गुणा

Submitted by Theurbannomad on 8 March, 2020 - 17:10

मलेशिया हा देश बघायचा योग्य आयुष्यात कधी ना कधी यावा, अशी माझी मनापासून इच्छा होती. या देशाबद्दल मी बरंच काही ऐकलं होतं, पण माझ्यासाठी या देशाची महत्वाची ओळख म्हणजे या देशाच्या राजधानीत क्वालालंपूरला जगातल्या सर्वात उंच इमारतींमधली एक असलेली पेट्रोनॉस टॉवर ही इमारत. खरं तर या जुळ्या इमारती आहेत, ज्या एकमेकांशी 'skybridge' ने जोडलेल्या आहेत.वास्तुविशारद असल्यामुळे अशा जागा माझ्यासाठी तीर्थस्थळांसारख्या, परंतु बरोबर मुलगी आणि बायको असल्यामुळे माझ्यातल्या वास्तुविशारदाला मला काबूत ठेवणं भाग होतं. शेवटी क्वालालंपूरमधल्या खरेदीसाठी प्रसिद्ध असलेल्या जागा, आजूबाजूच्या पर्यटकांसाठीच्या महत्वाच्या जागा आणि प्राणीसंग्रहालय, फुलपाखरांची बाग अशा मुलीला आवडतील अश्या जागा दोन दिवस बघायच्या आणि तिसऱ्या दिवशी दुपारचे काही तास मला ते टॉवर बघायची मुभा द्यायची अशा पद्धतीचा 'सौदा' तुटला.

क्वालालंपूर ही जागा बघायला एखादी गाडी आणि त्याबरोबर एखादा माहितगार माणूस मिळावा म्हणून आम्ही ज्या हॉटेलमध्ये उतरलो होतो तिथे चौकशी केली आणि थोड्या खटपटीनंतर आम्हाला एक माणूस मिळाला. दुसऱ्या दिवशी सकाळी तो गाडी घेऊन येणार होता आणि आम्हाला तीन दिवस क्वालालंपूर फिरवणार होता. हा माणूस तामिळ आहे आणि आम्ही भारतीय असल्यामुळे मुद्दाम हॉटेलच्या लोकांनी त्याला आमच्या दिमतीला रुजू केलं आहे हे समजल्यावर मला त्यांचं आदरातिथ्य मनापासून आवडलं .

दुसऱ्या दिवशी सकाळी बरोब्बर साडेआठ वाजता खाली हॉटेलच्या समोर एक गाडी आली. आतून एक साठीतला माणूस उतरला.डोक्याचे आणि मिशीचे केस पूर्णपणे पिकलेले, अगदी अव्वल वर्ण, गळ्यात पिवळी धमक सोन्याची साखळी, हाताच्या तीन बोटांत चांगल्या जाडजूड अंगठ्या, अंगावर पांढरे शुभ्र कपडे, पायात पांढरे शुभ्र बूट आणि कपाळावर ठसठशीत तामिळ पद्धतीचं शुभ्र गंध असा या माणसाचा अवतार बघून चित्रपटांमध्ये बघितलेले ' डॉन ' आठवले. त्याच्या हातात त्याचं कार्ड होतं. मला भेटल्यावर ओळख वगैरे झाल्यावर त्याने ऐटीत स्वतःचं नाव मला सांगितलं. " मै गुणा. मै तामिळ है, मलेशिअन है और थोडा थोडा इंडियन भी है......" त्याच्या त्या स्टाइलवर मी फिदा झालो आणि आता हा माणूस दोन-तीन दिवस आपल्याबरोबर असणार आहे या विचाराने मी मनापासून सुखावलो.

गुणा जन्माने मलेशिअन होता. त्याचे वडीलसुद्धा मलेशियामध्येच जन्मलेले होते. त्याचे आजोबा मात्र तामिळनाडूमधल्या कुठल्याश्या खेड्यात जन्मलेले होते आणि तेव्हाच्या ब्रिटिश लोकांनी पाम-रबराच्या शेतामध्ये मजुरी करायला त्यांना मलेशियामध्ये आणलं होतं. हजारो तामिळ भारतीय लोकांप्रमाणे तेसुद्धा मलेशियामध्ये आल्यावर तिथलेच झाले आणि तिथेच त्यांनी गुणाच्या आजीशी लग्न करून संसार थाटला.त्या संसाराला किती फांद्या फुटल्या माहित नाही, पण गुणाने पुरवलेल्या माहितीप्रमाणे त्याचं कुटुंब पन्नास-पंचावन्न लोकांचं असल्यामुळे त्याचे आजोबा 'बहुप्रसवा' होते हे मात्र नक्की.

तपासला तर 'तामिळ' हा एकच रक्तगट त्याच्या शरीरात मिळेल , इतका त्याला स्वतःच्या तामिळ असण्याचा अभिमान होता. मी 'मलेशिअन' आहे , भारतीय नाही हेसुद्धा तो तितक्याच अभिमानाने सांगत होता. एकूणच काय, तर टोकाचा अभिमान हा तामिळ लोकांमध्ये प्रकर्षाने आढळणारा स्वभावविशेष त्याच्यात पावलोपावली दिसून येत होता. ती गाडी त्याची स्वतःची होती. " तुम्ही शाकाहारी आहात म्हणून हॉटेलच्या लोकांनी सांगितलं, गुणा आहे ना, काळजी नको. इथे तुम्हाला सहजासहजी नाही मिळणार शाकाहारी जेवण......पण मी बरोबर घेऊन जाईन तुम्हाला.... " गुणा कॉलर कडक करत सांगत होता.

बाटू नावाच्या क्वालालंपूरपासून तास-दीड तास अंतरावर असलेल्या एका जागी आधी तो आम्हाला घेऊन गेला. तिथे शंभर-एक पायऱ्या चढून जाऊन वर एका गुहेत राम-सीतेच्या मूर्त्या आणि खाली उंचच उंच अस्सल सोन्याची कार्तिकेयाची उभी मूर्ती बघून भारताबाहेर भारतीय संस्कृतीच्या खुणा किती ठळक आहेत याची प्रचिती येत होती. तिथे मोकाट माकडांचा प्रचंड उच्छाद होत होता. आम्ही सांभाळून त्यांना चुकवत चुकवत सगळ्या जागा बघत होतो. मधूनच आम्हाला मागून गुणाची हाक ऐकू आली. आपल्या आजूबाजूला दहाबारा माकडांना तो काय काय खायला घालत होता आणि आम्हाला त्या माकडांना नमस्कार करायला बोलवत होता. त्यांच्यापैकी कोणाचे चाळे जास्त आचरट होते हे काही कळायला मार्ग नव्हता. " हनुमानाचा अवतार आहे.....आशीर्वाद घ्या" गुणाने आग्रह केला.कलियुगातील हे हनुमानाचे सवंगडी इतके आक्रमक होते, की आज जर रावणाने सीतेला पळवलं असतं, तर रामाने नुसती ही माकडं दाखवल्यावर रावणाने आपणहून सीतेला रामाकडे सोपवून स्वतः प्रायश्चित्त करायला हिमालयात निघून गेला असता. आजूबाजूच्या एकाही मनुष्यप्राण्याला हि माकडं सुखाने काही करू देत नव्हती. गुणाला त्याच्या त्या मर्कटलीलांमधून आणि त्याच्या आजूबाजूच्या त्या मर्कटांमधून बाजूला करत आम्ही त्याला पोटपूजेबद्दल विचारलं.

एका छोट्याशा खानावळीत तो आम्हाला घेऊन गेला. अर्थात ती जागा तामिळ लोकांची तामिळ लोकांनी तामिळ लोकांसाठी उघडलेली असल्यामुळे तिथे इडल्या, डोसे आणि बाकी तामिळ पद्धतीचे सगळे पदार्थ होते. शाकाहारी या शब्दाचा अर्थ गुणासाठी 'तामिळ शाकाहारी' असा होता. कसेबसे ते तामिळ पदार्थ पोटात ढकलून आम्ही तिथून निघालो. तिथेसुद्धा मनासारखी कॉफी न मिळाल्यामुळे गुणाने त्या हॉटेलच्या मालकाला " एखाद्या दिवशी पोलीस येणार इथे या फिल्टर कॉफीमुळे मेलेल्याचा पंचनामा करायला" असा खास 'गुणा' स्टाईलचा टोला हाणला. गाडीत बसताना " परत इथे कोणाला नाही आणणार.....गुणाची इज्जत धोक्यात येईल नाहीतर....." असा त्याचा शेरा ऐकून मी खळखळून हसलो.

जवळचं एक तामिळ मंदिर त्याने आम्हाला दाखवलं. तिथे आम्ही नमस्कार केल्यावर आणि गाभाऱ्याभोवती प्रदक्षिणा घातल्यावर गुणाच्या मनात आमचा आदर शंभर पटीने वाढला. आम्हाला अचानक त्याने 'सज्जन', ' संस्कारी' वगैरे विशेषण द्यायला सुरुवात केली. आता गुणा खुशीत येऊन आमच्याबरोबर मस्त गप्पा मारायला लागला. त्याच्या त्या तामिळ वळणाच्या तोडक्या मोडक्या हिंदीची आम्हाला मजा वाटत होती. त्याची खास विशेषणं आणि तिरकस टोमणे ऐकून आमचं मस्त मनोरंजन होत होतं.

" मलेशियामध्ये स्थानिक मलय, चिनी आणि तामिळ भारतीय असे तीन शक्तिशाली समाज. फेंगड्या नाकाचे ( मलाया लोकांबद्दल गुणाचं खास संबोधन ) नुसते तोंडाची वाफ दाखवण्यापुरते, छोट्या डोळ्याचे (अर्थात चिनी लोक ) पक्के आतल्या गाठीचे......डोळे छोटे, नाक छोटं पण अंगातले किडे मोठे...... पण त्यांना पुरून उरतात तामिळ लोक. "

" आमची पूजा करायची पद्धत फेंगड्यांना आणि चपटयाना कळत नाही.....कवटीत मेंदूऐवजी नूडल्सची गुंडाळी असते ना....."

" यांच्या अंगात रक्त नाही, सोया सॉस असतं वाटतं.....ज्यात त्यात सोया सॉस....आणि भातात पण व्हिनेगर टाकतात बावळट लोक..... "

" काड्यांनी जेवण जेवतात.....idiot ! आपण एक घास दोन सेकंदात खाऊ, हे काड्यांनी उचलून उचलून तोच घास खायला दोन तास लावतात....."

गुणासाठी शक्य असतं तर त्याने मलेशियात तामिळ लोकांशिवाय कोणालाच राहू दिलं नसतं. इतरांच्या, अगदी भारतीय असूनही आमच्या सवयी किंवा कृती 'केवळ त्या तामिळ पद्धतीसारख्या नाहीत' म्हणून कशा चुकीच्या आहेत हे तो आम्हाला पटवून द्यायचा आटोकाट प्रयत्न करत होता. भाताच्या ढिगाच्या मधोमध खड्डा करून त्यात सांबार ओतून तो कसा नीट कालवायचा इथपासून गव्हाच्या रोटीपेक्षा डोसा कसा आरोग्यदायी इतक्या टोकाचा त्याचा तो 'तामिळाभिमान' मला अचंबित करून गेला. काही गोष्टी देश बदलला, पिढ्या बदलल्या तरी तसूभर जागच्या हालत नाहीत, याचा ते ढळढळीत उदाहरण होतं.

दुसऱ्या दिवशी आम्हाला हा गुणा एका छानशा प्राणिसंग्रहालयात घेऊन गेला. तिथे वेगवेगळ्या प्राण्यांची माहिती आम्ही घेत असताना याच्या खास शेऱ्यांनी आमची चांगलीच करमणूक होत होती. तिथल्या एका माणसाने आम्हाला हातात एक अजगाराचं पिल्लू दिलं. आम्ही घाबरत घाबरत त्याला हातात घेतला तोच हा कुठूनसा अवतरला आणि ते पिल्लू त्याने स्वतःच्या गळ्यात घालून दाखवलं. पिवळ्या सोनसाखळीबरोबर हा पिवळा अजगर त्याच्या गळ्यात त्याच्या अव्वल वर्णावर उठून दिसत होता. कदाचित त्या अजगराला गुणाच्या केसांना थापलेल्या तेलाचा उग्र वास सहन झाला नसावा, कारण तो सारखा सरपटत खाली उतरायचा प्रयत्न करत होता आणि हा त्याला परत उचलून गळ्यात घालत होता. पुढे पोपटांना खायला घालताना पुढे पुढे करून त्याने अंगावर इतके रंगीबेरंगी पोपट बसवून घेतले, की त्याला बघून रंगीबेरंगी फुलांनी बहरलेल्या झाडाची आठवण झाली. प्रत्येक ठिकाणी माझी लहान मुलगी आणि गुणा एकाच उत्साहाने बागडत होते. कदाचित साठीनंतर त्याचं दुसरं लहानपण सुरु झालं होतं.

त्या दिवशी जेवायला तो आम्हाला जिथे घेऊन गेला, तिथे बसायला बैठक होती. याने मांडी घालून बसायचा प्रयत्न करताच त्याच्या अगडबंब पोटाचा विस्तार सहन न होऊन शर्टाची पोटावरची दोन बटणं उडाली. शर्टाच्या त्या जागेतून मग त्याचं ते भलं मोठं पोट, त्यातली विहिरीसारखी बेंबी आणि मधूनच डोकावणारं जानवं असा सुरेख देखावा आम्हाला दिसायला लागला. त्या सगळ्याचा ढिम्म परिणाम त्याच्यावर झाला नव्हता. तशाच अवस्थेत तो जेवला आणि त्या बटणांच्या जागी त्याने चक्क 'टूथपिक' खोचून बटणांची सोय केली.

त्या तीन दिवसात गुणामुळे आम्ही भरपूर फिरलो. अनेक जागा त्याने आम्हाला स्वतःहून वाट वाकडी करून दाखवल्या. बोलता बोलता जेव्हा त्याने त्याच्या कुटुंबाबद्दल सांगितलं, तेव्हा आम्हाला आश्चर्याचा धक्का बसला. त्याची खुद्द क्वालालंपूरमध्ये चार-पाच घरं होती. मुलगी डॉक्टर,मुलगा सिंगापूरमध्ये एका मोठ्या कंपनीत चांगल्या हुद्द्यावर आणि दुसरी मुलगी डॉक्टरेट करत असल्याचं कळल्यावर हा माणूस हे काम नक्की का करतोय, याची मला उत्सुकता वाटली. मुद्दाम विषय काढून मी त्याला विचारला, आणि अचानक त्याचा चेहरा गंभीर झाला.

" एक सांगू, सगळं आहे.....पण बायको नाही. मी हेच काम करून मुलांना शिकवलं. माझी स्वतःची ट्रांसपोर्ट कंपनी होती. ती विकली, पैसे घरं घेण्यात गुंतवले.....पण आरामात जगणार असा वाटलं आणि बायको गेली. मुलं सांगतात, आमच्याबरोबर राहा. मी विचार केला, कशाला त्यांना त्रास.....त्यांच्या आणि माझ्या पिढीत खूप मोठं अंतर आहे.....मग पुन्हा मी हे काम सुरु केलं. मला दुसरं काय येतं ? आता वेळ जातो, दिवस जातो....रात्र त्रास देते. रोज घेरी गेलो की एक 'पेग' घेतो आणि झोपायचा प्रयत्न करतो.... "

त्याच्या आत दडलेला हळवा बाप, नवरा आणि कुटुंबवत्सल माणूस मी नकळत जागा केला होता. मी त्याला नमस्कार केल्यावर तो अचानक पाघळला. हळूच डोळे पुसत त्याने मला, बायकोला आणि मुलीला आशीर्वाद दिले. तोंडातून शब्द काही फुटले नाहीत, पण एक अश्रूचा थेम्ब तेव्हढा खाली पडलेला दिसला. खिशातून त्याने एक अंगाऱ्याची छोटी पुडी काढून दिली. ती घेऊन मी त्याचा निरोप घेतला. जाताना पुन्हा हात वर करून त्याने आशीर्वाद दिला आणि गाडीत बसून तो दिसेनासा झाला.

कोणत्याही देशात, कोणत्याही जातीत आणि कोणत्याही धर्मात आशीर्वाद तेव्हढा एकसारखाच असतो, नाही का?

प्रांत/गाव: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

>> कोणत्याही देशात, कोणत्याही जातीत आणि कोणत्याही धर्मात आशीर्वाद तेव्हढा एकसारखाच असतो, नाही का?<< ह्या वाक्यावर, तुमच्या एकंदरितच लिखाणशैली वर आपण फिदा !!!!!!!

एवढ्या कमी वेळात माणसं कळण थोडं अवघड पण तुम्हाला ती अचूक गवसतात मग तो नासीर खान असो वा गुणा... बारीक निरीक्षण, सुंदर रेखाटन हे तुमच्या पेशाचे‌ गुण तुमच्या लेखात उतरलेत....

@kishor Mundhe We stayed in hotel Olympic sports in Jalang Hang Jebat area of KL. I don't have Guna's number now...