शाकाहारी ड्रॅगन

Submitted by Theurbannomad on 8 March, 2020 - 17:08

चीन या देशाबद्दल मला खूप पूर्वीपासून एक सुप्त आकर्षण आहे. हजारो वर्षांची संस्कृती, जगापासून वर्षानुवर्ष जपून ठेवलेलं स्वतःचं खास असं जग आणि अतिशय क्लिष्ट आणि तरीही नेत्रसुखद लिपी अख्या अनेक गोष्टींमुळे हा देश कधीतरी बघावं अशी मनात दडवून ठेवलेली इच्छा २००७ साली पूर्ण झाली आणि चीनच्या बैजिंग आणि शांघाय या दोन शहरांना मला भेट देता आली.

या भेटीत अनुभवायला मिळालेला ते अद्भुतरम्य जग माझ्यासाठी एका सुखद स्वप्नासारखं जरी असलं, तरी एकंदरीत हा देश म्हणजे माझ्यासारख्या अंडंही न खाणाऱ्या शाकाहाऱ्यासाठी सत्वपरीक्षाच होती. ३-४ दिवस फळं, बरोबर आणलेलं फराळाचं जिन्नस आणि मुद्दाम बांधून घेतलेल्या गुजराथी ठेपल्यांवर निघाले आणि शेवटी माझ्या जिभेने आणि पोटाने सत्याग्रह पुकारला. बरोबरचे मांसाहारी लोकसुद्धा जिथे तिथे तर्हेतर्हेचे प्राणी, कीटक आणि काय काय बघून अन्नावरची वासनाच उडाल्यासारखे आवश्यक तितकंच खात होते. त्याही परिस्थितीत ७-८ दिवसात सक्तीचा उपवास घडणार म्हणून त्याचा फायदा घेत देवाचा सप्ताह उरकून घ्यावा अशी सूचना देणारा एक महाभाग आणि ' चीन मधला देव शोध मग...छोट्या डोळ्यांचा' अशी त्याची खिल्ली उडवणारा दुसरा महाभाग आमच्यात असल्यामुळे आमची मौजमस्ती थांबली नव्हती.

सकाळी फिरायला जायचा म्हणून आमच्या टोळीने जी मिनीबस मागवली होती, त्याच्या बाजूला उभा असलेला त्या बसचा चालक म्हणून माझी ' पीटर' शी ओळख झाली. पीटर हे त्याचं बिन-चिनी लोकांसाठी घेतलेलं नाव होतं. चिनी लोकांमध्ये पाळणा असतो का हे मला माहित नाही, पण असलाच, तर त्या पाळण्यातलं त्याचं नाव होतं फू मिंग हुआ. भारतीय पद्धतीने विचार करून फू हे त्याचं आणि मिंग हे त्याच्या जन्मदात्याचा नाव असावं, असं वाटून मी त्याला Mr.Foo म्हंटलं आणि तो पोपडे उडालेल्या भिंतीसारखे दिसणारे किडके खडबडीत दात दाखवून हसला. तोडक्या मोडक्या इंग्रजीत त्याने ' आमच्यात आधी आडनाव, मग आमचं नाव आणि मग आमचंच प्रचलित नाव' अश्या पद्धतीने नाव लिहितात हि बहुमोल माहिती पुरवली. वर ' मला पीटर म्हण ना...माझा नाव तुला नाही उच्चरता येणार' असा हसत हसत उपदेश सुद्धा केला आणि स्वारी हातातलं संत्रं सोलून खायला लागली.

या माणसाच्या चेहेऱ्यावर परमेश्वराने अवयव अक्षरशः चिकटवल्यासारखे दिसत होते. सुरीने आडवी खाच मारावी असे वाटणारे मिचमिचे डोळे, गोल गरगरीत चेहेरा, बारीक कापलेले केस, नाकपुड्यांपुरतच तयार केलेलं छप्पर वाटावं असं थोडंच पुढे निघालेलं नाक आणि बारीक पातळ जिवणी. त्याच हे रूप बघून एकदम युरोपमधली छान खसाखसा धुवून घासून पुसून स्वच्छ केलेली डुकरांची पिल्लं मला आठवली.

आमची भारताच्या विविध प्रांतांमधून आलेल्या वेगवेगळ्या वयाच्या लोकांची ती इरसाल टोळी एकदाची बसमधे बसली. त्यातसुद्धा पगडी घातलेला, छान दाढी मिशी असलेला आणि मस्करी केल्यावर पटकन चिडणार आमचा एक शीख मित्र या 'पीटर' ला प्रचंड आवडला. लहानपणी पेशवे उद्यानात पांढरा वाघ आयुष्यात मी पहिल्यांदा बघताना मला जे आश्चर्य वाटलं होतं, तेच त्या 'पीटर' ला या सरदारजीकडे बघून वाटत होतं. सारखी त्याची पगडी आणि दाढी तो निरखत होता , त्यामुळे आता हा आमचा सरदार कृपाण काढून त्या 'पीटर' ला मारणार अशी आम्हाला भीती वाटायला लागली.

शांघाय मध्ये फिरताना अनेक लोक या आमच्या सरदार मित्राबरोबर फोटो काढायला यायला लागले आणि १-२ तासात तो तिथे चांगलाच ख्यातनाम झाला. पीटरने मला त्या पगडीबद्दल तोडक्या मोडक्या इंग्रजीत विचारलं आणि मी माझ्या परीने त्याला समजावायचा प्रयत्न केला. दोघांना दोघांचाही कळलं असेल असं मला तरी वाटत नाही, कारण दोघांनीही २-३ मिनिटातच तो प्रश्नोत्तरांचा नाद थांबवला. या पीटरने त्याच्या भयंकर इंग्रजीत अनेक जागांची नावं, त्यांचा इतिहास आणि तिथल्या महत्वाच्या घटनांची माहिती आम्हाला दिली आणि त्यातलं अवाक्षरही न कळल्यामुळे आमच्याकडच्या काही मंडळींच्या चीनबद्दल असलेल्या 'अज्ञानात' आणखी भर पडली.

शेवटी आमची भुकेची वेळ झाल्यावर त्याला आम्ही जमेल तशा खाणाखुणा करत आणि त्याला उमजेल इतक्या सोप्या इंग्रजीत 'जेवायला कुठे जायचं ?' म्हणून विचारलं. ज्या जागी तो आम्हाला घेऊन गेला, तिथे चक्क भारतीय जेवणसुद्धा मिळत होतं आणि त्याच्याबद्दल आत्तापर्यंत ' हा कुठून शोधून आणला...याला guide म्हणून कोणी नोकरीवर ठेवला...' अशी काटकटवजा तक्रार करणाऱ्या आमच्या मंडळींना स्वर्ग दिसल्याचा आनंद झाला. अनेक दिवसांपासून भारतीय जेवण न मिळाल्यामुळे आता आमचे लोक या खाणावळीमधलं आठवड्याभराचं जिन्नस नक्कीच संपवतील अशी माझी खात्री पटली आणि खरोखरच सगळ्यांनी दुष्काळातून आल्यासारखं जेवण मागवायला सुरुवात केली.

हा पीटर मला एकटाच बसलेला दिसला आणि त्याला मी आमच्याबरोबर बसायची विनंती केली. बाजूच्या एका जैन गुजराथी मित्राने माझ्याकडे रागाने बघितलं . ' जर याने समोर बसून कुत्री-मांजरी खायला सुरु केली तर मी उठून जाईन' अशी त्याने मला धमकी दिली. पीटर माझ्या बाजूला बसला आणि त्याने मला पुन्हा त्याच्या खास चिनी इंग्रजीत सांगायला सुरु केलं...

' यू ईत ऍनिमल? आय नो ईत..आय ईत भेज..यू अंडरस्तान मी ?'

एक वेळ नुकतंच बोबडं बोलायला लागलेल्या लहान बाळाची भाषा कळेल, पण हे सगळं कळणं माझ्या आवाक्याबाहेरचा होतं. माझा प्रश्नार्थक चेहेरा बघून तो पुन्हा सुरु झाला...

' ऍनिमल? इत ? यु? '

' येस...टायगर, लायन...कॅन ईट मी...'

' यु ? टायगर? ' तो खुर्चीतून उडाला. मी वाघ खातो अशी त्याची बहुतेक समजूत झाली. पण काहीतरी चुकतंय हे त्याचं त्यालाच वाटलं आणि मला त्याने समोरच्या टेबलवर ठेवलेली एक थाळी दाखवली. त्यात लालबुंद चरचरीत भाजलेलं अखंड बदक, भाताच्या ढिगाऱ्यात बसलेल्या अवस्थेत ठेवलेलं होतं आणि आजूबाजूला कसल्यातरी उकडलेल्या भाज्या आणि ३-४ प्रकारचे सॉस होते. ' ऍनिमल? यु? ईट? ' पुन्हा त्याचे शब्द कानावर पडले आणि माझ्या मेंदूत अचानक अनेक तास गेलेलीं वीज येताच झपकन घरभर दिव्यांचा प्रकाश पडावा तसा लक्ख प्रकाश पडला.

' नो नो ऍनिमल...नो एग...ओन्ली व्हेजिटेबल....' मी त्याला समजेल अशा शब्दात सांगितलं.

त्याने आनंदाने मला टाळी द्यायला हात वर केला, मला ना कळल्यामुळे माझा हात उचलून स्वतःच ती टाळी पूर्ण केली आणि ' सेम सेम' असं काहीसं तो बोलला. मग पुन्हा त्याने खुलासा केला आणि मला चीनमधला आत्तापर्यंतचा आश्चर्याचा सगळ्यात मोठं धक्का बसला.

हा माणूस खुद्द चीन मध्ये जन्माला आला, वाढला आणि पिकला, पण तो चक्क शाकाहारी होता. १०-१२ वर्षांपूर्वी कोणत्याशा बौद्ध भिक्खूच्या सान्निध्यात येऊन त्याने 'ऍनिमल' खाणं सोडलं होतं....अगदी अंडंसुद्धा! दीक्षा घेऊन माळ घालून निरामिष होणाऱ्या आपल्याकडच्या माळकरयांमधला कदाचित गतजन्मीचा कोणीतरी पुण्यात्मा चीनमध्ये जन्माला आलाय , असं काहीसं मला वाटून गेलं .आभाळाखालच्या कोणत्याही जिवंत प्रकाराला आपल्या आहारात निषिद्ध न मानणाऱ्या चिनी लोकांमध्ये बिलकुल न शोभणाऱ्या या माणसाचा मला अचानक प्रचंड कुतूहल वाटायला लागलं.

त्यानंतर दिवसभरातल्या अथक प्रयत्नांनी भाषेच्या अडचणींवर कशीबशी मात करून मी याची कुंडली जाणून घेतली. एका सर्वसाधारण कुटुंबात शेंडेफळ म्हणून जन्माला आलेल्या या खुशालचेंडू माणसाला वाया गेलेल्या पोरांच्या संगतीत पूर्णवेळ राहून त्यांसारखेच नको ते उद्योग करायला लागल्यामुळे आणि शेवटी घरच्यांवर ओझं झाल्यामुळे घरातून बाहेर काढलं गेलं होतं. दिवसभर गांजा पिणे, चोऱ्यामाऱ्या करून दोन वेळचं पोटात ढकलणे आणि मनसोक्त टवाळक्या करणे असे उद्योग करण्यात त्याने उमेदीची पाच-सहा वर्ष वाया घालवली. एकदा तुरुंगाला सुद्धा स्वतःचं दर्शन देऊन आला. तिथेसुद्धा त्याने एका रात्रीत खिसे कसे कापायचे याचं शिक्षण देणारे गुरु भेटल्यामुळे पुढच्या तुरुंगवारीची सोय करून घेतली.सुरुवातीची उमेदवारी म्हणून स्वतःच्या सख्या काकाचा खिसा कापताना त्या काकाने याला पकडला आणि पोलिसांकडे न नेता जवळच्या बौद्ध मंदिरात घेऊन गेला.

' my uncle ...good man ....now no...die ...' काहीशा उदास आवाजात त्याने सांगितलं.

त्या मंदिरातल्या कोणत्याशा भिक्खूने मग त्याला आपल्या छत्रछायेखाली घेतलं. बौद्ध पद्धतीच्या उपासनेची दीक्षा दिली आणि आयुष्य कसा जगायचं हे अक्षरशः हात धरून शिकवलं. त्याच्या प्रभावाखाली राहून हा ' पीटर' गांजा, दारू, चोऱ्या इतकाच काय पण मांसाहार सुद्धा सोडून एकदम वाल्याचा वाल्मिकी झाला. ३-४ वर्षांनी तो भिक्खू चीनच्या कुठल्याशा भागातल्या बौद्ध मठात कायमचा निघून गेला आणि त्याचा हा शागीर्द स्वतःच्या मेहेनतीने स्वतःचे नूडल्स कमवून खायला लागला.

त्या दिवशी मला त्याने अनेक गोष्टींसाठी मदत केली. कुठे कोणती वस्तू स्वस्त मिळते, कुठे भाव चांगला १०-१२ पट वाढवून सांगितलं जातो, कुठे नव्या चित्रपटाच्या ' DVD ' स्वस्त मिळतात अशी सगळी माहिती त्याने मला पुरवली. वेळप्रसंगी स्वतः चिनी भाषेत दुकानदाराला ' पटवून' सौदा स्वस्तात करून द्यायला आपणहून तो पुढे आला. एका ' jade buddha ' मंदिरात तिथे ठेवलेल्या पुस्तकाचा त्याने डोकं गदागदा हलवत पठण केलं आणि अगरबत्त्यांचा जुडगा तिथल्या शेकडो अगरबत्त्या लावलेल्या एका मोठ्या पितळी घमेल्यात खोचताना ' buddha ...god ...pray ' म्हणून मलासुद्धा प्रार्थना करायला लावली. मी केलेला नमस्कार बघून त्यानेसुद्धा हात जोडून नमस्कार केला. गौतम बुद्ध भारतात जन्माला आला आणि त्याच्या अनुयायांनी श्रीलंका, चीन जाते अगदी जपान पर्यंत बौद्ध धर्म पोचवला हे मी त्याला सांगितल्यावर त्याला आश्चर्य वाटलं आणि त्याच्या त्या चकित होण्यामुळे चीनमध्ये इतर देशांची किती माहिती सर्वसामान्यांना मिळू दिली जाते हे मला कळलं.

माओ-त्से तुंग आणि डेंग-झीओ पिंग यांच्या त्या साम्यवादी चीनमध्ये केवळ आपल्या भूतकाळातल्या सम्राटांना आणि वर्तमानकाळातल्या सत्ताधीशांना देव मानण्याची सवय असलेल्या चिनी लोकांमध्ये वेगळा वाटणारा हा बुद्धाचा उपासक मला विलक्षण वाटून गेला. आपल्या पुढाऱ्यातल्या माणसाचं दैवीकरण केल्यावर जसा समाज त्या पुढाऱ्याचा गुलाम व्हायला लागतो, त्याचप्रमाणे खऱ्या देवाचं अस्तित्व मान्य केल्यावर गुलामांमध्ये सुद्धा माणूस जागा व्हायला लागतो, याची जाणीव या 'पीटर' च्या अनुभवावरून मला झाली.

त्या दिवशी संध्याकाळी आमच्याबरोबर उकडलेला भात आणि भाज्या खाणारा हा शाकाहारी चिनी ड्रॅगन मला आमच्यातलाच एक वाटायला लागला. माझ्या त्या गुजराथी मित्राने त्याला आपल्या डब्यातला ठेपला खायला दिला आणि आता आमचा टोळकं ' हिंदी चिनी भाई भाई' म्हणून ओरडत की काय, असं मला वाटायला लागलं.रात्री पांगापांग झाली आणि घरी जायला निघणार तोच हा पळत पळत आला. हातात बुद्धाची प्रतिमा असलेलं एक नाणं त्याने हातावर ठेवला आणि काहीही न बोलता मागे वळला.

ते नाणं माझ्या त्या चीनच्या प्रवासातली मला मिळालेली सर्वात अविस्मरणीय भेट होती.

प्रांत/गाव: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users