भुताचा भाऊ

Submitted by Theurbannomad on 10 March, 2020 - 02:20

चित्रविचित्र गोष्टींचा नाद असणारी अनेक माणसं आपल्या आजूबाजूला आपल्याला दिसतात आणि त्यांच्या त्या विक्षिप्तपणातूनअनेक नवे नवे अनुभव आपल्याला येऊ शकतात. नाकासमोर बघून चालना या लोकांना मान्य नसतं. अशा लोकांबरोबर घालवलेले काही क्षण सुद्धा साधा सरळ जीवन जगणाऱयांना विलक्षण वाटू शकतात. इद्रिस नावाच्या या विचित्र माणसाबरोबर मला मिळालेले दोन दिवस माझ्यासाठी अतिशय वेगळ्या विश्वातले अनुभव देऊन गेले.

हा इद्रिस जन्माने आफ्रिकेतल्या ट्युनिशिया नावाच्या तुलनेने अनोळखी देशाचा रहिवासी. भूमध्य समुद्राच्या कुशीत शांतपणे पहुडलेला हा खुशालचेंडू देश एके कालच्या ग्रीक आणि रोमन साम्राज्याचा भाग होता. आधुनिक जगाला या देशाची ओळख २०११ साली महिनाभर चाललेल्या जस्मिन क्रांतीमुळे झाली. अरब जगतात खळबळ माजवणारी ही क्रांती पुढे अनेक देशांच्या शासकांचे बळी घेऊन थंडावली असली तरी त्याच्या खुणा आज सुद्धा अरब देशांमध्ये पावलोपावली दिसतात.

२०१४ साली ३ वर्षांचा भारतातला मुक्काम संपवून दुबईच्या माझ्या कर्मभूमीत मी परत आलो आणि काही काळ स्थिरस्थावर होईपर्यंत एकटा राहिलो, तेव्हाचा हा माझा अनुभव आहे. भुताखेतांवर, काळ्या जादूवर आणि तत्सम तांत्रिक प्रथांवर माझा खूपसा विश्वास जरी नसला, तरी त्या गोष्टींचा अस्तित्व मला मान्य आहे. किंबहुना विज्ञानाच्या कसोटींवर अनेक गोष्टीं अशक्य वाटत असल्या तरी आजपासून १०० वर्षांनी त्यातल्या अनेक शक्य झालेल्या दिसतील असा माझा ठाम समज असल्यामुळे कोणत्याच गूढ आणि अगम्य गोष्टींचा अस्तित्व मला पूर्णपणे नाकारायला आवडत नाही. अशा अनेक अगम्य गोष्टींचा पाठपुरावा करणारा इद्रिस नावाचा हा इसम मला अपघातानेच भेटला आणि आला तसा तो आपल्या वाटेने दोन दिवसांनी निघूनही गेला, पण त्या दोन दिवसात त्याने मला जे दिलं, ते शब्दात सांगणं मला खरोखरच कठीण आहे.

हा इद्रिस व्यवसायाने 'ghost hunter ' होता असा त्याने मला सांगितलं. जगभर फिरून भुताखेतांच्या गोष्टी, लोककथा आणि झपाटलेल्या ठिकाणांबद्दलची माहिती गोळा कारणं हे काम हा माणूस पूर्णवेळ करत होता. जगातल्या अनेक ' paranormal societies ' चा हा सदस्य होता. बॅगेत चित्रविचित्र यंत्र, पुस्तकं , तऱ्हेतऱ्हेचे खडे, मणी आणि काय काय घेऊन हा अवलिया मानवी आकलनशक्तीच्या पलीकडे असणाऱ्या कोणत्या तरी अगम्य गोष्टींचा थांग शोधायचा प्रयत्न करत होता. घरात लागणाऱ्या साहित्याची खरेदी करून थकल्यामुळे मी एका कॉफी शॉप मध्ये पोटपूजा करायला बसलो होतो, तेव्हा माझ्याकडच्या पिशवीत असलेलं नुकताच बर दुबई च्या मंदिराबाहेर घेतलेलं पितळेच्या तुकड्यावर कोरलेलं लक्ष्मी यंत्र पाहून हा माझ्या बाजूला आला आणि त्या यंत्राची चौकशी करायला त्याने सुरुवात केली , तेव्हा या महाभागाची आणि माझी पहिली भेट झाली .

पावणेसहा फुटाची उंची, दिवसेंदिवस ना विंचरलेले आणि स्वतःच्या मर्जीने कुठेही आणि कसेही वाढलेले कुरळे केस, जुन्या घरांच्या भिंतींवर पावसाळ्यात बुरशी येते, तशी दिसणारी खुरटी दाढी, तोंड मिटलेलं असतानाही हळूच बाहेर डोकावणारे पुढे आलेले दात आणि डोळ्यांवर पूर्वीचे लोक घालायचे तसा जाड फ्रेमचा चष्मा अश्या अवतारातला हा इसम नक्की काय शोधायला आलाय हे मला कळेना. माझ्याकडच्या त्या यंत्राबद्दल त्याला असलेलं कुतूहल आमच्यातल्या अनोळखीपणाच्या सगळ्या रेषा पुसून टाकायला पुरेसं होतं. अस्खलित इंग्रजीमध्ये आणि अतिशय मृदू सुरात बोलत असल्यामुळे सुसंस्कृत वाटणारा हा मनुष्य नक्की आहे तरी कोण, म्हणून माझी उत्सुकता चाळवली गेली आणि मी त्याच्याशी संवाद साधायचा ठरवलं.

' हे लक्ष्मी यंत्र आहे. भारतीय लोक आपल्या घरी हे ठेवतात कारण त्यामुळे घरात लक्ष्मीचा वास राहतो असा मानलं जातं. लक्ष्मी हि देवी आमच्या देशात धनाची देवी मानली जाते. '

' oh how interesting ! can I buy one for myself ? " मी त्याला ते यंत्र दिलं आणि ' कुठे तू शोधात बसणार..त्यापेक्षा हेच घे' असं आमिष दाखवून माझ्या पुढच्या संवादांची दारं उघडी करून घेतली. १० मिनिटं कॉफी पिण्यासाठी थांबलेलो मी आता पुढचे २-३ तास या माणसाबरोबर छान गप्पा मारणार होतो.

त्याने मला तो 'पॅरानॉर्मल एक्स्पर्ट' आहे असा सांगितल्यावर मी खरं तर थोडासा घाबरलो. चुकून माकून अघोरी विद्या करणारा निघाला तर हे विकतचा दुखणं मला या परदेशात जड जाऊ शकतं, हे कळत असल्यामुळे मी थोडा सांभाळून बोलायला लागलो. त्याने ओळखलं असावं , कारण त्याने पुढच्य अर्ध्या तासात मला एका वेगळ्याच दुनियेची विचित्र आणि तरीही विलोभनीय सफर घडवली.

हा एकटा जीव स्वतःच्या घरातसुद्धा फारसा रमला नाही. वडील पुरातत्व विभागात कामाला असल्यामुळे आणि घरात प्राचीन काळातल्या लिप्या, चित्र, संस्कृत्या अशाच विषयांवर चर्चा होत असल्यामुळे याला लहानपणापासूनच अनेक अगम्य विषयांमध्ये गोडी निर्माण झाली. पुढे पुरातत्वशास्त्रात विशारद होऊन त्याने ३-४ वर्ष उत्खननात आयुष्य घालवलं. आफ्रिकेच्या एका कोपर्यात अशाच एका पुरातन जागी उत्खननात मिळालेल्या जादूटोण्याशी संबंधित असणाऱ्या वस्तूंमुळे यांचं गूढविद्येबद्दलचं कुतूहल चाळवलं गेलं आणि त्या दिवसापासून आजपर्यंत १२ वर्ष त्याने जगभर यांचं विषयाचा पाठपुरावा करण्यात आयुष्याची इतिकर्तव्यता मानलेली होती. या अश्या विषयावर डॉक्टरेट मिळवलेला हा माणूस मला त्या गूढ विद्यांइतकाच अगम्य वाटत होता.

' तू दुबई मध्ये कशाचा अभ्यास करायला आलायस?'

' म्हणजे तुम्हा लोकांना माहित नाही कि काय? इथे अनेक अश्या जागा आहेत, ज्या 'haunted' किंवा 'possessed ' आहेत. आता तू विचारशील दोन्ही एकूण एकचं ना? पण तसं नसतं. जेव्हा एखाद्या व्यक्तीला आजूबाजूला एखाद्या अदृश्य शक्तीची सतत जाणीव होत असते तेव्हा तशा जागेला haunted म्हणतात, पण त्या शक्तीने जागेचा, शरीराचा किंवा अनेक गोष्टींचा ताबा मिळवलेला असतो तेव्हा त्याला possessed म्हणतात. माझा भूत, पिशाच्च, तंत्र-मंत्र या प्रकारांवर अंधविश्वास नाही, म्हणून वेगवेगळ्या यंत्रांद्वारे आम्ही अश्या जागी होणाऱ्या सूक्ष्म बदलांना टिपून त्यातून काही ठोकताळे बांधायचा प्रयत्न करतो. बरेचदा लोकांनी उगाच पुड्या सोडलेल्या असल्यामुळे हाती काही लागत नाही, पण जेव्हा लागतं तेव्हा मजा येते.'

' इथे कोणत्या अश्या जागा आहेत?'

' अरे एक अक्ख्ख शहर आहे, खूप जुनं. Ras Al Khaimah या emirate मध्ये जझीरात अल हमरा नावाचं. पूर्वीच्या काळी जाब नावाच्या टोळीचा ते शहर, जिथे मोत्यांचा व्यापार चालत होता, ते अचानक तिथले रहिवासी सोडून गेले. मी पुढच्य आठवड्यात तिथे दोन सलग रात्री राहून काही आहे का ते शोधायचा प्रयत्न करणार आहे. सौदीमध्ये माझा पुढचा मुक्काम आहे, तिथे सुद्धा जेद्दाह शहरात असाच एक घर आहे. '

सामान्य माणसाच्या फिरण्याच्या आणि या विलक्षण माणसाच्या फिरण्याच्या जागा किती वेगळ्या आहेत, याचं मला मनापासून आश्चर्य वाटत होतं. त्याचबरोबर, तो अंधश्रद्धा किंवा मात्र-चमत्कार यापासून मैलोन मैल लांब राहून गूढविद्येसारख्या विषयाचा एका शास्त्रज्ञासारखा विचार करत होता हे माझ्या मनाला जास्त भावलेलं होतं.

' अश्या सगळ्या गोष्टी करताना भीती नाही वाटत? कोणी दुष्ट आत्मा किंवा शक्ती तुलाच आपल्या कह्यात घेईल असा कधी नाही वाटत तुला?

' मित्रा, जिवंत माणसांचा काम रे ते. आत्मे तसे नसतात. दुष्ट व्यक्तींचे आत्मे सुद्धा माझ्या अनुभवाप्रमाणे खूप कमी वेळा त्रास देतात. मी अनेक वेळा अश्या अदृश्य शक्तींशी संवाद साधायचा प्रयत्न केलाय, त्यांचा अस्तित्व जाणवल्यावर एक पाऊल पुढे जाऊन त्यांच्या दुनियेत आपल्याला डोकावत येऊ शकतं का ते बघायचा प्रयत्न केलाय पण कधीही मला त्यांचा त्रास नाही झाला.'

हे सगळं आता मला कुतूहलाचा वेशीबाहेर पडून अभ्यासाच्या गावाकडे घेऊन जात होतं. भूताखेतांचे २०-२५ प्रकार त्याने मला हॉटेल च्या मेनू कार्ड वर पनीरच्या भाजीचे प्रकार असल्यागत सांगितले आणि भुतांच्या दुनियेत सुद्धा चांगलीच variety आहे हा साक्षात्कार मला झाला. आफ्रिका, दक्षिण अमेरिका, भारत, इंडोनेशिया अशा अनेक जागांच्या अनेक कहाण्या त्याच्याकडे होत्या आणि त्या ऐकताना माझ्या मनात सतत एक विचार येत होतं, की हा माणूस नक्की भानावर आहे कि झपाटलेला ?. दुपारच्या ३ वाजल्यापासून जवळ जवळ रात्रीच्या जेवणाची वेळ होईपर्यंत त्याने मला त्याच्या गूढ दुनियेची मनसोक्त सफर करवून आणली आणि एकत्र जेवून शेवटी मनात नसून हि मला त्याला त्या दिवसाचा निरोप द्यावा लागला.

घरी आल्यावर झोपताना दिवे मालवायची माझी हिम्मत झाली नाही आणि रात्री ३-४ वेळा तरी दचकून मला जाग आली. चविष्ट लागलं म्हणून भरपेट जेवावं आणि रात्री पोटाने असहकार पुकारावा, तशी काहीशी माझी अवस्था होती.

दुसऱ्या दिवशी ठरल्याप्रमाणे पुन्हा त्याला भेटलो. देवळाच्या बाहेरच्या दुकानातून त्याने होती नव्हती ती सगळी यंत्र गोळा करून आणली होती आणि त्यांच्याशी संदर्भ असलेल्या पुस्तकांची यादी त्याच दुकानदाराकडून घेऊन हा महाभाग पुढच्या ३-४ महिन्याच्या अभ्यासाची बेगमी करून आला होता. अरब देशांमधल्या अनेक अगम्य ठिकाणांचा नकाशा त्याने तयार केला होता आणि दुसऱ्या दिवशी त्या ' शहाण्या माणसांनी सोडून दिलेल्या ' जझीरात अल हमरा शहरापासून त्याच्या अरबस्तानातल्या वेडेपणाचा श्रीगणेशा होणार होता.

२-३ तासांनी निघायची वेळ आली, आणि मी त्याला त्याचा नंबर आणि e-mail विचारला. आपण भेटावं अशी निसर्गातल्या शक्तींची इचछा असेल तर आपण पुढे भेटूच रे, नको काळजी करुस असा काहीसा तो बोलला आणि मला उगीच त्याने आपला दुसऱ्या जगातला एक मित्र माझ्या पाळतीवर सोडलाय कि काय अशी शंका मनात येऊन गेली. जाताना त्याने मला 'पॅरानॉर्मल सोसायटी ' चा सदस्य व्हायची शिफारस केली आणि रीतसर निरोप घेऊन स्वारी त्याच्या त्या गूढ दुनियेच्या सफरीवर निघून गेली.

त्या दिवसानंतर मला तो कधीही भेटला नाही. Social Media शोध घ्यायचा प्रयत्न केला पण तिथेही मला तो सापडला नाही. कदाचित आपल्या प्रिय दुनियेतल्या सवंगड्यांसारखा तो सुद्धा अचानक प्रकट आणि गायब होण्यावर विश्वास ठेवत असेल, कोणास ठाऊक!

प्रांत/गाव: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

माझ्या नवर्‍याला यु केत एकाने एक चांदीत गुंडाळलेली तांब्याची कॉइन दिलेली आहे. त्याने सांगीतलेले की याची चांदी काढू नको. आणि नवर्‍याने घेतली. घ्यायची नाही ना! Sad
चांदी आता झिजत चालली आहे. त्यावर नागाचे वगैरे विचित्र चित्र आहे.
मला तर भीतीच वाटते असे काही घ्यायची.

माझ्या माहितीप्रमाणे कोणत्याही वस्तूतून नकारात्मक ऊर्जा मिळत असेल तर तसं आपल्याला समजतं. फक्त त्यासाठी आपण विचार करताना त्या वस्तूबद्दल तटस्थ राहिलं पाहिजे.