रोजच्या जीवनात येणारे थरारक प्रसंग

Submitted by पशुपत on 9 March, 2020 - 06:20

एक प्रसंग मनावर कोरला गेलेला आहे. १९८९ मधे दिल्लीला मुलाखतीसाठी गेलो होतो. डिसेंबरचे दिवस , मरणाची थंडी !.
मी झेलम एक्स्प्रेसने रात्री ९ ला स्टेशनला उतरून धौला कुवाला रिक्षाने गेलो. मित्राच्या भावाकडे ( नेव्ही क्वार्टर्स ) जायचे होते. फोन नव्हते. चुकीच्या गेटला उतरलो. आत सिक्युरिटीला विचारल्यावर हे कळले. मग त्याने सांगितले चालत कसे जायचे. कुडकुडत , न झेपणारे सामान घेऊन चालता झालो. १० मिनिटाचे अंतर . पाच मिनिटाने , आलो तिथले दिवे आणि पोहोचायचे होते तिथले दिवे क्षीण दिसू लागलेले. किर्र अंधार , रातकिड्यांची किरकिर. आकाशात छोटी चंद्रकोर... इतक्यात बाजूने दोन कुत्रे हुश हुश करत आले .. पायातले उरले सुरले त्राणही गेले. मनात भीमरूपी म्हणायला लागलो. मग मेंदू चालू लागला. कुत्रे माझ्यावर भुंकत नव्हते.. याचा अर्थ ते पाळीव आणी ट्रेंड आहेत ! इतक्यात त्यांचा मालक माझ्ह्या बाजूने येऊन माझ्याशी बोलू लागला ! जीव भांड्यात पडणे म्हणजे काय त्याचा खरा खरा खरा अनुभव आला.
तो ऑफिसरच होता . मित्राच्या भावाला ओळखणारा !. त्याने मला सोबत केली आणि योग्य इमारतीत आणून सोडले . त्याचे आभार मानायचे भानही त्यावेळी मला उरले नव्हते.
त्याच ट्रिप मधला शेवटच्या दिवशीचा रात्रीचा प्रसंग असाच थरार अनुभवाचा.
पुण्यातल्या आमच्या कट्टा गँगमधला एक मित्रही त्या काळात दिल्लीत नोकरी करायचा. त्याला भेटायला संद्याकाळी (ज्या मित्रा च्या भावाकडे राहिलो होतो त्याची) जुनी बजाज १५० स्कूटर चालवीत गेलो. रात्री हॉटेलात जेऊन, गप्पा मारून निघालो. मला दिल्लीची काडीमात्र माहिती नाही. कडक अंधार , निर्मनुष्य रस्ते , थंदीचा कडाका ! त्या मित्राने मला ज्या एरियात जायचे होते तिथे जाणार्या चौकात आणून सोडले. आणि गप्पा मारून तो परत निघाला . तो कुठलीशी बस पकडून जाणार होता, त्याने मला माझ्या वाटेतल्या खाणाखुणा सांगून ठेवल्या. मी स्कूटर चालू केली आणि निघालो तर काय, स्कूटरचे टायर फ्लॅट. ओरडून आधी त्याला हाक मारली. तो भारी धीराचा. त्याने पहाणी केली आणि शोध लावला कि व्हाल्व्ह मधली पिन अडकली आहे. नशीबाने ज्या कॉर्नरवर आम्ही उभे होतो , तो पेट्रोल पंपच होता. आता तिथल्या मिणमिणत्या दिव्याच्या प्रकाषात आम्ही तार शोधू लागलो . २ - ४ मिनिटानी ती मात्र सापडली. व्हाल्व्हची पिन सरळ करण्यात यशही मिळाले. आता प्रष्ण होता हवा कशी भरायची ! तिथल्याच हवेच्या नळीचा अंदाज घेतला. माझ्या नशीबाने काँप्रेसरमधे हवेचे पुरेसे प्रेशर होते. हवा भरली. संकटात मेंदू तीक्ष्णपणे काम करतो . त्याला म्हंटले ५ मिनिटे हवा टिकते आहे याची खात्री करू. ती टिकली. मग तो म्हणाला इथून माझे घर ५ मिनिटाच्या (स्कूटरवरून) अंतरावर होते. (३-५ कोलोमीटर असावे) . तू माझ्यासाठी त्या कॉर्नरवर १५ मिनिटे थांबणार आणि तोपर्यंत मी परत आलो नाही तर मी सुखरूप घरी पोहोचलो असे समजून निघून जाणार असे ठरले.
मग मी निघालो . तो ५ मिनिटाचा प्रवास अजून लक्षात आहे. लांबून आमची बिल्डिंग दिसू लागल्यावर परत खूप खूप खूप आनंद झाला.

आता या प्रसंगांचे इतके काही वाटत नाही पण त्या वेळी मात्र खूप थरारक वाटले होते.

तुमच्या जीवनात असे काही प्रसंग घडले असतीलच. इथे सांगण्या साठी स्वागत आहे.

शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

सिंहगड म्हणजे अश्या अनुभवांचा राजाच आहे बहुतेक..
एकदा मी आणि माझा एक मित्र असेच जाऊया म्हणून सिंहगडावर्ती निघालो.
नेहमी सरळ वाटेने जातो, आज जरा जंगलातून जाऊया म्हणून वाट सोडून शेजारच्या ओढ्यात घुसलो.
प्लॅन होता की वाटेच्या कडेकडेने ओढ्यातून जाऊ, वरती पोचलो की वाटेने घुसू.
पण ओढ्यात जाता जाता त्याला फाटे फुटले, आणि वाट सोडून आम्ही कधी दूर गेलो हे वरती सिंहगडाचा कडा लागल्यावरतीच कळलं.
मग तरी शहण्यासारखं खाली यावं ना, पण नाही. आम्हाला एक गुरांची वाट दिसली, मग आम्ही त्या वाटेने निघालो पायवाट गाठायला..
ती वाट म्हणजे एका बाजूला डोंगर, एक बाजूला दरी आणि निसरडा मातीचा रास्ता.
माझ्या पायात साध्या चप्पल. त्याच्या पायात बूट.. त्या वाटेने जात जाता अचानक त्या सुटलेल्या कोरड्या मातीवरून चप्पल घसरायला लागले. एक फूट खाली गेलं की दरी.. चप्पल घसरायला लागले म्हणून वरच्या डोंगरावरच्या बारीक गवताचा आधार घ्यायला गेलो तर ते गवत उपटून हातात.. असली तंतरलेली.. पण त्याच क्षणी वरच्या मातीत बोटं रुतवली, अजिबात हालचाल न करता तसाच उभा राहिलो, आणि पुढे गेलेल्या मित्राला हाक मारली.
तो मागे आला, आणि मला हात देऊन वाटेवरून पलीकडे का मागे घेऊन आला..
गुपचूप शहण्यासारखा सगळं चढलेले उतरलो आणि पुन्हा मुख्य वाटेने वरती गेलो.

त्या दिवसापासून मूर्खासारखे साहस करणे बंद केले. आयुष्याची किंमत खऱ्या अर्थाने कळली.

आनंदा
खरे तर अशा प्रसंगात पर्याय खूप कमी असतात.
तुमचे नशीब च जोरावर होत म्हणून नाही तर अजुन गंभीर संकटात सापडला असता.

>> सिंहगड म्हणजे अश्या अनुभवांचा राजाच आहे बहुतेक..

हे खूप खरे आहे. सिंहगडाच्या वाटेवर बऱ्याच घटना घडल्या आहेत. दहा बारा वर्षांपूर्वी एका घटनेची बातमी सतत येत होती. एक ग्रुप तिथे ट्रेकिंगला गेला होता. त्यात एक तरुणी मागे राहिली. ती मध्येच अचानक गायब झाली. पुढे गेलेल्या ग्रुपने तिची बराच वेळ वाट पहिली पण ती आलीच नाही. तिचा त्यांनी शोध घेतला असता ती सापडली नाही. नंतर त्यांनी पोलीस तक्रार वगैरे केली. मग तिला शोधायचे प्रयत्न झाल्याच्या बातम्या अधूनमधून येत राहिल्या. पण ती कधीच सापडली नाही किंवा तिच्याशी संबंधित असे काहीच हाती लागले नाही. कालांतराने त्या बातम्या यायच्या पण बंद झाल्या.

असे अजूनही प्रकार घडले आहेत तिथे. या सर्व पार्श्वभूमीवर वर अनुभव कथन केलेल्या मुली फार म्हणजे फार नशिबवान होत्या इतकेच म्हणेन.

हो atulpatil लघुपट तर खरच होऊ शकेल..एकदम फिल्मी परिस्थिती झाली होती आमची..आम्ही सुद्धा आता विचार करतो की आपण इतक्या संध्याकाळी गाडीने खाली न जाता जंगलातून जायचा निर्णय कसा घेतला असेल..आता दिवसा सुद्धा जायची हिम्मत होत नाही त्या जंगलातून..

Atulpatil बाप रे इतकं भयानक सुद्धा झालेलं आहे काय..
आता हे वाचून भीतीने धडकीच भरली मला..आमच्याबरोबर अस काही झालं आता तर..थोडक्यात बचावलो नशीबवान च म्हणावं लागेल खरच..

आनंदा..आपण एखादी गोष्ट सुरू करतो तेव्हा त्याचे धोके लक्षात येत नाही हेच खरं आहे..नाहीतर कोण उगाच आपला जीव धोक्यात घालेल..आणि सिंहगड च जंगल खरच अवघड आहे..
आम्ही सिंहगड ला जायच्या 7 8 दिवस आधीच एक गर्भवती स्त्री सेल्फी काढताना तिथून खाली दरीत कोसळली होती..मला तर रात्री अंधारात तीच आठवत होती खूप वेळ..भयानक भीती वाटायची..

2012 चा जून महिना. मी आणि माझा मित्र पुण्यावरून बाईक वर कोथळीगड ( पेब चा किल्ला) च्या ट्रेक साठी पहाटे निघालो. पुण्यात उकाड्याने हैराण झाल्यामुळे ह्या ट्रेक मध्ये मनसोक्त भिजणे हा पण उद्देश्श होता. पण कोकणात पण एव्हाना पाऊस सुरू झाला नव्हता. दिवस भर पावसाचा एकही टिपूस नव्हता. उलट कोकणातल्या दमट हवेने ट्रेक चांगलाच खडतर झाला. गड फिरून खालच्या गावात आलो तेंव्हा लक्षात आलं की एकाचं हेल्मेट वरच राहिलं होतं. पुन्हा आशा गरमीत पावसाला शिव्या देत परत गड चढलो आणि हेल्मेट घेऊन परत आलो. परतीचा प्रवास सुरु केला तेंव्हा अंगाची लाही लाही झाली होती. आकाश निरभ्र होतं. दूर कुठेतरी एकच ढग दिसत होता. पण आम्ही दिलेल्या शिव्या कदाचित पावसाला आवडल्या नसाव्यात. गाफील सैन्यावर शत्रूने डाव साधून आक्रमण करावे तसं काहीतरी झालं. अगदी थोड्या वेळात वातावरण पूर्ण बदललं. काळे ढग दाटून आले आणि सोसाट्याचा वारा सुरू झाला. फाटा ओलांडून आम्ही मुरबाड कर्जत रस्त्याला लागलो तेंव्हा पावसाने टॉप गियर टाकला होता सोबत कवरिंग फायर द्यायला सोसाट्याचा वारा आणि ढगांचा गडगडाट होताच. एक वेळ अशी आली की पावसाच्या थेंबाच्या आक्रमणाने पुढे जाणेच अशक्य झालं. रस्त्यावर पण पाण्याचे लोट एवढे वहायला लागले की रस्त्याची साईड पट्टी संपते कुठे आणि चर कुठे सुरू होतो हेच लक्षात येत नव्हते. त्यात रस्ता वळणावळणाचा. सगळा धोका लक्षात घेऊन तिथेच थांबण्याचे ठरले. रस्ता निर्मनुष्य होताच. रस्त्यावरच गाडी साईड स्टँड वर लावून बाईकच्या आडोशाला बसून राहिलो. एवढ्यात फोटो काढन्यासाठी फ्लॅश मारावा तसा मोठ्ठा प्रकाश पडला आणि कानाचे पडते फाटतील एवढा गडगड आवाज करीत आमच्या पासून 50 फुटांवर एका झाडावर वीज कोसळली. निसर्गाच्या ह्या थरार नाट्याचे आम्ही मूक साक्षीदार होतो. अजून इथे थांबलो तर निसर्गाचा रोष आपल्यावर पण ओढवेल हे जाणून आम्ही पुढे जाण्याचे ठरवले. गाडीची किक मारतच होतो की पुन्हा फ्लॅश पडला , पुन्हा त्या कानठळ्या आणि पुन्हा काही अंतरावर दुसरी वीज पडली. 10 मिनिटाच्या अंतरात 2 विजा कोसळल्या होत्या. मानसिक अवस्थेचं वर्णन करणं अशक्य आहे. तशाच अवस्थेत कसेतरी हळू हळू पूढे जात राहिलो. थोड्या वेळाने कर्जतच्या अलीकडची घरे दिसायला लागल्यावर जीव भांड्यात पडला.
कर्जत मधल्या एक हॉटेल मध्ये थांबलो. भूक लागली होतीच पण चित्त थऱ्यावर आणणे हा मूळ उद्देश्य. मूकपणे जेवण यायची वाट पाहत होतो. हॉटेल वल्याने टीवी लावला. टीवीवर रविना टंडन टीप टीप बरसा पाणी वर नाचत होती.एकीकडे नायक नायिकेमध्ये उत्कट भाव निर्माण करून प्रेम रस पसरवणार टीप टीप पाऊस तर दुसरीकडे धरतीवर आक्रमण करीत , समोर येईल ते नष्ट करणारा तो प्रलकारी पाऊस.
हे गाणे जेंव्हा जेंव्हा बघतो तेंव्हा हा प्रसंग आठवतो.

ह्या वरून माझा पण एक अनुभव आठवला .
अकरावी किंवा बारावी ली ला असेन.
महाराष्ट्रात पावसाने कहर केला होता.
माझे गाव महाबळेश्वर च्य जवळ.
आणि तो नॉर्मल पावूस नव्हता विजांचा लखलखाट, ढगांची कडकडाट आणि जोरदार पावूस अगदी सतत धार पंधरा दिवसांच्या वर.
तापमान रसा तळाला गेले होते पावसात सुद्धा डोंगरात मेंढरे चरायला घेवून जाणाऱ्या धनगरांची मेंढरं तापमान खूप कमी झाल्या मुळे जागेवरच मृत्यू मुखी पडली होती.
तशीच ती गावात आणून फुकट मटण वाटलं होते.
तेव्हा संडास नव्हते बाहेर जावं लागायचं पण लोकांनी विजेचा एवढं धसका घेतला होता की बाहेर जायला सुद्धा घाबरायचे.

माझा हा अनुभव लिह्ण्यासारखा नाही. कुणालाही आजवर सांगितलेला नाही. कारण तो सांगण्यासारखा नाही. पण इथे विषय थरारचा आहे म्हणून त्या संदर्भात लिहितो. तरीही, विवाहबाह्य संबंध वगैरेची ज्यांना एलर्जी आहे त्यांनी माझा अनुभव वाचला नाही तरी चालेल. पाच सहा वर्षे झाली असतील ह्या गोष्टीला. फेसबुकवर एक मैत्रीण झाली होती आणि सुरवातीला आमची फेसबुकवरच फ्रेन्डशिप होती बाकी काही नाही. काही दिवसांनी या मैत्रीचे जवळच्या मैत्रीत रुपांतर झाले पण ओनलाइनच. आत्मविश्वास निर्माण झाल्यावर व्यक्तिगत गोष्टी सुरु झाल्या. आम्ही आमचे फोन नंबर एकमेकाला दिले. फोनवर एकदोन वेळा बोललो. पुढे हळू हळू गप्पांच्या ओघात मी तिला फेसबुक चाटवर नाव पत्त्यासहित माझी सगळी माहिती सांगून टाकली. तिने पण ती कुठे राहती व तिच्या नवऱ्याचे दुकान आहे व ती हाउसवाईफ आहे हे सगळे तिने सांगितले. तिचे लग्न झाले आहे हे कळल्यावर मी तिला म्हणालो बाई गं तसे असेल तर तू जरा काळजी घे.आपले चाट वेळच्या वेळी डिलीट करत जा. नवऱ्याला कळले तर पंचाईत नको. तर म्हणाली नाही नाही माझा नवरा अजिबात तसा नाही. त्याला चालते मी फेसबुकवर मैत्री केलेली. नवीन लग्न केलेल्या बऱ्याच लेडीजना आपला नवरा - तसा नाही - ह्याचा फाजील आत्मविश्वास असतो. तिला पण तसाच खोटा आत्मविश्वास होता. पण हे मला कळायला उशीर झाला, त्याचीच हि थरार कथा. मी तेंव्हा तिच्यावर विश्वास ठेवला आणि परत तिला कधी आपले चाट व मेसेज डिलीट कर म्हणालो नाही. असेल तिच्या नवऱ्याला चालत तर आपण तरी कशाला काळजी करा, असे मला पण वाटले व आम्ही बिनधास्त वाटेल ते चाट करू लागलो. तिच्या कसल्या कसल्या भन्नाट कल्पना आहेत ते ती मला सांगायची. कसली कसली चित्रे ती मला पाठवायला सांगायची. मी पण ती इमानेइतबारे पाठवायचो. मैत्रीने सगळ्या हद्दी ओलांडल्या होत्या. पण हे सगळे फेसबुकवरच. हे असे काही महिने चालले. पण आम्ही एकदाही भेटलो नव्हतो. पण पुढे तो दिवस सुद्धा आला. तिची खरंतर प्रत्यक्ष भेटायची अजिबात इच्छा नव्हती. काय असेल ते मैत्री फक्त फेसबुकवरच असू दे म्हणायची. पण चाटवर मी तिला बऱ्याच मिनतवाऱ्या केल्यावर पाच दहा मिनटे भेटायला ती तयार झाली. तिचे गाव माझ्या गावापासून पन्नास साठ किलोमीटरवर अंतरावर होते. मी तिथे बाईकवरून गेलो. आम्ही भेटलो पाच दहा मिनटे. व ते पण एका गर्दीच्या ठिकाणी त्या गावच्या बस स्थानकावर. कुणाला शंका येऊ नये म्हणून आम्ही दोघेही एकमेकांना आधीपासून ओळखतो असे न दाखवता बसची वाट पाहत उभे असलेले वेगवेगळे प्रवासी आहोत असे भासवून आम्ही बोललो. साडी नेसलेली एक अत्यंत सामान्य गृहिणी ह्यापलीकडे तिला व्यक्तिमत्व नव्हते. भेटून आम्ही जे काही जुजबी बोललो तेवढेच. एकमेकांना पाहण्यापलीकडे त्या भेटीत काहीच झाले नाही. पुढे कामाच्या वगैरे नादात आमचे चाटिंग कमी कमी होत गेले. पण मला कल्पनाही नव्हती कि ह्या फेसबुकवरच्या मैत्रीमुळे माझ्या पुढ्यात नजीकच्या भविष्यात काय थरार वाढून ठेवला आहे.

पुढे साधारणपणे दोन तीन महिन्यांनी एका संध्याकाळी मी घरीच होतो. तर एका अनोळखी नंबर वरून मला फोन आला. बोलणारा पुरुष होता व त्याने माझे नाव घेऊन तो तूच का असे विचारले. आवाजावरून रागरंग चांगला वाटला नाही. व माझ्या मनात शंकेची पाल चुकचुकली. मी त्याला हो मी तोच असे म्हणून आपण कोण बोलताय असे विचारले. माझी शंका खरी ठरली. त्याने तिचे नाव घेतले व मी तिचा नवरा बोलतोय म्हणाला. व तिच्याशी तुझे काय संबंध आहेत असे त्याने मला थेटच विचारले. माझी गाळण उडाली. मला काय बोलावे सुचेना. कोण बोलताय आपण? रॉंग नंबर. असे काहीतरी बोललो. तर तो म्हणाला तिच्याशी बोल. आणि त्याने तिला फोन दिला. तर ती रडत म्हणाली अरे तू त्याला जे आहे ते सांग, खोटे काही सांगू नकोस कारण आपल्याविषयी त्याला सगळे कळले आहे आणि आपले सगळे चाटिंग त्याने वाचलेत. ते ऐकून माझे सगळे अवसान गळाले. मग त्याने पुन्हा फोन आपल्याकडे घेतला. आता मात्र माझा आवाज कापू लागला. त्याला मी चाचरत सांगायचा प्रयत्न केला कि अरे नुसते आम्ही ओनलाईन बोलत होतो आणि तू समजतोस तसे आमच्यात आमच्यात काहीही नाही. तर त्याने मला बोलूच दिले नाही. मला म्हणाला नाटक करू नको तुम्ही दोघे भेटला पण आहे. भेटून काय केलेस तेवढे सांग. तुमचे सगळे चाट मी वाचले आहे. तू काय करतोस कुठे राहतोस ते तुझी सगळे माहिती मी चाटिंग मधून मी घेतली आहे. हे सगळे केलेस तेंव्हा तुला अक्कल नव्हती का. तू आमचा संसार उधळलास. आता तू फक्त परिणामाला तयार हो. मी आता पोलिसांकडे जाणार आहे व पेपरला पण हे सगळे देणार आहे. शिवाय एका पक्षाच्या लोकल नेत्याचे नाव घेऊन म्हणाला त्याची माणसे आपले दोस्त आहेत, त्यांना तुज्याकडे बोलायला पाठवतोय. तेच तुझ्या घरी येऊन आता तुला समजावतील तू तयार राहा. असे म्हणून त्याने फोन ठेवला. माझे पाय लटलट कापू लागले. हा सगळा प्रकार घरच्यांसमोरच झाल्याने त्यांनी मला विचारले काय झाले व कुणाचा फोन होता. तर मी त्यांना सगळे सांगितले व म्हणालो फक्त नेटवर मैत्री केली होती व फक्त एकदाच भेटलो आहे. तर घरच्यांनी सुद्धा मला सुनावले. नसते उद्योग करायला तुला कुणी सांगितले होते वगैरे वगैरे मला बोलले. त्या रात्री एक सेकंद सुध्धा झोप लागली नाही. ती रात्र भयंकर नी प्रचंड म्हणजे प्रचंड तणावाची होती. रात्रभर तळमळत होतो. माझ्या घरी कोणत्याही क्षणी पोलीस येतील इथपासून मला मारायला त्याचे मित्र येतील इथपर्यंत काय काय विचारांनी माझी झोप उडाली. दुसऱ्या दिवशी बाहेर जाऊन मी त्याला त्या नंबर वर फोन केला. व माफी मागितली. तर तो आवाज चढवून बोलला. म्हणाला कि काल आमच्यात तुझ्यावरून जोरात भांडण झालंय आणि तिने रात्री औषध खावून जीव द्यायचा प्रयत्न केलाय व ती आता दवाखान्यात एडमिट आहे. जर तिला काय झालेबिले तर तू मेलासच म्हणून समज, मी तुला सोडणार नाही एवढे लक्षात ठेव. असे म्हणून त्याने फोन ठेवला. मला अक्षरशः घाम फुटला घशाला कोरड पडली व भीतीने कापरे भरले. कुठल्या कुठे ह्या फंदात पडलो असे झाले. चेहरा पांढराफट्ट झाला. दोन दिवसांनी कसेबसे अवसान आणून मी त्याला घाबरत घाबरत पुन्हा फोन केला व माझे सगळे कौशल्य पणाला लावून त्याची समजूत घातली माफी मागितली व जे जे काय शक्य आहे ते बोललो. यावेळी त्याने ऐकून घेतले व मी आता टेन्शनमध्ये आहे मला पुन्हा फोन करून त्रास देऊ नकोस म्हणून त्याने फोन कट केला. त्यानंतर कित्येक दिवस मला घशाखाली अन्न जात नव्हते. भीतीने व तणावाने मी आजारीच पडलो. माझ्या सुदैवाने त्यानंतर पुढे काहीच झाले नाही. ते प्रकरण तिथेच संपले. पण यातून एक मोठा धडा शिकलो कि फाजील आत्मविश्वास बाळगणाऱ्या मूर्ख व बेजबाबदार बायांशी फेसबुकवर कधीही मैत्री करायची नाही.

सुजा, तो टाईमर स्विच होता. लॉज मधे exhaust fan ला असा टाईमर असलेला switch बरेचदा अस्तो. या शिवाय नोर्मल लाईट चा वेगळा switch पण असतो.

https://www.amazon.com/BN-LINK-60-Minute-Countdown-Mechanical-bathroom/d...

ट्रेक, पाणी, विमान गाठणे.... सर्वच अनुभव भयंकर घाबरवणारे.
अनोळखी पाण्यात तर पोहता येणार्‍यानेही शिरु नये.

मस्त धागा!

एकदा माझे कामानिमित्त सौदी अरेबियाच्या रियाध या राजधानीच्या शहरात वास्तव्य होते तेव्हाची गोष्ट. तो दिवस म्हणजे माझे महिनाभराचे ऑफिसचे काम संपवून परत भारतात परतण्याचा होता. इथून गेलेल्यांसाठी तिथे बाकी काही सोशल लाईफला वाव नसल्याने तिकडे गेल्यापासून ते काम संपवून कधी एकदा भारतात घरी परततोय असे मला झाले होते. तशी या देशातली माझी ही पहिली वारी नव्हती, पण यावेळी माझ्या ऑफिसातले जे माझ्या आधी आले होते ते परतले होते आणि नंतर येणारे होते ते अजून आले नव्हते. अश्या एक महिन्याच्या कालावधीतला माझा रोजचा दिवस म्हणजे यंत्राच्या साच्यातून काढल्याप्रमाणे जाई. कंटाळा येई. ऑफिसातून आल्यावर गप्पा मारण्यासाठी ओळखीचे कोणी नाही आणि बाहेर पडून हिंडावे असे मॉलव्यतिरिक्त बाहेर काहीच नाही. कधी जेवण्यासाठी मॉलमध्ये जायचे तर कधी तिथून पार्सल आणून रूमवर खायचे. टिव्हीवर अरबीत डब केलेले हिंदी सिनेमे पाहणे हाच काय तो त्यातल्या त्यात मजेशीर विरंगुळा. पण तिथेही फिलरवाल्या झायराती चालू झाल्या की बोंबच. शनिवार-रविवार आल्यावर (सॉरी शुक्रवार शनिवार म्हणजे वीकेंड) आल्यावर ते दोन दिवस अंगावर येत. शुक्रवार तर दिवसभर बाहेर नुसता कर्फ्युप्रमाणे सन्नाटा वाटे. मग कुठे पेंटींग कर, लाँड्री बाहेर न देता स्वतःच करत बसा, ऑफिसचे काम करत बसा, किंवा फोनवर कपिल शर्मा किंवा इतर टिव्ही शो बघत बसा असे चाले. शनिवारी मॉलमध्ये थोडा जास्त वेळ घालवून आठवडाभराचे काही खायचे खरेदी करा (म्हणजे मुख्यतः फळे, सुकामेवा, चिप्स, फरसाण इ.) आणि इतर काही खरेदी असेल तर ते असे चाले. मी ज्या हॉटेलवर राहिलो होतो तिथला अरबी मॅनेजर अहमद आता थोडा ओळखीचा झाला होता. तो स्वभावाने चांगला होता. कधी कधी तो भेटे तेंव्हा त्याच्याशी इकडच्या तिकडच्या थोड्या गप्पा होत. बाकी सगळे यथातथा.

तिथे आधीही काही वेळा जाणे येणे झाल्यामुळे तिथल्या संस्कृतीची, लोकांच्या मानसिकतेची, पद्धतींची जुजबी ओळख झाली होती. त्यात आवर्जून पाळली जाण्यातली एक गोष्ट म्हणजे रस्त्यावर थांबवून टॅक्सी करणे टाळणे. त्याऐवजी उबेरवरून किंवा हॉटेलच्या रिसेप्शनकरवी त्यांच्या ओळखीच्या टॅक्सी बुक करणे हे बरे.

त्या दिवशी माझे परतीचे विमान दुसर्‍यादिवशी पहाटे लवकर उडणार होते आणि पुरेसा वेळ हाती ठेवून मी साधारण रात्री १ ला हॉटेलवरून निघायचे ठरवले होते. त्यानुसार ऑफिसवरून आल्यावर मी हॉटेलवरच्या रिसेप्शनवरील माणसाला माझ्यासाठी विमानतळावर नेणारी टॅक्सी बुक करायला सांगून मी रूमवर आलो. नंतर एकदा रात्री १० वाजता रिसेप्शनवर फोन करून त्याला आठवण करून दिली आणि बॅग पॅक करून मोबाईलवर रात्री पावणेएकचा गजर लावून मी थोडावेळ बळेच डुलकी काढायचे ठरवले. भारतात परत येण्याच्या उत्साहात झोप काही येत नव्हती. मोबाईलवर टाईमपास करत राहिलो. निघायची वेळ झाल्यावर मी बॅक ओढत रूमला शेवटचा सलाम ठोकून लिफ्ट्ने रिसेप्शनला आलो. दारात टॅक्सी उभी असेल अशी माझी अपेक्षा होती. पण बाहेर रस्त्यावर रात्रीचा किर्र सन्नाटा. रात्रपाळीवर आलेला रिसेप्शनवाला अंधूक प्रकाशात लॉबीतल्या एका सोफ्यावर टेकून झोपी गेलेला. मी गडबडीत जाऊन त्याला जागे केले आणि टॅक्सी कधीपर्यंत येतेय असे विचारले. तर तो म्हणे कसली टॅक्सी? यावर मी त्याला मला विमानतळावर जायचे आहे आणि मी टॅक्सी बुक केली होती असे सांगितले. तर तो म्हणाला, मला माहीत नाही! अरे बाप रे! दिवसपाळीवाल्याने जाताना गडबडीत याला काहीच कल्पना दिलेली नव्हती असे समजले. मग त्याला म्हणालो की ठीक आहे, आता अर्जंटली टॅक्सी बुक कर. तो पटकन उठला आणि त्याच्याकडच्या टॅक्सीड्रायव्हर्सना फोन करू लागला. पण हाय! एकामागून एक ड्रायव्हर एकतर आधीच बुक्ड होता किंवा फोनच लागत नव्हता! माझे उबेरवरून टॅक्सी शोधणेही चालूच होते. रस्त्यावर कसलीच चाहूल लागत नव्हती. आणि हॉटेलवरही दुसरी काही हालचाल दिसत नव्हती. या सगळ्यात वेळ भराभर पुढे सरकल्यासारखे वाटत होते आणि याचे मला आता दडपण येऊ लागले होते.

बर्‍याच प्रयत्नांनंतर मला एक उबेरवर टॅक्सी मिळाली. थोड्याच वेळात हॉटेलच्या दारात टॅक्सी आली. मी एकदा खात्री करावी म्हणून गाडीचा नंबर बघितला तर कळले की मी बुक केलेली ही टॅक्सी नव्हेच. मी हिरमुसला होऊन बॅग परत ओढत सोफ्यापर्यंत आणली. जरी मला अर्जन्सी होती तरी अनोळखी टॅक्सीमधून तेही परक्या देशात रात्रीचा इतक्या दूरवरचा प्रवास मला अजिबात करायचा नव्हता. तोवर त्या टॅक्सीतून ड्रायव्हर खाली उतरला. तो माणूस म्हणजे एक कळकट कपड्यातला आणि तारवटलेल्या डोळ्यांचा धिपाड दिसणारा उर्मट स्थानिक ड्रायव्हर होता. उतरल्याबरोबर त्याने हॉटेलच्या लॉबीत प्रवेश केला आणि अरबीत बडबडत त्याने माझी बॅग घेण्यासाठी हात पुढे केला. पण मी चलाखीने बॅग मागे ओढली आणि मागे सरकलो. तर तो अजून पुढे आला. तोवर रिसेप्शनवाला मध्ये पडला आणि त्याने मला विचारले की मी बुक केलेली टॅक्सी ही आहे का? मी नाही म्हणाल्यावर त्याने त्या ड्रायव्हरला अरबीत ओरडत मागे ढकलायला सुरुवात केली. पण तो ड्रायव्हर जोर लावून माझ्या बॅगेवर ताबा मिळवण्याचा प्रयत्न करू लागला. शेवटी कसाबसा त्याला दाराबाहेर लोटण्यात रिसेप्शनवाल्याला यश आले! हुश्य. आता तो काही अंतर तरी दूर गेला होता. पण आता जरी तो हॉटेलच्या दाराबाहेर होता, तरी त्याची बडबड चालूच होती. तो दाराबाहेरच ठाण मांडून बसला. अधूनमधून माझ्याकडेही रागाने बघे. कोण दुसरा टॅक्सीवाला येतोय तेच बघतो, असे तो बडबडतोय असे मला रिसेप्शनवाल्याने सांगितले.

तेवढ्यात मी बुक केलेली उबेर टॅक्सी आली. तो एक पाकिस्तानी ड्रायव्हर होता. तो खाली उतरणार इतक्यात हा आधीचा टॅक्सीड्रायव्हर त्याच्यावर चवताळून चालून गेला. या अनपेक्षीत चढाईने उबेरवाला बिचारा हबकून गेला. त्याला काहीच कळेना. पुन्हा एकदा रिसेप्शनवाला मध्ये पडला आणि कसेबसे त्या दोघांना वेगळे केले. या लोकल टॅक्सीवाल्यापुढे तो पाकिस्तानी ड्रायव्हर अगदी गांगरून गेला. त्या लोकल टॅक्सीड्रायव्हरची अखंड बडबड चालू होती आणि रिसेप्शनवाल्यालाही आता तो फारसा जुमानेसा झाल्यासारखे वाटू लागले. मीही भिती अधिक विमान सुटण्याची शक्यता या दुहेरी दडपणाने हवालदिल झालेलो. मला विमान गाठायचे आहे आणि हे काय भलतेच चालू झालेय. याचा शेवट काय? काहीच सुचेना. शेवटी मी रिसेप्शनवाल्याला ओरडून सांगितले की तू आताच्या आता अहमदला म्हणजे हॉटेल मॅनेजरला फोन लाव आणि त्याला इथे ताबडतोब बोलावून घे. त्याने अहमदला फोन करून थोडक्यात इथली कल्पना दिली आणि ताबडतोब यायला सांगितले. पुढच्या दहा मिनिटात अहमद तिथे हजर झाला आणि त्याने त्या स्थानिक माणसाला अरबीत असा झाडला की तो स्वतःहून तिथून शेपूट घातल्यागत नाहीसा झाला. चला एक संकट टळले!

संकट टळले हे खरे पण मला आता या उबेरमधूनही प्रवास सुरू करण्याचे धोक्याचे वाटू लागले. न जाणो तो स्थानिक परत पाठलाग करत आला तर? मी अहमदला हे बोलून दाखवले आणि सांगितले की मला या उबेरनेही प्रवास करायचा नाही. प्लीज तू माझ्यासाठी तुझ्या ओळखीतला खात्रीशीर ड्रायव्हर बोलाव जेणेकरून या स्थानिकाने काही उपद्रव केलाच तर तो निस्तरू शकेल. मग अहमदने फोन करून एक टॅक्सी बोलावली जो त्याच्या नात्यातलाच होता. म्हणाला, उपद्रव तर दूरच या टॅक्सीच्या आगेमागेही फिरकायचे धाडस तो स्थानिक ड्रायव्हर करणार नाही. तू बिनधास्त जा. प्रवासाकरता शुभेच्छा आणि या प्रकाराबद्दल माफ कर.

शेवटी त्याचे आभार मानून आणि देवावर भरवसा ठेवून मी त्या टॅक्सीत बसलो आणि विमानतळावर सुखरूप पोचलो. तिथून अहमदला फोन करून तसे कळवले आणि चेक-इन खिडकीकडे मोर्चा वळवला.

त्या सुन्न रात्रीच्या वेळी घड्याळातले काटे जसे जसे पुढे सरकत होते तसे आणि अनोळखी ठिकाणी हा अचानक उद्भवलेला प्रसंग नक्की कुठे संपणार हे समजत नव्हते तेंव्हाचा तेवढा कालावधी फार ताणाखाली गेला.

एकंदरीत सिंहगड चे किस्से डेंजरस दिसताहेत . खर तर मी पण कॉलेजात असताना पुण्याचे माझे दोन चुलत भाऊ त्याचे मित्र माझ्या एक दोन मैत्रिणी असे साधारण दहा जण तरी नक्कीच असेच पावसाळ्याच्या दिवसात दुपारचे ४-४.३० वाजता परतीच्या वाटेला निघालो होतो. पावसाळ्याचे दिवस होते. पाऊस आधीच पडून गेला होता त्यामुळे माती सरकती झाली होती . जवळ जवळ सगळे जण एकदा तरी घसरलो होतो असं नक्कीच आठवतंय. . पण कोणाला फार काही लागलं नाही . आणि सगळे जण घसरत घसरत गड उतरत होतो त्यामुळे खूप हसत पण होतो एवढं नक्की आठवतंय . उलट मजेत एकमेकांची थट्टा करत अजून कोण घसरलं नाहीये / हे काय घसरायला पाहिजे असं काहीतरी बडबडत हसत उतरलो त्यामुळे कधी उतरलो कळलंच नाही . पायथ्यशी येऊन साधारण ७. ७. ३० ला बस पकडून घरी आलो . पण त्यावेळी एवढीशी काय थोडी सुद्धा भीती वाटली नव्हती पण आता इथे सिंहगड चे किस्से वाचतेय ते अनुभव मात्र अति डेंजरस आहेत

इशिता तू दिलेल्या साईट वर जाऊन बघितलं . पण तसे दिसणारे स्विच नव्हते ते . इथे भारतात गच्चीवरच्या पाण्याच्या टाकीला कसा गोल गोल फिरवायचा कर्माळा नळ असतो तसा दिसणारा होता. गोल शेप पण कमळासारखा आकार अशा टाईप चा नळासारखा दिसणारा लाईट स्विच होता तो Happy

धागा छान आहे. असे काही थरार प्रसंग आठवत तरी नाहीयेत. त्यामुळे वाचनमात्र..

>> पण यातून एक मोठा धडा शिकलो कि फाजील आत्मविश्वास बाळगणाऱ्या मूर्ख व बेजबाबदार बायांशी फेसबुकवर कधीही मैत्री करायची नाही.>> आजवर तुम्ही काढलेले बीबी बघता तुम्ही स्चतःच्या मूर्खपणातून कधी शिकणार काही कळत नाही.

माझ्या भावासोबत केलेला रात्रीतून पुणे ते आंजर्ले बाईक प्रवास... रात्री १२ वाजता निघालो, प्रवास सुरु केला तेव्हा फार काही वाटले नाही. का कुणास ठाऊक पण नेहमी किमान २,४ वाहने असणारा ताम्हिणी घाट सुद्धा निर्मनुष्य होता. घाट संपायला येतो त्याच्या आधी एकच चहाची टपरी आहे जी नक्की सुरू असते. नेहमी तिथे जात असल्याने तो टपरीवाला पण तोंड ओळखीचा झाला होता. त्याच्या टपरीपाशी ट्रक पार्क करून दोघे जण झोपले होते. टपरीवाल्याने सांगितलं की दोघेच आहात तर जाऊ नका पुढे, वाटमारी होऊ शकते. पण आम्ही घोड्यावर असल्याने न ऐकता निघालो! माणगाव क्रॉस केल्यावर जंगल टाईप एरिया सुरू झाला आणि मग खऱ्या अर्थाने तंतरायला सुरवात झाली, कारण रस्त्यावर चितपाखरू देखील नव्हते. नेहमीचे जाणे असले तरी आज रस्त्याचा अंदाजच येत नव्हता. सावित्री पार व्हायला हवी होती तरी आम्ही फिरतच होतो. त्यातल्या त्यात फक्त एकच रस्ता असल्याने चुकण्याची देखील शक्यता नव्हती. त्या दिवशी सगळ्यात मोठी चूक म्हणजे मोबाईल चार्ज केले नव्हते, जेमतेम बॅटरी मुळे अर्ध्या तासाने वगैरे एकदा मॅप बघत होतो. अर्थात अर्धा तास झाला असे आम्हाला वाटायचे पण खरोखर फक्त 10 मिनिटं झालेली असायची. जणू वेळ सुद्धा हळू हळू सरकत होता. भरपूर चालवून देखील गाडीवरचा मीटर आमच्या अंदाजापेक्षा फार कमी अंतर दाखवत होता. भीती घालवण्यासाठी मग मोठमोठ्याने गाणी म्हणत होतो, प्रत्येक वळणावर हॉर्न देत होतो. अश्या प्रवासात अगदी जिवलग मित्रांत देखील भयंकर भांडण होऊ शकते. कारण वैताग.. पण प्रयत्नपूर्वक आम्ही भांडणाचे विषय टाळत होतो. अखेर एकदाची सावित्री नदी पार झाली आणि आमच्या जिवात जीव आला. पुढे पण रस्ता निर्मनुष्य होताच, पण आपण कुठेतरी पोचलोय, एक टप्पा पार केलाय एवढी खात्री सुद्धा तेव्हा फार महत्त्वाची होती. सावित्री पार केल्यावर एका ढाब्यावर थांबलो. चहा वगैरे घेतला आणि निघालो. एव्हाना एक मोबाईल ऑफ झालेला, दुसऱ्यात 10 टक्के बॅटरी. ढाब्यावरच रस्ता बरोबर असल्याची खात्री करून पुढे निघालो. तिथून पुढे घाटाचा सिंगल रोड आहे. त्यात आम्हाला काही लांडगे दिसले रस्त्याच्या कडेला. पुन्हा एकदा फाटणे मोड ऑन. गाडी फुल स्पीडने सोडली. माझ्या लाडक्या युनिकॉर्नने चांगली साथ दिली. १००- ११० अगदी लीलया चालत होती गाडी. पुढे एक छोटं गाव लागलं, जिथून 2 रस्ते फुटत होते. तिथेच एक मंदिर होतं, त्या मंदिराच्या पायरीवर बसून मॅप बघू म्हटलं तर रेंज नव्हती. मग पाकिटात एअरटेल सिम होतं ते मोबाईलला टाकलं, रस्ता बघत होतो इतक्यात एक अल्टो आमच्या पुढून आमच्याच रस्त्यावरून गेली. पटकन बॅग उचलून गाडी स्टार्ट केली आणि त्या कारच्या पाठी लागलो. संपूर्ण प्रवासात ताम्हिणी माणगाव सोडल्यावर दिसलेली पहिली गाडी होती ती. त्यावेळी आपण एकटे नाही आहोत ही भावनाच फार जास्त महत्वाची होती, आणि म्हणून त्या कारचा भरधाव वेगात पाठलाग सुरू केला. कारवाल्याला देखील अंदाज येईना आम्ही का पाठलाग करतोय, म्हणून त्याने गाडी स्लो केली आणि आम्ही ओव्हरटेक करून पुढे आलो. पण आता गाडी हळू चालवित होतो. कारला देखील अंदाज आला असावा की एकटे असल्यामुळे हे सगळं सुरू आहे. अखेर वेळासच्या वळणावर त्या कारचा आणि आमचा रस्ता वेगळा झाला. एव्हाना बराच आत्मविश्वास निर्माण झाला होता, पूर्वीकडे थोडं लालसर आभाळ दिसायला लागलं होतं. उजाडता उजाडता आम्ही आंजर्ले पोचलो, आमच्या होमस्टेच्या पायरीवर बसून राहिलो, थोडं फटफटलं तसा मालकाला फोन केला, आणि एकदाचे रूम मध्ये जाऊन पडलो!

हे खूप खरे आहे. सिंहगडाच्या वाटेवर बऱ्याच घटना घडल्या आहेत. दहा बारा वर्षांपूर्वी एका घटनेची बातमी सतत येत होती. एक ग्रुप तिथे ट्रेकिंगला गेला होता. त्यात एक तरुणी मागे राहिली. ती मध्येच अचानक गायब झाली. पुढे गेलेल्या ग्रुपने तिची बराच वेळ वाट पहिली पण ती आलीच नाही.

>>>>> मी ट्रेनी म्हणून जॉइन झालेल्या कंपनीत आमच्याच डिपार्ट्मेंटला कविता जॉईन झाली होती. सोबत दोनेक वर्ष काम केल असेल आम्ही. टी ब्रेकमध्ये स्टँडर्ड रूमच्या पीसीवर संदीप- सलील ची गाणी ऐकायचो.
पुढे तिने दुसरी कंपनी जॉईन केली अन संपर्क राहीला नाही.
नंतर अचानक ही बातमी समजली.. आम्हा सगळ्यांसाठी मोठा शॉक होता हा Sad

आम्ही कॉलेज मधे असताना सिंहगडला रात्री बेरात्री, रस्त्याने, पायवाटेने, कात्रज-सिंहगड मार्गै , पाऊस, उन्हाळा सर्व रुतूत...अगदी फक्त दोघे तेही अमावस्येला .... कैक वेळा गेलोय पण एकदाही कसलाच भीतीदायक अनुभव आलेला नाही... त्यामुळे मला या साऱ्यांच्या अनुभवचे राहून राहून आश्र्चर्य वाटतंय.

>> माणगाव क्रॉस केल्यावर जंगल टाईप एरिया सुरू झाला आणि मग खऱ्या अर्थाने तंतरायला सुरवात झाली

हो. हा संपूर्ण रस्ता म्हणजे जंगल आणि घाटरस्ता आहे. दिवेआगरला अनेकवेळा याच रस्त्यावरून गेलोय. पण रात्री अपरात्री ते सुद्धा बाईकवरून म्हणजे काय थरार असेल याची फक्त कल्पनाच करू शकतो.

वरती दिलेला वादळी वाऱ्याचा प्रसंग वाचून मला माझ्या आयुष्यात घडलेले दोन थरारक प्रसंग आठवले.

१. शिर्डीहून पुण्याला परत येत होतो. तेंव्हा गुगल वाटाड्या नवीनच होता पण मला त्याच्यावर विश्वास होता. मी लोकेशन टाकल्यावर त्याने एक रस्ता दाखवला. फार विचार न करता त्या दिशेने गाडी दामटली. पर्यायच नव्हता कारण मला दुसरा रस्ताच माहित नव्हता. निमुळत्या, शेतातून गेलेल्या, खाचखळगे असलेल्या रस्त्यावरून कुठून कुठून शोर्टकट घेऊन कार एकदाची त्याने एका मोठ्या रस्त्याला आणवली तेंव्हा हुश्श्य करून सुस्कारा टाकला आणि गती वाढवली. आता हा रस्ता पुढे दूरदूरवर मोठा व चांगला दिसत होता. पण खरा थरार पुढेच आहे याची तेंव्हा कल्पना पण आली नव्हती. पुढे बरेच अंतर गेल्यावर सपाट मैदानी प्रदेश लागला. आजूबाजूला डोंगर नाही, झाड नाही, घर नाही, दुकान नाही, वस्ती नाही, काही काही नाही. नुसते अखंड सपाट असे माळरान अवतीभोवती पसरले होते आणि त्यातून गेलेल्या सुनसान रस्त्यावर एकमेव अशी माझी कार पळत होती.

आणि थोड्या वेळात वादळी वारे सुरु झाले. शिर्डीत असताना उष्णतेमुळे अंगाची काहिली काहिली. आणि एके ठिकाणी तर अनवाणी चालल्याने अक्षरशः पाय पोळले होते इतके कडक ऊन. ते वातावरण बघता बघता बदलले. काळे काळे ढग आकाशात जमले. गडगडाट सुरु झाला. पाठोपाठ थंडगार वारे घोंघावू लागले. धूळ उडून आजूबाजूच्या माळरानावर मोठमोठ्या वावटळी दिसू लागल्या. गाडीच्या काचेवर धुळीची पुटे चढली. तासाभरापूर्वी निरभ्र असणारे आकाश काळ्या काळ्या ढगांनी पूर्णपणे काळवंडून गेले. आणि बघता बघता पुढच्या दहा ते पंधरा मिनिटातच विजेचा प्रचंड थयथयाट सुरु झाला. असल्या भयाण विजा कि विचारू नका. वर आकाशात विजेचा अक्राळविक्राळ नंगानाच आणि खाली जमिनीवर विशाल विस्तीर्ण असे माळरान आणि त्यातून गेलेल्या डांबरी रस्त्यावर फक्त माझीच कार. विजेच्या तत्वानुसार जो काही जमिनीवरील जवळचा उंचवटा असेल त्यावर ती पडते. म्हणूनच ती अनेकदा झाडांवर पडते. (आणि म्हणूनच इमारतीला त्याहून उंच असे तारेचे टोक लावतात व ती तार जेणेकरून इमारतीवर न पडता त्या तारेवर पडून जमिनीत जाईल). इथे त्या सपाट माळरानी प्रदेशात उंच म्हणजे माझी कारच होती. ते विचार मनात येताच भीतीने अक्षरशः गोठून गेलो. गाडीत कुटुंब होते. कार जमेल तितक्या गतीने पुढे दामटत होतो. एकेक किलोमीटर दहा दहा किलोमीटर सारखे वाटत होते. तेवढ्यात "हे देवा! वीज आपल्या कार वर तर पडणार नाही ना?" माझ्या मनात इतका वेळ दाबून राहिलेली नको ती शंका कोणतरी उघड बोलून दाखवली. "हा हा हा..." पूर्वीच्या नाटकात प्रदीप पटवर्धन जसे केविलवाणे हसायचा तसे भाव चेहऱ्यावर आणून हसत मी म्हणालो, "क्याहीहि काय... असे कधीच होत नसते. कारण कार ला खाली रबरी टायर असतात ना, त्यामुळे वीज कारवर कधीच पडत नाही. कधी ऐकलेय कोणत्या कारवर वीज पडलीय असे? मग? ह्या... च्याक्क..." असे उदगार काढून कारवर वीज पडण्याची कल्पना उधळून लावत सगळ्यांना धीर देण्याचे काम मी केले खरे. पण मनातून मात्र मी चांगलाच टरकलो होतो. थोड्याच वेळाने आकाशात विजेचा लोळ चमकला, लख्खकन डोळे दिपवणाऱ्या प्रकाशाने सारा आसमंत क्षणार्धात भरून टाकला आणि पुढच्या काहीच सेकंदांत कड्डाळ काडकाडकाडकाड आवाज करत जवळपासच्या माळावर वीज पडली. अजून एक दोन वेळा असे झाले. मी सर्वाना आत सरकून बसायला सांगितले. गाडीच्या बाजूच्या धातूच्या कोणत्याही भागाला अजिब्बात म्हणजे अज्जिब्बात स्पर्श झाला नाही पाहिजे अशी सर्वाना सक्त ताकीद देत असतानाच अजून एक काडकाडकाड आवाज झाला. विजेने जणू माझ्या कानाखालीच हाणली असे वाटले. ततपप झाले. सर्वांनी श्वास रोखले.

पुढचा अर्ध्या एक तासाचा प्रवास आम्ही सर्वांनी अक्षरशः जीव मुठीत घेऊन केला. काहीच वेळात वळीवाचा पाऊस थांबला. आमच्यापुढेमागे भेसूर नाच करून तो विद्युतवादळराक्षस गायब झाला. सुदैवाने आम्हाला त्याने काही केले नाही. उघडीप पडून आकाश मोकळे झाले. तेंव्हा आम्ही सर्वांनी मोठा सुस्कारा सोडला. एक फार मोठा अनर्थ होऊ शकला असता तो टळला होता. तो प्रवास आमच्या कायमचा लक्षात राहिला.

२. दुसरा प्रसंग सातारा ते पुणे हायवेवर घडलेला आहे. एरवी गारांचा पाऊस आपण एन्जोय करतो. पण तेंव्हाची गोष्ट फार फार वेगळी होती. गारांमुळे कधी आपली भीतीने टरकेल अशी कल्पना पण त्याआधी केली नव्हती. गाडीने सातारा मागे टाकले. खंबाटकी अजून यायचा होता. तोच पावसाने गाठले. सुरवातच मोठ मोठ्या थेंबानी झाली. आहो कस्सले थेंब म्हणजे काय राव त्याला अर्थ आहे का? हे हे एवढे असले मोठे तांब्याएवढे थेंब? पूर्वी एकदा पोलादपूर घाटातून महाबळेश्वरला चाललो असता अक्षरशः बादलीने पाणी ओतल्यासारख्या पावसात कार अडकली होती. अरे कस्सले पाणी का काय म्हणायचे ते? ते पाणी काचेवरून बाजूला सारता सारता रॉंइ रॉंइ करत वायपर कन्हायला लागले होते. एक तर वेळ अशी आली होती कि पुढे दोन फुट अंतरावरचे सुद्धा दिसेना. तेंव्हा हाझार्ड इंडिकेटर लावून सर्वांनी आपापल्या गाड्या रस्त्याकडेला घेतल्या होत्या. पर्यायच नव्हता. पण आजची गोष्ट वेगळीच होती. ते मोठे मोठे थेंब काही मिनिटांतच थांबले आणि गारांना सुरवात झाली. ताड ताड गारा पडू लागल्या. मुलगा लहान होता. त्याला प्रचंड मजा वाटली. आम्हाला पण वाटली. आणि बघता बघता गारांचा आकार वाढला. संख्या वाढली. आजूबाजूला थांबावे तर तिथे रत्यावर एक पट्टा असा आहे कि रस्त्यावर बाजूला एकही झाड नाही किंवा थांबण्यासाठी कसलाच आडोसा वगैरे नाही. पुढे कुठेतरी हॉटेल वगैरे दिसेल म्हणून मी गाडीला वेग दिला. आणि पुढच्या भागात गारांनी रौद्ररूप धारण केले. अक्षरशः दगडफेक व्हावी असा कारच्या टपावर गारांचा प्रचंड वर्षाव सुरु झाला. पत्र्याच्या ताडताड ताडताड ताडताड ताडताड आवाजाने कानठळ्या बसल्या. पुढे तर ते प्रमाण इतके वाढले कि पत्रा फाटतोय कि काय असे वाटू लागले. ह्यात एक अक्षराचीही अतिशयोक्ती नाही. भीतीने गाळण उडाली होती.

आकाशात इतक्या प्रचंड उंचीवरून येणाऱ्या ते बर्फरुपी दगडांना गाडीवर येईपर्यंत गुरुत्वीय त्वरणामुळे काय वेग येत असावा? आणि त्यांच्या तेंव्हाच्या त्या मोठ्या आकारामुळे होणाऱ्या इम्पॅक्ट पुढे टपाच्या पातळ पत्र्याचा निभाव लागेल का असे वाटावे अशी परिस्थिती होती. तुम्हाला सांगतो आमचे अक्षरशः धाबे दणाणले होते. तुमच्या कारवर प्रचंड दगडफेक सुरु आहे अशी कल्पना करा. मुलगा तेंव्हा लहान होता. वेडेवाकडे काय झाले असते तर होणाऱ्या परिणामांची कल्पनाही करवत नव्हती. जवळपास कुठे निवारा दिसतोय का शोधत त्या गारांच्या मरणमाऱ्यात जीवाच्या आकांताने मी गाडी दामटत होतो. पुढे गारा आपसूकच थांबल्या. आणि मग मला एक बाजूला हॉटेल दिसले. लगेचच मी कार आत वळवली. एव्हाना पावसाचा पण जोर कमी आला होता. कार थांबवून पट्कन उतरलो आणि आधी कारच्या टपावर पाहिले. थोडेफार टवके किंवा ओरखडे दिसतील असे वाटले होते. पण सुदैवाने काहीही झाले नव्हते. मी एखाद्या लहान मुलाच्या गालावरून फिरवावा तसे प्रेमभराने त्या टपावरून हात फिरवला. माझ्या मागोमाग अजून एकदोन कार आत आल्या. त्यांच्या चालकांनी सुद्धा आपापल्या कार धड आहेत का बघून घेतले. आम्ही एकमेकांकडे पाहून स्मितहास्य केले. "काय गारा म्हणायच्या का काय ओ त्या?" आमच्यापैकी कोणीतरी म्हणाले. मग त्या हॉटेलात बसून आम्ही गरम गरम चहा घेतला. आणि पुढच्या प्रवासाला लागलो. गारांच्या पावसातला तो काही मिनिटांचा थरार मात्र विसरणे केवळ अशक्य.

पण यातून एक मोठा धडा शिकलो कि फाजील आत्मविश्वास बाळगणाऱ्या मूर्ख व बेजबाबदार बायांशी फेसबुकवर कधीही मैत्री करायची नाही. >> अरेरे तुमच्याकडून ही अपेक्षा नव्हती. जर ही गोष्ट त्या माणसाने ताणून धरली असती आणि घरापर्यंत येऊन पत्नी, मुलांना कळलं असतं तर मग तुमची धडगत नव्हती. कानाला खडा लावला असेलच. Wink

पूर्वी च लोक अनुभवाने शहाणी झाली होती.
गारा सहसा वळीव पावसात च पडतात.
आणि हा पावूस अचानक येतो पूर्व दिशेकडून.

काळेकुट्ट ढगांचा पट्टा समोर पूर्वेला दिसला की शक्यतो लवकरात लवकर आसरा शोधावा असे पूर्वी ची लोक सांगत.
हा हा म्हणता हा पावूस येतो.
मोठ मोठे थेंब आणि बरोबर गारा असा लवजमा घेवून च त्याचे आगमन होते सोबतीला विजेची वाजंत्री असतेच.
ढगांचा dj pan asto.

दिवी आगार हून ताम्हिणी मधून तिन्हीसांजेला मी आणि बायको दोघेच कार मधून दिवाळीच्या आदल्या दिवशी आलो होतो. एक अनामिक ताण आणि भीती मनात होती... मग गुलाम अलींंची आबडती सीडी चालू केली आणि मुद्दाम गप्पा मारत मारत , बाहेर च्या गूढ द्रुष्य विश्वाचा आनंद घेत आलो. पुढे एके ठिकाणी झाडावर काजवे दिसले आणि भीती वगैरे विसरून च् गेलो.

माझ्या आतेभावाच्या मुलीचा साखरपुडा होता. मोठ्या लॉन्सवर कार्यक्रम होता. मुलीकडचे म्हणून उशीरा जेवायला गेलो. अनेक नातेवाईक भेटत होते. हास्य विनोदात जेवण करत होतो. खूप उशीर झाला म्हणून पटपट जेवण करत होतो. शेवटी रसमलाई ची वाटी तोंडाला लावली. रसमलाई पिऊन झाल्यावर घशात काही तरी अडकल्याची जाणीव झाली. निरोप घेऊन स्कुटीवर निघालो. घशात अडकलंय म्हणून गळा जरा जोराने ताणून पाहिला तर आत काहीतरी टोचलं. सहज थुंकलो तर रक्ताची धार बाहेर पडली. परत थुंकलो तर रक्त येतच होते. तसाच दवाखान्यात गेलो. रविवार असल्याने दवाखाना बंद. नाककानघसा तज्ञाच्या दवाखान्याकडे गेलो तर तोही नव्हता. दुसऱ्या दवाखान्यात गेलो .. इतकं रक्त थुंकत होतो तरी तिथली बाई आत सोडेना. एक तास थांबावे लागेल. जवळ दुसरा दवाखाना होता तिकडे गेलो. तिथंही नंबर... विनंती करुनही आत सोडेनात, आता रक्त पडायचं थांबलं होतं. तसाच डॉक्टर ला न भेटता घरी आलो, तासभर आराम केला, गरम पाणी पिले. अडकलेली गोष्ट निघून आत पोटात गेली. बहुतेक रसमलाई मध्ये बदामाचा उभा काप असावा आणि दोन टोके धारदार असल्याने घशात आडवं अडकलं असेल आणि गळा ताणून आवळल्या मुळे जखम झाली असावी. याला दीड वर्ष झाले.

उघड्या माळावरचा वळीवाचा पाउस आणि गारा म्हणजे भीषण अनुभव असतो...विजांच तांडव , कानठळ्या बसवणार्या मेघगर्जना .. निसर्गाच हे रूप पाहूनच बहुधा ईश्वर संकल्पनेचा उगम झाला असावा !
परशुराम , भाग्यवान आहात. सहज निभावलं
माझ्या मित्राच्या छोट्या मुलाच्या वाढदिवसाला पु ष्पगुच्छातल्या थर्मॉकॉलचा छोटा गोळा त्याच्या नाकात गेला आणि अडकून बसला !
सगळ्यांची अशी काही टरकली ना ! त्याला तोंडाने श्वास घ्यायला सांगून दवाखान्यात नेले. डॉक्टरानी फोर्सेप वापरून अलगद तो गोळा बाहेर काढल्या वर हुश्श झाले सगळ्याना.

२००१ साली भुजचा भूकंप झाला, तेव्हाची गोष्ट. आम्ही वापीला राहत होतो.
२६ जानेवारीला सकाळी पहिला प्रचंड धक्का बसला. त्यानंतर ३-४ दिवसांनी परत एकदा गुजराथ सरकारनं 'रेड अलर्ट' जाहीर केला होता. आफ्टरशॉक्स तर सुरू होतेच.

आम्ही राहायचो ती चार मजली इमारत होती. आमचं घर दुसर्‍या मजल्यावर होतं. साधारण २८/२९ जानेवारीला चौथ्या मजल्यावरच्या एका घराच्या स्लॅबला काही तडे गेल्याचं त्या घरातल्या लोकांना दिसलं. २-४ बॅगा सामान भरून ती मंडळी दुसरीकडे कुणाकडेतरी राहण्यासाठी बाहेर पडली. तेव्हा रात्रीचे ९ वाजून गेले होते. बघता बघता ही बातमी सगळ्या घरांमध्ये पोचली, सगळ्यांचं धाबं दणाणलं. समूहाचं मानसशास्त्र, पॅनिक यामुळे एक-एक करत सगळे बाहेर पडायला लागले. पण बाहेर म्हणजे तरी जाणार कुठे? प्रत्येकाचेच काही नातेवाईक/जवळचे परिचित गावात नव्हते.

आमच्या इमारतीसमोर एक प्लॉट मोकळा होता. सगळे तिथे जमायला लागले. हो-नाही करत करत आम्हीही बाहेर पडलो. बाहेर पडण्याचा निर्णय घेण्याचा क्षण सर्वात थरारक होता.
घरात होते ते पैसे, दागिने, इन्श्युरन्सची कागदपत्रं वगैरे सोबत घेतलं. मुलगा लहान होता, म्हणून त्याच्यासाठी थोडं खाणं-पिणं, पाणी घेतलं. सगळे त्या मोकळ्या प्लॉटमध्ये जाऊन नुसते उभे राहिलो. सगळ्या घरांमधले दिवे वगैरे सुरू ठेवले होते. प्रत्येकजण अबोल होऊन समोर बघत उभा होता. आपलं घर आपल्या डोळ्यांसमोर कधीही कोसळू शकतं, हा विचार... रात्रीची वेळ... प्रचंड डास चावत होते, आसपास बर्‍यापैकी अंधार होता. आपण करतोय हे बरोबर आहे का, यात कितपत तथ्य आहे, असे प्रश्न मनात उभे राहत होते.

पहाटे ३-४ वाजेपर्यंत तिथे तसे उभे होतो. पण त्यालाही मर्यादा होत्याच. जसे एक एक जण बाहेर पडले होते, तसेच एक एक जण आपापल्या घरी परतायला लागले.
रेड अलर्ट खरा होताच, पण सुदैवाने वापीपर्यंत त्याचे धक्के जाणवले नाहीत इतकंच.

ते थरारक ५-६ तास मी कधीही विसरणार नाही!! आजही कोणतीही चैनीची नवीन वस्तू घेताना मला ती रात्र आठवते. कधीतरी सगळं निरर्थक वाटायला लागतं.

Pages