आजारांच्या जागतिक साथी : दृष्टिक्षेप

Submitted by कुमार१ on 12 March, 2020 - 05:47

नुकतेच जागतिक आरोग्य संघटनेने ‘करोना’ विषाणूच्या आजाराची जागतिक साथ आल्याचे जाहीर केले आहे. ती साथ आटोक्यात राहावी म्हणून आपण सर्वजण योग्य ते प्रयत्न करीतच आहोत. आजाराच्या एखाद्या जागतिक साथीमुळे संपूर्ण जनजीवन ढवळून निघते. तसेच त्याचे अर्थकारण आणि समाजकारणावर गंभीर परिणाम होतात.
या निमिताने जागतिक साथींच्या इतिहासात डोकावत आहे. त्याची थोडक्यात माहिती देतो. त्यासाठी ठराविक कालमर्यादा निश्चित करूयात. इ.स. १३०० ते २०१२ या कालावधीतील साथींचा हा आढावा आहे.
.......

१. इ.स. १३४६ -५३
प्लेग अर्थात काळ्या मृत्यूची महासाथ

हा आजार Yersinia pestis या जीवाणूमुळे होतो. हा जीवाणू निसर्गतः उंदीर आणि तत्सम प्राण्यांत आढळतो. उंदरांना विशिष्ट पिसवा चावत असतात आणि त्याच या रोगाच्या प्रसाराला कारणीभूत ठरतात. मुळात अशी रोगट पिसू उंदीर आणि माणूस या दोघानाही चावते. या मानवी आजारात शरीरातील लिम्फग्रंथी मोठाल्या सुजतात, त्यांच्यात रक्तस्त्राव होतो आणि मग त्या मरतात. पुढे संपूर्ण शरीरात विषबाधा होते, अंगावर काळेनिळे चट्टे पडतात आणि अखेर रुग्ण दगावतो.

या साथीचा उगम आशियात झाला आणि मग ती फैलावली. त्याकाळी जागतिक दळणवळण आणि व्यापार समुद्रमार्गे असायचे. त्यामुळे विविध जहाजे आणि बंदरांवर उंदीर आणि त्यांना चावणाऱ्या पिसवा खूप पैदा होत. तसेच बंदराच्या मर्यादित जागेत मानवी समूह दाटीवाटीने वावरत. हे घटक या जागतिक साथीस कारणीभूत ठरले. या महासाथीत सुमारे १५ कोटी माणसे मृत्यू पावली.

२. इ.स. १८५२- ६०
कॉलराची महासाथ
हा आजार Vibrio cholerae या जिवाणूमुळे होतो आणि त्याचा प्रसार दूषित पाण्यातून होतो. हा आजार झालेल्या माणसाच्या विष्ठेतून हे जंतू समाजात पसरतात. घनदाट लोकसंख्या, सांडपाण्याची गलीच्छ व्यवस्था, दुष्काळी व युद्धकालीन परिस्थिती या सर्वांच्या एकत्रित परिणामातून ही महासाथ फैलावली. कॉलरा झालेल्या रुग्णास प्रचंड जुलाब होऊन त्याच्या शरीरातील पाणी संपुष्टात येते. परिणामी मृत्यू होऊ शकतो. आतापर्यंत जगात या आजाराच्या ६ मोठ्या साथी येऊन गेलेल्या आहेत. त्यापैकी ही तिसरी साथ होती. तिचा उगम भारतात गंगा नदीच्या पट्ट्यात झाला. या साथीत सुमारे १० लाख लोक मरण पावले.

३. इ.स. १८८९-९०
फ्लूची महासाथ

या आजाराचे पूर्ण नाव ‘इन्फ्लूएन्झा’ असे आहे. तो एका विषाणूमुळे होतो आणि त्या विषाणूचे बरेच प्रकार असतात. ही साथ ‘‘इन्फ्लूएन्झा’-ए (H3N8) या प्रकारामुळे आली होती. या आजारात सुरवातीस ताप, सर्दी, खोकला ही लक्षणे दिसतात. पण आजार बळावला की श्वसन, हृदयक्रिया, मेंदूकार्य आणि स्नायू या सर्वांवर गंभीर परिणाम होतात.
या साथीचा उगम आशियात झाला असा समज होता. परंतु, संशोधनानंतर वेगळी माहिती मिळाली. या आजाराची सुरवात जगात एकदम ३ ठिकाणी झाली – तुर्कस्तान, कॅनडा आणि ग्रीनलंड. या सुमारास जगभरात शहरे लोकसंख्येने फुगू लागली होती. त्यामुळे या आजाराचा फैलाव वेगाने झाला. या साथीत सुमारे १० लाख लोक मरण पावले.

४. इ.स. १९१०-११
कॉलराची महासाथ

हिचा उगम भारतात झाला आणि पुढे ती फैलावली. एव्हाना आरोग्यसुविधांमध्ये बरीच सुधारणा झालेली होती. त्यामुळे ही साथ तशी लवकर आटोक्यात आली. यावेळी सुमारे १ लाख लोक दगावले.

५. इ.स. १९१८
फ्लूची महासाथ

पुन्हा एकदा ‘इन्फ्लूएन्झा’ विषाणूने जगभर धुमाकूळ घातला. याखेपेस जगातील सुमारे १/३ लोक याने बाधित झाले होते. त्यापैकी सुमारे १५% मृत्युमुखी पडले. या साथीचे एक वैशिष्ट्य दखलपात्र आहे. यापूर्वी अशा साथींत बहुतांश लहान मुले, वृद्ध आणि दुबळे लोक आजारास बळी पडत. पण यावेळेस पूर्ण उलटे चित्र दिसून आले. बहुसंख्य रुग्ण हे तरुण आणि धडधाकट असे होते.

६. इ.स. १९५६-५८
आशियाई फ्लूची महासाथ
ही साथ ‘इन्फ्लूएन्झा’-ए (H2N2) मुळे आली. तिचा उगम चीनमध्ये झाला. मृत्यूसंख्या सुमारे २० लाख.

७. १९५८
हाँगकाँग फ्लूची साथ

ही साथ ‘इन्फ्लूएन्झा’-ए (H3N2) मुळे आली. तशी ती लवकर आटोक्यात आली. तरीसुद्धा त्यात १० लाख लोक मरण पावले. त्यापैकी निम्मे लोक हे हाँगकाँगचे रहिवासी होते.

आतापर्यंतच्या फ्लूच्या ४ साथी पाहता एक लक्षात येईल. ‘इन्फ्लूएन्झा’ या विषाणूचे विविध उपप्रकार हे आजार घडवत असतात. साधारणपणे एखाद्या साथीदरम्यान नवीन औषधे आणि लसींचा शोध लागतो. त्यातून विषाणूच्या एका प्रकाराचा मुकाबला करता येतो. आता माणसाला वाटते की आपण त्या जन्तूवर विजय मिळवला. पण तसे नसते. जंतू पण हुशार असतात ! ते उत्क्रांत होतात आणि त्यांची नवी प्रजाती आपल्या पूर्वीच्या औषधांना पुरून उरते.

८. २००५- २०१२
एड्सची महासाथ

हा आजार HIV या विषाणूने होतो. त्याचा प्रथम शोध १९७६मध्ये आफ्रिकेतील कोंगोमध्ये लागला. १९८१ पासून त्याचा वेगाने जागतिक फैलाव झाला. वरील काळात ही साथ उच्चतम बिंदूवर होती. आजपर्यंत या आजाराने ३.६ कोटी लोक मृत्यू पावले आहेत.

आजच्या घडीला या आजारावरील अत्यंत प्रभावी औषधे उपचारांसाठी उपलब्ध आहेत. त्या जोडीला अशा रुग्णांचे सामाजिक पुनर्वसन करण्यासाठी राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय पातळींवर अनेक समाजसेवी संस्था कार्यरत आहेत. त्यामुळे हा आजार आटोक्यात येत आहे. १९८०- ९० च्या दरम्यान एखाद्याला एड्स झाला म्हणजे “आता सगळे संपले, तो खात्रीने मरणार” अशी काहीशी परिस्थिती होती. आज त्याचे उपचार व प्रतिबंध यावर भरपूर लक्ष दिल्याने परिस्थिती नक्कीच सुधारली आहे. योग्य उपचार घेतल्यास अशा रुग्णांचा जगण्याचा कालावधी बराच वाढलेला आहे. थोडक्यात, ‘नियंत्रणात ठेवता येणारा आजार’ असे एड्सचे आजचे स्वरूप आहे.

वरील जागतिक साथींच्यानंतर काही काळ ‘एबोला’ या विषाणूने धुमाकूळ घातला होता. पण आज तरी तो आजार पश्चिम आफ्रिकेपुरता मर्यादित झाला आहे.
...........

आणि लोकहो,
सध्या चालू असलेली ‘करोना’ची जागतिक साथ आपण अनुभवत आहोत. प्रगत वैद्यकीय संशोधन आणि सुविधांमुळे आपण आता ही साथ लवकर आटोक्यात आणू शकू असे वाटते. या साथीसंबंधी विपुल लेखन या संस्थळासह अनेक माध्यमांतून झालेले आहे. म्हणून पुनरुक्ती टाळतो.

या साथीत ....
जे मरण पावले आहेत, त्यांना आदरांजली,

जे आजारी आहेत, त्यांना लवकर बरे होण्यासाठी सदिच्छा,

आणि
ही जागतिक साथ लवकरात लवकर संपुष्टात येईल या आशेसह समारोप करतो.
**********************************************

विषय: 
शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

आपले लेखन नेहमीच माहितीपूर्ण आणि संयत असते. आपणास आपल्या कक्षेबाहेरची माहिती विचारली गेल्यास आपण " शोधून नंतर प्रतिसाद देतो " असे विनयपूर्वक सांगता. आपल्या लेखनातून कोणताही अजेंडा डोकावत नाही. डोकावते ते केवळ समोरच्याचे हितचिंतन. मोजक्या शब्दांत समर्पक उत्तर देण्याचे आपले कौशल्यही आवडते.
आपल्या प्रत्येक लेखावर जरी प्रतिसाद लिहिलेला नसला नाही तरी आपले सर्व लेखन वाचले आहे आणि ते नेहमीच आनंददायी आणि माहितीत भर घालणारे असते.
असेच लिहीत राहावे.>>>>>>+११११११११११

हीरा, एस व ऋतुराज
धन्यवाद.

तुमच्यासारख्या अभ्यासू व विचारी सभासदांच्या प्रतिसादामुळेच लेखनाचा उत्साह टिकून राहतो.
तुमच्या शुभेच्छांच्या बळावरच लेखन करीत राहीन.
लोभ असावा.

हीरा यांच्या प्रतिसादाशी पूर्णपणे सहमत. >> +७८६

औषधे खपावीत म्हणून साथी निर्माण केल्या जातात ?
ही पहा गिरीश कुबेरांची मुलाखत :
https://www.youtube.com/watch?v=KXQxh5wfvJY&feature=youtu.be

इतर साथींमधे यावेळी जेवढे निर्बंध आहेत तेवढे नव्हते.किमान आपल्या आयुष्याच्या टप्प्यात आपल्या वाटेला आले नाहीत.

१९१८च्या फ्लूच्या महासाथीत अमेरिकेत विलगीकरण केलेल्या व्यक्तीच्या घरावर असे पांढरे कापड गुंडाळीत. बाहेरून ते पाहिले की त्या घरात कुणी जात नसे.

1918 flu.jpg

(सौजन्य : STAT न्यूज )

गैरसमज नको

हन्ताविषाणू हा एकदम नवीन नाही.

तो १९८०मध्ये उंदरांमध्ये सापडला होता.
१९९३मध्ये अमेरिकेच्या दक्षिण-पश्चिम भागांत त्याचा उद्रेक झाला होता.

कोविद च्या पार्श्वभूमीवर आज सहज २ शब्दांची उजळणी केली.
१. Infectious
२. Contagious

इंग्रजी वृत्तमाध्यमांत हे दोन्ही शब्द ‘सारखेच’ म्हणून वापरले जाऊ शकतात.

पण तसे नाही.

जे Infectious आजार व्यक्तींच्या संपर्कातून पसरतात, त्यांनाच फक्त Contagious म्हटले जाते.

कोविद तसा आहे, हे आपण जाणतोच.

डाॅ. एखादी साथ गेली हे कसे ठरवतात. उदा. ह्या आत्ताच्या साथीत वाहक रुग्ण असणारच. ही परीस्थिती साधारण कधी संपते.
धन्यवाद

michto,

प्रश्न चांगला आहे. आधी सध्याचा रोग बाजूला ठेऊन त्याचे उत्तर देतो.

१. काही प्रस्थापित आजार एखाद्या समाजात अल्प प्रमाणात नेहमी आढळतात (endemic).
२. हे प्रमाण प्रचंड वाढले की आपण त्याला साथ म्हणतो.

३. जेव्हा साथीतल्या रुग्णांचे प्रमाण कमी होत होत endemic पातळीवर येते, तेव्हा साथ संपली असे म्हणतात.
.......................................
कोविद १९ पूर्ण नवा आजार असल्याने त्याबाबतची उत्तरे आताच देता येणार नाहीत.

विषाणूजन्य आजारांच्या विरोधात लशी तयार करताना संबंधित विषाणूंचा वापर केला जातो. त्यातून काही वेळेस सुरक्षिततेचे प्रश्न निर्माण होतात. यावर एक तोडगा म्हणून लस तयार करताना वनस्पतींचा वापर करता येतो.

सध्या या प्रकारचे नवे संशोधन इन्फ्लुएंझा विरोधी लस तयार करण्यासाठी वापरले जात आहे. यामध्ये एखाद्या वनस्पतीला जनुकीय सूचना दिल्या जातात. त्यामुळे तिच्यात संबंधित विषाणूची प्रथिने तयार होतात. मग ती वेगळी काढून त्यापासून लस तयार केली जाते.

मानवी सुरक्षितता आणि मोठ्या प्रमाणावर सुलभ उत्पादन हे या प्रकाराचे फायदे आहेत.
भविष्यात या संशोधनाची प्रगती पाहणे रोचक ठरेल.

जगातील बहुसंख्य देशांमध्ये पोलिओचे निर्मूलन झालेले आहे. परंतु अफगाणिस्तान आणि पाकिस्तानात मात्र हा आजार अजूनही बऱ्यापैकी अस्तित्वात आहे. नुकताच तो मलावी या देशात पोचल्याचे दिसले. तेथील एका तीन वर्षांच्या मुलीला पोलिओ झाला आहे. तेथील सरकारने पोलिओचा प्रसार (आउटब्रेक) होत असल्याचे जाहीर केले आहे.

याव्यतिरिक्त दक्षिण अमेरिकेतील काही देशांमध्येही पोलिओचा धोका संभवतो.
(https://www.afro.who.int/news/malawi-declares-polio-outbreak)

गेल्या तीन आठवड्यांपासून जगभरात अचानक मंकीपॉक्स या संसर्गजन्य आजाराचे रुग्ण आढळू लागले आहेत. आजमितीस जगभरात मिळून असे 38 रुग्ण सापडले आहेत. ते मुख्यतः युरोप आणि उत्तर अमेरिकेत आढळले आहेत. या आजारात अशी इजा होते:

29599.jpg

जागतिक आरोग्य संघटनेने या आजारासंदर्भात महत्त्वाची बैठक बोलावली आहे.

मंकीपॉक्स
उंदीर, ससा, खार आणि माकड या प्राण्यांमधून हा आजार माणसात संक्रमित होतो. ज्या लोकांचा हे प्राणी पकडणे, त्यांची कत्तल करणे व त्यांचे मांस हाताळणे यांच्याशी संपर्क होतो त्यातून हा विषाणू माणसात येतो.

या आजाराचा मूळ उगम आफ्रिका खंडातून झालेला आहे

या आजाराचा विषाणू देवीरोगाच्या गटातला आहे. आफ्रिकेतील मुलांमध्ये मृत्युदर 1ते 10 टक्क्यांपर्यंत राहिलेला होता.

मध्य आफ्रिकेतून उगम पावलेला विषाणू तीव्र स्वरूपाचा आहे मात्र पश्चिम आफ्रिकेतून आलेला तुलनेने सौम्य आहे.

जर आजारात कुठलीही गुंतागुंत निर्माण झाली नाही तर चार आठवड्यांमध्ये बरा होतो. मात्र वण राहू शकतात.
गुंतागुंत झाल्यास श्वसनसंस्थेवर परिणाम आणि अंधत्व अशा गोष्टी पूर्वी घडलेल्या आहेत.

WHO, CDC वर मंकीपॉक्स transmission बद्दलची माहिती मिळते.

https://www.cdc.gov/poxvirus/monkeypox/transmission.html
https://www.who.int/news-room/fact-sheets/detail/monkeypox

सर्वत्र शरिभर फोड असलेले फोटो त्रासदायक आहेत. Sad लोक आताच कोरोना मधून सावरत आहेत पण घाबरण्यात/ इतरांनाही घाबरवून देण्यात अर्थ नाही. वरिल दोन्ही लिंक मधे Transmission कशामुळे होते हे वाचा.
" Animal-to-human (zoonotic) transmission can occur from direct contact with the blood, bodily fluids, or cutaneous or mucosal lesions of infected animals. "

"Other human-to-human methods of transmission include direct contact with body fluids or lesion material, and indirect contact with lesion material, such as through contaminated clothing or linens. "

चुकीची माहिती :
मंकीपॉक्सवर आतापर्यंत कोणतेही उपचार उपलब्ध नाहीत.
https://www.loksatta.com/mumbai/no-monkey-pox-cases-found-in-mumbai-but-...

वास्तव :
tecovirimat या पॉक्सविषाणू विरोधी औषधाला अमेरीकी व युरोपीय औषध प्रशासनाने मान्यता दिलेली आहे. सध्या त्याचा पुरवठा सरकारी नियंत्रणात आहे.
https://www.who.int/news-room/fact-sheets/detail/monkeypox

संगणकीय संवाद माध्यमांतून मंकीपॉक्सबद्दल काही विधाने केली जात आहेत. हा धागा आरोग्य विभागातील असल्याने फक्त वैद्यकीय विधानांची दखल घेतो.

वाचण्यात आलेली काही बेजबाबदार विधाने आणि त्यांचे सत्य स्पष्टीकरण असे आहे :
१. एक महासाथ संपत नाही तर अचानक कसा उपटला हा नवा आजार ? इत्यादी

-हा आजार अजिबात नवा नाही. 1970 पासून तो अस्तित्वात आहे. फक्त तो आफ्रिकेतील अकरा देशांमध्ये मर्यादीत होता.
जसजसे त्या देशातील लोक वाढत्या प्रमाणात आंतरराष्ट्रीय प्रवास करू लागले तसा तो आजार अन्यत्रही पसरला.
2003 मध्ये अमेरिकेत या आजाराचे सुमारे 70 रुग्ण आढळले होते.
2018 -19 मध्ये इंग्लंड, सिंगापूर आणि अन्य काही देशांमध्येही त्या आजाराचा प्रसार झाला. नुकताच झालेला प्रसार सर्वांसमोर आहेच.

२. कसला आलाय मंकीपॉक्स ? या तर साध्या कांजिण्या आहेत, इत्यादी.
त्वचेवर लालसर पुरळ उठणे हे लक्षण अंदाजे पन्नासेक आजारांमध्ये दिसून येते. परंतु डॉक्टर रोगनिदान करताना फक्त पुरळ पाहत नाहीत, तर त्याच्या जोडीने आजूबाजूच्या भागातील लिंफग्रंथी, त्वचेवरील संवेदना, श्वसन मार्गाची तपासणी हे सर्व पाहतात. त्यानंतर योग्य त्या तपासण्या करून रोगनिदान होते.

वैद्यकातील अज्ञान किंवा अर्धवट माहिती असणारे लोक दोन भिन्न आजारांच्या पुरळांचे फोटो शेजारी डकवून काहीही विधाने करतात ती बेजबाबदार आहेत.

वैद्यकीय स्पष्टीकरणाबद्दल धन्यवाद.
तरीही, एवढी कमी प्रसरण संख्या असताना, त्याचा वापर लॉकडाऊन लावण्यासाठी व अर्ध-शास्त्रीय माहिती (पन्नास रोगांमधले पुरळ हे लक्षण) वापरुन भिती याचा गैरवापर हे दर ३० तासाला श्रीमंत होणारे लोक किंवा काही देश घेत आहेत का याबद्दल साशंकता कायम राहते.

Faheem Younus, MD
@FaheemYounus
·
1m
Monkeypox cases are concerning but the risk of this becoming a COVID like pandemic is ZERO%

Why? This virus:

- is NOT novel…
- is typically not deadly
- is less contagious than COVID
- has been around for 5 decades
- is prevented by smallpox vaccine

Stay calm folks:)
आफ्रिकेत देवीची लस देत नाहीत का?

देवीची लस आणि पॉक्सचा प्रतिबंध याबद्दल एक मुद्दा स्पष्ट करतो.
ही लस सार्वत्रिक देणे 40 वर्षांपूर्वीच बंद झालेले आहे. आता ती फक्त विशेष धोका असलेल्या गटांसाठी तयार केली जाते आणि दिली जाते.
अमेरिकेच्या सी डी सी नुसार ही लस घेतल्यानंतर पुढे तीन वर्षाच्या कालावधीसाठी मंकीपॉक्सपासून 85 टक्के संरक्षण मिळते.

आफ्रिकेमध्ये अशी विशेष गटांची काळजी कदाचित घेतली जात नसावी.

Pages