शंकराचा नंदी

Submitted by Theurbannomad on 14 March, 2020 - 00:45

काही माणसं कुंडलीत ' आजन्म लाळघोटेपणा ' नावाचा एक महत्वाचा योग्य घेऊनच जन्माला येतात. त्यांचे बाकीचे ग्रह त्या एका योगाभोवती पिंगा घालत असतात .साडेसाती असो व मंगळ, हा योग्य त्यांना सगळ्या कुग्रहांपासून सतत दूर ठेवतो. सहसा एका ठिकाणी कामाच्या निमित्ताने चिकटल्यावर अशी माणसं आजन्म तिथेच राहतात, किंवा ज्यांचे ' लोम्बते ' होऊन ते तिथे टिकलेले असतात, त्यांनी नोकरी बदलल्यावर मागोमाग त्यांच्याबरोबर हे सुद्धा नव्या जागी दाखल होतात. अशा माणसांना स्वत्व, स्वाभिमान, स्वतंत्र अस्तित्व अशा कोणत्याही गोष्टींची गरज कधीच पडत नाही.

माझ्या ऑफिसमध्ये रुजू झाल्याच्या दुसऱ्या दिवशी काही कारणाने आमच्या डायरेक्टरकडे काही कामानिमित्त मी गेलो आणि केबिनच्या बाहेर मला आसिफ भेटला. हा माणूस हातात कोणत्या तरी प्रोजेक्टचे कागद घेऊन कॅबिनमध्ये जायची वाट बघत उभा होता. घरून निघताना बहुधा अजूनही याची आई याची तयारी करून देत असावी असं विचार माझ्या मनाला चाटून गेला, कारण या महाभागाचा अवतार जरा जास्तच नीटनेटका होता. तेल लावून नीट विंचरलेले पातळ केस, तुळतुळीत केलेली दाढी, पांढरा शर्ट, काळी पॅन्ट, काळ्या रंगाचा पट्टा, छान चकचकीत पॉलिश केलेले काळे बूट, हातात थेट आजोबांच्या काळातलं वाटावं असं मोठ्या आकाराचं घड्याळ,कहर म्हणजे या सगळ्यावर काळ्या रंगाचा टाय आणि जाड फ्रेमचा चष्मा असं त्याचा अवतार बघून मला थेट सत्तरीच्या दशकात गेल्यासारखं वाटायला लागलं. याचं बोलणं तर इतकं संथ आणि मार्दवपूर्ण होतं की अंमळ जास्तच खणखणीत असलेला माझा आवाज माझा मलाच कानाला खटकायला लागला. आम्हाला दोघांनाही डायरेक्टरने आत बोलावले आणि आम्ही त्यांच्यासमोर खुर्चीवर स्थानापन्न झालो.

माझं काम जरी छोटस असलं, तरी आसिफ आधी आलेला होता. अर्थात त्याला प्राधान्य देणं संकेताला धरून होतं. त्याने तरीही " तुम्ही आधी बोललात तरी चालेल...मी थांबतो.." असं मला सांगितलं. आमच्या डायरेक्टरने " you came first, so you should finish your work first ..." असं फर्मान सोडलं आणि त्याने लगेच पवित्रा बदलून " तुम्ही सांगाल तसं....बॉस तुम्ही आहात..." असं उत्तर दिलं आणि मी हैराण झालो. पुढच्या पाच मिनिटात त्याने त्याच्या प्रत्येक शंकेचं उत्तर डायरेक्टर देत असताना " तुम्ही बरोबर सांगताय...." , " कसलं सुंदर निरीक्षण आहे तुमचं..." , " तुम्ही एका मिनिटात काय उपाय सांगितला...आम्ही दोन तास डोकं लावत होतो..." अशा त्याच्या खास ' वरिष्ठांच्या जोड्याच्या तळव्यांना जीभ लावून' दिलेल्या टिप्पण्या माझा डोकं उठवत होत्या. प्राण्यांमध्ये पाठीचा कणा नसलेला एक ' अपृष्ठवंशी ' प्रकारचा वर्ग असतो. हा मनुष्यप्राणी त्यातला एक होता.

माझा काम झाल्यावर मी जागेवर आलो तेव्हा आजूबाजूच्यांना माझ्याबरोबर आत आसिफ होता हे कळलेलं असल्यामुळे आत काय झालं हे जाणून घायची उत्सुकता होती. मी नवा असल्यामुळे उगीच कोणाच्या वाईटात का शिरा, असा रास्त विचार करून मी विषय वाढवला नाही. शेवटी जेवणाच्या वेळेत माझ्या बाजूला बसणाऱ्या फ्रान्सिसने मुद्दाम विषयाला हात घातला.

" आज किती चाटली बॉसची? खरं खरं सांग...अक्ख्या ऑफिसला माहित आहे हा माणूस काय आहे ते, तू कशाला हातच राखून बोलतोयस?"

" अरे, विचित्र आहे हा माणूस इतकं नक्की...पण जाऊदे ना , त्याचं त्याच्याकडे..."

" अजून तुझी वेळ यायचीय...धीर धर. पुढे पुढे बघ..." आपल्या अनुभवाची शिदोरी माझ्यापुढे उघडी करत फ्रान्सिसने मला संभाव्य धोक्याची आगाऊ सूचना दिली.

पुढे पुढे या आसिफबरोबर काम करताना खरोखर माझ्या संयमाची परीक्षा व्हायला लागली. कोणत्याही कामात कोणत्याही गोष्टींचे निर्णय घेताना हा " बॉसला विचारून मगच पुढे जाऊया.." , " साहेबांना आवडेल ना हे?" , " मला वाटतं एकदा साहेबांच्या नजरेखालून जाऊदे ना हे..." अशा सूचना करायचा. " आपल्याला डोकं आहे...आणि आपण उठसूट बॉस बॉस करत त्यांना विचारायला गेलो तर आपली गरजच काय इथे?" माझा त्रागा सुरु व्हायचा. मग आजूबाजूचे ' अनुभवी' लोक मला शांत करायचे. फ्रान्सिसने मला एका वाक्यात आसिफशी वागायची गुरुकिल्ली सांगितली - " गाढवाला च्यवनप्राश खायला घातलास तरी त्याचा मेंदू आईन्स्टाइनसारखा काम करेल का? चूक खायला घालणाऱ्याची की गाढवाची? " हळूहळू मी आसिफशी जुळवून घेऊन काम पुढे न्यायला लागलो.

जवळ जवळ दररोज तशाच कपड्यात आणि अवतारात दिसणारा हा माणूस नुसता लाळघोट्याच नव्हता, तर विलक्षण लोचटही होता. त्याला समोरचा आपल्याला टाळतोय आणि तेही थेट तोंडावर सांगून हे दिसत असूनही काही फरक पडायचा नाही. बिनदिक्कत कोणाच्याही कामाचा पंचनामा थेट साहेबांसमोर करायची त्याची जुनी खोड होती. डायरेक्टरबद्दल स्टाफ काय कुजबूज करतो हे तो थेट जाऊन त्यांनाच सांगायचा.

" तुम्ही सुचवलेल्या डिझाईनमधल्या बदलाला तो महमूद काय म्हणाला माहित्ये? डायरेक्टर आहे म्हणून, नाहीतर सुरळी करून XXXX मध्ये घालायच्या लायकीची आहेत ती स्केचेस..." महमूदला महिनाभर संध्याकाळी २-३ तास जास्तीचं काम डोक्यावर का पडलंय, याचा पत्ता लागायला बराच वेळ लागला. " ती सारा आहे ना, ती म्हणते यांना डायरेक्टर नाही डिक्टेटर म्हंटलं पाहिजे...हिटलरचा आत्मा पुनर्जन्म घेऊन आपल्या ऑफिसमध्ये आलाय सगळ्यांना छळायला..." त्या वर्षी सारा इतरांपेक्षा कमी बोनस मिळाल्यामुळे तणतणून शेवटी राजीनामा देऊन निघून गेली. " तुम्ही डिझाईन केलेली ती बिल्डिंग झिप नसलेल्या चड्डीसारखी वाटते असं म्हणाला रोमेल.." त्या रोमेलला पुढे महिनाभर ऑफिसचे कपडे अंगावरून उतरवायची फुरसत मिळाली नाही. " तुमच्या पेनाची शाई सेप्टिक टॅंक मधून भरता तुम्ही, म्हणून इतक्या घाणेरड्या शब्दात कंमेंट्स लिहिता आमच्या कामावर असं म्हणाला तो शरीफ" अर्थात शरीफने पुढे अनेक दिवस टॉयलेट्स आणि सेप्टिक टँक्सच्याच डिझाईनवर काम केलं हे वेगळ्याने सांगायची गरज नाही!

शेवटी ऑफिसच्या सगळ्यांनी हा प्राणी आजूबाजूला असेल तर चक्क मोबाईलवर मेसेज पाठवून बोलायला सुरु केलं.

एकदा एका कामात आसिफला माझ्या आणि फ्रान्सिसच्या सहकार्याची नितांत गरज होती. अर्थात मदत करायची सूचना थेट डायरेक्टरकडून घेऊन आल्यामुळे आम्हाला त्याला टाळणं अशक्य होतं. आता आलिया भोगासी....म्हणून जे काही हा प्राणी आपल्याला सांगेल ते आणि तितकंच करून आपली लवकरात लवकर सुटका करून घ्यायची आम्ही ठरवली. हा दर अर्ध्या तासांनी हातात काहीबाही रेखाटलेले कागद घेऊन 'गाभाऱ्यातल्या देवाकडे' जायचा. परत आल्यावर त्या कागदावर त्याच्या त्या देवाने लाल रंगात उमटवलेली अक्षरं जणू काही आज्ञापत्र असल्यासारखी तो वाचायचा आणि एकूण एक सूचना तंतोतंत अमलात आणून पुन्हा नव्या दर्शनाला जायचा. दिवसभर हे सगळं त्या शंकरालाही असह्य होतं नव्हतं, आणि त्याच्या या नंदीबैलालाही. आम्ही मात्र त्याच्याबरोबर फरफटत त्या गाभाऱ्याची प्रदक्षिणा घालत होतो.

" आसिफ, तुला लाज लज्जा काही नाहीये का रे? तुझ्या जिभेवर आता डायरेक्टरच्या बुटाचा नंबर सुद्धा छापला गेलाय...किती चाटूगिरी?" बांध फुटून एकदाचा फ्रान्सिस बोलता झाला. आसिफ नुसता हसला. लज्जा हा एक अलंकार असतो, असा मी लहानपणी कुठेतरी वाचलं होतं. ते लिहिणारी व्यक्ती एक तर मूर्ख असावी व अडाणी, असा विचार माझ्या मनाला चाटून गेला.

" तुम लोग कुछ भी बोलो...मै ऐसा ही हूं. तुम डायरेक्टर बन जाओ, तुम्हारा भी जूता साफ करुंगा. "

" अरे का पण? तुला काही स्वाभिमान आहे की नाही?" मीसुद्धा त्या संभाषणात उडी मारली.

" मी तुमच्याइतका टॅलेंटेड नाहीये ना...ती कमी भरून काढायला हे सगळं करावं लागत. मला इथे आल्यावर एका महिन्यात कळलं, आपल्या डायरेक्टरला खुशमस्करे लागतात आजूबाजूला. मी ती जागा भरून काढली...मागच्या दहा वर्षात किती आले आणि गेले...किती लोकांना काढलं तुम्हाला माहित आहे....पण आसिफ अजून आहे तसाच आहे ना?"

" अरे पण हे ऑफिस काय तुझ्यासाठी शेवटचं ऑफिस आहे का काम करायला? इतकं वाईट आहेस का कामात?"

" पण इथे माझी दहा वर्षाची मेहेनत आहे...नव्या ऑफिसमधला बॉस कसा असेल, त्याला कशा पद्धतीची चाटूगिरी आवडते हे सगळं बघून नव्याने तिथे सुरु का करायचं?"

थोडक्यात काय, तर कुठेही गेलो तरी मी चाटूगिरी करणारच आणि तीच माझी काम करायची पद्धत असेल हे तत्व त्याने आयुष्यभर पाळायचं ठरवलं होतं. कोडगेपणाने ते सगळ्यांसमोर मान्य करण्यातही त्याला काहीच लाज वाटत नव्हती. अर्थात या सगळ्याला खतपाणी घालणारे वरिष्ठ ऑफिसमध्ये असल्यामुळे त्याच्या या प्रकारांना कधीही निर्बंध लागणं शक्य नव्हतं.

ऑफिसनंतर तो साहेबांच्या घरी त्यांच्या मुलाला चित्रकलेचे धडे द्यायला जायचा. अधून मधून त्यांच्या घरी होणाऱ्या पार्ट्यांमध्ये सगळी व्यवस्था बघण्याचं काम याच्याकडे असायचं. साहेबांची गाडी दुरुस्तीला अथवा अन्य काही कारणांमुळे उपलब्ध नसेल तर आपल्या गाडीने त्यांना सकाळी घ्यायला आणि संध्याकाळी सोडायला जायचा. कळस म्हणजे संध्याकाळी उशीर झाला आणि ऑफिसचे मदतनीस गेलेले असले तर साहेबांना कॉफी सुद्धा करून द्यायचा. ऑफिसच्या लोकांना त्याच्या या वागणुकीमुळे तो सावलीलादेखील उभा असलेला चालायचा नाही, पण अशा कोणत्याही गोष्टींची यत्किंचितही पर्वा न करता हा वरिष्ठांची थुंकी झेलायला ओंजळ पुढे करून सतत उभा असायचा.

एके दिवशी आसिफ ऑफिसमध्ये आला नाही म्हणून डायरेक्टरने त्याला फोन लावला. त्या संभाषणातून आम्हाला आसिफने डायरेक्टरला ' मी येऊ शकणार नाही' असं उत्तर दिलेला आहे इतकं आम्हाला कळलं. ही उलटी गंगा कशी वाहायला लागली आज, म्हणून आम्ही आश्चर्य व्यक्त करत बोलत होतो. तोच आमच्या ऑफिसच्या शिपायाने आसिफची अम्मी शेवटच्या घटका मोजत असल्याची खबर आम्हाला दिली. संध्याकाळी आमच्यापैकी काही जण त्याला भेटायला म्हणून त्याच्या घरी गेले. घरी त्याच्या बायकोने आमचं स्वागत केलं आणि आम्ही त्याला भेटायला आत गेलो.

" आप लोग आए, शुक्रिया. लगा नाही था आप मेरे घर कभी आएंगे..."

" अरे अम्मी कशी आहे?"

" खूप नाही जगणार...डॉक्टर म्हणाले फार तर एक महिना काढेल. मागची बारा वर्षं कॅन्सरमुळे रोज थोडी थोडी मृत्यूजवळ जात्ये..." आम्हाला त्याच्या त्या परिस्थितीचं मनापासून वाईट वाटलं.

" पाकिस्तानात कोणी नाही माझं...अम्मीला इथे आणलं. तिचा सगळं खर्च आणि बाकीच्या कुटुंबाचा खर्च...नाही परवडत. एक दिवस जरी नोकरी नसेल किंवा एक महिना जरी पगार नाही आला तर घरात हलकल्लोळ होईल. दोन मुलं आहेत...त्यांची शाळेची फी, अम्मीची औषधं...काय करणार?"

" ठीक आहे रे...मदत लागली तर सांग. "

" मदत नको काही...अल्लाह आहे ना मदतीला. फक्त माझ्याबद्दल तुमचा गैरसमज आहे ना, तो दूर करा. मला नोकरी जायची भीती आहे ना, म्हणून मी शक्य तितकं साहेब लोकांना खुश ठेवायचा प्रयत्न करतो. मला माहित आहे ऑफिसमध्ये सगळे लोक माझ्याबद्दल काय बोलतात...अम्मी समोर आहे, खोटं नाही बोलणार मी."

नोकरी जाऊ नये म्हणून या माणसाने नको तो मार्ग धरला आणि त्यात तो किती गुरफटत गेला हे समजल्यामुळे आम्ही काही क्षण निःशब्द झालो.

" आसिफ, पण हे करून तुला वाटतं की तुझी नोकरी टिकेल?"

" माहित नाही...पण अजून तरी टिकलीय ना. "

त्या दिवशी त्याच्या घरातून बाहेर पडताना आम्हाला मानवी स्वभावाचा हा एक अनोखा कंगोरा समजला. असुरक्षिततेची भावना आणि जबाबदारीचं ओझं एकत्र पेलताना आसिफने भलतीच वाट धरल्याचं चित्र सगळ्यांच्या डोळ्यासमोर स्पष्ट होतं गेलं. अचानक सगळ्यांनी यथेच्छ शिव्या घातलेला हा माणूस आम्हाला केविलवाणा वाटायला लागला. त्याला काही समजावणं शक्य नव्हतच, कारण इतक्या वर्षात त्याने स्वतःला तशा पद्धतीने 'घडवलं' होतं.

पुढच्या दोन आठवड्यात त्याची अम्मी गेली. दहा-पंधरा दिवसांनी सुटीनंतर तो परत ऑफिसमध्ये रुजू झाला तेव्हा त्याच्या कोमेजलेल्या चेहेऱ्याची दया यायला लागली होती. कदाचित 'इतकं करूनही अम्मी गेली' अशी भावना त्याला डाचत होती. अचानक त्याचा फोन वाजला, पलीकडून साहेबांनी 'गाभाऱ्यात' यायचं फर्मान सोडलं.

आसिफ त्याचं जुन्या सवयीप्रमाणे उठला, हातात आवश्यक ती कागदपत्र त्याने उचलली आणि खालमानेने हळू हळू साहेबांच्या केबिनकडे निघाला. त्याच्या वागण्यात आणि देहबोलीत काहीही बदल नव्हता. बदल होताच तर त्याच्या चेहेऱ्यावर. आधी आजूबाजूला काय चालू आहे याचा कानोसा घेणारा 'लोचट' चेहरा आता मात्र निर्विकार होता!

प्रांत/गाव: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

गोष्ट फुलवून सांगायचे कौशल्य तुमच्या लेखणीत आहे.

रेखाटनातून व्यक्तीचित्रे डोळ्यासमोर उभी होतात.

पुढील लेखनास शुभेच्छा.

छान.
बहुतेक कार्यालयात असे नंदी पहायला मिळतातच व प्रथम त्यांच्याबद्दल संताप वाटला तरी नंतर सहानुभूतीच अधिक वाटते. पण असे नंदी कार्यालयातलया बर्याच ' शंकरा'ना हवेच असतात, हें खरं तर अधिक संतापजनक असावं.