रोजच्या जीवनात येणारे थरारक प्रसंग

Submitted by पशुपत on 9 March, 2020 - 06:20

एक प्रसंग मनावर कोरला गेलेला आहे. १९८९ मधे दिल्लीला मुलाखतीसाठी गेलो होतो. डिसेंबरचे दिवस , मरणाची थंडी !.
मी झेलम एक्स्प्रेसने रात्री ९ ला स्टेशनला उतरून धौला कुवाला रिक्षाने गेलो. मित्राच्या भावाकडे ( नेव्ही क्वार्टर्स ) जायचे होते. फोन नव्हते. चुकीच्या गेटला उतरलो. आत सिक्युरिटीला विचारल्यावर हे कळले. मग त्याने सांगितले चालत कसे जायचे. कुडकुडत , न झेपणारे सामान घेऊन चालता झालो. १० मिनिटाचे अंतर . पाच मिनिटाने , आलो तिथले दिवे आणि पोहोचायचे होते तिथले दिवे क्षीण दिसू लागलेले. किर्र अंधार , रातकिड्यांची किरकिर. आकाशात छोटी चंद्रकोर... इतक्यात बाजूने दोन कुत्रे हुश हुश करत आले .. पायातले उरले सुरले त्राणही गेले. मनात भीमरूपी म्हणायला लागलो. मग मेंदू चालू लागला. कुत्रे माझ्यावर भुंकत नव्हते.. याचा अर्थ ते पाळीव आणी ट्रेंड आहेत ! इतक्यात त्यांचा मालक माझ्ह्या बाजूने येऊन माझ्याशी बोलू लागला ! जीव भांड्यात पडणे म्हणजे काय त्याचा खरा खरा खरा अनुभव आला.
तो ऑफिसरच होता . मित्राच्या भावाला ओळखणारा !. त्याने मला सोबत केली आणि योग्य इमारतीत आणून सोडले . त्याचे आभार मानायचे भानही त्यावेळी मला उरले नव्हते.
त्याच ट्रिप मधला शेवटच्या दिवशीचा रात्रीचा प्रसंग असाच थरार अनुभवाचा.
पुण्यातल्या आमच्या कट्टा गँगमधला एक मित्रही त्या काळात दिल्लीत नोकरी करायचा. त्याला भेटायला संद्याकाळी (ज्या मित्रा च्या भावाकडे राहिलो होतो त्याची) जुनी बजाज १५० स्कूटर चालवीत गेलो. रात्री हॉटेलात जेऊन, गप्पा मारून निघालो. मला दिल्लीची काडीमात्र माहिती नाही. कडक अंधार , निर्मनुष्य रस्ते , थंदीचा कडाका ! त्या मित्राने मला ज्या एरियात जायचे होते तिथे जाणार्या चौकात आणून सोडले. आणि गप्पा मारून तो परत निघाला . तो कुठलीशी बस पकडून जाणार होता, त्याने मला माझ्या वाटेतल्या खाणाखुणा सांगून ठेवल्या. मी स्कूटर चालू केली आणि निघालो तर काय, स्कूटरचे टायर फ्लॅट. ओरडून आधी त्याला हाक मारली. तो भारी धीराचा. त्याने पहाणी केली आणि शोध लावला कि व्हाल्व्ह मधली पिन अडकली आहे. नशीबाने ज्या कॉर्नरवर आम्ही उभे होतो , तो पेट्रोल पंपच होता. आता तिथल्या मिणमिणत्या दिव्याच्या प्रकाषात आम्ही तार शोधू लागलो . २ - ४ मिनिटानी ती मात्र सापडली. व्हाल्व्हची पिन सरळ करण्यात यशही मिळाले. आता प्रष्ण होता हवा कशी भरायची ! तिथल्याच हवेच्या नळीचा अंदाज घेतला. माझ्या नशीबाने काँप्रेसरमधे हवेचे पुरेसे प्रेशर होते. हवा भरली. संकटात मेंदू तीक्ष्णपणे काम करतो . त्याला म्हंटले ५ मिनिटे हवा टिकते आहे याची खात्री करू. ती टिकली. मग तो म्हणाला इथून माझे घर ५ मिनिटाच्या (स्कूटरवरून) अंतरावर होते. (३-५ कोलोमीटर असावे) . तू माझ्यासाठी त्या कॉर्नरवर १५ मिनिटे थांबणार आणि तोपर्यंत मी परत आलो नाही तर मी सुखरूप घरी पोहोचलो असे समजून निघून जाणार असे ठरले.
मग मी निघालो . तो ५ मिनिटाचा प्रवास अजून लक्षात आहे. लांबून आमची बिल्डिंग दिसू लागल्यावर परत खूप खूप खूप आनंद झाला.

आता या प्रसंगांचे इतके काही वाटत नाही पण त्या वेळी मात्र खूप थरारक वाटले होते.

तुमच्या जीवनात असे काही प्रसंग घडले असतीलच. इथे सांगण्या साठी स्वागत आहे.

शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

माझा प्रसंग सांगते.

संध्याकाळची वेळ होती. यजमान पाय मोकळे करायला बाहेर गेले होते . मी घरात एकटीच होते.

मी आमच्या गॅलरीत बसले होते. अचानक धुराचा वास यायला लागला . वाटलं म्युन्सिपालटी चे धूर वाले असतील पण वास वेगळा येत होता. म्हणून मी घरात आले आणि बघते तर काय हॉल धुराने भरला होता. हॉल मधल्या इलेक्ट्रिक बोर्डातून धूर येत होता. तिथे काही तरी झोल झाला होता.

मला इलेक्ट्रिसिटी ची फार भीती वाटते. हातापायातले अवसानच गळून गेले . घरात रहाणं रिस्की होतं पण बाहेर जाण ही तेवढंच धोकादायक होत कारण तो इलेक्ट्रिक बोर्ड मेन दरवाज्याच्या फारच जवळ होता.

तरी मी बाहेर पडायचा निर्णय घेतला . रोजच पाकीट, किल्या यजमानांची औषधं आणि फोन घेतला आणि लाईट सगळे तसेच चालू ठेवून तीरासारखी हॉल ओलांडून घराबाहेर आले.

चला, जीव तरी वाचला म्हणून सुटकेचा निःश्वास टाकला पण आता बिल्डिंग ची सुरक्षा दिसायला लागली. जिना उतरून खाली आले तर शेजारच्या बिल्डिंग मधली तरुण मुलं गप्पा मारत उभी होती. त्याना सगळं सांगितलं आणि आमचा मीटर बंद करण्याची विंनती केली. मला आमचा मीटर कोणता ते exact माहीत नव्हतं पण दोन चार प्रयत्नात यश आलं. आमच्या घरातले लाईट ऑफ झाल्याचे खालून दिसले आणि सुटकेचा खरा निश्वास टाकला.

ह्या सगळ्या प्रकारांनी मी किती थकून गेलेय ह्याची आता जाणीव झाली . गरम कॉफी तरी घेऊ या म्हणून जवळच्या हॉटेलात बसले. पण नजर रस्त्यावर होती कारण यजमान दिसले तर त्यांना घरी जाऊ न देणे आवश्यक होतं. मी कॉफी घेत असतानाच ते दिसले. त्याना सगळं सांगितलं. त्यानी ही कॉफी घेतली.

आता आम्ही दोघ एकत्र होतो आणि घरातले लाईट ही ऑफ होते त्यामुळे चिंता नव्हती. नेहमीच्या दुकानात electrician असेल तर दुरुस्ती होईल म्हणून तिथे गेलो तर तो होता दुकानातच. तो लगेच आला आमच्या बरोबर घरी आणि पंधरा वीस मिनीटात त्याने दुरुस्ती ही करून दिली. आम्ही घरी आलो पण थोडा वेळ रिस्क च वाटत होती. मग थोड्या वेळाने मात्र रिलॅक्स झालो.

हे सगळं एखाद तासात निस्तरलं ही गेलं. पण यजमान दिसे पर्यंत चा अर्धा पाऊण तास मी कसा काढला ह्या कल्पनेने आज ही शहारा येतो अंगावर.

ममोताई त्या लाईटीची भितीच वाटते.
एकदा भर दुपारी आम्हीही घरी तंगड्य ताणून बेडरूममध्ये झोपलो होतो. बायको बाथरूमला जायला म्हणून ऊठली आणि तशीच ऊलट्या पावली घाबरीघुबरी होत पळत आली. बाथरूमच्या पॅसेजमध्ये जिथे मेन स्विच बोर्ड होता तिथलीच वरची वायर तडतडतड आवाज करत धूर काढत ठिणग्या उडवत जळत होती. मी तिला थोडा धीर दिला. आणि ठोंब्यासारखे पुढे काय होते हे बघत तिथेच ऊभा राहिलो. पण मग लक्षात आले की आत बेडरूममध्ये दोन पोरे झोपली आहेत. तर आता काहीतरी ॲक्शन घेतलीच पाहिजे. गेलो हिंमत करून, आणि त्या जळणारया वाईरीखालचा मेन बोर्ड उघडला आणि खटका खाली खेचून संपुर्ण घरातील विद्युतप्रवाह बंद केला.

तो क्षण अगदी ते पिक्चरमध्ये टाईमबॉम्ब डिफ्युज करताना लाल पिवळी कोंणती वायर कापायची या निर्णयाचे जसे टेंशन येते तसा वाटला. बायकोनेही (कधी नव्हे ते) प्रामाणिकपणे माझे आभार मानले आणि कबूल केले की नशीब आज सुट्टीच्या दिवशी हे झाले आणि तू घरी होतास. नाहीतर मला पोरांच्या टेंशनमध्ये काय करावे सुचले नसते.

>> किर्र अंधार , रातकिड्यांची किरकिर. आकाशात छोटी चंद्रकोर... इतक्यात बाजूने दोन कुत्रे हुश हुश करत आले ..

थरारक आहे. त्याठिकाणी ते कुत्रे भटके वा पिसाळलेले वगैरे असते तर काय गत झाली असती.
अनोळखी भागात जायचे तर रात्री बेरात्री पोहोचेल असे कधीही निघायचे नाही असा शिरस्ता मी स्वत:ला घालून घेतला आहे. अर्थात प्रत्येक वेळी हे शक्य होईलच असे नाही. पण तरीही.

हे कुणाच्याही बाबत घडू शकते...

चार पाच वर्षांपूर्वी पुण्यातलाच प्रसंग आहे. ऐन उन्हाळ्यातली भर दुपारची वेळ. टळटळीत ऊन पडले होते. औंध-बाणेर भागात एका रस्त्यावरून कारने सुसाट चाललो होतो. उन्हाचा तडाखाच इतका होता कि एसी पूर्ण क्षमतेने सुरु असूनही कारचा काळा डॅशबोर्ड मात्र कड्कून तापला होता. अचानक काही कळायच्या आत स्टीअरिंग व्हील मधून धूर येऊ लागला. मी चक्रावलो. गाडी वेगात होती पट्कन थांबवायला थोडा वेळ तर लागणारच होता. पण तेवढ्या काही सेकंदात हां हां म्हणता धूर भराभर वाढला. बघता बघता कार धुराने भरून गेली. नाकातोंडात धूर गेला. ठसका लागून श्वास गुदमरतोय कि काय असे वाटले. अर्ध्या एक मिनिटाचाच खेळ. नशिबाने मी एकटाच होतो. भरधाव रहदारीत कार कशीबशी बाजूला घेतली. थांबवली. धुराचे लोट वाढले होते. दार उघडून पट्कन बाहेर आलो. गाडी बंद करून किल्ली काढून घेऊनही धूर कमी व्हायचे नाव घेईना. मग मात्र मी पार गोंधळून गेलो. वाटले कि हे काहीतरी वेगळे आहे. त्यानंतर जे मी केले ते मला कसे काय सुचले माहित नाही. पट्कन बॉनेट उघडले आणि बॅटरीचे कनेक्शन काढायचा प्रयत्न केला. ते निघता निघेनात. मग कसेबसे अक्षरशः उचकटून काढले... आणि पुढच्या काही सेकंदातच धूर थांबला! एक मोठा सुस्कारा सोडला. मग सर्विस सेंटरला फोन केला. गाडी टो करून तिथे न्यावी लागली. तिथे त्यांनी पाहिले असता लक्षात आले कि स्टीअरिंगमध्ये एक सर्किट बोर्ड असतो तो शॉर्ट झाल्याने पेटला होता. "तुम्ही प्रसंगावधानाने बॅटरीचा सप्लाय वेळीच बंद केलात हे बरे झाले. नाहीतर अशा गाड्या पेटलेल्या आहेत", सर्विस एडवायजर बोलला. बरोबरच होते. कडकडीत उन्हाने तापलेल्या बॉनेटने एकदा का जर पेट घेतला असता तर मात्र मी काहीच करू शकलो नसतो.

त्यानंतर जेंव्हा केंव्हा कारने रस्त्यात पेट घेतल्याची बातमी वाचतो तेंव्हा हा प्रसंग मला हटकून आठवतो.

मस्त एक से एक थरारक प्रसंग!
माझ्याकडे पण दोन-तीन आहेत बघूया लिहायला जमतंय का आणि ते तुम्हा सगळ्याएव्हढे interesting वाटतंय का!

कार चा वेग ११० च्या पुढे गेल्या वर मला अशी अनामिक भीती वाटते... त्या वेगात एखादा छोटा दगड जरी चाकाखाली आला तरी अनर्थ घडू शकतो.

सुरुवातीला साधी मारुती८०० गाडी वापरायची सवय होती. नंतर पोलो आल्यावर उतारावर थांबलो होतो. निघताना सवयी प्रमाणे हँडब्रेक रिलीज केला आणि गाडी स्टार्ट न करता न्यूट्रल मधे निघालो. चौकात येईपर्यंत हळू हळू गाडी ने वेग पकडला . मी ब्रेक दाबला , तो एकदम हार्ड. स्टियरिंगही सरळच्या सरळ एकदम टाईट..
माझी चांगली च तंतरली...
मग एकदम प्रकाश पडला.. पटकन इग्नीशन किल्ली फिरवली.. मग एक-दोन क्षणात ब्रेक आणि स्टियरिंगमधे जान आली. तेव्हा कुठे जीवात जीव आला.

हँगिंग गार्डन मधून मधल्या रस्त्याने खाली उतरून चर्नी रोड ल चालत जात होतो.
हँगिंग गार्डन मधून खाली उतरलं की एक रोड लागतो वाळकेश्र्वर ला जाणार .
तो क्रॉस करण्यासाठी road chya madhye थांबलो होतो.
तिथे divider nahi.
समोरून चर्नी कडून येणारी गाडी उजव्या लेन नी हळू हळू येत होती त्या driver che भलतेच कौतुक मला वाटतं होती किती शिस्तबध्द ड्रायव्हर आहे.
हळू हळू येवून तो माझ्या पासून काही अंतरावर येवून थांबला आणि अचानक अतिशय वेगात गाडी अर्ध गोलाकार वळवली ते एवढं क्षणात झाले की मला सावरायला वेळच मिळाला नाही.
त्या गाडीची डिकी आणि मी ह्या मध्ये दोनच इंचाच अंतर राहिले होते.
थोडा जरी मी गाडीच्या दिशेने halalo असतो तर त्या गाडीच्या डिकी चा जोरदार फटका मला बसला असता.
खूप घाबरलो होत पाच मिनिट डोक सुन्न झाले.

सिंगापोरला असताना असाच एक प्रसंग ओढवला होता. वाइल्ड वाइल्ड वेट म्हणून एक वॉटर थीम पार्क आहे. तिथे त्सुनामी म्हणून एक विभाग आहे. एका बाजूला उथळ आणि दुसर्या बाजूला खोल असा तो भला मोठा स्विमिंगपूल आहे. पण फक्त स्विमिंगपूल नाही. त्यात कृत्रिमरीत्या मोठ्या लाटा सुद्धा निर्माण केल्या जातात. म्हणूनच नाव आहे 'त्सुनामी'

अस्मादिकांना मात्र तेंव्हा पोहायला येत नव्हते. हवेने फुगवलेल्या स्विम रिंग मध्ये बसून तरंगत होतो. तरंगत तरंगत खोल भागात गेलो कधी कळले पण नाही. एका बाजूला थोडा कलल्याचे निमित्त काय झाले आणि रिंग मधून धाड्कन पाण्यात खाली पडलो. पाहतो तर पाय टेकत नव्हते. पाण्याच्या तळाला पाय टेकत नाहीत याची जाणीवच पोहायला न येणाऱ्या व्यक्तीचा अर्धा जीव घेते. नेमके तेच झाले. नशीब कि रिंग सोडली नव्हती. अक्षरशः जीवाच्या आकांताने रिंगला गच्च पकडून धरले होते. पण डोके पाण्यात बुडायलाच लागले. वर येता येण्याचे चिन्ह दिसेना. प्रचंड धडपड सुरु होती. एक मात्र होते कि स्वत:ला प्रयत्नपूर्वक शांत ठेवले. पॅनिक झालो नाही. श्वास नियंत्रित केला. घाबरून नाकात पाणी एकदा का गेले असते तर संपले असते. कसाबसा पुन्हा रिंग वर आलो. कसे ते मलाच माहित. पण तो एक मिनिटभरचा काळ युगासारखा वाटला.

तिथे लाईफगार्ड होते, पाणी माझ्या उंचीहून फक्त अर्धा फुट अधिक खोल होते, भरपूर गर्दी होती, नशिबाने लाटा बंद केल्या होत्या वगैरे सगळे ठीक आहे. पण वेळ आली असेल तर काहीही होऊ शकते. माझ्या हातून रिंग सुटली असती तर? एवढ्या गर्दीत लाईफगार्डचे अथवा कुणाचेच माझ्याकडे लक्ष गेले नसते तर? तेंव्हा लाटा सुरु असत्या व एखादी मोठी लाट आली असती तर? नाकातोंडात पाणी जाऊन कुणाच्या नकळत मी तसाच खाली गेलो असतो तर? भर गर्दीत स्विमिंगपूलमध्ये बुडून मृत्यू झालेले जेंव्हा वाचतो तेंव्हा अजूनही अंगावर काटा येतो.

त्या घटनेनंतर मग मात्र मी पोहायला शिकलो Happy

माझा किस्सा अगदी कालचाच. वेळ सकाळी ९ वाजून ५ मिनिटे.

लग्नानंतरचा पहिला सण, तोही होळी, म्हणून साडी नेसून ऑफिसला चालले होते. बस सुद्धा नेहमीचीच. ऑफिस च्या आधीच्या सिग्नलला खूप ट्राफिक दिसले म्हणून बसमधून उतरून चालत निघाली. खरंतर नेहमीचा रस्ता अन रहदारी सुद्धा खूप असते म्हणून त्या वळणावर गाड्यांचा वेग नेहमी कमीच असतो. मला साडी नेसून चालायची इतकी सवय नसल्यामुळे मी हळूहळू साडी सावरत चालत होते अन त्यामुळे मैत्रिणी चिडवत होत्या त्यामुळे सुद्धा मी थोडी माझ्यातच व्यस्त होते म्हणा किंवा धुंदीत होते म्हणा पण माझ्या लक्षात आले नाही की मी थोडी रस्त्याच्या मध्याकडे चालली होती अन नेमके तेव्हाच कसे काय जाणो एक बस फुल्ल स्पीडमध्ये माझ्याकडे येत होती, रस्त्याच्या कडेला जावे त्याच दिशेने बसला समांतर त्याच बाजूने तितक्याच वेगाने एक बाईक येत होती. बाईकवाल्याने अन बस ड्रायव्हर ने मला अशी रस्त्याच्या मधोमध बघून करकचून ब्रेक दाबले. अन फक्त नशिबाने मी बस अन बाईकच्या मध्ये सुरक्षित उभी होते, अगदी खरचटले पण नाही. बिचारा बाईकवाला पडला मात्र. त्यालाही लागले नाही हे नशीब तरी थोडे खरचटले त्याला. त्याची माफी मागितली मी.
पण ज्यावेळी बस अन बाईक माझ्या दिशेने येत होत्या तो क्षण शब्दांत सांगू शकत नाही. मी जर एक पाऊल पुढे असते तर बसने उडविले असते अन जर एक पाऊल मागे असते तर बाईकने. मी काल वाचले तो निव्वळ एक चमत्कार होता असेच म्हणेन. रादर तो प्रकार ज्यांनी पाहिला त्यांचे देखील हेच म्हणणे होते.

अतुल , बर झाल पोहायला लागलात.
VB , वेळ आली नव्हती !
संजय , उगाच नाही म्हण ; नजर हटी , दुर्घटना घटी ...
ऋन्मेऽऽष आणि मनीमोहोर , प्रसंगावधान दाखवलेत ते महत्वाचे आहे .
राजसी , मामी - वाट पहतो आहोत.

@अतुलपाटील - बुडण्याचा स्लाईट अनुभव आहे मला. फार शांतपणे पाणी आत ओढतं. हिंदी सिनेमासारखे बचाव-बचाव तर अज्जिबातच होत नाही. काहीही बोलता येत नाही की हलता येत नाही. इट्स काल्मनेस इज शिट स्केअरी.

बुडण्याचा स्लाईट अनुभव आहे मला.-- -- मला पण, फार भीतीदायक असतं ते अनुभवणं. खरं तर मी बुडाले नव्हतेच. ते वॉटर पार्क मध्ये घसरगुंडी असते ना त्याच्यावरून घसरत खाली पाण्यात आले होते. ते पण मिडीयम उंचीच्या घसरगुंडीवरून. तरी बदकन पाण्यात पडल्यावर खाली गेले. काही दिसेना, ऐकायला येईना. पटकन वर येता येईना. जाम तडफड झालेली अर्धा मिनिटभर. परत धाडस झालं नाही घसरायचं अजूनही.

माझ्या लहानपणीच किस्सा. मी ७-८ असेन, आम्ही गव्हर्नमेंट quarter ला राहायचो. पुढे मागे मस्त भरपूर जागा होती, त्यात आम्ही बरीच फळ झाडं जसे आंबा, चिक्कू, सीताफळ वगरे लावली होती तसेच काही भाज्या पण लावल्या होत्या. त्यात तोंडल्याचा वेल तर एकदम मोठा झाला होता. कधी कधी एकदम कोवळी तोंडली डायरेक्ट वेलीवरून काढून आम्ही मुलं खायचो कच्चीच. एकदम कोवळी असल्यानी चांगली लागायची. एकदा असाच मी एक छोटे पांढरी तोंडली दिसली म्हणून मी काढायला गेलो तर ती एका सरड्याची शेपूट होती Lol , परंतु कळेपर्यंत तो माझ्या हातात होता आणि त्याला दूर झटके पर्यंत त्याने माझ्या बोटाचा चावा पण घेतला होता.

आधी वाटले साप आहे परंतु नंतर सरडा पाहून जीवात जीव आला. पण तेव्हडा वेळ मात्र चांगलीच तंतरली होती Lol

गोव्याला कलंगुट बीचवर मी समुद्रात पोहण्याचा आनंद घेत होतो. लाट आली की पोटाखालून पास करत जागेवर उभा रहात होतो. बाजूला एक अतिशय कमनीय बांधा असलेली फॉरेनर तरूणी मासोळी सारखी पोहोत होती. पाण्यात ती इतकी सुंदर दिसत होती की नजर आपसूकच तिच्याकडे जात होती. असे चाललं असतानाच एक मोठी लाट आली आणि मला आत खोल समुद्रात ओढून घेऊन गेली. किनारा दूर होत चालला आणि मी आत खेचला जात होतो. बुडत नव्हतो, पण बाहेर येणे अवघड होते आहे ही जाणीव झाली. घरचे सगळे नजरेसमोर दिसायला लागले. कुठुन तरी शक्ती आली आणि जीव तोडून हातपाय मारत किनाऱ्यावर आलो . तसाच वाळूत फतकल मारुन कितीतरी वेळ बसून राहिलो.
मी पोहायला सुरुवात केली तेव्हा ओहोटी होती. हळूहळू भरती आली हे लक्षात आलेच नाही.

पाण्यात बुडण्याचा अनुभव भयंकर असतो. काही करता येत नाही. पाय खाली टेकत नाहीत ही जाणीवच जीव अर्धा करते. मी तर पैसे भरून पोहायला न शिकताच ते वाया घालवले. कधी गेले तर रॉड धरून ठेवायचे आणि फक्त पाय हलवायचे. शिकवणारी बाई पाण्यात न उतरता फक्त शिट्टी वाजवत राहायची. कोणाला तिचा फायदा व्हायचा ते तिलाच माहित.

१५-२० वर्षांपूर्वीचा प्रसंग आहे. तेव्हा आम्ही गुजराथमध्ये वापीला राहायचो. पुणे/मुंबईतून तिथे जायला अहिंसा एक्सप्रेस ही थेट ट्रेन होती. थेट असल्याने सोयीची पडायची.

वापीला ही गाडी मध्यरात्री दोन-सव्वा दोनला पोचायची. मी एकदा ४-५ वर्षांच्या माझ्या मुलाला घेऊन पुण्याहून त्या गाडीने परत चालले होते. वापीला नवरा स्टेशनवर न्यायला येणार होता. एक-दीड वाजल्यानंतर सवयीप्रमाणे सामान काढून ठेवलं. त्यादिवशी त्या टप्प्यानंतर पुढे रेल्वे लाईनलगत संपूर्ण अंधार दिसत होता. वाटेतली लहान स्टेशनंही कोणती हे कळत नव्हतं. रेल्वेचाच विजेचा काहीतरी प्रॉब्लेम दिसत होता.

त्यात त्यादिवशी ती गाडी नेहमीच्या वेळेच्या आधीच वापीला पोचली. मी घोलवड-बोर्डी आलं असेल, गाडी का स्लो झाली असं म्हणत बाहेर पाहिलं, तर वापीच्या प्लॅटफॉर्मवर गाडी थांबली होती. त्यानंतर सामान, पेंगुळलेला मुलगा सगळं काखोटीला मारून, डब्याचं दार उघडून गाडी सुटायच्या आत मी कशी उतरले माझं मलाच माहित !

स्टेशनवर मिट्ट काळोख. तुरळक माणसं, चहाविक्रेते वगैरे. गाडी वेळेच्या जवळपास अर्धा तास आधी आलेली, त्यामुळे नवराही आलेला नव्हता. तेव्हा मोबाईल फोन नव्हते, घरी लँडलाईनही नव्हता.
स्टेशनमास्तरच्या केबिनमध्ये एक इमर्जन्सी दिवा सुरू होता. केबिनच्या दारातून त्याचा बाहेर अंधुक उजेड येत होता. मी त्या उजेडाच्या पट्टीत जाऊन उभी राहिले. तर आतल्या केबिनमधून कुणीतरी म्हणालं, 'मॅडम, अंदर आ के बैठो'... म्हटलं नको, मी इथेच बरी आहे. मग आतून कुणीतरी एक खुर्ची आणून दिली, ती पण मी परत पाठवली. तो कोण माणूस होता, त्याचा चेहरा कसा, काहीही नीट दिसत नव्हतं.
स्टेशनबाहेर रिक्षा असायच्या, पण ते मला सेफ वाटलं नाही. कारण स्टेशनपासून घर लांब होतं.

इतक्यात आणखी एक जण आला. म्हणाला, मी तुम्हाला ओळखतो, तुम्ही नेहमी त्या अमुकतमुक दुकानात बाईक घेऊन येता. ते माझ्या मित्राचं दुकान आहे. (तेव्हा नवर्‍याची बाईक मी वापरायचे, आणि आख्ख्या वापीत बाईक चालवणारी मी एकटीच बाई होते Proud ) दुकानाचा रेफरन्स बरोबर होता. मी त्याला कोर्‍या चेहर्‍याने 'अच्छा, अच्छा' म्हटलं आणि नजर दुसरीकडे वळवली. तर म्हणाला, तुम्ही त्या अमुकतमुक रोडवर राहता ना, माझं घर तिकडेच आहे, मी सोडू का तुम्हाला? मी परत कोर्‍या चेहर्‍याने नकार दिला.

गाडी निघून गेल्यावर स्टेशनवर आणखी सामसूम झाली. मुलगा कुरकुरायला लागला. मी तशीच शांत डोकं ठेवून उभी राहिले, दोन पायांच्या मध्ये सामान आणि कडेवर मुलगा. १५-२० मिनिटांत नवरा लांबून येताना दिसलाच. तेव्हा मनोमन टाकलेला सुस्कारा आजही मला चांगला आठवतो. Lol

गाडीतून उतरण्याचा मिनी थरार आणि मग हा २०-२५ मिनिटांचा मेगा थरार !!

ललिता जी कधी कधी समोरचा मनुष्य खरोखरच मदत करायला तयार असतो पण मन अनोळखी माणसांवर विश्र्वास ठेवायला तयार नसते. तसेही विश्र्वास टाकला आणि समोरच्याच्या मनात पाप आले तर आणखीनच वाईट घडणार. तूम्ही धीर धरुन तिकडेच थांबलात ते योग्यच होते.

तुम्हाला ओळखतो, तुम्ही नेहमी त्या अमुकतमुक दुकानात बाईक घेऊन येता. ते माझ्या मित्राचं दुकान आहे. (तेव्हा नवर्‍याची बाईक मी वापरायचे, आणि आख्ख्या वापीत बाईक चालवणारी मी एकटीच बाई होते Proud ) दुकानाचा रेफरन्स बरोबर होता. मी त्याला कोर्‍या चेहर्‍याने 'अच्छा, अच्छा' म्हटलं आणि नजर दुसरीकडे वळवली. तर म्हणाला, तुम्ही त्या अमुकतमुक रोडवर राहता ना, माझं घर तिकडेच आहे, मी सोडू का तुम्हाला? मी परत कोर्‍या चेहर्‍याने नकार दिला.

कोणत्या ही अनोळखी व्यक्ती वर विश्वास ठेवू नये हे सत्य आहे.
पण त्या व्यक्तीकडे संशयास्पद नजरेने आपण बघत आहे हे आपल्या वागण्यातून दाखवणे सुद्धा चूक आहे.
त्या मुळे खरोखर ओळखणाऱ्या आणि मदतीचा हेतू असणाऱ्या व्यक्तीचा एगो हार्ट होवून तो धोका पोचवू शकतो.
नकार सुधा योग्य रीतीने देता आला पाहिजे

सिंगापुरच्या त्या पार्क मध्ये मला पण सेम अनुभव आलेला. मला आठवतं त्यानुसार तिथे पाण्याची पातळी लिहिलेली आहे, आणि lifeगार्ड सुद्धा फार आत जाऊ देत नाहीत, पण अस्मादिक फार आगाऊ असल्याकारणाने त्या गार्ड ची नजर चुकवून अगदी जिथे त्या लाटा सुरु होतात त्या टोकापाशी पोचले होते. जीव वाचवण्यापुरते हात पाय मारायला शिकलो होतोच, पुन्हा ते लाईफजॅकेट देखील असल्याने न घाबरता बाहेर आलो. ते पार्क खूप झकास आहे, आणि लाटांचा अनुभव देखील अस्सलच्या जवळ जाणारा.. या लाटांमुळेच मी पोहायला शिकलो तो प्रसंग मात्र खरोखर भयंकर होता..

कर्नाटकातल्या गोकर्ण येथे, ओम बीच म्हणून ठिकाण आहे. आकाशातून पहिले असता साधारण ओम चा आकार आहे त्या बीचचा म्हणून हे नाव. या बीच च्या रचनेमुळे येणाऱ्या लाटा एका विशिष्ट पॉईंट वर एकमेकांना काटकोनात आदळतात. मला तेव्हा पोहायला येत नव्हते, तरीही खेळत खेळत उड्या मारत मी बऱ्यापैकी खोल गेलो होतो. लाट निघून गेल्यावर पाणी छातीपर्यंत असायचे, पण लाट आल्यावर डोक्यावरून एक दीड फूट वरून जायची. आलेल्या लाटेवर उडी मारायचा खेळ सुरु होता. अचानक मी त्या काटकोनाच्या जागी पोचलो आणि लाट ओसरताना माझा पाय भोवऱ्यात फसल्यासारखा अडकला. प्रयत्न करून हि बाहेर येता येईना. त्या बीच वर अनेक लोक मरण पावल्याच्या पाट्या होत्या त्या सगळ्या डोळ्यासमोर येऊ लागल्या एक ५ ते १० सेकंद असे गेले. एक त्यातल्या त्यात बरं कि श्वास रोखून ठेवला होता. १० सेकंदांनी लाट पूर्ण ओसरली तरी पाय जमिनीला टेकत नव्हते. कसे बसे हात पाय मारत होतो, डोके वर आल्यावर मोठा श्वास घेत होतो, इतक्यात लाट पुन्हा आली आणि त्या लाटेनेच मला थोडे बाहेर फेकले. पाय जमिनीला टेकले आणि धावतच पाण्याबाहेर पडलो. त्या दिवशी ठरवलं कि पोहायला आलच पाहिजे आणि शिकलो. समुद्र भयंकर आवडतो मला. किमान त्यासाठी तरी शिकायचं होतंच. वाचलो!

एकदा मी लिफ्टने वर घरी येत होते. वीज गेली. दोन तीन मिनिटात जनरेटर सुरू झाला, पण लिफ्ट सुरू होईना. मग मी अलार्म बेल दाबली. आमची लिफ्ट जुन्या प्रकारची आहे. आतलं collapsible door उघडता येतं. ते मी उघडलं. लिफ्ट दोन मजल्यांच्या मधे अडकली होती. बेल ऐकून एक सिक्युरिटी गार्ड आला. तो नवीन, पोरगेलासा होता. त्याने त्याच्याकडच्या टूलने दोनपैकी खालच्या मजल्याचं दार उघडलं. तो म्हणाला मी बरेच प्रयत्न केले, पण लिफ्ट सुरू होत नाहीये. तुम्ही इथून खाली उडी मारा Uhoh मीही वेड्यासारखं त्याचं ऐकून कशीबशी तिथून उडी मारली. सुदैवाने काही झालं नाही. पण नंतर माझ्या लक्षात आलं की जर चुकून माझा उडी मारल्यावर तोल गेला असता तर मी सरळ लिफ्टच्या खाली, शाफ्टमधे पडले असते. कारण लिफ्ट अर्धी वर, अर्धी खाली होती.

मी त्याला वरच्या मजल्याचं दार उघडायला सांगायला हवं होतं आणि मला हात देऊन वरती घ्यायला सांगायला हवं होतं. मुळात हे खरं तर त्याला सुचणं अपेक्षित होतं. याबद्दल नंतर त्याला सुनावलं गेलंच.

Pages