आजारांच्या जागतिक साथी : दृष्टिक्षेप

Submitted by कुमार१ on 12 March, 2020 - 05:47

नुकतेच जागतिक आरोग्य संघटनेने ‘करोना’ विषाणूच्या आजाराची जागतिक साथ आल्याचे जाहीर केले आहे. ती साथ आटोक्यात राहावी म्हणून आपण सर्वजण योग्य ते प्रयत्न करीतच आहोत. आजाराच्या एखाद्या जागतिक साथीमुळे संपूर्ण जनजीवन ढवळून निघते. तसेच त्याचे अर्थकारण आणि समाजकारणावर गंभीर परिणाम होतात.
या निमिताने जागतिक साथींच्या इतिहासात डोकावत आहे. त्याची थोडक्यात माहिती देतो. त्यासाठी ठराविक कालमर्यादा निश्चित करूयात. इ.स. १३०० ते २०१२ या कालावधीतील साथींचा हा आढावा आहे.
.......

१. इ.स. १३४६ -५३
प्लेग अर्थात काळ्या मृत्यूची महासाथ

हा आजार Yersinia pestis या जीवाणूमुळे होतो. हा जीवाणू निसर्गतः उंदीर आणि तत्सम प्राण्यांत आढळतो. उंदरांना विशिष्ट पिसवा चावत असतात आणि त्याच या रोगाच्या प्रसाराला कारणीभूत ठरतात. मुळात अशी रोगट पिसू उंदीर आणि माणूस या दोघानाही चावते. या मानवी आजारात शरीरातील लिम्फग्रंथी मोठाल्या सुजतात, त्यांच्यात रक्तस्त्राव होतो आणि मग त्या मरतात. पुढे संपूर्ण शरीरात विषबाधा होते, अंगावर काळेनिळे चट्टे पडतात आणि अखेर रुग्ण दगावतो.

या साथीचा उगम आशियात झाला आणि मग ती फैलावली. त्याकाळी जागतिक दळणवळण आणि व्यापार समुद्रमार्गे असायचे. त्यामुळे विविध जहाजे आणि बंदरांवर उंदीर आणि त्यांना चावणाऱ्या पिसवा खूप पैदा होत. तसेच बंदराच्या मर्यादित जागेत मानवी समूह दाटीवाटीने वावरत. हे घटक या जागतिक साथीस कारणीभूत ठरले. या महासाथीत सुमारे १५ कोटी माणसे मृत्यू पावली.

२. इ.स. १८५२- ६०
कॉलराची महासाथ
हा आजार Vibrio cholerae या जिवाणूमुळे होतो आणि त्याचा प्रसार दूषित पाण्यातून होतो. हा आजार झालेल्या माणसाच्या विष्ठेतून हे जंतू समाजात पसरतात. घनदाट लोकसंख्या, सांडपाण्याची गलीच्छ व्यवस्था, दुष्काळी व युद्धकालीन परिस्थिती या सर्वांच्या एकत्रित परिणामातून ही महासाथ फैलावली. कॉलरा झालेल्या रुग्णास प्रचंड जुलाब होऊन त्याच्या शरीरातील पाणी संपुष्टात येते. परिणामी मृत्यू होऊ शकतो. आतापर्यंत जगात या आजाराच्या ६ मोठ्या साथी येऊन गेलेल्या आहेत. त्यापैकी ही तिसरी साथ होती. तिचा उगम भारतात गंगा नदीच्या पट्ट्यात झाला. या साथीत सुमारे १० लाख लोक मरण पावले.

३. इ.स. १८८९-९०
फ्लूची महासाथ

या आजाराचे पूर्ण नाव ‘इन्फ्लूएन्झा’ असे आहे. तो एका विषाणूमुळे होतो आणि त्या विषाणूचे बरेच प्रकार असतात. ही साथ ‘‘इन्फ्लूएन्झा’-ए (H3N8) या प्रकारामुळे आली होती. या आजारात सुरवातीस ताप, सर्दी, खोकला ही लक्षणे दिसतात. पण आजार बळावला की श्वसन, हृदयक्रिया, मेंदूकार्य आणि स्नायू या सर्वांवर गंभीर परिणाम होतात.
या साथीचा उगम आशियात झाला असा समज होता. परंतु, संशोधनानंतर वेगळी माहिती मिळाली. या आजाराची सुरवात जगात एकदम ३ ठिकाणी झाली – तुर्कस्तान, कॅनडा आणि ग्रीनलंड. या सुमारास जगभरात शहरे लोकसंख्येने फुगू लागली होती. त्यामुळे या आजाराचा फैलाव वेगाने झाला. या साथीत सुमारे १० लाख लोक मरण पावले.

४. इ.स. १९१०-११
कॉलराची महासाथ

हिचा उगम भारतात झाला आणि पुढे ती फैलावली. एव्हाना आरोग्यसुविधांमध्ये बरीच सुधारणा झालेली होती. त्यामुळे ही साथ तशी लवकर आटोक्यात आली. यावेळी सुमारे १ लाख लोक दगावले.

५. इ.स. १९१८
फ्लूची महासाथ

पुन्हा एकदा ‘इन्फ्लूएन्झा’ विषाणूने जगभर धुमाकूळ घातला. याखेपेस जगातील सुमारे १/३ लोक याने बाधित झाले होते. त्यापैकी सुमारे १५% मृत्युमुखी पडले. या साथीचे एक वैशिष्ट्य दखलपात्र आहे. यापूर्वी अशा साथींत बहुतांश लहान मुले, वृद्ध आणि दुबळे लोक आजारास बळी पडत. पण यावेळेस पूर्ण उलटे चित्र दिसून आले. बहुसंख्य रुग्ण हे तरुण आणि धडधाकट असे होते.

६. इ.स. १९५६-५८
आशियाई फ्लूची महासाथ
ही साथ ‘इन्फ्लूएन्झा’-ए (H2N2) मुळे आली. तिचा उगम चीनमध्ये झाला. मृत्यूसंख्या सुमारे २० लाख.

७. १९५८
हाँगकाँग फ्लूची साथ

ही साथ ‘इन्फ्लूएन्झा’-ए (H3N2) मुळे आली. तशी ती लवकर आटोक्यात आली. तरीसुद्धा त्यात १० लाख लोक मरण पावले. त्यापैकी निम्मे लोक हे हाँगकाँगचे रहिवासी होते.

आतापर्यंतच्या फ्लूच्या ४ साथी पाहता एक लक्षात येईल. ‘इन्फ्लूएन्झा’ या विषाणूचे विविध उपप्रकार हे आजार घडवत असतात. साधारणपणे एखाद्या साथीदरम्यान नवीन औषधे आणि लसींचा शोध लागतो. त्यातून विषाणूच्या एका प्रकाराचा मुकाबला करता येतो. आता माणसाला वाटते की आपण त्या जन्तूवर विजय मिळवला. पण तसे नसते. जंतू पण हुशार असतात ! ते उत्क्रांत होतात आणि त्यांची नवी प्रजाती आपल्या पूर्वीच्या औषधांना पुरून उरते.

८. २००५- २०१२
एड्सची महासाथ

हा आजार HIV या विषाणूने होतो. त्याचा प्रथम शोध १९७६मध्ये आफ्रिकेतील कोंगोमध्ये लागला. १९८१ पासून त्याचा वेगाने जागतिक फैलाव झाला. वरील काळात ही साथ उच्चतम बिंदूवर होती. आजपर्यंत या आजाराने ३.६ कोटी लोक मृत्यू पावले आहेत.

आजच्या घडीला या आजारावरील अत्यंत प्रभावी औषधे उपचारांसाठी उपलब्ध आहेत. त्या जोडीला अशा रुग्णांचे सामाजिक पुनर्वसन करण्यासाठी राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय पातळींवर अनेक समाजसेवी संस्था कार्यरत आहेत. त्यामुळे हा आजार आटोक्यात येत आहे. १९८०- ९० च्या दरम्यान एखाद्याला एड्स झाला म्हणजे “आता सगळे संपले, तो खात्रीने मरणार” अशी काहीशी परिस्थिती होती. आज त्याचे उपचार व प्रतिबंध यावर भरपूर लक्ष दिल्याने परिस्थिती नक्कीच सुधारली आहे. योग्य उपचार घेतल्यास अशा रुग्णांचा जगण्याचा कालावधी बराच वाढलेला आहे. थोडक्यात, ‘नियंत्रणात ठेवता येणारा आजार’ असे एड्सचे आजचे स्वरूप आहे.

वरील जागतिक साथींच्यानंतर काही काळ ‘एबोला’ या विषाणूने धुमाकूळ घातला होता. पण आज तरी तो आजार पश्चिम आफ्रिकेपुरता मर्यादित झाला आहे.
...........

आणि लोकहो,
सध्या चालू असलेली ‘करोना’ची जागतिक साथ आपण अनुभवत आहोत. प्रगत वैद्यकीय संशोधन आणि सुविधांमुळे आपण आता ही साथ लवकर आटोक्यात आणू शकू असे वाटते. या साथीसंबंधी विपुल लेखन या संस्थळासह अनेक माध्यमांतून झालेले आहे. म्हणून पुनरुक्ती टाळतो.

या साथीत ....
जे मरण पावले आहेत, त्यांना आदरांजली,

जे आजारी आहेत, त्यांना लवकर बरे होण्यासाठी सदिच्छा,

आणि
ही जागतिक साथ लवकरात लवकर संपुष्टात येईल या आशेसह समारोप करतो.
**********************************************

विषय: 
शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

प प , धन्यवाद.

१८९८ >>> बरोबर.
तेव्हाची एक "बॉम्बे प्लेग साथ" या नावाने ओळखली जाते.

बरोबर.
एक लक्षात घ्यावे.
हा लेख 'जागतिक' साथीवर आहे.
एखाद्या देशांतर्गत साथी तशा बऱ्याच असतात.

छान माहिती.

>>>>ही जागतिक साथ लवकरात लवकर संपुष्टात येईल या आशेसह >>>
+१११

डॉक्टर एक विचारायचं होते
आमच्या ऑफिस मध्ये प्रवेश करताना रोज लेझर किरणांचा वापर करून शरीराचे तापमान मोजले जाते .
ते धोकादायक तर नाही ना ?
माझे रोज २९/३० chya darmyan ch aste.
३७ degree chya var asel tar karan तपासावे लागेल असे सांगितलं आहे.

@Sanjay111 - मी डॉक्टर नाही परंतु निरोगी माणसाचे शारीरिक तापमान ३६.१ ते ३७.२ डिग्री सेल्सिअस दरम्यान असल्यास सामान्य मानले जाते...तेच जर ३८ डिग्री सेल्सिअसच्या वर असेल तर काही कारणास्तव (जंतुसंसर्ग / आजार) ताप आला आहे असे समजले जाते

सर्व नवीन प्रतिसादकांचे आभार !

संजय,
माझे रोज २९/३० chya darmyan ch aste. >>> हे नाही पटले. मित्रांचे बरोबर आहे.

लेसरचा मला अनुभव नाही. संदर्भ शोधून पाहीन.

संजय तापमान वाढू नये यासाठी भरपूर बर्फ खात असेल. एवढं कमी शरिराचे तपमान झाले तर मग ॐ फट् स्वाहा!

लेसर किरणे जोवर थेट डोळ्यात पडत नाहीत तोवर त्याचा फारसा परिणाम होत नाही.

भौतिकशास्त्राचा अभ्यास केलेल्या लोकांना हे माहिती आहेच कि डोळ्यांनीं दिसणारा प्रकाश हा असंख्य वारंवारता FREQUENCY ( किंवा तरंगलांबींचा WAVELENGTH) असतो. लेसर मध्ये हाच प्रकाश एकाच तरंगलांबींचा (MONOCHROMATIC) आणि एकसंगतीचा/ एकसारखा (COHERENT) असतो. त्यामुळे तो फारसा विचलित न होता आणि उर्जेचा फारसा र्हास न होता प्रवास करतो. यामुळे त्यात ऊर्जा एकवटलेली राहते.

मुळात तापमान मोजण्यासाठी असलेला लेसर हा इन्फ्रा रेड म्हंणजे अतिरक्त श्रेणीतील असल्यामुळे त्याची ऊर्जा दृश्य प्रकाशापेक्षा कमी असते. आणि तो अगदी कमी वेळेपुरता चालू असतो त्यामुळे या लेसरचा शरीरावर परिणाम होत नाही.

ऊच्च शक्तीचे लेसर ज्यात दृश्य प्रकाशापेक्षा मायक्रोवेव्ह किंवा एक्स रे वापरले जातात त्यांची ऊर्जा जास्त असते.

सुबोध,
चांगली माहिती
धन्यवाद !

धन्यवाद
Dr Kumar,dr khare aani Mitra
शंका समाधान झाले.

सिमंतीनी,

देवी आणि पोलियोची साथ 'महासाथ' नव्हती का? >>>

छान आणि अपेक्षित प्रश्न.
१. पोलिओची नव्हती. ठराविक देशापुरती / खंडापुरती मर्यादित असल्यास “जागतिक’ असे अधिकृत जाहीर होत नाही.

२. ‘देवी’ हा आजार जवळपास १२,००० वर्षे टिकून होता. त्याचे अस्तित्व जाणवले त्याकाळात वैद्यकीय नोंदी देखील होत नसत. जागतिक आरोग्य संघटनाही त्याकाळी नव्हती. अजून एक. फार पूर्वी ‘संपूर्ण जग’ देखील पृथ्वीवासियांना माहित नव्हते. लोकांचे स्थलांतर मर्यादित होते. म्हणून देवीच्या अनेक साथी येऊन गेल्या पण ‘महासाथ’ असे शिकामोर्तब झाले नाही.

हा काहीसा वादग्रस्त मुद्दा आहे.

आजाराच्या साथीबद्दल मला काही प्रश्न व्य. संपर्कातून आलेत. त्याचे स्पष्टीकरण उपयुक्त असल्याने इथे देतो.

संसर्गजन्य आजारांचे बाबतीत २ व्याख्या नीट समजून घ्याव्यात.

१. साथ = ठराविक प्रदेशात आजाराचा अल्प काळात झालेला वेगवान प्रसार.

२. जागतिक साथ / महासाथ = आजाराची साथ जगाच्या अनेक खंडांत वेगाने पसरते. अशा रुग्णांचा आकडा सतत वाढता राहतो.

उत्तम माहितीसंकलन.

शाळेत एका धड्यात “मरीआईचा गाडा“ हा उल्लेख होता. प्लेगसाठी असावा.

सर्व नवीन प्रतिसादकांचे आभार !
.....................................

इतिहासात फ्लूच्या बऱ्याच महासाथी येऊन गेल्या. अशा साथी नियंत्रणात आणण्यासाठी लोकांच्या आंतरराष्ट्रीय विमान प्रवासावर निर्बंध घालावेत का, हा एक औत्सुक्याचा मुद्दा असतो. या संदर्भात WHOचे काही अभ्यास झालेले आहेत. त्यांचे साधारण निष्कर्ष असे आहेत:

१. एखाद्या देशाने असे कडक निर्बंध जरी घातले तरी त्यामुळे साथीचा देशातील शिरकाव पूर्णपणे रोखता येत नाही.
२. मात्र तो शिरकाव २ महिन्यांपर्यंत पुढे ढकलता येतो.

३. त्यामुळे त्या साथीचा तिथला व्यापक प्रसार ३-४ महिने पुढे जातो.
४. वरील दोन मुद्द्यांचा एक मोठा फायदा होतो. तो म्हणजे संबंधित विषाणूविरोधी औषधे आणि लसीचे उत्पादन व वितरण करण्यास बहुमूल्य वेळ मिळतो.
..........
अन्य काही अभ्यासात देशांतर्गत रस्त्याने होणाऱ्या प्रवासावर निर्बंध घालून पाहण्यात आले आहेत. त्यापैकी काहींत या निर्बंधांचा उपयोग (विमानापेक्षा) अधिक झाल्याचे दिसून आले आहे.

प्रौढांपेक्षाही लहान मुलांच्या प्रवासावारील निर्बंध अधिक उपयुक्त ठरतात, असाही एक रोचक निष्कर्ष आहे.
...............
सध्याही आपण या अवस्थांतून जात आहोत. त्याचे उपयुक्त परिणाम किती होतात हे काळाच्या ओघात समजेल.

आपले लेखन नेहमीच माहितीपूर्ण आणि संयत असते. आपणास आपल्या कक्षेबाहेरची माहिती विचारली गेल्यास आपण " शोधून नंतर प्रतिसाद देतो " असे विनयपूर्वक सांगता. आपल्या लेखनातून कोणताही अजेंडा डोकावत नाही. डोकावते ते केवळ समोरच्याचे हितचिंतन. मोजक्या शब्दांत समर्पक उत्तर देण्याचे आपले कौशल्यही आवडते.
आपल्या प्रत्येक लेखावर जरी प्रतिसाद लिहिलेला नसला तरी आपले सर्व लेखन वाचले आहे आणि ते नेहमीच आनंददायी आणि माहितीत भर घालणारे असते.
असेच लिहीत राहावे.

Pages