पाकिस्तानी मराठा

Submitted by Theurbannomad on 8 March, 2020 - 06:49

ओमान हा देश तसा अघळपघळ आणि अवाढव्य असूनही तुलनेने कमी लोकवस्तीचा. या देशाचे सुलतान अतिशय शांतताप्रिय असल्यामुळे युद्धांमध्ये किंवा आंतरराष्ट्रीय कुरघोड्यांमध्ये सहसा या देशाचा उल्लेख आढळत नाही. यूएई आणि ओमान सक्खे शेजारी असल्यामुळे आणि अगदी सहज व्हिसा मिळू शकत असल्यामुळे या देशात अनेकदा जाणंयेणं झालं आणि अशाच एका प्रवासात मला नासीर खान भेटला आणि केवळ ५ तासाच्या कालावधीत या माणसाने मला मंत्रमुग्ध करून सोडलं.

खांद्यावर एक, दोन्ही हातात एक-एक आणि समोर पोटावर एक अशा बॅग्स लटकावलेला हा उंच, धिप्पाड आणि भारदस्त मनुष्य जेव्हा बसकडे चालत आला, तेव्हा बसच्या सीट वर हा मावेल कसा अशी शंका येऊन गेली. आपल्या बॅग्स बसच्या सामान ठेवायच्या जागेत सगळ्यात शेवटी त्याने ठेवल्या, कारण इतरांच्या बॅग्समुळे त्याला त्या खराब होऊ द्यायच्या नव्हत्या. लिटरभर पाण्याची बाटली एका दमात रिकामी करून आणि खिशातून आणलेला पुडीभर सुकामेवा खाऊन स्वारी ताजीतवानी झाली आणि त्याच्यासमोर अगदीच बापुडवाण्या दिसणाऱ्या त्या बस चालकाला त्याने आपल्या पहाडी आवाजात बस किती वाजता सुटणार म्हणून विचारल. अजून वेळ आहे असा कळल्यावर तितक्यात तिकीट विकायला बसलेल्या अरबी माणसाशी त्याच्याच भाषेत काहीबाही बोलला आणि संभाषण संपल्यावर त्याने त्याच्याशी handshake केला. अरबी माणूस त्या ताकदीने चांगलाच विव्हळला आणि दिवसाढवळ्या बारा राशी, नऊ ग्रह आणि सत्तावीस नक्षत्र त्याच्या डोळ्यांसमोर चमकून गेली.

या सगळ्याचं काहीही सोयरसुतक नसल्यागत हा सहा फुटी देह तो परिसर तीर्थरूपांकडून आंदण मिळाला असल्यासारखा मनात येईल तसा मनसोक्त फिरत होता. कोणालाही काहीही विचार, कोणाच्या छोट्या मस्तीखोर कार्ट्याला उचलून घे आणि मधूनच कोणाचातरी फोन आल्यावर उंच स्वरात बडबड कर असे असंख्य चाळे हा माणूस करा होता. त्याची ती घट्ट पगडीवजा टोपी आणि त्यातून बाहेर डोकावणारे लांब केस या सगळ्यामुळे त्याचा चेहरा लोणच्याच्या बरणीवर प्लास्टिकचा तुकडा ठेवून झाकण घट्ट लावल्यावर ती बरणी जशी दिसते, तसा दिसत होता. नाक मात्र भरघोस होतं. मिशीला चांगला पीळ भरलेला होता आणि गर्द दाढीमधून हळूच डोकावणारा एखादा पांढरा केस त्याच्या मध्यम वयाची जाणीव करून देत होता.

प्रवासात हा मनुष्य बस मध्ये कसा वागेल, याची मला आता काळजी वाटायला लागली होती. नाही म्हणायला एकट्याने प्रवास करणार असल्यामुळे मला त्या ५ तासांचा विचार करून सुद्धा वैताग आला होता आणि त्यात अश्या महाभागाबरोबर प्रवास करावा लागला तर....चा विचार भीतीमध्ये भर घालत होता. पण कधी कधी खरोखर नशीबाला सुद्धा आपली चेष्टा करायची जबरदस्त हुक्की आलेली असते हेच खरं कारण नेमका बस मध्ये माझ्या बरोब्बर बाजूच्या जागेवर याची जागा आली. सगळ्यात पुढची जागा असल्यामुळे बसल्याच क्षणी त्याने आपल्या पठाणी सपाता काढून पाय समोरच्या दांड्यावर ठेवले आणि पुढे ५ तास कसे जाणार आहेत याची छोटीशी झलक मला दाखवली.

बसचालक निघायच्या आधी आमचे पासपोर्ट चेक करत असताना मी भारताचा आणि तो पाकिस्तानचा आहे असं कळलं आणि बसचालक सुद्धा विळा - भोपळा बाजूबाजूला बसल्याचं ते दृश्य पाहून हसला.

' तुम क्यों हसा??? पाकिस्तानी के बराबर हिंदुस्तानी बैठा तो क्या होती?' म्हणून त्याने बसचालकाला दटावलं आणि मला ' भाईजान कोई तक्लिफ नही ना? ' म्हणून मला विचारलं . एकाच वेळी भाईजान आणि स्त्रीलिंगी संबोधन असा विरोधाभास मला मजेशीर वाटला आणि हा प्राणी काही शांत बसू शकणार नही याची खात्री पटून आता आलिया भोगासी...म्हणून मी पुढील ५ तासांच्या झोपेच्या विचारावर स्वहस्ते पाणी सोडलं.

बस निघाली तशी स्वारी रंगात आली.

' तुम्हारा नाम?'

मी नाव सांगितल्यावर त्याने ना विचारताच स्वतःचा नाव सांगितलं..' नासीर खान बुगटी ' आणि पुढे न विचारताच आपल्या सगळ्या कुटुंबकबिल्याची माहिती त्याने सांगायला सुरुवात केली.

पाकिस्तानातल्या बलुचिस्तान भागातल्या क्वेट्टा शहरापासून १०० किलोमीटरवर त्याचा गाव होतं. बलुची वस्ती असलेलं आणि खाऊन पिऊन सुखी प्रकारातला त्याचं कुटुंब तसं ऐसपैस होतं. चार भाऊ, दोन बहिणी आणि तीन काकांचा कुटुंबकबिला त्याच्या घरात एकत्र राहात होता. खिशातून पाकीट काढून त्यात आतल्या बाजूला जपून ठेवलेले स्वतःच्या दोन मुलांचे फोटो दाखवून ' ये मेरे दो शेर..' म्हणून त्यांची ओळख त्याने मला करून दिली. दुसऱ्या मुलाच्या वेळी बायको अल्लाहला प्यारी झाली आणि घरच्यांनी सांगून सुद्धा दुसरा लग्न ना करता हा माणूस दुबई सारख्या देशात अंगमेहेनतीचं काम करून पैसा कमवायला लागला.

' आमच्या भागात खूप अत्याचार होतात...काय सांगणार...आमच्या भागात खूप काही आहे...जमिनीच्या आत आणि बाहेर सुद्धा. गॅस आहे, कोळसा आहे आणि काय काय आहे आमच्या भागात....पण त्याचं आम्हाला काही फायदा नाही होत. आम्ही गरीबच राहिलो आणि आमचे हाल होतंच राहिले...पण मी माझ्या मुलांना आणि माझ्या भावांच्या मुलांना शिकवणार. मेरा एक शेर अस्पताल वाला डॉक्टर बन के काबिले के लोगों की सेवा करेगा, देखना भाईजान!'

अस्पताल वाला डॉक्टर हा संदर्भ मला समजला नाही. मग त्यानेच खुलासा केला, कि जडीबुटी विकणारे आणि काहीबाही उपाय करणारे हकीम त्यांच्या गावी अनेक आहेत, पण शिकला सवरलेला डॉक्टर नाही. कदाचित आपल्या बायकोच्या जाण्याचा सल मनात असेल, पण डॉक्टरची गावाला किती गरज आहे हे त्याला ठाऊक होतं.

मी महाराष्ट्राचा आहे, हे त्याला कळल्यावर तो एकदम खुश झाला आणि त्याने माझ्या पाठीवर आपल्या भक्कम हाताने एक जोरदार थाप मारली आणि हातानेच मला दाबत ' सुभानल्लाह सुभानल्लाह' असं काहीसं तो म्हणाला. पाठीच्या मणक्यांच्या हाडांचा हिशेब Muscat ला उतरल्यावर पुन्हा एकदा जमवावा लागणार याची मला यथेचछ जाणीव झाली. या महाभागाचं महाराष्ट्राशी काय नातं आहे, हे मात्र मला कळलं नाही. पण त्यानेच मला ' तुम मराठा है? ' असा विचारलं आणि मी सर्द झालो!

' नाही, पण मराठे लोक तुम्हाला कसे माहीत? '

' सुभानल्लाह, हम पेहले के जमाने का मराठा रेहेती भाईजान...आपको मालूम? '

९६ कुळी मराठे मला माहीत होते, पण हे सत्याण्णावावं कूळ आणि चक्क पाकिस्तानातलं, हे मात्र माझ्यासाठी अविश्वसनीय होतं. मराठयांनी अटकेपार झेंडे लावले होते हे जरी खरं असलं, तरी नासीर खान बुगटी नावाचा एक मनुष्य चक्क झुणका भाकरी आणि पांढरा-तांबडा रस्सा भुरकतोय आणि बायको त्याला चुलीवरची गरम गरम भाकरी आग्रहाने वाढतेय हे दृश्य माझ्यासाठी जरा विचित्रच होतं.

' भाईजान, जरा और बताएंगे? मेरे लिये ये नया है...' मी विनंती केली.

त्यावर त्याने मग मुद्देसूद खुलासा करायला सुरुवात केली. अहमद शाह अब्दाली ने पानिपतात बलुचिस्तानच्या शासकांच्या सैनिकांची मदत घेतली होती आणि पानिपतात कैद केलेले मरहट्टे परत जाताना त्याच बलुचिस्तानात त्या शासकांना भेट म्हणून दिले होते. २०-२५ हजारांच्या वर संख्या असलेले ते मराठे मग तिथलेच झाले. मार्री, बुगटी, माझारी, गुरचानी आणि रायसानी अश्या वेगवेगळ्या नावांनी आज ओळखली जाणाऱ्या आजच्या बलुची टोळ्या म्हणजे मूळचे मराठे आहेत आणि त्यांनी तिथे स्थायिक होऊन सुद्धा आणि धर्मपरिवर्तन करून सुद्धा कुठेतरी मूळच्या मराठा चालीरीतींच्या खुणा जपून ठेवल्या आहेत हे ऐकून मला आश्चर्य वाटलं.

' आमच्यात पेशवाणी म्हणून एक कबिला आहे...तुमच्यात पेशवा आहे ना?' माझ्यासाठी अजून एक धक्का. मग मी सुद्धा मराठ्यांचा इतिहास थोडक्यात त्याला सांगितला. शिवाजी महाराज ते शाहू महाराजांपर्यंत आणि बाजीराव पेशव्यांपासून ते चिमाजी अप्पांपर्यंत माझ्याही इतिहासाची उजळणी झाली.

' तुम हमारा भाई होती दोस्त...' त्याने सगळं ऐकून घेतल्यावर भावनेच्या भरात मला पुन्हा तशीच मिठी मारायचा प्रयत्न केला आणि माझ्या कण्याच्या आजूबाजूची उरलेली हाडं सुद्धा जागेवरून सरकवली. बस जेवणाकरता एका जागी थांबल्यावर तो माझ्याच बरोबर जेवायला बसला आणि ' आज मी मनसोक्त खाणार..मी खूप खुश आहे' असा म्हणून त्याने एका अक्ख्या कोंबडीचा फडशा पाडला. त्याला मी मोबाईल वर रायगड, प्रतापगड, सिंधुदुर्ग, शनिवारवाडा आहि जी जी ठिकाणं दाखवता येतील ती दाखवली आणि स्वतःच्या पूर्वजांच्या आठवणीत हा अजस्त्र वाटणारा माणूस लहान झाला. अधून मधून अहमद शाह अब्दाली आणि त्याच्या वंशजांना अस्सल बलुची शिव्या घालून त्याने त्यांचा मनसोक्त उद्धार केला. ' ते खात्रीने जहन्नुम मध्ये गेले असतील आणि अल्लाह ने त्यांना भरपूर शिक्षा दिली असेल...उकळत्या तेलात तळून काढला असेल त्यांना सैतानाने....' असा काहीबाही तो बोलत होता. जेवताना हातात घेतलेला तळलेल्या सामोशाचा घास मात्र ते ऐकून माझ्या घशाखाली उतरला नाही.

पुढचे दोन तास असेच गप्पांमध्ये मजेत गेले. शेवटी MUSCAT ला पोचल्यावर आम्ही उतरलो आणि निरोपाचा बोलायला म्हणून मी त्याच्या जवळ गेलो. आधीच अनुभव असून सुद्धा मी स्वताःहु हात पुढे केला आणि अपेक्षेप्रमाणे भावनांच्या आवेगात त्याने तो अजून जोरात पकडून अगदी गदागदा हलवला. अफझलखानाने शिवाजी महाराजांना कवटाळलेलं तसं काहीसं त्याने मला कवटाळताना मला वाटून गेला आणि पुढचे काही दिवस शरीर नक्की कुठे कुठे दुखणार आहे याची उजळणी मनात सुरु झाली.

' वापस मिलेंगे भाईजान....' म्हणून तो आपल्या वाटेवर चालायला लागला. मला लहानपणी बघितलेल्या तिरंगा चित्रपटातला नाना पाटेकरांच्या DIALOGUE आठवला - " मराठा मारता नाही, मारता है! " पानिपताच्या त्या रणसंग्रामातून वाचलेले मरहट्टे बलुचिस्तानातल्या त्या प्रतिकूल परिस्थितीत सुद्धा राहिले, वाढले आणि तिथल्या मातीतले होऊन गेले आणि आपल्या पूर्वपुण्याईमुळे कदाचित त्यातला एक मरहट्ट आज आपल्याला भेटला असा विचार मनात येऊन मी मनोमन पुन्हा एकदा इतिहासातल्या त्या महापुरुषांना मुजरा केला.

प्रांत/गाव: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

आवडला लेख...
बलुचिस्तान पाकिस्तानी शासनाला कंटाळयं. तिथे स्वातंत्र बळ धरतयं.
पानिपतात आजही जखमी मराठ्यांचे वंशज आहेत. नाव भले कुमार सिंह असेल पण नावापुढे रोड मराठा आवर्जुन लिहितात. मराठी चालीरीती पाळतात.

हे बुगटी लोकं, मराठा आरक्षणाला सपोर्ट करत होते तिथे बलुचिस्थानात बसून ते वाचलेले तेव्हा..

पानिपतचे मराठे 'रोड मराठे' म्हणुन ओळखले जातात, यूट्यूबवर त्यांची एक फिल्म बघितली होती
हा विनोदी लेखनात का आहे? >>>>+१००

मस्त लेख.

तुम्ही बहुतेक सगळे तुमचे लेख विनोदी लेखन भागात टाकले आहेत. ते ललित लेखनात हलवा.

एकदम इतके लेख टाकण्यापेक्षा दर २ दिवसांनी एक वगैरे टाका म्हणजे जास्ती प्रतिसाद मिळतील. नाही तर सगळे मागे जात गडप होतील.

मध्यंतरी कोल्हापूर मध्ये १५ ते २० रोड मराठ्यांना पानिपत मधून बोलवून त्यांचा सत्कार करण्यात आला. त्यांना आता जरी मराठी बोलता येत नसले तरी त्यांच्या भाषेतील अनेक शब्द, लग्नाच्या चाली रीती, कुलदैवत ही एका सारखी आहेत. आशा लोकांना पाहिले की त्यांचे फार कुतूहल वाटते आणि एक गौरवशाली इतिहास डोळ्या समोर उभा राहतो. एक सुंदर, सत्यावर आधारित व आपल्या पूर्वजांच्या नाते संबधावर आधारित नाविन्य पुर्ण असा लेख.