सिंघासन

Submitted by पायस on 23 March, 2020 - 03:34

मध्ये नागराजचं समग्र कॉमिक कलेक्शन पुनःपारायणाचा योग आला. त्यात विषकन्या म्हणून मस्त कॉमिक आहे. नागतांत्रिक विषंधर नागराजला मारण्यासाठी यक्षराक्षस गरलगंटची आराधना करून एक विषकन्या यज्ञातून उत्पन्न करतो आणि मग नागराज विरुद्ध ते दोघे असा सामना आहे. ते वाचताना इतर विषकन्या रेसिपी डोक्यात घोळू लागल्या. अशा वेळी सिंघासन मधली रेसिपी आठवणे आणि तो सिनेमा बघणे हे ओघाने आलेच. तरी दोन जितेंद्र एक प्राण,
दोन राज्ये कारस्थाने बेसुमार,
एक राजकन्या एक विषकन्या,
शक्ती कपूर अमजद खान आपले चन्या मन्या
आणि महत्त्वाचा भिडू कादर खान असा हा चांदोबापट आहे. जितेंद्र-कादर खान द्वयीने ८० मध्ये केलेल्या पातालभैरवीपटांपैकी एक! याचे रसग्रहण पुढीलप्रमाणे

१) गांधार राज्यात गांधारी नाही

हा सिनेमा पद्मालया स्टुडिओज् ने बनवला असल्याने यावर साऊथपटांचा जबर पगडा आहे. त्यामुळे भडक रंगाचे सेट्स, कपडे वगैरेंची रेलचेल आहे. धरम-वीर हा अ‍ॅक्चुअली फार संयत चित्रपट आहे हे सिंहासन सारखे सिनेमे बघितल्याशिवाय लक्षात येत नाही. याचा दिग्दर्शक कृष्णा हा तेलुगु इंडस्ट्रीचा मूळ क्विक गन मुरुगन. याची तेलुगु आवृत्ती सुद्धा मिळते पण जितेंद्र आणि कादर खान जी मजा आणतात ती तेलुगु मध्ये नाही.

१.१) ग्रीक लोकांचा गांधारावर प्रभाव होता

नमनाला आपल्याला जितेंद्र एका रथात येताना दिसतो. जंपिंग जॅक गांधार देशाचा महावीर सेनापती विक्रमसिंग आहे. काही कारणाने हे लोक गांधारला गांधारा म्हणतात. आपण दोन्ही नावे आलटून पालटून वापरू. विक्रमसिंग कुठलीशी लढाई जिंकून राजधानीत परतला आहे. ग्रीक शैलीचे शिरस्त्राण व चिलखत आहे. लक्षात घ्या की अलेक्झांडरचे भारतातील पहिले पाऊल हे गांधार देशात पडले होते आणि गांधार शिल्पकलेवर ग्रीकांचा प्रभाव दिसून येतो. त्यामुळे गांधार देशातील वेषभूषा ग्रीक असणे स्वाभाविक आहे. ही गोष्ट वेगळी की लवकरच हे लॉजिक धाब्यावर बसवले जाते बट दे ट्राईड. जॅकची विजययात्रा चाललेली असताना मध्ये मध्ये जयाप्रदाचे शॉट्स. सुरुवातीलाच हिरो-हिरोईन जोडी एस्टॅब्लिश करून दिग्दर्शक आपले कौशल्य सिद्ध करतो. ग्रीक प्रभाव असल्याने राजसभा उघड्यावर, सॉरी प्रशस्त पटांगणावर भरलेली आहे. गांधार नरेश दाखवला आहे भारत भूषण. याचे नाव आहे शमींद्र भूपती. तसे बघता केवळ आपला राजा भारत भूषण आहे या एका कारणासाठी लोकांनी या व्हल्नरेबल राजसभेचा फायदा घेऊन दगडांचा वर्षाव करायला हरकत नाही पण पेमेंट वेळेत होत असल्याने ही सर्व एक्स्ट्रा जनता फारच खुशीत आहे.

भाभू जॅकचे स्वागत करतो. उजव्या हाताला जयाप्रदा बसलेली आहे - ही देशाची राजकन्या अलकनंदा. डाव्या हाताला कादर खान आहे - हा महामंत्री भानू प्रताप. अशा सिनेमांत सिंहासनाच्या मंडपाच्या पायर्‍यांवर उभे राहायला एक पात्र लागते. इथे गुलशन ग्रोव्हरची वर्णी लागली आहे. जॅक कुठल्याशा राजपुरी पर्यंतचा इलाखा जिंकून आलेला असतो. ही राजपुरी कुठे आहे हा प्रश्न अगदी बिनमहत्त्वाचा आहे. तसेच ग्रीक प्रभावामुळे या सगळ्या अनाऊंसमेंट पब्लिक आहेत. आपल्या राज्याची खलबते, मिलिटरी स्ट्रॅटेजी, आर्थिक धोरणे सर्वकाही माहितीच्या अधिकारांतर्गत जनतेस उपलब्ध आहे. हा सिनेमा बघून डेमोस्थेनिस स्वर्गातून पुष्पवृष्टी करेल असा आमचा कयास आहे. गेला बाजार एक भाषण तर नक्कीच ठोकेल.

१.२) सामंत व्यवस्था

भाभूचे राज्य सामंत सिस्टिम फॉलो करते. पुढील सीन वरून असे दिसते की जॅकला सामंतांची बंडाळी मोडून काढायला पाठवले होते. तो सोबत बरेच सामंत घेऊन आलेला असतो. एक एक करून प्रत्येक सामंत भाभू पुढे हजेरी लावतो आणि भाभू त्याला उदार मनाने सन्मानित करतो. यात मुख्य सामंत आहेत - काल भैरव (प्रवीण कुमार, महाभारतातला भीम), दुर्गापुरचा सामंत आणि राजगडचा जहागीरदार कटारी कटैया (गुरबचन सिंग). काल भैरव आणि कटारी कटैया अशी नावे असलेली लोकं अर्थात व्हिलन पार्टीत असणार हे कोणीही सांगू शकतं. त्यामुळे त्यांचा मेकअपही तसाच आहे. आणखी एक हरेंद्र गौतम म्हणून कोणी दाखवला आहे पण तो चेहर्‍यावरूनच युसलेस दिसत असल्यामुळे त्याला भाभूही भाव देत नाही. इतर दोघांना मात्र स्पेशल ट्रीटमेंट आहे - काल भैरवला पहिले आसन मिळते तर कटारी कटैयाला सोबत दोन आयटम आणता येतात. मग तो एका थाळीत भाभूचे पाय घेऊन नुसतेच चोळतो (मला वाटलं दुधाने धुवेल) आणि तेच हात डोईला स्पर्शून जागेवर बसतो. चरणांची धूळ मस्तकी लावणेचे इतके शब्दशः चित्रण मी प्रथमच पाहिले. बाकी मग दहाबारा पडेल चेहर्‍याचे एक्स्ट्रा आहेत ते आपले असेच आहेत.

कादर खान युद्धात हरलेल्या त्या सर्वांचे सांत्वन करून त्यांना आश्वस्त करतो की तुमची वतने तशीच पुढे चालू राहतील फक्त राज्याप्रती निष्ठावंत रहा. मग भाभू जॅकचे तोंडभरून कौतुक करतो. इथे भाभूचा क्लोजअप आहे ज्यावरून कळते की हे राज्य चंद्रवंशी आहे. मग जॅकला देशरक्षक आणि परमशूरवीर अशी बिरुदे मिळतात. इंटरेस्टिंगली याच्या कंबरेला क्सिफोसच्या (ग्रीक शॉर्टस्वोर्ड) बनावटीला मिळती जुळती तलवार आहे. त्याला जयाप्रदाच्या हस्ते एक राजवंशाची तलवार भेट दिली जाते. ही मात्र ब्रॉडस्वोर्ड आहे जे फारच बुचकळ्यात टाकणारे आहे. आता एवढं सगळं झाल्यावर जयाप्रदाला पण काहीतरी द्यायला हवे. मग ती दिवास्वप्न बघू लागते आणि दोघांचे गाणे सुरु होते.

१.३) कॉस्मिक गाणे

गाण्याचे बोल आहेत "किस्मत लिखनेवाले पर जरा बस जो चले हमारा, अपने हिस्से में लिख लें हम सारा प्यार तुम्हारा". थोडक्यात पझेसिव्ह कपल आहे. या सिनेमातली गाणी गुणगुणायला म्हणून बरी आहेत. संगीत आहे बप्पीदांचे आणि गायक आहेत किशोर कुमार आणि आशा भोसले. गाण्यात काही शिकण्यासारखे नसले की प्रेक्षक नृत्यावर लक्ष केंद्रित करतो. हे नृत्य म्हणजे वैश्विक स्तरावरचे नृत्य आहे. आधी बॅकग्राऊंडसमोर उदबत्ती लावून तिचा धूर शूट केला आहे. मग वेगवेगळे जितेंद्र-जयाप्रदा शॉट्स आणि हे सर्व ग्राफिक मॅच करून एक शॉट. या सगळ्यामध्ये ग्रहगोलांची अगतिक भ्रमणे आणि अभ्राच्छादित अंतराळ आहे. अंतराळात टिकणारे हे विशेष ढग केवळ गांधार देशात मिळत असल्याने आपल्याला आज ते बघावयास मिळत नाहीत.

जितेंद्रला एक कुरळ्या केसांचा विग दिला आहे. हा सेम विग तेलुगु सिनेमात कृष्णा पण वापरतो. कृष्णाला तो विग फिट बसतो, जॅकला नाही. कधी कधी उलटी परिस्थिती सुद्धा होते. माझा अंदाज असा आहे की दोन्ही सिनेमांचे युनिट एकच असल्याने कधी जॅकचा विग कृष्णाला तर कधी कृष्णाचा विग जॅकला गेला आहे. जयाप्रदाला नागराणी छाप मुकुट का दिला असेल याचा मी अजून विचार करतो आहे. बहुतांश वेळ ते दोघे ट्रॉलीवरून इकडून तिकडे जातात आणि तिकडून इकडे येतात. पुणे ५२ ची प्रेरणा इथूनच आलेली आहे. मध्येच ते लाल सूर्यासमोर डान्स करतात आणि अचानक एक पंखवाला घोडा न जाणे कुठून येतो. कहर प्रकार म्हणजे मध्ये मध्ये एक टुंग-टुंगटुडुंग-टुंगडुंग-टुंगडुंग-टुंग-टुंगटुडुंग-टुंगडुंग-टुंगडुंग-टुंग अशी काहीतरी ट्यून वाजते जी काहीशी ऑफबीट आहे. त्यावरच्या जयाप्रदाच्या स्टेप्स पूर्णपणे ऑफबीट आहेत. "राजकन्यांनी किमान स्वतःच्या स्वप्नात तरी बीटमध्ये नाचावे" असा नियम नसल्याची खंत वाटते. आणि हे लोक नक्की किती राज्ये फिरून आले आहेत - यांच्या स्वप्नात त्यांना किल्ले, मिनार, इमारती, वाडे, महाल आणि अगणित वेगवेगळ्या स्थापत्यशैलींचे नमुने आहेत. नि:संकोचपणे खर्चा कियेला हैं.

याने पोट न भरल्याने शेवटच्या कडव्यात जयाप्रदा शब्दशः दागिन्यांनी मढून येते. आता तिच्या डोक्यावर एक मोराचा मुकुट आहे. आता मोराचा मुकुट घातलाच आहे तर मोराच्या स्टेप्स केल्या पाहिजेत म्हणून ती पिसारा फुलवल्याचे कल्पून मोरासारखी नाचू लागते. इथे दिग्दर्शक विसरतो की पिसारा हा नर मोराला असतो. मादी मोर अर्थात लांडोर पिसारा फुलवून नाचत नाही. पण बहुधा जितेंद्राने थुईथुई नाचण्यास नकार दिला असावा किंवा जयाप्रदा तशीही थुईथुई नाचते आहे तर हेही करून बघू असा विचार झाला असावा. एकदाची जयाप्रदा स्वप्न बघता बघता दमते आणि हे गाणे संपते.

२) अवंती राज्यात एकही प्रद्योत नाही

२.१) स्टॉकर महामंत्री

सीन चेंज, जयाप्रदा शयनकक्षात झोपली आहे. हिचा पलंग एकदम भारी दाखवला आहे. डोक्यापाशी पलंगाला मोराच्या आकाराचे खांब आहेत. चार चिल्लर सैनिक हातात प्रत्येकी एक सुरा घेऊन तिला मारायला येतात. ते तिला मारणार इतक्यात जॅक कुठून तरी येऊन तिला वाचवतो. तिला वाचवण्याच्या नादात तिच्या पोटावर तो रेलल्याने ही जागी होते. काय झाले हे कळण्याच्या आत ते चार चिल्लर सैनिक पळून जातात आणि रेघारेघांचे फेटे बांधलेले चार भालदार उगवतात आणि आपापले भाले जितेंद्रावर रोखतात. मग तिथे कादर खान येतो. तो जॅकवर राजकुमारीच्या हत्येच्या प्रयत्नाचा आरोप ठेवतो. आता तेच चार चिल्लर सैनिक येतात आणि जितेंद्रला पकडून नेतात. कादर खान व्हिलन असल्याचे इथे चाणाक्ष प्रेक्षक ओळखतो. जयाप्रदालाही काहीतरी काळेबेरे असल्याची शंका येते पण ती गप्प राहते.

दुसर्‍या दिवशी त्याला राजसभेत आणले जाते आणि फुल्ल पब्लिक डिसक्लोजरमध्ये जॅकचा खटला सुरू होतो. सुजितकुमार अधियोजक अर्थात पब्लिक प्रॉसिक्यूटर दाखवला आहे. त्याचा मुख्य साक्षीदार असतो कादर खान. कादर खान म्हणतो की रात्री मी राजकुमारीच्या खोलीकडे कोणाला तरी जाताना पाहिले आणि मी सैनिकांसोबत त्या सावलीचा पाठलाग केला. पाहतो तर काय, महावीर, परमवीर, परमशूरवीर, देशरक्षक विक्रमसिंग खंजीराने राजकुमारीची हत्या करण्याचा प्रयत्न करत होता. सुजितकुमार जरा हुशार असतो. तो म्हणतो ते सगळं ठीक आहे पण मध्यरात्री तू, महामंत्री, राजमहालात काय करत होता? यावर कादर खान म्हणतो की यू सी, अवर महाराज हॅज नो सन ओन्ली डॉटर. अ‍ॅन्ड सम पीपल आर सो डाऊनमार्केट दॅट दे डोन्ट वॉन्ट अ क्वीन अ‍ॅज देअर रुलर. म्हणून मी प्रत्येक क्षण राजकुमारीवर नजर ठेवून असतो; तिच्या सुरक्षेकरिता ऑफकोर्स. अर्थात यावर कोणाला काहीच प्रॉब्लेम नसल्याने सुजितकुमार पुढचा प्रश्न विचारतो - मॉन अमी, व्हॉट्स द मोटिफ? कादर खानचे उत्तर तयारच असते - सिंहासनाची अभिलाषा. सगळी सेना पाठीशी असल्याने हा शेफारला आहे आणि आता याला राजा बनण्याची स्वप्ने पडत आहेत. सुजितकुमार म्हणतो - पण मग राजकुमारीला मारण्याची काय गरज आहे, तिला बंदी बनवून पण काम झालं असतं की? हायला हा वकील आहे की कादर खानचा मुलाखतकार? कादर खानची क्रॉस चालू असताना त्याला स्पेक्युलेट काय करायला लावतो आहे? आणि महामंत्री कोतवालाची कामं का करत हिंडतो आहे? सर्वात महत्त्वाचा प्रश्न - गुलशन ग्रोव्हर कोण आहे? त्याला नुसतंच सिंहासनासमोरच्या पायर्‍यांवर का उभं केलं आहे?

कादर खानच्या म्हणण्यानुसार जितेंद्रला भीति असते की राजकुमारीला बंदी बनवलं तर जनता त्याच्याविरोधात बंड करेल. या क्लेममध्ये काहीच अर्थ नाही. जर जितेंद्र राज्यातल्या सगळ्या सामंतांना एकटाच पुरून उरत असेल तर असल्या किरकोळ बंडांना तो का भीक घालेल? पण सुजितकुमार त्यावर विश्वास ठेवतो. आता जॅकचा डिफेन्स सुरू होतो. जॅकवर राज्यअपहरणाचा आरोप ठेवला जातो. आँ? याने अपहरण कोणाचं केलं? असला फडतूस प्रॉसिक्यूटर बघता आपण खटला जिंकण्याची सुतराम शक्यता नसल्याचे जॅकला कळून चुकते. तो म्हणतो की मी राजकुमारीला मारण्याचा प्रयत्न केला नाही. तुम्हाला नसेल पटत तर गेलात उडत. भाभू त्याची पूर्वीची सेवा लक्षात घेऊन त्याला फाशी देण्याऐवजी हद्दपार करतो. जितेंद्र जाता जाता त्याला सावध राहण्याचा इशारा देऊन निघून जातो.

२.२) स्नुषा संशोधनासाठी देवळात जावे

आता दुसर्‍या राज्यात काय चालू आहे ते बघण्याची वेळ झाली आहे. या राज्याचे नाव अवंती. अवंतीमध्ये दिसतात प्राण, अमजद खान आणि शक्ती कपूर. शक्ती कपूरचा ड्रेस आय थिंक रोमन स्टाईलचा आहे. ग्रीक-इटली शेजार म्हणून तसे ते केले असावे. याच्या कपाळावरही चंद्रकोर आहे फक्त ती तिरकी आहे. थोडक्यात दोन्ही राज्ये चंद्रवंशी असल्याने यांच्यात एक कॉमन धागा आहे. हा अवंतीचा सेनापती दाखवला आहे. पद्मालयवाल्यांना अमजदचा पातालभैरवीतला गुटगुटीत, गोंडस रोल आवडल्याने त्याची पुनरावृत्ती केली आहे. याला "बादाम खाके" म्हणण्याची सवय आहे. प्राण या सगळ्यांचा गुरु, अवंतीचा राजगुरु असल्याचे त्याच्या वेशभूषेवरून ताडता येते. याचे नाव आहे आचार्य अभंगदेव. अवंतीमध्ये आज लोकं वेड्यासारखे एका मंदिराच्या दिशेने धावत सुटले आहेत. असे का बरे बादाम खाके? शक्ती कपूर म्हणतो की हे मंदिर गांधारा आणि अवंतीच्या सीमेवर आहे आणि दरवर्षी देवीच्या दर्शनाला म्हणून दोन्ही राज्यांची प्रजा इथे येते. प्राण मग मंदिराची हिस्टरी सांगतो. तीन पिढ्यांपूर्वी दोन्ही राज्यांनी शांतिसंधी करून त्याचे प्रतीक म्हणून हे अपराजिता देवीचे मंदिर बांधले. त्यामुळे इथल्या दहा कोसांचा परिसरात कोणीही मुक्त संचार करू शकतं.

मग तिथे जयाप्रदा, कादर खान, गुलशन ग्रोव्हर प्रभूती येतात. देवीची पूजा करायला म्हणून ते आलेले आहेत. कादर खान देवीला हात जोडून म्हणतो की बाय माझे, आमच्या राजाला मुलगा नाही. क्षणभर मला वाटले हा या वयात भाभूला मुलगा होऊ दे असा आशीर्वाद मागतो की काय पण तसे होत नाही. त्याचे म्हणणे असते भावी राणी अलकनंदेला आशीर्वाद दे. मग जयाप्रदा आशीर्वाद मागते. ती राजमुकुट घेऊन आलेली असते. असे कळते की भाभू आजारी असल्याने येऊ शकलेला नाही आणि प्रॉक्सी म्हणून राजमुकुट पाठवला आहे. या सीनचा तसा काही उपयोग नाही. पूजा झाल्यावर ती बाहेर पडते तर गाभार्‍याबाहेर वहिदा रहमान आणि श्रीराम लागू उभे असतात. ते कोपर्‍यात उभे राहून जयाप्रदाला ताडतात. वहिदा अवंतीची राजमाता आहे तर श्रीराम लागू महामंत्री. वहिदा म्हणते पोरगी सुंदर आहे नै. श्री.ला. लगेच पुस्ती जोडतात की युद्धनीति आणि राजनीतिमध्ये सुद्धा निपुण आहे. इथे उच्चार शुद्ध असल्याचा फायदा होऊन भाभूच्या नावाचा जो शमींद्र, शरमेंद्र असा इतका वेळ उद्धार चालवला आहे ते नाव क्षेमेंद्र असल्याचे कळते. वहिदाची इच्छा असते की जयाप्रदा आपली सून व्हावी. यात एक प्रॉब्लेम आहे - राजकुमार आदित्य वर्धन अगदीच ऐषारामी राजपुत्र आहे.

२.३) सिंगल जितेंद्र डबल जॅक, लेट्स अनलीश द बूबा पॅक

अमजद खान, याचे नाव कुपटेश्वर, येऊन सांगतो की राजकुमार पूजेला येणार नाही. त्याच्या जागी त्याचा भाऊ उग्रराहू पूजा करेल असं प्राणने ठरवल्याचेही तो सांगतो. वहिदा मनातली खंत बोलून दाखवते - अभंगदेवच्या मार्गदर्शनाखाली आदित्य सर्व विज्ञांमध्ये पारंगत तर झाला पण ऐषारामी वृत्तीही त्याच्या हाडामासी खिळली. हा क्यू घेऊन जितेंद्र क्रमांक दोनची एंट्री. आदित्यवर्धनही जितेंद्रच दाखवला आहे. याचा विग थोडा वेगळा आहे ज्याच्या मदतीने तो ओळखू येतो. आदित्यवर्धन आपल्या महालात दारू पिऊन चार अर्धनग्न ललनांसोबत ऐष करत असतो. अशा वेळी गाणे झालेच पाहिजे.

गाण्याचे बोल आहेत बूबा बूबा मेरी बूबा...............
नो जोक्स हिअर - हे गाण्याचे अ‍ॅक्चुअल बोल आहेत. सुरुवातीला बरंच दिल मेरा डूबा, मेरी महबूबा वगैरे होतं आणि मग बूबा बूबा, बूबा बूबा, बूबा बूबा, बूबा बूबा मेरी बूबा सुरु. यातल्या सर्व बूबांना जितेंद्र आणि एक बाई आपापाल्या छात्यांचा भाता एकमेकांच्या दिशेने ओढतात. आधीच्या जितेंद्रला किशोरचा आवाज वापरल्याने या जितेंद्रला बप्पीदांनी स्वतःचा आवाज दिला आहे. बायकांसाठी आवाज आशाजींचा. आधीचा जितेंद्र तितका मनमोकळेपणाने नाचत नसल्याने हा जितेंद्र फुल ऑन नाचतो. या ललना नाचतात कमी आणि थरथरतात जास्त. तो काय टकलू हैवान आहे थरथराट व्हायला? याच्या कपाळावरही चंद्रकोर आहे आणि महालात पिसारा फुलवलेला एक भलामोठा कांशाचा मोर आहे. ही सेट डिझाईन मधली थिमॅटिक कन्सिस्टन्सी वाखाणण्याजोगी आहे. पण काही ठिकाणी हलगर्जीपणा केलेला आहे. एक बाईची मूर्ती आहे आणि तिच्या हातात चक्क शॉवरहेड दिलं आहे. आता एखादे भांडे देऊन त्यातून पाणी पडताना दाखवले असते तर ठीक होतं पण शॉवर? आणि जितेंद्र मेरी बूबा म्हणतो ते महबूबाचा शॉर्टफॉर्म म्हणून खपतं तरी; यातली मुख्य ललना फुल्ल सिडक्टिव्हली मेरा बूबा म्हणत आहेत, विथ कॅमेरा अ‍ॅट रिक्वायर्ड अँगल!!

मध्येच जितेंद्र आणि ललनांचे ब्रेकडान्स मोंटाज सुरु होते. मग जितेंद्र आणि मुख्य ललनेचा रोमान्स आणि इतर बायकांचे त्यावर कौतुकाने लारालूं, जितेंद्रचे दर दोन कट नंतर कपडे बदलणे, उड्या मारत डान्स करणे, महालाचे इंटेरिअर बदलणे इत्यादि प्रकार घडतात. एवढ्यानेही समाधान न झाल्याने या ललना ओकाशिबा आणि लालालाला करत नाचू लागतात. इथे भविष्यात करिश्मा कपूर-गोविंदाने वापरलेल्या काही स्टेप्स दिसतात. यानेही मजा न आल्याने याचा पलंग गोल गोल फिरायला लागतो आणि त्यावर बूबा बूबा होते. एवढे बूबा बूबा झाल्याने त्या ललनांच्या सिंक्रोची पार वाट लागते आणि दिग्दर्शक नाईलाजाने गाणे आवरते घेतो.

३) पहिली चकमक

३.१) ऐदी राजकुमार

आता इतर बूबा खोलीतून बाहेर गेल्या आहेत आणि जॅक क्रमांक दोन व मुख्य ललनेचा रोमान्स सुरू आहे. मुख्य ललना राजनर्तकी असून तिचे नाव आहे जसवन्ती. आपण तिला जास्वंदी म्हणूयात. जितेंद्र जास्वंदी ओठांमध्ये गुंगण्याच्या मूडमध्ये आहे पण तिला जितेंद्राच्या इभ्रतीची पडली आहे. ती म्हणते की जनतेचे काय? तिच्याप्रती असलेल्या जबाबदारीचे काय? जितेंद्र म्हणतो जनता को तो उपरवाला जनता (जन्म देतो) हैं, और जो जनता हैं वही जनता की चिंता करता हैं. हे असे कादर खान स्पेशल डायलॉग्ज या सिनेमात दर मिनिटाला सापडतात. अजूनही थोडे डायलॉक मारले जातात पण मुख्य मुद्दा असा आहे की जितेंद्रला आपल्या जबाबदारीचं फार काही पडलेलं नाही. आधी नमूद केल्याप्रमाणे तो कर्तव्यपरायण नाही. जास्वंदीने मुघल-ए-आझम पाहिला असावा कारण तिला त्या दोघांचे प्रेम बदनाम होईल अशी शंका आहे. पण जॅक-२ भलताच कूल असतो - जो प्यार बदनाम नही होता उस प्यार का कोई नाम नही होता. त्याचं म्हणणं असतं की माझ्यावतीने राजगुरु देवीची पूजा करवतील आणि मी तुझी पूजा करेन. राजघराण्यात जन्मल्याचा अर्थ असा की माझ्यासाठी डोकं कोणीतरी दुसरं चालवेल आणि युद्धात हाणामारी अजून कोणी तिसरं करेल. मी का चिंता करू? वहिदा जेव्हा याच्या नावानं बोट मोडत होती तेव्हा ती याचा ऐदीपणा अंडररेट करत असल्याचे आता प्रेक्षकाला कळून चुकते. हा दारु आणि बाई दोन्हीच्या नादी लागल्याचे आपल्याला कळून चुकते.

३.२) रॉबिनहूड सेनापती

सीन चेंज. पहाटेची वेळ. भडक निळ्या रंगाचे कपडे घातलेले पहारेकरी आणि त्यांनी संरक्षित एक छावणी. या छावणीला काही डाकूंनी घेरले आहे. सर्व पहारेकर्‍यांना बेशुद्ध केले जाते आणि काळाकभिन्न दिसणारा मुख्य डाकू एका तंबूत प्रवेश करतो. हा जयाप्रदाचा तंबू आहे. जयाप्रदा आणि तिच्या दासी साखरझोपेत आहेत आणि राजमुकुट निष्काळजीपणे जवळच एका मंचकावर ठेवलेला आहे. का.क. डाकू मुकुट उचलून पोबारा करतो. एका पहारेकर्‍याला वेळेत शुद्ध येते आणि तो झोपलेल्या सेनापतीला उठवून चोरीची बातमी देतो. मग सैनिक त्या डाकूंचा पाठलाग करू लागतात. जंगलातल्या वाटांशी परिचय नसल्याने थोड्याच वेळात ते डाकू त्यांना चकवा देण्यात यशस्वी होतात.

भाभू ही बातमी ऐकून भलताच क्रुद्ध होतो. म्हणजे असे समजण्याची अपेक्षा आहे कारण नेहमीप्रमाणेच त्याच्या चेहर्‍यावर काहीही भाव नाहीत आणि आवाजात काहीही चढउतार नाही. तो महामंत्री आणि सेनापतीला उगाच दोन शब्द सुनावतो पण हे आपलं नगास नग. ते गेल्यावर जयाप्रदा त्याला विचारते "तुम्ही म्हणता हा मुकुट विशेष आहे. म्हणजे नक्की काय?" भाभू म्हणतो उस मुकुट में महिमा हैं (म्हणजे परदेशी बनावट), करिश्मा हैं (खानदानी आहे), चमत्कार हैं (आर यू शुअर इथे उर्मिला हैं म्हणायचं नव्हतं आणि चित्रपटाचं नाव घ्यायचं होतं?). एनीवे, अ‍ॅपरंटली हा मुकुट कोणा योग्याने भूपती घराण्याला दिलेला असतो आणि जोपर्यंत हा मुकुट आहे तोपर्यंत या घराण्याचे राज्य कायम राहिल असा आशीर्वादही दिलेला असतो. भाभू संशय व्यक्त करतो की हे कोणाचे तरी षडयंत्र आहे.

तिकडे जितेंद्र क्रमांक १, विक्रम सिंग आता डाकू बनला आहे. याने मुकुट चोरलेला नाही, चिंता नसावी. आता रेशमी वस्त्रे व कवच कुंडले जाऊन साधा वेष, फेटा आणि केसाळ लेदर जाकिट आले आहे. याच्या गुहेत छान गारवा असावा अन्यथा त्या जाकिटाला काही अर्थ नाही. पण इतक्या मशालींमुळे पुरेशी उष्णता मिळत असावी. तरी स्वतःला त्रास करून घ्यायचा याचा हट्ट असल्याने हा तसाच जाकिट घालून हिंडत आहे. विक्रमसिंगचा अंदाज असतो की हे षडयंत्र सामंतांपैकी एकाचे आहे. त्याचा संशय काल भैरववर असतो कारण काल भैरव एक नंबरचा लोभी आहे. तसेच या सगळ्यामागे कोणी एक मुख्य व्हिलन असल्याचा संशयही तो बोलून दाखवतो. आता प्रश्न इतकाच की हा कोणी घरचा आहे की अवंतीचा? याच्याकडे सार्‍या गावाची बित्तंबातमी असल्याने याला हे माहित असते की गांधाराचा प्रॉब्लेम आहे की कोणीतरी राजकुमारीला मारण्याचा प्रयत्न करत आहे तर अवंतीमध्ये विविध प्रकारचे कर लादून जनतेची पिळवणूक चालली आहे. त्यामुळे यांचे कार्य ठरलेले आहे - भूपती घराण्याचे रक्षण आणि अवंतीच्या जनतेची करांच्या दुष्टचक्रातून मुक्तता. तेवढ्यात एकजण येऊन बातमी देतो की कसलातरी खजिना राजगडच्या दिशेने जातो आहे. रॉबिनहूडगिरी सुरु करण्याची वेळ झाली आहे.

३.३) कटारी कटैया

राजगडची जहागीर कटारी कटैयाची असल्याने साहजिकच याच्यामागे त्याचा हात आहे. जॅक-१ जाऊन तो खजिना अडवतो. खजिना म्हणजे एका रथात काही पेटारे घालून दोन जण नेत असतात. इतकी ढिसाळ सुरक्षाव्यवस्था क्वचितच बघावयास मिळते. त्यात हे दोघे विक्रमसिंगला मानणारे निघतात. ते त्याला कसलीही आडकाठी करत नाहीत. तो घोड्यावरून उडी मारून रथात येतो. पेटार्‍यांमध्ये हिरे-जवाहिर, सोने-नाणी इ. असते. तसेच रेशमी कपड्यावर एक पत्र आहे. कोणा "भविष्यवाणी" नामक इसमाने कटारी कटैयासाठी आशीर्वाद आणि हा खजिना पाठवलेला असतो. निश्चितच हा भविष्यवाणी मुख्य व्हिलन आहे. पण कोण?

आता जितेंद्र ठरवतो की मुख्य व्हिलनला नंतर बघता येईल आधी कटारी कटैयाला धडा शिकवूयात. इथे त्याचा एक आऊट ऑफ फोकस शॉट आणि शेपटी हलवत असलेल्या घोड्याच्या पार्श्वभागावर फोकस! मग जितेंद्र सगळा खजिना काढून घेऊन पेटार्‍यांमध्ये दगडं भरून कटैयाकडे पाठवतो. सोबत स्वतःचे एक पत्रही देतो. पत्रात कटैयाची निर्भत्सना केलेली असते. याने तो भलताच चिडतो आणि आपली भेडिया फौज जितेंद्राच्या मागावर पाठवायचा आदेश देतो. इथे अपेक्षा काय की जितेंद्रचा पाठलाग होईल, मे बी जितेंद्र याला खिंडीत गाठून आपले युद्ध कौशल्य दाखवेल, मग चार दोन डायलॉग, दोन चार खणाखणी. पण नाही. जितेंद्र ओरडतो कटैयाऽऽऽऽऽऽऽ हा प्राणी कटैयाच्या तळावर येऊन कटैया चिडण्याची वाट बघत विंगेत उभा आहे.

जॅक त्याला "घास खानेवाला खच्चर" आणि स्वतःला सिंह म्हणवून घेतो. तसे बघावे तर दोघेही गाढव आहेत पण जोपर्यंत ते एकमेकांना मनुष्य म्हणवून घेत नाहीत तोवर काही हरकत नाही. जितेंद्र त्याला म्हणतो की त्या भविष्यवाणीसोबत मिळून देशद्रोही कारवाया करणे बंद कर. कटैया त्याला म्हणतो मला उपदेश करण्याआधी तू डाकूगिरी बंद कर. हो ना करता करता मुद्दा सर काटण्यापर्यंत येतो. जॅक सुचवतो की चल द्वंद्व करून याचा निकाल लावू. कटैया म्हणतो ठीक आहे. जितेंद्र-१ इथून पुढे शक्य तितक्या उड्या मारत असल्याची नोंद घ्यावी. त्यामुळे तो घोड्यावरही उडी मारून बसतो. द्वंद्व असे असते की हे घोडेस्वार एकमेकांच्या दिशेने येणार, तलवारीने दुसर्‍याचे मस्तक धडावेगळे करण्याचा प्रयत्न करणार, जर दोघे फेल गेले तर रिपीट. थोडी खणाखणी झाल्यानंतर कटैया मोठ्या हुशारीने जितेंद्राच्या घोड्याच्या पायांवर वार करतो. याने जॅक आणि त्याचा घोडा दोघेही तोंडावर आपटतात. मग जॅकला घोड्याच्या टापांखाली चिरडण्याचा प्रयत्न होतो पण जॅकही कटैयाला घोड्यावरून खाली पाडतो. पुनश्च खणाखणी. जॅकला जखमही होते. पण त्याच्या उडी मारण्याच्या सुपरपॉवरपुढे लवकर कटैया निष्प्रभ ठरतो आणि चांगलाच घायाळ होतो. जितेंद्र मग कटैयाच्या नावाने एक नवीन संदेश लिहून घेतो - क्षेमेंद्र महाराजांना माझा प्रणाम. माझा या राजद्रोहाशी काही संबंध नाही, मी पूर्वीप्रमाणेच तुमच्याशी एकनिष्ठ आहे. मग तो खजिन्यासकट नवीन संदेश भाभूकडे पाठवून देतो.

इथे माझा अल्पविराम. भविष्यवाणी कोण, विषकन्या कोण, ती कशी बनवली जाते आणि अशाच इतर रोमहर्षक बाबी प्रतिसादांत कव्हर करतो.

विषय: 
शब्दखुणा: 
Groups audience: 
Group content visibility: 
Use group defaults

त्याकाळात राजकीय प्रोटोकॉल वगैरेंची काही पद्धत दिसत नसावी. गांधारा देशाचा महामंत्री व राजकन्या प्रदक्षिणा घालत असताना अवंती देशाची राणीमॉ व महामंत्री सूत्रधार असल्यासारखे जरा बाजूला उभे राहून नॅरेट करत आहेत. त्यांना तेथे कोणीही ओळख देत नाही. बाजूला सैनिक वगैरे काही नाही. कादर खान व जयाप्रदा समोरून जरा मान हलवून अ‍ॅकनॉलेज वगैरेही न करता जातात. या दोन मित्र देशातील राज्यकर्ते एकमेकांना ओळखत नाहीत का?

अजून एक बॉलीवूड नियाम. एखाद्या प्रसंगात जी माहिती कॉमन नॉलेज असायला हवी ती केवळ प्रेक्षकांना माहिती व्हावी म्हणून उपस्थितांनी एकमेकांना विचारणे. राजगुरू प्राण व त्याचे साहाय्यक अमजद वगैरेंचा त्या अपराजिता देवीच्या गर्दीसमोरचा सीन तसाच आहे Happy

तुमच्या राजघराण्याचे आस्तित्व जर एखाद्या मुकुटावर अवलंबून असेल तर तो सुरक्षितरीत्या कसा ठेवावा? तर जिच्याकडे त्याची जबाबदारी दिली आहे तिला त्याच्या सिग्निफिकंस बद्दल काहीही न सांगता तो द्यावा व ती जेथे झोपली असेल त्या तंबूच्या एकाच बाजूला सैनिक ठेवावेत.

इथेही राजकुमारीच्या डुलक्या. या पिक्चरमधले आत्तापर्यंतचे सर्व नाट्य राजकुमारीच्या डुलक्यांमुळे झाले आहे तिला म्हणे राजनीती, युद्धनीती वगैरेंची 'पूरी शिक्षा दिलायी गयी है'! तेवढे जरा उठसूठ डुलक्या न मारण्याचे प्रशिक्षण द्यायचे राहिले.

इथेच जेव्हा भाभू कादरखान ला जाब विचारतो मुकुट नीट न सांभाळल्याचा, तेव्हा तो "रिकाम्या सिंहासनाला वारा" सीन आहे.

बाय द वे इतके गद्दार लोक राज्यात असून भाभू सुमारे ४० मिनीटे झाली तरी जिवंत आहे. अशा ष्टोर्‍यांमधे सहसा राजा पहिल्या काही मिनिटांत मारला जातो. भाभू चांगलाच टिकाउ दिसतो.

आज हा चित्रपट बघायला सुरुवात केली.

१.कथा पटकथा संवाद संकलन आणि दिग्दर्शन - कृष्णा. म्हणून विकिपीडिया वर जाऊन कृष्णाचा शोध घेतला, तर साऊथचा एकेकाळचा सुपरस्टार कृष्णाने हा चित्रपट बनवलाय असं कळलं. Historical...
२. भारत भूषणची डायलॉग डिलीवरी बघता तो राजा नाही तर मुनीमजीच्या रोलमध्ये जास्त शोभला असता हे वैयक्तिक मत. आणि कुणी तुमच्या राज्यविरुद्ध बगावत करतय, त्याला विक्रमसिंहने युद्धात हरवून बंदी बनवून आणलंय, तरीही हा माठ त्यांना मनाचं स्थान देतो, हे बघून स्वर्गात विक्रमादित्य राजा ढसाढसा रडला असेल.
३. राजकुमारीने तलवार दिल्यानंतरच गाणं म्हणजे त्याकाळीसुद्धा साऊथचे दिग्दर्शक स्पेशल इफेक्ट वर किती खर्च करायचे याची पावती म्हणावी काय??? राजामोली आणि शंकर यांनी कृष्णा कडून धडे घेतले असतील याची दाट शक्यता आहे.
४. मराठीत एक म्हण आहे, शुद्ध बिजापोटी फळे रसाळ गोमटी, तसे माठ बापाच्या पोटी माठच जन्मति... आता या बयेच्या रूममध्ये एवढी खणाखणी चालली असताना ही झोपली होती, आणि त्यांनंतर जीतूभाऊ रेलल्यावर याच क्षणाची वाट बघत असल्याप्रमाणे जागी होते. जनरली आपला प्रियकर बघून मुली खुश होतात, किंवा आश्चर्यचकित होतात ही मक्ख होते, आणि राजदरबारात देखील तोंड उचकत नाही. एखादा सेन्सेस मधला माणूस असता तर तिथेच "आत्ता ब्रेकअप, आपलं झेंगाट तुटलं, गाण्यात लै उड्या मारती, मग बापासमोर तोंड का उचकीवली नाही," म्हणून मोकळा झाला असता. पण जितेंद्र तिच्या वरचढ असल्याने तो काहीही करत नाही.

अडस...

पायस या विकांताला काय करायचे ह्याचा प्रश्न तुम्ही सोडवलात. करोनाच्या काळात अशा परीक्षणामुळे आमच्या हास्यात वाढ होऊन करोनाचा मुकाबला करण्यासाठी धैर्य वाढणार हे नक्की. तुमचे परीक्षण आणि प्रतिक्रिया सगळेच मस्त. फारएण्ड भाऊंच्या टिप्पण्याही छान.

धन्यवाद..!!

फारेंड.... खूपच मस्त टिप्पणी!
Happy
तुमच्यात इतका पेशंस येतो कुठून हे सिनेमे बघायचा?
आणि मुख्य म्हणजे.......इतका निवांतपणा कसा काय मिळतो इतक्या (घर) कामांच्या धबडग्यात सध्या?

{{{ शक्ती कपूर तीन नवे कर जाहीर करतो.

१) शादी कर - लग्न केले तर १००० मोहोरा
२) जन्म कर - मूल झाले तर २०० मोहोरा }}}

लग्न न करताच मूल झाले तर?

इतकं बारकाईनी कसं काय मूवी बघू शकता? तो पण हा! मी पोस्टर पाहून तर कधी वाटेलाही गेले नस्ते.

सध्या च्या परिस्थिति त म्हणून हे परीक्षण व फारेण्ड दादांंचे टिप्पणी वाचून बघतेय. अगदी एक एक प्रसंगाचे detailed dissection करण्यात आलेय.

पुढील भाग लवकर येउद्या.

क्रेडिट पायसला आहे. त्याच्या लेखामुळे हे उद्योग केले जातात Happy वेळ वगैरेचा प्रश्न नाही - आवड असल्याने आपोआप होते. आणि तुपारे संपल्याने फोकस इतरत्र जाउ शकतो सध्या Happy

मी आपला निमित्तमात्र आहे. मला व्यक्तिशः हे सिनेमे बघायला प्रचंड आवडतात कारण हे सिनेमे तुमची नजर तयार करतात. यांचे गूफअप्स इतके ब्लॅटंट असतात की तुम्ही ते कधीच विसरत नाहीत आणि मग हळूहळू तुम्ही प्रत्येक फ्रेम बारकाईने बघू लागता.

भाभू चांगलाच टिकाउ दिसतो. >> हो ना अरे. त्या पब्लिक राजसभेचा फायदा घेऊन भाभूला कोणीही सहज टपकावू शकतं. बहुधा त्याचा आजारलेला चेहरा बघून लोक म्हणत असतील हा तसाही फट म्हणता जाईल. उगाच कशाला कष्ट घ्या.

लग्न न करताच मूल झाले तर? >> २०० मोहोरा. शक्ती कपूर असे कुठेच म्हणत नाही की जन्म कर हा लग्न करानंतरच भरायचा आहे. तुम्हाला लूपहोल काढायचेच असेल तर त्याचे वाक्य नीट ऐका - "जो भी बच्चा जनम लेगा उसके माता पिता को जनम कर देना होगा". समजा मूल झाले आणि त्या मुलाला या लोकांनी द्रोणात ठेवून नदीत सोडून दिले किंवा तत्सम कुंती-इन्स्पायर्ड ट्रिक्स वापरल्या आणि मूल अनाथ वाढले, तर त्याचा कर कसा वसूल करायचा याची तरतूद शक्ती कपूरच्या प्लॅनमध्ये नाही.

आता ते बूबा बूबा गाणे माझ्या डोक्यात बसले >> विकु Lol असे पाताल भैरवी पाहिल्यानंतर माझ्या डोक्यात "एक दुपट्टा दो दो मवाली" बसलं होतं.

तुपारे संपल्याने फोकस इतरत्र जाउ शकतो सध्या >> Lol या सीरिअल्समध्ये काही सेल्फ कंटेन्ड स्टोरी आर्क्स असतात. उदा. श्श कोई हैं मध्ये विक्राल और मायाकाल ची एक मस्त अठरा एपिसोडची आर्क होती. अशा आर्क्स एकदा बघायला पाहिजेत. पण सीरिअल्स अ‍ॅनालाईज करायला खूप वेळ जातो.

बाय द वे, दोन शेजारी असलेल्या मित्रराज्यांपैकी एकाचा सरसेनापती दुसर्‍या राज्याच्या राजपुत्रासारखाच हुबेहूब दिसतो हे कोणालाही इतकी वर्षे माहीत नसते का? होप्फुली पुढे कोठेतरी एकदम आश्चर्याने चकित होणार असेल पब्लिक.

पायस तुम्हाला माझ्यातर्फे एक अ‍ॅवार्ड. लेखन फारच भारी जमले आहे. मी पण पहिले काही दिवस जुना मराठी सिंहासन सिनेमा म्हणून दूर राहिले तो जरा हळवा विषय आहे . सर्व मस्त अ‍ॅक्टिग व गुड स्टोरी म्हणून.

जया प्रदा त्या पहिल्य्गा गाण्यात काळा ड्रेस व भरपूर दागिने मध्ये फारच टवका दिसते. व बूबा मधल्या पण बायका छान आहेत दिसायला शेपली व गोर्‍या सुरेख. हे अश्यासाठी की तेलुगु सिनेमात अश्या गाण्यांना चांगल्या दिस णार्‍या मुली सहसा मिळत नाहीत. अजून मंदाकिनी परेन्त पोहोचले नाही . बट दे ट्राइड हे खास मीम मटेरिअल आहे. जसे की २१ डेज लॉक डाउन ...... ब ट दे ट्राइड!!!!! दिवे घ्या.

असो आता ब्रेफा बनवायचा आहे तो खाउन मग बघीन पिक्चर. पुढील लेखनाच्या आतुरतेने प्रतीक्षेत. यु हॅव मेड लॉकडाउन बेअरेबल.
मच प्रेज फॉर दॅट.

{{{ शक्ती कपूर असे कुठेच म्हणत नाही की जन्म कर हा लग्न करानंतरच भरायचा आहे. }}}

ओके. खरं तर त्याने अशा वेळी १२०० मोहरा लावायल्या हव्या नाहीतर सगळे हा लग्नाशिवाय मूलचा ऑप्शन वापरुन लोकसंख्या वाढवतील. तसंही लोकसंख्या वाढीमुळेच रिसोर्सेसवर ताण येतो एरवी लग्नावर कर लावण्यात काही उद्देश नाही (अनलेस अ‍ॅण्ड अनटिल राज्यातली एक कुमारिका कमी होऊन जितू२ च्या एण्टर्टेण्मेण्ट मध्ये कमतरता येण्याचा मुद्दा धरला जात नाही)

६) मुख्य व्हिलन

६.१) फुकाची सोशल कमेंट्री

काही कारणाने आता दिग्दर्शकाला सामाजिक भाष्य करण्याची हुक्की आलेली आहे. लग्नाचा सीन. इतका वेळ अवंती, गांधार अशी उत्तर भारतीय राज्यांची नावे वापरल्यानंतर सामाजिक भाष्य करताना मात्र आपल्या संस्कृतीची आठवण होऊन दाक्षिणात्य पद्धतीने लग्न सुरु आहे. केळीचे खुंट वगैरे आहेत, भटजी सुद्धा दाक्षिणात्य वाटतो. पण शूटिंग करायला बहुतेक लग्नाचा व्हिडिओ करणार्‍या कोणाला तरी बोलावलं आहे कारण अतिशय चुकीचा अँगल लावला आहे. या व्हिडिओमध्ये नवरा नवरी सोडून सर्व दिसावे लागतात कारण मग अनेक वर्षांनंतर घरी पाहुणे आले की त्यांना कटवायला "आमच्या लग्नाच्या व्हिडिओ मध्ये कोण कोण आहे बरं?" असे खेळ खेळता येतात. एखादी बाई आपल्या लहान मुलाला सांभाळण्याची पराकाष्ठा करत असेल तर हमखास तिला फ्रेममध्ये चटकन नजरेत भरेल अशा जागी उभे केले जाते. या फ्रेममध्ये काही कारणाने सर्व पुरुषांना बसवून बायकांना उभे केले आहे. यातून काय साध्य होते? कृष्णालाच ठाऊक. दोन भटजी, नवरा-नवरी आणि त्यांचे आई-वडील, वाटलंच तर एक करवली अशी सुटसुटीत फ्रेम लावण्याऐवजी हा मॅरेज व्हिडिओ याने का शूट केला असेल देव जाणे.

असो, तर सोशल कमेंट्री. हे लग्न अवंती राज्यात चालू असल्याने लग्न झाले की कर द्यावा लागणार. ती वेळ येऊ नये म्हणून हे गुपचुप लग्न उरकत आहेत. पण मग गावजेवण घालण्याची काय गरज आहे? सगळा गाव एका जागी जमा झाला की शिपायांना संशय नाही येणार? बरं यांचे प्रॉब्लेम्स सुद्धा इतके फडतूस आहेत - म्हणे वर गांधाराचा आणि वधू अवंतीची तर लग्न कोणत्या पद्धतीने लावायचं? दुसरा एक भटजी म्हणतो की ते काही नाही आधी मंगळसूत्र घालण्याचा विधी कॉमन आहे, तो तरी व्हायलाच हवा. च्यामारी, असे किती विधी वेगवेगळे आहेत या दोन पद्धतींमध्ये? आणि हे काय बडजात्या वेडिंग आहे का रीतिरिवाज डिस्कस करायला? चार अक्षता टाकून पानं वाढायला घ्यायचं बघावं तर यांचं अजून देवक बसेना. असा फालतू प्रकार करत असल्यावर शक्ती कपूर तिथे येऊन न थडकता तरच नवल!

आंतरदेशीय विवाह होत आहेत याची नोंद घेऊन त्यांनी आंतरदेशीय विवाहांवर वेगळा कर बसवण्याची खबरदारी घेतलेली असते. सोबत अमजद खानही आहे. अमजदच्या सदर्‍यावर ड्रॅगनचे चित्र आहे. पण हा ड्रॅगन सर्पाकृती नसून त्याची शैली मध्यपूर्वे आशियाई वाटते. तसेच बदामाची लागवड सर्वप्रथम पर्शियनांनी करायला सुरुवात केली असा समज आहे. पर्शियन सुपर्ण अहुरमज्दाची पूजा करत असत ज्याचे अस्त्र पाश व भाला (आय थिंक) असते. तसा मागे कोट ऑफ आर्म्स पण आहे. त्यामुळे अमजद हा पर्शियातून प्राणकडे शिकायला म्हणून आला असण्याची शक्यता नाकारता येत नाही. याला पुष्टी देणारा आणखी पुरावा म्हणजे त्याच्या कोट ऑफ आर्म्समध्ये एक सिमिटार पण आहे जी मध्यपूर्वेतली वक्राकार तलवार आहे. अशा कॅरेक्टर्सना "विनोदनिर्मितीचा लहानसा प्रयत्न" करायला ठेवलेले असल्यामुळे चार दोन शेलके विनोद होतात. मग शक्ती कपूर अत्याचाराचे शस्त्र उगारतो आणि हिरोची एंट्री होते.

६.२) बापने मारी मेंढकी, बेटा तीरंदाज

जॅक-१ ला कोणीतरी काहीतरी करेपर्यंत विंगेत दबा धरून बसायची भारी खोड आहे. इथे तो शक्ती कपूर तलवार उगारायची वाट बघत एका झाडावर बसून आहे. तलवार उगारता क्षणी तो बाण सोडून याची तलवार खाली पाडतो. आता काळा सुती सदरा, त्यावर बाणांचा भाता बांधण्याच्या दृष्टीने छातीवरून घेतलेले दोन पट्टे, हातात धनुष्य आणि डाकू स्टाईलचे तोंडावरून ओढलेले फडके असा विक्रमसिंगचा वेष आहे. गांधारामध्ये भरपूर अत्याचार निर्दालन केल्यामुळे तो अवंतीत आपला अन्याय निवारणाचा बिझिनेस एक्स्पांड करू बघतो आहे. आधी तो शक्ती कपूरला म्हणतो की तुम्ही कोण कर लादणारे? शक्ती कपूर म्हणतो आम्ही आमच्या राज्यात काहीही करू, जाब विचारणारा तू कोण उपटसुंभ? यावर जितेंद्र उत्तरतो की आधी हे लक्षात घे की मी असेपर्यंत तू अत्याचार करू शकणार नाहीस. समोरच्याचा प्रश्न काय, आपण देतो आहे ते उत्तर काय कशाचा काही संबंध नाही. शाब्दिक बाचाबाची झाल्यावर जितेंद्र म्हणतो की तुला धडा शिकवण्याकरिता माझी करंगळीच पुरेशी आहे. एवढं बोलून तो एक बाण मारून शक्तीचा मुकुट पाडतो.

एकतर यात करंगळीचा कुठे संबंध आला? मेरे बाये हाथ का खेल पर्यंत ठीक होतं, मेरी छोटी उंगली काफी हैं काय? दुसरं म्हणजे जितेंद्राला धनुष्य कसे काम करते हे अजिबात कळलेले नाही. तो बाण मारत नाही, तो बाण भिरकावतो. तो प्रत्यंचा तर्जनी, मध्यमा, अंगठा आणि बाण यातील पोकळीत धरून ओढतो. असलं काहीतरी जमत असतं तर एकलव्य अंगठा गमावूनही श्रेष्ठ धनुर्धर राहिला असता. अंगठ्याचा वापर करून प्रत्यंचा ओढणे आणि तर्जनी, मध्यमेने बाणाला स्थिर ठेवणे हे भ्याड लोकांसाठीचे तंत्र असल्याने तो असलं काही करत नाही. धनुष्याला आधार देणार्‍या हाताच्या तर्जनीने बाणाला अ‍ॅडिशन सपोर्ट देऊन नेम धरणे वगैरे गोष्टी ज्यांचा नेम नॅचरल नाही अशांसाठी आहेत. त्यामुळे त्याचे भिरकावलेले बाणही बरोब्बर निशाण्यावर लागतात आणि विक्रमसिंग फार मोठा तीरंदाज असल्याचे सिद्ध होते.

६.३) महाराणी आणि मुहूर्त

प्रत्यक्ष फाईट फारच स्ट्रेटफॉरवर्ड आहे. जितेंद्र आणि त्याचे लोक बाणांचा वर्षाव करतात समोर शत्रु दिसत असतानाही शक्ती कपूरचे लोक लगेच हतबल होतात आणि हार मानून पळून जातात. अमजद खान हिंमत करून जितेंद्राच्या अगदी जवळ जातो आणि विचारतो की आमची धुलाई करणार्‍या महावीराचे नाव कळू शकेल काय? कसं आहे की परत गेल्यावर सांगता येईल आमची ही अवस्था कोणी केली बादाम खाके. जितेंद्र पण फारसे आढेवेढे न घेता सांगतो की मी विक्रमसिंग आहे.
मग प्रेक्षकांसाठी माहितीचे आदानप्रदान होते. विक्रमसिंग अपराजिता देवीच्या जंगलात वास्तव्य करून आहे तर अमजद खानचे वडील प्राणचे मित्र होते. प्राणला आपल्या लोकांच्या झालेल्या फजितीचे वैषम्य वाटत असले तरी तो राग आवरतो. प्राणच्या दालनात इजिप्शियन फराओ सारखे एक आसन आणि सिंगापुरी सिंहमूर्ती आहेत. शक्ती कपूर बढाई मारतो की तो जंगलात जाऊन विक्रमसिंगला पकडून आणेल. प्राणला त्याची कुवत ठाऊक असल्याने तो हे बोलणे हसण्यावारी नेतो.

तिकडे जॅक-२ आणि बेडकीचा रोमान्स जोरात चालू आहे. जॅक-२ आता तिला रेग्युरली भेटायला जातो आणि तीही त्याची वाट बघत असते. धबधब्यावर एक सांकवही बांधला गेला आहे याच्या येण्याजाण्याकरता. तिची हेअरस्टाईलही आता ऋषिकन्येप्रमाणे राहिली नाही. आता एक बँड लावून केसांचा पोंगा उजव्या बाजूला सोडला आहे. गळ्यातले आणि कानातले सुद्धा अपग्रेड झाले आहेत. जॅक-२ तिला ब्रँडेड गिफ्टा देत असणार यात शंका नाही. जॅक-२ ला आता लग्नाची स्वप्ने पडत आहेत. तो मुहूर्त बघायला लागला आहे. पण हिला राजमहालात यायची घाई झाली आहे. जॅक-२ म्हणतो की जरा थांब. तुझं मी राणीसारखं स्वागत करायचा प्लॅन आखला आहे. रस्त्यांवर मोती, हिरे, जवाहिर पसरवून टाकेन छाप "अमीर लोग" प्लॅन आहे त्याचा. एकंदरीत अवंतीची महाराणी जिचे कूळ आणि मूळ माहित नाही अशी मुलगी होणार हे नक्की आहे.

तिकडे गांधाराची परिस्थिती अजूनच बिकट आहे. जयाप्रदा गांधाराची महाराणी होणार हे तर निश्चित आहे पण तिचा महाराज कोण हे अजून निश्चित नाही. भाभूचेही वय होत चालले असल्याने तो जयाप्रदालाच राजतिलक करून गादीवर बसवायचा विचार करतो आहे. त्यानुसार चैत्र शुद्ध सप्तमीचा मुहूर्त काढला आहे. यात एक छोटीशी अडचण आहे. राजतिलक करण्यासाठी गरजेचा असा राजमुकुट चोरीला गेला आहे आणि तो अजून परत मिळालेला नाही. भाभू म्हणतो की अजून धीर नाही धरवत. रिप्लेसमेंट म्हणून एक फुलांचा मुकुट बनवा आणि तो वापरू. इथे प्रथमच गुलशन ग्रोव्हर फोकसमध्ये दिसतो. ज्या रीतिने तो कादर खान शेजारी उभा आहे ते बघता तो कादर खानचा मुलगा असावा हे मानायला वाव आहे. भाभू कादर खानला सर्व बंदोबस्त करायची आज्ञा देतो, कादर खान हो म्हणून गुलशनसोबत निघून जातो.

६.४) भविष्यवाणी

आता जी गुफा आधी जितेंद्राचा अड्डा म्हणून दाखवली होती, तीच थोडे फेरफार करून कादर खानचा खुफिया अड्डा म्हणून दाखवली आहे. कादर खान आणि गुलशन ग्रोव्हरने कटैया, कालभैरव वगैरे सामंतांना या खुफिया अड्ड्यावर बोलावून घेतले आहे. काय बरे काम पडले, अशी विचारपूस चालू असतानाच तिथे अमजद खान येतो. तो भविष्यवाणी येत असल्याची वर्दी देतो. मुख्य व्हिलन येतो आहे हे ऐकून प्रेक्षक सावरून बसतो.

प्रत्यक्ष रिव्हील जरा अंडरव्हेल्मिंग आहे. भविष्यवाणी कादर खान किंवा प्राण यापैकीच असला पाहिजे हे जितेंद्रला ते पत्र सापडते तेव्हाच सांगता येते. आता कादर खान ऑलरेडी तिथे असेल तर येणारा भविष्यवाणी प्राणच असला पाहिजे. तसेही मुख्य व्हिलनला साजेशा प्लॅनिंगची त्याने चुणूक दाखवली आहे (विषकन्या) ते बघता प्राण भविष्यवाणी आहे हे खूप आधीच सांगता येते. प्राण आणि शक्ती कपूर मग मीटिंग जॉईन करतात. प्राण मग अजेंडा सांगू लागतो. प्रॉब्लेम असा झाला आहे की भाभूने अचानक जयाप्रदाचा राजतिलक करायचा ठरवला आहे आणि व्हिलन गँगला रिअ‍ॅक्ट व्हायची संधी मिळाली नाही. काही कारणाने प्राणला देखील जयाप्रदाचा राजतिलक होणे पसंत नाही. त्यामुळे तो कालभैरव, कटैया गँगला चिथावतो आहे. त्याचे म्हणणे असते की राज्याचा शासक पुरुषच हवा आणि स्त्रीची शासक म्हणून नेमणूक अपमानास्पद आहे. एका कसलेल्या मुख्य व्हिलनप्रमाणे प्राण या सामंतांच्या सुप्त इच्छेला सेक्सिझमचा वापर करून खतपाणी घालतो आहे. पण तेवढ्यावरच प्राणचं प्लॅनिंग थांबत नाही.

त्याचा सल्ला असा - जर मुहुर्ताच्या वेळी काही करून जयाप्रदाचा राजतिलक होऊ दिला नाही तर जनतेत खळबळ माजेल कारण पब्लिक डिसक्लोजर! अशावेळी जर कोणी महापुरुष पुढे आला आणि त्याचा राजतिलक झाला तर अँक्झाईटी रिडन जनता त्याला पाठिंबा देईल. एवढे बोलून तो साळसूदपणे सुचवतो की महामंत्री भानूप्रतापचा मुलगा कालकेतु गांधाराच्या गादीवर बसावा. इथे प्रेक्षकाची अवस्था - कालकेतू? कौन हैं कालकेतु? कालकेतु कौन है? अखेर कळते की गुलशन ग्रोव्हरचे नाव कालकेतु असून तो कादर खानचा मुलगा आहे. प्राण इकडे फार दूरची खेळी खेळतो आहे. तो सामंतांना पूर्ण स्वायत्तता देण्याच्या बदल्यात गुलशनचे राजपद फिक्स करून घेतो. मग १ तास पाच मिनिटांनी अखेर गुलशनला एक डायलॉग मिळतो. विक्रमसिंगने काही सामंतांना आपल्या बाजूने वळवून घेतले आहे. जितेंद्र आपल्यासोबत राजकीय डावपेच करत असल्याचे समजल्यावर प्राण छद्मी हसतो. इथे "हां मालूम हैं चल अपने बाप को मत सिखा" अ‍ॅटिट्यूड आहे. प्राणचा प्लॅन मग कादर खान इस्कटून सांगतो गांधाराची ती पब्लिक राजसभा एका किल्ल्यात भरते. हा किल्ला पूर्वेकडून समुद्राने वेढलेला आहे. तरी उत्तरेकडून कालभैरव, दक्षिणेकडून विजयसिंग आणि पश्चिमेकडून कटारी कटैया सामंतांचे नेतृत्व करतील. राजतिलकाच्या दिवशी अचानक हल्ला करून गांधाराच्या सेनेचा नि:पात करायचा असं ते सगळं प्लॅनिंग.

मुख्य व्हिलनने प्लॅन तर जोरदार बनवला आहे. यावर हिरो लोक काय प्रत्युत्तर देतील?

{{{ प्राण तिला तोंडभरून आशीर्वाद देतो पण तिला स्पर्श करताना तो काळजी घेतो आहे हे दिसू शकते. तिचा केअरटेकरही सुरक्षित अंतर राखूनच उभा आहे.}}}

कोरोना इफेक्ट

जबरदस्त! एक से एक लिहिलं आहेस! हे वाचून तो सिनेमा बघितला आणि भरपूर हसलो. त्या मंदाकिनीच्या डोक्यावरून कावळा उडतो - तिथे तर मी फुटलोच!

आत्ता तुझी रीसेंट पोस्ट वाचायची आहे, पण अजून विषय न निघाल्यास एक निरीक्षण - प्राणच्या महालात एक इजिप्शियन बनावटीचे सिंघासन आहे, त्याचा उद्देश कळला नाही. पूर्ण सिनेमात त्यावर कुणीही बसत नाही, पण दिसायला ते फारच अवजड आणि महत्त्वाचे दिसते. कदाचित इतर कुठल्या तरी सिनेमाच्या सेटवरून उरलेले सामान इथे वापरले असेल.

बाकी, हा सिनेमा पाहिल्यापासून तूनळीवर सारखे 'मवाली' सिनेमाचे सजेशन येत होते; शेवटी बायकोने कंटाळून तो लावला आणि तोही (धीर गोळा करून) आम्ही पाहिला. त्यातही डबलरोल आहे. मग आय एम डी बी वर पाहिले तर जितेन्द्रच्या डबल रोल असलेल्या तब्बल १६ सिनेमांची यादीच तिथे आहे. हे जर 'द कॉमेडी ऑफ एरर्स' लिहिणार्‍या शेक्सपीयरने पाहिले असते, तर 'येथे कर माझे गळती' म्हणत हतबुद्ध होऊन बसला असता!

प्राणच्या महालात एक इजिप्शियन बनावटीचे सिंघासन आहे >> केला आहे उल्लेख. माझी थिअरी अशी आहे की प्राण आयोनियामधील यातुधान वगैरे असावा नाहीतर इजिप्शियन सिंहासन आणि विषकन्या रेसिपी वगैरे प्रकार कसले जमायला त्याला?!

हे जर 'द कॉमेडी ऑफ एरर्स' लिहिणार्‍या शेक्सपीयरने पाहिले असते, तर 'येथे कर माझे गळती' म्हणत हतबुद्ध होऊन बसला असता! >> Lol जितेंद्र बॉलिवूडच्या इतिहासातला सर्वाधिक एंटरटेनिंग हिरो आहे असे माझे नम्र मत आहे. इतर हिरो अधिक लोकप्रिय किंवा अधिक अभिनयकुशल असतील पण प्रेक्षकांच्या करमणुकीचा चोवीस तास विचार करणार्‍यांमध्ये जितेंद्राचा नंबर फार वरचा आहे.

७) बेबच्या राज्यारोहणासाठी दाही दिशा

७.१) प्रभावी टॅक्टिक्स लढाई जिंकून देतात

जसे मंगल कार्यालयांमध्ये वेगवेगळ्या मजल्यांवर वेगवेगळी कार्ये सुरु असतात तसे त्याच गुहेच्या सेटच्या दुसर्‍या भागात जॅक-१ आपली मीटिंग घेतो आहे. इथे प्रथमच एखाद्या बॉलिवूड हिरोने प्रपोझिशनल लॉजिक वापरले आहे. विक्रमसिंग सांगतो की अभंगदेवच भविष्यवाणी आहे. आता त्याला हे कळण्याचे खरे काही कारण नाही. त्यामुळे त्याने मोडस पोनन्डो टोलन्स वापरला असलाच पाहिजे. विक्रमसिंग्ज प्रूफ
१) अभंगदेव किंवा भानूप्रताप वगळता कोणी इतर भविष्यवाणी असू शकत नाही.
२) भानूप्रताप भविष्यवाणी नाही. जर तो असता तर त्याला जहागीरदारांपर्यंत खजिना जंगलामार्गे पाठवायची गरज नाही. तो हे सर्व लीगल मार्गांनी करू शकतो.
३) मोडस पोनन्डो टोलन्स => अभंगदेव भविष्यवाणी असलाच पाहिजे.
(याचं प्रपोझिशनल लॉजिक वापरून फिच स्टाईलचं प्रूफही लिहिता येईल - http://logica.stanford.edu/logica/homepage/fitch.php. क्ष आणि य असे दोन प्रिमाईस घेऊन क्ष एक्सऑर य आणि मग ~य अझंप्शन करून सोडवता येईल.)
तसेही इतके पैसे पाठवायचे तर मुळात ते व्हिलनकडे पाहिजेत. कसले कसले कर लावून प्राण तितका श्रीमंत झाला आहे हे जॅक-१ ला कळले असल्याने त्याच्याकडे तार्किक सिद्धतेला पुष्टी देणारा पुरावाही आहे. मग जितेंद्र लाल रंगाचा फेटा घालून येरझार्‍या घालत आपले तर्क सांगतो आहे. ग्रीकोरोमन ब्याकग्राऊंड बघता हा प्लेटोवादी (किंवा येरझारावादी) असावा. अलकनंदेचा राजतिलक समारोह होणार आहे हे त्यालाही कळलेले आहे (पब्लिक डिसक्लोजर). प्राण ही संधी दवडणार नाही हे जाणून तो तर्क करतो की त्याने कादरखानच्या मदतीने जहागीरदारांची मोट बांधली असणार. एक एक्सट्रा याची बडबड संपावी म्हणून विचारतो की यावर आपली योजना काय आहे?
तो म्हणतो सिंपल आहे, हे लोक जंगलातून येत असतील. तर रामसिंग तू पश्चिमेस जा, महावीर तू उत्तरेस जा, मानसिंग तू दक्षिणेस जा, आणि तिघे मिळून गांधारात यायच्या रस्त्यांना बंद करून टाका. गद्दारांना मारुन टाका किंवा पळवून लावा, पण त्यांना राज्यात पोहोचू देऊ नका. मग तिथे नसलेल्या अभंगदेवला उद्देशून तो म्हणतो की तू अगस्त्य ऋषींप्रमाणे कूटनीति वापरून गांधारा राज्याचा नि:पात करण्याची योजना आखली आहे पण हे षडयंत्र विफल होऊन तुझा पराभव निश्चित आहे. इथे कोणत्या पुराणकथेचा रेफरन्स आहे हे ते काही कळलेले नाही.

मग काय व्हायचे तेच होते. जंगलातून एवढे प्रचंड घोडदळ नेणे काही खायचे काम नाही. त्यात जितेंद्रकडे जंगलात लपून अचूक नेम असलेल्या तिरंदाजांची फौज आहे. असा स्ट्रॅटेजिकल मिसमॅच प्राणसारख्या तज्ञ माणसाच्या लक्षात येऊ नये ही खेदाची बाब आहे. बघता बघता बाणांनी सर्व सैनिक टिपले जातात. काही सेना नदीमार्गे येण्याचा प्रयत्न करते. तर नदीमध्ये या लोकांनी करवती, काटेरी अडसर लावलेले असतात. त्याला अडखळून घोडे नदीत पडतात आणि असहाय सैनिकांना बाणांच्या मदतीने टिपले जाते. काही ठिकाणी झाडांना मोठे मोठे थर्माकोलचे काटेरी लोहगोल बांधून ठेवलेले आहेत. ते गोळे मारून उरल्या सुरल्या सैनिकांचा नि:पात केला जातो.

७.२) रिस्की मूव्ह

तिकडे विक्रमसिंगला व्हिलन लोकांच्या गुहेचा पत्ता सापडला आहे. तो तिथे एकटाच काळा फेटा, कटैयाला हरवताना घातलेले जाकीट घालून जातो. रिस्की मूव्ह! पण व्हिलन लोक त्याच्याहूनही मूर्ख असल्याने तिथे एकच माणूस मागे सोडला आहे. हा बहुतेक तोच का.क. डाकू आहे ज्याने मुकुट चोरला होता. तो जितेंद्राला बेसावध समजून त्याच्यावर वार करतो पण जितेंद्र हॅज गुड रिफ्लेक्सेस. तो शिताफीने का.क.डा. चा वार चुकवून त्याला आपल्या तलवारीच्या धारेवर धरतो. विक्रमसिंगला आपल्या बेबचा राजमुकुट परत हवा आहे. का.क.डा. आधी आढेवेढे घेतो पण समोरचा प्राणी विक्रमसिंग आहे हे समजताच मुकुट समोरच्या गुहेत आहे असे सांगतो. मग जॅक-१ त्याला बेशुद्ध करून मुकुट ठेवलेल्या गुहेत प्रवेश करतो.

हा तोच सेट आहे फक्त लायटिंग मारून वेगळ्या गुहेत आल्याचा आभास निर्माण केला गेला आहे. या गुहेत कोळिष्टके लोंबताना दाखवली आहेत. हे कसं शक्य आहे? का.क.डा. च्या म्हणण्यानुसार या गुहेत मुकुट ठेवला आहे. आता ही गुहा प्राणच्या मीटिंगच्या गुहेला लागूनच आहे. म्हणजे तिथे लोकांचे येणेजाणे आहे. का.क.डा तर इथे राहतो आहे. मग तो जागेची किमान साफसूफ करणार नाही? का प्राणला आपल्या कारस्थाने करण्याच्या जागेच्या स्वच्छतेशी काही घेणेदेणे नाही? हे कमी म्हणून तिथे झाडांची मुळे दिसत आहेत. म्हणजे ही गुहा जमिनीच्या खाली आहे आणि वरच्या झाडांची मुळे छप्पर फोडून आत आली आहेत. ही गुहा डेंजरस आहे. जर भूकंप आला आणि विक्रमसिंगच्या डोक्यावरच छप्पर कोसळले तर? (हा विचार "ए आई आपण बुंग मध्ये बसलो, वर आभाळात गेलो आणि अचानक बुंग बंद पडलं तर?" वरून प्रेरित आहे) विक्रमसिंगची ही मूव्ह किती रिस्की आहे हे त्याचे त्यालाच उमगलेले नाही. थोडे पुढे जाताच एक नारळाचे झाड दिसते आहे. गुहेत नारळाचे झाड? लाईक सीरियसली, एकालाही गुहेत नारळाचे झाड दाखवायच्या कल्पनेवर फेरविचार करावासा वाटला नाही?

७.३) जॅक वि. ड्रॅगन

हे कमी म्हणून तिथे सहा तोंडांचा एक ड्रॅगन पण आहे. जर हा नऊ तोंडांचा असता तर त्याला हायड्रा म्हणता आले असते आणि जॅक-१ हर्क्युलस म्हणता आला असता. ग्रीक प्रेरणांची कन्सिस्टन्सी पण राखता आली असती. आता तसे काही झालेले नाही बट दे ट्राईड!!! या ड्रॅगनचाही जितेंद्र इतकी रिस्की मूव्ह करत आहे यावर विश्वास न बसल्याने त्याचे डोळे बाहेर आले आहेत. प्रत्येक तोंडाला गोलाकार लाल डोळे आहेत जे चमकत आहेत. याला पापणी नसल्याने त्याचे डोळे पाकपूक करत आहेत ते तो अ‍ॅक्चुअली मिचकावत आहे असे म्हणावे लागेल. हा साप मुकुटाच्या रक्षणासाठी तैनात केला आहे. आता एवढा जबर्‍या प्राणी रक्षणाकरता असताना त्या टुकार का.क.डा. ची गरज ती काय? असो, या ड्रॅगनच्या पाठीवरच्या शिंगसदृश खवल्यांमध्ये (scute) मुकुट ठेवला आहे. जितेंद्र ड्रॅगनची नजर चुकवून मुकुट काढता येतो का ते बघतो.

ड्रॅगन भलताच चतुर असतो. जितेंद्र जवळ येतो आहे हे बघून तो आग ओकतो. जितेंद्र सुरक्षित अंतर ठेवल्याने वाचतो पण आग त्याच्या बर्‍याच जवळून जाते. इथे ड्रॅगनचे पाय दिसू शकतात आणि हा साप नसून ड्र्रॅगनच आहे यावर शिक्कामोर्तब होते. आता ड्रॅगन हळू हळू जॅक-१ च्या दिशेने सरकतो आहे. त्याचा इरादा निश्चितच जॅक-१ ला भस्म करण्याचा आहे. गंमत म्हणजे इथे त्याच्या चारच तोंडांतून आग निघते आहे. बहुधा दोन तोंडांचे इंधन संपले असावे. जॅक-१ मागे मागे सरकत जातो आणि अखेर एका द्रवकुंडाच्या कडेला येऊन थबकतो. द्रवकुंडातील द्रवामधून बुडबुडे निघत असल्यामुळे तो द्रवपदार्थ आम्लीय (अ‍ॅसिड) असल्याचे स्पष्ट होते. पुढे आग मागे आम्ल अशा अवस्थेत आपला हिरो अडकला आहे.

पण अतिशय कन्व्हिनिअंटली या कुंडाच्या मधोमध एक दगडी स्लॅब आहे. ही स्लॅब जणू तिथे बसून कोणीतरी आंघोळ करणार आहे अशा रीतिने बनवली आहे. अर्थात जॅक आधी स्लॅबवर उडी घेतो आणि मग आणखी एक उडी मारून दुसर्‍या कडेला जातो. या दुसर्‍या कडेला गुहेच्या वरच्या मजल्याकडे जाणारा रस्ता आहे. या रस्त्याने जॅक ड्रॅगनच्या नजरेच्या टप्प्याच्या बाहेर जातो. अतिशय जुना डिक्टम आहे, हायर अल्टिट्युड प्रोव्हाईड्स टेरेन्शिअल अ‍ॅड्व्हांटेज. आता जितेंद्र अधिक उंचीवर असल्यामुळे त्याचे पारडे जड आहे. पण ड्रॅगनही पक्का असतो. तो आपल्या शेपटाच्या मदतीने जॅकला खाली पाडतो. आता उडी मारून टेलिपोर्ट होणे या सुपरपॉवरचा उपयोग करण्याशिवाय पर्याय उरत नाही. तसा मग तो उडी मारून मुकुट हस्तगत करतो. आता ड्रॅगनशी लढा देऊन मरण्यात काहीच हशील नसल्याने तो तिथून काढता पाय घेतो.

७.४) राज्यारोहण सोहळा

तिकडे राजधानीत कादर खान, गुलशन ग्रोव्हर, कालभैरव, कटैया प्रभूती उपस्थित आहेत. निश्चितच ते आपापल्या सेना कधी राजधानीत पोहोचतात याची वाट बघत आहेत. तोवर भाभू आणि जयाप्रदासमोर नाटक करण्याशिवाय गत्यंतर नसल्याने कादर खान जमलेल्या आबालवृद्धांचे स्वागत करतो. काहीबाही संस्कृत श्लोक म्हटले जात आहेत. जयाप्रदा भरपूर दागिने घालून प्रवेश करते. इथे हिची केशभूषा देवसेनेसारखी आहे. मागून पुष्पवर्षाव करायला दोन दासी ठेवल्या आहेत. भाभू लगेच उठतो आणि तिच्यासाठी सिंहासन रिकामे करतो. भटजी निर्विकारपणे राजमुकुट घालायला सांगतो. हा टोन "हं आता पळीभर पाणी ताम्हनात सोडा" वाला टोन आहे. जयाप्रदा टेचात डावा हात सिंहासनाच्या कडेवर रेलून बसली आहे. पण भाभू राजमुकुटाच्या उल्लेखाने भावुक होतो (म्हणजे आमचा आपला अंदाज कारण त्याच्या चेहर्‍यावर तेच सदैव दुर्मुखलेले एक्सप्रेशन. बैजु बावरात याची मीनाकुमारी मेल्यापासून हा मनापासून हसलाच नाही). तो म्हणतो की फुलांचाच मुकुट आहे चालेल. इथे तो पुरोहित/भटजी एवढा घाईत आहे की भाभूचा डायलॉग पूर्ण होण्याची वाट न बघता तोच फुलांचा मुकुट भाभूच्या हातात देतो. असा हा "फुलं नाहीत तर मंत्रपुष्पांजलीला अक्षता वापरा" स्टाईल राज्यारोहण संस्कार सोहोळा बघून प्रेक्षकाच्या दगडी हृदयालाही पाझर फुटू शकतो. पण विक्रमसिंगला हे मंजूर नसते.

तो जोरात ओरडून सगळ्यांचे लक्ष वेधून घेतो. हा प्राणी सिंहासनासमोरच्या सज्जात राजमुकुट घेऊन उभा आहे. हा इथे कधी आला? कुठून आला? सगळे दरवाजे बंद दिसत असताना याला आत कोणी घेतले? हे असे सर्व प्रश्न व्यर्थ आहेत कारण जॅक-१ कोणासाठीही कुठेही विंगेत दबा धरून बसू शकतो. इथे तो भाभू "राजमुकुट नाही" याची जाणीव होऊन कधी भावुक होतो याची वाट बघत विंगेत थांबला आहे. इथे केवळ कॅमेरा पॅनोरमा प्रमाणे फिरवून जितेंद्राचा चांगली क्लोजअप लावता येत नाही म्हणून कट दिला आहे. अन्यथा कटैया सीन प्रमाणे कॅमेरा कितीतरी अंशात फिरवून जितेंद्र दाखवायला कमी केले नसते. आपला हिरो बघून जयाप्रदा एक्साईट तर कादर खानची पाचावर धारण. तो सांगतो की हे बघा मी राजमुकुट घेऊन आलो. त्याचे भाषण कटैया इतक्या सिन्सिअरली ऐकतो आहे की ते एक डाव बघण्यासारखे आहे. जयाप्रदा यावर एक्साईट स्क्वेअर. आपला प्लॅन बोंबलतो आहे हे लक्षात येऊन कादर खान हलकेच कालभैरवला इशारा करतो. भाभू राजमुकुट ताब्यात घेऊन जितेंद्रला थँकयू म्हणतो. आता याचे राजद्रोहाचे आरोप वगैरे सगळे विसरायचे. जयाप्रदाला मुकुट घालणार इतक्यात कालभैरव म्हणतो "ठहरो!! क्या आपने पंखा बंद किया?" (मुकेश खन्ना कुजबुजतो - अरे तू भीष्म नाही भीम, हा डायलॉग तुला नाही मारता येणार)

७.५) व्हिलन लोक, स्त्री राज्य, आणि हमारा अगला पिलान

इतक्या सहजासहजी राज्यारोहण सोहळा होऊ दिला तर ते व्हिलन लोक कसले! कालभैरव एक लास्ट ट्राय म्हणून ओरडतो की ठहरो!! पण जॅक-१ ठरवून आलेला असतो की आज आर या पार. आपल्या बेबचा राजतिलक आज झालाच पाहिजे. तो म्हणतो कोण आहे रे तो जो ऑब्जेक्शन घेतो आहे? कालभैरवसाठी सुद्धा आता परिस्थिती हातघाईवर आलेली आहे. सेना अजूनही आलेली नाही पण विक्रमसिंग पोहोचला आहे. म्हणजे काहीतरी प्रॉब्लेम झालेला आहे. आता या तर वेळकाढूपणा करता येईल किंवा उघड उघड आव्हान देता येईल. वेळकाढूपणा तरी कितीवेळ करणार? त्यामुळे तो थेट सांगतो की माझी या राजतिलकाला हरकत आहे. कादर खान अधिक पॉझिटिव्ह असल्याने त्याला अजूनही सेना येण्याची आशा असते. त्यामुळे तो वेळकाढूपणा करायचे ठरवतो. तो कालभैरवचे ऑब्जेक्शन चर्चेला घ्यायचे ठरवतो.

जितेंद्र म्हणतो की असल्या टुच्च्या जहागीरदारांच्या मताला किंमत द्यायचं काही कारण नाही. कादर खान त्याला म्हणतो की असं नाही चालत बाबा, समजा सगळ्या जहागीरदारांनी एकत्र हरकत घेतली तर यांना कोण हँडल करेल? जितेंद्र आवाज चढवू बघतो तर तो म्हणतो "ए गप ए". आता पुन्हा एकदा सोशल कमेंट्री मारण्याची वेळ झाली आहे. कालभैरव, कटैया वगैरे बोंबा मारू लागतात की आम्ही स्त्री-शासक कदापी मान्य करणार नाही. स्त्रिया राज्यकारभार सांभाळण्यास सक्षम नाहीत - टिपिकल इनसेक्युरिटी काँप्लेक्स वाली बडबड. कालभैरव तर इतका तापतो की त्याला एका दमसासात एक वाक्य बोलता येत नाही. जयाप्रदा जर इथे "दादा श्वास घ्या जरा. मी किंवा कादर खान कुठे पळून जात नाही. पाणी पाहिजे का तुम्हाला? विकुडार्लिंग, जरा आपल्या तलवारीचे पाणी पाज कालभैरव दादांना" असा काही ड्वायलॉक मारती तर बहार आली असती. पण दिग्दर्शक ड्वायलॉक नाही तर सोशल कमेंट्री मारण्यात इंटरेस्टेड असल्याने तसे काही होत नाही.

जितेंद्र मग डायलॉग मारून जयाप्रदाला डिफेंड करू लागतो. एकतर जयाप्रदा स्वत:ला निश्चितपणे डिफेंड करू शकते - श्रीराम लागूंनी सांगितल्याप्रमाने युद्धनीति तथा राजनीति में निपुण - पण तिला समजा आपल्या तोंडाची वाफ दवडायची नाही, पब्लिक प्रॉसिक्यूटर सुजित कुमार अशावेळी कुठे तडमडला? आणि विक्रमसिंग व कालभैरव मधूनच नरुटो-स्टाईल टॉक-नो-जुत्सू अर्थात वाकयुद्ध सुरु करतात ते सगळे मद्दडासारखे बघत काय उभे आहेत? जितेंद्राचा मुद्दा त्या काळातला पॉप्युलर मुद्दा आहे. तुम्ही पूजा करता ती देवी देखील स्त्रीच आहे. जयाप्रदा विरोधात जाऊन तू देवीचा अपमान करतो आहे. गार्गी-मैत्रेयी ही दोनच नावे सगळ्यांना माहिती असल्याने त्यांचा उल्लेख होतो. खरंतर दाक्षिणात्य डिरेक्टरने किमान लोपामुद्रेचा उल्लेख करायला हरकत नव्हती. बट दे ट्राईड!! बापडी जयाप्रदा एवढ्यानेही खुश होते.

कालभैरव अजूनही टेचात असतो कारण सेना येण्याची आशा असते. जितेंद्र हसून त्याला म्हणतो "अहो मूर्ख मी इथे आलो आहे याचा अर्थ तुमच्या सेनेचा धुव्वा उडाला असून तुमच्या प्लॅनचा बोजवारा वाजला आहे एवढंही कळू नये?" आता यावर अगला पिलान द्यायची वेळ झालेली असल्याने कालभैरव मरेस्तोवर विरोध करण्याचा निर्णय घेतो. जितेंद्रही म्हणतो की तुझ्या मरण्याची वेळ झाली आहेच. चल फैसला करूनच टाकू.

ही रोमहर्षक लढाई कोण जिंकेल या व्यर्थ प्रश्नाच्या महा ऑब्व्हिअस उत्तरावर विचारमंथन पूर्ण होताच पुढील रसग्रहण घेऊन हजर होईन.

Lol
का. क. डा., बट दे ट्राईड, टुच्च्या जहागीरदारांच्या, एकाच गुहेचे वेगवेगळे नेपथ्य..... खूपच हसू आले!
काय निरीक्षण!

राज्यशास्त्राची माहिती भारतीय जनतेस सोप्या शब्दात व्हावी या उद्देशाने हा सिनेमा काढला आहे असा माझा अंदाज आहे. लोकशाहीची वैशिष्ट्ये सांगा या प्रश्नाचे उत्तर बहुतेक कादर खान मुलाला शिकवत असताना जोडीने या सिनेमाची पण कथा लिहिली असावी. त्या जितेंदर व प्रवीण कुमार/कादर खान प्रसंगात लोकशाहीची मुल्ये, स्त्री-पुरुष समानता पण त्याचबरोबरीने राजकुमारीला जन्माधारीत हक्काने मिळणारे अधिकार दाखवून ऑल (वु)मेन आर इक्वल बट सम आर मोअर इक्वल या ऑर्वेलियन विचाराने राखाडी रंग भरणे अशी कारागिरी कादरखानने साधली आहे.

या शिणुमातले जितु व मंदाकिनि चे "प्यार की रात आयी" ( how subtle !) हे गाणे युट्यूब वर आहे.
त्याचे रसग्रहण अजून आले नाही.
संबंधित अधिकारी इकडे लक्ष देतील काय ?

Spoiler alert one song coming up jeetu jaya prada where she wears a peacock theamed dress and crown. Jeetu the prince wears black and gold embellished royal dress and several extras I red dress gold ornaments in a garden with paper cut out backdrops

{{{ ४) डबल रोल असेल तर दोन सेपरेट हिरविणी लागतात, त्यांचाही डबल रोल असून चालत नाही. }}}

या नियमाला एका निर्मात्याने छेद द्यायचा प्रयत्न केला होता. राधेश्याम सीताराम नावाचा एक सिनेमा बनवला जात होता ज्यात सुनिल शेट्टी आणि ऐश्वर्या राय या दोघांचे डबल रोल्स होते. प्रत्यक्षात हा सिनेमा कधीच पूर्ण होऊन पडद्यावर येऊ शकला नाही. त्यामुळे या नियमाला अजुनच बळकटी मिळाली.

राज्यशास्त्राची माहिती भारतीय जनतेस सोप्या शब्दात व्हावी या उद्देशाने हा सिनेमा काढला आहे असा माझा अंदाज आहे. >> सोळा आणे सहमत.
ऑर्वेलियन विचाराने राखाडी रंग >> Biggrin

सामंत वगैरे इतका भारी शब्द पयास ने वापरला आहे...त्याला सिनेमात काय म्हटलं आहे? >> जागीरदार

संबंधित अधिकारी इकडे लक्ष देतील काय ? >> ते गाणे यायला सिनेमात अजून एक तास आहे. बाराव्या किंवा तेराव्या भागात त्या गाण्यावर भाष्य असेल.
jaya prada where she wears a peacock theamed dress >> हे गाणे आधी येते.

Pages