लग्नाळू

Submitted by Theurbannomad on 10 March, 2020 - 10:33

मी लहान होतो, तेव्हा माझ्या ज्या ज्या नातेवाईकांची लग्न मी पहिली आहेत, त्यांच्या अनेक सुंदर आठवणी आजही माझ्या मनाच्या एका खास कप्प्यात मी जपून ठेवलेल्या आहेत. मुळात तीस-पस्तीस वर्षांपूर्वी नात्यातल्या लोकांचं एकमेकांकडचं जाणं-येणं, सुट्टीच्या दिवसात महिना-महिनाभर मुक्कामाला येणं किंवा सणासुदीला आवर्जून घरी जाऊन एकत्र फराळ करणं हा सवयीचा भाग होता. घरात लग्नकार्य असेल तर नातेवाईक दोन-दोन आठवडे लग्नघरात तळ ठोकायचे आणि आपापला हातभार लावून ते कार्य निर्विघ्न पार पाडायला मदत करायचे.

आज काळानुसार लग्न, लग्नाच्या पद्धती, जागा आणि एकंदरीतच सगळा जामानिमा पूर्णपणे बदलून गेलेला आहे. आज लग्नाकडे एक सोहळा म्हणून ना बघता ' इव्हेंट' म्हणून बघण्याची प्रथा पडलेली आहे आणि म्हणूनच अशा 'इवेन्ट'ना पार पडायची जबाबदारी घेणारे 'मॅनेजर' आणि त्यांच्या ' मॅनेजमेंट कंपन्या' यांना सुगीचे दिवस आलेले आहेत. लग्नाच्या अथपासून इतिपर्यंत सगळ्या गोष्टी ते बघणार, लग्नकार्य रंजक व्हावं म्हणून आधीपासून लग्नाचं 'प्लांनिंग' करणार आणि त्याचे चोख दाम वसूल करणार हे माहित असूनही आज 'लोकलाजेसाठी' या सगळ्यावर बँकेतून कर्ज काढून पैसे खर्च करणारे महाभाग माझ्या माहितीत आहेत. अशाच एका 'इव्हेंट मॅनेजमेंट' कंपनीची प्रमुख असलेली मेलिसा मला माझ्या एका मित्राच्या लग्नात भेटली आणि तिने मला कोणत्याही पुस्तकात अथवा वर्गात ना मिळणारे 'व्यवसायाचे' धडे दिले.

मेलिसा गोव्याची. गोव्याच्या मातीत कला आणि बिनधास्तपणा या दोन विजोड गोष्टींचा मिलाफ इतका मुरलेला आहे, की तिथल्या प्रत्येक व्यक्तीमध्ये मी या दोन गोष्टी आपसूक आलेल्या बघितल्या आहेत.एक उपजत बंडखोरी आणि जगाच्या नियमांना डावलून आपली वेगळी वाट चोखाळणारी धडाडी मला अनेक गोयंकारांमध्ये दिसलेली आहे. मेलिसा या सगळ्याला अपवाद होती, पण वेगळ्या अर्थाने. तिच्या कुटुंबात तिच्या आधीच्या पिढीने जगाला फाट्यावर मारून अशा काही गोष्टी केल्या होत्या, की ती मुलगी बाळगुटीबरोबर बंडखोरपणा कोळून प्यायली होती आणि त्यामुळे तिला वेगळ्याने बंडखोर व्हायची गरजच पडली नव्हती. तिचे वडील ख्रिस्ती, आई सारस्वत. दोघांनी लग्नासाठी आपापले धर्म सोडले. कोर्टात लग्न केलं आणि लग्नाच्या सहा महिन्यात मेलिसाला जन्म दिला. आईचं कडक शिस्तीचं सारस्वत कुटुंब आणि वडिलांचं तितकाच कर्मठ ख्रिस्ती कुटुंब पुन्हा एकदा मुलीने कोणता धर्म स्वीकारावा म्हणून भांडलं, तेव्हा ती मोठी झाली कि तिने ठरवाव तिला कोणता धर्म हवाय, अशा स्पष्ट शब्दात मेलिसाच्या आई-वडिलांनी आपल्या घरच्यांची बोळवण केली. हे सगळं डोळ्यासमोर बघितल्यामुळे मेलिसा बंडखोर झाली नसती, तरच नवल वाटलं असतं. तिने आपला आडनाव टाकलं आणि आई-वडिलांचा वारसा पुढे चालवत तिने शाळेनंतर पुढच शिक्षण बाहेरून परीक्षा देऊन पूर्ण केलं. कदाचित म्हणूनच असावं, पण ती इतक्या विषयात पारंगत होती आणि इतक्या वेगवेगळ्या अनुभवांनी समृद्ध होती, कि ऐन तिशीत तिने स्वतःची ' इव्हेंट मॅनेजमेंट कंपनी' उघडून आपली स्वप्न साकारायला सुरुवात केली.

" गोव्यात माझ्याच मित्राच्या लग्नाचं पहिलं कॉन्ट्रॅक्ट मिळवलं मी...२००२ साली लग्न म्हणजे इव्हेंट असा आजच्यासारखा प्रकार नव्हता...त्याच्या घरचे विचारायला लागले, तू काय करायचे इतके पैसे घेणार? मी सांगितलं, तुमचा विल्सन गावात फेमस होतो कि नाही बघा...त्यांनी सांगितलं, आधी अर्धेच पैसे देऊ...सगळं झाल्यावर चांगलं वाटलं तर उरलेले देऊ...लग्न झाल्यावर त्यांनी ठरलेले पैसे दिलेच, वर कंपनीत इन्व्हेस्टमेंट पण दिली. आज दुबईला माझी कंपनी खास लोकांच्या खास इव्हेंट्स शिवाय काम नाही करत..." थोडक्यात मेलिसाने मला तिची कहाणी सांगितली.

माझ्या ज्या मित्राच्या लग्नाचं कंत्राट तिला मिळालं होतं, तो दुबईच्या श्रीमंत सोनार कुटुंबाचा एकुलता एक कुलदीपक होताच, पण ज्या मुलीशी त्याचं लग्न होणार होतं, ती त्यांच्यासारख्याच सोनार कुटुंबातली एकुलती एक असल्यामुळे दोन्हीकडचे लोक खर्चाच्या बाबतीत सढळ होते. मेलिसाने आपल्या अनुभवाच्या जोरावर त्या लग्नाचा भव्यदिव्य 'इव्हेंट' केला होता. पहिल्या दिवशी दोन्ही कुटुंबाकडच्या लोकांचं स्वागत म्हणून प्रश्नोत्तरांचा कार्यक्रम, त्यात एकेका व्यक्तीची वैशिष्ट्य आधीपासून माहित करून घेऊन त्या अनुषंगाने खास तयार केलेले प्रश्न, मुद्दाम एखाद्या 'खाष्ट' आणि 'प्रसिद्धी-परायण' मंडळींसाठी मधाचा बोट लावलेली खास प्रश्नमंजुषा....मला या सगळ्याची कमाल वाटत होती.

" कोमलजी...आप प्लीज सामने आईए." शंभरीच्या आसपासचं वजन, त्यावर पाच-दहा किलोची भपकेबाज साडी, एक-दोन किलोचे दागिने आणि आजूबाजूच्या सगळ्या दिव्यांची चमक फिकी वाटेल इतका चकचकीत 'मेक-अप' घेऊन एक पन्नाशीतला भला मोठा ऐवज समोर आला. या बाईला 'कोमल' म्हणणं म्हणजे शहामृगाला फुलपाखराची उपमा दिल्यासारखं होतं.

" कोमलजी, हमें पता चला है, के आप शादी के वक्त एकदम हेमा मालिनी जैसी दिखती थी..." कोमल सगळे बत्तीस दात दाखवून हसल्या. अर्थात अक्कलदाढा अजूनही फुटलेल्या नव्हत्याच! " आप भी ना...किसने बताया?" कोमलचा प्रश्न. " सोचिये..." शक्य तितका लाडिकपणाचा अभिनय करून मेलिसाने विचारलं. " मेरे उन्होने बताया होगा...है ना?" अर्थात अजून कोणी असणं शक्यच नव्हतं. मग या हेमामालिनीचा काटकुळा धर्मेंद्र समोर आला. दोघांनी लाजत लाजत मिठी मारली. ते दृश्य लोकरीच्या मोठ्ठया गुंडाळ्यात सुई अडकावी तसं वाटत होतं. मग " ड्रीम गर्ल " गाण्यावर त्यांचा " गरबा" झाला. हे सगळं बघून मी हसणं दाबत होतो, आणि मेलिसाच्या कल्पकतेला दाद द्यावी कि संयमाला, असा विचार करत होतो.

" हे सगळं तुला कसं जमतं...ना हसता तू हे सगळं समोर बघू शकतेस..कमाल आहे" मेलिसाने माझ्याकडे तुच्छ कटाक्ष टाकला आणि म्हणाली, " मला उलट कीव येते या मूर्ख माणसांची. कधी कधी मुद्दाम मी एखाद्या अति शहाण्या लोकांचा सूड पण घेते...बघायचंय?" आता हि बया नक्की काय करणार मला कळेना, पण उत्सुकतेने मी बघायला लागलो.

" अब स्टेज पे बुलाते है...राधा बुवाजी को.." माझ्या मित्राची आत्या सहा इंची टाचा असलेली पादत्राणं घालून स्वतःचा महागडा 'लेहेंगा' सांभाळत आली. तिच्याकडे बघून ती आपल्या 'दिसण्याची' जीवापाड काळजी घेत असावी हे कळत होतं, कारण पन्नाशीच्या आसपास असूनही ती तिशीत वाटत होती. " राधा बुवाजी पिछले साल मिसेस वर्ल्ड प्रतियोगिता के लिये गयी थी....तालियां " मेलिसाने घोषणा केली. नंतर त्या चवळीच्या शेंगेला तिच्या वयापेक्षा अंमळ जास्त थोराड वाटणाऱ्या नवऱ्याबरोबर " बुड्ढा मिल गया" वर नाचायला लावलं. सगळं प्रकार झाल्यावर कळलं, की त्या आत्याने आणि तिच्या नवऱ्याने मेलिसाला सगळ्या गोष्टींमध्ये सारखं नाक खुपसून नाकी नऊ आणले होते. ही आत्या मिसेस वर्ल्ड स्पर्धेसाठी गेली तेव्हा तिचं पहिल्या चाळिसांमध्येही नाव येऊ शकलं नव्हतं हि माहिती काढून मेलिसाने तिच्या वर्मावर बरोब्बर बोट ठेवलं.मला तिच्या या बिनधास्तपणावर हसावं कि रडावं कळत नव्हतं.

दुसऱ्या दिवशी 'संगीत' होतं. ते साग्रसंगीत पार पडलं. चाळीस-एक जोडप्यांचे नाच, मग मुलाच्या आणि मुलीच्या जन्मदात्यांचे, त्यांच्या जन्मदात्यांचे आणि त्यांनी जन्म दिलेल्या इतर प्रजेचे खास 'परफॉर्मन्स' झाले. आपल्या सवयीच्या बिंधास्तपणाने मेलिसा हे सगळं व्यवस्थित पार पाडत होतीच, पण एखाद्या 'स्टाफ' कडून चूक झाली तर त्याला बिनधास्त 'फ'कारान्त शिव्या देऊन त्याच्या वर गेलेल्या पिढ्या खाली आणत होती. हि मुलगी चुकून 'स्त्री' जातीत जन्माला आली असं आजूबाजूच्या अनेक बायकांनी म्हटलेलं मी ऐकलं.

लग्नाच्या दिवशी मेलिसा स्वतः साडी घालून आणि मुलीला शोभेल अशा पद्धतीने सजून आलेली बघून अनेकांची दांडी उडाली. काहींनी ओळख वाढवायचा असफल प्रयत्न केला आणि मेलिसाकडून त्याबद्दल छानशा शिव्याही खाल्ल्या. एक महाभाग तिला आपल्या तीर्थरूपांशी ओळख करून द्यायला गेला, तेव्हा " तुमच्या स्वयंपाकघरात मी मटण बनवला तर चालेल का तुम्हाला? तर पुढे बोलू" असं तोंडावर बोलून त्याने त्या अक्ख्या कुटुंबाला गार केलं. कोणत्याही गोष्टीला हातचं ना राखता थेट भिडायचं आणि समोरच्याला गार नाही तर कायमचं नामोहरम करायचं अशी तिची वागण्याची पद्धत होती. आजूबाजूच्या दिखाऊ संस्कारी लोकांना ते ' अब्रमण्यम' वाटलं तरी मला मात्र ते मनापासून आवडत होतं. हि मुलगी 'सोड्याला जाऊन ग्लास लपवणारी' नव्हती, याची मला खात्री पटली.

लग्नाच्या मांडवाच्या खांबांना तिने वर आणि वधू यांचे वेगवेगळ्या वेशातले फोटो लावले होते. माझा उंचीपेक्षा रुंदी जास्त असलेला मित्र कधी शेहजादा सलीम, कधी सम्राट अकबर तर कधी थेट अरबी शेखाच्या अवतारात अतिशय विचित्र दिसत होता. त्याच्या बाजूला त्या त्या व्यक्तिरेखेला अनुसरून त्याची होणारी अर्धांगिनी वेगवेगळ्या वेशांमध्ये दिसत होती. मी मेलिसाला त्याबद्दल विचारल्यावर तिने " हौस या दोघांची, माझी नाही. तुझा मित्र प्रयत्न करूनही देखणा दिसत नाही. बापाकडे एकही चांगला स्पर्म नसल्यावर काय होणार.....फोटो असे का आले याचं उत्तर विचारायची चूक करू नकोस.." असं थेट उत्तर देऊन मला गप्प केलं.

त्या दिवशी लग्नकार्य पार पडल्यावर आणि सगळी प्रजा पांगल्यावर मी मुद्दाम मेलिसाला भेटायला गेलो. सामानाची बांधाबांध, साफसफाई आणि बाकीची उरलेली काम यात ती गुंग होती. मी आल्याचं बघून " मला प्रपोज करणार असशील तर आधीच सांगते, मागे फार आणि निघून जा " असं ती बोलली आणि मी खळखळून हसलो. " तुला साधा सरळ विचार नाही करता येत का?" मी विचारलं. " वाकड्यात गेल्याशिवाय माणसं सरळ नाही होतं...कळलं का?" तिने अपेक्षित उत्तर दिलं.

श्रीमंतांच्या लग्नसराईनंतर मेलिसा आपल्या स्टाफ बरोबर जेवण घ्यायला बसते, हे बघून मला आश्चर्य वाटलं. मलाही तिने तिच्या कळपात सामील करून घेतलं. मस्ती-मस्करी सुरु झाली. लग्नात भेटलेल्या आणि अनुभवलेल्या एकेका महाभागाचं यथेच्छ 'कौतुक' झालं. मेलिसा रंगात आल्यावर तिच्यात दडलेली लहान मुलगी बाहेर आली. स्टाफबरोबर मग तास-दोन तास दंगा झाला. कोणाला जबरदस्तीने आठ-दहा गुलाबजाम भरव, कोणाला पैजेवर श्रीखंड-भात खायला लाव असे सगळे प्रकार तिथे झाले. त्या क्षणी मेलिसा 'बॉस' नव्हती आणि बाकीचे तिचं 'स्टाफ' नव्हते.

एका हातात वाईनचा ग्लास आणि दुसऱ्या हातात गाडीची चावी घेऊन मग ती माझ्याबरोबर गप्पा मारायला बसली. हळू हळू तिच्या 'अदृश्य' बाजूचे पदर उलगडायला लागले. मला तिच्याबद्दल जाणून घ्यायची उत्सुकता होतीच, म्हणून मी सुद्धा तिला हळू हळू चावी देत होतो.

" You know, माझ्याकडे सगळे जण एक तर desperate नजरेने तरी बघतात किंवा तुच्छतेने तरी. मुलीच्या टॉपचा लो-नेक कट जितका खोल, तितकी ती 'हॉट' आणि ' सेक्सी' वाटते या साल्यांना. हात ना लावताही नजरेने मुलींचा किती वेळा हे साले विनयभंग करतात...मोठ्या घराचे पोकळ वासे साले. "

" पण मला वाटतं तुला त्याचा फरक नाही पडत...तीन दिवसात मी तुला जितका बघितला, त्यावरून तरी मला वाटत..."

" अरे आहेच ना तसं. मी शाळेत होते, बारा वर्षाची. तेव्हा माझ्या शाळेतल्या एका शिक्षकाने मला सहा महिने त्रास दिलेला होता. कुठेही हात लाव, मुद्दाम अंगाशी ये...लांडगा साला. एकदा ठरवलं, घाबरायच्या ऐवजी त्याला त्याच्याच भाषेत उत्तर द्यायचं. त्याच्या बायकोला त्याची प्रेमिका म्हणून पत्रं पाठवली मग...निनावी. दोन महिन्यात सोडून गेला गावातून. या आजच्या लग्नातसुद्धा माझ्या वयाची मुलगी असलेले पुरुष माझ्याकडे बोलताना डोळ्यात नाही, तर माझ्या 'cleavage' कडे बघत होते. एकाला तर मी बोलले सुद्धा, की तुमच्या मुलीपेक्षा आणि बायकोपेक्षा माझं जास्त आवडलं का तुम्हाला? " ती खळखळून हसली , पण मला हसू आलं नाही.

" कितीतरी वेळा ममा -पप्पा लग्नासाठी मुलगा बघायला गेले. काहींनी त्या दोघांचा इतिहास काढला, काहींनी धर्म विचारला, काहींनी जणू काही मला विकतच घेतायत अशा अटी घातल्या. मग मी ठरवलं, लग्न गेलं उडत. एखादा मुलगा आवडला तर सरळ सांगेन...no marriage,only live-in."

" पण तुझा व्यवसाय लग्नाशीच संबंधित....काय योगायोग ना?"

" अरे हात...मी मुद्दाम आली या व्यवसायात. लग्नात मोठ्या माणसांची खोटी तोंडं दिसतात. सगळ्यांना नुसता बडेजाव हवा असतो. मी मुद्दाम अशा माणसांना अजून हरभऱ्याच्या झाडावर चढवते आणि दामदुप्पट कमावते. माझ्याशी नीट जो वागत नाही, त्याची तर सगळ्यांसमोर काढते बरोबर...त्यांना कळतही नाही, की साखर लावून कारलं खायला लावलाय त्यांना मी....बाजारात जाऊन लग्न करण्यापेक्षा लग्नाला जाऊन बाजार केलेला बारा, नाही का?" मी निरुत्तर!

मी हे सगळं ऐकून शांत झालो. ही मुलगी आतल्या आत काय काय घेऊन जगतेय, याची मला पुसट कल्पना आली. दिखाऊ जगाशी संबंध ठेवणारी हि मुलगी स्वतः जराही खोटी नव्हती. जे आहे ते कोणताही आडपडदा ना ठेवता जगाला बिनधास्त दिसू देणारी आणि तरीही अंतर्बाहय सभ्य असणारी मेलिसा मला अतिशय मनापासून आवडली.

आमची मैत्री हळूहळू चांगलीच घट्ट झाली. दोन-तीन वर्ष झाल्यावर तिने मला आपण कायमचं पोर्तुगालला जात असल्याचं सांगितलं. तिला तिच्या व्यवसायाचा पुढचा टप्पा खुणावत होता. जायच्या आधी आम्ही भेटलो, तेव्हा तिने तिच्या आई-बाबांची भेट घालून दिली. थोडा वेळ मनसोक्त गप्पा झाल्यावर जायची वेळ आली. कडकडून भेटल्यावर शेवटी आम्ही आमच्या वाटेल निघालो, तोच तिने आवाज दिला.

" आता काय?" मी विचारलं.

" लग्न करशील तेव्हा सांग....तुझ्या लग्नाचं सगळं प्लांनिंग फ्री माझ्याकडून..."

" तू सुद्धा कधी लग्न करायचा विचार केलास तर कळव..." मी हसत बोललो.

तसं काही कधीही होणार नाही हे मला माहित होतं...कारण माझी ही मैत्रीण फक्त आणि फक्त व्यवसायानेच पक्की 'लग्नाळू' होती.

प्रांत/गाव: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

किती सुरेख शब्दचित्र रेखाटता तुम्ही.
>>>एकाला तर मी बोलले सुद्धा, की तुमच्या मुलीपेक्षा आणि बायकोपेक्षा माझं जास्त आवडलं का तुम्हाला? ">>>> वाह!!! याला म्हणतात भीमटोला.

धन्यवाद !
माझ्या ब्लॉग्सना भेट द्या आणि आपल्या प्रतिक्रिया कळवा. शक्य असल्यास आपल्या मित्रमैत्रिणींना ब्लॉग वाचण्याची माझ्यातर्फे विनंती करा.

https://humansinthecrowd.blogspot.com/
https://demonsinthecrowd.blogspot.com/

मस्त