' ताप ' गंधर्व

Submitted by Theurbannomad on 8 March, 2020 - 03:38

संगीत आणि त्यातही शास्त्रीय संगीत हा माझा जिव्हाळ्याचा विषय. आजच्या पंजाबी वळणाच्या आणि केवळ ठेक्यावर जोर देत गायला जाणाऱ्या गाण्यांचा मला प्रचंड तिटकारा आहे. किंबहुना ही गाणी ' तयार' करावी लागतात हे मला पटत नाही आणि म्हणूनच हे सगळं मला बरंचसं सपक वाटतं. कवितेचे शब्द, भाव, त्यात अभिप्रेत असलेला अर्थ याचा सखोल विचार करून सुरांना त्या शब्दांमध्ये अलगद गुंफायची कला प्रचंड तपस्या करून मिळते, म्हणूनच असेल कदाचित, पण आजच्या ' फास्ट फूड' च्या जमान्यात फार कमी वेळा अशी गाणी ऐकायला मिळतात.

दुबईला महाराष्ट्र मंडळात अधून मधून शास्त्रीय संगीत आणि भावसंगीताचे कार्यक्रम होत असतात, जे माझ्यासारख्या ' जुन्या वळणाच्या' संगीतप्रेमींना पर्वणीसारखे वाटतात. संजीव अभ्यंकर यांच्यापासून अगदी संदीप - सलील यांच्या अतिशय गोड गाण्यांचे कार्यक्रम मी अनेक वेळा पाहिले आहेत. अशाच एका कार्यक्रमात माझ्या बाजूला बसलेला असल्यामुळे मला माहित झालेला आणि नंतर ओळख वाढून मित्र झालेला प्रसाद जोग. संजीव अभ्यंकरांनी गाताना एक विजेसारखी तान अतिशय डौलदारपणे समेवर आणून संपवली आणि माझ्या बाजूला बसलेला हा मनुष्य एकदम ' धैवतssssधैवत' असा काहीसा बोलला. मला त्याची ती दाद चमत्कारिक वाटली. हे प्रकरण नक्की काय आहे, हे काही मला समजल नाही, पण चहा घेताना तो बाजूला आला आणि ' तुम्ही कुठले?' असा प्रश्न त्याने विचारल्यामुळे ओळखीची सुरुवात झाली.

' मी ठाण्याला राहतो....तुम्ही?'

' आम्ही संजीव अभ्यंकरांच्याच गावचे.....पुण्याचे' मुळात त्या शिडशिडीत काटकुळ्या देहातून ' आम्ही' असा संबोधन मला विचित्र वाटलं आणि कोणास ठाऊक, कदाचित सहकुटुंब आला असावा म्हणून ' आम्ही ' म्हणत असावा असं वाटून मी त्याला तसा प्रश्न विचारला. ' नाही, अहो मी एकटाच आहे......विवाहाचा विचार तूर्तास नाही' असं त्याचं उत्तर ऐकून मी गार झालो.हे पुणेरी शुद्ध मराठी बरेच दिवसांनी कानावर पडत होतं. ' चहापानानंतर पुढच्या कार्यक्रमाला अजून बहार येईल असं दिसतंय बहुधा' असं काहीतरी पुढे तो बोलला आणि मी त्या ऐतिहासिक व्यक्तिमत्वाला मनोमन 'कुर्निसात' केला.

त्यापुढच्या सत्रात कार्यक्रम रंगला कि नाही ते काही मला कळलंच नाही. हा सारखा ' अरे, संजीवजींनी कोमल निषाद काय लावलाय बघ' , ' ते बघ कसे तालाशी खेळत खेळत तान घेतायत' , ' अरे कोमल ग.......हि भैरवी आहे, मला आधी वाटलं भैरव गातायत संजीवजी' अशी अखंड कुजबूज करत होता. मला गाण्याच्या व्याकरणाची फारशी माहितीही नाही आणि आवडही नाही...गाण्याचा आस्वाद घ्यावा आणि मनसोक्त ऐकत राहावं यापलीकडे मला चिकित्सक होऊन गाण्याची चिरफाड करणं जमत नाही. मला मुळात भैरवी आणि भैरव यातला फरक खूपसा नाही कळत, पण हा टोळभैरव मला ' हा बघ तो कोमल ग.....म्हणून हि भैरवी कळलं का?' असं अगदी माझा शाळामास्तर असल्यासारखा मला सांगत होता. त्या दिवशी केवळ या प्राण्यामुळे संजीवजींनी लवकरात लवकर गाणं संपवून माझी एकदाची सुटका करावी असं मला मनापासून वाटत होतं.

या माणसाचे मग मला फोन यायला लागले. अमुक अमुक जागी अमुक अमुक गायक येतोय, जाऊया का असं दर दोन आठवड्यांनी मला फोनवर विचारायला लागला आणि हा जाणार असेल तर त्या कार्यक्रमात लपून छापून तरी जायचं किंवा जायचंच नाही हे मी कटाक्षाने पाळायला लागलो. शेवटी काही दिवसांनी त्याने एका कार्यक्रमाची तिकिटं स्वतः काढून मला बरोबर यायची गळ घातली आणि माझ्याकडे नाही म्हणायचा पर्याय न ठेवून माझी पंचाईत केली. कार्यक्रम होता दक्षिण भारतीय गायकांच्या शास्त्रीय- उपशास्त्रीय संगीताचा. कार्यक्रम सुरु झाल्या झाल्या ' अरे वा.....आज सुरुवात मृदंगमच्या तडफदार सुरांनी होणार वाटतं.....तुला माहित्ये, ढोलक, ढोलकी आणि मृदंगम हे वेगवेगळे असतात बरं का.....' अशी त्याची ती कानात डास जसा सतत गुणगुणत राहतो तशी कुजबूज सुरु झाली.

' ते आहेत ना......ते आहेत प्रख्यात व्हायोलिनवादक डॉक्टर सुब्रमण्यम.....ते आता जुगलबंदी सुरु करतील. त्यांच्या व्हायोलिनमधून दैवी सूर बाहेर पडतात......असं वाटावं जणू काही साक्षात कृष्णच !' कृष्ण बासरीव्यतिरिक्त व्हायोलीनसुद्धा वाजवायचा हा नवा शोध मला लागला. ' धा धिं कित्ता तूंना ' अश्या अगम्य अक्षरांनी तो माझी त्या तालाशी ओळख करून देत होता. ' पुरिया धनश्री ' एकदम तो ओरडला आणि हि कोण धनश्री आणि कुठे त्याला दिसली हे न कळून मी आजूबाजूला बघायला लागलो, तसा ' अरे, हा राग आहे.....मी झटकन ओळखला बघ....पहिला आरोह अवरोह कानावर पडल्यावर मी कोणत्याही रागाची ओळख पटवून देऊ शकतो.....' असं त्याने पुढे सांगितलं. मला ३-४ तास स्टेजवर चाललेल्या सगळ्या गोष्टींचं धावतं समालोचन आणि त्यात त्याने स्वतःचे मौलिक विचार घालून तिथल्या तिथे तयार केलेलं विवेचन त्याच्याकडून अनिच्छेने ऐकून घ्यावं लागलं. त्यात त्याची ती साजूक तुपात घोळवलेली शृंगारिक आणि ऐतिहासिक मराठी माझ्या त्रासात अजून भर घालत होतं.

' रातराणीचा सडा पडल्यावर जसा सुगंध दरवळतो न तशी ती डॉक्टर साहेबांची मींड वाटते.'

' व्यंकटेश्वरांनी मृदंगम असा वाजवला कि तो मागे बसलेला तबलजी त्या ठेक्यांच्या वावटळीत कुठल्या कुठे उडाला बघ'

' अरे, सम अगदी त्या 'धा' वर कशी अलगद अली बघ......तसूभर पुढेमागे नाही......डॉक्टर साहेब कसले प्रतिभावंत आहेत'

' द्रुत तालात मृदंग आणि तितक्याच द्रुतवेगात व्हायोलिनचे सूर......आज कृतकृत्य झालो...आत्ता यमराज आले तर सांगेन घेऊन जा मला......'

खरोखर यमराज येऊन हि ब्याद घेऊन गेले तर बरं होईल असं सारखं मला वाटत होतं. एक मिनिट या महाभागाने मला त्या मैफिलीची मजा घेऊ दिली नाही. मी त्याच्याकडे दुर्लक्ष करायला लागलो तर त्याने माझा हात खेचून माझ्या कानात पुटपुटायला सुरुवात केली. शेवटी माझ्या माणुसकीचा बांध फुटून चहापानाच्या वेळेस मी त्याला सांगितलं, ' अरे तू मला सगळं काही सांग,पण कार्यक्रमानंतर. अशाने मला ना धड तुझं समजतं न त्या स्टेजवरचं......' त्याच्यावर ढिम्म परिणाम झाला नाही. ' मित्रा, अमूल्य ज्ञान मिळवतोयस तू......दुबईला इतक्या बारकाईने संगीताची माहिती समजावून देणारा कोणी मिळेल का? काही दिवसांनी तूच म्हणशील, माझे कान माझ्या या मित्रामुळे तयार झालेत.....आता त्या कानांना फक्त दर्जेदार, रसाळ आणि शास्त्रशुद्ध संगीतच आवडू शकतं, आहेस कुठे?'

हा माणूस संगीतात विशारद झालेला होता हे मला कळल्यावर या सगळ्या गोष्टींचा उलगडा मला झाला. त्याचं स्वप्न होतं पुढे जाऊन ' भारतातल्या विविध सांगीतिक घराण्यांचा इतिहास आणि वर्तमान' या विषयावर डॉक्टरेट करायचं. पेशाने इंजिनिअर असलेला हा पुणेरी मनुष्य स्वतःला ' संगीतप्रेमी' ना म्हणवता 'संगीतोपासक' म्हणायचा. त्याच नावाने तो अगम्य कवितासदृश्य काहीबाही लिहायचा आणि त्या कवितांना ' आज काय रचना सुचली बघ....' असं म्हणत मला चाली लावून दाखवायचा... त्या प्रकाराला काव्य किंवा बंदिश म्हणणं म्हणजे पावसाळ्यात पाणी साठून तयार झालेल्या डबक्याला थेट मानसरोवर म्हणण्यासारखं होतं. मी त्याच्या कचाट्यात बेसावधपणे अलगद सापडायचो आणि मग तो त्याची ती ' बंदिशींची वही ' उघडायचा.

आता ऐक.... कालच सुचली मला हि रचना .

घोळका किती ग बाई....वारकऱ्यांचा!
विटेवरी उभा विठू...असे सर्वांचा....

हे काय आहे याचा मला काहीही थांगपत्ता लागत नव्हता. मी जरासा तडकलो. ' अरे, हे काय आहे ?? फार फार तर साधं सोपं भक्तीगीत होईल याचं.....आणि काय यमक जुळवलंय.......नाही येत तर का अट्टाहास?'

' मित्रा, चाल ऐक.....' रावसाहेब निश्चल। ' घोssssss' पहिल्या ' घो' वरच साहेबांनी आकार लावला, त्यानंतर अचानक कोणीतरी करकचून चिमटा काढावा तसं काहीतरी वेडंवाकडं गाऊन त्याने शेवटी 'ळका' वर पाऊल ठेवलं. मग बाई या शब्दावर पुन्हा एक तान. त्या तानेमुळे बाजूची एक बाई दचकली. हे सगळं मला असह्य होऊन मी त्याला शांत केलं आणि विचारलं, ' तुला असं नाही का रे वाटत की तू या सगळ्या फंदात ना पडता सरळ आलापी, नोम-तोम अशा स्वरूपाची ' बंदिश ' रचावीस......शब्द नाही रे तुला जमत'

' अरे, जमेल मला.....यतिभंग होतोय ना पण घोळका शब्दात ? वाटलंच मला......'

' मुळात अक्खी रचनाच यतिभंगात गटांगळ्या खातेय रे.....यतिभंग कसला ' मतिभंग ' आहे हा सगळा ' माझ्या जिभेच्या टोकावर आलेल्या भावना मी गिळल्या.

पुढचे २ तास मग ' साssसाssरेssरेssधाssपss' कसा वाटेल, त्यापेक्षा ' रे नंतर मी थेट प वर जाऊ का , काय बहार येईल.....' असं असह्य आणि मेंदूला प्रचंड त्रास देणारं काहीबाही हा बोलत होता आणि मी समोर बसून ऐकत होतो. शेवटी रात्र होऊन जेवायची वेळ झाली, तेव्हा न पूर्ण झालेली ती भिकार ' चीज ' घेऊन तो उठला. जाताना सुद्धा 'आपण असेच संगीतावर बोलत राहिलो पाहिजे रे......आपल्या देशाची जाज्वल्य परंपरा आपण पालखीचे भोई होऊन पुढे नेली पाहिजे......आपला या थोर सांगीतिक इतिहासात छोटासा खारीचा वाटा म्हणून काहीतरी आपण या परंपरेला अर्पण केलं पाहिजे' असं काय काय तो बोलला आणि एकदाचा गेला. घरी आल्यावर डोकेदुखीची गोळी घेऊन झोपलो आणि रात्री ३-४ वाजता त्याच्या त्या गायनाचं स्वप्न पडून घाबरून जागा झालो.

हे ' ताप' गंधर्व आपल्या त्या सांगीतिक दुनियेत अडखळतच राहिले. ' होतकरू गायक-वादक' हेरून एकदा विनामूल्य संगीताचा 'क्लास' चालवायचा प्रयत्नही त्यांनी केला. त्या निमित्ताने त्याचं घर मला पहाता आलं आणि भिंतीभिंतींवर लटकलेल्या पंडितजींच्या आणि उस्तादांच्या तसबिरी बघून मी सर्द झालो. त्या सगळ्यांनी त्या घरात काय काय म्हणून सोसलं असेल, याची कल्पना येऊन माझ्या अंगावर काटा आला. खुद्द पंडित भीमसेनजींच्या मोठ्या फोटोखाली त्याने एक जाजम अंथरून आपली गाण्याचा रियाझ करायची बैठक थाटली होती. न चुकता तो तिथे बसल्यावर सगळ्यांना नमस्कार करायचा, दोन उदबत्त्या लावायचा, तंबोऱ्याला हळद-कुंकू लावायचा आणि डोळे मिटून ' रियाझ' करायचा. त्या उदबत्या तेव्हा 'मृत' व्यक्तींच्या डोक्याशी लावलेल्या असल्यासारख्या केविलवाण्या वाटायच्या. त्याचबरोबर त्याच्याकडे तबले, ढोलकी, ५०-६० वर्ष जुनी पेटी, तितकीच जुनी दिमडी असं काय काय होतं. ती पेटी म्हणे त्याच्या आजोबांना खुद्द कुमार गंधर्वांनी दिलेली होती. त्यावरून त्याचे आजोबा एक तर त्याच्यासारखे मुळीच गात नसावेत किंवा त्याच्यासारखेच भयंकर गात असावेत आणि म्हणूनच कंटाळून ' ही पेटी उचल आणि जा इथून कायमचा' म्हणून गंधर्वांनी त्यांना बाहेर पिटाळून लावलं असावं याची खूणगाठ मी मनात बांधली.

त्या ' संगीतोत्तेजक मंडळाचं ' व्हायचं तेच झालं. एक एक करत मुलांनी तिथून काढता पाय घेतला आणि ' आजकालच्या मुलांना पॉप गाणी लागतात......कसदार संगीत नाही पचत त्यांना' अशी कारणं देत त्याने मला ' यापुढे गाणं शिकवेन तर त्यालाच, जो भीमसेनांनी आपल्या गुरूकडे वर्षभर केलेली तपश्चर्या करून स्वतःला त्या परंपरेचा पाईक होण्याच्या योग्यतेचा सिद्ध करेल' अशी आपली प्रतिज्ञासुद्धा ऐकवली. सवाई गंधर्व-भीमसेनजी यांची नाव बिनदिक्कत एका दमात घेणाऱ्या या महाभागाला मनातल्या मनात शिरसाष्टांग नमस्कार घालून मी पुढ्यात त्याने ठेवलेला चहा उचलला. केवळ नाव घेताना कानाला हात लावला म्हणून या महान गायकांच्या प्रती आदर व्यक्त होत नाही, हे मला त्याला तोच कान पिरगाळून सांगावंसं सारखं वाटत होतं.

काही दिवसांनी मला त्याने घरी बोलावलं। तेव्हा त्याचे आई-वडील खास पुण्याहून आले होते. आपल्या या एकुलत्या एक बाळासाठी त्यांनी बाकरवडी, आंबावडी असं काहीही न आणता चक्क एक ग्रामोफोन आणि १०-१५ रेकॉर्डस् आणल्या होत्या. त्याच्या बाबांना रेकॉर्ड वर जुन्या उस्तादांची गायकी ऐकायला आवडतात हे समजल्यावर मी मनात देवाचा धावा सुरु केला....कोण जाणो, बापलेक एकसारखे असले तर जीवावर बेतेल अशी भीती मनात डोकावून गेली. बाबांनी उस्ताद बडे गुलाम अलींची एक रेकॉर्ड लावली आणि स्वतःच्या कुलदीपकाला गप्पा बसायची खूण करून डोळे मिटले. दोन मिनिटांनी मला अतिशय मंजुळ आणि गोड आवाजात त्या रेकॉर्डिंगच्या सुरात विरघळणारा एक वेगळा सूर ऐकू यायला लागला आणि चमकून मी त्या सुराचा उगम शोधायला आजूबाजूला बघितलं। आई आत गात होती.

पुढे २०-२५ मिनिटं मला अक्षरशः त्या सुरांनी वेड लावलं. या पुस्तकी किड्याची आई इतकी तयारीची गायिका आहे आणि तिच्या सुरात इतका दैवी 'असर' आहे, हे मला विलक्षण वाटतं होतं। नंतर गप्पांच्या ओघात कळलं, कि आईंनी दस्तुरखुद्द डॉक्टर प्रभा अत्रेंकडे गायनाचे धडे घेतलेले होते. पुण्यात अनेक वर्ष गायनाचे धडे स्वतः दिले होते आणि ते सगळं एका पैचीही अपेक्षा न बाळगता निस्पृह मनाने केलं होतं. या महाभागाने आईकडून सुरांचं व्याकरण घेतलं, घराण्याची माहिती घेतली, पुस्तकात लिहिलेलं एक एक पान आत्मसात केलं पण गाणं काही याला जमलं नाही.

त्याच्या आईने मग बोलता बोलता आपला मन मोकळं करायला सुरुवात केली. ' मी सांगते रे माझ्या राजाला, तुला माझ्यासारखा व्हायची गरज नाहीये. तू स्वतंत्र व्यक्तिमत्व आहेस आणि तुझं आवाका सुद्धा वेगळा आहे. आईने केलं ते मी करणारच, पुढे नेणारच असं अट्टाहास करून नाही चालत....तुम्ही वेगळ्या पद्धतीने ते कार्य पुढे न्या...मी त्याला सांगितलं, कि तू पेटी उत्तम वाजवतोस....तुला तालाची माहिती आहे.....गायन तुझ्यासाठी कदाचित नाही योग्य....' त्याच्या त्या तश्या वागण्याच्या मागचं कारण मला आता व्यवस्थित समजलं होतं. आई आणि बाबांनी त्याची खूप समजूत घातली होती आणि तरीही तो वस्तुस्थिती मान्य न करता मृगजळामागे धावायचा अट्टाहास करत आपली सोन्यासारखी वर्ष वाया घालवत होता.

पुढची दोन वर्ष तो असाच चाचपडत राहायला. अनेकांनी त्याला समजावायचा प्रयत्न केला पण त्याच्या मानगुटीवर बसलेलं ते 'ध्येयाचं' भूत काही उतरायला तयार नव्हतं. एके दिवशी आपण यूएई मधून परत आपल्या घरी पुण्याला जाणार आहोत असं त्याने कळवलं आणि दुबई सोडलं.

जवळ जवळ सात-आठ वर्षांनी मला ठाण्यालाच अचानक तो समोरून येताना दिसला. बरोबर त्याची बायको आणि ३-४ वर्षाची गोड मुलगी होती. नमस्कार चमत्कार झाल्यावर मी त्याची विचारपूस केली, तेव्हा त्याने बायकोची ओळख करून देताना अभिमानाने ' ही माझी बायको स्टेजवर कार्यक्रम सादर करते बरं का.....फक्त शास्त्रीय गायकीचेच.....किराणा घराण्याची तालीम घेतलीय तिने १० वर्ष.....आणि माझी मुलगी म्हणजे बहुतेक माझी आईच परत जन्माला आलीय असं वाटतं रे......आत्तापासून काय गाते.....' अशी माहिती त्याने पुरवली. ' आणि तू? ' ' मी त्यांना साथ देतो पेटीची.'

त्याच्यातला तो बदल सुखावणारा होता. मी त्याला ' हा बदल कशामुळे?' असं विचारल्यावर दोन मिनिट तो शांत झाला आणि मुलीकडे बोट दाखवत म्हणाला, ' आई गेली आणि परत आली......ती होती तोवर तिचं म्हणणं हट्टाने टाळत राहिलो......आता ती परत आल्यावर तिला पुन्हा तेच सगळं बघायला कसं वाटेल?' मी त्याला मनापासून मिठी मारून त्याचं अभिनंदन केलं आणि पुण्याला काय करतोस आता म्हणून विचारलं.

कदाचित ते विचारायची गरज नव्हती. ते अक्ख कुटुंब त्यांच्या ' संगीतोत्तेजक मंडळाच्या' विधायक कामात पूर्णपणे समर्पित होऊन संगीताच्या प्रसारात त्यांचा 'खारीचा वाटा' उचलत होतं.

प्रांत/गाव: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

छान लेख. व्यक्ती आणि वल्ली ची छाप जाणवते शैलीवर. इतके सर्व लेख एकदम का बरे ऑफलोड केले? मला तो पुणेरी माणूस आव्डला.

मथळा वाचून मला पहिल्यांदा महेश काळे यांच्यावर लेख आहे की काय असे वाटले Wink

Majhya blogspot var barech lekh tayaar ahet, je copy paste keleyt. >>>
रोज एकेक लेख आणा इकडे आणताना.