स्काऊट

Posted
12 वर्ष ago
शेवटचा प्रतिसाद
6 वर्ष ago
Time to
read
<1’

Scout म्हणजे बालवीर. (मुलगी असेल तर तिला Guide म्हणतात.) स्वावलंबन, स्वसंरक्षण आणि समाजाला उपयोगी पडणे हे त्याचे ब्रीद असते. बदल्यात तो कसलीही अपेक्षा ठेवत नाही. स्काऊटची शिकवण आम्हाला शाळेतून दिली जायची. प्रत्येकाने आपण समाजात राहतो, त्याशिवाय जगूच शकत नाही हे नेहमी लक्षात ठेवायला हवे, आपण समाजासाठी काही करतो म्हणजे समाजावर उपकार करत नाही तर आपण त्या समाजाचे देणे लागतो आणि त्याची परतफेड करणे हे आपले कर्तव्यच आहे. हे आमच्या मनावर बिंबवले जाई.

वर्षातून एकदा स्काऊटचा मेळावा भरायचा. (त्याचं खरं नाव स्काऊट मेळावा असं असलं तरी आमच्या तोंडी फक्त 'स्काऊट' असंच बसलेलं... स्काऊटला जायचं!) जिल्हा परिषदेतल्या सगळ्या शाळा त्यात सहभागी होत असत. हा स्काऊट मेळावा म्हणजे एक अतिशय सुंदर असा सोहळा असतो. तो एखाद्या गावाशेजारील विस्तीर्ण मोकळ्या पठारावर भरवण्यात येतो. मेळाव्याची तारीख आणि कोणत्या गावी भरणार हे ठिकाण सगळ्या शाळांना कळवण्यात येई. आणि मग सगळ्या शाळांतून उत्साहाचे भरते येई. हा मेळावा तीन दिवसांचा असायचा. त्यात विविध स्पर्धा ठेवलेल्या असायच्या. पहिला दिवस हा त्या ठिकाणी दाखल होऊन आपल्या शाळेच्या तंबूसाठी आखून दिलेली जागा स्वच्छ करून शाळेचा तंबू टाकायचा, तंबूचे अंगण, आजूबाजूचा परिसर ठाकठीक करायचा (या टापटिपीला काही गुण राखून ठेवलेले असत) , पिण्याच्या पाण्याची व्यवस्था करायची असा स्थिरस्थावर होण्यात जाई. रात्री प्रकाशासाठी या मेळाव्याच्या केंद्रस्थानी एक विजेचा शक्तिशाली दिवा असला तरी तंबूत प्रकाशाकरता मशाली असायच्या. पहिल्या दिवशी हळूहळू ते पठार युनीफॉर्ममधल्या असंख्य उत्साही विद्यार्थ्यांनी फुलून जाई... प्रत्येक दिवशी सायंकाळी सगळ्या शाळांची सामुहीक कवायत व्हायची. काटेकोर रांगांमध्ये उभे राहून एवढ्या जणांनी एकाच लयीत केलेल्या कवायती पाहणे हा एक नयनरम्य अनुभव असतो. (एकदा अगदी चुकून माझ्या सुदैवाने मला या मेळाव्यात पुढे येऊन, 'एक साथ सावधान!', 'विश्राम!', 'पिछे मुड', 'बैठेंगे बैठ जाव!' अशा ऑर्डर्स या प्रचंड ताफ्याला द्यायची संधी मिळाली तेव्हा मला कळले की आपल्या या कवायती नुसत्या बघायलाही किती सुंदर दिसतात!)

या मेळाव्यात मुख्य आकर्षण असायचे ते दुसर्‍या दिवशी रात्री होणार्‍या सांस्कृतीक कार्यक्रमांचे! रात्री मोठी शेकोटी पेटवून तिच्या भोवती फेर धरून म्हटलेल्या शेकोटीगीताने या स्पर्धेला प्रारंभ होई. सगळ्या शाळांच्या सहभागामुळे या स्पर्धेत मोठीच चुरस असायची. सगळ्यांमधून आपल्या शाळेला बक्षीस मिळावे यासाठी आधी जो तो मजबूत तयारी करीत असायचा. हा कार्यक्रम बघण्यासाठी आजूबाजूच्या गावातले लोक आवर्जून यायचे. त्यामुळे प्रत्येकासमोर इज्जत का सवाल असायचा. तिसर्‍या दिवशी सकाळी सहभोजनाची पंगत उठायची. त्यानंतर शोभायात्रा नावाची एक स्पर्धा असायची आणि मग शिक्षणाधिकार्‍यांच्या हस्ते किंवा त्यांच्या उपस्थितीत एखाद्या मान्यवर व्यक्तीच्या हस्ते होणार्‍या बक्षीस समारंभाने या सोहळ्याची सांगता व्हायची.

...तर त्यावर्षी सांस्कृतीक रात्रीसाठी आपण एक शेतकरी गीत बसवायचे असे आमच्या शाळेत घाटत होते. एक शेतकरी असतो त्याची बायको माहेरी जाण्यासाठी रुसून बसलेली असते. पण हा शेतकरी काही ऐकायला तयार नसतो. आधी हे काम कर आणि मग जा! हा त्याचा हेका. त्याच्या कामाची जंत्री काही संपत नसते. पण माहेरी जायला मिळेल म्हणून ती तो जे सांगेल ते सगळे करते आणि मग माहेरी जाते, असे ते गीत होते. त्यावर समुहनृत्य बसवायचे होते. आणि गायनही अर्थात आम्हालाच करायचे होते. कारण कॅसेट टाकून रेडीमेड गाण्यावर नुसतं येऊन नाचून जाणार्‍या शाळेला कधीच बक्षीस मिळायचे नाही. नाचताना दमल्यावर शेवटी शेवटी नीट गाता येत नाही त्यामुळे असे गाणे असेल तर गाण्यासाठी विद्यार्थ्यांची स्वतंत्र टीम सहभागी करण्याची मुभा असायची. वाद्यांची साथ देण्यासाठी मेळाव्यातर्फे वादकांची टीम असायची. आवश्यक वाटल्यास त्यांची मदत घेण्याचीही मुभा असे. आमच्या गाण्यात एक शेतकर्‍यांची रांग आणि एक शेतकरणींची अशा दोन रांगा होत्या. शाळेत, आपल्याला या स्काऊट मेळाव्याला जायला मिळावे असे प्रत्येकाला वाटे. पण सहलीप्रमाणे सगळ्यांनाच जाता यायचे नाही. स्पर्धांमध्ये ज्यांचा सहभाग असेल त्यांना आणि संबंधितांनाच फक्त जायला मिळे. मुलींना पाठवायला पालक तयार नसत. पर्यायाने गाण्यातील शेतकरणीचे काम पण मुलांनाच करायला लागणार होते.

- आणि रांगेतल्या सगळ्यात पहिल्या शेतकरणीसाठी माझी निवड करण्यात आली! त्या शेतकरणीने मला थोडे खट्टू केले पण म्हटले चला शेतकरीण तर शेतकरीण. स्काऊटला तर जायला मिळणार! इतर स्पर्धांतील सहभागाच्या दृष्टीने कार्यक्रम ठरवले गेले. त्याप्रमाणे निवड केली गेली, आणि त्या दिशेने आमच्या तालमी सुरू झाल्या. शोभायात्रेसाठी आम्ही जोतिबाचा छबिना काढायचा ठरवले. आदल्या आठवड्यात आम्ही शाळेचा तंबू धुवून आणला. तो धुवायचा म्हणजे त्याचे बोचके उचलून गुरुजींसोबत विहिरीवर जायचे. तिथे एक दगडी कुंड असायचा. (म्हणजे टब!) त्यात निरमा पावडर टाकायची. पाणी शेंदून त्या कुंडात भरपूर फेस करायचा. त्यात तंबू भिजायला घालायचा. आणि जेवून घ्यायचे. जेवून झाल्यावर दोघादोघांच्या जोड्या करायच्या आणि एकेका जोडीने अगदी पाय दुखेपर्यंत त्या कुंडात नाचायचे! मधूनच गुरुजी, 'हो हो रे हो हो रे ह्हो!' असे ओरडून थांबवून तंबूची खालची बाजू वर करायचे मग कुंडातील थयथयाट पुन्हा सुरू होई...

शेवटी तो दिवस आला. दोन दिवस पुरतील एवढ्या चपात्या, तेल-चटणी आणि भजी बांधून घेऊन, तंबू, बांबू, कवायतीकरता लेझिम, लाठ्या, डंबेल्स् तसेच पांघरुणं वगैरे वगैरे पाठीवर टाकून आमची फौज स्काऊटच्या तळावर उतरली. आणि सगळे कामाला लागले. मी ज्या गाण्यात भाग घेतला होता त्यातल्या शेतकरणीला साडी, गळ्यात, कानात दागिने, बांगड्या आणि कपाळावर मोठ्ठंच्या मोठं कुंकू अशी वेशभूषा होती. आम्हाला साड्या नेसवायला, शिक्षकांपैकी एकजण पत्नीला घेऊन थेट त्या ठिकाणी येणार होते. पण काही कारणाने त्या येऊ शकल्या नाहीत.

ऐन वेळी आमची चांगलीच पंचाईत झाली. आता आम्हाला साड्या कोण नेसवणार? एखाद्या शिक्षिकेची मदत मिळू शकेल असा विचार करून आमचे गुरुजी कन्याशाळेच्या एका तंबूत गेले आणि त्यांच्या शिक्षिकेला विनंती केली की, आमच्या पोरांना तेवढ्या साड्या नेसवून द्याल का? त्या बाई म्हणाल्या ठिक आहे, त्यात काय एवढे? रात्री आठच्या दरम्यान येऊन तुमच्या मुलांना साड्या नेसवून जाईन असे आश्वासन त्यांनी आमच्या गुरुजींना दिले. आम्ही निर्धास्त झालो. त्या दिवशी सात वाजता गुरुजी जाऊन पुन्हा त्यांना आठवण करून आले. पण 'हो हो आलेच आता तुम्ही चला पुढे' असे सांगितलेल्या त्या बाईंचा साडे आठ वाजायला आले तरी पत्ता नव्हता. गुरुजी पुन्हा गेले तर त्या वैतागून म्हणाल्या की आता तुम्हीच नेसवा हो! आमच्या मुलींना पण तयार करायचे आहे! आता मात्र गुरुजींच्या पण तोंडचे पाणी पळाले. आम्ही बाकी सारा मेक - अप करून साड्या घेऊन बसलेलो. गुरूजी डोक्याला हात लावून बसले.

एव्हाना तिकडे कार्यक्रम सुरूही झाला होता. आमचीही धडधड आता वाढायला लागली होती. शेवटी जवळच असलेलं पाण्याचं मोठं पातेलं पालथं घालून त्यावर गुरूजी बसले आणि 'आपापल्या साड्या घेऊन रांगेत माझ्यासमोर या' असे फर्मान आम्हाला सोडले. मग काय त्यांनीच आम्हाला साड्या नेसवल्या. आम्ही तयार झालो. त्या साडीत मला कमालीचे अस्वस्थ वाटत होते. आम्ही आमच्या शाळेचे नाव पुकारण्याची वाट बघत बसलो. मग एकदाचे आमच्या शाळेचे नाव पुकारले आणि आम्ही ओळीने एकदाचे रंगमंचावर गेलो! गाणे सुरू झाले. गाणे साधारण मध्यावर आले असेल आणि मला काहीतरी घोळ होतोय असे वाटू लागले! मला साडी सावरता येत नव्हती. हे 'वाटणे'वाढतच चालले होते. आमच्या गाण्याची आधी भरपूर तालीम झाली होती पण हे साडी वगैरे मला नविन होते. आणि एका क्षणी माझ्या डोक्यात लख्ख प्रकाश पडला की माझी साडी सुटली आहे!

आता आपली चांगलीच फजिती होणार असा विचार मनात आल्यावर मी पार गडबडून गेलो. साडी सावरण्याचा व्यर्थ प्रयत्न करू लागलो. पण छे! त्याचा उलट परिणाम झाला. त्या नादात मला गाण्याचे शब्द आठवेनात की नाचाच्या पायर्‍या आठवेनात! माझी कानशिलं एकदम गरम झाली. आता आपले काही चालत नाही हे उमगल्यावर शेवटी सगळी साडी गुंडाळून पोटाशी धरून, ओठ आवळून मी माझ्या जागेवर तसाच उभा राहिलो! नुसताच इकडे तिकडे पाहू लागलो. एव्हाना हा प्रकार शिक्षक आणि प्रेक्षकांच्याही लक्षात आला असावा कारण रंगमंचावर वर वेळेच्या सूचनेची शिटी वाजवणार्‍या माणसापासून सगळे प्रेक्षक खो खो हसत होते. मी आणखीणच बावरून गेलो. हातपाय बधीर पडले आणि काही न सुचून मी तिथेच फतकल घातले! समोर सगळे जोरजोरात हसत होते.

गाणे संपल्यावर सगळे सहकारी निघून गेले. आमचे गुरूजी आले आणि माझ्या दंडाला धरून त्यांनी जवळ जवळ फरफटतच मला रंगमंचावरून ओढून नेले. आणि हास्याची लाट आणखीनच जोरात उसळली.

पुढे परतीच्या प्रवासात आणि नंतरही बरेच दिवस हा विषय सगळ्यांना पुरला.
सुरूवातीला मी मनातून एकदम निराश झालो. हे लक्षात आल्यावर माझ्या मुख्याध्यापकांनी मला बोलावून घेतले आणि समजावले. शेवटी म्हणाले, 'अरे यडा की शाना तू? चोर नाही तर चोराचा लंगोट! एवढी लोकं तुझ्यामुळं खदखदून हसली हे काय सोप्पं काम आहे का? तू मुळीच काळजी करू नको. काहीच बिघडलेलं नाही.' आणि हे शिरसावंद्य मानून आम्ही पण'बर' म्हटलं.

त्यानंतर पुढच्या वर्षी ( या प्रकारानंतर Happy ) स्काऊटसाठी नृत्य बसवण्यापेक्षा काहीतरी बैठा कार्यक्रम बसवूया यावर आमच्या शाळेत एकमत व्हायला वेळ लागला नाही. त्यावेळी आमच्या घरी आम्हाला संगीत शिकवण्यासाठी एक संगीत शिक्षक नेमले होते. मग त्यातलेच काही बसवूया असे ठरले. आम्ही तशी तयारी सुरू केली. आणि मी माझ्या सहकार्‍यांच्या आणि तबला-पेटी , टाळ, चिपळ्या यांच्या सहाय्याने वारकरी वेषात संत जनाबाईंचा 'धरीला पंढरीचा चोर गळा बांधोनिया दोर' हा अभंग गायला आणि आमच्या शाळेने द्वितीय क्रमांक पटकावला!

प्रकार: 

मस्त लिहिलय.

शरद

गजानना,
मी होतो ३ वर्षे स्काऊट मध्ये... Happy

हे सारं केले त्या ३ वर्षात.. आणि कॅम्प देखिल. Happy
पण हे सात वर्षापुर्वीचे मला आजवर का दिसले नाही!
सगळ्या आठवणी झाल्या जाग्या! Happy