आतल्या शहरातला बाहेरचा वाटाड्या

Submitted by Theurbannomad on 9 March, 2020 - 01:13

महासत्तेच्या काळातल्या अक्राळ विक्राळ रशियाचा एक भाग असणारा आणि संपूर्ण रशियाची तेलाची गरज एकट्याने भागवू शकेल इतका तेलसंपन्न भूभाग म्हणजे आजचा चिमुकला अझरबैजान देश. बाकू ही या देशाची राजधानी पूर्वीपासून तेलसंपन्न भूमी म्हणून ओळखली जाते. ८व्या शतकातली शिरवानशाह राजांनी दीर्घकाळ सत्ता गाजवल्यावर काही काळ ऑटोमन राजांनी आणि त्यानंतर पर्शिअन राजांनी इथे राज्य केलं.शेवटी एकोणिसाव्या शतकाच्या सुरुवातीला रशिया आणि इराण या दोन देशांच्या शासकांनी बाकूला रशिया चा भूभाग म्हणून मान्यता दिली आणि कॅस्पियन समुद्राच्या किनाऱ्यावर वसलेल्या या निसर्गसंपन्न भागाच्या मागे लागलेला लढायांचं शुक्लकाष्ठ संपलं.

या शहरात जायचा योग आयुष्यात आला, याचा मला अतिशय आनंद आहे. बरेच वेळा ज्या जागांबद्दल फारशी माहिती नसते, त्या आपल्याला आश्चर्याचा सुखद धक्का देऊन जातात. या शहरात विमानतळावर पाऊल ठेवताच , तिथल्या मनमिळावू लोकांनी त्यांच्या खानदानी अदबशीर आदरातिथ्याने आणि आपल्याकडे पाहुणे म्हणून आलेल्या दुसऱ्या देशातल्या लोकांना स्वतःहून मदत करण्याची तयारी दाखवल्याने मला अक्षरशः पहिल्या तासात खिशात घातलं.

दुसऱ्या दिवशी शहर फिरायला म्हणून त्या शहराचा सगळ्यात सुंदर भाग - इचारीशेहेर - बघायचा बेत केला आणि बायको-मुलीबरोबर मी बाहेर पडलो. आपल्याकडच्या राजस्थानप्रमाणे चारी बाजूंनी भिंती घालून सुरक्षित केलेला जुन्या शहराचा भाग म्हणजे हे इचारीशेहेर, ज्याचा अर्थ सुद्धा शब्दशः ' आतलं शहर' असा आहे. जागेची नीट माहिती करून घ्यावी म्हणून मी तिथल्या पर्यटकांसाठी खास तयार केलेल्या घरवाजा कार्यालयात गेलो आणि तिथे मला ' राफाएल ' असं स्पॅनिश वळणाचा नाव असलेला हा वाटाड्या भेटला.

शिडशिडीत, उंच, डोक्यावर एकही केस नसलेला, निळ्या डोळ्यांचा आणि सतत मोहक हास्य चेहेऱ्यावर ठेवून येणाऱ्या पर्यटकांना २-३ तास त्या आतल्या शहराची सफर घडवणाऱ्या या माणसाला बघून मी मनापासून खूष झालो. माझ्यापेक्षा जास्त बोलका स्वभाव आणि हळू हळू एक एक पापुद्रा सोलत सोलत प्रत्येक गोष्टीची माहिती द्यायची त्याची पद्धत मला अतिशय आवडली आणि पुढचे ३ तास आम्ही स्वतःला त्याच्या हातात सुपूर्द केला.

हा माणूस उच्चIरांनी स्पॅनिश, चेहरेपट्टीवरून रशियन आणि अदबीवरून ब्रिटिश वाटत होता. कोणत्याही जागेचं किंवा वास्तूचं वर्णन करताना त्याचे डोळे सतत एखाद्या काल्पनिक दुनियेत रममाण व्हायचे. वेळ मागे सारून त्या काळात जाऊन डोळ्यासमोर ती प्रत्येक गोष्ट खरीखुरी घडतेय कि काय अश्या अविर्भावात तो सगळ्या गोष्टींचं मुद्देसूद आणि तरीही मोहक वर्णन करायचा. शरीराची त्या वर्णनानुसार होणारी हालचाल आणि आवाजातला त्या त्या वर्णनाला चपखल बसेल असा चढउतार या माणसाने कधी काळी रंगभूमीवर काम केला आहे कि काय, अशी शंका देऊन जायचा. त्या त्या गोष्टींचे स्थानिक उच्चार त्याला बेमालूम येत होते आणि तरीही इंग्रजी भाषेत तो एखाद्या ब्रिटिश व्यक्तीला लाजवेल इतका तरबेज होता.

हे विलक्षण रसायन नक्की कुठून तयार झाला आणि इथे कशासाठी आला, हे जाणून घ्यायची मला अतिशय उत्सुकता लागून राहिली होती आणि शेवटी तासाभराने कॉफी घ्यायला थांबल्यावर मी माझ्या मनातला प्रश्न शेवटी त्याला विचारला.

' तुमच्या वैयक्तिक आयुष्याबद्दल तुमची हरकत नसेल तर जाणून घ्यायला मला आवडेल... तुम्ही नक्की कुठले? '

' मी मूळचा स्पॅनिश असलो तरी माझ्या वडिलांनी ६०-७० वर्षांपूर्वी पेट्रोलियम कंपनीत काम करायच्या निमित्ताने बाकूमध्ये तळ ठोकला. हि जागाच अशी आहे, कि कोणीही प्रेमात पडेल! माझा, माझ्या दोन भावंडांचा आणि मोठ्या भावाच्या पुढच्या पिढीचा जन्म इथलाच, त्यामुळे आम्ही आता याच देशाचे झालोय. मी स्पॅनिश नागरिकत्व सुद्धा सोडून दिलं आणि रीतसर इथला पासपोर्ट आणि नागरिकत्व घेतलं. हा देश आणि इथले लोक माझेच आहेत आणि त्यांनी सुद्धा मला बाहेरचा म्हणून कधी हिणवलं नाही! '

दोन राज्यांमधल्या लोकांना सुद्धा बाहेरचा, उपरा किंवा परप्रांतीय म्हणून हिणवणाऱ्या आपल्या देशातल्या लोकांनी हे आवर्जून ऐकावं असा मला मनापासून वाटून गेलं.

' माझ्या शहराबद्दल मी येणाऱ्या प्रत्येकाला भरभरून सांगतो. इथे आलेला प्रत्येक बाहेरचा माणूस इथून जाताना माझ्या देशाच्या आणि शहराच्या फक्त आणि फक्त चांगल्याच आठवणी घेऊन गेला पाहिजे, अशी माझी इच्छा असते आणि tourist guide चा काम मी स्वेच्छेने करतो. मी बाकू विद्यापीठात इतिहास, पुरातत्त्वशास्त्र आणि पुरातत्त्वसंवर्धनाचा प्राध्यापक आहे. इथे माझे अनेक विद्यार्थी माझ्यासारखेच स्वतःहून हे काम करताना दिसतील तुम्हाला'

हे सगळं माझ्यासाठी भारावून टाकणारं होतं. घरी लक्ष्मी आणि सरस्वती मुक्तहस्ताने भरभरून देत असताना हे काम केवळ ज्या देशाचे आणि शहराचे आपल्यावर उपकार आहेत, त्याचे ऋण फेडण्याच्या एकाच उद्देशाने हा माणूस करत होतं आणि आपल्या विद्यार्थ्यांना आपल्या पावलावर पाऊल ठेवण्यास उद्युक्त करत होता. नुसता आरडाओरडा करून देशावर आपला किती प्रेम आहे हे सांगायचं प्रयत्न करणाऱ्या नाठाळ नेत्यांच्या तुलनेत हे कितीतरी मोठं काम होतं.

समोरून त्याचा एक मित्र किंवा विद्यार्थी गाडीतून आला आणि खाली उतरून बोलायला लागला. ती ४०-५० वर्ष जुनी गाडी आपण नुकतीच विकत घेतली आहेमी असा कळल्यावर राफाएलने त्याला ' भंगाराच्या दुकानातून किलोवर घेतलीस की पुराणवस्तुसंग्रहालयातून चोरलीस' असं हसत हसत विचारलं आणि उगीचच गाडीचा टेम्भा मिरवायला आलेल्या त्या मित्राला गार केलं. वर अशी गाडी चालवताना कोणी पाहिलं तर शिरवानशाह च्या काळातला वाटशील असं टोलासुद्धा जाता जाता दिला.

' हा माझा मित्र. काहीही गरज नसताना सतत बढाया मारत असतो...मग त्याला असं शांत करावं लागतं आणि जमिनीवर आणावं लागतं.' सहज हसत हसत आजूबाजूच्या उपद्रवी लोकांना त्यांना न दुखावता कसं वठणीवर आणायचा याचा प्रात्यक्षिक देत रफाएल पुन्हा आम्हाला त्या जुन्या शहराच्या भूतकाळात घेऊन गेला.

प्रत्यक्ष शिरवानशाह च्या महालाबाहेर त्याने दोन सेकंड डोळे मिटून दीर्घ श्वास घेतला. महाल डोळ्यात अनेकदा साठवलेला असूनही पुन्हा एकदा डोळे भरून त्याने ती वास्तू पहिली आणि एकदम खर्जात बोलायला सुरु केलं. राजाच्या महालासमोर असल्यामुळे त्याची देहबोली एकदम बदलून गेलेली होती आणि माझ्यासाठी हे सगळं थक्क करणारं होतं. गडकिल्लांवर दारू पिऊन धिंगाणा घालणाऱ्या आणि भिंतींवर बदाम काढून प्रेयसीचा नाव कोरणाऱ्या आपल्याकडच्या मूर्ख लोकांनी एकदा हे सगळं बघावं असं मला मनापासून वाटायला लागलं.

तिथल्या karavaansaraai म्हणजे आपल्याकडच्या व्यापारी लोक राहायचे तसल्या धर्मशाळा दाखवताना त्याने तिथल्या एका माणसाला लोखंडी साखळ्या लावून बंद केलेले काही भाग उघडायला लावले. व्यापाऱयांचे तांडे आपल्या जनावरांना - खेचर, घोडे आणि क्वचित उंट - यांना भिंतींवरच्या लोखंडी कड्यांना कसे बांधायचे याचा प्रात्यक्षिक एकदा व्यापारी होऊन आणि एकदा घोडा होऊन त्याने दाखवलं. गळ्यातल्या मफलर ला दोरीसारखं स्वतःच्या गळ्याभोवती गुंडाळताना हा आता गळफास लावून घेईल अशी मला भीती वाटली. चबुतऱ्यावर उभा राहून व्यापारी आपला माल विकायचे, हे सांगताना आपल्याकडचे मंडईतले भाजीपाला विकणारे जशी उकीडवी बसकण मारतात, तसा तो बसला आणि मला त्याने चक्क त्याच्याकडून ' मसाले विकत घ्यायला लावले.' त्या जागेशी तो इतका एकरूप झाला होता, की पुनर्जन्म घेऊन हा माणूस पुन्हा इथेच येणार याची मला खात्रीच पटली. तिथल्या एका दगडावर कोणीतरी काहीतरी कोरलेला बघून त्याला अतिशय दुःख झाला आणि जणू काही ते आपल्याच अंगावर कोरला गेलेला आहे अश्या अविर्भावात त्याने ते दुःख माझ्याकडे व्यक्त केलं.

तीन तासाच्या त्या फेरफटक्यात मी अनुभवाने प्रचंड समृद्ध झालो. ऐतिहासिक जागांवर मनापासून प्रेम कसं करावं आणि आपल्या इतिहासाबद्दल असलेला अभिमान छोट्या छोट्या कृतींमधून कसा व्यक्त करावं, याचं मला अतिशय विलोभनीय प्रात्यक्षिक मिळालं होतं. आपल्या पुढच्या पिढीकडे इतिहासाचा नुसता वारसा नाही, तर अभिमान कसा हस्तांतरीत करावा आणि त्या इतिहासाचा संस्कृती मध्ये कसं रूपांतरण करावं हे कोणत्याही पुस्तकात किंवा शाळेत ना शिकता अश्या कृतीपूर्ण गोष्टींमधून शिकता येतं हे मला पुपेंपूर पटलं.

हा माणूस पुन्हा एकदा भेटावं म्हणून मी शेवटच्या दिवशी पुन्हा एकदा इचारीशेहेरला आलो. साहेब कोणत्यातरी पर्यटकांच्या घोळक्याबरोबर पुन्हा शिरवानशाहशी गप्पा मारायला गेल्याचं कळलं. थोडा वेळ थांबूनही रफाएल परतला नाही, म्हणून शेवटी माघारी जायचा ठरवलं. मी परत जातोय असं बघून तिकीट विकणार्याने मला समोर बोट करून ' हा राफेलविद्यार्थी आहे, हा चालेल का' असं विचारला. त्या दिशेकडे बघितला तर एक सतरा-अठरा वर्षांचा मुलगा चार-पाच जणांना त्या जागेची माहिती देताना दिसला. तशाच पद्धतीने त्याच आपुलकीने बोलता बोलता एकदम त्याने शून्यात नजर लावली आणि बघता बघता तो पाचशे वर्ष मागे गेला.....

कदाचित तो क्षण रफाएल सारख्या गुरूला त्याच्या त्या शिष्याने दिलेली सर्वोत्कृष्ट गुरुवंदना होती.

प्रांत/गाव: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

आज झपाटल्यासारखे तुमचे सर्व लिखाण वाचत आहे.. खूप सुरेख लिहिता तुम्ही Happy

वर्णन, व्यक्तिचित्रण एवढे खास आहे की तिथला परिसर आणि माणसे डोळ्यासमोर उभी राहिली Happy

धन्यवाद !
माझ्या ब्लॉग्सना भेट द्या आणि आपल्या प्रतिक्रिया कळवा. शक्य असल्यास आपल्या मित्रमैत्रिणींना ब्लॉग वाचण्याची माझ्यातर्फे विनंती करा.

https://humansinthecrowd.blogspot.com/
https://demonsinthecrowd.blogspot.com/