एकटीच @ North-East India दिवस - १६

Submitted by सुप्रिया राज जोशी on 2 March, 2020 - 08:01

अनुक्रमाणिका > https://www.maayboli.com/node/72984
अनुक्रमाणिका २ > https://www.maayboli.com/node/73598

52852264_10156893190557778_6237142191467134976_n.jpg

21st फेब्रुवारी 2019

प्रिय वाचकांनो,
एकेकाची नावं डोक्यात येतायत, पण सारी लिहू कशी?

एका पत्रावर कोणीतरी प्रतिक्रिया लिहिली होती की पत्र वाचताना माझ्याबरोबर स्वत:चीही ट्रीप चालू आहे की काय अस वाटतं. खर तर मलाही मी एकटीच ट्रीप करते असं अजिबात वाटत नाही. दिवसभर कठीण प्रसंगांना तोंड देऊन थकून जरी गेले तरी रात्री माझ पत्र कोणी कोणी वाचलं हे मी जरूर बघते. तुमच्या प्रतिक्रिया वाचून मला दुसऱ्या दिवशीची आव्हानं पेलायला पुन्हा उत्साह येतो. म्हणून तर सर्वात कठीण प्रसंगाला तोंड देत होते तेव्हा जे जे पत्र वाचतात त्यांचीच आठवण झाली. त्या कठीण प्रसंगात तुमचे पाठीवर शाबासकी देणारे शब्द वाचण्यासाठी जीव तळमळत होता.
गोष्ट सविस्तर संगण्याआधी पत्र कोणाला नि का लिहिते आहे तेवढे लिहिले.

20 फेब्रुवारी ला सकाळी फादर ब्रेकफास्ट बद्दल विचारत होते पण मला त्यांच्या उपकाराचे ओझे वाटले म्हणून मी ब्रेकफास्ट न करता निघाले. चर्च मध्ये फक्त मी एकटीच होते म्हणून प्रार्थनेत मन ही एकाग्र झाले. तासभर सरला असेल. काल जिथे पोहोचायचे ठरवले होते तिथे फुल्ली मारून आज मी आणखी लांबचा पल्ला गाठायचा बेत केला. Yes, नोग्रीआट (Nongriat)! पब्लिक ट्रान्सपोर्ट ने प्रवास करायचा म्हणजे शिलॉंग चा बस स्टँड गाठायला हवा तो शोधत निघाले! अंजली स्टँड ...पोलीस बाजार ...बोरा बाजार ... Ground Floor...First Floor... शिलॉंग मधले हे इतके सारे स्टँड टुरिस्टच्या डोक्याचे खोबरे करून टाकतात. एकीकडे गेले की लोकं सांगतात त्या दुसऱ्या स्टँड वर जा. वर जा ...खाली जा. बॅगेला खांद्यावर उचलून जवळ जवळ पाच सहा किलोमीटर चालावे लागले, तेव्हा एकदाची बरोबर स्टँड वर (अजूनही मला त्या नावांचे कोडे सुटले नाही) पोहोचले. प्रवास सुरु व्हायच्या आधीच शरीर थकून गेल्यासारखं झालं.

इथे मला जेमतेम चेरापुंजी पर्यंत शेअर सुमो मिळाली. चोपन्न किलोमीटर पार झाले, आता पुढे दहा - बाराच किलोमीटर तैरना (Tyrna) आहे, तिथे पोहोचायला माझ्या बजेट चे वहान मिळायला हवे. एक गाडी स्वतः होऊन समोर थांबली. ड्रायव्हर ने सांगितले की मी तिथून कोणी सवारी च्या pick up ला चाललो आहे तर हवं तर तुलाही सोडतो. नेकी और पुछ पुछ :D. मी ऐटीत तैरना ला निघाले! गप्पाच्या ओघात मी एकटीच प्रवास करत आहे हे कळले, तसे त्या तरुण ड्रायव्हरने तिथल्या तिथे घाटात गाडी चक्क उभी केली आणि मला मार्शल आर्टचे धडे द्यायला सुरुवात केली. वर हे ही सांगितले की आजवर त्याने फक्त त्याच्या बहिणींना स्वतः च्या सुरक्षेसाठी हे सारे शिकवले होते.

52759718_10156891017397778_7491942029732085760_n.jpg

तैरना ला पोहोचेस्तोवर दुपार टळू लागली होती. पोट तर रिकामे होते पण पोटाचे पहात बसले तर दुसरेच संकट ऊद्भवेल कारण अंधार पडायला फक्त तीन चार तास शिल्लक होते. त्या आधी 3700 पायऱ्या, 2/3 झुलते ब्रिज पार करून मला Nongriat ला पोहोचायचे. तिथे रहायची सोय काय होऊ शकते याचा काही अंदाज नाही. गाईड हजार रुपये सांगत होता. आधी माझे समान मीच उचलून चालत होते, पाच मिनिटांच्या आत दम निघाला. मग मला हजार रुपये सुद्धा परवडले. 20 वर्षाचा तरुण मुलगा माझे ओझे उचलीत सरसर चालत होता, मी पाठून धापा टाकत चालत राहिले.

53053579_10156893188757778_8047721750001090560_n.jpg

‘धापा’ हा खूप उथळ शब्द झाला. लवकरच भुकेपोटी मला चक्कर येऊ लागली, वाटेत छोटे छोटे स्टोल लागले तिथे काहीबाही खाल्ले पण शरीराला उर्जा मिळेना. पाय लटपटत होते, वाकडे पडत होते, चक्कर सारख - कुठच्याही क्षणी तोल जाऊन मी पडेन असं होऊ लागलं. त्या वेळी तुम्हा सर्वांची खूप आठवण आली. जरा कुठे थोडीशी रेंज मिळाली तसे तुम्हाला तेच लिहूनही पाठवले. त्यावर सर्वांनी फटाफट शुभेच्छा पाठवल्या त्या ही नशिबाने वाचता आल्या. तेवढीच थोडी ताकद वाटली. माझी हालत खराब व्हायचे आणखी एक कारण आहे. मला उंचीची भीती वाटते. Nongriat हा trail ज्यांनी केला त्यांनाच ते माझ्यासाठी काय साहस असेल, ते समजेल.

52654484_10156893190402778_6028588599732076544_n.jpg

सत्तर एक डिग्री च्या कोनात रचलेल्या खोल खोल पायऱ्या उतरताना डोक 360 डिग्रीत फिरत होतं. झुलता ब्रिज पार करताना खाली नदीत पहायचे हे शक्यच नाही पण नुसत्या कल्पनेनेच पाय लटपट कापतात. हळू हळू एकेक पाऊल टाकत ब्रिज पार करायला जेवढा जेवढा जास्त वेळ जातो, घाबरगुंडीच्या फोडणीपाई कढी आणखी पातळ होते. पण मी हे आव्हान पेलायचेच असे ठरवले होते. (न ठरवून सांगणार कुणाला?) हा रस्ता असा आहे की मधेच दाट जंगलात दमछाक झाली तरी दुसरा काही उपाय नाही. अंधार व्हायच्या आत जंगल पार करून राहत्या ठिकाणी पोहोचावेच लागते. मनाच्या शक्तीच्या भरवशावर हले डुले का होईना पण चालत राहिले. पण माझेच मला एक विशेष वाटले. अंधार आता पडेल की काय अशा घडीलाही जिथे मन रमले तिथे क्षणभर थांबून निसर्गाला डोळ्यात, कानात, नाकात साठवून घेण्यात कुठे कमी केले नाही. अतिथंडगार पाण्याचा ओहोळ लागला, मी त्यातही उतरून मनसोक्त अंघोळ केली.

52629668_10156891017927778_7630813994747428864_n.jpg

आधीची अवस्था वर लिहिली आहेच त्यात थंड वाऱ्याला झेलत ओल्या अंगाने चालायचे म्हणजे माझे जे झाले होते त्याला काय शब्द द्यायचा तो माहीत नाही. एकेक पाऊल जशी टाकत होते की पुंगीवर नाग डोलतो नि सरपटतो याच्या जवळपासचे काहीतरी चालले होते.
Nongriat ला पोहोचले तेव्हा वातावरण निर्मनुष्य निरव होते. डबल डेकर ब्रिज नितांत सुंदर दिसत होता. अंधार पडत होता, थंडी वाढली होती. आधीच्या ओहोळात मनसोक्त आंघोळ झाल्यावर ओले कपडे अंगावरच सुकवले. ते नुकतेच सुकत आले होते. अशात इथचा पूल सुद्धा जरी बोलावत होता तरी तिथे कानाडोळा करून मी बाजूच्या एका होम स्टे मध्ये जाऊन, रात्रीपुरती रहायची बोली केली आणि गादीवर अंग झोकून दिले.

रात्रीचे जेवण तयार व्हायला बराच वेळ होता. शेजारच्या खोलीत एक साहसी तरुण रहात होता त्याच्या प्रवासाच्या गोष्टी ऐकल्या. आम्ही एकत्रच जेवण केले. इथे माणसांचा पत्ता नाही आणि कशी ती एक मांजर रात्री माझ्या खोलीत घुसली. राणीसारखी गादीवर लोळत होती तोवर सुंदर दिसली, मग आवाज करायला लागली तशी हाकलून दिली तर कार्टी रात्रभर दार ठोठावत बसली होती. अशा निर्मनुष्य ठिकाणी अपरात्री दार वाजू लागले की बाईमाणसाला केवढी भीती वाटते त्या मांजरीला काय कळणार?
52875383_10156891018422778_5511633219155394560_n.jpg

या पत्रात आत्ताशी कुठे वीस फेब्रुवारी संपला. पत्राची तारीख तर एकवीस आहे. म्हणजे अजून अख्ख्या दिवसाचा प्रवास लिहायचा बाकी आहे.

सकाळी उठले तर कोवळे ऊन पडले होते ते एवढे सुखावह वाटले. डबल डेकर ब्रिज सोनेरी उन्हात जसा काही दिसत होता ते चित्र आयुष्यभर मनात कोरून राहील.

53373545_10156893168622778_4949546674419662848_n.jpg

सकाळी मी गावाच्या आत आत खासी कुटुंबांचे रुटीन आयुष्य पहात भटकत राहिले. इथे एकेका जोडप्याला दहा बारा पंधरा मुले सहज असतात. लहान मोठी मुले मिळून ज्या शाळेत शिकतात त्या शाळेला दोनच वर्ग आहेत. मुलेच शाळेचे कुलूप उघडतात. शाळा सुरु व्हायच्या आधी शाळा साफ करतात. शाळेची घंटाही मुलेच वाजवतात. घंटेचा नाद डोंगरात घुमतो. काहीच मिनिटात डोंगराच्या चहू दिशांनी पळत पळत पोरे शाळेच्या अंगणात जमतात. तोवर टीचरचे आगमन झालेले नसतेच. मग शाळेच्या आवारात मुलांचे खेळ सुरू होतात. वेळ सरतो तसे एकेकजण वर्गात जाऊन बसतात. शाळेचे दोन वर्ग बाजूबाजूलाच भरतात पण शाळेत टीचर एकच! ते कधीतरी येतात. आता ते कधी आले नि त्यांनी मुलांना काय शिकवले ते पहायला मी थांबले नाही.

52783835_10156893206177778_8265447794152570880_n.jpg

मी निघाले. नुकतीच सकाळ झाली म्हणजे खरतर माझ्याकडे अख्ख जंगल भटकेंन एवढा वेळ आहे. पण बरोबर गाईड नाही, त्यामुळे माझे सामान उचलायचे आणि वाट न चुकता तैरना ला पोहीचायचे या दोन जबाबदाऱ्या माझ्यावर पडल्या. नदीच्या थंड पाण्यात मी अंग चोळत चोळत अंघोळ आटपत असताना, पोलंड वरून आलेल्या एका प्रवाशाने मला हुडकून काढले. तो सांगत होता की, "तू मला जंगल क्वीन सारखी दिसत आहेस."
52964832_10156893194567778_818131647151996928_n.jpg

ओल्या कपड्यानिशी इथे तिथे फिरत फिरत मी एक गुहा शोधून काढली. पण परतीची वाट मात्र कशी ती चुकले. आणि जंगलात हरवले. काही केल्या दिशा कळेना तशी भीती वाटू लागली. काहीच सुचेना तशी फतकल मारून मी तिथेच बसले. थोडा वेळ जाऊ दिला. सारे बळ एकवटले नि परत उठून अंदाजाने चालत राहिले. दिशा कळतच नाही अशा परिस्थितीत विसेक मिनिटे चालले असेन. तेव्हा मला पायऱ्या दिसल्या. पण काल उतरले त्या या पायऱ्या निश्चितच नाहीत. असो पायऱ्या आहेत म्हणजे रस्ता आहे हे ही नसे थोडके! या पायऱ्या मला कुठेतरी नेतीलच. पंधरा एक मिनिटे तशी गेली. दुरून माणसांची कुजबूज ऐकू आली. मला इतकी इच्छा होत होती बैगेतली शिट्टी काढून वाजवावी. संकटकाळी उपयोग व्हावा म्हणूनच तर तिला जवळ बाळगली आहे. पण ते फारच ड्रॅमॅटीक होईल असे वाटले. मी पायऱ्या चढतच राहिले. आणि एक क्षण जेव्हा असा आला की दोन ट्रेल्स एकमेकांना जुळतात ते दुरूनच दिसले तसा माझ्या आनंदाला पारावर रहात नाही. अंगात नवीन बळ संचारले आणि झपाझप मी तेवढे अंतर काटून त्या पायऱ्यांच्या जंक्शनला जाऊन पोहोचले.

आता फक्त एकच आव्हान राहिले. आताशी म्हणे 1500 पायऱ्या संपल्या. अजून 2200 पायऱ्या चढायच्या. मी दमून गळून गेले आहे. पाच पायऱ्या चढल्या की धाप लागते या वेगाने साधारण 450 वेळा विश्रांती घ्यावी लागणार ... छे छे ... काहीतरी अवास्तव वेग आहे. थोडी मनाची शक्ती वाढवून मी खटपट करीत 10 पायऱ्या चढते .. म्हणजे 220 वेळा विश्रांती घ्यायची ... कसचे काय दमछाक अशी होते की घटकाभर थांबले तरी पुन्हा चार पायऱ्या ही चढवत नाहीत.
माझ्या परीने मी शब्दात सांगायचा प्रयत्न केला की तेव्हा परिस्थिती काय होती! पण आयुष्यात इथे एकदातरी यायलाच हवे. मी हा ट्रेक पूर्ण केला म्हणजे कोणीही करू शकेल एवढे नक्की!
रबर च्या झाडाची मुळे (roots) हव्या त्या दिशेने वळवून मग त्यांना रुजवून 15-20 वर्षानी असा ब्रिज तयार होतो. वर्ष सरतात तशी त्याची ताकद वाढत जाते. एक ब्रिज जवळजवळ 50 लोकांना एका वेळेस उचलून धरेल. इंजिनिअर्स ने बांधलेले ब्रिजेस् कमी येत नव्हते म्हणून नदी पार करण्यासाठी मेघालयातील लोकांनी या प्रकारचे ब्रिज तयार करायला सुरुवात केली त्याला आता 180 वर्षे उलटून गेली.
52859394_10156893174302778_722030899205505024_n.jpg

पुढे कुठे जायचे याबद्दल माझा काही प्लान नव्हता. शेअर टँकसी मिळेपर्यंत बराच वेळ गेला. शेवटी चेरापुंजी पर्यंत एक गाडी मिळाली. मी त्यात घुसले. म्हणजे आज मुक्काम चेरापुंजी!

पत्र साऱ्यांना लिहिलंय. जमल्यास उत्तर नक्की लिहा. आणि हा प्रवास करताना माझ्याबरोबर तुम्ही सारे आहात त्याबद्दल Thanks and Love
सुप्रिया

Group content visibility: 
Public - accessible to all site users

वॉव

अरे किती छान प्रतिक्रिया!
समोरची परिस्थिती हाताळता येईल की नाही अशी शंका आली की भीती वाटते. या भीतीपोटी वाचकांनी टीका करून माझ्या या सिरीज ला प्रतिक्रिया द्यायला सुरवात केली होती. पण त्या परिस्थितीला सामोरे जायची एकदा मनाची तयारी केली की त्याच परिस्थितीतले साहस, आव्हान दिसू लागते.
थरारक, साहस, वॉव, हेवा, अवाक ... हे सारे शब्द वाचून असे वाटले की वाचकांनी सुद्धा आता या प्रवासाबद्दल त्यांच्या त्यांच्या मनाची तयारी केलेली आहे. Lol
धन्यवाद!