व्हिस्की आणि वोडका

Submitted by Theurbannomad on 10 March, 2020 - 02:50

कधी कधी अनपेक्षितपणे जगावेगळी प्रेमकहाणी असलेल्या विलक्षण लोकांची गाठभेट घडते आणि प्रेम या संकल्पनेवरचा विश्वास अधिकाधिक दृढ होऊ लागतो. जात, धर्म, वर्ण, देश, भाषा, चालीरीती अश्या कोणत्याही कुंपणांना ना जुमानता प्रेम या एकाच गोष्टीवर ईश्वराइतकी निस्सीम भक्ती करणाऱ्या अशाच एका जोडप्याला भेटायचा योग आला आणि आजच्या जगात त्यांच्यासारख्या लोकांची कमी विधात्याने भरून काढली तर जगातल्या अर्ध्याहून जास्त समस्याच खरोखर चुटकीसरशी दूर होतील यावर माझा ठाम विश्वास बसला.

एकेकाळी रशियाचा भूभाग असलेल्या आणि आता स्वतंत्र अस्तित्व जोपासणाऱ्या युक्रेन नावाच्या देशात लहानाचा मोठा झालेला बोहदान आणि ज्यांच्या साम्राज्यावरचा सूर्य कधीही मावळत नाही अशी मिजास आज तो धड उगवण्याची मारामार असूनही मिरवणाऱ्या इंग्लंडची नोआ आफ्रिकेतल्या सोमालिया देशात समाजसेवा करायच्या उद्देशाने येतात काय, पेशाने डॉक्टर असल्यामुळे तिथे दोन वर्ष राहून शेकडो आजारी मुलांचा एका पैचाही मोबदला ना घेता उपचार करतात काय आणि तिथल्या गुंडांना पुरून उरत वाट चुकलेल्या पौगंडावस्थेतल्या मुलामुलींना शिक्षणाकडे आकर्षित करण्याचं अतिशय मोठं काम स्वतःहून अंगावर घेतात काय....त्यांची ही कहाणी ऐकायचा योग एका रक्तदान शिबिरात आला आणि माणसांमध्ये आजही माणुसकी शाबूत आहे याचा मला पुरेपूर प्रत्यय आला.

गडचिरोलीच्या आश्रमातील बाबा आमटे आणि त्यांच्या कुटुंबीयांचा कार्य आफ्रिकेत करणारं हे दाम्पत्य. आफ्रिकेच्या निबिड जंगलात केवळ मनुष्यबळी देण्यापासून स्थानिक टोळ्यांना रोखण्यासाठी त्यांनी जीव धोक्यात घातला होता. दर दिवशी स्वतःच्या हाताने ५०-६० मुलांना दोन वेळचा खाऊ घातलं होतं. त्यांना अंघोळ घालण्यापासून ते त्यांचं ढुंगण धुण्यापर्यंत कोणताही काम त्यांनी आनंदाने केला होतं. मी रक्तदान करत असताना मी त्यांना सहज त्यांच्याबद्दल विचारला आणि बाजूला उभ्या असलेल्या मदतनीस परिचारिकेने मला या दोघांची ही आणि अशी व्यवस्थित ओळख करून दिली.

नोआला मी भेटायला गेलो तेव्हा ' रक्तदान केलं का?' हा प्रश्न तिने आधी विचारला. दुबईसारख्या जागी हा उपक्रम का या माझ्या प्रश्नाला तिने ' आम्ही प्रत्येक देशात रक्तदान शिबिरं घेतोय...इथे शिबीर घेण्यामागे काही खास कारण नाही.' असं उत्तर दिला आणि ' मला माहित्ये, इथे आयुष्य खूप सुखवस्तू आहे आणि या सगळ्याची फारशी सवय लोकांना नाहीये, पण एका रक्ताच्या बाटलीमुळे किती जीव वाचू शकतात हे कोणी बघतच नाही' अशी तक्रारसुद्धा केली. तिने स्वतः चाळीस वर्षाच्या आयुष्यात शंभरहून अधिक वेळा रक्तदान केल्याचं मला कळलं आणि आपण या बाबतीत किती बेजबाबदार आहोत याची जाणीव अधिक खोलवर झाली.

मुद्दाम शिबिरात घुटमळून शेवटी शिबिराची वेळ संपल्यावर मी त्यांना मदत करायची तयारी दर्शवली आणि तिथल्या छोट्या छोट्या कामांमध्ये मला त्यांनी सामील करून घेतलं. दोघांपैकी बोहदान थोडासा अबोल होता आणि नोआ नेमकंच बोलत होती, तरीही मी त्यांना जास्तीत जास्त बोलता करायचा प्रयत्न करत होतो. शेवटी त्यांनी त्यांची कहाणी मला सांगितली आणि मला भूकंपाच्या केंद्रबिंदूवर उभं करून ते पुढचं काम करायला गेले.

बोहदान युक्रेन मधल्या खार्कोव्ह शहरात जन्माला आला आणि वाढला. साम्यवादी सरकारचा पोलादी पडदा ज्या घटनेमुळे डळमळीत झाला, त्या चेर्नोबिल अरिष्टाच्या वेळी तो महाविद्यालयात होता. पुढे २-३ वर्षातच रशियाचं विभाजन झालं आणि रातोरात तो एका वेगळ्या देशाचा नागरिक झाला.अशा डळमळीत परिस्थितीत जिद्दीने त्याने शिक्षण पूर्ण करून वैद्यकशास्त्रात पदवी मिळवली आणि स्वतःचा व्यवसाय सुरु केला. पण सततच्या राजकीय घडामोडींनी कंटाळून त्याने देश सोडला आणि एका आंतरराष्ट्रीय संस्थेतर्फे आफ्रिकेत आला. मुळात नास्तिक, त्यात साम्यवादाच्या झळा सोसलेलं बालपण आणि चांगला चाललेला व्यवसाय सोडायला लागल्यामुळे आलेला कडवटपणा यामुळे तो आफ्रिकेच्या त्या विधायक कामात पूर्णवेळ रमला.

नोआ अश्या देशात जन्माला आली होती, जिथली मध्यमवर्गीय कुटुंबं अनेक देशांमधल्या उच्चभ्रु कुटुंबांपेक्षा जास्त सुखवस्तू होती. अतिशय लाडाकोडात गेलेलं लहानपण, चांगल्या महाविद्यालयात झालेलं वैद्यकीय शिक्षण आणि त्यानंतर आपसूक चालत आलेली श्रीमंती यामुळे आयुष्य अतिशय आरामात सुरु होतं. अनेक देशांमध्ये फिरल्यामुळे तिच्याकडे अनुभवाची रग्गड शिदोरी जमलेली होती. अश्या या आयुष्याला अचानक दृष्ट लागावी, तसं काहीसं तिच्या बाबतीत झालं.

कामावरून रात्री उशिरा परत जाताना तिला गुंडांच्या टोळीने धरलं आणि तिच्याकडेच होतं नव्हतं ते लुटून तिला मारहाण करून रस्त्यावर सोडून दिलं. त्या घटनेत तिला गर्भाशय गमवावं लागलं आणि कधीही मूल जन्माला न घालू शकणाऱ्या तिच्यासारख्या स्त्रीला अचानक आजूबाजूच्या सुंदर वातावरणातल्या भेसूरपणाची जाणीव झाली. प्रियकर केवळ याच कारणासाठी तिला सोडून गेला आणि ती कोलमडली.

त्या घटनेनंतर केवळ मनःशांतीसाठी तिने सेवाभावी संस्थांमध्ये जाऊन लोकांना मदत करायला सुरुवात केली आणि तिला आयुष्य जगण्याची खरी गुरुकिल्ली सापडली. अशाच एका संस्थेतर्फे आफ्रिकेत आल्यावर तिला बोहदान भेटला आणि दोघांनी मिळून आयुष्यभर एकत्र राहायचा आणि काम करायचा वसा घेतला.

स्वतःचं मूल होणं शक्य नसल्याचा त्यांना आनंद होता, हे ऐकून मी थक्क झालो. आम्हाला आमचा मूल झालं, तर आमच्या कामावर त्याचा परिणाम होईल, म्हणून आम्हाला ते नको होतं आणि म्हणूनच नोआचं गर्भाशय काढल्याचा आम्हाला आनंद आहे हे त्यांचं बोलणं मला सुन्न करून गेलं. त्या गुंडांना शिक्षण मिळालं असतं , चार पैसे कमवायचा मार्ग मिळाला असता तर त्यांनी ते कृत्य केला नसतं, अशा त्रयस्थपणे ते दोघेही त्या घटनेकडे बघत होते. सोमालिया मध्ये एका स्थानिक गुंडाने त्यांना मारायला मारेकरी पाठवले आणि त्यातल्या दोघांनी त्यांना बघून उलट स्वतःच्याच साथीदारांना गोळ्या घातल्या, कारण त्यांच्या घरच्या लहान मुलांचे या दाम्पत्याने औषधोपचार केले होते असे अनेक अनुभव त्यांनी मला सांगितले. त्यांनी शिकवलेल्या एका स्थानिक मुलाने त्याच्या वस्तीत शाळा काढून आजूबाजूच्यांना लिहा-वाचायला शिकवायला सुरुवात केली हे सांगताना त्यांच्या चेहर्यावर स्वतःच्या मुलाची एखादी मोठी कामगिरी सांगितल्याचं समाधान होतं.

त्या सहा तासांमध्ये एक माणूस म्हणून मी खूप समृद्ध झालो. फुकट आणि विनामूल्य या दोन गोष्टींमधला फरक मला व्यवस्थित जाणवला आणि ईश्वरावर जराही विश्वास न ठेवणारे हे दोन नास्तिक मला ईश्वराचं तासनतास नाव घेणाऱ्या लोकांपेक्षा ईश्वराच्या जास्त जवळ गेलेले वाटले.

ब्रिटिश लोकांना आपल्या व्हिस्कीचा आणि रशियन लोकांना आपल्या वोडकाचा कमालीचा अभिमान आहे हे मी जाणून होतो , पण या दोन्हीचं मिश्रण आयुष्यभराची 'किक' देऊन जाईल, असं मला स्वप्नातही वाटलं नव्हतं!

तळटीप - या घटनेत उल्लेख झालेल्या व्यक्तींच्या कुठेही स्वतःच नाव येऊ न देण्याच्या व्रतस्थपणाचा आदर ठेवून या लेखात त्यांची नावं बदललेली आहेत.

प्रांत/गाव: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

छान Happy