ती ' राजहंस ' एक

Submitted by Theurbannomad on 14 March, 2020 - 08:23

सौंदर्य,लावण्य, देखणेपणा, रेखीवपणा अशा सगळ्या मोजमापांना मागच्या काही वर्षात 'आंतरराष्ट्रीय' वलय प्राप्त झालं आहे. सौंदर्यस्पर्धा, शरीराची प्रमाणबद्धता मोजण्याचे निकष, गोऱ्या कांतीला सावळ्या अथवा काळ्या कांतीपेक्षा मिळालेली सर्वमान्यता, सौंदर्य प्रसाधनांच्या मोठमोठाल्या कंपन्यांनी आणि 'फॅशन इंडस्ट्री'ने लोकांच्या मानसिकतेवर जाहिरातींचा मारा करून टाकलेला प्रभाव अशा अनेक मार्गांनी सौंदर्याच्या व्याख्या आमूलाग्र बदलल्या गेल्या आहेत. या सगळ्या धोपट मार्गाच्या विरुद्ध जाऊन स्वतःच्या मनाप्रमाणे याच 'फॅशन इंडस्ट्री'मध्ये स्वतःचं नाव कमावणारी दीमा मला काही दिवसांपुरतीच भेटली, पण तिच्यातल्या त्या जबरदस्त बंडखोरीमुळे आणि कोणत्याही व्यक्तीला थेट भिडायच्या धडाडीमुळे माझ्यावर तिने चांगलाच प्रभाव टाकला.

एका ऑफिसच्या अंतर्गत सजावटीचं काम आमच्याकडे आलं. आमच्या पहिल्या क्लायंट मीटिंगच्या वेळी आम्हाला ऑफिसमध्ये हव्या असलेल्या सोयी आणि आवश्यक गोष्टींची यादी आम्हाला देण्याचं काम दीमाकडे होतं. दीमा माझ्याबरोबर संभाषण करायला बसली, तेव्हा तिच्या व्यक्तिमत्वाने पहिल्या काही मिनिटात माझ्यावर छाप सोडली. कुरळे सोनेरी केस, धारदार नाक, पातळ जिवणी, लालसर गोरा वर्ण, साडेपाच फुटाच्या आतबाहेरची उंची आणि या सगळ्यात सर्वाधिक लक्ष वेधून घेणारे तीक्ष्ण निळे डोळे मलाच नाही तर माझ्या बरोबरच्या अनेकांना पहिल्या नजरेत आवडून गेले. या क्षेत्राशी संबंध असलेल्या सर्वसाधारण स्त्रिया करतात त्या मानाने तिच्या चेहऱ्यावर काहीच मेक-अप नव्हता. किंबहुना एकंदरीतच तिला बघून ती एक व्यावसायिक 'मॉडेल' आहे याचा अंदाज आम्हा कोणालाही आला नाही. या ऑफिसची ती एक भागीदार होती आणि अनेक देशांमध्ये वेगवेगळ्या 'फॅशन हाऊसेस' साठी फॅशन शो आयोजित करणं हे तिचं मुख्य काम होतं.

त्यानंतर कामाच्या निमित्ताने माझ्या आणि तिच्या अनेक भेटी झाल्या. दर आठवड्यात किमान दोन वेळा कामाची प्रगती कशी होतं आहे, याचा 'रिपोर्ट' आम्हाला तिला द्यावा लागे. ती स्वतः कामाच्या बाबतीत अतिशय चोखंदळ होती. आपल्याला नक्की काय आणि कसं हवंय, याचे आडाखे तिच्या मनात स्पष्ट आणि पक्के होते. रंगसंगती, फर्निचर, कलाकुसरीच्या वस्तू इतकंच काय पण चहा-कॉफीचे कपसुद्धा तिने अतिशय कलात्मकतेने निवडले होते. आम्ही या क्षेत्रातले असूनही कधी कधी तिच्याकडून एखाद्या गोष्टीचं ' संदर्भासहित स्पष्टीकरण ' ऐकून आम्हाला स्वतःबद्दल न्यूनगंड यायचा. तिची बुद्धिमत्ता आणि ज्ञान अफाट आहे, याची प्रचिती आम्हाला पावलोपावली येत असे.

एके दिवशी आमच्यातल्या काही जणांना तिने दुबईतल्याच एका उंची हॉटेलमध्ये तिने आयोजित केलेल्या 'फॅशन शो' चा आमंत्रण दिलं. आम्ही सगळे अर्थात काहीतरी नवीन बघायला मिळणार आणि या क्षेत्रात काम कसं चालतं याची चांगली माहिती मिळणार म्हणून आनंदलो. ठरलेल्या वेळेत आम्ही त्या हॉटेलमध्ये पोचलो, तेव्हा आम्हाला तिच्या एका सहकार्याने ' प्री-फंक्शन ' भागात गेलो आणि आमच्या समोर जे काही सुरु होतं, ते बघून आमचा श्वास कोंडला. वीस-पंचवीस 'मॉडेल्स' आणि त्यांच्या 'सजावटीत' गुंतलेले चाळीस-पन्नास मदतनीस त्यांनी तिथे कल्ला केलेला होता. मदतनीस भरभर एका खुर्चीवरच्या मॉडेलची 'रंगरंगोटी' झाली की पुढच्या खुर्चीवर एखाद्या यंत्रासारखे तेच काम त्याच कौशल्याने आणि त्याच वेगाने करत होते. मॉडेल मुलींना जागेवरून हलायचीही परवानगी नव्हती. त्या सगळ्यांमध्ये खणखणीत आवाजात फिरणाऱ्या एका मुलीने आमच्या सगळ्यांचं लक्ष वेधून घेतलं. पाच-एक मिनिटानंतर आम्हाला तिने बघितलं आणि जवळ बोलावलं. आम्ही जवळ गेल्यावर आम्हाला ४४० वोल्टचा झटका लागला.

" दीमा? आम्ही ओळखलंच नाही....." माझ्या तोंडून आश्चर्यमिश्रित उद्गार निघाले.

" मेक-अप केला की आम्हाला ओळखणं कठीणंच जातं. आम्हाला अक्षरशः मेक-अपचे थरच्या थर चेहऱ्यावर लावावे लागतात. असा समजा, की लोकांना सुंदर दिसावं म्हणून आमच्या तोंडावर असलेली एक-एक सुरकुती, डाग, पुटकुळ्या इतकंच नाही तर अगदी ओठांचा आणि डोळ्यांचा आकारसुद्धा बदलावा लागतो. अंगावर जे कपडे असतात, त्या कापडांना अनुसरून मेक-अपसुद्धा सारखा बदलावा लागतो. हेच आमच्या दिखाऊ विश्व आहे. पण आजच्या शो मध्ये मी जे काही करते आहे, ते या सगळ्या तथाकथित प्रथांच्या विरुद्ध आहे....."

" म्हणजे?"

" सगळ्या मॉडेल्स पहिल्या? एकही उंच, शिडशिडीत, गोरीपान दिसतेय का?"

" मेक-अप मुळे आम्हाला विशेष काही जाणवत नाहीये...."

" नीट बघा. त्या सॅलीकडे बघा, ती आफ्रिकन आहे. तिचे केस सुद्धा मुलाच्या केसांसारखे बारीक आहेत. ती एम्मा बघा, ती तर जाणवण्याइतपत भारदस्त आहे. ती लॉरेटा, ती तर जेमतेम सव्वापाच फूट उंच आहे. माझ्याकडेच बघा.....मी जे कपडे घातलेत ते माझ्या शरीराला शोभणारे नाहीत असं कोणताही फॅशन डिझाइनर सांगेल."

" हे सगळं नक्की कशासाठी?"

" आजच्या माझ्या शो ची संकल्पना आहे "अपरिपूर्ण आणि तरीही सुंदर"....शेवटी आमच्या शोची शो-स्टॊपर म्हणून जी येईल,ती तर व्यवस्थित लठ्ठ आहे. या सगळ्या जणी रूढार्थाने अपरिपूर्ण असल्या तरी माझ्यासाठी परिपूर्ण आहेत. केवळ कमनीय बांधा, गोरा वर्ण, आकारबद्ध शरीर आणि धारदार चेहरा हीच सौंदर्याची परिभाषा का? कोणी ठरवलं हे?"

दीमा काम करता करता बोलत होती आणि आम्ही मंत्रमुग्ध होऊन ऐकत होतो.

" वेनेसा, बिनधास्त राहा. तू काटकुळी आहेस म्हणून तुला खोल गळ्याचा ड्रेस शोभून नाही दिसणार असा विचार करू नको. हे तुझं शरीर आहे. तुझ्या स्तनांचा आकार छोटा असला म्हणून काय झालं?" तिने बिनदिक्कत एकही क्षण विचार नं करता आणि काहीही आडपडदा न ठेवता सगळ्यांसमोर एकीला धीर दिला. आमच्यापैकी काही जणांना ते शब्द ऐकून थोडंसं अवघडल्यासारखं झालं. " का? पुरुषांची छाती तसे स्त्रियांचे स्तन....शब्द ऐकून इतकी कशाची लाज वाटते? लिंग बदललं की शरीराच्या त्याच भागाचं नाव वेगळं होतं.....पण दोन्ही नावांना सारखाच मान का नाही?" आमच्यापैकी एकालाही उत्तर सुचलं नाही.

बाहेर शो सुरु झाला. लोकांच्या टाळ्या आम्हाला बाहेरून ऐकू येत होत्या. एक एक मॉडेल व्यवस्थित रॅम्पवर चालून येत होती आणि चटचट कपडे बदलायच्या खोलीत जाऊन काही सेकंदात दुसरा पोशाख घालून शेवटच्या 'टच-अप' साठी खुर्चीवर बसत होती. काहींना पाणी प्यावंसं वाटलं तर मेक-अप खराब व्हायला नको म्हणून 'स्ट्रॉ' वापरावा लागत होता. एखाद्या मॉडेलच्या केसांची जुनी रचना बदलायची असेल तर अक्षरशः ऑपेरेशन टेबलच्या आजूबाजूला रुग्णाच्या दिमतीला जसे डॉक्टर, परिचारिका, मदतनीस असे सगळे वेढा देऊन उभे असतात तसे सात-आठ मदतनीस त्या मॉडेलच्या आजूबाजूला घेराव घालून काम करत होते. सगळं काही इतक्या यांत्रिकपणे आणि तरीही इतक्या शिस्तबद्धपणे सुरु होतं की आम्हाला त्या चिमुकल्या विश्वाची ती लगबग बघून विस्मयचकित व्हायला होत होतं.

दीमा शेवटी आपल्या 'शो-स्टॊपर' ला घेऊन पडद्यापाशी गेली. शेवटच्या दहा मिनिटाचा पार्श्वसंगीताचा तो आवाज आला आणि ती मुलगी पडद्यामागून रॅम्पवर गेली। टाळ्यांचा कडकडाट ऐकू येत होता. दिमाने आपल्या त्या शो च्या सगळ्या डिझाइनरना एक एक करून रॅम्पवर जायला सांगितलं. दीमासकट प्रत्येक मॉडेल एक एक करत आपापल्या क्रमानुसार रॅम्पवर गेली. शोची सांगता होत असताना बाहेरून प्रचंड टाळ्या, शिट्या आणि गोंगाट ऐकू येत होता. शेवटचे नमस्कार-चमत्कार होऊन ती प्रजा माघारी आली आणि त्या ' प्री-फंक्शन ' भागात प्रचंड आरडाओरडा सुरु झाला. काही जणी आनंदाने रडत होत्या, काही उड्या मारत होत्या आणि काही खुर्चीवर थकलेलं अंग टाकून नुसत्याच हसत होत्या। शो प्रचंड यशस्वी झालेला होता.

आपला मेक-अप काढून आणि कपडे बदलून दीमा आमच्याबरोबर येऊन बसली. कोणी येऊन तिला अभिनंदनाचे चार शब्द ऐकवत होतं तर कोणी तिचं तोंड भरून कौतुक करत होतं. अक्ख्या ऑफिसच्या विरोधात जाऊन हट्टाने तिने या शोचा वेगळा विचार करून तो यशस्वी करून दाखवला होता. तिने आपल्या मॉडेल्सना स्त्री, मुलगी, बाई या सगळ्यापलीकडे जाऊन आत्मविश्वासाने आपल्या शरीराचा अभिमान बाळगत जगासमोर जायला उद्युक्त केलं होतं आणि त्यांच्यापैकी अनेकांना वाटत असलेली त्यांच्या शरीराची लाज तिने कुठल्या कुठे भिरकावून दिली होती. अभिनंदनाला आलेले काही जण मॉडेल्सच्या शरीराचं 'अवलोकन' करत होते. त्यांच्याकडे काहीशा तुच्छतेने बघून मग तिने आम्हाला तिचे अनुभव सांगायला सुरुवात केली.

" मी मूळची लेबनॉनची. लहानपणी मी दिसायला काहीतरीच होते, असं सगळे म्हणायचे. पुढे आलेले दात, स्प्रिंगसारखे केस, काहीसं जाड शरीर अस ध्यान असल्यामुळे मला शाळेत आणि कॉलेजमध्ये सगळे खूप चिडवायचे. स्वतःच्या दिसण्यावर मी खूप काम केलंय.....अर्थात शस्त्रक्रिया सोडून..... या विश्वात मला पाऊल ठेवणं सोपं नव्हतं. मी कॉप्टिक ख्रिश्चन आहे. आमच्यात घरात खूप बंधन असतात. हे क्षेत्र मला खुणावत होतं आणि माझ्या घरचे शक्य तितकं या क्षेत्रापासून लांब जायला माझ्यावर दबाव टाकत होते. शेवटी मी त्यांना निक्षून सांगितलं, की एक तर मी याच क्षेत्रात जाईन किंवा शिक्षण सोडून देऊन चर्चमध्ये जोगतीण होईन. युरोपमध्ये शिकले, आधी इटलीमध्ये मॉडेलिंग केलं, मग व्यवस्थापन करायला सुरुवात केली आणि शेवटी या कंपनीमध्ये भागीदार होऊन स्वतःची स्वप्नं स्वतःच्या कष्टाने स्वतःच्या कर्तृत्वावर साकार करायला सुरुवात केली." ही मुलगी काय चीज आहे, हे आता आम्हाला कळायला लागलेलं होतं.

" आमचं विश्व म्हंटलं तर सर्जनशील, म्हंटलं तर शोषणाने भरलेलं. मला अनेक अनुभव आलेत. पुरुषांकडून सोड, स्त्रियांकडून लैंगिक संबंधाची विचारणा आणि काही वेळेस जबरदस्ती झालीय. पुरून उरले प्रत्येकाला. कपडे घालताना काही वेळा मुद्दाम ड्रेसचा गळा अजून खाली ओढ, झिरझिरीत कपड्यांमधून स्तनाग्रांचा आकार दिसावा म्हणून रॅम्पवर जायच्या आधी मुद्दाम तिथे बर्फ लाव , ओठ ' मादक ' आणि ' रसरशीत ' वाटावे म्हणून त्यांच्यावर इंजेकशन्स घे असले अनेक प्रकार मी पहिल्या काही वर्षात पाहिले आणि सहन केले. एके दिवशी ठरवलं कि बस......आता तेच करायचं, ज्यात हे असलं 'व्यावसायिक शोषण' नसेल." आम्ही सुन्न होऊन ऐकत होतो.

" मी काम करत असलेल्या एका फॅशन डिझाइनरकडे मी बंड केलं. 'साईझ झीरो' नाही होणार म्हणून सगळ्यांसमोर सुनावलं. त्याने सगळ्यांसमोर अर्वाच्य भाषेत शिव्या दिल्या, तेव्हा माझ्या एका मैत्रिणीने ते मोबाईलवर रेकॉर्ड केलं आणि आम्ही त्या डिझाइनरला सगळ्या जगासमोर उघडं पाडलं. त्याचा राग ठेवून त्याने एकदा मला एकांतात गाठलं तेव्हा मी त्याला असा धडा शिकवलं, की कदाचित बाप व्हायच्या लायकीचा नसेल उरला आता तो....." हि मुलगी मनात आणलं तर भल्याभल्यांना पाणी पाजू शकते हे आम्हाला पुरेपूर समजलं होतं.

" पुरुषांना कपड्यांच्या आतलं बघण्यात जास्त रस असतो....ते बघ, कसे मुद्दाम आजूबाजूला घुटमळतायत कौतुक करायच्या बहाण्याने....माझ्या माहितीत हे काम काही स्त्रियांनीही केलाय.....तिथे फक्त बघणारी स्त्री असते आणि भोगणारा पुरुष. मग मी त्यांची चारचौघात लाज चव्हाट्यावर आणते....बघायचंय?" आम्ही चपापलो. दीमा उठून एकाकडे गेली.

" मिस्टर युसूफ, ती आना, ती तातियाना आणि आत्ता तुम्ही जिच्याशी बोललात ती रीम. कोणाची छाती जास्त आवडली? मनात तुम्ही खूप काही गोष्टींच्या कल्पना केल्या असतील....त्यात कोण सुयोग्य बसते? आणि माझ्याबद्दल काय वाटतं?" युसुफच्या हातातला ग्लास पडता पडता राहिला. त्या मॉडेल्सना सवय असावी, कारण त्यांनी दिमाच्या त्या खणखणीत आवाजात विचारलेल्या सवालाला हसून दिलखुलास दाद दिली. युसुफच नाही, तर अनेक आजूबाजूचे तशाच 'कामगिरीवर' असलेले ओशाळले. काहींनी काढता पाय घेतला. युसूफ तर शरमेने मान खाली घालून जवळ जवळ पळालाच !

आमच्याकडे येऊन दीमा हसली आणि नुसत्या नजरेने " कळलं का?" असा प्रश्न तिने आमच्याकडे केला. तिला टाळ्या वाजवून दाद द्यावीशी वाटली, पण व्यावसायिकतेचा पडदा आड आला आणि आम्ही नुसत्या स्मितहास्यावर निभावून नेलं. धुवट विचारांच्या लोकांना केवळ कपड्यांमुळे आणि धूम्रपान-मद्यपानासारख्या सवयीनमुळे 'उफाड्याच्या' आणि ' वाया गेलेल्या ' वाटू शकणाऱ्या या मुली मुळात स्वाभिमान बाळगून आहेत आणि बिनधास्त असल्या तरी बेलगाम नाहीयेत हे बघून मला अतिशय आनंद होत होता.

पुढच्या चार आठवड्यात आमचं आराखड्याचा काम संपलं आणि आमच्या पुढच्या टीमने ते प्रोजेक्ट हातात घेतलं. दिमाला अधून मधून भेटणं होतंच होतं. दर वेळी हातातल्या 'ग्रीन टी' च्या कपबरोबर आमच्या पुष्कळ अवांतर गप्पा व्हायच्या. अनुभवांची देवाण घेवाण व्हायची. यथावकाश दीमाने आपल्या 'होणाऱ्या यजमानांची' माझ्याशी ओळख करून दिली. हा माणूस तिच्यापेक्षा भारी निघाला, कारण त्याने या क्षेत्रात येण्यासाठी आपला धर्म, आडनाव आणि घर - या सगळ्यावर तुळशीपत्र ठेवलेलं मला त्याने सांगितलं. " याच्याहून जास्त कोण शोभून दिसेल मला....सांग" दीमाने मला विचारलं. या जगावेगळ्या जोड्याचा मला मनापासून हेवा वाटला.

काम संपलं, आणि शेवटी आमच्या ऑफिसने आणि दीमाच्या ऑफिसने मिळून एक छोटीशी मेजवानी आयोजित केली. सगळे जण त्या दिवशी जरा सैलसर वातावरणात खुलले आणि मग आम्ही चार-पाच तास मनसोक्त धिंगाणा घातला. आम्हा आर्कीटेक्ट लोकांचा रॅम्प शो झाला. दीमाच्या सहकाऱ्यांनी आपापल्या कल्पनाशक्तीने आपापल्या 'स्वप्नातल्या घराचा' आराखडा आम्हाला काढून दाखवला. दीमा आणि तिचा होणारा नवरा लहान होऊन मनसोक्त धांगडधिंगा करत होते. मधूनच हसत हसत मला दीमाने प्रश्न केला, " खरं सांग......मी कशी वाटते तुला? तुझा मत काय आहे? "

मला माडगूळकरांच्या ' एका तळ्यात होती बदके ' ची आठवण झाली. मी दीमाला मूळचं ''the ugly duckling' ऐकवलं आणि त्याचा अर्थ विचारला.... तिला माझ्या बोलण्याचा मतितार्थ समजला आणि तिच्या डोळ्यात एक छोटासा अश्रू आलेला मला दिसला, पण लगेच स्वतःला सावरत तिने हसून मला घट्ट मिठी मारली. खरोखर त्या कवितेतला राजहंस दीमाच्या रूपाने माझ्यासमोर उभा होता, नाही का?

प्रांत/गाव: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

मस्तंच!

असा खमकेपणा प्रत्येकीत असतो. फक्त तो शोधता यायला हवा. Happy >>>+१११

धन्यवाद !
माझ्या ब्लॉग्सना भेट द्या आणि आपल्या प्रतिक्रिया कळवा. शक्य असल्यास आपल्या मित्रमैत्रिणींना ब्लॉग वाचण्याची माझ्यातर्फे विनंती करा.

https://humansinthecrowd.blogspot.com/
https://demonsinthecrowd.blogspot.com/