सिंघासन

Submitted by पायस on 23 March, 2020 - 03:34

मध्ये नागराजचं समग्र कॉमिक कलेक्शन पुनःपारायणाचा योग आला. त्यात विषकन्या म्हणून मस्त कॉमिक आहे. नागतांत्रिक विषंधर नागराजला मारण्यासाठी यक्षराक्षस गरलगंटची आराधना करून एक विषकन्या यज्ञातून उत्पन्न करतो आणि मग नागराज विरुद्ध ते दोघे असा सामना आहे. ते वाचताना इतर विषकन्या रेसिपी डोक्यात घोळू लागल्या. अशा वेळी सिंघासन मधली रेसिपी आठवणे आणि तो सिनेमा बघणे हे ओघाने आलेच. तरी दोन जितेंद्र एक प्राण,
दोन राज्ये कारस्थाने बेसुमार,
एक राजकन्या एक विषकन्या,
शक्ती कपूर अमजद खान आपले चन्या मन्या
आणि महत्त्वाचा भिडू कादर खान असा हा चांदोबापट आहे. जितेंद्र-कादर खान द्वयीने ८० मध्ये केलेल्या पातालभैरवीपटांपैकी एक! याचे रसग्रहण पुढीलप्रमाणे

१) गांधार राज्यात गांधारी नाही

हा सिनेमा पद्मालया स्टुडिओज् ने बनवला असल्याने यावर साऊथपटांचा जबर पगडा आहे. त्यामुळे भडक रंगाचे सेट्स, कपडे वगैरेंची रेलचेल आहे. धरम-वीर हा अ‍ॅक्चुअली फार संयत चित्रपट आहे हे सिंहासन सारखे सिनेमे बघितल्याशिवाय लक्षात येत नाही. याचा दिग्दर्शक कृष्णा हा तेलुगु इंडस्ट्रीचा मूळ क्विक गन मुरुगन. याची तेलुगु आवृत्ती सुद्धा मिळते पण जितेंद्र आणि कादर खान जी मजा आणतात ती तेलुगु मध्ये नाही.

१.१) ग्रीक लोकांचा गांधारावर प्रभाव होता

नमनाला आपल्याला जितेंद्र एका रथात येताना दिसतो. जंपिंग जॅक गांधार देशाचा महावीर सेनापती विक्रमसिंग आहे. काही कारणाने हे लोक गांधारला गांधारा म्हणतात. आपण दोन्ही नावे आलटून पालटून वापरू. विक्रमसिंग कुठलीशी लढाई जिंकून राजधानीत परतला आहे. ग्रीक शैलीचे शिरस्त्राण व चिलखत आहे. लक्षात घ्या की अलेक्झांडरचे भारतातील पहिले पाऊल हे गांधार देशात पडले होते आणि गांधार शिल्पकलेवर ग्रीकांचा प्रभाव दिसून येतो. त्यामुळे गांधार देशातील वेषभूषा ग्रीक असणे स्वाभाविक आहे. ही गोष्ट वेगळी की लवकरच हे लॉजिक धाब्यावर बसवले जाते बट दे ट्राईड. जॅकची विजययात्रा चाललेली असताना मध्ये मध्ये जयाप्रदाचे शॉट्स. सुरुवातीलाच हिरो-हिरोईन जोडी एस्टॅब्लिश करून दिग्दर्शक आपले कौशल्य सिद्ध करतो. ग्रीक प्रभाव असल्याने राजसभा उघड्यावर, सॉरी प्रशस्त पटांगणावर भरलेली आहे. गांधार नरेश दाखवला आहे भारत भूषण. याचे नाव आहे शमींद्र भूपती. तसे बघता केवळ आपला राजा भारत भूषण आहे या एका कारणासाठी लोकांनी या व्हल्नरेबल राजसभेचा फायदा घेऊन दगडांचा वर्षाव करायला हरकत नाही पण पेमेंट वेळेत होत असल्याने ही सर्व एक्स्ट्रा जनता फारच खुशीत आहे.

भाभू जॅकचे स्वागत करतो. उजव्या हाताला जयाप्रदा बसलेली आहे - ही देशाची राजकन्या अलकनंदा. डाव्या हाताला कादर खान आहे - हा महामंत्री भानू प्रताप. अशा सिनेमांत सिंहासनाच्या मंडपाच्या पायर्‍यांवर उभे राहायला एक पात्र लागते. इथे गुलशन ग्रोव्हरची वर्णी लागली आहे. जॅक कुठल्याशा राजपुरी पर्यंतचा इलाखा जिंकून आलेला असतो. ही राजपुरी कुठे आहे हा प्रश्न अगदी बिनमहत्त्वाचा आहे. तसेच ग्रीक प्रभावामुळे या सगळ्या अनाऊंसमेंट पब्लिक आहेत. आपल्या राज्याची खलबते, मिलिटरी स्ट्रॅटेजी, आर्थिक धोरणे सर्वकाही माहितीच्या अधिकारांतर्गत जनतेस उपलब्ध आहे. हा सिनेमा बघून डेमोस्थेनिस स्वर्गातून पुष्पवृष्टी करेल असा आमचा कयास आहे. गेला बाजार एक भाषण तर नक्कीच ठोकेल.

१.२) सामंत व्यवस्था

भाभूचे राज्य सामंत सिस्टिम फॉलो करते. पुढील सीन वरून असे दिसते की जॅकला सामंतांची बंडाळी मोडून काढायला पाठवले होते. तो सोबत बरेच सामंत घेऊन आलेला असतो. एक एक करून प्रत्येक सामंत भाभू पुढे हजेरी लावतो आणि भाभू त्याला उदार मनाने सन्मानित करतो. यात मुख्य सामंत आहेत - काल भैरव (प्रवीण कुमार, महाभारतातला भीम), दुर्गापुरचा सामंत आणि राजगडचा जहागीरदार कटारी कटैया (गुरबचन सिंग). काल भैरव आणि कटारी कटैया अशी नावे असलेली लोकं अर्थात व्हिलन पार्टीत असणार हे कोणीही सांगू शकतं. त्यामुळे त्यांचा मेकअपही तसाच आहे. आणखी एक हरेंद्र गौतम म्हणून कोणी दाखवला आहे पण तो चेहर्‍यावरूनच युसलेस दिसत असल्यामुळे त्याला भाभूही भाव देत नाही. इतर दोघांना मात्र स्पेशल ट्रीटमेंट आहे - काल भैरवला पहिले आसन मिळते तर कटारी कटैयाला सोबत दोन आयटम आणता येतात. मग तो एका थाळीत भाभूचे पाय घेऊन नुसतेच चोळतो (मला वाटलं दुधाने धुवेल) आणि तेच हात डोईला स्पर्शून जागेवर बसतो. चरणांची धूळ मस्तकी लावणेचे इतके शब्दशः चित्रण मी प्रथमच पाहिले. बाकी मग दहाबारा पडेल चेहर्‍याचे एक्स्ट्रा आहेत ते आपले असेच आहेत.

कादर खान युद्धात हरलेल्या त्या सर्वांचे सांत्वन करून त्यांना आश्वस्त करतो की तुमची वतने तशीच पुढे चालू राहतील फक्त राज्याप्रती निष्ठावंत रहा. मग भाभू जॅकचे तोंडभरून कौतुक करतो. इथे भाभूचा क्लोजअप आहे ज्यावरून कळते की हे राज्य चंद्रवंशी आहे. मग जॅकला देशरक्षक आणि परमशूरवीर अशी बिरुदे मिळतात. इंटरेस्टिंगली याच्या कंबरेला क्सिफोसच्या (ग्रीक शॉर्टस्वोर्ड) बनावटीला मिळती जुळती तलवार आहे. त्याला जयाप्रदाच्या हस्ते एक राजवंशाची तलवार भेट दिली जाते. ही मात्र ब्रॉडस्वोर्ड आहे जे फारच बुचकळ्यात टाकणारे आहे. आता एवढं सगळं झाल्यावर जयाप्रदाला पण काहीतरी द्यायला हवे. मग ती दिवास्वप्न बघू लागते आणि दोघांचे गाणे सुरु होते.

१.३) कॉस्मिक गाणे

गाण्याचे बोल आहेत "किस्मत लिखनेवाले पर जरा बस जो चले हमारा, अपने हिस्से में लिख लें हम सारा प्यार तुम्हारा". थोडक्यात पझेसिव्ह कपल आहे. या सिनेमातली गाणी गुणगुणायला म्हणून बरी आहेत. संगीत आहे बप्पीदांचे आणि गायक आहेत किशोर कुमार आणि आशा भोसले. गाण्यात काही शिकण्यासारखे नसले की प्रेक्षक नृत्यावर लक्ष केंद्रित करतो. हे नृत्य म्हणजे वैश्विक स्तरावरचे नृत्य आहे. आधी बॅकग्राऊंडसमोर उदबत्ती लावून तिचा धूर शूट केला आहे. मग वेगवेगळे जितेंद्र-जयाप्रदा शॉट्स आणि हे सर्व ग्राफिक मॅच करून एक शॉट. या सगळ्यामध्ये ग्रहगोलांची अगतिक भ्रमणे आणि अभ्राच्छादित अंतराळ आहे. अंतराळात टिकणारे हे विशेष ढग केवळ गांधार देशात मिळत असल्याने आपल्याला आज ते बघावयास मिळत नाहीत.

जितेंद्रला एक कुरळ्या केसांचा विग दिला आहे. हा सेम विग तेलुगु सिनेमात कृष्णा पण वापरतो. कृष्णाला तो विग फिट बसतो, जॅकला नाही. कधी कधी उलटी परिस्थिती सुद्धा होते. माझा अंदाज असा आहे की दोन्ही सिनेमांचे युनिट एकच असल्याने कधी जॅकचा विग कृष्णाला तर कधी कृष्णाचा विग जॅकला गेला आहे. जयाप्रदाला नागराणी छाप मुकुट का दिला असेल याचा मी अजून विचार करतो आहे. बहुतांश वेळ ते दोघे ट्रॉलीवरून इकडून तिकडे जातात आणि तिकडून इकडे येतात. पुणे ५२ ची प्रेरणा इथूनच आलेली आहे. मध्येच ते लाल सूर्यासमोर डान्स करतात आणि अचानक एक पंखवाला घोडा न जाणे कुठून येतो. कहर प्रकार म्हणजे मध्ये मध्ये एक टुंग-टुंगटुडुंग-टुंगडुंग-टुंगडुंग-टुंग-टुंगटुडुंग-टुंगडुंग-टुंगडुंग-टुंग अशी काहीतरी ट्यून वाजते जी काहीशी ऑफबीट आहे. त्यावरच्या जयाप्रदाच्या स्टेप्स पूर्णपणे ऑफबीट आहेत. "राजकन्यांनी किमान स्वतःच्या स्वप्नात तरी बीटमध्ये नाचावे" असा नियम नसल्याची खंत वाटते. आणि हे लोक नक्की किती राज्ये फिरून आले आहेत - यांच्या स्वप्नात त्यांना किल्ले, मिनार, इमारती, वाडे, महाल आणि अगणित वेगवेगळ्या स्थापत्यशैलींचे नमुने आहेत. नि:संकोचपणे खर्चा कियेला हैं.

याने पोट न भरल्याने शेवटच्या कडव्यात जयाप्रदा शब्दशः दागिन्यांनी मढून येते. आता तिच्या डोक्यावर एक मोराचा मुकुट आहे. आता मोराचा मुकुट घातलाच आहे तर मोराच्या स्टेप्स केल्या पाहिजेत म्हणून ती पिसारा फुलवल्याचे कल्पून मोरासारखी नाचू लागते. इथे दिग्दर्शक विसरतो की पिसारा हा नर मोराला असतो. मादी मोर अर्थात लांडोर पिसारा फुलवून नाचत नाही. पण बहुधा जितेंद्राने थुईथुई नाचण्यास नकार दिला असावा किंवा जयाप्रदा तशीही थुईथुई नाचते आहे तर हेही करून बघू असा विचार झाला असावा. एकदाची जयाप्रदा स्वप्न बघता बघता दमते आणि हे गाणे संपते.

२) अवंती राज्यात एकही प्रद्योत नाही

२.१) स्टॉकर महामंत्री

सीन चेंज, जयाप्रदा शयनकक्षात झोपली आहे. हिचा पलंग एकदम भारी दाखवला आहे. डोक्यापाशी पलंगाला मोराच्या आकाराचे खांब आहेत. चार चिल्लर सैनिक हातात प्रत्येकी एक सुरा घेऊन तिला मारायला येतात. ते तिला मारणार इतक्यात जॅक कुठून तरी येऊन तिला वाचवतो. तिला वाचवण्याच्या नादात तिच्या पोटावर तो रेलल्याने ही जागी होते. काय झाले हे कळण्याच्या आत ते चार चिल्लर सैनिक पळून जातात आणि रेघारेघांचे फेटे बांधलेले चार भालदार उगवतात आणि आपापले भाले जितेंद्रावर रोखतात. मग तिथे कादर खान येतो. तो जॅकवर राजकुमारीच्या हत्येच्या प्रयत्नाचा आरोप ठेवतो. आता तेच चार चिल्लर सैनिक येतात आणि जितेंद्रला पकडून नेतात. कादर खान व्हिलन असल्याचे इथे चाणाक्ष प्रेक्षक ओळखतो. जयाप्रदालाही काहीतरी काळेबेरे असल्याची शंका येते पण ती गप्प राहते.

दुसर्‍या दिवशी त्याला राजसभेत आणले जाते आणि फुल्ल पब्लिक डिसक्लोजरमध्ये जॅकचा खटला सुरू होतो. सुजितकुमार अधियोजक अर्थात पब्लिक प्रॉसिक्यूटर दाखवला आहे. त्याचा मुख्य साक्षीदार असतो कादर खान. कादर खान म्हणतो की रात्री मी राजकुमारीच्या खोलीकडे कोणाला तरी जाताना पाहिले आणि मी सैनिकांसोबत त्या सावलीचा पाठलाग केला. पाहतो तर काय, महावीर, परमवीर, परमशूरवीर, देशरक्षक विक्रमसिंग खंजीराने राजकुमारीची हत्या करण्याचा प्रयत्न करत होता. सुजितकुमार जरा हुशार असतो. तो म्हणतो ते सगळं ठीक आहे पण मध्यरात्री तू, महामंत्री, राजमहालात काय करत होता? यावर कादर खान म्हणतो की यू सी, अवर महाराज हॅज नो सन ओन्ली डॉटर. अ‍ॅन्ड सम पीपल आर सो डाऊनमार्केट दॅट दे डोन्ट वॉन्ट अ क्वीन अ‍ॅज देअर रुलर. म्हणून मी प्रत्येक क्षण राजकुमारीवर नजर ठेवून असतो; तिच्या सुरक्षेकरिता ऑफकोर्स. अर्थात यावर कोणाला काहीच प्रॉब्लेम नसल्याने सुजितकुमार पुढचा प्रश्न विचारतो - मॉन अमी, व्हॉट्स द मोटिफ? कादर खानचे उत्तर तयारच असते - सिंहासनाची अभिलाषा. सगळी सेना पाठीशी असल्याने हा शेफारला आहे आणि आता याला राजा बनण्याची स्वप्ने पडत आहेत. सुजितकुमार म्हणतो - पण मग राजकुमारीला मारण्याची काय गरज आहे, तिला बंदी बनवून पण काम झालं असतं की? हायला हा वकील आहे की कादर खानचा मुलाखतकार? कादर खानची क्रॉस चालू असताना त्याला स्पेक्युलेट काय करायला लावतो आहे? आणि महामंत्री कोतवालाची कामं का करत हिंडतो आहे? सर्वात महत्त्वाचा प्रश्न - गुलशन ग्रोव्हर कोण आहे? त्याला नुसतंच सिंहासनासमोरच्या पायर्‍यांवर का उभं केलं आहे?

कादर खानच्या म्हणण्यानुसार जितेंद्रला भीति असते की राजकुमारीला बंदी बनवलं तर जनता त्याच्याविरोधात बंड करेल. या क्लेममध्ये काहीच अर्थ नाही. जर जितेंद्र राज्यातल्या सगळ्या सामंतांना एकटाच पुरून उरत असेल तर असल्या किरकोळ बंडांना तो का भीक घालेल? पण सुजितकुमार त्यावर विश्वास ठेवतो. आता जॅकचा डिफेन्स सुरू होतो. जॅकवर राज्यअपहरणाचा आरोप ठेवला जातो. आँ? याने अपहरण कोणाचं केलं? असला फडतूस प्रॉसिक्यूटर बघता आपण खटला जिंकण्याची सुतराम शक्यता नसल्याचे जॅकला कळून चुकते. तो म्हणतो की मी राजकुमारीला मारण्याचा प्रयत्न केला नाही. तुम्हाला नसेल पटत तर गेलात उडत. भाभू त्याची पूर्वीची सेवा लक्षात घेऊन त्याला फाशी देण्याऐवजी हद्दपार करतो. जितेंद्र जाता जाता त्याला सावध राहण्याचा इशारा देऊन निघून जातो.

२.२) स्नुषा संशोधनासाठी देवळात जावे

आता दुसर्‍या राज्यात काय चालू आहे ते बघण्याची वेळ झाली आहे. या राज्याचे नाव अवंती. अवंतीमध्ये दिसतात प्राण, अमजद खान आणि शक्ती कपूर. शक्ती कपूरचा ड्रेस आय थिंक रोमन स्टाईलचा आहे. ग्रीक-इटली शेजार म्हणून तसे ते केले असावे. याच्या कपाळावरही चंद्रकोर आहे फक्त ती तिरकी आहे. थोडक्यात दोन्ही राज्ये चंद्रवंशी असल्याने यांच्यात एक कॉमन धागा आहे. हा अवंतीचा सेनापती दाखवला आहे. पद्मालयवाल्यांना अमजदचा पातालभैरवीतला गुटगुटीत, गोंडस रोल आवडल्याने त्याची पुनरावृत्ती केली आहे. याला "बादाम खाके" म्हणण्याची सवय आहे. प्राण या सगळ्यांचा गुरु, अवंतीचा राजगुरु असल्याचे त्याच्या वेशभूषेवरून ताडता येते. याचे नाव आहे आचार्य अभंगदेव. अवंतीमध्ये आज लोकं वेड्यासारखे एका मंदिराच्या दिशेने धावत सुटले आहेत. असे का बरे बादाम खाके? शक्ती कपूर म्हणतो की हे मंदिर गांधारा आणि अवंतीच्या सीमेवर आहे आणि दरवर्षी देवीच्या दर्शनाला म्हणून दोन्ही राज्यांची प्रजा इथे येते. प्राण मग मंदिराची हिस्टरी सांगतो. तीन पिढ्यांपूर्वी दोन्ही राज्यांनी शांतिसंधी करून त्याचे प्रतीक म्हणून हे अपराजिता देवीचे मंदिर बांधले. त्यामुळे इथल्या दहा कोसांचा परिसरात कोणीही मुक्त संचार करू शकतं.

मग तिथे जयाप्रदा, कादर खान, गुलशन ग्रोव्हर प्रभूती येतात. देवीची पूजा करायला म्हणून ते आलेले आहेत. कादर खान देवीला हात जोडून म्हणतो की बाय माझे, आमच्या राजाला मुलगा नाही. क्षणभर मला वाटले हा या वयात भाभूला मुलगा होऊ दे असा आशीर्वाद मागतो की काय पण तसे होत नाही. त्याचे म्हणणे असते भावी राणी अलकनंदेला आशीर्वाद दे. मग जयाप्रदा आशीर्वाद मागते. ती राजमुकुट घेऊन आलेली असते. असे कळते की भाभू आजारी असल्याने येऊ शकलेला नाही आणि प्रॉक्सी म्हणून राजमुकुट पाठवला आहे. या सीनचा तसा काही उपयोग नाही. पूजा झाल्यावर ती बाहेर पडते तर गाभार्‍याबाहेर वहिदा रहमान आणि श्रीराम लागू उभे असतात. ते कोपर्‍यात उभे राहून जयाप्रदाला ताडतात. वहिदा अवंतीची राजमाता आहे तर श्रीराम लागू महामंत्री. वहिदा म्हणते पोरगी सुंदर आहे नै. श्री.ला. लगेच पुस्ती जोडतात की युद्धनीति आणि राजनीतिमध्ये सुद्धा निपुण आहे. इथे उच्चार शुद्ध असल्याचा फायदा होऊन भाभूच्या नावाचा जो शमींद्र, शरमेंद्र असा इतका वेळ उद्धार चालवला आहे ते नाव क्षेमेंद्र असल्याचे कळते. वहिदाची इच्छा असते की जयाप्रदा आपली सून व्हावी. यात एक प्रॉब्लेम आहे - राजकुमार आदित्य वर्धन अगदीच ऐषारामी राजपुत्र आहे.

२.३) सिंगल जितेंद्र डबल जॅक, लेट्स अनलीश द बूबा पॅक

अमजद खान, याचे नाव कुपटेश्वर, येऊन सांगतो की राजकुमार पूजेला येणार नाही. त्याच्या जागी त्याचा भाऊ उग्रराहू पूजा करेल असं प्राणने ठरवल्याचेही तो सांगतो. वहिदा मनातली खंत बोलून दाखवते - अभंगदेवच्या मार्गदर्शनाखाली आदित्य सर्व विज्ञांमध्ये पारंगत तर झाला पण ऐषारामी वृत्तीही त्याच्या हाडामासी खिळली. हा क्यू घेऊन जितेंद्र क्रमांक दोनची एंट्री. आदित्यवर्धनही जितेंद्रच दाखवला आहे. याचा विग थोडा वेगळा आहे ज्याच्या मदतीने तो ओळखू येतो. आदित्यवर्धन आपल्या महालात दारू पिऊन चार अर्धनग्न ललनांसोबत ऐष करत असतो. अशा वेळी गाणे झालेच पाहिजे.

गाण्याचे बोल आहेत बूबा बूबा मेरी बूबा...............
नो जोक्स हिअर - हे गाण्याचे अ‍ॅक्चुअल बोल आहेत. सुरुवातीला बरंच दिल मेरा डूबा, मेरी महबूबा वगैरे होतं आणि मग बूबा बूबा, बूबा बूबा, बूबा बूबा, बूबा बूबा मेरी बूबा सुरु. यातल्या सर्व बूबांना जितेंद्र आणि एक बाई आपापाल्या छात्यांचा भाता एकमेकांच्या दिशेने ओढतात. आधीच्या जितेंद्रला किशोरचा आवाज वापरल्याने या जितेंद्रला बप्पीदांनी स्वतःचा आवाज दिला आहे. बायकांसाठी आवाज आशाजींचा. आधीचा जितेंद्र तितका मनमोकळेपणाने नाचत नसल्याने हा जितेंद्र फुल ऑन नाचतो. या ललना नाचतात कमी आणि थरथरतात जास्त. तो काय टकलू हैवान आहे थरथराट व्हायला? याच्या कपाळावरही चंद्रकोर आहे आणि महालात पिसारा फुलवलेला एक भलामोठा कांशाचा मोर आहे. ही सेट डिझाईन मधली थिमॅटिक कन्सिस्टन्सी वाखाणण्याजोगी आहे. पण काही ठिकाणी हलगर्जीपणा केलेला आहे. एक बाईची मूर्ती आहे आणि तिच्या हातात चक्क शॉवरहेड दिलं आहे. आता एखादे भांडे देऊन त्यातून पाणी पडताना दाखवले असते तर ठीक होतं पण शॉवर? आणि जितेंद्र मेरी बूबा म्हणतो ते महबूबाचा शॉर्टफॉर्म म्हणून खपतं तरी; यातली मुख्य ललना फुल्ल सिडक्टिव्हली मेरा बूबा म्हणत आहेत, विथ कॅमेरा अ‍ॅट रिक्वायर्ड अँगल!!

मध्येच जितेंद्र आणि ललनांचे ब्रेकडान्स मोंटाज सुरु होते. मग जितेंद्र आणि मुख्य ललनेचा रोमान्स आणि इतर बायकांचे त्यावर कौतुकाने लारालूं, जितेंद्रचे दर दोन कट नंतर कपडे बदलणे, उड्या मारत डान्स करणे, महालाचे इंटेरिअर बदलणे इत्यादि प्रकार घडतात. एवढ्यानेही समाधान न झाल्याने या ललना ओकाशिबा आणि लालालाला करत नाचू लागतात. इथे भविष्यात करिश्मा कपूर-गोविंदाने वापरलेल्या काही स्टेप्स दिसतात. यानेही मजा न आल्याने याचा पलंग गोल गोल फिरायला लागतो आणि त्यावर बूबा बूबा होते. एवढे बूबा बूबा झाल्याने त्या ललनांच्या सिंक्रोची पार वाट लागते आणि दिग्दर्शक नाईलाजाने गाणे आवरते घेतो.

३) पहिली चकमक

३.१) ऐदी राजकुमार

आता इतर बूबा खोलीतून बाहेर गेल्या आहेत आणि जॅक क्रमांक दोन व मुख्य ललनेचा रोमान्स सुरू आहे. मुख्य ललना राजनर्तकी असून तिचे नाव आहे जसवन्ती. आपण तिला जास्वंदी म्हणूयात. जितेंद्र जास्वंदी ओठांमध्ये गुंगण्याच्या मूडमध्ये आहे पण तिला जितेंद्राच्या इभ्रतीची पडली आहे. ती म्हणते की जनतेचे काय? तिच्याप्रती असलेल्या जबाबदारीचे काय? जितेंद्र म्हणतो जनता को तो उपरवाला जनता (जन्म देतो) हैं, और जो जनता हैं वही जनता की चिंता करता हैं. हे असे कादर खान स्पेशल डायलॉग्ज या सिनेमात दर मिनिटाला सापडतात. अजूनही थोडे डायलॉक मारले जातात पण मुख्य मुद्दा असा आहे की जितेंद्रला आपल्या जबाबदारीचं फार काही पडलेलं नाही. आधी नमूद केल्याप्रमाणे तो कर्तव्यपरायण नाही. जास्वंदीने मुघल-ए-आझम पाहिला असावा कारण तिला त्या दोघांचे प्रेम बदनाम होईल अशी शंका आहे. पण जॅक-२ भलताच कूल असतो - जो प्यार बदनाम नही होता उस प्यार का कोई नाम नही होता. त्याचं म्हणणं असतं की माझ्यावतीने राजगुरु देवीची पूजा करवतील आणि मी तुझी पूजा करेन. राजघराण्यात जन्मल्याचा अर्थ असा की माझ्यासाठी डोकं कोणीतरी दुसरं चालवेल आणि युद्धात हाणामारी अजून कोणी तिसरं करेल. मी का चिंता करू? वहिदा जेव्हा याच्या नावानं बोट मोडत होती तेव्हा ती याचा ऐदीपणा अंडररेट करत असल्याचे आता प्रेक्षकाला कळून चुकते. हा दारु आणि बाई दोन्हीच्या नादी लागल्याचे आपल्याला कळून चुकते.

३.२) रॉबिनहूड सेनापती

सीन चेंज. पहाटेची वेळ. भडक निळ्या रंगाचे कपडे घातलेले पहारेकरी आणि त्यांनी संरक्षित एक छावणी. या छावणीला काही डाकूंनी घेरले आहे. सर्व पहारेकर्‍यांना बेशुद्ध केले जाते आणि काळाकभिन्न दिसणारा मुख्य डाकू एका तंबूत प्रवेश करतो. हा जयाप्रदाचा तंबू आहे. जयाप्रदा आणि तिच्या दासी साखरझोपेत आहेत आणि राजमुकुट निष्काळजीपणे जवळच एका मंचकावर ठेवलेला आहे. का.क. डाकू मुकुट उचलून पोबारा करतो. एका पहारेकर्‍याला वेळेत शुद्ध येते आणि तो झोपलेल्या सेनापतीला उठवून चोरीची बातमी देतो. मग सैनिक त्या डाकूंचा पाठलाग करू लागतात. जंगलातल्या वाटांशी परिचय नसल्याने थोड्याच वेळात ते डाकू त्यांना चकवा देण्यात यशस्वी होतात.

भाभू ही बातमी ऐकून भलताच क्रुद्ध होतो. म्हणजे असे समजण्याची अपेक्षा आहे कारण नेहमीप्रमाणेच त्याच्या चेहर्‍यावर काहीही भाव नाहीत आणि आवाजात काहीही चढउतार नाही. तो महामंत्री आणि सेनापतीला उगाच दोन शब्द सुनावतो पण हे आपलं नगास नग. ते गेल्यावर जयाप्रदा त्याला विचारते "तुम्ही म्हणता हा मुकुट विशेष आहे. म्हणजे नक्की काय?" भाभू म्हणतो उस मुकुट में महिमा हैं (म्हणजे परदेशी बनावट), करिश्मा हैं (खानदानी आहे), चमत्कार हैं (आर यू शुअर इथे उर्मिला हैं म्हणायचं नव्हतं आणि चित्रपटाचं नाव घ्यायचं होतं?). एनीवे, अ‍ॅपरंटली हा मुकुट कोणा योग्याने भूपती घराण्याला दिलेला असतो आणि जोपर्यंत हा मुकुट आहे तोपर्यंत या घराण्याचे राज्य कायम राहिल असा आशीर्वादही दिलेला असतो. भाभू संशय व्यक्त करतो की हे कोणाचे तरी षडयंत्र आहे.

तिकडे जितेंद्र क्रमांक १, विक्रम सिंग आता डाकू बनला आहे. याने मुकुट चोरलेला नाही, चिंता नसावी. आता रेशमी वस्त्रे व कवच कुंडले जाऊन साधा वेष, फेटा आणि केसाळ लेदर जाकिट आले आहे. याच्या गुहेत छान गारवा असावा अन्यथा त्या जाकिटाला काही अर्थ नाही. पण इतक्या मशालींमुळे पुरेशी उष्णता मिळत असावी. तरी स्वतःला त्रास करून घ्यायचा याचा हट्ट असल्याने हा तसाच जाकिट घालून हिंडत आहे. विक्रमसिंगचा अंदाज असतो की हे षडयंत्र सामंतांपैकी एकाचे आहे. त्याचा संशय काल भैरववर असतो कारण काल भैरव एक नंबरचा लोभी आहे. तसेच या सगळ्यामागे कोणी एक मुख्य व्हिलन असल्याचा संशयही तो बोलून दाखवतो. आता प्रश्न इतकाच की हा कोणी घरचा आहे की अवंतीचा? याच्याकडे सार्‍या गावाची बित्तंबातमी असल्याने याला हे माहित असते की गांधाराचा प्रॉब्लेम आहे की कोणीतरी राजकुमारीला मारण्याचा प्रयत्न करत आहे तर अवंतीमध्ये विविध प्रकारचे कर लादून जनतेची पिळवणूक चालली आहे. त्यामुळे यांचे कार्य ठरलेले आहे - भूपती घराण्याचे रक्षण आणि अवंतीच्या जनतेची करांच्या दुष्टचक्रातून मुक्तता. तेवढ्यात एकजण येऊन बातमी देतो की कसलातरी खजिना राजगडच्या दिशेने जातो आहे. रॉबिनहूडगिरी सुरु करण्याची वेळ झाली आहे.

३.३) कटारी कटैया

राजगडची जहागीर कटारी कटैयाची असल्याने साहजिकच याच्यामागे त्याचा हात आहे. जॅक-१ जाऊन तो खजिना अडवतो. खजिना म्हणजे एका रथात काही पेटारे घालून दोन जण नेत असतात. इतकी ढिसाळ सुरक्षाव्यवस्था क्वचितच बघावयास मिळते. त्यात हे दोघे विक्रमसिंगला मानणारे निघतात. ते त्याला कसलीही आडकाठी करत नाहीत. तो घोड्यावरून उडी मारून रथात येतो. पेटार्‍यांमध्ये हिरे-जवाहिर, सोने-नाणी इ. असते. तसेच रेशमी कपड्यावर एक पत्र आहे. कोणा "भविष्यवाणी" नामक इसमाने कटारी कटैयासाठी आशीर्वाद आणि हा खजिना पाठवलेला असतो. निश्चितच हा भविष्यवाणी मुख्य व्हिलन आहे. पण कोण?

आता जितेंद्र ठरवतो की मुख्य व्हिलनला नंतर बघता येईल आधी कटारी कटैयाला धडा शिकवूयात. इथे त्याचा एक आऊट ऑफ फोकस शॉट आणि शेपटी हलवत असलेल्या घोड्याच्या पार्श्वभागावर फोकस! मग जितेंद्र सगळा खजिना काढून घेऊन पेटार्‍यांमध्ये दगडं भरून कटैयाकडे पाठवतो. सोबत स्वतःचे एक पत्रही देतो. पत्रात कटैयाची निर्भत्सना केलेली असते. याने तो भलताच चिडतो आणि आपली भेडिया फौज जितेंद्राच्या मागावर पाठवायचा आदेश देतो. इथे अपेक्षा काय की जितेंद्रचा पाठलाग होईल, मे बी जितेंद्र याला खिंडीत गाठून आपले युद्ध कौशल्य दाखवेल, मग चार दोन डायलॉग, दोन चार खणाखणी. पण नाही. जितेंद्र ओरडतो कटैयाऽऽऽऽऽऽऽ हा प्राणी कटैयाच्या तळावर येऊन कटैया चिडण्याची वाट बघत विंगेत उभा आहे.

जॅक त्याला "घास खानेवाला खच्चर" आणि स्वतःला सिंह म्हणवून घेतो. तसे बघावे तर दोघेही गाढव आहेत पण जोपर्यंत ते एकमेकांना मनुष्य म्हणवून घेत नाहीत तोवर काही हरकत नाही. जितेंद्र त्याला म्हणतो की त्या भविष्यवाणीसोबत मिळून देशद्रोही कारवाया करणे बंद कर. कटैया त्याला म्हणतो मला उपदेश करण्याआधी तू डाकूगिरी बंद कर. हो ना करता करता मुद्दा सर काटण्यापर्यंत येतो. जॅक सुचवतो की चल द्वंद्व करून याचा निकाल लावू. कटैया म्हणतो ठीक आहे. जितेंद्र-१ इथून पुढे शक्य तितक्या उड्या मारत असल्याची नोंद घ्यावी. त्यामुळे तो घोड्यावरही उडी मारून बसतो. द्वंद्व असे असते की हे घोडेस्वार एकमेकांच्या दिशेने येणार, तलवारीने दुसर्‍याचे मस्तक धडावेगळे करण्याचा प्रयत्न करणार, जर दोघे फेल गेले तर रिपीट. थोडी खणाखणी झाल्यानंतर कटैया मोठ्या हुशारीने जितेंद्राच्या घोड्याच्या पायांवर वार करतो. याने जॅक आणि त्याचा घोडा दोघेही तोंडावर आपटतात. मग जॅकला घोड्याच्या टापांखाली चिरडण्याचा प्रयत्न होतो पण जॅकही कटैयाला घोड्यावरून खाली पाडतो. पुनश्च खणाखणी. जॅकला जखमही होते. पण त्याच्या उडी मारण्याच्या सुपरपॉवरपुढे लवकर कटैया निष्प्रभ ठरतो आणि चांगलाच घायाळ होतो. जितेंद्र मग कटैयाच्या नावाने एक नवीन संदेश लिहून घेतो - क्षेमेंद्र महाराजांना माझा प्रणाम. माझा या राजद्रोहाशी काही संबंध नाही, मी पूर्वीप्रमाणेच तुमच्याशी एकनिष्ठ आहे. मग तो खजिन्यासकट नवीन संदेश भाभूकडे पाठवून देतो.

इथे माझा अल्पविराम. भविष्यवाणी कोण, विषकन्या कोण, ती कशी बनवली जाते आणि अशाच इतर रोमहर्षक बाबी प्रतिसादांत कव्हर करतो.

विषय: 
शब्दखुणा: 
Groups audience: 
Group content visibility: 
Use group defaults

१४) क्लायमॅक्स

इथे अकरा मिनिटांचा एपिक क्लायमॅक्स सुरु होतो. मंदाकिनी कोळिणीचा ड्रेस घालून राजमहालात बसलेली असताना तिला जॅक-२ ला फाशी देणार असल्याची बातमी समजते. पण तिला रिअ‍ॅक्ट होण्याची संधी न देता कैद केले जाते. शक्ती कपूर मग वल्गना करू लागतो की वी आर ऑन, आता होऊन जाऊ दे. पण अनुभवी व्हिलन प्राण त्याला जमिनीवर आणत, अजूनही जॅक-१ आणि जयाप्रदा बाकी असल्याचे त्याच्या ध्यानात आणून देतो. प्राण जॅक-१ ची स्ट्रॅटेजी त्याच्याच विरुद्ध वापरायचे ठरवतो. जसे अलकनंदेच्या राजतिलकाच्या दिवशी जसे विक्रमसिंगने सर्व जहागीरदारांच्या सेनेला जंगलातच अडवून गांधारात पोहोचू दिले नव्हते, तसेच विक्रमसिंग आणि अलकनंदेला जंगलातच अडवून अवंतीत पोहोचू द्यायचे नाही असे ठरते. यासाठी कटारी कटैयाची मदत घेतली जाते. हा प्लॅन कागदावरच फेल आहे. कारण ज्या कटैयाला विक्रमसिंग "घास खानेवाला बेवकूफ खच्चर" म्हणतो त्याच्यात विक्रमसिंगला अडवण्याची क्षमता असण्याची अपेक्षा धरणे शुद्ध मूर्खपणा आहे.

आणि तस्सेच होते. विक्रमसिंग एकटाच अवंतीच्या दिशेने घोड्यावरून निघतो. वाटेत काही सैनिक त्याला गाठतात. तलवार गोफणीसारखी डोक्यावरून फिरवून समोरच्याच्या छातीवर किंवा गळ्यावर वार करण्याचे जादुई कौशल्य जॅक-१ कडे आहे. हे कौशल्य इतके जादुई आहे की कधी कधी त्याने उजवीकडे केलेला वार डावीकडे लागतो. कधी कधी तर वार लागण्याचीही गरज पडत नाही, नुसत्या एअर स्लॅशनेही ते सैनिक उडून पडतात. नंतर नंतर ते सैनिक हतबल होऊन तसेच उभे राहतात की कधी हा तलवार फिरवतो आणि आम्ही खाली पडतो. आधीच उल्हास त्यात फाल्गुनमास या न्यायाने जयाप्रदाही अवंतीच्या दिशेने कूच करते. हिला ग्रीक शैलीचे शिरस्त्राण दिले आहे. फक्त अलेक्झांडर आणि इतर ग्रीक योद्धे सोनेरी रंगाची शिरस्त्राणे घालत, जयाप्रदा गुलाबी रंगाचे शिरस्त्राण घालते. ग्रीक योद्ध्यांच्या शिरस्त्राणास पोलादी जाळीचे आवरण नसे, हिच्या शिरस्त्राणाला आहे. आणि अखेरीस ग्रीक योद्धे स्लीव्हलेस आणि हाफ पॅंट घालत असत जे फॉर ऑब्व्हिअस रीझन्स तिने घातलेले नाही. त्याऐवजी सोनेरी चिलखत, गुलाबी अंगरखा-सुरवार असा वेष आहे. हिला अडवायला मात्र एकही सैनिक मध्ये येत नाही. तसेच अवंतीकडे जाणारा रस्ता जंगलातून जात असूनही जयाप्रदा पूर्णवेळ मोकळ्या मैदानातून घोडदौड करते.

तिकडे राजसभेत पब्लिक डिसक्लोजरमध्ये प्राण आणि शक्ती कपूर जॅक-२ च्या फाशीचा कार्यक्रम सुरु करतात. वहिदा रहमान, श्री.ला. व कादर खान देखील उपस्थित आहेत. जॅक-२ च्या तोंडावर काळे कापड घालून जल्लादही तयार आहे. शक्ती कपूर आदेश देतो की सभेतील घंटा सहावेळा वाजवा आणि सहाव्या टोल्याला याला फाशी द्या. पण पाचवा टोला दिला जाणार तेवढ्यात तोंडावर फडके बांधून जॅक-१ तिथे पोहोचतो. तो म्हणतो की हा अन्याय आहे. शक्ती कपूर म्हणतो की फाशीच्या कार्यक्रमात अडसर आणणारा तू कोण लागून गेलास? जॅक-१ म्हणतो की याला फाशी द्यायला तू कोण लागून गेलास? प्राण सावरून घेत म्हणतो की हा विक्रमसिंगचा कोणी साथीदार असावा. जॅक-१ तोंडावरचे फडके बाजूला करून म्हणतो की मी साथीदार तर खुद्द विक्रमसिंग आहे. अवंतीच्या प्रजासभेत सर्वांकडे झूम एनेबल्ड डोळे असल्यामुळे त्यांना शंभर फुटांवरूनही आलेली व्यक्ती विक्रमसिंगच आहे हे दिसते. सिनेमा संपत आल्यामुळे जॅक-१ थोडक्यात सर्वकाही इस्कटून सांगतो. प्राणचा कुटिलपणा सिद्ध करण्यासाठी तो केअरटेकर आणि जास्वंदीला साक्षीदार सोबत घेऊनच आला आहे. हे बघितल्यावर वहिदाचे डोळे खाडकन उघडतात आणि ती प्राण व शक्ती कपूरला कैद करण्याचा आदेश देते.

यावर शक्ती कपूर तुच्छतेने तिला सांगतो की तिच्या आदेशांना आता काही किंमत उरली नाही. लपवाछपवी करण्यात काहीच अर्थ राहिला नसल्याने प्राण उघडपणे शक्ती कपूर आपले कारटे असल्याचे कबूल करतो. तो म्हणतो की हरकत नाही, आता दोन्ही जॅकना मारून मी त्यांच्या प्रेतांचे हवनकुंड बनवेन. पण एवढ्यावेळा तोंडावर पडून सुद्धा त्याला हे समजत नाही विक्रमसिंग अर्थातच पूर्ण तयारीनिशी आला असणार. विक्रमसिंगचे धनुर्धारी हा हा म्हणता प्राणच्या बर्‍याचशा सैनिकांना यमसदनी धाडतात. किल्ल्याचे दरवाजे उघडून इतका वेळ विंगेत दबा धरून बसलेल्या जयाप्रदाला आत घेतले जाते. ती आल्या आल्या जॅक-२ ची सुटका करते. मग दे दणादण हाणामारी सुरु होते. बाकीची हाणामारी फारशी इंटरेस्टिंग नसल्यामुळे आपण मुख्य फाईट्स बघू.

जास्वंदी जाऊन मंदाकिनीची सुटका करते. जास्वंदीला हिरो नसल्याची आठवण तिथल्या एका सैनिकाला होते. त्यामुळे तो मरता मरता चाकू मंदाकिनीवर फेकतो जेणेकरून जास्वंदी मध्ये स्वतःहून स्वतःला मारेल. का.क.डा. ला जॅक-१ एका फटक्यात मारतो, सॉफ्ट डिसमिसल. जयाप्रदा कादर खानला गाठते. एवढे चिलखत घातलेले असतानाहे ती कादरखानच्या देहापुढे फारच किरकोळ दिसते. कादरखानच्या उजवीकडे मोकळ्या जागेत तलवार भोसकून कादरखानला मारण्याचे जगावेगळे कसब तिच्या अंगी आहे. कटैयाला जॅक-१ दोन फटक्यात शब्दशः कटैया करून टाकतो. राहता राहिले शक्ती कपूर आणि प्राण.

जॅक-२ आणि शक्ती कपूर मोराच्या बेडरूममध्ये फेन्सिंग करतात. बाकीच्या यूसलेस व्हिलन्स तुलनेने शक्ती कपूर बरी फाईट देतो. पण जॅक-२ ऐदी राजपुत्रास न शोभणार्‍या दर्जाचा फेन्सर आहे. तो अखेर तलवार शक्तीच्या पोटात खुपसण्यात यशस्वी होतो. जॅक-१ प्राणला सिंहासनासमोर गाठतो. ज्या सिंहासनाला मिळवण्यासाठी प्राणने आयुष्य खर्च केले आणि ज्या प्रजाजनांना भडकावले, त्याच सिंहासनासमोर त्याच प्रजेच्या हातून प्राणचा मृत्यु जॅक-१ घडवून आणतो. मरता मरता प्राण सिंहासनावर बसण्याचा शेवटचा असफल प्रयत्न करतो. हे इंप्रॉव्ह नक्की प्राणचे असणार. एकदाचा तो भेलकांडत पडून मरतो. केअरटेकरलाही नंतर शिक्षा दिली गेली असावी.

आता संदेश देण्याइतपतच वेळ उरला असल्यामुळे दणादण संदेश दिले जातात. जॅक-२ जॅक-१ ला म्हणतो की अगर तुम ना होते तो न हमारा राज होता, न हमारे सिर पे ये ताज होता. जॅक-१ म्हणतो की आता सगळ्यांचे सगळे प्रॉब्लेम्स सॉल्व्ह झालेले आहेत, तरी मला जाऊ द्यात. इथे एक वेस्टेड पोटेन्शिअल दिसते. वहिदा म्हणते की तुझ्या रुपाने मला दुसरा मुलगा मिळाला. इथे जॅक-१ तिचा लहानपणी हरवलेला मुलगा दाखवता आला असता. पण मनमोहन देसाईची दूरदृष्टी कृष्णात नसल्यामुळे हा प्लॉट पॉईंट वाया गेला आहे. याकडे फारसे लक्ष जाऊ नये म्हणून वहिदा पुस्ती जोडते की या निमित्ताने का होईना जयाप्रदाला सून करून घ्यायची माझी इच्छा पूर्ण झाली. इथे जयाप्रदाच्या चेहर्‍यावर "मान ना मान, मैं तेरा मेहमान" असे भाव. संदेश फार लांबत आहेत असे लक्षात येताच श्री.ला. त्यांना "सदैव सुखी राहा" असा आशीर्वाद देऊन सिनेमा संपवून टाकतात. हा सावळा गोंधळ प्रजेने पब्लिक डिसक्लोजरमध्ये पाहिला असल्यामुळे ते "अवंती-गांधारा अमर रहे" अशी घोषणा आपल्या भावना व्यक्त करतात.

एकंदरीत सिनेमा इंटरेस्टिंग आहे पण हिरोच्या तुलनेत फारच कमकुवत व्हिलन घेतला की मजा जाते हेच खरे!

Pages