आज शनिवार आहे शनिवार!-भाग १

Submitted by amdandekar on 1 March, 2020 - 16:48

माझ्या मताप्रमाणे शिनिवार हा वारांचा राजा आहे. याचं नुसतं नाव जरी घेतलं ना तरी मन आनंदून जातं. त्यात सुट्टीची मजा आहे, काम आणि कर्तव्य पार पाडल्याचं समाधानही आहे. आठवड्यात बऱ्याच तुंबलेल्या कामाचं ओझं हा शिनिवार एखाद्या कुटुंबवत्सल घरच्या कर्त्या पुरुषाप्रमाणे आनंदाने आपल्या खांद्यावर उचलतो आणि कर्तव्य कठोराप्रमाणे पार पाडतो. याची दुपार रेंगाळलेली असली तरीही त्यात रविवारची हुरहूर नाही, मरगळ तर नाहीच नाही, आनंद आहे फक्त आनंद. शनिवारची चाहूल लागते ती गुरुवारपासून, शुक्रवार येतो तो शनिवारचा आनंद घेऊनच. शुक्रवार अर्धा संपला की शनिवारचा उत्सव सुरु होतो. एखाद्या जवळच्या मित्राची किंवा लाडक्या नातेवाईकाची अनेक वर्षांनी भेट होणार असेल तर ज्या आतुरतेने आपण त्या भेटीच्या दिवसाची वाट बघतो त्याच आतुरतेने आपण या येणाऱ्या प्रत्येक शनिवारची वाट बघतो. तोही असाच रोज कोपऱ्यावर भेटणाऱ्या मित्रासारखा हसत उभा असतो. लहानपणापासून असे कित्येक शनिवार माझ्या लक्षात आहे किंवा आजीनं केलेल्या साटोऱ्यांची चव जशी वर्षानुवर्षं जिभेवर घोळते तसे हे शनिवार माझ्या मनात घोळत असतात.

पाचवी ते सातवी रोज आमची शाळा सकाळची असायची आणि फक्त शनिवारी दुपारची असायची. पण दुपारची शाळा आणि शनिवार हे समीकरण मला फारसं रुचत नसे. तो शनिवार उगाच लांबल्या सारखा वाटे. म्हणजे फणसातून गरे काढून टाकले आणि फक्त बी ठेवली तर कसं वाटेल तसा तो शनिवार वाटायचा. पण यातही एक मजा होती, शाळा सुटायची ते दुपारी ३ च्या सुमारास. मग शाळेतून सुसाट पळत सुटायचं ते धन्नू च्या घरी. त्याच घर फक्त अर्धा किलोमीटर. तो जमाना होता दूरदर्शनच्या दर्जेदार कार्यक्रमांचा, तेव्हा दुपारी याच सुमारास डीडी'झ कॉमेडी शो यायचा आम्हाला त्याचे फक्त शेवटले ५ मिनिटं मिळत. पण त्या ५ मिनिटांसाठी जिवाच्या आकांतानी दप्तर पाठीवर घेऊन केलेली ती धावपळ त्या कार्यक्रमासाठी सार्थक वाटायची. शनिवारी दुपारची शाळा असल्याने ते फारसं आवडायचं नाही. त्यामुळे जिव्हाळ्याचा खूप आठवणी या दिवसातल्या नाही.

पण हायस्कुल ला गेलो तेव्हापासून शनिवार हवा हवासा वाटू लागला. मुळातच सकाळी उठून शाळा आणि १०:३० ला सुटका ही कल्पनाच इतकी अफलातून होती की त्या सकाळी उठण्याचे फारसे कष्ट नव्हते. घरची शिस्त होती त्यामुळे शाळा असो वा नसो उशिरात उशिरा सकाळी ६:३० च्या सुमारास उठावेच लागे. सात आणि त्यानंतर उठलो तर एकतर खूप बोलणी खावी लागत नाहीतर पोरग वाया गेलं असं घरात घोषित होई, त्यामुळे हे सगळं ओढवण्यापेक्षा ६:३० ला उठणे जास्त सोपे वाटे. शनिवारची प्रसन्न सकाळ, ७ च्या सुमारास शाळा सुरु होई शनिवार त्यामुळे ड्रिल (PT) ने सुरवात. वर्गात कोंडून हे आता ऐका नाहीतर तुमचं काही खर नाही ह्या पेक्षा एखाद दिवसाची ड्रिल बरी. एक गणित सोडलं तर आपलं कुठल्याच विषयाशी वाकड नव्हतं. वाकड गणिताशीही नव्हतं पण मनापासून हा विषय काही कधी आवडला नाही आणि गणिताची परिक्षा म्हंटली म्हणजे त्यासमोर एखादा किल्ला किंवा आपलं कळसुबाई शिखर पादाक्रांत करणे जास्त सोपे वाटे. कसका होईना पण शनिवारच्या शाळेचे ४ पिरेड संपले की कोंडवाड्यातून जनावरे सुटत तसे आम्हा पोरांचे कळप शाळेतून बाहेर पडत. वैद्य बुवांचे घर मौक्याच्या ठिकाणी त्यामुळे शाळा सुटली की पहिला पाडाव तिथे पडे.

पतंगांचे दिवस

पतंगच्या दिवसात दप्तरं बाहेरच्या झोपाळ्यावर ठेवायची आणि गच्चीवर पाळायचं. मला फक्त पतंग उडवता येत असे पण दुसऱ्या पतंगीशी पेचा (लढत) आणि त्याचे डावपेच या भानगडीत मी पडत नसे हे काम वैद्य बुवांचे आणि ते त्याला जमतही असे. त्यामुळे सुरवातीला पतंग उडवायची आणि तीनं धोक्याची घंटा पार केली की ती धन्नूच्या हाती द्यायची. बहुतेक मी आणि धन्नूच असायचो कधी अनुप येई. कधीतरी अभिजित म्हणजे धन्नूचा मोठा भाऊ पण असे. पतंगीच्या नादात २-३ तास निघून जात. १२:३०-१:०० घरी हजेरी लावायची वेळ येई. "मी जातो बे आता, एक वाजला” या वाक्यावर निरोप घेऊन खाली निघावं तर जिना उतरताना काकू स्वयंपाक घरातच असत, "आता जेऊन जा" हे कानी पडे. पण वाजले किती आहेत त्यावर घरी किती शिव्या खाव्या लागतील हे अवलंबून असे. म्हणून मग घरी पळायची की जेऊन जायचं हे ठरवावं लागे. म्हणजे ११:३० वाजून गेल्यावर आईला ही माहित असे की मी कुठे गेला असेन.

पण जानेवारीत मस्त थंडी पडायची त्या थंडीत पतंग उडवायची मजाही काही वेगळी असायची. बसकी घर, थंडीतलं कोवळं ऊन, रंगीबेरंगी पतंगीन भरलेलं आकाश, मुलांनी फुललेल्या घरांच्या गच्च्या, ओ पारचे आवाज यांनी एकच माहोल तयार होई. ७-८ वर्षांपूर्वी डिसेंबर २५ च्या आसपास नागपूरला जायचा योग आला होता, पण डिसेंबर २५ असूनही आकाश मात्र रिकामेच होते आणि गच्च्या ओस पडल्या होत्या. शायद जमाना बदल गया!

पतंगी साठी दही दिशा!
नागपूरला पतंगीच वेड फार जुनं, साधारण दिवाळी पासून ते २६ जानेवारीपर्यंत पतंग आकाशात उडायच्या. संक्रांत म्हणजे या उत्सवाचा कळस.

नोव्हेंबर-डिसेंबर-जानेवारीत पतंगाची एक छाप बाजारावर असे एक छोटी अर्थव्यस्था! चक्री, मांजा, सिरस असले अनेक नानाविविध पहिलु या पतंगीत. आणखीन काही वर्ष मागे गेलो तर, धरमपेठेत परांजपे शाळेत होतो ते दिवस आठवतात. शंकरनगरच्या भव्य चौकात दिवाळी झाली की पतंगच एक मोठ्ठ दुकान सजे. मोठमोठाल्या रंगीबेरंगी पतंगी, रिकाम्या आणि मांजान भरलेल्या चक्रया कुणाचंही लक्ष वेधून घेत. मी न चुकता या दुकानाकडे बघत बघत शाळेत जायचो. कधी तरी शाळा सुटल्यावर बाबांनी या दुकानातून पतंगही घेऊन दिल्याचं आठवत. पतंगांच्या दिवसात अशी खूप दुकानं जागोजागी लागत, पण त्या शंकरनगरच्या दुकानाची मजा मात्र दुसऱ्या दुकानात नव्हती.

नववीतली गोष्ट असावी, कुणाच्यातरी डोक्यात आले चला पतंगांची खरेदी इतवारीतुन करू. इतवारी म्हणजे नागपुरची ठोक विक्रीची बाजारपेठ आणि खरेदीचे नंदनवन! जसे दिवस, सणवार त्याप्रमाणे बाजाराचा रंग बदलत असतो. इतवारीही त्याला अपवाद नाही. मला तर तसेही इतवारी मनापासून आवडणारी बाजारपेठ. काय मिळत नाही इथे. आता इतकी वर्ष झाली काय काय खरेदी केली आठवत नाही पण भरपूर पतंग आणि ऐवज आणला असावा. अर्थात दिवस शनिवारचा! घरून फारसा विरोध होत नसे कारण इतवारीत जाणार म्हणजे इथे जे १०ला मिळणार ते तिथं पाच ला मिळणार, पोरं सायलकनी १२ कि.मी. जाणार आणि येणार, स्वतःहून म्हणतात आहेत. तेव्हा काही नाही तर निदान थोडा व्यवहार तर शिकतील म्हणून घरून विरोधापेक्षा प्रोत्साहन जास्त मिळे. मात्र आम्हा दोघांना यानंतर इतवारीची आवडच लागली. शाळेचं व नंतर कॉलेजचं नवीन वर्षाचं साहित्य सारं इतवारीतूनच येई. आम्हा दोघांचे आई वडीलही इतवारी या विषयात पीएचडी झालेले असल्याने १९८६-८७ पासून इतवारी ही ओळखीची होती. मग अगदी नागपुरातून बारवाटा होईपर्यंत, नाही नाही अगदी मुंबईहून येऊनही इतवारीत खरेदी करायला जायचो.

पार्टनरशिप मधला कुत्रा!

झालं असं की आमच्या गावी नाचणगावला घरी कुत्रा हवा होता. वाडा मोठा आहे त्यामुळे एक कुत्रा नेहमी असायचाच. मग काणे काकाने एक पिल्लू आणून दिलं जर्मन शेफर्डचं क्रॉसब्रीड, काळ्या रंगाच्या त्या पिल्लांचा तर मला काही तासातच लळा लागला. ज्या दिवशी मोती घरी आला तोही शनिवार! दादाना (आजोबा) आणि सगळ्यांना सोप्प जावं म्हणून कुर्त्र्याचं नाव 'मोती' ठेवण्यांत आलं. आणि तसही नाचणगावला घरी कुत्रा हा आतापर्यंत "मोती" ह्याचं नावांन होता. म्हणजे हेनरी आठवा तसा हा आत्ताच मोती चौथा असावा! मला राहून राहून सातव्या वर्गात अनिल अवचटांचा 'पिल्लू' हा त्यांचा कुत्रा पाळायच्या अनुभवावरचा धडा आठवू लागला.
पुढल्या २-४ दिवसात खेळता खेळता मोतीची मान वाकडी झाली म्हणून की काय कुणासठाउक पण दादा काही या पिल्लाला नाचांगावला पाठवायला तयार होईना आणि आई घरी ठेवायला तयार होईना. आई तर अगदी मी राहीन नाहीतर कुत्र्याचं पिल्लू राहील असं म्हणू लागलं. शेवट कोणाला देऊन टाकू किंवा सोडून देऊ इथपर्यं वेळ आली. पण मधल्या वेळात आमच्या घराजवळ एक ढोर डॉक्टर राहायचे त्याच्याकडे मी मोतीला घेऊन गेलो त्यांनी ५ मिनिटात त्याची मन सरळ करून दिली. मध्ये एक आठवडा निघून गेली. कुत्र्याचं पिल्लू घरी आहे म्हंटल्यावर धन्नू काय तसाच राहाणार होता होय? त्याच्याही मोतीशी खेळायला घरी दोन चार चकरा झाल्या होत्या. आम्ही दोघेही कुत्रा प्रचंड आवडणाऱ्या जमातीत मोडणारे आहोत. लहानपणी आम्हीदांडेकर जेव्हा एकत्र राहत असू तेव्हा यशवंत नगर ला आमच्या कडे टायगर नावाचा चांगला ढाण्या वाघासारखा जर्मन शेफर्ड कुत्रा होता. त्यामुळे कुत्र्याची भीती तर दूर पण कुत्रा म्हणजे जीव की प्राण होता. एकदोनदा काकांकडले गावाला गेले होते तेव्हा हल्लीच्या टॉमीला आमच्याकडे ठेवले होते. अर्थात त्याच्या देखरेखिची जवाबदारी माझ्याकडे असे आणि ती मी आनंदाने करायचो. धन्नूकडेही तो धरमपेठेत राहत असताना कुत्रा होता. टिपू त्याच नाव, टिपूवर धन्नूचा आणि धन्नूवर टिपूचा भयंकर जीव! टिपू म्हणजे तांबड्या रंगाचा डौलदार आणि अत्यंत इमानदार प्राणी.
मी प्राप्त परिस्थती धनूला सांगिली मग वैद्य बुवांनी घरी सगळ्यांना लवकरच पटवले आणि मोतीला घर मिळाले! मी थोडा खट्टू झालो होतो पण माझ्यासाठी आनंदाची बाब ही होती की मोती जरी आमच्या घरी राहणार नव्हता तरी रोज भेटणार होता. मोती घरी आला तो शनिवार आणि धन्नूच्या घरी गेला तोही शनिवारच!

रोज शाळेत जायच्या आधी आणि नंतर मोतीशी खेळणे हा नित्यक्रम असे. कुत्र्यांचं लहानपण मस्त असतं आणि ते फारच थोड्या काळ असतं कारण ३-४ चार महिन्यात ते पूर्ण मोठे होतात. पण याच दिवसात ते सगळ्यात जास्त शिकतात. पहिल्या ६-८ महिन्यात कुत्र्यालाही काही इंजेक्शन द्यावे लागतात. अलंकार टॉकीजच्या शेजारी प्राण्यांचा सरकारी दवाखाना आहे तिथे घेऊन जावं लागे. मोतीला इंजेक्शन लावायचा मग एखाद्या शनिवारी आमचा कार्यक्रम ठरे. शाळा आटोपली की घरी जायचं, पटकन जेवण उरकायचं आणि पुन्हा धन्नूकडे यायचं. एकाच सायकलवर जायचं कुणालातरी मोतीला पकडून बसावं लागे. आमच्यातलं आपापसातली समज इतकी चांगली होती की मी चालवतो किंवा मीच घेऊनबसतो यावरून भांडणतर दूर पण कधी वादही झाला नाही.

ही व्हेटरनरी दवाखान्याची चक्कर रस्त्यावरून आमच्या आजूबाजूने जाण्याऱ्या वाहनांसाठी मोठी रंजक असे. पाठीमागे मोतीला एखाद्या चादरीत गुंडाळून घट्ट पकडून बसावं लागे. तो हलता कामा नये म्हणून विशेष खबरदारी घ्यावी लागे. प्रतापनगर ते माधवनगरचा चढाव म्हणजे दमछाक नुसती. श्रध्दानंदपेठ ते बजाजनगर, बजाजनगरला पोहचेपर्यंत मोतीचा पेशन्न्स संपलेला असे. तो खूप चुळबुळ करू लागे मग जो कोणी सायकल चालवत असेल त्याला सांगावं लागे की मी आता हलणार आहे तेव्हा सायकल हळू चालावं. नाहीतर थोडा थांब. कधी कधी सायकल हळू झाली की उडी मारून उतरावही लागे. रस्त्याच्या कडेला थोडं थांबायचं मोतीचे पाय मोकळे होईद्यायचे आणि मग आमची वरात मार्गी लागायची. येणारे जाणारे मात्र आमची ही गम्मत पाहून हसत पण आम्ही तिकडे दुर्लक्ष करायचो. पुढे रस्त्याचे दोन पर्याय होते म्हणजे बजाजनगर ते रामदापेठ/काचीपुरा कडून अलंकार टॉकीज गाठायचे की वेस्ट हायकोर्ट रॉड ने शंकरनगरकडू जायचे. आता नक्की कुठल्या रस्त्यानं जायचो हे आठवत नाही. पण दवाखान्यात पोहोचेपर्यंत असे दोन ब्रेक घ्यावे लागत, की मजल दरमजल करत दवाखान्यात पोहोचत असू. दवाखान्यातले सोपस्कार उरकले की पुन्हा आम्हा तिघांची वरात परतीला लागायची. काही औषध दिलं असेल तर शंकरनगर चौकाकडून जावं लागे कारण प्राण्यांची औषध फक्त शंकरनगरच्या रेणुका मेडिकल्स याच दुकानात मिळत असत! जसे आलो तसेच म्हणजे साधारण तोच क्रम परतीचा असे. धन्नूकडे येईपर्यंत १/१:३० झालेला असायचा लगेच घरी पळायचं. कारण ३/३:३० चा ठोसर सरांचा क्लास असायचा, होमवर्क राहिला असेल तर उगाच संकट नको म्हणून ते पूर्ण केलेले बरे.

पण मोतीला दवाखान्यात घेऊन जाणे हा एक आनंदच असायचा आम्ही कधी कंटाळा केला नाही, उलट त्या सगळ्या प्रवासाचा आम्ही आनंद घ्यायचो. मोतीनी ही कधी त्रास दिला नाही.

शनिवार म्हणजे गाणं!

हायस्कुलला गेल्यावर शनिवारची सकाळची शाळा झाली की उरलेला दिवस म्हणजे पर्वणी! या शनिवारचा एक भाग म्हणजे माझी गाण्याची बैठक. मला कधी गाणं शिकायला मिळालं नाही, ना मी कधी हे घरी सांगितलं. घरच्यांनाही कधी असं वाटलं नाही की मी गाणं, तबला किंवा एखादं वाद्य वाजवावं, असो. पण प्रार्थमिक शाळेत असल्यापासून उत्तमातलं उत्तम गाणं ऐकल. आमच्याघरचा टेपरेकॉर्डर पहिल्यांदा गायला तेच मुळी पं. वसंत खा देशपांडेंच्या आवाजात! प्रथम नाट्यसंगीताचे म्हणजेच उपशास्त्रीय संगीताचे संस्कार कानावर झाले. 85 ते ८७ पर्यंत घरी ज्या काही कॅसेट होत्या त्या सगळ्या नाट्यसंगीताच्या यातला एकमेव अपवाद म्हणजे अनुप जलोटाची भजन संध्या. त्यामुळे पं. जितेंद्र अभिषेकी, प्रभाकर कार्येकर, रामदास कामात, ज्योत्स्ना भोळे, वसंतराव देशपांडे, छोटा गंधर्व, माणिकवर्मा, पं भीमसेन जोशी इत्यादींची गायकी खूप कानावर पडली. सिनेमाची गाणी ऐकली नाही असं नाही पण ती फार क्वचित कधी रेडियो लावला तर आणि घरी शिस्त होती. रेडियो लावून किंवा गाणं ऐकत अभ्यास करण्यास मज्जाव होता. समजा कधी केला तर आई लगेच ओरडायची. त्यामुळे गाणं ऐकताना फक्त गाणंच ऐकल आणि अभ्यास करताना.... जाउद्यान कुठे आता शिरायचं त्याच्यात.

मग शाळा आटोपून घरी आलं की कपडे बदलून वगैरे वरच्या खोलीत घुसायचं की तास दोन तास मंत्रमुग्ध होऊन गाणी ऐकायची. ८४-८८ कॅसेट संग्रहही वाढला साधारण ८७ पासून अजित कडकडे हे नाव त्या काळात खूप प्रसिद्ध झालं. अजित कडकडे हा माझा त्या काळातला सगळ्यात आवडता गायक. आमच्याकडे अजित कडकडेची देवाचिये द्वारी, तुझे नाम आले ओठी आणि इतरही काही कॅसेट होत्या यांची पारायण करायची.
देवाचिये द्वारीचे सगळेच अभंग मला आवडायचे/आवडतात. त्यातही
<वृंदावनी वेणू आणि
जन्मोजन्मी आम्ही
देवाचिये द्वारीचे सगळेच अभंग मला आवडायचे/आवडतात. त्यातही वृंदावनी वेणू आणि जन्मोजन्मी आम्ही हे अभंग माझ्या विशेष आवडीचे. या ध्वनिफितीत निरूपण मोजकं, अतिशय प्रभावी पण तितकंच गोड. जसं जन्मोजन्मी आम्ही अभंगा आधी निरूपणकर्ता (प्रभाकर पंडित ?) सांगतो, "नामदेवाला एका वारकरायण विचारलं नामदेव तुला कसा रे हा विठ्ठल पावला ? तेव्हा टाळ मृदूंगाच्या गजर चालू असतानाच नामदेवाने सांगितलं, अरे जन्मोजन्मी आम्ही बहू पुण्य केले तेव्हा या विठ्ठले कृपा केली!" निरूपण कुणाचं हे काही कॅसेटवर लिहिलं नव्हतं. त्यामुळे केवळ अभंग न ऐकता संपूर्ण कॅसेट ऐकायचो. कदाचित माझ्याकडे भाषेचे थोडे-फार संस्कार हे असे आले. तुझे नाम आले ओठी मधेही एकाहून एक सरस अशी भक्तीगीते होती. पण यात निरूपण अथवा निवडणं नाही. ८८ सालच्या गुढीपाडव्याला तात्या टोपे नगरला अजित कडकडेची एक मैफल झाली होती. ती गाण्याची प्रत्यक्ष ऐकलेली पहिली मैफल!
नाट्यसंगीताच्या जोडीला आणखीन लाईट ऐकायचं असेल तर गुलाम अलीच्या दोन केसेट होत्या. त्यात चुपके चुपके, हमको किसके गम ने मारा अश्या त्याच्या तेव्हाच्या प्रसिद्ध गज़ल होत्या. यातच एक हंगामा हैं क्यू बरपा ही गज़ल होती याच्या आधी एक शेर आहे

अंदाज अपने देखते हैं आइने में वो
और ये भी देखते हैं कोई देखता ना हो...

विशेष काही समजायचं नाही पण हे खूप भारी वाटायचं म्हणून रिवाइंड करून ४-४दा ऐकायचं. याच्या जोडीला मेहंदी हसन ची ऑल time फेव्हरेट
रंजीशी ही सही
होती. या वेळेपर्यंत जगजीत सिंगचा शोध बाबांना आणि मलाही लागायचा होता. पण पुढे जगजितसिंग ऐकला अन त्यापुढे मी कुठलाही इतर गज़ल गायक ऐकला नाही.
गीता दत्तच्या आणि तलत मेहमूदच्या गाण्यांची दोन स्वत्रंत्र कॅसेट होत्या आणि एके काळी ह्याही माझ्या फेव्हरेट होत्या. माझा कल गीता दत्त कडे जास्त. आणखीन काही वर्षात हिंदी गाण्याच्या कॅसेटची भर पडली. लता मंगेशकरच्या हिंदी चित्रपटातल्या काही शास्त्रीय गाण्यांची एक कॅसेट होती महंमद रफीची ही एक होती. पण मला मनापासून कुणी आवडत असेल तर ते म्हणजे अशा भोसले आणि किशोर कुमार. पण हे अजून कॉलेजला गेल्यावर. हिंदीगाण्याच्या ट्यून्सच्या काही कॅसेट होत्या त्यात एक राजकपूरच्या पिक्चरच्या गाण्याची होती. या ट्यून्स ऐकायला मजा यायची.
हे सगळं ऐकेपर्यंत १२:००/१२:३० ला आईची हाक यायची जेवायला चल. बरेचदा जड अत:करणाने बैठक आटोपती घ्यावी लागे. पुष्कळदा आधीच आटोपललेली असे. पण त्या काळात ऐकलेली गाणी आणि संगीत कुठतरी झिरपल. मराठी भावगीत, मराठी गाणी मात्र काही या दिवसात जास्त ऐकली नाही ते खरं ऐकलं ते पुण्यात आल्यावर त्याची थोडी सुरुवात नागपूरहूनच झाली होती.
पुढं कॉलेजला गेलो तरी गाणं आणि शनिवार ह्याचं नातं काही बदललं नाही, उलट ते घट्ट होत गेलं आणि आजही आहे. कॉलेजला जाईपर्यंत घरी संग्रह ही वाढला होता.
मी पुण्याला जायच्या आधी बाबांनी स्वराभिषेक ह्या कॅसेटचा संच आणला होता मी म्हणावं इतका ऐकलं नव्हता पण पंडितजीच वेगळेपण त्यांची ती गायकीनं मनात एक जागा मात्र नक्की तयार केली. त्याचबरोबर माणिक वर्मांचा बहरला पारिजात दारीच्या ह्या कॅसेटचा संचही घरी आला होता पण मी फारसा याकडे वाळलो नव्हतो. गोविंराव पटवर्धन आणि पुलंच्या हार्मोनियम वादनाच्याही दोन ध्वनिफिती घरी होत्या. हार्मोनियम वादनात दोघेही केवळ अजोड बोटात जादू दुसरं काहीच नाही!

पुढं शिक्षणानिमित्त पुण्याला मग पोटासाठी मुंबई गाठली या मधल्या वणवणीत शनिवार कधी दुरावला कधी जवळ आला असं काही वर्ष चाललं. पुण्याला असतांना संगीताच्या आवडीमुळं अभिजित भेटला आणि आमची मैत्री घट्ट होत गेली ती आजतागायत टिकून आहे. पुढं लग्न होऊन गोरेगांव अन ठाण्यात काही काळ विसावलो. तसा शनिवार पुन्हा वसंता सारखा बहरला!

आजही शनिवारी बरेचदा उठलो की हिंदी-मराठी भक्तगीतापासून सुरुवात होऊन नाट्यगीतांवरून उतरत गज़ल वर मैफल संपते, पेक्षा संपवावी लागते. पण पूर्वीइतका सलग वेळ मळेनासा झाला आहे. दुसरं म्हणजे गाणं नको इतकं मुबलक झालं आहे ON DEMAND, त्यामुळे त्याची थोडी मजा कमी झाली आहे असं वाटत.
पण मस्त तास दोन तास मानसोप्त आणि आवडीचं संगीत ऐकल की शनिवार सार्थकी लागतो!

- अमोल दांडेकर

Group content visibility: 
Public - accessible to all site users

छान.
शनिवारी माझ्या आईवडिलांना सुट्टी असल्याने माझ्यासाठीही शनिवार म्हणजे आनंद असे. शिवाय शाळेत विविध उपक्रम सहसा शनिवारी राबवले जात. तीही मजा असे.

हर्पेन,अन्जुत, प्राचिन धन्यवाद!
आर्यन धन्यवाद कधी कधी लिहिताना typo होतात चूकभूल द्यावी घ्यावी. पुस्तक लिहीन तेव्हा तुमच्याच proof reading ला देइन.
-अमोल