भूतांच्या गोष्टी: अनुभव भरतपुरचा तसेच मनातले भुत

Submitted by Dr Raju Kasambe on 1 March, 2020 - 08:10

भूतांच्या गोष्टी

खरं सांगायचं तर माझा भूतांवर अजिबात विश्वास नाही. पण ज्या काही घटना घडतात त्याचे आपल्या जवळ स्पष्टीकरण नसते. मग आपल्याला पटेल ते स्पष्टीकरण आपण स्वीकारतो. त्यातील एक म्हणजे भूतांचे अस्तित्त्व.

मला तत्त्वज्ञानाच्या अभ्यासक्रमात असे शिकविले गेले की कुठल्याही गोष्टीचे त्यावेळेसचे सर्वात जास्त स्वीकारले गेलेले स्पष्टीकरण म्हणजे ‘सत्य’ असे मानले जाते. पण खरे ‘सत्य’ तेच असेल ह्याची शाश्वती देता येत नाही. कारण काही दिवसांनी आणखी कुणी तरी त्याचे आणखी चांगल्या प्रकारे स्पष्टीकरण देतो आणि आपण त्याला सत्य मानायला लागतो.

जसे अणूच्या आत काय दडले आहे त्याबद्दलचे सिद्धान्त. आता आणखी एका ‘गॉड्स पार्टिकल’चा शोध लागला आहे (असे म्हणतात). तो सूक्ष्म कण सर्व विश्वाच्या पसार्‍याचा मूलभूत घटक असल्याचे म्हटले जाते.

असो, आपली भुतं भरकटत चालली आहेत.

अनुभव भरतपुरचा:

भरतपुरला माझे कुटुंब (मी, सौ, मुलगा, मुलगी) आणि माझ्या साडूचे कुटुंब (दोघे) एका लॉजमध्ये मुक्कामी होतो (इ.स. २००९ असावे, लॉजचे नाव मुद्दाम गुपित ठेवले आहे). लॉज मालकाला छातीवर आणि मालकीणबाईंना डोक्यावर मोठमोठी बॅंडेज होती. बाईंचा अपघात झाला होता तर बुवांची हृदयाची ‘बायपास’ शस्त्रक्रिया झाली होती. वरच्या माळ्यावर पडून मालकीण बाईंचे डोके फुटले होते.

आम्हाला पहिल्या माळ्यावरच्या लागून असलेल्या दोन खोल्या दिलेल्या होत्या. पहिल्या माळ्यावर चढल्यावर आणि नंतर खोलीत प्रवेश केल्याकेल्याच काहीतरी विचित्र भास झाला; म्हणजे डोक्यात हवा जातेय, आपले शरीर हलके झालेय असे काहीतरी. अर्थात सर्वजण आग्र्यावरून प्रवास करून आल्यामुळे असे वाटले असेल म्हणून सर्वांनी दुर्लक्ष केले.

खोलीत प्रवेश केल्याकेल्या माझ्या सौ. ला आणि मेहुणीला नळाच्या तोटीचा शॉक लागला. घर मालकाला सांगितले तर त्यांनी मेहुणीला तिसरी खोली उघडून दिली. त्या खोलीत जाताच सर्व खिडक्या बंद असूनही छताला टांगलेले झुंबर हलत असल्याचे लक्षात आले. ती लगेच धावत परत आली.

मोघम कपडे धुवून ते वाळायला टाकण्यासाठी सौ. टेरेसवर गेली तर तीला कुणीतरी मागे येतोय असा भास झाला. पण तिथे कुणीच नव्हते. ती धावत खोलीत परतली. थोड्याच वेळात मेहुणीसुद्धा कपडे वाळायला टाकायला गेली. परत तसेच घडले आणि ती खोलीत धावत परतली.
दुपारचे जेवण वगैरे करून आम्ही केवलादेव पक्षी अभयारण्यात पक्षी बघायला निघून गेलो.

सूर्यास्तानंतर परत आलो. दोघे लॉज मालक आम्हाला आग्रहाने घरचे बनविलेले ‘आलूके पराठे’ खाऊ घालीत होते. त्यांच्या बंडेज वगैरे बघून आम्हाला थोडे मनात खटकलेच.

पटापट जेवणं आटोपून आम्ही झोपी गेलो. मला सकाळीच उठून पक्षीनिरीक्षणाला जायचे होते.

उशिरा रात्री मला काहीतरी भास झाला आणि झोपमोड झाली. मी भासाकडे दुर्लक्ष करीत परत झोपायचा प्रयत्न करीत होतो. तेवढ्यात सौ.ने मला उठविले.

‘अहो आपला पलंग फिरतोय!’

अरेच्या. मला पण असेच वाटत होते. कुणी तरी आमचा पलंग वर उचलून फिरवीत होतं (असे वाटत होते).

‘अगं, आपल्याला असेच भास होतात. झोप आता’.

तिला मी रागावल्यासारखे केले आणि तीचा आवाज बंद झाला. बिचारी असले भास होत असूनही गुमानं झोपली.

सकाळीच जाग आली. साडू साहेब आणि मेहुणी उठून वाटच बघत होते. आम्ही उठल्याचे जाणवताच त्यांनी दरवाजा वाजवला. आम्ही काही बोलायच्या आताच मेहुणी सांगू लागली,

‘भाऊजी, आमच्या रूममध्ये किनई भासच होतात. रात्री कुणीतरी आमचा पलंग उचलून फिरवीत होतं; आणि ना, सकाळी मी पाण्याची तोटी उघडल्याबरोबर मला शॉक लागला!’

सौ. उत्साहाने एकदम ‘सेम टु सेम’ सांगायला लागली. काय झाले काही कळले नाही. दोन्ही खोल्यांमध्ये सारखाच अनुभव येणे फार विचित्र होते आणि त्याचे माझ्याकडे तरी स्पष्टीकरण नव्हते. भुताटकीचे स्पष्टीकरण मला मान्य नव्हते.

माझ्या मुलाला फणफणून ताप भरला होता. पण त्याला असे काही भास झाले नव्हते.

प्रसंग दूसरा: मनातले भुत

१९९४ किंवा ९५ चा प्रसंग असेल. मी तेव्हा औरंगाबादला नोकरी करीत होतो. इंग्रजीचे खूळ मी फारच मनावर घेतले होते. वृत्तपत्र, बातम्या, चित्रपट सगळं इंग्रजीच बघायचो, वाचायचो....मग बरेच इंग्रजी चित्रपट भुताटकीचे असायचे. असाच कुठला तरी भुताटकीचा चित्रपट (फ्लॅटलाईनर्स? कदाचित) एकट्याने बघून मध्यरात्री सिनेमा थेटरातून बाहेर पडलो. स्कूटर बंद असल्यामुळे जाताना ऑटोने गेलो होतो. पण आता एकही ऑटो कुठे दिसत नव्हता. पैठण गेटला सगळ्या बसेस मिळतात. पण आता एकही बस कुठे दिसत नव्हती. पैठण गेटमधून निघून आता मी निर्जन असलेल्या समर्थ नगराकडे वळलो. वळल्यानंतर मला एक सिटी बस थांबलेली दिसली. त्या बाजूला जाणारी कुठलीही सिटी बस मला चालली असती. मी लवकर घरी पोचलो असतो. डोळ्यासमोर सिनेमातली भुतं अजूनही धिंगाणा घालीत होती. विचार करायला वेळ नव्हता. तसाच धावत सुटलो आणि एका दमात बस पकडली. सुदैवाने तीने वेग धरला नव्हता.

जागेवर स्थानापन्न झाल्यावर मोठा सुस्कारा टाकला आणि आजूबाजूला बघू लागलो.
विशेष म्हणजे बस मध्ये एकही प्रवासी नव्हता.
एवढ्या रात्री कोण असणार? अरे हे काय? ड्रायव्हर सुद्धा नाही?
मागे वळून बघितले.
अरे हे काय, कंडक्टर सुद्धा नाही?
आता मी घाबरलो.
तेवढ्यात रस्त्याने एक माणूस जाताना दिसला.
तो माझ्याकडे बघून खुळ्यासारखा हसला. ह्या...ह्या!

‘अबे, गाडी फेल है...कही नही जाएंगी!!’

डॉ. राजू कसंबे
मुंबई

Group content visibility: 
Use group defaults

आता एव्हडं सगळं झालय तर तुम्हाला खरं काय ते सांगूनच टाकतो. राजू सर तिथे पक्षीनिरीक्षणासाठी जाणार हे मला कळलं तसा मी आश्चर्यचकित झालो कारण तो भाग निर्जन आणि अतिशय दुष्ट भयानक प्रेतातम्यांनी भारलेला होता. तिथले प्रेतात्मे साधे नसून आकाशात उडत उडत लोकांचा पाठलाग करणारे होते. मी राजू सरांच्या एक दिवस आधी तिथे पोहचलो. राजू सरांची बुकिंग असलेले हॉटेल हे एक मायाजाल होतं. प्रत्यक्षात तो झाडी झुडपंचा एरिया होता आणि पूर्वी तिथे स्मशानभूमी होती. मी गेल्यावर अर्थातच तिथली सगळी भुतं आणि माझ्यात घनघोर युद्ध झालं. मी एकेकाला चांगलाच लोळवला. माझ्या ताकदीचा अंदाज आला तशी ती भुतं सैरावैरा इकडे तिकडे पळू लागली. थोड्याच वेळात तो सगळा एरिया मी निर्भूत करून टाकला. दुसऱ्या दिवशी राजू सर येणार म्हणून ते मायाजाल तसेच ठेवले आणि स्वतः तिथे त्यांचं आदरातिथ्य करायला थांबलो.

एवढ्या सगळ्या प्रतिक्रिया वाचून खूप मजा आली. कथेत एक उतारा मागे पुढे झालाय एवढे मात्र निश्चित. सर्वांना खूप खूप धन्यवाद!

बोकलत (किंवा त्यांच्या आयडीतून लिहिणारी भुते), तुम्ही तर जादूने ह्या लेखातील उतारे देखील खालीवर केलेले दिसतात. आता या उताऱ्यावर उतारा काय? उत्तरादाखल पाणउतारा नाही केलात म्हणजे मिळवली!

लेखात बादल केले. आता घर मालकांचे ऑपरेशन झाले होते इ. माहिती आधीच घातली आहे. असो. त्यामुळे भुताटकीचे बरेच वातावरण निर्माण झालेले दिसते.
प्रतिक्रिया वाचून खूपच मजा आली. पक्षी फुलपाखरे निसर्ग हा विषय सोडून भुताटकी सारख्या विषयावर लिहावे की लिहू नये हा प्रश्न पडलाय. अनुभव तर येताच असतात.

फुलपाखरे निसर्ग हा विषय सोडून भुताटकी सारख्या विषयावर लिहावे की लिहू नये हा प्रश्न पडलाय. अनुभव तर येताच असतात.
Submitted by Dr Raju Kasambe >>
सर, ह्या विषयावरचे अनुभव वाचायला आवडतील वाचकांना. प्रतिसादांचा विचार न करता आपण लिहित रहावे ही विनंती.

>>>> भुताटकी सारख्या विषयावर लिहावे की लिहू नये हा प्रश्न पडलाय. >>>>हॉरर स्टोरीज न आवडणारा मनुष्यच विरळा.

मी अशा गोष्टी कधी अनुभवल्या नाहीत . पण एखाद्या वास्तूत गेल्यावर प्रसन्न वाटत तर एखाद्या वास्तूत नैराश्य आल्यासारखं वाटत,जास्त वेळ थांबायला नको वाटत.

प्रतिक्रिया वाचून खूपच मजा आली. पक्षी फुलपाखरे निसर्ग हा विषय सोडून भुताटकी सारख्या विषयावर लिहावे की लिहू नये हा प्रश्न पडलाय. अनुभव तर येताच असतात >>>> लिहा बिनधास्त. ज्यांना वाचायचं ते वाचतात . मी तर त्यासाठीच लॉगिन करतो मायबोलीवर अधूनमधून. माझ्याकडे ढीगभर किस्से आहेत पण दुसरं कोणी काही टाकत नाही आजकाल त्यामुळे लिहायचा कंटाळा येतो. अमानवीयच्या पहिल्या धाग्यावर भरपूर लोकांनी असे किस्से टाकले पण आता फार लोक मायबोलीवर येत नाहीत बहुतेक किंवा त्यांना लिहायची इच्छा होत नसेल.

भूताची गोष्ट नाही पण वैयक्तिक अनुभव आहे.

- माझा आजार डयग्नोस होउन बरा होण्याच्या जस्ट आधी मला अतिशय प्र कर्षाने वाटू लागले होते की मी नवरा व मुलीपासून कुठे तरी दूर अतिशय लांब जाणार आहे. आता ही आजारपणाचा भाग असलेली अँग्झायटी होती की मरणप्राय अनुभवाची नांदी होती देवच जाणे.
- आजारात मला कोणीतरी चापट मारुन जागे करते आहे असे सतत भास होत. परत हा केमिकल लोच्या होता की ते घर पछाडलेले होते तेही देवाला ठाउक.
- पण एकदा स्वप्नात मी एक बाई माझी वाट पहात बसलेली पाहीली की मी तिला वचन दिलेले आहे की मी तिला भेटणार आहे तेव्हा ती वाट पहात होती. ही बाई बरीचशी dishevelled आणि एकंदर अवतारात व मध्यमवयीन होती. व मला उठल्यावर वाटायचे अरे देवा मी कशाकरता हिला वचन देउन बसले? का मी वचन दिलं. माझी बुध्दी भ्रष्ट तर नव्हती झाली Sad
पण नंतर मध्यंतरी एकदा लक्षात आले की - आता मीच क्वचीत त्या बाईसारखी दिसते.
म्हणजे ती प्रचीती होती की मला , माझ्याच मला पुढे जाउन भेटायचे आहे. मी इतक्यात मरणार नव्हते.

कितीही अनाकलनिय असो पण माझे तरी हेच इन्टरप्रिटेशन आहे.
______
त्या मानविय धाग्यावरच्या प्रतिक्रिया वाचल्या. कसले खतरनाक किस्से आहेत एकेक. पण एक जाणवले ते न्हणजे या वाईट किंवा अतृप्त शक्तींना लिमिटेडच पॉवर असते म्हणजे अगदी फार हार्म करता येत नाही त्यांना. आपण कणखर असावे लागते.

लिहा बिनधास्त. ज्यांना वाचायचं ते वाचतात .
मी तर त्यासाठीच लॉगिन करतो मायबोलीवर अधूनमधून. >>>> +11111 मीही

माझ्याकडे ढीगभर किस्से आहेत पण दुसरं कोणी काही टाकत नाही आजकाल त्यामुळे लिहायचा कंटाळा येतो. >>>> @जिद्दू जमलं तर नक्की लिहा किस्से..आम्ही वाचतो..

पण एकदा स्वप्नात मी एक बाई माझी वाट पहात बसलेली पाहीली की मी तिला वचन दिलेले आहे की मी तिला भेटणार आहे तेव्हा ती वाट पहात होती. ही बाई बरीचशी dishevelled आणि एकंदर अवतारात व मध्यमवयीन होती. व मला उठल्यावर वाटायचे अरे देवा मी कशाकरता हिला वचन देउन बसले? का मी वचन दिलं. माझी बुध्दी भ्रष्ट तर नव्हती झाली Sad
पण नंतर मध्यंतरी एकदा लक्षात आले की - आता मीच क्वचीत त्या बाईसारखी दिसते.
म्हणजे ती प्रचीती होती की मला , माझ्याच मला पुढे जाउन भेटायचे आहे. मी इतक्यात मरणार नव्हते.
>>>
सामो, मला पण अशाप्रकारे अनुभव आलेत. अगदी डिट्टो नाही पण प्रकार सेम

Pages