सिंघासन

Submitted by पायस on 23 March, 2020 - 03:34

मध्ये नागराजचं समग्र कॉमिक कलेक्शन पुनःपारायणाचा योग आला. त्यात विषकन्या म्हणून मस्त कॉमिक आहे. नागतांत्रिक विषंधर नागराजला मारण्यासाठी यक्षराक्षस गरलगंटची आराधना करून एक विषकन्या यज्ञातून उत्पन्न करतो आणि मग नागराज विरुद्ध ते दोघे असा सामना आहे. ते वाचताना इतर विषकन्या रेसिपी डोक्यात घोळू लागल्या. अशा वेळी सिंघासन मधली रेसिपी आठवणे आणि तो सिनेमा बघणे हे ओघाने आलेच. तरी दोन जितेंद्र एक प्राण,
दोन राज्ये कारस्थाने बेसुमार,
एक राजकन्या एक विषकन्या,
शक्ती कपूर अमजद खान आपले चन्या मन्या
आणि महत्त्वाचा भिडू कादर खान असा हा चांदोबापट आहे. जितेंद्र-कादर खान द्वयीने ८० मध्ये केलेल्या पातालभैरवीपटांपैकी एक! याचे रसग्रहण पुढीलप्रमाणे

१) गांधार राज्यात गांधारी नाही

हा सिनेमा पद्मालया स्टुडिओज् ने बनवला असल्याने यावर साऊथपटांचा जबर पगडा आहे. त्यामुळे भडक रंगाचे सेट्स, कपडे वगैरेंची रेलचेल आहे. धरम-वीर हा अ‍ॅक्चुअली फार संयत चित्रपट आहे हे सिंहासन सारखे सिनेमे बघितल्याशिवाय लक्षात येत नाही. याचा दिग्दर्शक कृष्णा हा तेलुगु इंडस्ट्रीचा मूळ क्विक गन मुरुगन. याची तेलुगु आवृत्ती सुद्धा मिळते पण जितेंद्र आणि कादर खान जी मजा आणतात ती तेलुगु मध्ये नाही.

१.१) ग्रीक लोकांचा गांधारावर प्रभाव होता

नमनाला आपल्याला जितेंद्र एका रथात येताना दिसतो. जंपिंग जॅक गांधार देशाचा महावीर सेनापती विक्रमसिंग आहे. काही कारणाने हे लोक गांधारला गांधारा म्हणतात. आपण दोन्ही नावे आलटून पालटून वापरू. विक्रमसिंग कुठलीशी लढाई जिंकून राजधानीत परतला आहे. ग्रीक शैलीचे शिरस्त्राण व चिलखत आहे. लक्षात घ्या की अलेक्झांडरचे भारतातील पहिले पाऊल हे गांधार देशात पडले होते आणि गांधार शिल्पकलेवर ग्रीकांचा प्रभाव दिसून येतो. त्यामुळे गांधार देशातील वेषभूषा ग्रीक असणे स्वाभाविक आहे. ही गोष्ट वेगळी की लवकरच हे लॉजिक धाब्यावर बसवले जाते बट दे ट्राईड. जॅकची विजययात्रा चाललेली असताना मध्ये मध्ये जयाप्रदाचे शॉट्स. सुरुवातीलाच हिरो-हिरोईन जोडी एस्टॅब्लिश करून दिग्दर्शक आपले कौशल्य सिद्ध करतो. ग्रीक प्रभाव असल्याने राजसभा उघड्यावर, सॉरी प्रशस्त पटांगणावर भरलेली आहे. गांधार नरेश दाखवला आहे भारत भूषण. याचे नाव आहे शमींद्र भूपती. तसे बघता केवळ आपला राजा भारत भूषण आहे या एका कारणासाठी लोकांनी या व्हल्नरेबल राजसभेचा फायदा घेऊन दगडांचा वर्षाव करायला हरकत नाही पण पेमेंट वेळेत होत असल्याने ही सर्व एक्स्ट्रा जनता फारच खुशीत आहे.

भाभू जॅकचे स्वागत करतो. उजव्या हाताला जयाप्रदा बसलेली आहे - ही देशाची राजकन्या अलकनंदा. डाव्या हाताला कादर खान आहे - हा महामंत्री भानू प्रताप. अशा सिनेमांत सिंहासनाच्या मंडपाच्या पायर्‍यांवर उभे राहायला एक पात्र लागते. इथे गुलशन ग्रोव्हरची वर्णी लागली आहे. जॅक कुठल्याशा राजपुरी पर्यंतचा इलाखा जिंकून आलेला असतो. ही राजपुरी कुठे आहे हा प्रश्न अगदी बिनमहत्त्वाचा आहे. तसेच ग्रीक प्रभावामुळे या सगळ्या अनाऊंसमेंट पब्लिक आहेत. आपल्या राज्याची खलबते, मिलिटरी स्ट्रॅटेजी, आर्थिक धोरणे सर्वकाही माहितीच्या अधिकारांतर्गत जनतेस उपलब्ध आहे. हा सिनेमा बघून डेमोस्थेनिस स्वर्गातून पुष्पवृष्टी करेल असा आमचा कयास आहे. गेला बाजार एक भाषण तर नक्कीच ठोकेल.

१.२) सामंत व्यवस्था

भाभूचे राज्य सामंत सिस्टिम फॉलो करते. पुढील सीन वरून असे दिसते की जॅकला सामंतांची बंडाळी मोडून काढायला पाठवले होते. तो सोबत बरेच सामंत घेऊन आलेला असतो. एक एक करून प्रत्येक सामंत भाभू पुढे हजेरी लावतो आणि भाभू त्याला उदार मनाने सन्मानित करतो. यात मुख्य सामंत आहेत - काल भैरव (प्रवीण कुमार, महाभारतातला भीम), दुर्गापुरचा सामंत आणि राजगडचा जहागीरदार कटारी कटैया (गुरबचन सिंग). काल भैरव आणि कटारी कटैया अशी नावे असलेली लोकं अर्थात व्हिलन पार्टीत असणार हे कोणीही सांगू शकतं. त्यामुळे त्यांचा मेकअपही तसाच आहे. आणखी एक हरेंद्र गौतम म्हणून कोणी दाखवला आहे पण तो चेहर्‍यावरूनच युसलेस दिसत असल्यामुळे त्याला भाभूही भाव देत नाही. इतर दोघांना मात्र स्पेशल ट्रीटमेंट आहे - काल भैरवला पहिले आसन मिळते तर कटारी कटैयाला सोबत दोन आयटम आणता येतात. मग तो एका थाळीत भाभूचे पाय घेऊन नुसतेच चोळतो (मला वाटलं दुधाने धुवेल) आणि तेच हात डोईला स्पर्शून जागेवर बसतो. चरणांची धूळ मस्तकी लावणेचे इतके शब्दशः चित्रण मी प्रथमच पाहिले. बाकी मग दहाबारा पडेल चेहर्‍याचे एक्स्ट्रा आहेत ते आपले असेच आहेत.

कादर खान युद्धात हरलेल्या त्या सर्वांचे सांत्वन करून त्यांना आश्वस्त करतो की तुमची वतने तशीच पुढे चालू राहतील फक्त राज्याप्रती निष्ठावंत रहा. मग भाभू जॅकचे तोंडभरून कौतुक करतो. इथे भाभूचा क्लोजअप आहे ज्यावरून कळते की हे राज्य चंद्रवंशी आहे. मग जॅकला देशरक्षक आणि परमशूरवीर अशी बिरुदे मिळतात. इंटरेस्टिंगली याच्या कंबरेला क्सिफोसच्या (ग्रीक शॉर्टस्वोर्ड) बनावटीला मिळती जुळती तलवार आहे. त्याला जयाप्रदाच्या हस्ते एक राजवंशाची तलवार भेट दिली जाते. ही मात्र ब्रॉडस्वोर्ड आहे जे फारच बुचकळ्यात टाकणारे आहे. आता एवढं सगळं झाल्यावर जयाप्रदाला पण काहीतरी द्यायला हवे. मग ती दिवास्वप्न बघू लागते आणि दोघांचे गाणे सुरु होते.

१.३) कॉस्मिक गाणे

गाण्याचे बोल आहेत "किस्मत लिखनेवाले पर जरा बस जो चले हमारा, अपने हिस्से में लिख लें हम सारा प्यार तुम्हारा". थोडक्यात पझेसिव्ह कपल आहे. या सिनेमातली गाणी गुणगुणायला म्हणून बरी आहेत. संगीत आहे बप्पीदांचे आणि गायक आहेत किशोर कुमार आणि आशा भोसले. गाण्यात काही शिकण्यासारखे नसले की प्रेक्षक नृत्यावर लक्ष केंद्रित करतो. हे नृत्य म्हणजे वैश्विक स्तरावरचे नृत्य आहे. आधी बॅकग्राऊंडसमोर उदबत्ती लावून तिचा धूर शूट केला आहे. मग वेगवेगळे जितेंद्र-जयाप्रदा शॉट्स आणि हे सर्व ग्राफिक मॅच करून एक शॉट. या सगळ्यामध्ये ग्रहगोलांची अगतिक भ्रमणे आणि अभ्राच्छादित अंतराळ आहे. अंतराळात टिकणारे हे विशेष ढग केवळ गांधार देशात मिळत असल्याने आपल्याला आज ते बघावयास मिळत नाहीत.

जितेंद्रला एक कुरळ्या केसांचा विग दिला आहे. हा सेम विग तेलुगु सिनेमात कृष्णा पण वापरतो. कृष्णाला तो विग फिट बसतो, जॅकला नाही. कधी कधी उलटी परिस्थिती सुद्धा होते. माझा अंदाज असा आहे की दोन्ही सिनेमांचे युनिट एकच असल्याने कधी जॅकचा विग कृष्णाला तर कधी कृष्णाचा विग जॅकला गेला आहे. जयाप्रदाला नागराणी छाप मुकुट का दिला असेल याचा मी अजून विचार करतो आहे. बहुतांश वेळ ते दोघे ट्रॉलीवरून इकडून तिकडे जातात आणि तिकडून इकडे येतात. पुणे ५२ ची प्रेरणा इथूनच आलेली आहे. मध्येच ते लाल सूर्यासमोर डान्स करतात आणि अचानक एक पंखवाला घोडा न जाणे कुठून येतो. कहर प्रकार म्हणजे मध्ये मध्ये एक टुंग-टुंगटुडुंग-टुंगडुंग-टुंगडुंग-टुंग-टुंगटुडुंग-टुंगडुंग-टुंगडुंग-टुंग अशी काहीतरी ट्यून वाजते जी काहीशी ऑफबीट आहे. त्यावरच्या जयाप्रदाच्या स्टेप्स पूर्णपणे ऑफबीट आहेत. "राजकन्यांनी किमान स्वतःच्या स्वप्नात तरी बीटमध्ये नाचावे" असा नियम नसल्याची खंत वाटते. आणि हे लोक नक्की किती राज्ये फिरून आले आहेत - यांच्या स्वप्नात त्यांना किल्ले, मिनार, इमारती, वाडे, महाल आणि अगणित वेगवेगळ्या स्थापत्यशैलींचे नमुने आहेत. नि:संकोचपणे खर्चा कियेला हैं.

याने पोट न भरल्याने शेवटच्या कडव्यात जयाप्रदा शब्दशः दागिन्यांनी मढून येते. आता तिच्या डोक्यावर एक मोराचा मुकुट आहे. आता मोराचा मुकुट घातलाच आहे तर मोराच्या स्टेप्स केल्या पाहिजेत म्हणून ती पिसारा फुलवल्याचे कल्पून मोरासारखी नाचू लागते. इथे दिग्दर्शक विसरतो की पिसारा हा नर मोराला असतो. मादी मोर अर्थात लांडोर पिसारा फुलवून नाचत नाही. पण बहुधा जितेंद्राने थुईथुई नाचण्यास नकार दिला असावा किंवा जयाप्रदा तशीही थुईथुई नाचते आहे तर हेही करून बघू असा विचार झाला असावा. एकदाची जयाप्रदा स्वप्न बघता बघता दमते आणि हे गाणे संपते.

२) अवंती राज्यात एकही प्रद्योत नाही

२.१) स्टॉकर महामंत्री

सीन चेंज, जयाप्रदा शयनकक्षात झोपली आहे. हिचा पलंग एकदम भारी दाखवला आहे. डोक्यापाशी पलंगाला मोराच्या आकाराचे खांब आहेत. चार चिल्लर सैनिक हातात प्रत्येकी एक सुरा घेऊन तिला मारायला येतात. ते तिला मारणार इतक्यात जॅक कुठून तरी येऊन तिला वाचवतो. तिला वाचवण्याच्या नादात तिच्या पोटावर तो रेलल्याने ही जागी होते. काय झाले हे कळण्याच्या आत ते चार चिल्लर सैनिक पळून जातात आणि रेघारेघांचे फेटे बांधलेले चार भालदार उगवतात आणि आपापले भाले जितेंद्रावर रोखतात. मग तिथे कादर खान येतो. तो जॅकवर राजकुमारीच्या हत्येच्या प्रयत्नाचा आरोप ठेवतो. आता तेच चार चिल्लर सैनिक येतात आणि जितेंद्रला पकडून नेतात. कादर खान व्हिलन असल्याचे इथे चाणाक्ष प्रेक्षक ओळखतो. जयाप्रदालाही काहीतरी काळेबेरे असल्याची शंका येते पण ती गप्प राहते.

दुसर्‍या दिवशी त्याला राजसभेत आणले जाते आणि फुल्ल पब्लिक डिसक्लोजरमध्ये जॅकचा खटला सुरू होतो. सुजितकुमार अधियोजक अर्थात पब्लिक प्रॉसिक्यूटर दाखवला आहे. त्याचा मुख्य साक्षीदार असतो कादर खान. कादर खान म्हणतो की रात्री मी राजकुमारीच्या खोलीकडे कोणाला तरी जाताना पाहिले आणि मी सैनिकांसोबत त्या सावलीचा पाठलाग केला. पाहतो तर काय, महावीर, परमवीर, परमशूरवीर, देशरक्षक विक्रमसिंग खंजीराने राजकुमारीची हत्या करण्याचा प्रयत्न करत होता. सुजितकुमार जरा हुशार असतो. तो म्हणतो ते सगळं ठीक आहे पण मध्यरात्री तू, महामंत्री, राजमहालात काय करत होता? यावर कादर खान म्हणतो की यू सी, अवर महाराज हॅज नो सन ओन्ली डॉटर. अ‍ॅन्ड सम पीपल आर सो डाऊनमार्केट दॅट दे डोन्ट वॉन्ट अ क्वीन अ‍ॅज देअर रुलर. म्हणून मी प्रत्येक क्षण राजकुमारीवर नजर ठेवून असतो; तिच्या सुरक्षेकरिता ऑफकोर्स. अर्थात यावर कोणाला काहीच प्रॉब्लेम नसल्याने सुजितकुमार पुढचा प्रश्न विचारतो - मॉन अमी, व्हॉट्स द मोटिफ? कादर खानचे उत्तर तयारच असते - सिंहासनाची अभिलाषा. सगळी सेना पाठीशी असल्याने हा शेफारला आहे आणि आता याला राजा बनण्याची स्वप्ने पडत आहेत. सुजितकुमार म्हणतो - पण मग राजकुमारीला मारण्याची काय गरज आहे, तिला बंदी बनवून पण काम झालं असतं की? हायला हा वकील आहे की कादर खानचा मुलाखतकार? कादर खानची क्रॉस चालू असताना त्याला स्पेक्युलेट काय करायला लावतो आहे? आणि महामंत्री कोतवालाची कामं का करत हिंडतो आहे? सर्वात महत्त्वाचा प्रश्न - गुलशन ग्रोव्हर कोण आहे? त्याला नुसतंच सिंहासनासमोरच्या पायर्‍यांवर का उभं केलं आहे?

कादर खानच्या म्हणण्यानुसार जितेंद्रला भीति असते की राजकुमारीला बंदी बनवलं तर जनता त्याच्याविरोधात बंड करेल. या क्लेममध्ये काहीच अर्थ नाही. जर जितेंद्र राज्यातल्या सगळ्या सामंतांना एकटाच पुरून उरत असेल तर असल्या किरकोळ बंडांना तो का भीक घालेल? पण सुजितकुमार त्यावर विश्वास ठेवतो. आता जॅकचा डिफेन्स सुरू होतो. जॅकवर राज्यअपहरणाचा आरोप ठेवला जातो. आँ? याने अपहरण कोणाचं केलं? असला फडतूस प्रॉसिक्यूटर बघता आपण खटला जिंकण्याची सुतराम शक्यता नसल्याचे जॅकला कळून चुकते. तो म्हणतो की मी राजकुमारीला मारण्याचा प्रयत्न केला नाही. तुम्हाला नसेल पटत तर गेलात उडत. भाभू त्याची पूर्वीची सेवा लक्षात घेऊन त्याला फाशी देण्याऐवजी हद्दपार करतो. जितेंद्र जाता जाता त्याला सावध राहण्याचा इशारा देऊन निघून जातो.

२.२) स्नुषा संशोधनासाठी देवळात जावे

आता दुसर्‍या राज्यात काय चालू आहे ते बघण्याची वेळ झाली आहे. या राज्याचे नाव अवंती. अवंतीमध्ये दिसतात प्राण, अमजद खान आणि शक्ती कपूर. शक्ती कपूरचा ड्रेस आय थिंक रोमन स्टाईलचा आहे. ग्रीक-इटली शेजार म्हणून तसे ते केले असावे. याच्या कपाळावरही चंद्रकोर आहे फक्त ती तिरकी आहे. थोडक्यात दोन्ही राज्ये चंद्रवंशी असल्याने यांच्यात एक कॉमन धागा आहे. हा अवंतीचा सेनापती दाखवला आहे. पद्मालयवाल्यांना अमजदचा पातालभैरवीतला गुटगुटीत, गोंडस रोल आवडल्याने त्याची पुनरावृत्ती केली आहे. याला "बादाम खाके" म्हणण्याची सवय आहे. प्राण या सगळ्यांचा गुरु, अवंतीचा राजगुरु असल्याचे त्याच्या वेशभूषेवरून ताडता येते. याचे नाव आहे आचार्य अभंगदेव. अवंतीमध्ये आज लोकं वेड्यासारखे एका मंदिराच्या दिशेने धावत सुटले आहेत. असे का बरे बादाम खाके? शक्ती कपूर म्हणतो की हे मंदिर गांधारा आणि अवंतीच्या सीमेवर आहे आणि दरवर्षी देवीच्या दर्शनाला म्हणून दोन्ही राज्यांची प्रजा इथे येते. प्राण मग मंदिराची हिस्टरी सांगतो. तीन पिढ्यांपूर्वी दोन्ही राज्यांनी शांतिसंधी करून त्याचे प्रतीक म्हणून हे अपराजिता देवीचे मंदिर बांधले. त्यामुळे इथल्या दहा कोसांचा परिसरात कोणीही मुक्त संचार करू शकतं.

मग तिथे जयाप्रदा, कादर खान, गुलशन ग्रोव्हर प्रभूती येतात. देवीची पूजा करायला म्हणून ते आलेले आहेत. कादर खान देवीला हात जोडून म्हणतो की बाय माझे, आमच्या राजाला मुलगा नाही. क्षणभर मला वाटले हा या वयात भाभूला मुलगा होऊ दे असा आशीर्वाद मागतो की काय पण तसे होत नाही. त्याचे म्हणणे असते भावी राणी अलकनंदेला आशीर्वाद दे. मग जयाप्रदा आशीर्वाद मागते. ती राजमुकुट घेऊन आलेली असते. असे कळते की भाभू आजारी असल्याने येऊ शकलेला नाही आणि प्रॉक्सी म्हणून राजमुकुट पाठवला आहे. या सीनचा तसा काही उपयोग नाही. पूजा झाल्यावर ती बाहेर पडते तर गाभार्‍याबाहेर वहिदा रहमान आणि श्रीराम लागू उभे असतात. ते कोपर्‍यात उभे राहून जयाप्रदाला ताडतात. वहिदा अवंतीची राजमाता आहे तर श्रीराम लागू महामंत्री. वहिदा म्हणते पोरगी सुंदर आहे नै. श्री.ला. लगेच पुस्ती जोडतात की युद्धनीति आणि राजनीतिमध्ये सुद्धा निपुण आहे. इथे उच्चार शुद्ध असल्याचा फायदा होऊन भाभूच्या नावाचा जो शमींद्र, शरमेंद्र असा इतका वेळ उद्धार चालवला आहे ते नाव क्षेमेंद्र असल्याचे कळते. वहिदाची इच्छा असते की जयाप्रदा आपली सून व्हावी. यात एक प्रॉब्लेम आहे - राजकुमार आदित्य वर्धन अगदीच ऐषारामी राजपुत्र आहे.

२.३) सिंगल जितेंद्र डबल जॅक, लेट्स अनलीश द बूबा पॅक

अमजद खान, याचे नाव कुपटेश्वर, येऊन सांगतो की राजकुमार पूजेला येणार नाही. त्याच्या जागी त्याचा भाऊ उग्रराहू पूजा करेल असं प्राणने ठरवल्याचेही तो सांगतो. वहिदा मनातली खंत बोलून दाखवते - अभंगदेवच्या मार्गदर्शनाखाली आदित्य सर्व विज्ञांमध्ये पारंगत तर झाला पण ऐषारामी वृत्तीही त्याच्या हाडामासी खिळली. हा क्यू घेऊन जितेंद्र क्रमांक दोनची एंट्री. आदित्यवर्धनही जितेंद्रच दाखवला आहे. याचा विग थोडा वेगळा आहे ज्याच्या मदतीने तो ओळखू येतो. आदित्यवर्धन आपल्या महालात दारू पिऊन चार अर्धनग्न ललनांसोबत ऐष करत असतो. अशा वेळी गाणे झालेच पाहिजे.

गाण्याचे बोल आहेत बूबा बूबा मेरी बूबा...............
नो जोक्स हिअर - हे गाण्याचे अ‍ॅक्चुअल बोल आहेत. सुरुवातीला बरंच दिल मेरा डूबा, मेरी महबूबा वगैरे होतं आणि मग बूबा बूबा, बूबा बूबा, बूबा बूबा, बूबा बूबा मेरी बूबा सुरु. यातल्या सर्व बूबांना जितेंद्र आणि एक बाई आपापाल्या छात्यांचा भाता एकमेकांच्या दिशेने ओढतात. आधीच्या जितेंद्रला किशोरचा आवाज वापरल्याने या जितेंद्रला बप्पीदांनी स्वतःचा आवाज दिला आहे. बायकांसाठी आवाज आशाजींचा. आधीचा जितेंद्र तितका मनमोकळेपणाने नाचत नसल्याने हा जितेंद्र फुल ऑन नाचतो. या ललना नाचतात कमी आणि थरथरतात जास्त. तो काय टकलू हैवान आहे थरथराट व्हायला? याच्या कपाळावरही चंद्रकोर आहे आणि महालात पिसारा फुलवलेला एक भलामोठा कांशाचा मोर आहे. ही सेट डिझाईन मधली थिमॅटिक कन्सिस्टन्सी वाखाणण्याजोगी आहे. पण काही ठिकाणी हलगर्जीपणा केलेला आहे. एक बाईची मूर्ती आहे आणि तिच्या हातात चक्क शॉवरहेड दिलं आहे. आता एखादे भांडे देऊन त्यातून पाणी पडताना दाखवले असते तर ठीक होतं पण शॉवर? आणि जितेंद्र मेरी बूबा म्हणतो ते महबूबाचा शॉर्टफॉर्म म्हणून खपतं तरी; यातली मुख्य ललना फुल्ल सिडक्टिव्हली मेरा बूबा म्हणत आहेत, विथ कॅमेरा अ‍ॅट रिक्वायर्ड अँगल!!

मध्येच जितेंद्र आणि ललनांचे ब्रेकडान्स मोंटाज सुरु होते. मग जितेंद्र आणि मुख्य ललनेचा रोमान्स आणि इतर बायकांचे त्यावर कौतुकाने लारालूं, जितेंद्रचे दर दोन कट नंतर कपडे बदलणे, उड्या मारत डान्स करणे, महालाचे इंटेरिअर बदलणे इत्यादि प्रकार घडतात. एवढ्यानेही समाधान न झाल्याने या ललना ओकाशिबा आणि लालालाला करत नाचू लागतात. इथे भविष्यात करिश्मा कपूर-गोविंदाने वापरलेल्या काही स्टेप्स दिसतात. यानेही मजा न आल्याने याचा पलंग गोल गोल फिरायला लागतो आणि त्यावर बूबा बूबा होते. एवढे बूबा बूबा झाल्याने त्या ललनांच्या सिंक्रोची पार वाट लागते आणि दिग्दर्शक नाईलाजाने गाणे आवरते घेतो.

३) पहिली चकमक

३.१) ऐदी राजकुमार

आता इतर बूबा खोलीतून बाहेर गेल्या आहेत आणि जॅक क्रमांक दोन व मुख्य ललनेचा रोमान्स सुरू आहे. मुख्य ललना राजनर्तकी असून तिचे नाव आहे जसवन्ती. आपण तिला जास्वंदी म्हणूयात. जितेंद्र जास्वंदी ओठांमध्ये गुंगण्याच्या मूडमध्ये आहे पण तिला जितेंद्राच्या इभ्रतीची पडली आहे. ती म्हणते की जनतेचे काय? तिच्याप्रती असलेल्या जबाबदारीचे काय? जितेंद्र म्हणतो जनता को तो उपरवाला जनता (जन्म देतो) हैं, और जो जनता हैं वही जनता की चिंता करता हैं. हे असे कादर खान स्पेशल डायलॉग्ज या सिनेमात दर मिनिटाला सापडतात. अजूनही थोडे डायलॉक मारले जातात पण मुख्य मुद्दा असा आहे की जितेंद्रला आपल्या जबाबदारीचं फार काही पडलेलं नाही. आधी नमूद केल्याप्रमाणे तो कर्तव्यपरायण नाही. जास्वंदीने मुघल-ए-आझम पाहिला असावा कारण तिला त्या दोघांचे प्रेम बदनाम होईल अशी शंका आहे. पण जॅक-२ भलताच कूल असतो - जो प्यार बदनाम नही होता उस प्यार का कोई नाम नही होता. त्याचं म्हणणं असतं की माझ्यावतीने राजगुरु देवीची पूजा करवतील आणि मी तुझी पूजा करेन. राजघराण्यात जन्मल्याचा अर्थ असा की माझ्यासाठी डोकं कोणीतरी दुसरं चालवेल आणि युद्धात हाणामारी अजून कोणी तिसरं करेल. मी का चिंता करू? वहिदा जेव्हा याच्या नावानं बोट मोडत होती तेव्हा ती याचा ऐदीपणा अंडररेट करत असल्याचे आता प्रेक्षकाला कळून चुकते. हा दारु आणि बाई दोन्हीच्या नादी लागल्याचे आपल्याला कळून चुकते.

३.२) रॉबिनहूड सेनापती

सीन चेंज. पहाटेची वेळ. भडक निळ्या रंगाचे कपडे घातलेले पहारेकरी आणि त्यांनी संरक्षित एक छावणी. या छावणीला काही डाकूंनी घेरले आहे. सर्व पहारेकर्‍यांना बेशुद्ध केले जाते आणि काळाकभिन्न दिसणारा मुख्य डाकू एका तंबूत प्रवेश करतो. हा जयाप्रदाचा तंबू आहे. जयाप्रदा आणि तिच्या दासी साखरझोपेत आहेत आणि राजमुकुट निष्काळजीपणे जवळच एका मंचकावर ठेवलेला आहे. का.क. डाकू मुकुट उचलून पोबारा करतो. एका पहारेकर्‍याला वेळेत शुद्ध येते आणि तो झोपलेल्या सेनापतीला उठवून चोरीची बातमी देतो. मग सैनिक त्या डाकूंचा पाठलाग करू लागतात. जंगलातल्या वाटांशी परिचय नसल्याने थोड्याच वेळात ते डाकू त्यांना चकवा देण्यात यशस्वी होतात.

भाभू ही बातमी ऐकून भलताच क्रुद्ध होतो. म्हणजे असे समजण्याची अपेक्षा आहे कारण नेहमीप्रमाणेच त्याच्या चेहर्‍यावर काहीही भाव नाहीत आणि आवाजात काहीही चढउतार नाही. तो महामंत्री आणि सेनापतीला उगाच दोन शब्द सुनावतो पण हे आपलं नगास नग. ते गेल्यावर जयाप्रदा त्याला विचारते "तुम्ही म्हणता हा मुकुट विशेष आहे. म्हणजे नक्की काय?" भाभू म्हणतो उस मुकुट में महिमा हैं (म्हणजे परदेशी बनावट), करिश्मा हैं (खानदानी आहे), चमत्कार हैं (आर यू शुअर इथे उर्मिला हैं म्हणायचं नव्हतं आणि चित्रपटाचं नाव घ्यायचं होतं?). एनीवे, अ‍ॅपरंटली हा मुकुट कोणा योग्याने भूपती घराण्याला दिलेला असतो आणि जोपर्यंत हा मुकुट आहे तोपर्यंत या घराण्याचे राज्य कायम राहिल असा आशीर्वादही दिलेला असतो. भाभू संशय व्यक्त करतो की हे कोणाचे तरी षडयंत्र आहे.

तिकडे जितेंद्र क्रमांक १, विक्रम सिंग आता डाकू बनला आहे. याने मुकुट चोरलेला नाही, चिंता नसावी. आता रेशमी वस्त्रे व कवच कुंडले जाऊन साधा वेष, फेटा आणि केसाळ लेदर जाकिट आले आहे. याच्या गुहेत छान गारवा असावा अन्यथा त्या जाकिटाला काही अर्थ नाही. पण इतक्या मशालींमुळे पुरेशी उष्णता मिळत असावी. तरी स्वतःला त्रास करून घ्यायचा याचा हट्ट असल्याने हा तसाच जाकिट घालून हिंडत आहे. विक्रमसिंगचा अंदाज असतो की हे षडयंत्र सामंतांपैकी एकाचे आहे. त्याचा संशय काल भैरववर असतो कारण काल भैरव एक नंबरचा लोभी आहे. तसेच या सगळ्यामागे कोणी एक मुख्य व्हिलन असल्याचा संशयही तो बोलून दाखवतो. आता प्रश्न इतकाच की हा कोणी घरचा आहे की अवंतीचा? याच्याकडे सार्‍या गावाची बित्तंबातमी असल्याने याला हे माहित असते की गांधाराचा प्रॉब्लेम आहे की कोणीतरी राजकुमारीला मारण्याचा प्रयत्न करत आहे तर अवंतीमध्ये विविध प्रकारचे कर लादून जनतेची पिळवणूक चालली आहे. त्यामुळे यांचे कार्य ठरलेले आहे - भूपती घराण्याचे रक्षण आणि अवंतीच्या जनतेची करांच्या दुष्टचक्रातून मुक्तता. तेवढ्यात एकजण येऊन बातमी देतो की कसलातरी खजिना राजगडच्या दिशेने जातो आहे. रॉबिनहूडगिरी सुरु करण्याची वेळ झाली आहे.

३.३) कटारी कटैया

राजगडची जहागीर कटारी कटैयाची असल्याने साहजिकच याच्यामागे त्याचा हात आहे. जॅक-१ जाऊन तो खजिना अडवतो. खजिना म्हणजे एका रथात काही पेटारे घालून दोन जण नेत असतात. इतकी ढिसाळ सुरक्षाव्यवस्था क्वचितच बघावयास मिळते. त्यात हे दोघे विक्रमसिंगला मानणारे निघतात. ते त्याला कसलीही आडकाठी करत नाहीत. तो घोड्यावरून उडी मारून रथात येतो. पेटार्‍यांमध्ये हिरे-जवाहिर, सोने-नाणी इ. असते. तसेच रेशमी कपड्यावर एक पत्र आहे. कोणा "भविष्यवाणी" नामक इसमाने कटारी कटैयासाठी आशीर्वाद आणि हा खजिना पाठवलेला असतो. निश्चितच हा भविष्यवाणी मुख्य व्हिलन आहे. पण कोण?

आता जितेंद्र ठरवतो की मुख्य व्हिलनला नंतर बघता येईल आधी कटारी कटैयाला धडा शिकवूयात. इथे त्याचा एक आऊट ऑफ फोकस शॉट आणि शेपटी हलवत असलेल्या घोड्याच्या पार्श्वभागावर फोकस! मग जितेंद्र सगळा खजिना काढून घेऊन पेटार्‍यांमध्ये दगडं भरून कटैयाकडे पाठवतो. सोबत स्वतःचे एक पत्रही देतो. पत्रात कटैयाची निर्भत्सना केलेली असते. याने तो भलताच चिडतो आणि आपली भेडिया फौज जितेंद्राच्या मागावर पाठवायचा आदेश देतो. इथे अपेक्षा काय की जितेंद्रचा पाठलाग होईल, मे बी जितेंद्र याला खिंडीत गाठून आपले युद्ध कौशल्य दाखवेल, मग चार दोन डायलॉग, दोन चार खणाखणी. पण नाही. जितेंद्र ओरडतो कटैयाऽऽऽऽऽऽऽ हा प्राणी कटैयाच्या तळावर येऊन कटैया चिडण्याची वाट बघत विंगेत उभा आहे.

जॅक त्याला "घास खानेवाला खच्चर" आणि स्वतःला सिंह म्हणवून घेतो. तसे बघावे तर दोघेही गाढव आहेत पण जोपर्यंत ते एकमेकांना मनुष्य म्हणवून घेत नाहीत तोवर काही हरकत नाही. जितेंद्र त्याला म्हणतो की त्या भविष्यवाणीसोबत मिळून देशद्रोही कारवाया करणे बंद कर. कटैया त्याला म्हणतो मला उपदेश करण्याआधी तू डाकूगिरी बंद कर. हो ना करता करता मुद्दा सर काटण्यापर्यंत येतो. जॅक सुचवतो की चल द्वंद्व करून याचा निकाल लावू. कटैया म्हणतो ठीक आहे. जितेंद्र-१ इथून पुढे शक्य तितक्या उड्या मारत असल्याची नोंद घ्यावी. त्यामुळे तो घोड्यावरही उडी मारून बसतो. द्वंद्व असे असते की हे घोडेस्वार एकमेकांच्या दिशेने येणार, तलवारीने दुसर्‍याचे मस्तक धडावेगळे करण्याचा प्रयत्न करणार, जर दोघे फेल गेले तर रिपीट. थोडी खणाखणी झाल्यानंतर कटैया मोठ्या हुशारीने जितेंद्राच्या घोड्याच्या पायांवर वार करतो. याने जॅक आणि त्याचा घोडा दोघेही तोंडावर आपटतात. मग जॅकला घोड्याच्या टापांखाली चिरडण्याचा प्रयत्न होतो पण जॅकही कटैयाला घोड्यावरून खाली पाडतो. पुनश्च खणाखणी. जॅकला जखमही होते. पण त्याच्या उडी मारण्याच्या सुपरपॉवरपुढे लवकर कटैया निष्प्रभ ठरतो आणि चांगलाच घायाळ होतो. जितेंद्र मग कटैयाच्या नावाने एक नवीन संदेश लिहून घेतो - क्षेमेंद्र महाराजांना माझा प्रणाम. माझा या राजद्रोहाशी काही संबंध नाही, मी पूर्वीप्रमाणेच तुमच्याशी एकनिष्ठ आहे. मग तो खजिन्यासकट नवीन संदेश भाभूकडे पाठवून देतो.

इथे माझा अल्पविराम. भविष्यवाणी कोण, विषकन्या कोण, ती कशी बनवली जाते आणि अशाच इतर रोमहर्षक बाबी प्रतिसादांत कव्हर करतो.

विषय: 
शब्दखुणा: 
Groups audience: 
Group content visibility: 
Use group defaults

या चित्रपटात जयाप्रदा जेव्हा हळू आवाजात हिंदी वाक्य बोलते ते ठीक वाटतं , पण जेव्हा ती हिंदी वाक्ये ओरडून बोलते तेव्हा तिचे उच्चार मजेशीर आहेत.

अरे ड्रॅगन नंतर काही आलेच नाही की काय ?

पायसा - तुझ्या पंख्यांना पुढील परिक्षण लिहून कृपाप्रसादाची दीक्षा द्यावी Wink

पुढील परिक्षण लिहून कृपाप्रसादाची दीक्षा द्यावी >> Happy पुढचा कृपाप्रसाद हा घ्या

८) प्रोअ‍ॅक्टिव्ह हिरोईन असेल तर रोमान्स लवकर डेव्हलप होतो

८.१) मूर्ख व्हिलन

कालभैरव "अंधयुद्ध" करण्यात प्रवीण असतो. म्हणजे डोळ्यांवर पट्टी बांधून लढण्यात पटाईत असतो. यात आणि शब्दवेधी असण्यात एक फरक आहे. शब्दवेध्याला जागचे हलणे गरजेचे नसते. त्यामुळे त्याचे रिफ्लेक्सेस थोडे कमजोर असले तरी चालतात. अंधयोद्ध्याला त्याचे रिफ्लेक्स स्टॅट्स मॅक्स आऊट करणे अत्यावश्यक आहे आणि अ‍ॅटॅक स्टॅट्स थोडे कमी असले तरी चालतात. तसेच डॉज वाढवून कॅरिस्मा सॅक्रिफाईस करता येतो. याचे बेस्ट इंप्लिमेंटेशन अ‍ॅडव्हेंचर क्वेस्ट वर्ल्ड्स या गेममधल्या रोग (rogue) क्लासमध्ये आहे. त्यानुसार कालभैरवही रोग म्हणजे अप्रामाणिक, दलबदलू आहेच. असा बारीकसारीक विचार दिग्दर्शकाने केलेला पाहून प्रेक्षक गहिवरून जातो.

जितेंद्राचे मोटिव्हेशन त्याहूनही उदात्त आहे. राजतिलक बघायला आलेल्यांचे थोडे मनोरंजन होऊन जाऊ देत. कालभैरवही एका सेकंदात जितेंद्राचा शिरच्छेद करण्याची घोषणा करून मैदानात उतरतो. दोघांनी डोळ्यांवर पट्ट्या बांधल्या आहेत. हातात तलवार आणि आयताकृति ढाल. रोमन लोक आयताकृति ढाली वापरत असत पण यांचे डिझाईन थोडे वेगळे आणि अधिक भारतीय आहे. बट दे ट्राईड! बरं ही खणाखणी सिंहासनाजवळच्या सज्जात होते आहे. कालभैरव अंधयुद्धात प्रवीण असेल तर त्याला सगळ्यांच्या स्टार्टिंग पोझिशन्स पाठ असतील. असे असता त्याने जितेंद्राला सरळ इग्नोर मारून सिंहासनावरच्या जयाप्रदावर हल्ला केला आणि आत्मघातकी हल्ल्यात तिला ठार करण्याचा प्रयत्न का केला नाही हा संशोधनाचा प्रयत्न आहे. लगे हाथ भाभूचा गेम करून कादर खान, गुलशन ग्रोव्हर आणि कटैयाच्या मदतीने राजधानीतून पळ काढणे काही फारसे कठीण कर्म नाही. तरी तडीपार, फडतूस, भूतपूर्व सेनापतीवर आपले कौशल्य खर्च करण्याचा मूर्खपणा करून कालभैरव स्वतःविषयी प्रेक्षकांच्या मनात काडीचीही सहानुभूति शिल्लक ठेवत नाही.

८.२) चतुर हिरो

कालभैरव खरंच अंधयुद्धात प्रवीण असल्याने तो बरोबर जितेंद्राच्या स्टार्टिंग पोझिशनवर प्रहार करतो. रिफ्लेक्स बरे असल्याने जॅक तो वार परतवतो पण कालभैरव त्याला पहिल्या मजल्यावरून खाली पाडतो. जयाप्रदा जरा चिंतेत आहे. पण ८.१ मधला कालभैरवचा मूर्खपणा तिच्या लक्षात येता तर तिने सुटकेचा नि:श्वास सोडला असता. कारण आता लढाई तिच्या पासून दूर खुल्या मैदानात आहे. इथून कालभैरवचे पळून जाणे दुरापास्त आहे. जितेंद्रचे नशीब अजून इतके चांगले नाही. तो फक्त डिफेन्सिव मूव्ह्ज करून टिकून राहिला आहे. कालभैरव वेगाने प्रहारांवर प्रहार करत सुटला आहे. अखेर जॅकला कळते की उडी मारून याचा वार चुकवला तर मग याचा कोऑर्डिनेट प्रेडिक्शन अल्गोरिदम फेल होऊन याला त्याच्या सिस्टिम्स रिकॅलिबरेट कराव्या लागतील. तेवढ्या वेळात आपल्याला स्ट्रॅटेजी बनवता येईल. तो तसेच करतो आणि कालभैरव गोंधळून चुपचाप एका जागी थिजतो.

कालभैरवही लेचापेचा नसतो. जमिनीवर खडी पसरली आहे हे लक्षात येताच तो मुद्दामून आपला पाय घासतो जेणेकरून आवाजाच्या दिशेने जॅकने जंप मारावी. जॅकची जंप तो चुकवतो आणि जॅक जमिनीवर. पुन्हा प्रहारांवर प्रहार. यावेळेसही जितेंद्र अधिक हुशार ठरतो. कालभैरवची अपेक्षा की तो डॉज करताना कालभैरवच्या विरुद्ध दिशेला लोळेल पण जितेंद्र हुशारीने कालभैरवच्या पायांच्या दिशेने लोळतो. जितेंद्राला अडखळून कालभैरव भुईसपाट! तो पडलेल्या ठिकाणच्या खड्यांची डायरेक्ट वाळूच!! हा रोमहर्षक सामना बघून जयाप्रदा - मेरेको तो ऐसा धक धक हो रेला हैं - मोड मध्ये.

हुशार लोकांचे नशीबही साथ देते. त्यामुळे जितेंद्र अनवधानाने सिंहासनाकडे जाणार्‍या जिन्याला अडखळतो पण पडत नाही. त्याची कोऑर्डिनेट सिस्टिम त्यामुळे आधी रिकॅलिबरेट झाली आहे. तसेच त्याच्याकडे टेरेन अ‍ॅड्व्हांटेज आहे. याचा तो पुरेपूर फायदा उठवतो. आधी तो पहिल्या मजल्यावरून आपली ढाल खाली फेकतो. हे म्हणजे काईजुडो मधल्या डार्क सिव्हिलायझेशनच्या स्नेक अ‍ॅटॅक स्पेल कार्ड सारखे आहे ज्याच्यात आपली शील्ड सॅक्रिफाईस केली जाते. कालभैरव येडपट, त्याला ढाल पडल्याचा आवाज आणि अख्खा माणूस पडल्याचा आवाज यात फरक करता येत नाही आणि पुन्हा तो स्लॅशिंग फ्रेंझी मोडमध्ये जातो. याचा फायदा घेऊन जितेंद्र वरच्या मजल्यावरून त्याच्यावर उडी घेतो. याने कालभैरव भेलकांडत जाऊन चार सैनिकांवर आदळतो.

८.३) थाई योगी

हिरोला इतक्या सहजासहजी जिंकू देणे थोडे बोरिंग होत असल्यामुळे व्हिलनलाही थोडे लक दिले जाते. त्यानुसार कालभैरववर केलेला एक वार एका खांबाला लागतो आणि जितेंद्राचे ट्रॅकिंग फेल जाते. मग जितेंद्र एक धोंडा तर कालभैरव एक मडके अ‍ॅज अ बेट वापरून एकमेकांना शोधण्याचा प्रयत्न करतात. त्यानुसार ते जवळपास एकाच वेळी एकमेकांना सापडतात पण कालभैरवने आपला सर्व स्टॅमिना वापरल्याने त्याच्या हालचालींमध्ये शैथिल्य आलेले आहे. त्याचा फायदा घेऊन जितेंद्र त्याच्यावर एकावेळी एक वार करायला लागतो. यावर कालभैरव पॅनिकमोडमध्ये जाऊन कसेही वार करायला लागतो. याने स्टॅमिना, ताकद सर्वच व्यर्थ खर्च होते आणि त्याच्या ओरडण्याने जितेंद्रला आयतेच त्याचे लोकेशन कोऑर्डिनेट्स मिळतात. मग काय एक उडी आणि तलवार कालभैरवच्या छाताडात. कालभैरव खलास!!

आपला भिडू जिंकलेला बघून जयाप्रदा हरखते. पण आमचा अंदाज आहे की खरे तर "आता तरी डायलॉग्ज मिळतील" या कल्पनेने ती आनंदली आहे. पण आपला भिडू हरलेला पाहून कादर खान टरकतो. जॅक मग ऐटीत पायर्‍या चढून सिंहासनाकडे जातो. भाभूही याचे महत्त्व ओळखून त्याला स्वतःच्या हातांनी जयाप्रदाला राजमुकुट घालण्याची विनंती करतो. त्यानुसार मग विक्रमसिंग हस्ते राजकन्या अलकनंदेचा राजतिलक समारोह पार पडतो. ती आता गांधाराची महाराणी अलकनंदा देवी आहे. तो मुकुट काही जयाप्रदेच्या डोक्याचे माप घेऊन बनवलेला नाही. मुकुटाचे डिझाईन थाई वाटते. हाऊस ऑफ हाँटेड नावाच्या थाई फोक हॉरर मध्ये याप्रकारचे मुकुट बघायला मिळतात. मुकुटाच्या दोन्ही बाजूंनी दोन रत्नजडीत लंबक आहेत. याने तिच्या कानाच्या पाळ्या अतिशय लांबट असल्याचा भास व्हावा असा हेतु असावा. हे थेरवद बौद्ध राजांमध्ये बघावयास मिळते. यात बुद्धाच्या कानाच्या पाळ्या अतिशय लांब असल्याची मान्यता आहे जे त्याच्या बुद्धत्व प्राप्त झाल्याचे लक्षण समजतात. तसेच आपला राजा/राणीही अतिशय ज्ञानी असल्याचे दर्शवण्याकरिता असे मुकुट बनवले जात. थेरवद बौद्ध थाईलंडमध्ये असल्याने मुकुट देणारा योगी हा बौद्ध असून थाईलंडमधला असल्याचा सिद्धांत मांडता येतो. तसेच गांधार राज्याचा सुदूर पूर्वेशी संपर्क असल्याचे सिद्ध होते.

८.४) उधळलेल्या पटावर पुन्हा सोंगट्या मांडण्याची वेळ

महाराणी झाल्याच्या आनंदात जयाप्रदा जितेंद्राची हद्दपारीची शिक्षा रद्द करून त्याला पुन्हा एकदा सेनापती नेमते. ही घोषणा होत असताना जयाप्रदाचा क्लोजअप आणि जॅक-१ फ्रेमबाहेर जातो. मग ती प्रेमाने जॅक-१ कडे बघायला जाते तर तो गायब! विक्रमसिंग हा परोपकारासाठी परोपकार करत असल्यामुळे त्याचे काम होताच निघून गेलेला आहे. हे करताना त्याच्या शेजारी उभा असलेला भाभू, समोर उभे असलेले कादर खान-गुलशन ग्रोव्हर, आणि मागच्या निष्काम कर्मयोगी दासी यापैकी कोणीच बघितलेले नाही. विक्रमसिंग काय क्विकसिल्व्हर आहे काय? असो, जयाप्रदाला फारसे पडलेले नाही तर आपण का चिंता करा. जयाप्रदा त्याच टोनमध्ये आपला दुसरा आदेश देते. सगळे जहागीरदार आणि कादर खान, तसेच गुलशन ग्रोव्हरला ती हद्दपार करते. पण एक कळत नाही. कादर खानचा गद्दारपणा कसा सिद्ध झाला? का जाता जाता जॅक-१ तिच्या कानात "यईच गद्दर हैं" कुजबुजून गेला?

आपण एवढ्या मेहनतीने साधत आणलेला डाव असा एकाएकी उधळला गेल्याने प्राण फारच कष्टी झाला आहे. स्वतःच्या टॅक्टिक्स फालतू असल्याचे आणि विक्रमसिंग अधिक हुशार असल्याचे अजूनही तो मान्य करायला तयार नसतो. मग वड्याचे तेल वांग्यावर काढणे आले. त्यानुसार तो कादर खानला जाब विचारू लागतो. गुहेत नेहमीचे यशस्वी कलाकार वजा कालभैरव आहेत. कादर खान अधिक रिअलिस्टिक व्हिलन असल्याने जोपर्यंत विक्रमसिंग जिवंत आहे तोपर्यंत गंधारा सुरक्षित असल्याचे तो खेदपूर्वक मान्य करतो. शक्ती कपूरही जेव्हा त्याच्या जखमेवर मीठ चोळतो तेव्हा कादर खान भडकतो. तो म्हणतो यात माझी काय चूक आहे? कालभैरव, जो हातांनी एक सिंह फाडत असे, त्याला जॅक-१ ने तलवारीने टराटरा फाडला. हे सगळे सामंत, ज्यांच्या सेनेवर आपली भिस्त होती, ते कालभैरव मरत असताना षंढासारखे बसून राहिले. मी एकटा कुठे आणि किती पुरा पडणार. बरोबरच आहे बादाम खाके. अमजद म्हणतो की नशीब याला जयाप्रदाने फाशीची शिक्षा न देता फक्त हद्दपार केले. नाहीतर याचं प्रेत लटकताना दिसलं असतं बादाम खाके. एक दोन फालतू विनोद होतात आणि प्राण गेन्स हिज कंपोजर अगेन. त्याचे नाव अभंगदेव आहे आणि तो राजनीतिचा देवता आहे. तो म्हणतो की "इस हार को फूलों का हार बनाकर दुश्मन के हार के समय हम खुद अपने गले में डालेंगे". आपल्या एकातरी कडक डायलॉगला न्याय मिळालेला पाहून गहिवरलेला कादर खान विचारतो की ते ठीक आहे पण तोवर आम्ही काय करायचं? प्राण म्हणतो की तोवर इथेच गुहेत राहा. पुढचं पुढं

८.५) तोहफा

आता एवढा पराक्रम गाजवल्यावर एक गाणे व्हायलाच पाहिजे. दिग्दर्शक त्याचा सेटअप करायला घेतो. विक्रमसिंग आपल्या गुहेत आहे आणि त्याच्यासाठी अलकनंदेने एक पुरुष उंचीचा पेटारा तोहफा म्हणून पाठवलेला आहे. त्याची उंची, विक्रमसिंगसाठी या काँटेक्स्टमध्ये तोहफा काय असू शकतो, तोहफा अलकनंदेकडून आलेला आहे इ. मुद्द्यांवरून सहज सांगता येते की पेटार्‍यात जयाप्रदा आहे. तरीही थोडा बिल्डअप म्हणून हा पेटारा जितेंद्राने एकांतांत उघडावा अशी सूचना आहे. तो तखलिया करतो आणि पेटारा उघडतो. पेटार्‍यात अपेक्षेनुसार नटून थटून आलेली जयाप्रदा एक्साईट क्यूब!!

आता - आपण एका मोठ्या राज्याची नुकतीच महाराणी झालो आहोत, विक्रमसिंग अजूनही डाकू बनून हिंडतो आहे, प्राण-कादर खान लोकही विक्रमसिंग राहतो त्याच जंगलात आहेत, आपल्या राज्याची सेना विक्रमसिंगच्या अनुपस्थितीत टोटल यूसलेस आहे हे सर्व ठाऊक असतानाही केवळ आपल्या क्रशला भेटण्यासाठी एवढा मोठा स्टंट करण्यामागे काय प्रयोजन असावे? विक्रमसिंगला जर बोलावणे पाठवले तर तो राजधानीत, तेही थेट आपल्या खोलीत येणार नाही का? तसेही आपला "मी नाही त्यातली आणि कडी लावा आतली" तत्त्वावर भक्कम विश्वास! मग गुहा काय आणि राजमहालातले दालन काय, काय फरक पडतो? तरी हट्टाने क्लिओपॅट्रा छाप मुकुट घालून ताई गुहेत हजर. जयाप्रदा या सिनेमात दिसते बाकी छान. तिला दागिन्यांनी अक्षरशः आंघोळ घातली आहे. जॅक-१ तिच्या मूर्खपणावर रागवत नाही हे पटण्यासारखे आहे. प्यार मध्ये इतका अंधा असल्यानेच तो अंधयुद्ध जिंकू शकला. जयाप्रदा म्हणते की हे बघ, जनतेचे भले, कर्तव्य, गद्दारों को सजा वगैरे वगैरे होत राहिल. पण बेबचे लाड पुरवणे हे सुद्धा तितकेच महत्त्वाचे आहे. त्याला ते पटते आणि गाणे सुरु

८.६) छुम छुम छुम, छुम बाबा छुम

दोघेही झक्कपैकी निळा ड्रेस घालून नाचायला तयार. इथे मनमोकळे नाचायचे असल्याने जॅक-१ ने जॅक-२ चा विग उधार घेतला आहे. यांच्या नाचण्यासाठी एक छोटे उद्यान, त्यात एक तळे, तळ्यात कारंजी, मागे चवीपुरते "आआआआ" करायला एक्स्ट्रांचा जथा असा सर्व बंदोबस्त राजकोषातून केला आहे. इव्हन एक केशरी रंगाचा न चमकणारा सूर्यही गाण्यात आहे. बागेचा कंटाळा आला तर नदीकाठचे एक मंदिरही बुक केलेले आहे. एवढी जय्यत तयारी असल्यावर गाणे रंगले नाही तरच नवल! जयाप्रदा शक्ती कपूरसारखी वेडगळ हसते आणि गाणे सुरु होते.

गाण्याच्या सुरुवातीला दोघे टाळ्या पिटतात तर एक्स्ट्रा "छुम लाला छुम" करतात. कवायतप्रकार करून झाल्यावर कीबोर्ड व ड्रमसेट वाजायला लागतो आणि किशोर कुमारचा प्रसन्न आवाज कानावर पडतो. सोबत पी. सुशीला ही ख्यातनाम तेलुगु गायिका आहे. गाण्याचे बोल आहेत "तेरे लिए मैंने जनम लिया, मेरे लिए तुने जनम लिया". जितेंद्र-जयाप्रदा धमाल नाचले आहेत. जितेंद्र आधीच्या सिनेमांत जास्त चांगला नाचला असेल पण डान्स एंजॉय त्याने फक्त जयाप्रदा आणि श्रीदेवीसोबतच केला. जेव्हा जितेंद्र नाचता नाचता दातांनी खालचा ओठ दाबू लागेल तेव्हा समजायचं की भाऊ भान हरपून नाचणार आहेत. अशावेळी तो कधी कधी ऑफबीट जातो, त्याकडे दुर्लक्ष करायचे असते. त्याला बीट मध्ये आणण्यासाठी जयाप्रदा (किंवा श्रीदेवी) आहेत, चिंता करण्याचे काही कारण नाही. या सिनेमातल्या गाण्यांची एक स्पेशालिटी आणखी आहे. याचा गीतकार (इंदीवर) फक्त ७५% च गाणे लिहितो. गाळलेल्या जागांमध्ये मग "छुम छुम छुम, छुम बाबा छुम" असले शब्द मेसच्या भाज्यांमधल्या बटाट्यासारखे भरले आहेत.

कडवे बदल आणि कपडे बदल हे हिंदी सिनेमांत समानार्थी शब्द आहेत. आता जयाप्रदाने मोराचा मुकुट आणि शोभेसा ड्रेस घातला आहे. तिची टिकली सुद्धा मोराच्या आकाराची आहे. जितेंद्रही राजकुमार वाटेल अशा पांढर्‍या कपड्यांत मस्त दिसतो आहे. दाक्षिणात्य पब्लिकला खुश करण्यासाठी बप्पीदांनी इथे दोन-तीन मृदुंगमच्या बीट्स भरल्या आहेत. दिग्दर्शकाचे ट्रॉली ऑब्सेशनही पुन्हा सुरु होते. गीतात ती स्वतःला अ‍ॅज अ गिफ्ट म्हणून देण्याच्या गोष्टी करते आहे. डान्स स्टेप्समधून पप्प्या टीज केल्या जात आहेत. कळस म्हणून त्या दोघांना हायड्रॉलिक ट्रॉलीवर बसवून ते कारंज्यावर बसलेले असून हळू हळू हवेत वर जात आहेत असा ट्रिक शॉटही काढून घेतला आहे. पुन्हा छुम छुम छुम, छुम बाबा छुम.

यानेही फारशी मजा न आल्याने जयाप्रदाला साडी नेसायला दिली आहे. कारण त्याशिवाय दाक्षिणात्य सिनेमांत अत्यावश्यक असलेले नेव्हल शॉट्स घेता येत नाहीत. मग दोघे एक अमेझिंग असा कदम ताल करतात - "एक दोन तीन म्हणत उजवीकडे मटका, उजवी तंगडी वर आणि पार्श्वभागावर फटका". डान्स स्टेप्स मधून "किस को टीझ कर रहे हैं" प्रकार चालू आहेतच. मागून व्हीएफएक्स इफेक्ट आणण्यासाठी मध्ये गोल कापलेले स्टेन्सिल वापरून फ्रेम लावली आहे. अत्याधुनिक सॉफ्टवेअरमध्ये ते लगेच कळून येत असल्याने एक चांगला ट्रिक शॉट वाया गेला आहे. हळू हळू त्यांचे किस अजून जवळ येत असल्याचे मिस होऊ शकत नाही. मागून तबल्यावरच्या केरव्या लग्गीला उधाण आले आहे. दोघांचे "लाखों का दिल तोडा मैने एक तेरे लिए" वर एकमत झाल्याने गाणे संपवण्याची वेळ झाली आहे. मग तिचा पदर धरून पळण्याची स्टेप काढून घेतली जाते. किस करताना ओठ एक सेंटीमीटर वर थांबवण्याची अवघड स्टेपही उरकली जाते. दोघेही ट्रॉलीवरून एक्झिट घेतात आणि एकदाचे गाणे संपते.

Lol

असे असता त्याने जितेंद्राला सरळ इग्नोर मारून सिंहासनावरच्या जयाप्रदावर हल्ला केला आणि आत्मघातकी हल्ल्यात तिला ठार करण्याचा प्रयत्न का केला नाही हा संशोधनाचा प्रयत्न आहे. >>
कारण त्यांची सेना अजूनही आलेली नाहीय व ते गांधराच्या सेनेने घेरले गेलेत. त्यांच्या सेनेला राज्यात येण्याआधीच संपवलं हे सांगून जितेंद्र ने त्यांचे हौसले संपवून टाकलेत. त्यामुळे त्यांचा मुख्य राग जितेंद्र वरच आहे. त्याला आधी संपवू मग भाभू आणि जया कडे पाहूया, शिवाय जितेंद्र स्वतः च मरायला तयार झालाय तर संधी का सोडा असा व्यवहारी विचार दिसतो. कारण अंधायुद्धात जितेंद्र मेला तर स्वतच्या कंडूने मेला असेच सगळ्यांचे मत बनेल.

पुढील प्रतिसादाच्या प्रतीक्षेत...

<<<याचा गीतकार (इंदीवर) फक्त ७५% च गाणे लिहितो. गाळलेल्या जागांमध्ये मग "छुम छुम छुम, छुम बाबा छुम" असले शब्द मेसच्या भाज्यांमधल्या बटाट्यासारखे भरले आहेत>>> याला इतक्या जोरात हसलो की बास Lol Rofl

९) अदला बदली

गाणे एंजॉय करून झाल्याने जॅक-१ जयाप्रदाला म्हणतो की आता तू घरी जा, इथे लै ड्यांजर लोक आहेत. फुकट-फाकट मेलीस तर माझं एकट्याचं कसं व्हायचं? मग शेरखान नामक माणसाला तो हिला घरी सोडून यायला सांगतो. आता दुसर्‍या रोमान्सकडे वळूयात.

९.१) आपली विषकन्या बेडूक नसून प्लॅटिपस आहे

नदीकाठचे दृश्य. मंदाकिनी कबुतरासोबत खेळत बसली आहे. आधी म्हटल्याप्रमाणे ही काही फार पॉवरबाज नाही किंवा हिचे विषकन्या तंत्र अजून नीट स्पष्ट झालेले नाही. दिग्दर्शकाला याची जाणीव असल्याने आता तो डेमो द्यायचे ठरवतो. डेमो द्यायचा तर कोणीतरी मरायला बकरा पाहिजे. एवीतेवी गुलशन ग्रोव्हरला सिंहासनासमोरच्या पायर्‍यांवर उभा राहायला ठेवले होते. आमची जयू त्याला आता दारात सुद्धा उभं करणार नाही. मग तो जिवंत राहून काय फायदा? असा सारासार विचार करून गुल्लुच्या मरणाचा सीन लिहिला आहे.

मंदाकिनी कबुतराला मिठ्ठू म्हणते आहे. बाईंना पोपट आणि कबूतरातला फरक कळत नाही याची नोंद घ्यावी. ती जॅक-२ ची वाट पाहते आहे. त्याजागी तिथे गुलशन ग्रोव्हर येतो. म्हणजे प्राणची गुहा हिच्या राहत्या जागेपासून फारशी लांब नाही. हे ठाऊक असतानाही गुलशन ग्रोव्हरला त्या गुहेत ठेवण्याची रिस्क प्राणने का घेतली असावी? याची आणि कादर खानची अवंतीमध्येच एखाद्या भवनात सोय लावता आली नसती का? आता भोगा आपल्या बावळटपणाची फळे! गुलशन जाऊन तिची छेड काढतो. प्रेक्षकाला मात्र मंदाकिनीने मुठीत दाबल्यामुळे प्राण कासावीस झालेल्या कबूतराची चिंता आहे. कालकेतुच्या व्यत्ययामुळे कबूतराचे प्राण वाचतात आणि प्रेक्षक कालकेतुला स्वर्गात जायचा आशीर्वाद देतो.

मग दोघे पूल, डोंगर, दरी, धबधबा असा प्रवास करून परत जंगलात येतात. "व्हिलनचे आद्य कर्तव्य" सीन येण्याची चिन्हे दिसू लागतात. धावून धावून मंदाकिनीच्या छातीचा भाता झाला आहे. पण तिच्यापेक्षा कैकपटींने अवजड कपडे घालून धावलेल्या गुल्लुचा स्टॅमिना तसाच आहे. तो जोर-जबरदस्ती करू बघतो. अशाच प्रसंगासाठी वाढवलेली नखे वापरायची वेळ झाली आहे. ती नखे याच्या गालांत रुतवते. गुल्लुला प्राणांतिक वेदना होऊन तो ओरडून खाली पडतो. दोन सेकंदात तो काळा पडतो आणि तोंडातून फेस येऊन मरतो. याने आपल्याला विषकन्येविषयी बरीच माहिती मिळते. पहिले म्हणजे ती खरंच पॉवरबाज विषकन्या आहे. दोन म्हणजे तिच्या स्पर्शातून विष पास होत नाही, विष तिच्या नखांमध्ये आहे. तीन, ती सस्तन प्राणी आहे. चार, ती नदीपाशी राहते आणि तिची जीवनचर्या सेमी-अ‍ॅक्वेटिक आहे. हे सर्व क्रायटेरिया असलेला एकमेव प्राणी म्हणजे प्लॅटिपस. थोडक्यात मंदाकिनी प्लॅटिपस आहे. तिचे बदकासारखे ओठ या सिद्धांताला पुष्टी देतात.

९.२) माणुसकीच्या राज्यातले प्रेम

मंदाकिनीचा केअरटेकर तिला शोधत शोधत तिथे पोहोचतो. कालकेतु मेलेला बघून तो काय ते समजतो. तो म्हणतो की मी याची विल्हेवाट लावतो, तू टेन्शन नको घेऊ. पण मंदाकिनी त्याच्या अपेक्षेपेक्षा अधिक हुशार निघते. ती आपली नखे आणि गुल्लुचे काळे पडणे यातला कार्यकारणभाव ओळखते आणि केअरटेकरची उलटतपासणी घेऊ लागते. आपली नखे काढून ती त्याला धमकावते की खरं बोल नाहीतर तुलाही काळे करेन. तसे बघता तो ऑलरेडी का.क.डा. इतका काळा आहे पण तोंडातून फेस निघण्याची कल्पना सहन न होऊन तो सगळे खरे खरे सांगून टाकतो. हिने जर कोणाला नखे मारली तर तो मरेल, जर कोणासोबत "प्रेम" केले तर तो मरेल. या क्यूवर तिच्या प्रेमाकडे वळण्याची वेळ होते.

बराच वेळ गायब असलेले वहिदा आणि श्री.ला. परत आले आहेत. इतका वेळ त्यांनी जयाप्रदाची तसबीर मिळवण्यात खर्च केला आहे. जॅक-२ ला त्याची पोटेन्शिअल बायको म्हणून ती तसबीर बघायला बोलावतात. जॅक-२ परीकथा राजपुत्र स्टँडर्ड तंग विजार आणि सदरा घालून येतो. यावेळेस विगही अगदी टाईट फिटिंगचा आहे. द्रविड हेल्मेट काढल्यावर जसा घाम गाळायचा तसाच जितेंद्रानेही या सीननंतर विग काढून घाम गाळला असेल. वहिदा म्हणते की ही जयू बघ कशी वाटते, मला तर सून म्हणून पसंत आहे. जॅक-२ म्हणतो की मला ही नको, मला दुसरी मुलगी आवडते. ते म्हणतात की कोण, कुठली राजकन्या आवडली तुला? तो म्हणतो की चंदनागंधी म्हणून इन्सानियत के राज्य की राजकुमारी आहे तिच्याशीच मी लग्न करेन. वहिदा इकडे अप्रतिम त्सुक्कोमी मारते (तिचा डेडपॅन फार भारी आहे) - ये कौनसा राज्य हैं? यावरचे त्याचे उत्तर त्याच्याच तोंडून ऐकण्यासारखे आहे. पण एवढे नमूद करेन की हा प्रेमात जॅक-१ पेक्षाही अधिक आंधळा झाला आहे. वहिदा म्हणते की तिला दरबारात चहापाण्याला बोलव. तो म्हणतो अवश्य.

मध्ये काही दिवस गेले असावेत कारण मंदाकिनीचा ड्रेस बदलला आहे. ती स्वतःच्याच विचारांत गुंग आहे. जॅक-२ येऊन तिला हाक मारतो. ती आनंदते आणि धावत जाऊन त्याचे चुंबन घेते. लगेच जॅक-२ काळा-निळा पडून खलास! मग तिची तंद्री भंगते आणि हे स्वप्न असल्याचे स्पष्ट होते. ती म्हणते की निघून जा. तो म्हणतो की जाईन पण अवंतीच्या होणार्‍या महाराणीला घेऊन जाईन. चल, तुला वहिदा रहमानने चहापाण्याला बोलावलं आहे. ती म्हणते नको मी चहा नाही पीत, तू जा आता. जॅक-२ ला काही कळत नाही. कॉफी तरी घेतेस का विचारेपर्यंत, "माझ्या जवळ येऊ नकोस" असे किंचाळत बाई बघता बघता गायब! जॅक-२ कनफ्युज्ड! तिकडे बयो "प्रियकराच्या मृत्युचे कारण ठरण्यापेक्षा मीच मेलेले काय वाईट" म्हणून नदीत उडी घेते.

९.३) षडयंत्राची बीजे खूप पूर्वीच पेरलेली असतात

केअरटेकर जाऊन हा सगळा गोंधळ प्राणच्या कानांवर घालतो. प्राण त्या इजिप्शिअन आसनावर बसलेला आहे. याने तो आयोनियाच्या यातुधान परंपरेतला असल्याचे स्पष्ट होते. शक्ती कपूर आणि अमजद खानही तिथेच पडीक आहेत. शक्ती म्हणतो की तिने तुला धमकावलं आणि तू लगेच घाबरलास? आमचा एवढा मोठा सेट पीस वाया घालवलास? ते काही नाही तुझा शिरच्छेद झालाच पाहिजे. प्राण अधिक संयमी असल्याने तो म्हणतो की हे बघ गोंधळ तर झाला आहे. तो निस्तरलाही पाहिजे. तरी कपाल, म्हणजे तो केअरटेकर, यानेच जाऊन विषकन्येला शोधले पाहिजे. त्यासाठी भीषणची, म्हणजे का.क.डा.ची, माणसे सोबत दिली जातात.

तिकडे आपल्या मुलाच्या मृत्युच्या दु:खाने कादर खान वेडापिसा झाला आहे. का.क.डा. आणि प्राण त्याला आत्महत्या करण्यापासून थांबवतात. या सीनमध्ये हळू हळू प्राण हा कादर खानचा थोरला भाऊ असल्याचे स्पष्ट केले आहे. दोघा भावांनी मिळून दोन्ही राज्यांना एक करून त्यावर राज्य करण्याची महत्त्वाकांक्षा बाळगली आहे. कादर खान म्हणतो की माझा मुलगा तर गेला, आता मी जिवंत राहून काय करू? अरे पण "एकटी मुलगी गपकन धरली" धंदे करायला त्याला कोणी सांगितलं होतं? आणि प्राणने जसे उग्रराहू अर्थात शक्ती कपूरला राजा होण्याचं ट्रेनिंग दिलं तसं तुला गुल्लुला ट्रेन करता येऊ नये? एनीवे, प्राण म्हणतो की प्रोजेक्ट कालकेतु तर फेल गेला. आता प्रोजेक्ट उग्रराहूवर लक्ष केंद्रित कर. कादर खान म्हणतो उग्रराहूशी माझा काय संबंध? तो तर जॅक-२ चे काका विलासवर्धन यांचा मुलगा आहे. प्राण म्हणतो की नाही, तो माझा मुलगा आहे.

प्राण आपला मास्टर प्लॅन सांगतो. कधी काळी विलासवर्धन आपल्या बायकोला आणि मुलाला घेऊन सुट्टीचा म्हणून आपल्या डेस्टिनेशन होमला गेला होता. तेव्हा तिथे आग लागली आणि आगीत जळून तो आणि त्याची बायको मेली. ती आग प्राणनेच लावली होती. मग प्राण येऊन सांगतो की मी विलासवर्धनच्या मुलाला वाचवले. प्रत्यक्षात त्याचा मुलगाही त्याच आगीत जळून मेला. प्राणने त्याच्या जागी आपला मुलगा, उग्रराहू प्लांट केला. प्राण कादर खानला म्हणतो की हे रहस्य उग्रराहूला माहित आहे आणि आता मी तुलाही सांगितले आहे. आपण दोघे एकाच वडलांची मुले आहोत तर आता सांग की उग्रराहूची जबाबदारी तुझी सुद्धा जबाबदारी आहे का नाही? उग्रराहू आपला पुतण्या आहे हे कळल्यावर कादर खान काकाचे कर्तव्य पार पाडायला तयार होतो. प्राणचे षडयंत्र सफल झाले की प्राण तपश्चर्येला निघून जाणार, उग्रराहू सिंहासनावर बसणार, आणि कादर खान त्याचा महामंत्री म्हणून काम बघेल असे ठरते. प्राण म्हणतो की गुड, आधी आपण अवंती आपल्या ताब्यात घेऊ. मी परस्पर जॅक-२ चा राजतिलक प्लॅन केला आहे जे त्याला माहितच नाही. तो जंगलात मंदाकिनीच्या शोधात भटकतो आहे. आपण त्याला खलास करू. असे म्हणून तो का.क.डा. ला जॅक-२ ला मारण्याची आज्ञा देतो.

९.४) षडयंत्र

जॅक-२ मंदाकिनीला शोधून शोधून थकला आहे. तो वाईच एका झाडाला टेकतो तर का.क.डा. आणि त्याची माणसे येऊन त्याला घेरतात. जॅक-२ चे पोश्चर जादुई आहे. एका अँगलने तो दगडाला टेकला आहे असे दिसते. या अँगलमध्ये त्याने दोन्ही पाय काहीसे दुमडले आहेत. दुसर्‍या अँगलमध्ये तो झाडाला टेकला असून त्याचा एक पाय सरळ आहे तर दुसरा गुडघ्यातून दुमडून सरळ पायाच्या खाली घेतला आहे. का.क.डा. याला मारायला सोबत आठ लोक घेऊन आला आहे. ते सर्व "हाहाहाहा" हसून याला झोपेतून जागा करतात. मग याला मारायचा प्रयत्न होतो. आदित्यवर्धन विक्रमसिंग इतका नसला तरी पुरेसा शूरवीर असतो. तो यांचा पहिला हल्ला चुकवून यांच्याशी लढायला लागतो.

मंदाकिनीला भेटायला येताना बहुतेक याने सोबत तलवार आणली नसावी. त्यामुळे तो जवळच पडलेली एक फांदी घेऊन यांना धोपटू लागतो. ती फांदीही जादुई आहे कारण तिचा स्पर्श न होताही का.क.डा. चे लोक कोलांटी उडी मारून पडतात. पण शेवटी फांदी ती फांदीच. का.क.डा. त्याला घायाळ करण्यात यशस्वी होतो आणि त्याचे लोकही एक दोन लगावतात. का.क.डा. तलवार खुपसणार एवढ्यात तोंडावर फडके बांधलेला जॅक-१ येतो आणि त्याच्या हातावर बाण मारून जॅक-२ ला वाचवतो. मग जॅक-१ हा हा म्हणता का.क.डा. च्या सगळ्या लोकांना बाण मारून ठार करतो. हे बघून का.क.डा. पळून जातो. मग जॅक-१ जॅक-२ ला घेऊन निघून जातो.

जॅक-१ आणि जॅक-२ जॅक-१ च्या गुहेत एकमेकांना भेटतात. आदित्यवर्धनने ने विक्रमसिंगचे नाव ऐकलेले आहे. दोघे डिट्टो सेम दिसतात यामागे विधात्याची काहीतरी योजना असावी छाप डायलॉग होतो. एकतर हे दोघे सेम दिसतात हे पब्लिक नॉलेज कसे नाही हेच मला कळलेले नाही, एस्पेशिअली विथ द ग्रीको-रोमन काँटेक्स्ट! हा मुद्दा सोडून देत आहे कारण तो कुठेच फॉलो करता येत नाही. विधात्याची योजना हे उत्तर ग्राह्य धरून पुढे जाऊ. जॅक-२ म्हणतो की तुला कसं कळलं की मला मारण्याचा प्रयत्न केला जाईल? जॅक-१ म्हणतो की तुझ्या अनुपस्थितीत परस्पर तुझा राजतिलक करण्याची घोषणा झाली. प्राणचा षडयंत्रांचा राजतिलक पॅटर्न असल्याने मला कळले की तुला मारण्याचा प्लॅन आहे. जॅक-१ म्हणतो की हा सगळा प्राणचा प्लॅन आहे. तुला त्याने दारू आणि बाईचा नाद लावला. राज्याचा हितैषी असल्याचे भासवून त्याने राज्याचा पाया भुसभुशीत करून ठेवला आहे. त्याला हवं तेव्हा तो अवंती त्याच्या ताब्यात घेऊ शकतो आणि तू काहीच करू शकणार नाहीस.

९.५) काऊंटर षडयंत्र

जॅक-१ त्याला सल्ला देतो की अजूनही वेळ गेलेली नाही. तू जाऊन राज्यकारभारात लक्ष घालायला लाग. दारू आणि बाईपासून चार हात लांबच राहा. प्राणचा बंदोबस्त कसा करता येईल त्याचा विचार कर आणि मग सर्व काही ठीक होईल. जॅक-२ म्हणतो की हे मला जमत असतं तर मी ते केव्हाच केलं असतं. ही माझी कोअर कंपिटन्सी नाही. विक्रमसिंग यावर भलताच खवळतो. तो म्हणतो की असा कसा तू राजकुमार? तुला तुझ्या कर्तव्याची काहीच जाणीव कशी नाही? त्याने ठेवलेली सर्व नावे ऐकून घेऊन जॅक-२ म्हणतो की बरं मग माझा प्लॅन ऐक. राजतिलक होईल, पण माझ्या जागी तू जायचं. विक्रमसिंग म्हणतो की कसं शक्य आहे? आदित्यवर्धन म्हणतो की ठीक आहे, मग उग्रराहूला बनू देत राजा. मला काहीच प्रॉब्लेम नाही, भरडली जाऊ देत जनता. विक्रमसिंगला कळून चुकते की हा वाटतो तेवढा काही मूर्ख नाही, याने आपले मर्म ओळखले आहे. तो म्हणतो की ठीक आहे, मी टेंपररी राजा बनायला तयार आहे. पण माझ्या दोन अटी आहेत. अट क्रमांक एक - काम झाले की तू येऊन आपले राज्य परत घ्यायचे. अट क्रमांक दोन - हे सगळं निस्तरेपर्यंत तू इथून हलायचं नाही. जॅक-२ दोन्ही अटी मान्य करतो.

तिकडे राजतिलक म्हणून पब्लिक जमलेलं आहे. प्राण भाषण ठोकतो आहे. त्याने म्हणे वचन दिलेलं असतं की तो जॅक-२ ला सिंहासनावर बसवेल. प्राण नाटकी आवाजात म्हणतो की काश हम यह वचन पूरा कर सकते. श्री.ला. विचारतात की आता काय अडचण आहे? वहिदा रहमान अजून कहर - हमारी ममता की कांच में शक की दरार पड गयी हैं. प्राण म्हणतो की कोणत्या तोंडाने सांगू? जॅक-२ एका जंगली मुलीच्या प्रेमात पडला आणि तिच्यापायी जंगलात वणवण भटकत होता. अशातच त्याला लुटारूंनी घेरून मारून टाकले. वहिदा म्हणते की शक्य नाही. त्याचे भविष्य आहे की तो शतायुषी होईल. प्राण म्हणतो "आले देवाजीच्या मना तिथे कोणाचे चाले". तो पुढे म्हणतो की झाले ते झाले पण आता राजसिंहासन रिकामे ठेवणे अमंगळ ठरेल. यावर अवंतीची बावळट प्रजा ओरडू लागते - आम्हाला राजा पायजे.

सर्व काही पिलान के मुताबिक होत असल्याने सुखावलेला प्राण मोठ्या चतुराईने शक्ती कपूरचे नाव सुचवतो. मुहूर्तही न भूतो न भविष्यति असा आहे तरी शक्ती कपूरचा राज्याभिषेक करून टाका. श्री.लांना हे पटत नसल्याने ते पूर्णवेळ मान खाली घालून उभे आहेत. वहिदाही कष्टी आहे. तेवढ्यात घोड्याच्या टापांचा आवाज येतो आणि प्राणच्या पिलानवर बोळा फिरवायला आदित्यवर्धन (विक्रमसिंग) राजसभेत दाखल होतो. तो जिवंत असल्याचे बघून वहिदा सज्जातून टेलिपोर्ट होऊन त्याच्यापाशी येते. श्री.ला. देखील खुश. प्राण आणि शक्ती कपूर बुचकळ्यात पडतात. यावर फार काही प्रतिक्रिया देणे इष्ट नसल्याने ते थातुरमातुर उत्तरे देतात. त्यांच्यावर कोणताच आरोप ठेवला जात नाही कारण अजून पाऊण तासांचा सिनेमा बाकी आहे. मग आदित्यवर्धन (विक्रमसिंग) जनतेच्या इच्छेला मान देऊन राजतिलक करवून घेतो. इथे जास्वंदीचा एक ओमिनस शॉट. तिचा उर्वरित सिनेमात काही रोल असेल काय?

तो पेटारा आणि त्यातून जयाप्रदा ची एन्ट्री, यावरूनच क्लिओपात्राला त्या कार्पेट सदृश उपहारातून एन्ट्री करायची आयडिया सुचली असावी. क्लिओपात्राला भविष्य दिसत होते याचा हा एक उत्तम पुरावा!

एकतर हे दोघे सेम दिसतात हे पब्लिक नॉलेज कसे नाही हेच मला कळलेले नाही, एस्पेशिअली विथ द ग्रीको-रोमन काँटेक्स्ट! .....
धिस टाईम दे डिडंट ट्राय! ...
Lol

जबरदस्तच. त्या जयप्रदा विक्रम गाण्यात तो मस्टरड कलर सूर्य लै भारी प्लस कट आउट मॅन्शन व शेजारी दोन पर्पल कलर क्रिसमस ट्री सारखे
झाडांचा कट आउट. पण तिची बेबी पिंक साडी बाकी झकास आहे. ही माझी फेवरिट जोडी आहे. कादर खान चा तन्मणी पण बेश. बाकी सिनेमात दागिने कोऑर्डिनेटर एक पोस्ट असेल नक्की इतके दागिने आहेत.

आगाऊ सूचना: पडद्यावरची पुढची सात-आठ मिनिटे प्रचंड बोर आहेत.

१०) जगातील सर्वात इनकंपिटंट व्हिलन लोक वि. सर्वात एफिशिअंट हिरो फिट. डेस्परेट सासू आणि कंटाळलेली सून

१०.१) मेहनती सासू

वहिदा रहमानला आता एकच काम उरले आहे - आपल्या पोराचे जयूसोबत लगीन लावून देणे. त्यानुसार ती राजतिलकाचे रिसेप्शन ठेवते आणि त्यात सगळ्यांना बोलावणे धाडते. हे सगळे - जयाप्रदा वगळता - कोण हे कोणालाच माहित नाही. किंबहुना या दुनियेत गांधार आणि अवंती सोडून इतरही राज्ये आहेत याचा हा एकमेव पुरावा! वहिदाला फक्त जयाप्रदाच्याच स्वागतात इंटरेस्ट असल्याने तिने तिच्या स्वागताची जय्यत तयारी केली आहे. जयाप्रदा तिकडे मिनिटागणिक क्लिओपात्रासारखी दिसू लागली आहे. यात मूळ क्लिओपात्राचा हिरो मार्क अँटनी देखील राजकारणकुशल सेनापती होता त्यामुळे विक्रमसिंग-अलकनंदा जोडी अँटनी-क्लिओपात्रा वरून प्रेरित असल्याचे सांगता येते.

स्वागत करण्याचा एकमेव मार्ग नाचगाणे असल्याने बरेच लोक डान्स करायला सुरु करतात. जयाप्रदाच्या ड्रेसमध्ये कापूस, रेशीम वगैरे तागे कितपत वापरले असतील जरा शंकाच आहे कारण दागिने सोडून काही दिसतच नाही. तिच्या स्वागतासाठी जिप्सी आणले आहेत. ते हातात पताका घेऊन नाचत आहेत. बायकांनी रेघा रेघांच्या चोळ्या घातल्या आहेत पण त्या कमी पडल्यामुळे एक दोन एक्स्ट्रांना प्लेन चोळी दिली आहे. पुरुषांना बिनबाह्यांचे जाकीट दिले आहे आणि खाली विजार. बप्पीदांच्या संगीताचे एक वैशिष्ट्य आहे. जेव्हा जेव्हा त्यांच्या गाण्यात जेंबे किंवा बोंगो सोलो असतो, तेव्हा तेव्हा ब्रिटिश आफ्रोबीट बँड ओसिबिसा ते ऐकून त्या लयबद्ध रचनेची टिपणे काढतो. बरं हे सर्व ठीक आहे पण इतर राजांना एकट्या जयाप्रदाचीच अशी वरात काढल्याचे काहीच वाटले नसेल का? त्या सर्वांनी समजा युती करून अवंती आणि गांधार दोघांवर हल्ला केला तर? विक्रमसिंग, अभंगदेव, अलकनंदा, भानु प्रताप वगैरे सगळे लोक ऑलरेडी एकमेकांशी भांडत बसले आहेत. या अचानक हल्ल्याने सर्व प्रश्न चुटकीसरशी सुटून उलट दोन्ही राज्यांची जनता यांना धन्यवादच देईल. पण सिनेमा अजून पाऊण तास खेचायचा असल्याने तसे होत नाही.

स्वागताच्या तयारीचा भाग म्हणून सर्व नगर नव्याने रंगवून काढले आहे. तोरणे वगैरे लावून सुशोभित केले आहे. जयाप्रदाला सिंहासनासकट एका गाड्यावर बसवून कूर्मगतीने मुख्य पटांगणाकडे नेत आहेत. आता जास्वंदी भरतनाट्यम् करताना दिसते. ही जास्वंदी राधा नावाची फेमस साऊथ इंडियन अ‍ॅक्ट्रेस आहे. तरी स्टीरिओटाईपचा मान ठेवून व्यवस्थित स्टेप्स केल्या आहेत. ही राजनर्तकी क्लासिकल डान्स करते ते ठीकच आहे पण त्या जिप्सी बायका का भरतनाट्यम् करतील? आता सगळे "स्वागतम्" करून विव्हळू लागतात. ताटात फुलं घेतलेल्या दासी पुष्पवृष्टी करू लागतात. त्यांच्या अंगात इतका जोर आहे की वीस-पंचवीस फुटांवरच्या जयाप्रदापर्यंत त्यांची फुले पोहोचतात. जयाप्रदा मंद हसत विचार करते आहे "मुख्य हिरोईन मी आहे. दुय्यम हिरोईन मंदाकिनी आहे. मग या राधेच्या डान्स सोलोवर एवढं फुटेज का खर्च केलं आहे?" आता साऊथ इंडियन खूप झाल्याने अरेबिक पीस ढापले जातात. या पॉईंटला येईपर्यंत हा इंस्ट्रुमेंटल प्रकार कंटाळवाणा वाटू शकतो. तसे झाल्यास जयाप्रदाच्या एक्सप्रेशन्सचे वर्गीकरण करण्याचा खेळ खेळता येतो - तुच्छ कटाक्ष, दुसर्‍याची फजिती झाल्यानंतरचे हास्य, काहीच न समजल्याने केलेले वेडगळ स्मित, आपण महाराणी आहोत हे सिद्ध करण्यासाठीची गंभीर मुद्रा, उकडत असल्याने किंवा बसून बसून अवघडल्याने त्रासल्याचे भाव इ. हे करणे फार गरजेचे आहे कारण अजून दिग्दर्शकाचे पोट भरलेले नाही. यानंतर बासरी सदृश वाद्य वाजवणारे आदिवासी ओझा आणले जातात. मागून "ओ हा" असे चित्रविचित्र आवाज काढले जातात. तरी नशीब आता ही अवंती दर्शन टूर आपल्यास परिचित राक्षसमूर्ती असलेल्या पटांगणात आली आहे. इतर राजे तिथे स्वस्थ बसून "हा काय बावळटपणा आहे" अशी चर्चा करत आहेत. डोईवर हंडे घेतलेल्या काही बायका पण काहीतरी नृत्य प्रकार करत आहेत. २६ जानेवारीच्या फ्लोट्समध्ये सुद्धा इतकी विविधता बघायला मिळत नाही जितकी या स्वागत परेडमध्ये आहे. हे सर्व प्रेक्षक मुकाट सहन करतो केवळ एकाच कारणाने - आपल्या पोटेन्शिअल सुनेसाठी इतके एफर्ट घेणारी सासू (वहिदा रहमान) पाहून त्याची दृष्टी ऑलरेडी अश्रूंनी धूसर झाली आहे.

१०.२) फार मोठ्ठा स्टंट

तिकडे जितेंद्रालाही तयार करून आणतात. मला क्षणभर वाटले की वहिदा रहमान श्री.लांना "याच्या हातात तुम्ही बनवलेल्या कांद्या पोह्याच्या डिशेस पण द्या. जयूला वाटू देत की मुलाला स्वयंपाकही येतो" असे म्हणेल. पण सिनेमा तेवढा पुढारलेला नसल्याने तसे होत नाही. एकदाचा तो इंस्ट्रुमेंटल ताप बंद पडतो आणि जयाप्रदाला राजकुमार आदित्यवर्धन हुबेहूब विक्रमसिंगसारखा दिसत असल्याचा साक्षात्कार होतो. यावर तिच्याकडचे काही ऑप्शन्स पुढीलप्रमाणे - १) काय विलक्षण योगायोग आहे, तुमचे राजकुमार अगदी आमच्या विक्रमसिंगसारखे दिसतात; असे म्हणून कन्फ्युजन मिटवणे, २) मोठमोठ्याने "ये आदित्यवर्धन नही, यह तो मेरा विक्कु हैं" अशा बोंबा मारून तमाशा करणे, ३) देणे घेणे राम जाणे, असे म्हणून गप्प बसणे, ४) रात्रीचा मुक्काम करून गुपचूप आदित्यवर्धनच्या बेडरुममध्ये जाऊन जितेंद्राला "तू विक्रमसिंगच आहेस, बोल असे का केलेस" म्हणून जाब विचारणे. "मी नाही त्यातली आणि कडी लावा आतली" तत्त्वावर भक्कम विश्वास असल्याने ती कोणता ऑप्शन निवडेल हे प्रेक्षक गेस करू शकतात.

रात्र होईपर्यंत थोडा टाईमपास केला पाहिजे. श्री.ला. अधिक कार्यकुशल महामंत्री असल्याने त्यांनी जितेंद्राच्या डोक्याच्या मापाचा राजमुकुट बनवून घेतला आहे. त्यामुळे तो व्यवस्थित फिट बसतो. श्री.ला. स्वतःच तो मुकुट त्याला घालतात. राजतिलक झाला. प्राण आणि शक्ती कपूरही चेहर्‍यावर उसने सौजन्य आणून उभे आहेत. यानंतर एवढी प्रजा बोलावली आहेच तर फार मोठा स्टंट केला पाहिजे म्हणून जयाप्रदा-जितेंद्राने "जोवर दुनिया कायम आहे तोवर अवंती-गांधार मित्रराष्ट्रे" अशी शपथ पब्लिकली घेण्याचे ठरते. त्यानुसार दोघे हातात एक एक तलवार घेऊन एका यज्ञवेदीच्या दिशेने शक्य होईल तितके सावकाश चालत जातात. दोन किरकोळ पुरोहित अमुक तमुक स्वाहा म्हणत पळीने तुपाच्या आहुत्या देत आहेत. अँगल बदलून लाँगशॉटमध्ये पडलेला फुलांचा सडा दिसतो. यात गुलाबाच्या पाकळ्यांचा निस्ता खच. अलकनंदा देवींना समजा राधा काळ्यांप्रमाणे गुलाबाची अ‍ॅलर्जी असती तर या लोकांनी काय केले असते?

आता हे दोघे यज्ञकुंडात आपापल्या तलवारींची टोके टेकवतात. त्यातल्या समिधांची पार राख व्हायला आली आहे. म्हणजे हा स्वाहा प्रकार बर्‍याच वेळ चालू होता. श्री.ला. तिथे टेलिपोर्ट होतात आणि या दोघांना शपथ देतात, ज्याचा सारांश दोघे राज्यकर्ते आजपासून मित्र आहेत. ही शपथ घेताना त्यांच्या तलवारी अधांतरी आहेत. मग ते दोघे तलवारी उंचावतात आणि तलवारीचा तलवारीला स्पर्श करतात. जयाप्रदा त्याच्याकडे जशी बघते ते पाहून जॅक-१ ला "मैं तो गियो" असे एक्सप्रेशन द्यावेच लागते. शक्ती कपूरच्या पाठोपाठ जयजयकार होतो. पण श्री.लांचे तेवढ्याने समाधान होत नाही. आदित्यवर्धनाने संदेश द्यावा अशी ते विनंती करतात.

जॅक-१ ने याचे प्लानिंग बर्‍याच दिवसांपासून केले असावे. त्याचा संदेश म्हणजे नवीन धोरणांचे घोषणापत्र आहे. तो अवंतीमध्ये पार्लमेंट (राजसभा) स्थापनेची घोषणा करतो आणि स्पीकर म्हणून श्री.लांची नेमणूक करतो. थोडक्यात तो ब्रिटनच्या धर्तीवर वेस्टमिनिस्टर पद्धतीची लोकशाही राबवणार आहे. अशा लोकशाहीत अभंगदेवचे काय काम? म्हणून तो अभंगदेववर सक्तीची रिटायरमेंट लादतो आणि त्याला वानप्रस्थाश्रमात जाण्याचा सल्ला देतो. प्राण हे उलटे फासे पडलेले बघून स्तिमित होतो. व्हिलन लोकांना लवकरात लवकर काही तरी करण्याची गरज आहे अन्यथा त्यांचे सगळे मुसळ केरात.

आरारा.भयंकर पिक्चर असणार.प्लॅटिपस काय ☺️☺️☺️
मी हा पिक्चर गुड फ्रायडे च्या सुट्टी च्या दिवशी बघणार आहे.

एलदुगो अर्थात एका लग्नाची दुसरी गोष्ट मधली हिरोईन
Submitted by सहेली on 8 April, 2020 - 15:32

धन्यवाद सहेली.

हहपुवा झाली.
प्लँटिपस,,,, Proud
राधा काळे अगदी सिक्रेट पंच

"पाप का सूरज पुण्य के आकाश मे जादा देर नहीं टिकता. वो अपनेही वजन से जल्दही डूब जाता है"
- हे एक कादरखानिजम ऐकले आज यातले Happy

मध्ये उगाच झूम मीटिंगा करत बसलो होतो आणि इकडे दुर्लक्षच झाले. कथा पुढे नेऊ

११) व्हिलन लोक्स रिटर्न

११.१) न्यायदेवता : इन्साफ का तराजू : : प्रेमदेवता : दिल का तराजू

त्याच रात्री जास्वंदी जॅक-१ ला भेटायला येते. जास्वंदीला आदित्यवर्धनच्या डिओचा वास तोंडपाठ असल्याने जॅक-१ ला मिठी मारताच तिच्या लक्षात येते की "अरे इससे तो घाम का वास आ रहा हय". इसका मतलब कुछ तो गडबड हैं. ती म्हणते की कोण रे तू? जॅक-१ म्हणतो की अरे मी तर राजकुमार. एवढ्या त्या राजसभेत पब्लिकली माझा राज्याभिषेक करवलात आणि आता तू म्हणते की मी राजकुमार नाही. कोण विश्वास ठेवेल तुझ्यावर? अशा वाक्यांना उत्तर देता यावे म्हणून विंगेत दबा धरून बसण्याची कला जॅक-१ ने आपल्या अनेक रोमँटिक स्वप्नांमार्फत जयाप्रदाला शिकवली आहे. त्यामुळे जयाप्रदा त्याच्या बेडरुमच्या विंगेत दबा धरून बसलेली असते. ती पुढे येऊन म्हणते की मी ठेवेन जास्वंदीवर विश्वास!
जयाप्रदाला विगसकट मुकुट घातला आहे. मुकुट खूप वजनदार असावा. कारण त्या मुकुटाच्या वजनाने तिचा विग मागे खेचला जाऊन जयाप्रदाचे कपाळ प्रमाणाबाहेर मोठे दिसते. शक्ती कपूरच्या रुपाने सिनेमात एक उग्रराहू आहेच. इथे स्लीव्हलेस ब्लाऊज घालून जयाप्रदाने चित्रपटास वज्रबाहूंची देणगी दिली आहे. आल्या आल्या जयाप्रदा जॅक-१ वर आरोपांच्या फैरी झाडते. ती म्हणते की तू काहीतरी राजकारणी चाल खेळत आहेस. जॅक-१ म्हणतो आता काय करायचं? कधी कधी करावं लागतं असं पण. जास्वंदी आणि जयाप्रदा गॉट नो चिल! त्या मात्र याला घालून पाडून बोलण्याच्या मूडमध्ये आहेत. जास्वंदी म्हणते की तू आमच्या भल्या राजपुत्राला गायब केलंस. अरे तो काय तुषार कपूर आहे गायब व्हायला? आणि आदित्यवर्धन भला राजकुमार कधीपासून झाला? जयाप्रदा म्हणते की मी तुला शूरवीर समजत होते पण तू तर धूर्त राजकारणी निघालास. सिंहासनाच्या लोभापोटी जॅक-१ ने अवंतीचे सिंहासन बळकावले असे तिचे म्हणणे आहे. जास्वंदी विचारते की जॅक-२ सुखरुप आहे ना? जयाप्रदाला सुतावरून स्वर्ग गाठण्याची सवय असल्यामुळे ती बिनदिक्कतपणे म्हणते की जॅक-१ ने जॅक-२ चा खून केला आहे. अरे, तू काय साळुंके आहेस का कोणालाही डेथ सर्टिफिकेट द्यायला?

इतका वेळ या बायकांची बडबड घेतल्यानंतर जॅक-१ चा पेशन्स संपतो. तो म्हणतो की बेब तुझा माझ्यावर भरवसा नाय काय? अरे आपल्याकडे कादरखान तसा इथे प्राण. आदित्यवर्धनला मारायचा प्लॅन होता तो मी हाणून पाडला. तो जंगलात माझ्या अड्ड्यावर सुखरुप आहे. हे ऐकून जास्वंदीचा जीव भांड्यात पडतो. इतका वेळ कटैयाला खच्चर म्हणण्याचा अपवाद वगळता एकदम रिफाईन्ड हिंदी वापरणार्‍या विक्रमसिंगच्या तोंडी अड्डा शब्द खटकतो. पानिपतमधल्या अब्दालीच्या हिंदी मागची प्रेरणा हे असे संवाद आहेत. तो पुस्ती जोडतो की मी भाडोत्री राजा आहे, सिंहासन दिले आहे भाड्याने मला. जयाप्रदाला बायपोलार असल्यामुळे ती लगेच शांत होते. इथे तिच्या तोंडी एक अत्युत्कृष्ट असा संवाद आहे - "मुझे क्षमा कर दो विक्रम. वाकई मैं अपने दिल के तराजु में अपने प्रेम को तोलकर उसकी किमत ना लगा सकी." ती मग त्याची स्तुती करू लागते. तो म्हणते ते सगळं ठीक आहे, पण आता तू पहली फुरसत में घरी जा, इथे तुज्या जीवाला धोका आहे. यावर जास्वंदीचा वेडगळ हसतानाचा एक क्लोज अप.

११.२) व्हिलनला आपला हिरो ओळखता येतो

कट टू राजसभा. प्राणसारखा इजिप्शियन यातुधान या राज्याचा राजगुरु आहे. त्याचा प्रभाव म्हणून जितेंद्रच्या हातात या सीनमध्ये इजिप्शियन फराओंच्या हातात असायचा तसा सेप्टर आहे. स्वतःला महाराजांचा वंशज समजत असल्याने जॅक-१ ने अष्टप्रधान मंडळ नेमले आहे. त्याच्या प्रमुखपदी श्री.लांची नेमणूक केली आहे. राजसभेत वेष बदलून (वाचा: डोक्यावरून घोंगडे घेऊन) कादर खानही आलेला आहे. राजसभेत येणार्‍या लोकांना प्रत्येक वेळी नवीन कायदे ऐकायची असलेली सवय मोडू नये म्हणून श्री.ला काही नवीन घोषणा करतात. पहिला निर्णय - शक्ती कपूरला हाकलून द्यावे. शक्ती कपूर धुसमुसत निघून जातो. दुसरा निर्णय - प्राण आणि शक्ती कपूरने काबाडकष्ट करून लुटलेला पैसा आणि बळकावलेल्या जमिनी परत दिल्या जातील. बिच्चारे प्राण आणि शक्ती! त्यांच्या अपार कष्टांवर क्षणार्धात पाणी फिरवले आहे. हे कल्याणकारी निर्णय ऐकून बुशशर्ट, सिंथेटिक साड्या, लुंगी अशा आधुनिक वेषभूषा केलेले प्रजाजन टाळ्यांचा कडकडाट करतात.

कट टू इजिप्शियन आसनाची खोली. अमजद खान छाती बडवू बडवू रडत आहे. प्राण विचारतो - कुकडू, भोकाड का बरे पसरले आहेस तू? शक्ती कपूर म्हणतो, मला सिंहासन मिळू शकले नाही म्हणून रडत असेल. अमजद खान म्हणतो अडलंय माझं खेटर, तुला सिंहासन मिळाले नाही म्हणून मी का रडू? प्राण म्हणतो मग माझे अधिकार काढून घेतले गेले म्हणून रडत असेल. अमजद खान म्हणतो गेले उडत तुझे अधिकार आणि गेला उडत तू. मी रडतो आहे कारण तुझ्या सोबत राहून बुद्धि, नशीब आणि डोक्यावरचे केस तिन्ही गेले आणि तो राजकुमार, प्लॅटिपसच्या प्रेमात काय पडला, डायरेक्ट सिंहासनावरच बसला बादाम खाके. प्राणची ट्यूब फायनली पेटते. ज्या जॅक-२ ला आपण जास्वंदीच्या पदराचे खेळणे बनवून ठेवले तो रातोरात एवढा हुशार कसा काय झाला? कादर खान एंट्री घेत म्हणतो कारण तो आदित्यवर्धन नव्हेच! कादर खान म्हणतो की मी गेलो होतो वेष बदलून राजसभेत. एवढा गरीबांचा पुळका फक्त विक्रमसिंगलाच येऊ शकतो तो विक्रमसिंगच आहे. प्राण जरा कॉशिअस व्हिलन असल्यामुळे तो आधी विक्रमसिंग जंगलात आहे का हे चेक करायचे ठरवतो.

११.३) शादी का लड्डू

तिकडे जॅक-१ ला आपण सार्वजनिक काका असल्याचा साक्षात्कार झाला आहे. तो आपल्या पर्सनल खलबतखान्यात अष्टप्रधानांना घेऊन बसला आहे. इथे एक प्रश्न पडतो - बाकी सात लोकांच्या हातात रविवार पेठेत मिळणारे दंडुके दिले आहेत तर आमच्या डॉक्टरांनी काय घोडं मारलं होतं? त्यांनाही द्यायचा एक. असो, जॅक-१ इस सुबह की शाम नही थाटात शब्दशः पैशांची खैरात करायला लागतो. अस्पृश्यता निवारण काय करणार, प्रजेला फुकट जेवण काय देणार, लोकांची फुकटात लग्ने काय लावून देणार. हे सर्व तो चांदीने आंघोळ करून आल्यानंतर बोलतो आहे. नो जोक, त्याच्या अंगावरची चांदी त्याच्या पँटवर ओघळली आहे. श्री.ला म्हणतात, बाळा अंथरूण पाहून पाय पसरावे. जॅक-१ म्हणतो की आपण सैन्यखर्चात कपात करू. दुसरा एक नाकातून बोलणारा मंत्री म्हणतो की मग देशाची रक्षा कोण करणार? जॅक-१ म्हणतो की माझी बेब आहे ना. पण समजा, उद्या हा जयाप्रदाशी भांडला किंवा जयाप्रदाने सारीपाटात चीटिंग केली म्हणून हा तिच्यावर रुसला आणि याने हिची मदत घ्यायला नकार दिला तर लढाईला काय नंदीबैलाप्रमाणे डोके हलवत डॉक्टर जाणारेत?!

तिकडे केअरटेकर अजूनही प्लॅटिपसला शोधतोच आहे. सोबत का.क.डा. पण आहे. प्रेक्षकांची दया येऊन मंदाकिनी लगेच नटून थटून त्यांच्या समोरून जाऊ लागते. केअरटेकर ताबडतोब तिला कैद करून प्राणकडे न्यायची व्यवस्था करतो. बहुधा तिच्या पार्लर पॅकेजमध्ये नेल्स इन्क्लूडेड असावेत. अन्यथा नखे रोवून या सर्व टुच्च्या व्हिलन्स मारणे प्लॅटिपससाठी काही कठीण नाही. हा गोंधळ चालू असताना वहिदा रहमानला काही डायलॉग्ज मिळावेत म्हणून आदित्यवर्धनच्या विवाहाच्या स्कीमचा ट्रॅक पुन्हा चर्चेत येतो. जॅक-१ अर्थातच म्हणतो की मी विवाह नाही करू शकत. श्री.ला. विचारतात, पण का? अरे, अजून अमृता राव पाच वर्षांची पण नाही झाली. ती सूरज बडजात्या डेट्स कशा देणार आणि विवाह कसा कोणी करू शकणार? प्रकट मात्र तो म्हणतो की मी आत्ता कुठे राजमुकुट परिधान केला आहे. एवढ्यात माझ्या शिरावर बायकोचे ओझे का लादता? यावर खरे तर "मेल्या मग मुकुट घालत जा ना. बोडख्याने का हिंडतोस?" असा प्रश्न विचारायची संधी होती. पण ती म्हणते की मेरे को मालूम तेरे को वो प्लॅटिपस पसंद हय. तो म्हणतो हो, आदित्यवर्धनला प्लॅटिपस आवडतो (अशा कठीण समयी सुद्धा तृतीयपुरुषाचा वापर करून सत्य बोलण्याचा अट्टहास पाहा). तो म्हणतो तिला शोधून आण मग विचार करता येईल. त्याची अपेक्षा की या लोकांना काय मंदाकिनी सापडत नाही आणि आपलं लग्न काय होत नाही. पण प्राणही महा बेरकी! तो मंदाकिनीला घेऊन येतो आणि म्हणतो की आता कुठे पळून जाईल गुलाम! गोर्‍या रंगाला वहिदाही भुलते आणि लग्नास आपली संमती देते. प्राण म्हणतो की उद्याच चांगला मुहूर्त आहे, उडवून टाका बार!

हिरो लोकांपुढे एक बिकट समस्या निर्माण झाली आहे. तसेच "प्यार की रात आयी" या मोस्ट रिक्वेस्टेड गाण्याची सुद्धा वेळ झालेली आहे. तरी प्रेमाच्या रात्री हिरो लोक ही समस्या कशी सोडवतील?

१२) प्यार की रात

१२.१) अदलाबदली

लगीनघाई सुरु आहे. मंदाकिनीला नटवले जात आहे. पण या बिकट समस्येवरही विक्रमसिंगकडे एक अतिशय सोपे उत्तर आहे. त्याने गुपचूप आदित्यवर्धनला आपल्या महालात आणले आणि जास्वंदीच्या मदतीने याला नवरदेवाचा साज चढवला. पण बहुधा अवंती राज्यात राजकुमाराला घालायला एका दिवशी एकच कपड्याचा जोड मिळत असावा. कारण विक्रमसिंगने पुन्हा आपला डाकू वाला वेष घातला आहे. तसे बघावे तर याला घालायला त्या महालात इतर कपडे असले पाहिजेत. त्याची मर्जी दुसरे काय? तो जास्वंदीला विचारतो की मी मेकअप कसा केला आहे? ती म्हणते बराय. पण मेकअप जोपर्यंत बाई करत नाही तोवर तो अपूर्ण असतो. मग मेकअप पूर्ण करण्यासाठी काय केले पाहिजे? यावर उत्तर म्हणून आदित्यवर्धन म्हणतो ती सांगणार नाही ती करून दाखवेल. क्षणभर प्रेक्षक ही आता काय करणार आहे याबाबत मोठ्या अपेक्षा बाळगण्याची चूक करतो. प्रत्यक्षात ती फक्त तीट लावते. या न्यायाने आदित्यवर्धन बहुधा जॉन्सन अ‍ॅन्ड जॉन्सनची पावडर लावत असावा. पण मुद्दा क्लिअर आहे. विक्रमसिंग या परिस्थितीचा फायदा उठवून आदित्यवर्धनची लाईन क्लिअर करून देत आहे. विक्रमसिंग म्हणतो की हे बघ आता काय तुझ्या राज्यात प्रॉब्लेम उरलेले नाही आहेत. तुला हवी तशी बायको सुद्धा मिळत आहे. तर फॉर्मली आता मी तुझ्या कॉन्ट्रॅक्टमधून मोकळा झालेलो आहे. तरी तू तुझे राज्य सांभाळ. आदित्यवर्धन म्हणतो की पंगतीचे ताट तरी जेवून जा. विक्रमसिंग म्हणतो आता काय चहापाण्याला येणं होईलच मग पंगतीला कशाला थांबू मी?

सर्व काही पब्लिकली होत असल्यामुळे राजसभेच्या पटांगणातच, जिथे जास्वंदी जयाप्रदाच्या स्वागताकरिता नाचत होती, लग्नाचा मांडव टाकला आहे. ज्या यज्ञवेदीच्या साक्षीने जॅक-१ आणि जयाप्रदाने मित्रत्वाची शपथ घेतली त्याच यज्ञवेदीच्या साक्षीने जॅक-२ आणि प्लॅटिपस साता जन्मांची गाठ बांधत आहेत. लग्न अगदी निर्विघ्न पार पडते. प्राणला याचे नवल वाटते की जॅक-१ लग्नाला बसलाच कसा? शक्ती कपूर येऊन म्हणतो की लग्न करणारा जॅक-२ होता, जॅक-१ तर जंगलात आहे. अमजद खान म्हणतो की हा फारच विश्वासू माणूस आहे, काम पूर्ण होताच जॅक-२ ला गादीवरून बसवून निघून गेला बादाम खाके. आता प्लॅटिपसच्या नख्यांकरवी जॅक-२ चे मरण अटळ आहे असे प्राण आणि कादर खान म्हणतात. त्यांना काय माहित हे सर्व संभाषण जास्वंदी ऐकते आहे. जास्वंदी फुल्ल टेन्शन मोडमध्ये!

१२.२) सच्चे प्रेम

दोन वेण्या घातलेला प्लॅटिपस पाहायची सुवर्णसंधी आता आहे. वहिदा रहमान कोणत्याही भारतीय मातेप्रमाणेच आजी बनण्यास उतावीळ असल्यामुळे ती जातीने प्लॅटिपसला हनिमून स्वीटमध्ये सोडून येते. जास्वंदी धावत धावत येते आणि म्हणते की हनिमून थांबवा नाहीतर आपला हनि डेड होईल. तसे बघावे तर या जास्वंदीला जॅक-२ चा राग यायला हवा. इतके दिवस हिच्या प्रेमात आकंठ बुडालेला रातोरात प्लॅटिपससोबत डुंबू लागला. हिच्या बूबा बूबा वर पाणी फिरवणार्‍या प्लॅटिपस-जॅक-२ जोडीचा हिने किती दुस्वास केला पाहिजे. पण हिचे प्रेम सच्चे असल्यामुळे ती जॅक-२ चा जीव वाचवायला आली आहे. एवढ्या उदात्त हेतुची वहिदा रहमान बोळवण कशी करते ते बघा.

वहिदा म्हणते तुला राजवाड्यात घुसू कोणी दिलं? अपवित्र झाला राजवाडा तुझ्यामुळे. जास्वंदी म्हणते की ते सगळं घटकाभर विसरा, आत्ता राजपुत्राचे प्राण संकटात आहेत. ती चंदना प्लॅटिपस म्हणजे विषकन्या आहे. वहिदा म्हणती आणि मी मेड्यूसा आहे, काहीपण फेकू नकोस. माझी सून म्हणजे गुणांची खाण आहे, तिच्या मनास छळकपटाच स्पर्शही झालेला नाही. संपूर्ण नॅचरल वातावरणात वाढलेले ते ऑरगॅनिक प्रॉडक्ट आहे, तुझ्यासारखे आर्टिफिशिअल नाही. जास्वंदी तरी विनवणी करते की ऐका माझं, त्या प्राणने हिला विषकन्या बनवले आणि आता तिच्याकरवी तो जॅक-२ ला मारण्याचा प्रयत्न करतो आहे. वहिदा मात्र ऐकण्याच्या मूडमध्ये नाही. तिच्यामते जास्वंदी जळकुटी असून जॅक-२ तिच्या हातचा गेल्यामुळे ती आता प्राणसारख्या महापुरुष लावते आहे. जास्वंदी मग स्वतःच अंतःपुरात जाऊ बघते आणि वहिदा तिला सैनिकांकरवी कैद करते.

१२.३) तकतू तक तै तक तै

सर्वकाही जुळून आलेले असल्यामुळे आता मिलनाची वेळ झालेली आहे. ला ला ला ला गाण्याची सुरुवात होते. बराच वेळ नेव्हल शॉट्स काढलेले नसल्यामुळे कृष्णाच्या अंगातला साऊथ इंडियन डायरेक्टर जागा झाला आहे. गाणे आहे - चलता हैं दो दिलों का कैसे संसार, प्यार से | आता हिअं प्रेमियों किस तरह करार, प्यार से | जीवन में आती हैं कैसे बहार, प्यार से प्यार से प्यार से | तकतू तक तै तक तै || (प्यार की पहली रात आयी) x२. यातले "तकतू तक तै तक तैं" हे "ताकातू ताका तै ताका तै" असे वाचावे. गायक आहेत किशोर कुमार आणि पी. सुशीला. पण गाण्याचा खरा हिरो आहे कोरिओग्राफर एन श्रीनिवास. नमुना बघण्यासाठी येथे टिचकी मारावी. या गाण्यामध्ये ऑलमोस्ट ओष्ठमिलनाच्या इतक्या स्टेप्स आहेत की जितेंद्र-मंदाकिनीने "त्यापेक्षा आम्ही पप्प्याच घेतो ना" अशी तक्रार केल्याचे ऐकिवात आले आहे. हे गाणे म्हणजे पाच मिनिटे खेचलेले कडल आहे.

प्रेक्षकांनी हे लक्षात ठेवले पाहिजे की ही फार टेन्स सिचुएशन आहे. त्यामुळे मध्ये "आज तरी हा मरतो का नाही" असा चेहरा करून प्राणने घातलेल्या येरझार्‍याही दाखवल्या आहेत. तुरुंगातली चिंताक्रांत जास्वंदी सुद्धा दिसते. पण जॅक-२ ला याच्याशी काही घेणेदेणे नसल्याने तो तकतू तक तै तक तैं करण्यात बिझी आहे. हे तकतू तक तैं मोराच्या खोलीत होत असावे पण मोर प्रॉमिनंटली दिसत नाही. बिछान्यावर फुलांची चादर पसरली आहे. त्यावर इकडून तिकडे आणि तिकडून लोळणे एवढीच त्यांच्या प्रेमाची मजल. पण केवळ लोळण्यातूनही डान्स करता येतो हे इथे सिद्ध केलेले आहे. इतके कलात्मक लोळणे परत कोणालाच जमले नाही. तिकडे जास्वंदी पहारेकर्‍याला जवळ बोलावते आणि दाराच्या जाळीतून हात बाहेर काढून, पहारेकर्‍याची तलवार हिसकावून त्याला तलवारीच्या धारेवर धरते आणि स्वतःची सुटका करते.

इथे विषकन्येचा ग्लोबल काँटेक्स्ट गाण्याच्या शब्दांमधूनही कॅप्चर केला आहे. पुढचे कडवे आहे "जहर भी बन जाता हैं अमृत, प्यार से अगर पिया जाए | कांटे भी बन जाते हैं कलिया, प्यार से अगर जिया जाए | " इथे मंदाकिनीच्या अंगातले विष अमृत बनणार असल्याचे फोरशॅडो केले आहे. पण या गाण्यात मंदाकिनीचे कौतुक केले पाहिजे. नव्वद टक्के वेळ ती गुडघ्यांवर बसली आहे. एवढा डोलारा गुडघ्यांवर पाच मिनिटे झेलायचे हे काही येरागबाळ्याचे काम नव्हे. प्राणला आपल्या प्लॅनवर गरजेपेक्षा अधिक विश्वास असल्यामुळे त्याने पहिले कडवे संपते ना संपते तोवर जॅक-२ साठी चिता रचून ठेवली आहे. ही चिता राजसभेत रचली जात आहे, डाव्या कोपर्‍यात दिसणारी राक्षसाची मूर्ती याचा पुरावा आहे. एवढे मोठे षडयंत्र केल्यानंतरही त्याला जॅक-२ ला पब्लिक डिसक्लोजरमध्ये जाळायचे आहे. जॅक-२ चे नशीबच की वहिदाने याची सुहागरात पब्लिक डिसक्लोजरमध्ये अ‍ॅरेंज नाही केली.

जास्वंदी आता घोड्यावर बसून राजवाड्याकडे येताना दाखवली आहे. धिस इज नॉनसेन्स! तिला राजवाड्यापासून दूरवरच्या तुरुंगात नेऊन डांबले होते. जर तसे असेल तर तिला तिथे नेईपर्यंतच याची सुहागरात होऊन जाईल. पण तसे झालेले दिसत नाही. च्यायला मग याचं तकतू नक्की किती वेळ चालू आहे? स्टॅमिना आहे की चेष्टा?! प्राण तिथे चिता रचून तयार आहे. हिचे विषकन्यापण सिद्ध करण्यासाठी बॅकग्राऊंडला फुत्कार म्युझिक. पुढचे कडवे - "मौत उसे कैसे ढूंढ पाये जो, गेसुओं मे तेरे खो जाए". मौत बी लाईक - ब्रो अ‍ॅम आय जोक टू यू? आता मिलन लांबवून चालणार नसल्यामुळे परत एकदा ला ला ला ला होते आणि फेडआऊट मध्ये मिलन झाले असे सूचित करणार्‍या शॉटने गाणे संपते.

मिलन तर झाले पण जॅक-२ काही मरून चालणार नाहे. मग जॅक-२ वाचला तर वाचला कसा?

तिच्यामते जास्वंदी जळकुटी असून जॅक-२ तिच्या हातचा गेल्यामुळे ती आता प्राणसारख्या महापुरुष लावते आहे. >>>>>>> प्राणसारख्या महापुरुषावर आरोप लावते आहे असे म्हणायचे आहे ना तुम्हाला?

बाकी चिरफाड मस्तये!!! Happy

प्राणसारख्या महापुरुषावर आरोप लावते आहे असे म्हणायचे आहे ना तुम्हाला? >> हो

१३) व्हिलन लोकांचा पलटवार

१३.१) विषकन्या टू अमृतकन्या : शास्त्रोक्त पद्धत

दुसर्‍या दिवशी सकाळी अमजद खान कोणाचीही पर्वा न करता जॅक-२ च्या शयनकक्षात घुसतो. काल रात्री इथे काय प्रोग्राम झाला, याचा जरा तरी विचार करावा माणसाने पण अमजद खोलीत शिरतो तोच भोकाड पसरून. काल या राज्यात सुखच सुख होते आज काय ही अवकळा पसरणार आहे, अशी त्याची बडबड चालू आहे बादाम खाके. त्याची अपेक्षा की एव्हाना जॅक-२ ने टें बोलली असेल. पण बघतो तर काय जॅक-२ याच्या बडबडीने जांभया देत जागा झाला आहे. याला जिवंत बघून अमजद खान भूत पाहिल्यासारखा दचकतो. प्राणच्या मनात इकडे लाडू फुटत आहेत. तो वहिदाचे सांत्वन करणार्‍या भाषणाची तयारी करतो आहे. सोबत कादर खान आणि शक्ती कपूरही संतोष व्यक्त करताना दिसत आहेत. एवढ्यात अमजद खान येऊन त्यांचा भ्रमाचा भोपळा फोडतो. विषकन्येचा प्रभाव तर पडला नाहीच, उलट जॅक-२ अजूनच चमकतो आहे बिना बादाम खाके. पण प्लॅटिपस फेल कसा गेला?

कट टू विक्रमसिंगची गुहा. जास्वंदी त्याच्याकडे मदत मागायला गेली आहे. विक्रमसिंग म्हणतो की तुला चिंता करण्याचे काही कारण नाही. मंदाकिनी एकेकाळी विषकन्या होती पण ती आता विषकन्या नाही. हा चमत्कार असा घडला - जेव्हा केअरटेकर पासून पळून जाऊन मंदाकिनीने जीव देण्याचा प्रयत्न केला होता तेव्हा जॅक-१ ही तिथूनच चालला होता. हिने नदीत उडी घेतलेली पाहून तोही नदीत उडी घेतो. तिला बुडण्यापासून वाचवल्यानंतर ती "मी विषकन्या आहे, मला हात नका लाऊ" असे ओरडून ती बेशुद्ध होते. जॅक-१ इतका भारी हिरो शतका-शतकांतून एकदाच होत असल्यामुळे त्याला एक अतिशय निष्णात वैद्यही माहित असतो. पण मंदाकिनी अतिशय बावळट हिरोईन असल्यामुळे तिच्या हे लक्षात येत नाही की आपल्याला वाचवणारा हा आपल्या प्रियकरासारखाच दिसतो.

हा वैद्य अतिशय निष्णात असल्यामुळे फक्त डोळ्यांची तपासणी करून तो हे सांगू शकतो की ही विषकन्या आहे. जॅक-१ ने खरंतर "अरे तिचे डोळेच सापासारखे आहेत, ती साप नाही आहे" असं म्हणायला पाहिजे पण एवढ्या मोठ्या वैद्याला क्रॉस कसे जावे म्हणून तो गप्प बसतो. तो विचारतो की हिचं विष काढून नाही टाकता येणार का? तो काय साप आहे विषग्रंथी काढून टाकली की बिनविषारी व्हायला? पण वैद्यबुवा म्हणतात की हो, बनवू की हिला अमृतकन्या. त्यानुसार तो मंदाकिनीला मंडलात बसवून कसल्याशा मुळ्यांची धुरी देतो. याने तिचे विष निघून जाते.

शास्त्रीय आधार : प्लुकिआ इंडिका किंवा इंडियन कॅम्फरवीड नावाच्या इंडोनेशियामध्ये आढळणार्‍या अ‍ॅस्टरवर्गीय वनस्पतीच्या मुळ्यांमध्ये बीटा-सिटोस्टेरॉल नामक रसायन असते. हे रसायन नागाचे विष उतरवू शकते. थोडक्यात मुळ्यांची धुरी हा उपाय वाटतो तितका काही रँडम नाही. हां आता प्लॅटिपसच्या विषासाठी कोणती मुळी वापरावी लागते हे त्या वैद्यालाच ठाऊक! पण जॅक-२ च्या मार्गातला विषारी अडसर दूर झाला हे नक्की!

१३.२) खटला जिंकण्याकरिता मुद्दे लागतात, लॉजिक नव्हे.

कादर खान आणि शक्ती कपूरने आपला पराजय मान्य केला आहे. पण प्राण अजूनही डिफीट खायला तयार नाही. तो म्हणतो की उद्या राजसभा बसणार आहे. तेव्हा फक्त गंमत बघा. दुसर्‍या दिवशी सभेत शक्ती कपूर येऊन मोठमोठ्याने बोंबा मारू लागतो. त्याचे म्हणणे असते की राज्यात नुसती लुटालूट चालू आहे आणि राजा व त्याचे मंत्रीमंडळ काहीही उपाय योजत नाही आहेत. जॅक-२ त्याला विचारतो की हे काम सेनेचे आहे, सेना काय झोपा काढते आहे? इथे तो विसरतो की जेमतेम अर्ध्या तासापूर्वी शक्ती कपूरला सेनेतून हाकलून दिले आहे आणि त्याचा व सेनेचा काही संबंध उरला नाही. पण शक्ती कपूरच्या डोक्यात वेगळेच कारस्थान शिजते आहे. तो म्हणतो की जेव्हा राजाच लुटारू असेल तर सेना तरी काय करेल? आत्ता सिंहासनावर बसलेली व्यक्ती जॅक-२ नसून जॅक-१ आहे. आपल्याला कोणीतरी डाकू म्हटल्याचे जितेंद्राला सहन होत नाही. वातावरणनिर्मितीकरिता वहिदा रहमानचा चिंताक्रांत क्लोजअप. जॅक-२ म्हणतो की मी जॅक-२ आहे, जॅक-१ नाही. मग राजसभेत प्राण उपटतो. आम्हाला संशय आहे की तू आदित्यवर्धन नव्हे!

शेजार्‍यांप्रमाणेच यांनाही जॅकला आरोपीच्या पिंजर्‍यात उभं करण्याची हौस असल्यामुळे खटला भरण्याची मागणी केली जाते. जॅक-२ याला तयार होतो. राजगुरु या नात्याने प्राणला पब्लिक प्रॉसिक्यूटर नेमतात. जॅक-२ आपल्यावरचा आरोप नाकारतो आणि काही पुरावा, कोणी साक्षीदार आहे का असे विचारतो. प्राणचा साक्षीदार आहे कादर खान. कादर खानला ओळखण्यास जॅक-२ नकार देतो. कादर खान म्हणतो अरे बच्चंमजी! तू विक्रमसिंगच आहेस. माझ्यासमोर तुला देशद्रोही ठरवून हद्दपार केले होते. अवंती गांधाराचे मित्रराष्ट्र असल्याकारणाने तू अवंतीच्या महाराजांचा खून केलास. आणि आपला बदला घेण्यासाठी इथे महाराज बनून बसला आहेस. मुळात विक्रमसिंग वड्याचे तेल वांग्यावर का काढेल? दुसरे म्हणजे जयाप्रदाला एक निरोप पाठवून याची शहानिशा करता येऊ शकत नाही का? तिसरे म्हणजे विक्रमसिंग सॉर्ट ऑफ सेलिब्रिटी असल्यामुळे त्याची हद्दपारीची शिक्षा माफ केल्याची बातमी किमान श्री.लांच्या कानावर तरी येऊ नये का? तसेच कादर खानलाही हद्दपार केले आहे, तरीही त्याच्या साक्षीवर हे मद्दड लोक का विश्वास ठेवत आहेत?

पण प्राण आज फुल्ल तयारीनिशी आला आहे. त्याची दलील दोन मुद्द्यांवर आधारित आहे. विक्रमसिंगने राज्यात कल्याणकारी कार्ये राबवण्यासाठी सैन्यखर्चात कपात केली होती. शक्ती कपूर याला नवा रंग देत म्हणतो की ही कपात करण्याचे कारण असे होते की सैन्य कमकुवत झाले की याच्या गँगला निर्विघ्नपणे लुटालूट करता येईल. मुद्दा क्रमांक दोन : विक्रमसिंगने अस्पृश्यता निवारणांतर्गत अस्पृश्यांना मंदिरात मुक्तप्रवेश दिला. याचा फायदा उठवून प्राणने धार्मिक दंगली घडवून आणल्या आणि त्याचे बिल सोयीस्कररित्या जॅक-२ वर फाडले. कोणीही विचारले नसतानाही नाकातून बोलणार मंत्री "हो हो हा असाच वागला" म्हणून पचकतो. प्राण मग हरिश्चंद्राप्रमाणे सत्यवचनी महामंत्री श्रीकांत म्हणजे डॉक्टर लागूंना विचारतो की याने हे दोन निर्णय घेतले की नाही. बिच्चारे डॉक्टर धर्मसंकटात सापडतात. अखेर हृदयावर दगड ठेवून ते कबूल करतात की तेव्हा जो कोण सिंहासनावर बसला होता त्याने हे निर्णय घेतले. तसे याने सिद्ध काहीच होत नाही पण प्राणची विजयी मुद्रा बघून प्रजासभेतला एक ढोल्या म्हणतो की "आता आम्हाला घरी जायचंय, काहीतरी शिक्षा द्या याला आणि आम्हाला मोकळं करा. केव्हाचं शूटिंग चाललंय काही रीतभात आहे का नाही." प्राण म्हणतो "तो अधिकार आम्हास नव्हे. तो अधिकार रहमानांच्या वहिदेला आहे." वहिदा रहमान सीआयडीत असल्याच्या थाटात "इसे तो फांसी होगी" म्हणून निर्णय सुनावून मोकळी होते. आपल्या आईच्या तोंडून सजा-ए-मौतचा निर्णय ऐकून जॅक-२ बिना मेकअपची मंदाकिनी बघतल्यासारखा हादरतो.

व्हिलन लोकांनी आपला शेवटचा डाव खेळला आहे. आता क्लायमॅक्स अटळ आहे.

__/\__
Lol

Pages