पक्ष्यांच्या घरट्यांमधील वास्तुकला

Submitted by Dr Raju Kasambe on 10 March, 2020 - 08:37

पक्ष्यांच्या घरट्यांमधील वास्तुकला

अरे खोप्यामधी खोपा
सुगरणीचा चांगला
देखा पिलासाठी तिनं
झोका झाडाले टांगला
खोपा इनला इनला
पाखराची कारागिरी
जरा देख रे माणसा!

बहिणाबाईंनी ह्या ओव्या लिहिल्या तेव्हा त्यांना सुगरण पक्ष्यांची लोंबकळणारी घरटी जगातील सर्वात गुंतागुंतीची व क्लिष्ट वास्तुशास्त्राचा नमुना आहेत ह्याची कदाचित जाणीवही नसेल. त्यांनी त्या घरट्याच्या आणि सुगरण पक्षाच्या सौंदर्यावर भाळूनच त्या लिहिल्या असाव्यात असे मला वाटते.
Baya_Weaver_Ploceus_philippinus_nesting_colony_by_Dr (2).jpg

वास्तुशास्त्र किंवा वास्तुकला हे शब्द केवळ मनुष्याच्या राहण्याच्या ठिकाणाबद्दलच नव्हे तर इतर प्राण्यांसाठीही वापरले जातात. पण, अशा किती सजीवांच्या घराला वास्तुशास्त्र शब्द वापरता येईल?

मनुष्याव्यतिरिक्त सर्वप्रथम आठवतात ती पक्ष्यांची विविध आकाराची, प्रकाराची घरटी! अर्थात छोटे सस्तन प्राणी, मुंग्या, वाळवी, इत्यादी प्राणी सुद्धा वास्तुशास्त्रात पारंगत असतात. पण वैविध्याचा विचार केला तर पक्ष्यांनाच जास्त गुण द्यावे लागतील.

पक्षी हे केवळ विणीच्या हंगामात घरटी बांधतात हे खरे असले तरी अनेक पक्षी वर्षभर मुक्कामासाठी घरट्याचा उपयोग करतात. पक्ष्यांची वास्तुकला अगदी साध्या घरट्यापासून म्हणजे जमिनीवर छोटा केलेला खळगा ते खूप क्लिष्ट अशा सुगरण पक्ष्याच्या घरट्यापर्यंत आणि त्याही पलीकडे जाऊन आंतरिक सजावट (इंटेरियर डेकोरेशन) पर्यंत मजल मारणाऱ्या बॉवरबर्डच्या घरट्यापर्यंत अशी विभागता येईल.

जमिनीवरील साधी घरटी
जमिनीवर पायाने किंवा चोचीने माती उकरून केलेला छोटा खळगा म्हणजेच हे घरटे. जमिनीवर घरटे करणारे पक्षी वास्तुकलेत अगदीच कच्चे असतात. पण त्यांची अंडी आणि पिल्लं काळपट मातकट ठिपक्यांची असतात आणि घरट्या भोवती छोटे दगड, माती, चिखलाचे गोळे अशा वस्तू जमवून अंड्यांना परिसराशी जुळणारा रंग दिला जातो. अशा उघड्यावरच्या घरट्यांना शत्रू सुद्धा खूप असतात. त्यावर उपाय म्हणून हे पक्षी संकटाची चाहूल लागताच घरटे सोडून दूर जातात व आरडाओरड करून प्रसंगी जखमी झाल्याचे सोंग करून (डिस्ट्रॅक्शन डिस्प्ले) शत्रूचे लक्ष स्वतःकडे वेधून घेतात. अर्थात घरट्यापासून विचलित करतात. आरडाओरड, कोलाहल करण्यात पटाईत असलेले पक्षी म्हणजे टिटव्या, शेकाटे, सुरय हे होत.
जखमी झाल्याचे सोंग करणाऱ्या पक्ष्यांमध्ये छोटा आर्ली (स्मॅल प्रॅटिनकोल), चिलखा (लिटिल रिंग्ड प्लोवर) असे अनेक पक्षी आवाज न करता दबकत दबकत घरट्यापासून दूर निघून जातात. उदाहरणार्थ पाणलावा (स्नाइप) आणि धाविक (इंडियन कोर्सर). आणखी एक गोष्ट म्हणजे पालकांनी धोक्याचा इशारा दिल्यानंतर ह्या पक्ष्यांची पिल्ले निपचित पडून राहतात आणि अक्षरशः दिसेनाशी होतात.

बिळातील, ढोलीतील घरटी
अनेक पक्षी झाडाच्या ढोलीत किंवा जमिनीमध्ये बीळ खोदून त्यात घरटी करतात. आपल्या परिचयाचा सुतार पक्षी (वूडपेकर) झाडाला त्याच्या मजबूत चोचीने पोखरून ढोली तयार करतो. तांबट व इतर बार्बेट जातीतील पक्षी मात्र झाडाच्या वाळक्या मऊ फांदीत घरटे पोखरतात. अशा दुसऱ्यांनी पोखरलेल्या आयत्या ढोलीत तसेच झाडांमधील नैसर्गिक ढोल्यांचा ताबा घेऊन उपभोग घेणारे पक्षी म्हणजे पोपट, घुबड, पिंगळा, दयाळ, धनेश (हॉर्नबिल), साळुंकी (कॉमन मैना), रामगंगा (ग्रेट टिट) हे होत. हे उपरे पक्षी स्वतःची ढोली पोखरण्यास असमर्थ असतात. पण भांडण करून आयत्या ढोलीवर ताबा मिळवण्यास मात्र समर्थ असतात.

जमिनीमध्ये अथवा नदीकाठी भुसभुशीत मातीची जागा शोधून धीवर (किंगफिशर) व राघू प्रजातीचे (बी-इटर) पक्षी त्यांच्या चोचीने लांब बीळ खोदतात. विदर्भातील मोठ्या नद्यांवर निळ्या शेपटीच्या राघुंची (ब्लु टेल्ड बी-इटर) सामुहिक वीण वसाहत आढळते. चोचीने खोदत जाऊन तसेच ढोलीत मागे मागे सरकत येऊन पायाने माती बाहेर काढले जाते. ढोलीच्या शेवटी एक रुंद अशी खोली अथवा अंड-कक्ष तयार केली जाते.
ढोलीत प्रत्येक वेळेस ये-जा करणारा पक्षी सायकलच्या हवा भरण्याच्या पंपाप्रमाणे शुद्ध हवा आत पोहोचवतो. साप, घोरपड इत्यादी शत्रूंना अशा वसाहतींवर नेहमी धाड टाकायला आवडते. त्यांना मूर्ख बनविण्यासाठी राघू पक्षी अनेक खोटी बिळं खोदतात पण अंडी मात्र एकाच बिळात घालतात.

धनेश पक्ष्यांची ढोलीतील घरटे करण्याची तर्‍हा मात्र वेगळीच आहे. अंडी घालण्यापूर्वी धनेश मादी स्वतःला ढोलीत बंदिस्त करून घेते. त्यासाठी चिखल आणि स्वतःची विष्ठा वापरून लिंपून ढोलीचे दार ती बुजवते. त्याला एक छोटीशी फट ठेवली जाते. त्यामधून नर तिच्या सर्व गरजा पुरवतो. पिल्लं बऱ्यापैकी वाढल्यानंतर मादी ही भिंत फोडून बाहेर पडते.
Hornbill pair inspecting a prospective cavity for nesting by Dr. Raju Kasambe.jpg (धनेश जोडी : छाया : लेखक)

घुबडाच्या अनेक प्रजाती ढोलीचा उपयोग वर्षभर करतात. ते निशाचर असल्यामुळे दिवसा झोपायला व विश्रांतीसाठी ढोलीच्या संरक्षणाची त्यांना गरज असते.

ओट्यासारखी घरटी
ह्या घरट्याच्या प्रकारात काड्या, काटक्या, तारा इत्यादी जमून त्याचे बाहेरून अस्ताव्यस्त दिसणारे ढिगार्‍या सारखे घरटे बांधले जाते. पारवे, होले, हरियाल यांचे घरटे फारच साधे आणि घाई गडबडीत बांधल्या प्रमाणे असते. त्यातही बगळे, वंचक, पाणकावळे यांचे घरटे बर्‍यापैकी मजबूत असते. तर गरुड, करकोचे, गिधाडे इत्यादी पक्षांचे घरटे म्हणजे काटक्यांचा मोठा ढिगारा असतो. हे पक्षी, गरुड दरवर्षी त्याच घरट्यावर आणखी काटक्या घालून विण करतात. असे दरवर्षी आकारमान वाढत गेल्यामुळे सुवर्ण गरुडाचे घरटे सहा फूट उंच आणि दहा फूट उंच व्यासाचे झाल्याची नोंद आहे.

पाण्यावरील घरटी
आपल्या देशात आढळणाऱ्या तीन प्रकारातील पक्ष्यांची घरटी पाण्यावर आढळतात. दाबचिक (ग्रीब) प्रकारातील मोठा तुरेवाला दाबचिक, वारकरी (कॉमन कूट) आणि कमळपक्ष्यांची (जकांना) वीण जलीय अधिवासात होते. दाबचिक आणि वारकरी पाणवनस्पतींचा ढिगारा जमवून पाण्यात घरटे बांधतात. दाबचिक पक्षी घरटे सोडून जाताना दरवेळी अंडी पाणवनस्पतींनी झाकूनच जातो. पिल्लं जन्मताच पाण्यात पोहायला शिकतात. अर्थात तरंगतात.

पाण्यात डुबकी मारून खाद्य शोधणारे पालक पक्षी जलपृष्ठावर येताच पिल्लांना भरवतात आणि परत पिल्लांना पाठकुळी बसवतात. घरटे बनविण्यासाठी पाणवनस्पती महत्त्वाच्या असल्यामुळे, प्रियाराधनाच्या वेळेस नर मादीला पाणवनस्पतीच भेट म्हणून देतो.
कमळपक्ष्याचे घरटे मात्र खऱ्या अर्थाने तरंगते घरटे असते. अगदी मोजकेच सामान जमविले जाते किंवा सरळ कमळाच्या अथवा शिंगाड्याच्या पानावर मादी अंडी घालते आणि नराच्या सुपूर्त करून निघून जाते. पुन्हा दुसऱ्या नरासोबत जोडी जमवून ती अंडी घालते आणि रफूचक्कर होते. अशाप्रकारे एका हंगामात अनेक नरांशी जोडी जमवून अंडी घालण्याचे मशीन असल्यासारखे ती वागते.
परंतु त्या घरट्याला अनेक संकटे असतात. त्यामुळे खूप अंडी घातल्यानंतर कुठे थोडी पिल्लं मोठी होतात. कमळपक्ष्याची अंडी ‘वॉटरप्रूफ’ असतात. ती तरंगतात सुद्धा आणि घरट्यावर संकट आलेच तर नर आपली अंडी चोचीत धरून दुसरीकडे उडत घेऊन जातात.

वाटीसारखी घरटी
काट्याकुट्यांची पण बर्‍यापैकी मजबूत आणि वरील बाजूस वाटीसारखी अंड्यांसाठी असे घरटे बांधणार्‍या पक्ष्यांमध्ये अगदी छोट्या चष्मेवाला (व्हाइट-आय) ते कावळ्या पर्यंत अनेक पक्ष्यांचा समावेश होतो. दोन फांद्यांच्या बेचक्यात बरेचदा हे घरटे असते. या प्रकारात बारीक तंतू, धागे, कोळीष्टके वापरून एक मजबूत वाटीसारखे घरटे बनविले जाते. आतून छान अस्तर केले जाते. सुभग (कॉमन आयोरा), स्वर्गीय नर्तक (पॅराडाइज फ्लायकॅचर) इत्यादी पक्षांच्या घरट्याला बाहेरून सुद्धा कोळीष्टके व अनेक छोट्या वस्तू सुशोभीकरणासाठी लावलेल्या असतात. पाणकोंबडीच्या व कावळ्याच्या घरट्यात मात्र केवळ मजबूतीला प्राधान्य दिलेले असते. कावळा तर लोखंडी तारा मोठ्या मेहनतीने जमवतो. पाणकोंबडीच्या घरट्यात गवताच्या पात्यांचा वापर अधिक असतो.

घुमटाकार व चेंडूसारखी घरटी
मुनिया व भारद्वाज (ग्रेटर कुकल) पक्षाचे घरटे एखाद्या चेंडू प्रमाणे असते. गर्द फांद्यांच्या मध्ये आजूबाजूच्या परिसरातील पालापाचोळा वापरून त्यांना गोल गोळ्याप्रमाणे रचले व गुंतवले जाते. घरट्याचे प्रवेशद्वार एका बाजूस असते व आत मध्ये गोल खोली असते.

चिखलाची घरटी
आपल्या परिसरात आढळणाऱ्या धूसर पांगळी (डस्की क्रग मार्टिन), भिंगरी (स्वालो), भांडीक (क्लिफ स्वालो) या पक्ष्यांची घरटी मातीची असतात. धूसर पांगळीचे घरटे पर्वतीय कडांमध्ये एखाद्या बाहेर डोकावणाऱ्या खडकाखाली असते. लालपाठी भिंगरी (रेड-रम्प्ड स्वालो) तर पुलाखाली सुद्धा घरटे करते. भांडीकांची मात्र मोठी वसाहत असते. नद्यांवरील पुलाच्या खालच्या बाजूस बरेचदा त्यांची घरटी असतात. भांडीकांचे थवे चोचित चिखलाचे गोळे आणून छान गोल माठांप्रमाणे एकमेकांना चिकटलेली घरटी बांधतात. त्याला खालील बाजूस नळकांड्याप्रमाणे प्रवेशद्वार बांधतात. घरट्याच्या आत अंडी व पिल्लांसाठी पिसांचे अस्तर घातलेले असते. धूसर पांगळीची घरटी शहरांमध्ये व उंच इमारतींवर खिडकीजवळ तावदानाखाली सुद्धा असतात.
मातीची बशी अर्धवट कापून भिंतीला चिकटवल्यासारखे ते असते. दक्षिण अमेरिकेत आढळणाऱ्या ओव्हनबर्डचे घरटे असेच मातीचे पण नावाप्रमाणे ओव्हनच्या आकाराचे असते.
Dusky Crag Martin.jpg
(http://orientalbirdimages.org/birdimages.php?action=birdspecies&Bird_ID=... (Girish Ketkar)

लोंबकळणारी, शिवलेली, विणकाम केलेली घरटी
शिंजीर (सनबर्ड), फुलटोच्या (फ्लॉवरपेकर) आणि सुगरणची घरटी लोंबकळणारी असतात. फुलटोच्याचे घरटे अगदी छोटे असून मजबूतीसाठी कोळीष्टकांचा वापर केलेला असतो. घरटे अगदीच अनाकर्षक असते. कोळ्याचे जाळे वाटावे म्हणून त्याला बाहेरून अळ्यांची विष्ठा, कागदाचे तुकडे इ. द्वारा सजविले जाते. सुगरण पक्ष्याचे घरटे विहिरीवर, काटेरी झाडाच्या झुकलेल्या फांदीला, किंवा विद्युत तारांना सुद्धा विणलेले असते. घरटे मधेच फुगीर असून वरील बाजूस हे मजबूत गाठीद्वारे आधाराला बांधलेले असते. ही मजबुती जोराचा पाऊस आणि वादळी वारा सहन करू शकेल एवढी असते. खालच्या बाजूस असलेले नळकांड्यासारखे प्रवेशद्वार नाजूक असते. कुठलाही शत्रू, उदाहरणार्थ साप, त्याद्वारे घरट्यात प्रवेश करू शकत नाही. फुगिर भागात अंडकक्ष असतो. पण घरटे कितीही हेलकावले तरी अंडी खाली पडत नाहीत. ह्या अंडकक्षाच्या छताला चिखलाचे लिंपण घातलेले असते. त्यामुळे घरटे हेलकावत नाही.

शिंपी (टेलरबर्ड), वटवट्या (अॅशी प्रिनिया) ह्या पक्षाचे घरटे म्हणजे एक किंवा दोन पाने शिवून तयार केलेली छोटीशी पिशवीच असते. पळस, करदळी, केळी, बदाम अशा मोठ्या पानांचा उपयोग घरट्यासाठी करण्यासाठी केला जातो. घरटे पानाच्या नैसर्गिक उताराचा विचार करून शिवले जाते जेणेकरून पावसाचे पाणी आत शिरू नये. खरी कला आहे ती कोळीष्टके, नारळाचे तंतू, धागे जमवून पाने एकत्र शिवण्याची. इवल्याश्या घरट्यामध्ये कापूस, शाल्मलीचा सिल्क, पक्ष्यांची पिसे वापरून मऊ अस्तर घातलेले असते.

उंचवट्यावरची घरटी
काही पक्षी केवळ कचर्‍याचा ढिगारा जमवून उंचवटा तयार झाला की त्यावर छोटा खोलगट भाग तयार करतात आणि त्यात अंडी घालतात. निकोबार बेटावर आढळणारा निकोबार मेगापॉड हा पाणकोंबडी सारखा पक्षी असे ढिगाऱ्यावर घरटे तयार करतो. वारकरी पक्षाचे (कॉमन कूट) घरटे सुद्धा असेच असते. पण त्याचा बहुतेक भाग पाण्याखाली व थोडाच भाग पाण्यावर असतो. पेंग्विन पक्ष्याच्या काही प्रजाती दगडांचा ढिगारा जमवून त्या उंचवट्यावर अंडी घालतात.

वसाहती किंवा सामूहिक विण
करकोचे (स्टोर्क), चमचे (स्पूनबिल), पाणकावळे (कारमोरंट), सुगरण, झोळीवाले (पेलिकन) व भांडीक पक्षी सामूहिक विण वसाहतीमध्ये घरटी बांधतात. भांडीकाची घरटी एकमेकांना चिकटून असतात पण प्रत्येकाचे प्रवेशद्वार वेगवेगळे असते.
रोहित (फ्लेमिंगो) पक्ष्यांची, आल्बट्रोस, व गॅनेट इ. समुद्री पक्ष्यांच्या एका वसाहती मध्ये हजारो घरटी असतात.

रोहित पक्ष्यांची घरटी म्हणजे उथळ पाण्यात चिखलापासून तयार केलेला उंचवटा. उंचवट्यावर छोटा खळगा ठेवून त्यात अंडी घातली जातात. उंचवटा व त्याची उंची भरतीचे पाणी अंड्यापर्यंत पोहोचणार नाही अशी ठेवलेली असते.

रोहित पक्ष्यांची घरटीhttps://www.shutterstock.com/image-photo/colony-great-flamingo-birds-on-...

सुगरणीच्या एका विशिष्ट प्रजाती (सोशल विव्हर, आफ्रिका) मध्ये जवळपास शंभर घरटी एकाला एक चिकटून बांधलेली असतात.

आंतरिक सजावट असणारी घरटी
ऑस्ट्रेलियामध्ये आढळणाऱ्या बॉवरबर्ड ह्या पक्ष्यांची कलात्मक दृष्टी वाखाणण्याजोगी असते. विणीच्या काळात नर काटक्यांची छान कमान तयार करतो. कमानी समोरचे अंगण साफ करून अंगणात छान सजावट करतो. सजावटीमध्ये जांभळ्या, गुलाबी फुलांचा ढिग, सुंदर शिंपल्यांचा संचय अथवा प्लास्टिकच्या वस्तूंची सजावट केली जाते. काटक्यांच्या कमानी जवळ बसून तो गातो व माद्यांना त्याची ही गृहसजावट बघण्यासाठी आमंत्रित करतो. ही सगळी कलाकारी केवळ मादीला भुरळ घालण्यासाठी असते. एकदा जोडी जमली की नर मादी दोघे मिळून दुसरे घरटे बांधतात.
bowerbird.jpg
(बॉवरबर्डचे घरटे, छाया: https://www.birdforum.net/opus/Image:Vogelkopbowerbird.jpg)

डॉ. राजू कसंबे,
मुंबई

(पूर्वप्रसिद्धी ‘विज्ञान प्रचिती’)

Group content visibility: 
Use group defaults

मस्त माहिती. यातली फार थोडी घरटी प्रत्यक्ष पाहिलीत. सुगरणीचे घरटे कोणीतरी घरी आणून दिले होते. त्याची वीण इतकी पक्की की खालचा तो निमुळता भागही हाताने उसवणे अशक्य. घरट्यासाठी वस्तूंची जमवाजमव करताना खूप पक्ष्यांना पाहिलंय. मुनियाच्या मागून हिरवे गवत उडताना बघून हा कुठला पक्षी हा प्रश्न पडला, नंतर लक्षात आले की गवताची लाम्ब पात घेऊन मुनिया उडतेय. सोफिया कॉलेजात एकदा गेले असता एका उंच झाडाच्या शेंड्यवर एक खूप मोठे फडके दिसले. इतक्या उंचावर इतके मोठे फडके कोणी फेकले असेल हा विचार करत असतानाच घरट्याच्या बाजूला घार दिसली.

लेख अतिशय रोचक आहे आणि नेहमीप्रमाणेच अभ्यासपूर्ण आहे.

सुगरणीचं घरटं झाडावर पाहिलंय. एकाच झाडाला अनेक खोपे लटकत असलेले पाहिले आहेत. शिंपी पक्ष्यानं तर एकदा आमच्या गच्चीतल्या झाडावरच घरटं शिवलं होतं. जागूच्या आणि अवलच्या घरातले बुलबुल पक्ष्याच्या घरट्यांचे लेख आठवले.

असे दरवर्षी आकारमान वाढत गेल्यामुळे सुवर्ण गरुडाचे घरटे सहा फूट उंच आणि दहा फूट उंच व्यासाचे झाल्याची नोंद आहे. >>>> बब्बो! इतकी मोठी नाहीत पण अशीच मोठी मोठी घरटी भरतपूरच्या पक्षी अभयारण्यात बघितली होती.

ऑस्ट्रेलियामध्ये आढळणाऱ्या बॉवरबर्ड ह्या पक्ष्यांची कलात्मक दृष्टी वाखाणण्याजोगी असते. विणीच्या काळात नर काटक्यांची छान कमान तयार करतो. कमानी समोरचे अंगण साफ करून अंगणात छान सजावट करतो. सजावटीमध्ये जांभळ्या, गुलाबी फुलांचा ढिग, सुंदर शिंपल्यांचा संचय अथवा प्लास्टिकच्या वस्तूंची सजावट केली जाते. काटक्यांच्या कमानी जवळ बसून तो गातो व माद्यांना त्याची ही गृहसजावट बघण्यासाठी आमंत्रित करतो. ही सगळी कलाकारी केवळ मादीला भुरळ घालण्यासाठी असते. एकदा जोडी जमली की नर मादी दोघे मिळून दुसरे घरटे बांधतात. >> हे फार गोड आहे.

शेवटच्या फोटोतील पक्षी - बिचारा वाटतोय.
----
राखी धनेश छान आले आहेत.
-----------
झाडावर घरटी बांधणारे पक्षी मुंग्या आणि खारींपासून पिले कशी वाचवतात?

फारच सुंदर, नेहमीप्रमाणेच माहितीपूर्ण लेख! बॉवरबर्डची गृहसजावट कसली सुंदर आहे !!

DSCN3308.JPG

हे माझ्या घराजवळचं एक (काम चालू असलेलं) घारीचं घरटं

शेवटच्या फोटोतील पक्षी - बिचारा वाटतोय>>>>>

प्रतीक्षेत आहे हो तो.... बाईसाहेबांना माझी धडपड आवडते की नाही या चिंतेत Happy Happy

साधना मला तर तीच मादी वाटते आहे. कारण मी ती डॉ क्युमेंटरी पाहीलेली. त्या नराने बिचार्‍याने निळ्या फुलांच्या पायघड्या घातलेल्या आहे आणि ही बयाच उगाच नको तितका चोखंदळप णा दाखवते आहे.