बंडखोर

Submitted by Theurbannomad on 11 March, 2020 - 01:25

समाजातल्या अनेक रूढी, परंपरा आणि प्रथा वर्षानुवर्षे चालत आल्यामुळे त्यांना एक प्रकारचं अमरत्व प्राप्त झालेलं असतं. काल बदलतो, वेळ बदलते पण माणसांच्या मनात त्यांचं स्थान अबाधित राहतं. एका पिढीकडून दुसऱ्या पिढीकडे सगळ्या रूढी-परंपरांचं ओझं हस्तांतरित होत असतं. त्या रूढी-परंपरांचा मूळ उद्देश मधल्या मध्ये एक तर अर्धवट हस्तांतरित होतो किंवा पूर्णपणे विस्मृतीत जातो आणि एखाद्या पिढीत निपजलेला एखादा बंडखोर त्या सगळ्याला तर्कांच्या आधारावर आव्हान देतो. हा तर्कवादी दृष्टिकोन अनेकांच्या पचनी पडत नाही. पोथीनिष्ठ विचारांचा बुद्धिनिष्ठ विचारांशी मग झगडा सुरु होतो आणि त्यातून अनेकदा संघर्षाची स्थिती उत्पन्न होते.

श्रीराम असं भारतातल्या एका देवतुल्य व्यक्तिमत्वाचं नाव धारण केलेला, वाराणसीसारख्या देवाधर्माचा अतिशय अभिमान असलेल्या शहरातल्या एका ऋग्वेदी ब्राह्मण कुळात जन्माला आलेला आणि लहानपणापासून पूजाअर्चा , सोवळं-ओवळं आणि परंपरांना जीवापाड जपणाऱ्या एका कर्मठ कुटुंबात मोठा झालेला हा वल्ली मला मुंबईमध्ये लोकल ट्रेनमधून प्रवास करताना भेटला. दररोज लाखो लोकांना एकीकडून दुसरीकडे नेणारा मुंबईच्या लोकल ट्रेनचं जाळं म्हणजे एक जगावेगळी मुलुखगिरी आहे. जीवघेण्या गर्दीतून ऑफिसची बॅग, खिशातला मोबाईल, पाकीट आणि पावसाचे दिवस असतील तर हातातली छत्री असे सगळे प्रकार सांभाळत चालत्या ट्रेनमध्ये झपकन चढण्याची कसरत एखाद्या सराईत मुंबईकरालाच जमू शकते. ठरलेल्या वेळेची ती ट्रेन आणि त्याचा तो विवक्षित डबा प्रत्येक मुंबईकराच्या रोजच्या जीवनाचा एक अविभाज्य घटक असतो. सवयीप्रमाणे मी ठाण्याच्या १ नंबर प्लॅटफॉर्म वरच्या सकाळच्या ७:०५ च्या ठाणा-मुंबई लोकॅलमधल्या पहिल्या वर्गाच्या डब्यासमोर गाडीची वाट बघत होतो, तेव्हा अचानक बाजूला हातात इंजिनीरिंगच्या जाडजूड पुस्तकाचं बाड घेऊन आलेला एक अनोळखी मनुष्य म्हणजे हा श्रीराम.

ट्रेनमध्ये चढताना ( की घुसताना ) धक्काबुक्कीत कोणाचं तरी हात लागून त्याचं पुस्तक खाली पडलं. ते उचलताना कोणाकोणाचे पाय त्याच्या पुस्तकाला आणि ते उचलायच्या प्रयत्नात असलेल्या त्याच्या हाताला लागले आणि शेवटी कसाबसा पुस्तक उचलून खरचटलेल्या हातांसकट तो कसाबसा ट्रेनमध्ये शिरला. जमेल तितक्या आतपर्यंत आला आणि शेवटी गर्दीतून जागा काढणं अशक्य झाल्यामुळे होता तसा त्याचं जागी तो उभा राहिला.झपकन आत घुसून जागा पटकवायची पक्का मुंबईकर असल्यामुळे मला सवय होती, त्यामुळे मी छान खिडकीजवळ बसलो होतो. त्याची अवस्था बघून मला त्याची दया आली आणि मी त्याला त्याची बॅग आणि पुस्तक माझ्याकडे द्यायला सांगितलं.

थोड्या वेळाने त्याला धक्क्याने होईना, पण अजून आत येत आला आणि तो माझ्या समोर येऊन उभा राहिला. त्याची बोटं चांगलीच खरचटलेली दिसत होती. त्याला खिडकीजवळ हात करून उभा राहायला सांगून मी माझ्याकडचं पाणी त्याच्या हातावर टाकलं. त्याने रुमालाने हात पुसून घेतले. माझा रुमाल मी त्याला बोटांवर गुंडाळायला दिला आणि शुद्ध हिंदीमध्ये त्याने माझे आभार मानले.

" हम आपको कैसे बतायें हमें कितना अच्छा लगा...धन्यवाद."

" आप मुंबई के नहीं है ना?"

" नहीं...हम बनारस से आए है. यहां इंजिनीरिंग कि शिक्षा जो लेनी है..."

त्याचं हिंदी एकदम अटल बिहारी वाजपेयी वळणाचं होता. अदबशीर, शुद्ध आणि अतिशय गोड. मुंबईच्या " अबे ए...कैसा है रे तू " छापाच्या हिंदीची सवय असलेल्या माझ्यासारख्या व्यक्तीला ते हिंदी ऐकताना लतादीदींच्या गाण्यासारखं निर्मळ वाटत होतं. नशिबाने शाळेत हिंदी विषय शिकलेलो असल्यामुळे आणि हिंदीचं वाचन असल्यामुळे माझं हिंदी अगदीच भयंकर नव्हतं, त्यामुळे त्याच्याशी संभाषण करताना माझी अगदीच फे फे उडत नव्हती.

आम्ही मग दररोज ठाणा स्टेशन च्या त्या एक नंबरच्या प्लॅटफॉर्मवर भेटायला लागलो. गप्पा मारता मारता माझ्याकडून त्याला मराठीचे धडे मिळायला लागले आणि मला हिंदीतल्या मुन्शी प्रेमचंद, भीष्म सहानी, सुरेंद्र मोहन पाठक वगैरे प्रख्यात लेखकांची ओळख व्हायला लागली. हरिवंशराय बच्चनजींचं 'मधुशाला ' हे दीर्घकाव्य तो इतक्या सुंदर पद्धतीने बोलून दाखवायचा की आजूबाजूचे सुद्धा ऐकत राहायचे. कबीराचे दोहे, मीरेची भजनं त्याला पाठ होती. घरातल्या कर्मठ वातावरणात गालिब आणि उर्दू चालत नसल्यामुळे त्याने चक्क बनारसच्या ग्रंथसंग्रहालयांमधून ती पुस्तक मिळवून वाचली होती. एकूणच काय, तर हा माझा मित्र ज्योतिषशास्त्र, धार्मिक कर्मकांड, साहित्य, कला आणि योग अश्या अनेक गोष्टींमध्ये पारंगत होता.

" श्रीराम, इंजिनीरिंगचं खूळ, तेही मुंबईतूनच करायचा हट्ट...का?"

" दोस्ता, खूप मोठी कहाणी आहे. माझ्या दोन्ही मोठ्या भावांना वडिलांनी आमच्या घरात परंपरेने चालत आलेला पांडित्य पुढे न्यायला लावलं. घरी सगळेच पंडित. बारशापासून अंतिम संस्कारांपर्यंत सगळं काही करणारे, घराबाहेरून आत आल्यावर आधी अंगावर गंगाजल शिंपडणारे, घराबाहेर खायची वेळ आली तर माहितीतल्याच लोकांकडे आणि दुकानात खाणारे....काय सांगू. मी मात्र बहुतेक पिताजींच्या कुंडलीतला शापित ग्रह म्हणून जन्माला आलो...कारण मी लहानपणापासून कधीच कोणाचं ऐकलं नाही."

" कशामुळे? कोणी होता का तुझ्यावर प्रभाव टाकणारं?"

" मुळीच नाही. पण कशालाही " असं का, कशामुळे, कोणामुळे, कसं " हे प्रश्न विचारल्याशिवाय आणि सगळ्या प्रश्नांचं मनापासून समाधान करून घेतल्याशिवाय मी स्वीकारलंच नाही. देवाने भग्वदगीता सांगितलंय असं आमच्या काकांनीं सांगितल्यावर " तुम्ही तेव्हा होता का? नव्हतं तर कशावरून असं छातीठोकपणे बोलता?" असं मी प्रश्न केला आणि त्या दिवसापासून मी आमच्या घरात सगळ्यांना नावडेनासा झालो.

" अरे पण त्यांना तुझी बाजू कधी समजावलीस का?"

" खूप वेळा. पण एक सांगू, धर्म कोणताही असो किंवा धर्माच्या जागी मानलं जाणारं एखादं पुस्तक व व्यक्ती असो, डोळे मिटून अंधानुकरण केलं की हाती काहीच लागत नाही. पिढ्या नासतात. काल बदलतो तसे तुमचे विचार नको बदलायला? आमचे पिताजी सांगतात, सगळं बदलून सुद्धा स्थिर आणि अमर राहतो तो धर्म. मी त्यांना सांगतो, धर्म बदलायचा नसतोच, तो अधिकाधिक प्रगल्भ करायचा असतो...तसं केलं तर समाज स्थिर राहतो. "

एका विशीतल्या तरुणाकडून हे ऐकताना मला खरोखर आश्चर्य वाटत होतं. इतक्या लहान वयात धार्मिक विचारांच्या बाबतीत हा इतका स्पष्ट कसा, हे मला कळत नव्हतं. आजूबाजूच्या काही लोकांनी संभाषणात भाग घेतल्यावर तो सगळ्यांना जराही नं दुखावता किंवा आक्रमक ना होता अतिशय मुद्देसूदपणे आपलं बोलणं पटवून देत होता. ही स्थितप्रज्ञता अनेक वर्षांच्या तपस्येनंतर मिळते, असं मी वाचलेलं होतं. अर्थात हे उदाहरण डोळ्यासमोर असल्यामुळे मला पुस्तकी विचारांच्या मर्यादा सुद्धा स्पष्ट दिसून येत होत्या.

" मी ज्योतिष शिकलो, ते त्या शास्त्राच्या खोलात जायला. घरात सगळे पत्रिका बघतात, उपाय सांगतात पण मी त्या शास्त्राकडे दिशादर्शक शास्त्र म्हणून बघतो. काही लोक मला सांगतात ज्योतिष थोतांड आहे. मी त्यांना म्हणतो, पूर्वीच्या लोकांना कामधंदे नव्हते म्हणून इतक्या किचकट गणितांच्या आधाराने अवकाशातल्या ग्रहगोलांचा मनुष्यावर होणार परीणाम त्यांनी मांडायचा प्रयत्न केला? काही सांगतात, ज्योतिष सांगतं तसं आणि तसंच होणार...मी त्यांनाही सांगतो, वाल्या कोळ्याचा वाल्मिकी कसा झाला? प्रयत्नवादाला ज्योतिष हे उत्तर नाही आणि ज्योतिषाला अगदीच टाकाऊ मानणं सुद्धा योग्य नाही." इतक्या सुयोग्य पद्धतीने एखादा वादाचा मुद्दा सर्वांगाने पटवून द्यायची त्याची ही हातोटी मला खूप काही शिकवून गेली.

एके दिवशी संध्याकाळी छत्रपती शिवाजी टर्मिनसला ऑफिसनंतर भेटायचा बेत ठरला. शनिवार असल्यामुळे ऑफिस अर्धा दिवस होतं. उरलेला अर्धा दिवस याच्याबरोबर मनसोक्त मजा करता येईल अशी खूणगाठ बांधून मी दुपारी बरोब्बर एकच्या ठोक्याला ऑफिसमधून बाहेर पडलो. आधी एखाद्या पोटपूजा करायची म्हणून आम्ही श्रीरामाच्या भाषेतल्या ' सब्जीमंडी' हॉटेल मध्ये गेलो आणि गप्पा सुरु केल्या.

" दोस्त, एक मोठी खबर द्यायचीय."

" काय? शादी? "

" अरे नाही रे...मी सैन्यदलात ' शॉर्ट सर्विस कमिशन ' चा फॉर्म भरायचं ठरवलंय."

" पण तुझा शिक्षण..."

" अरे दोस्त, लास्ट सेमिस्टर आहे. मला माहित्ये मी सहज फर्स्ट क्लास मिळवेन, डिस्टिंक्शन मिळालं तर चांगलंच आहे. मग सैन्यात जाणार. "

" घरचे काय बोलले?"

" पिताजी बोलले, ब्राह्मण धार्मिक कर्मकांड सांभाळतात, समाजाला धर्मापासून लांब जाण्यापासून वाचवतात...क्षत्रिय लढतात. मी सांगितलं, महाराष्ट्रात बाजीराव पेशवे आणि त्यांचे वंशज लढले नसते तर भारतात ब्राह्मण सोडा, बनारस आणि कशी सुद्धा राहिली नसती." हातातल्या रोटीचा तुकडा तोंडात टाकत टाकत मिश्कीलपणे हसत तो बोलला.

" अरे घरी कोणाला हे आवडलं नाही? काय सांगतोस? "

" अरे काय सांगू...अजून पोथीच्या बाहेर नाही आलेत रे घरचे. दादाजी आणि नानाजी - दोघे बनारस मध्ये महापंडित म्हणून प्रसिद्ध. त्यामुळेच माझ्या पिताजींचा माझ्या अम्माशी लग्न झालं. माझे पिताजी, चाचाजी आणि मामाजी - सगळे पंडित. माझ्या बुवा आणि मौसी पंडितांच्या घरात दिलेल्या. माझी एकमेव लहान बहीण अशीच एखाद्या पंडितांच्या घरात जाईल. सगळ्यांना वाटतं, देवाचं काम म्हणजे पूजापाठ. कोणाला हे पटतच नाही, की वेळ महत्वाची. बाजीराव पेशवे पूजा करत बसले असते तर पूजा करायला काही उरलं असतं का? " सवाल बिनतोड होता.

" पण सैन्यात धर्म वगैरेपेक्षा देश महत्वाचा मानतात. तिथे प्रशिक्षणात मी शाकाहारी आहे वगैरे गोष्टी चालत नाहीत..."

" माहीत आहे. मला कोणत्याही धर्माचा राग नाहीये. माझ्या मते धर्मनिरपेक्ष म्हणजे सगळ्या धर्मांचा आदर करणं आणि कोणताही धर्म इतरांवर नं लादणं. सैन्याशिवाय आणखी कुठे मिळेल मला असं वातावरण? आणि देशासाठी मांस भक्षण करण्यात चूक काय?"

" घरी सांगितलं हे सगळं?"

" हो. पिताजी चिडले. अम्मा समजावायला लागली...फक्त माझ्या मोठ्या भावाने कौतुक केलं. तो थोडा विचार करतो....फक्त स्वतः कधी हिंमत करून या सगळ्यातून बाहेर नाही पडू शकला."

श्रीराम काही महिन्यातच मला ऑफिसबाहेर पेढे घेऊन भेटायला आला. " बृजवासी दुग्धालयातले गाईच्या दुधाच्या अस्सल खव्याचे पेढे आहेत. मी बी.इ. झालो. डिस्टिंक्शन मिळालं. आता बनारसला जाईन काही महिने, मग सैन्यात. घरच्यांसमोर डोळ्यात डोळे घालून बोलणार आहे मी, की डिग्री घेऊन आलोय त्यामुळे शिक्षणात मला तुम्ही नावं ठेवू शकत नाहीं. तुमचे पैसे काही फुकट गेले नाहीत. सैन्यात जाणार आहे, तुम्हाला मान्य असू दे कि नसू दे...काही वर्षांनी शुक्ल खानदानाचं नावं बाकी कोणामुळे नहीं, पण माझ्यामुळे लोकांना माहित असेल. "

" अरे समजेल सगळ्यांना....आणि तू समजावण्यात उस्ताद आहेस. "

" जगाला समजावू शकतो मित्रा...आणि त्यांना नाही समजलं तरी काय फरक पडतो? पण घरच्यांचं काय? आंधळ्या व्यक्तीला नेत्रदान करून दृष्टी देता येते...पण ज्यांनी डोळ्यावर पट्टी बांधलाय, त्यांना दृष्टी देणं कठीण. मी प्रयत्न नाही सोडणार...बघू. "

पुढच्या दोन-तीन दिवसांनी त्याने मला तो रहात असलेल्या त्याच्या भाड्याच्या घरात बोलावलं. बनारसहून दोघे भाऊ, बहीण, काकाची दोन मुलं, आतेभाईं अशी फौज आली होती. मुंबईमध्ये एक आठवडा राहून त्यांना जीवाची मुंबई करायची होती. त्यांनी आपल्याबरोबर आणलेली साजूक तुपातली मिठाई, घरच्या गायीच्या दुधाचं लोणी, बनारसची प्रसिद्ध कचोरी असं सगळं बघून माझ्या तोंडाला पाणी सुटलं. मुंबईच्या महत्वाच्या जागांबद्दल माहिती पुरवायची जबाबदारी घेऊन त्याच्या मोबदल्यात मी जीवाचं बनारस करून घेतलं. त्या सगळ्या पदार्थांचा स्वाद इतका अप्रतिम होता, की मुंबईच्या मिठाया एरंडेलासारख्या वाटाव्या. त्या सगळ्यांच्या वागण्या-बोलण्यातली अदब मला अतिशय प्रभावित करून गेली.

त्यानंतरच्या आठवड्यात ऑफिस सांभाळून मी या सगळ्या बनारसवासीयांना मुंबई 'दाखवली'. श्रीरामाची बहीण - जी आपल्या या सगळ्या भावांसारखी मलादेखील "भैया" म्हणायला लागली होती - मुंबईच्या समुद्राकडे बघून हरखून गेली. " हा समुद्र किती मोठा...गंगामातेच्या पात्रापेक्षाही प्रचंड..." असं काय काय तिच्या तोंडून मी ऐकत होतो. नकळत त्या सगळ्यांना मी बोलून गेलो, " गंगा नदी पवित्र आहे, यात दुमत नाही. पण गंगा नदीचे संस्कार घेऊन आयुष्य या समुद्रासारखं जगायला काय हरकत आहे? " श्रीरामाला माझ्या बोलण्यातली मेख कळली आणि आम्ही दोघेही एकमेकांकडे बघून हसलो.

पुढे श्रीराम सैन्यदलात गेला, मी देशाबाहेर गेलो. अनेक वर्ष एकमेकांशी संपर्क ठेवणं जमलं नाही. आज दोघेही एकमेकांच्या आठवणीत जिवंत आहोत. रूढी-परंपरांना नं मानणारा श्रीराम आणि त्याचे तितकेच रूढीवादी कुटुंबीय आजही तसेच आहोत का? श्रीराम सैन्यदलात आज कोणत्या हुद्द्यावर आहे? कुठे आहे? हे प्रश्न आजही मला पडतात. त्या बनारसच्या मिठाईचा सुगंध आजही मला जाणवतो. श्रीरामकडून नकळत शिकलेली प्रत्येक गोष्टीचा सर्वांगाने विचार करायची पद्धत आजही मला उपयोगी पडते आणि आजही स्वतःच्या कुंडलीत माझ्या या मित्राला भेटायचं योग्य आहे का हे एखाद्या ज्योतिषाला विचारावं असं वाटतं.

वडिलांच्या कुंडलीतला हा 'पापग्रह' माझ्या कुंडलीतल्या मित्रस्थानातला मात्र ' गुरु ' होता, हेच खरं !

प्रांत/गाव: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

छान लिहिलंय..
लोकल प्रवास करताना भेटलेला एक व्यक्ती, त्याच वेगळ जग आणि त्याच्यासोबत तुमच्या आठवणी छान मांडल्या आहात.
I hope की कधीतरी का होईना श्रीराम हे वाचेल

खूप सुंदर.
किती वर्षे झाली या सगळ्याला ?