एकटीच @ North-East India दिवस - १८

Submitted by सुप्रिया राज जोशी on 3 March, 2020 - 23:56

अनुक्रमाणिका > https://www.maayboli.com/node/72984
अनुक्रमाणिका २ > https://www.maayboli.com/node/73598

23rd फेब्रुवारी 2019

प्रिय मयूर,

शेल्टर डॉन बोस्को ची सगळी मुलं मला एकसारखी आहेत. माझी लाडकी आहेत. आज एकेकाची आठवण येतेय, त्याला कारण ही तसेच आहे. पण पत्र एकालाच लिहायचे ना, मग तुला लिहायचे असे ठरवले. तू माझ्यावर खूप विश्वास टाकला आहेस, हे मला माहीत आहे. जरी तू मला ताई म्हटलसं तरी मी तुझ्या आईसारखी आहे. त्याच नात्याने सांगते. चांगले गुण शिक, मोठा हो, आनंदी रहा. तुझे आयुष्य खडतर आहे, पण स्वतःवर विश्वास आणि कुठेतरी अढळ श्रद्धा असली की सहसा कुठंचेही कठीण आव्हान पेलतना डगमगायला होत नाही.

या Mawphlang ला रहाणाऱ्या लोकांची तर एका जंगलावर गाढ श्रद्धा आहे. त्याचे नावच sacred forest असे पडले. आजूबाजुला पसरलेल्या पठारी टेकड्यांच्या मधे हे sacred forest दिमाखात उभे आहे. माणसासाठी अनेक उपयोगी वनस्पती ह्या जंगलात सापडतात. पण जिथे श्रद्धा जोडली तिथून काही उचलायचे नाही म्हणून झाडावरून गळून पायाखाली पडलेले पान, फुल सुद्धा स्वत:साठी घ्यायची परवानगी नाही. पूर्वजांनी स्वतः चे आयुष्य पणाला लावून ज्या जंगलाला वाचवले, त्यातील एका फांदीलाही हात लावायची कोणाची हिम्मत नाही. पूर्वी जनावरांना बळी देऊन जंगलाचा मान राखला जायचा, प्रत्येक sacrifice च्या नावाने एक शिळा जंगलात रोवली जायची. एक दिवस बैलाचा बळी देण्याआधीच दाव तोडून तो पळाला तेव्हापासून ती प्रथा बंद पडली.
53343473_10156899707527778_710865431639883776_n.jpg53065687_10156899649287778_1849887077752111104_n_0.jpg

ह्या जंगलात जो गाईड मला घेऊन गेला त्याने फेरफटका मारताना तिथल्या कित्येक चमत्कारिक कथा नि प्रथा मला सांगितल्या. फेरफटका अटपला तरी अख्खा दिवस हातात होता. तशी मी चालत चालत रोड वर आले नि एक ऑटो पकडली...म्हटलं नोंग्थम लेक ला जाऊन येऊया, ऑटो ने मार्केट मध्ये सोडलं. पुढचा एक टप्पा शेअर टॅक्सी ने पार केला. तिथच्या वळणावर पुढच्या वाहनासाठी बराच वेळ रखडून उभे रहावे लागले. तासभर उलटला तरी पुढे जायची काही सोय होईल असे दिसेना तशी मी तर 15 किलोमीटर ची वाट चालायला सुरुवातही केली पण एकदा तिथे पोहोचले नि दिवस मावळायच्या वेळेस नेमकी परतायची सोय झाली नाही मग वांदे होतील! हे सुचले तशी उलटी वळले. मग म्हटलं शिलॉंग ला जाऊन त्या रस्यांवरून फेटफटका मारावा. तिथे पोहोचले तर कळले की परत Mawphlang जिथे मी रहात होते तिथे परत जायची सोय सुद्धा फार उशिर केला तर होणार नाही.

एरव्ही मी अशा परिस्थितीत फारशी चिंता केली नसती, पण आज धडपड करून त्यातून मार्ग काढायची ताकद एकूणच संपल्यासारखीच वाटत होती. मग सरळ शेअर जीप मध्ये बसले नि माघारीच निघाले. Mawphlang ला पाऊस पडत होता, मी भिजून गारठून गेले. आज काहीच मनासारखे होत नाहीये असे वाटून मन हिरमुसल्यासारखे झाले. निव्वळ वेळ मारायला मी गावात चालू लागले, मन कशातच रमत नव्हते, अनोळखी रस्यावरून पावले फक्त चालत होती. रस्त्याच्या एका जंक्शनवर Boy's Home ची दिशा दाखवणारी पाटी वाचली. तेव्हाच आपल्या शेल्टर होम ची आठवण आली. किलोमिटरभर रस्ता झपझप पार केला. लहान लहान मुलांना भेटता येणार या विचाराने आत शिरायच्या आधीच चेहेऱ्यावर हसू पसरलं होतं आणि तिथे अंगणात बागडणारी मुले बघून तर मीच लहान होऊन गेले. त्यांच्याबरोबर क्रिकेट खेळले, त्यांचे होम फिरून पाहिले. माझ्यासाठी जणू मी तुम्हा सर्वांनाच भेटत होते. एकमेकांची भाषा कळत नसली तरी एकमेकांचा सहवास आवडत होता. मुलांचा निरोप घेऊन निघाले तरी मला न कळणाऱ्या खासी भाषेत त्यांचे काहीबाही प्रश्न चालूच होते, दूर वळणावर दिसेनाशी होईपर्यंत हात हलवत राहिले. सारा शीण उतरला, तुमची आठवण मात्र आणखी तीव्रतेने येऊ लागली

51762302_10156899708997778_4195152294695665664_n.jpg

मला माझा शेल्टर डॉन बोस्को मधला शेवटचा दिवस आठवला. मुले अशीच गेटच्या आतून खूप प्रश्न विचारत होती. मग शेवटी जेव्हा मी निघालेच तशी शेवटचा लंबा टाटाबायबाय करत राहिली. तेव्हा तू मात्र दूर उभा राहून सारे पहात होतास. एक शब्दही व्यक्त केला नाहीस. गपचूप राहिलास. पण तुझे डोळे बोलत होते.
मी काय किंवा कोणी काय, आयुष्यभर तुझा हात धरून चालणार नाही रे. हेच आयुष्य आहे. उद्या काय होईल हे आज सांगु शकत नाही. आपली वाट आपण निवडायची आहे, ती आपल्याला एकट्यालाच चालायची आहे. ज्या वाटेवरून चालताना लाज वाटणार नाही अशी वाट निवडशील एवढे बघ.

परतीच्या वाटेवर मला एक ब्युटी पार्लर दिसले, त्यातच घुसले. स्वतः चे थोडे लाड करून घ्यावे असा मूड आला. मी डोक्याला मसाज करायला म्हणून गेले होते, तिने माझ्या केसांना मेंदी लावली. थंडगार पाण्याने डोके धुतले तेव्हा तर मी किंचाळत होते. त्या पोरीचं नाव बोलायला कठीण आहे पण पोरगी केवढी गोड होती, तिने तिचे भावविश्व माझ्याकडे उघडे केले, दोन तास मी तिथे होते, मी जाताना तिचे डोळे भरून आले. एवढ्याशा सहवासाने सुद्धा कोणाची केवढी ओढ वाटते.
52902829_10156899709122778_727382840773181440_n.jpg

मग मी निघाले मार्केट मध्ये. इथे जेवताना कोरडा भात खातात, मला तो घशात अडकतो तरीही बिनतक्रार गोड मानून मी खातेच. पण आजचा दिवस खाण्यापिण्याचे पण लाड करायचे असे ठरवले. एका कॅफे मध्ये जाऊन पोटभर खाल्ले, मग भरपूर फळे खरेदी करून घरी निघाले. तेव्हा साडे सहा वाजले होते. म्हणजे अंधार झाला होता हे वेगळ्याने सांगायला नको.

माझे घर मुख्य रस्ता सोडून आत आत होते, येताना रस्ता नीट लक्षात ठेवला होता तो अंधारात सापडेनाच. मिट्ट काळोख्, जवळपास वस्तीही दिसत नाही, अशात अंदाजाने वीस मिनिटे चालले असेन तर जिकडून चालायला सुरवात केली तिथेच पुन्हा पोहोचले. मग पुन्हा एकदा चालायला सुरुवात केली. पण जिथे जिथे दोन रस्ते दिसायचे तिथे उजवीकडे की डावीकडे हे ठरवतानाच एकेक वळणावर मी जशी चुकत होते तशी आणखीनच भरकटत होते. शेवटी मी माझ्या गाईडला फोन केला, पण त्याला मी नेमकी कुठे आहे त्याचा अंदाज नाही तर तो तरी काय मदत करेल? त्याला माझी चिंता वाटू लागली, मग उलटा मीच त्याला धीर दिला. परत एकटीच चालत राहिले, मला फक्त एक घर किंवा एका माणसाला शोधायचे होते. पुढची मदत तिथेच मिळाली असती. पाच-दहा मिनिटानी मी एका झोपडीशी पोहोचले. आत अंगणात कोणीतरी वावरताना चाहूल लागली तशी मी त्याला गाठून गाईडचा फोन जोडून दिला. खासी भाषेत काय ती बातचीत झाल्यावर तो सद्गृहस्थ स्वतः मला माझ्या खोलीवर सोडायला निघाला. अंधारात वाट दाखवत तो मला घेऊन गेला ते अंतर फक्त दोन -तीन मिनिटांचे होते. म्हणजे शेवटचे वळण बरोबर घेतले असते तर कदाचित ...
असो. फक्त एखादेच वळण चुकले तरी कधी कधी आपल्या लक्ष्यापासून दूर इतस्तत: भटकत रहायची पाळी येते.

दहा मिनिटांच्या वाटेवर तासभर तंगडतोड करून मी एकदाची घरी पोहोचले. आज मी खरच खूप घाबरून गेले होते. अंगात थंडी भरली होती. भरपेट खाल्ले ते सारे जिरून गेले होते. पोटात खड्डा पडला होता होता ...भीतीने, थंडीने की भुकेने ते सांगता नाही येणार. मग मी सारी फळे खाऊन फस्त केली नि ड्रायव्हरच्या रूम मधली खरखरीत कांबळी अंगावर ओढून घेतली. माझी खुशाली विचारायला गाईड ने फोन केला तेव्हा दुसऱ्या दिवशी च्या Sunday mass ला चर्च मध्ये यायचे निमंत्रण दिले. सगळेच दिवस सारखे नसतात. आजचा दिवस यथातथाच होता. पण वेळच्या वेळी तो ही सरलाच ना? उद्या पुन्हा नवीन दिवस! चर्च मधल्या प्रार्थनेसाठी मला सकाळी सात वाजता पोहोचायचे तर उद्या वेळेवर उठायला हवे तर आज वेळेवर झोपायला हवे.

तुझी
सुप्रियाताई

Group content visibility: 
Public - accessible to all site users

खुप सुंदर चाललीये पत्र मालिका..

सध्या माबोवर जास्त येत नसल्याने प्रतिसाद देणे जमले नाही पण प्रत्येक भाग वाचला अन आवडला सुद्धा.

मन्या, अनुक्रमाणिका edit करायची परवानगी नाही मला! वेळ संपला वाटत.

आर्यन, आताच उत्तर देऊ शकत नाही कारण जसा प्रवासाचा शेवट येईल तसे त्याला वेगळेच वळण मिळेल.एखाद्या पिक्चरचा शेवट कसा अनपेक्षित असतो? ज्यांनी सारे भाग वाचले त्यांना सुरवातीच्या पत्राचे संदर्भही कळतील. पण धन्यवाद!