भूतांच्या गोष्टी: अनुभव भरतपुरचा तसेच मनातले भुत

Submitted by Dr Raju Kasambe on 1 March, 2020 - 08:10

भूतांच्या गोष्टी

खरं सांगायचं तर माझा भूतांवर अजिबात विश्वास नाही. पण ज्या काही घटना घडतात त्याचे आपल्या जवळ स्पष्टीकरण नसते. मग आपल्याला पटेल ते स्पष्टीकरण आपण स्वीकारतो. त्यातील एक म्हणजे भूतांचे अस्तित्त्व.

मला तत्त्वज्ञानाच्या अभ्यासक्रमात असे शिकविले गेले की कुठल्याही गोष्टीचे त्यावेळेसचे सर्वात जास्त स्वीकारले गेलेले स्पष्टीकरण म्हणजे ‘सत्य’ असे मानले जाते. पण खरे ‘सत्य’ तेच असेल ह्याची शाश्वती देता येत नाही. कारण काही दिवसांनी आणखी कुणी तरी त्याचे आणखी चांगल्या प्रकारे स्पष्टीकरण देतो आणि आपण त्याला सत्य मानायला लागतो.

जसे अणूच्या आत काय दडले आहे त्याबद्दलचे सिद्धान्त. आता आणखी एका ‘गॉड्स पार्टिकल’चा शोध लागला आहे (असे म्हणतात). तो सूक्ष्म कण सर्व विश्वाच्या पसार्‍याचा मूलभूत घटक असल्याचे म्हटले जाते.

असो, आपली भुतं भरकटत चालली आहेत.

अनुभव भरतपुरचा:

भरतपुरला माझे कुटुंब (मी, सौ, मुलगा, मुलगी) आणि माझ्या साडूचे कुटुंब (दोघे) एका लॉजमध्ये मुक्कामी होतो (इ.स. २००९ असावे, लॉजचे नाव मुद्दाम गुपित ठेवले आहे). लॉज मालकाला छातीवर आणि मालकीणबाईंना डोक्यावर मोठमोठी बॅंडेज होती. बाईंचा अपघात झाला होता तर बुवांची हृदयाची ‘बायपास’ शस्त्रक्रिया झाली होती. वरच्या माळ्यावर पडून मालकीण बाईंचे डोके फुटले होते.

आम्हाला पहिल्या माळ्यावरच्या लागून असलेल्या दोन खोल्या दिलेल्या होत्या. पहिल्या माळ्यावर चढल्यावर आणि नंतर खोलीत प्रवेश केल्याकेल्याच काहीतरी विचित्र भास झाला; म्हणजे डोक्यात हवा जातेय, आपले शरीर हलके झालेय असे काहीतरी. अर्थात सर्वजण आग्र्यावरून प्रवास करून आल्यामुळे असे वाटले असेल म्हणून सर्वांनी दुर्लक्ष केले.

खोलीत प्रवेश केल्याकेल्या माझ्या सौ. ला आणि मेहुणीला नळाच्या तोटीचा शॉक लागला. घर मालकाला सांगितले तर त्यांनी मेहुणीला तिसरी खोली उघडून दिली. त्या खोलीत जाताच सर्व खिडक्या बंद असूनही छताला टांगलेले झुंबर हलत असल्याचे लक्षात आले. ती लगेच धावत परत आली.

मोघम कपडे धुवून ते वाळायला टाकण्यासाठी सौ. टेरेसवर गेली तर तीला कुणीतरी मागे येतोय असा भास झाला. पण तिथे कुणीच नव्हते. ती धावत खोलीत परतली. थोड्याच वेळात मेहुणीसुद्धा कपडे वाळायला टाकायला गेली. परत तसेच घडले आणि ती खोलीत धावत परतली.
दुपारचे जेवण वगैरे करून आम्ही केवलादेव पक्षी अभयारण्यात पक्षी बघायला निघून गेलो.

सूर्यास्तानंतर परत आलो. दोघे लॉज मालक आम्हाला आग्रहाने घरचे बनविलेले ‘आलूके पराठे’ खाऊ घालीत होते. त्यांच्या बंडेज वगैरे बघून आम्हाला थोडे मनात खटकलेच.

पटापट जेवणं आटोपून आम्ही झोपी गेलो. मला सकाळीच उठून पक्षीनिरीक्षणाला जायचे होते.

उशिरा रात्री मला काहीतरी भास झाला आणि झोपमोड झाली. मी भासाकडे दुर्लक्ष करीत परत झोपायचा प्रयत्न करीत होतो. तेवढ्यात सौ.ने मला उठविले.

‘अहो आपला पलंग फिरतोय!’

अरेच्या. मला पण असेच वाटत होते. कुणी तरी आमचा पलंग वर उचलून फिरवीत होतं (असे वाटत होते).

‘अगं, आपल्याला असेच भास होतात. झोप आता’.

तिला मी रागावल्यासारखे केले आणि तीचा आवाज बंद झाला. बिचारी असले भास होत असूनही गुमानं झोपली.

सकाळीच जाग आली. साडू साहेब आणि मेहुणी उठून वाटच बघत होते. आम्ही उठल्याचे जाणवताच त्यांनी दरवाजा वाजवला. आम्ही काही बोलायच्या आताच मेहुणी सांगू लागली,

‘भाऊजी, आमच्या रूममध्ये किनई भासच होतात. रात्री कुणीतरी आमचा पलंग उचलून फिरवीत होतं; आणि ना, सकाळी मी पाण्याची तोटी उघडल्याबरोबर मला शॉक लागला!’

सौ. उत्साहाने एकदम ‘सेम टु सेम’ सांगायला लागली. काय झाले काही कळले नाही. दोन्ही खोल्यांमध्ये सारखाच अनुभव येणे फार विचित्र होते आणि त्याचे माझ्याकडे तरी स्पष्टीकरण नव्हते. भुताटकीचे स्पष्टीकरण मला मान्य नव्हते.

माझ्या मुलाला फणफणून ताप भरला होता. पण त्याला असे काही भास झाले नव्हते.

प्रसंग दूसरा: मनातले भुत

१९९४ किंवा ९५ चा प्रसंग असेल. मी तेव्हा औरंगाबादला नोकरी करीत होतो. इंग्रजीचे खूळ मी फारच मनावर घेतले होते. वृत्तपत्र, बातम्या, चित्रपट सगळं इंग्रजीच बघायचो, वाचायचो....मग बरेच इंग्रजी चित्रपट भुताटकीचे असायचे. असाच कुठला तरी भुताटकीचा चित्रपट (फ्लॅटलाईनर्स? कदाचित) एकट्याने बघून मध्यरात्री सिनेमा थेटरातून बाहेर पडलो. स्कूटर बंद असल्यामुळे जाताना ऑटोने गेलो होतो. पण आता एकही ऑटो कुठे दिसत नव्हता. पैठण गेटला सगळ्या बसेस मिळतात. पण आता एकही बस कुठे दिसत नव्हती. पैठण गेटमधून निघून आता मी निर्जन असलेल्या समर्थ नगराकडे वळलो. वळल्यानंतर मला एक सिटी बस थांबलेली दिसली. त्या बाजूला जाणारी कुठलीही सिटी बस मला चालली असती. मी लवकर घरी पोचलो असतो. डोळ्यासमोर सिनेमातली भुतं अजूनही धिंगाणा घालीत होती. विचार करायला वेळ नव्हता. तसाच धावत सुटलो आणि एका दमात बस पकडली. सुदैवाने तीने वेग धरला नव्हता.

जागेवर स्थानापन्न झाल्यावर मोठा सुस्कारा टाकला आणि आजूबाजूला बघू लागलो.
विशेष म्हणजे बस मध्ये एकही प्रवासी नव्हता.
एवढ्या रात्री कोण असणार? अरे हे काय? ड्रायव्हर सुद्धा नाही?
मागे वळून बघितले.
अरे हे काय, कंडक्टर सुद्धा नाही?
आता मी घाबरलो.
तेवढ्यात रस्त्याने एक माणूस जाताना दिसला.
तो माझ्याकडे बघून खुळ्यासारखा हसला. ह्या...ह्या!

‘अबे, गाडी फेल है...कही नही जाएंगी!!’

डॉ. राजू कसंबे
मुंबई

Group content visibility: 
Use group defaults

प्लॅचेट करताना शॉक मलाही बसलाय लहानपणी.
आईबाबांना आमच्या त्याच घरात कोणातरी बुटक्या म्हातार्‍या बाईचा वावर जाणवत असे. आईला मोरीत नळ सोडल्याचा ऐकू येई.
____________
अजुन एक किस्सा आमच्या ओळखीचे कोणीतरी म्हणत होते - त्यांच्या घरात, रात्र झाली की ताटंवाट्यांचे आवाज सुरु होतात, खाण्याचे/चहाचे वास येउ लागतात.
काय भयंकर असेल ते. घर सोडून जाणार कुठे व्यक्ती Sad

सामो,
रात्र झाली की ताटंवाट्यांचे आवाज सुरु होतात, खाण्याचे/चहाचे वास येउ लागतात.

नक्कीच भयानक अनुभव असणार. आणि नेहेमी झाले तर वाटच लागली म्हणायची !!

नशीबवान आहात.
आग्ऱ्याचा पेठा खाल्ला की असं होतं म्हणतात.

मी पुण्याला शिकत असताना चारजणी मिळून एक अत्यंत पाँश असा फ्लॅट भर वस्तीत (FC road) अत्यंत कमी दरात भाड्याने मिळवला. डबलस्टोरी फ्लॅटमधे खाली हाँल, किचन आणि एक बेडरूम तर वरच्या मजल्यावर दोन बेडरूम्स विथ अटँच्ड बाल्कनी होत्या. मालक परदेशी रहात व वर्षातून एकदा भेट देत. असा स्वत आणि मस्त सौदा होता. वरील बेडरूम्स पैकी एक घरमालकानी स्वत:च्या ताब्यात ठेवली होती व त्यात त्यान्चे फर्निचर ठेवले होते.. बाकी घर आमच्या हवाले.
तर रोज रात्री 2 ते 3च्या दरम्यान त्या वरच्या बन्द बेडरूममधून जोरजोरात फर्निचर सरकवण्याचे आवाज येत. आणि बाल्कनीत कोणी फ़िरत असल्याचा भास होई. बाकी इतर कसलाही त्रास नाही.

तुम्ही मज्जा म्हणून लीहाले आहे पण ह्या पृथ्वीवर असंख्य अशा घटना प्रसंग आहेत त्याचे उत्तर कोणाकडे नाही.
विज्ञान वादी म्हणजे संशोधक सांगतील त्या वर डोळे झाकून विश्वास ठेवणे नाही.

पहिला किस्सा भितीदायक आहे. भुताटकीचे स्पष्टीकरण तुम्हाला मान्य नव्हते तर पलंग फिरल्यासारखं वाटण्यामागे दुसरं काय स्पष्टीकरण असेल असं तुम्हाला वाटलं?

खोलीत प्रवेश केल्याकेल्या माझ्या सौ. ला आणि मेहुणीला नळाच्या तोटीचा शॉक लागला.>>> लिकेज करंट असला की असा शॉक लागतो.गिझर असतात तिथे हा अनुभव हमखास येतो. मी स्वतः घेतलाय. तुम्ही हॉटेल मालकाला हे सांगायला पाहिजे होतं. लिकेज करंट वाढला असता तर एखाद्याच्या जीवावर बेतलं असत हे प्रकरण.

घर मालकाला सांगितले तर त्यांनी मेहुणीला तिसरी खोली उघडून दिली. त्या खोलीत जाताच सर्व खिडक्या बंद असूनही छताला टांगलेले झुंबर हलत असल्याचे लक्षात आले. >>>> खिडक्या दारं बंद असलेल्या खोलीचा दरवाजा उघडला की खोलीत एक हवेचा दाब तयार होतो त्यामुळे ते झुंबर हललं असणार. हा अनुभवसुद्धा मी घेतलाय. आमच्या कंपनीच्या कॉन्फरन्सला दोन दरवाजे आहेत. एक उघडला की दुसरा दरवाजा हवेच्या दाबाने जोरात वाजतो.
बाकी तुम्हला जे भास झाले त्याबद्दल नो कमेंट्स.

रात्र झाली की ताटंवाट्यांचे आवाज सुरु होतात>>> उंदीर पकडायचा ग्लू पॅड स्वयंपाक खोलीत ठेवला असता तर हे आवाज कधीच बंद झाले असते.

आमचं अस्तित्व आहे. पण हे पलंग फिरवणे,भांडी वाजवणे असले चाळे आम्ही करत नाहीत. प्रत्येक गोष्टीचा संबंध आमच्याशी लावू नका.सगळ्यात महत्त्वाचे म्हणजे वरील पोस्ट बोकलतने लिहिलेली नाही. नाहीच राहवलं म्हणून मी लिहायला घेतली.
- तुमचाच एक भटका आत्मा.

थोडे अवांतर. काही दिवसांपूर्वी एका बागेत मुलांना घेउन गेलो असताना तिथे एक छोटे टेबल मांडून एक जोतिषी बसलेला होता. येणारेजाणारे त्याला हात दाखवून भविष्य विचारत होते. सहज गंमत म्हणून त्याला हात दाखवला तर त्याने माझ्या अशा गोष्टी सांगितल्या ज्या फक्त मलाच माहिती होत्या. फक्त चेहरा किंवा हात पाहून ते लोक कसेकाय ईतकी माहिती सांगत असतील?
काही जनरल बाबी सोडल्या तरी काही खासगी गोष्टी हे लोक कसेकाय बरोबर सांगतात? उदा. गेले वर्षभर मला झोपेचा प्राॅब्लेम येतो आहे. मला अलिकडे नेहमी वरचेवर वाईट स्वप्ने पडत आहेत हे त्याला कसे कळले असेल. कुणी यामागचे शास्त्र सांगेल का? (खरेतर यावर नविन धागा काढावा का? 'जोतिषाने सांगितलेले भविष्य कुणाकुणाचे खरे निघाले?' या नावाचा.)

वरील पोस्ट बोकलतने लिहिलेली नाही. नाहीच राहवलं म्हणून मी लिहायला घेतली.
- तुमचाच एक भटका आत्मा.
नवीन Submitted by बोकलत on 2 March, 2020 - 14:24

बोकलत यांच्या चाहत्यांची संख्या देखील नेमकी १३ च आहे हा योगायोग निश्चितच नसावा.

Submitted by बोकलत on 2 March, 2020 - 14:24>>>>> अरे ही कमेंट मी नाही टाकली. असो.
बाकी दोन्ही अनुभव खतरनाक आहेत.मला वाटतंय ते जखमी मालक मालकीण भूत असावेत. त्यांना पलंग शक्तिमानसारखा गोल गोल फिरवायला आवडत असेल. तुम्ही त्या रूममध्ये राहणार म्हटल्यावर त्यांचा प्लॅन फिस्कटला असेल. म्हणून जेवणात ते गुंगीचे औषध टाकून तुम्हाला आग्रह करत असतील. दुसरी शक्यता म्हणजे. लाईट गेलेले असल्याने फॅन बंद असेल आणि लाईट आल्यावर फॅन फिरतोय वाटण्याऐवजी बेड फिरतोय असं वाटलं असेल.

किती दिवसांनी अमानवीय किस्से वाचले, त्यासाठी धन्यवाद डॉक्टर, पण धाग्याला वेगळे नाव दिले असते तर काही उपद्रवी मानवी शक्ती इथे थोडया उशिराने आल्या असत्या.

डॉक्टर, खऱ्या आयडीने असे किस्से देण्याच्या धाडसाबद्दल अभिनंदन.

दुपारचे जेवण वगैरे करून आम्ही केवलादेव पक्षी अभयारण्यात पक्षी बघायला निघून गेलो.सूर्यास्तानंतर परत आलो. लॉज मालकाला छातीवर आणि मालकीणबाईंना डोक्यावर मोठमोठी बॅंडेज होती. बाईंचा अपघात झाला होता तर बुवांची हृदयाची ‘बायपास’ शस्त्रक्रिया झाली होती. >>> इथे थोडी गल्लत झाली असावी. इतक्या कमी वेळेत बायपास होऊन घरी कसे आले ते ?
अवांतर - for bird watching which power of binoculars you prefer ? 7,7.5 or 8 ? 7, 8, 8.5 ?

हम्म! डॉ इथेच चूकले. अँजिओवाला पण इतका लवकर घरी येत नाय. ( रौत पण दोन दिवस होते हास्पिटलात) समथिंग गडबड.

डॉक्टर आणि कुटुंबियांनी चेक इन केलं तेव्हा लॉजमालक आणि मालकिणबाई ठीक होते आणि हे लोक पक्षीनिरीक्षण करुन येईपर्यंत लगेच ते बायपास करुन आले आणि अपघात होऊन पट्टी करुन आले असं लिहिलेलं नाहीये.

<<<<<<<<दुपारचे जेवण वगैरे करून आम्ही केवलादेव पक्षी अभयारण्यात पक्षी बघायला निघून गेलो.

सूर्यास्तानंतर परत आलो. लॉज मालकाला छातीवर आणि मालकीणबाईंना डोक्यावर मोठमोठी बॅंडेज होती. बाईंचा अपघात झाला होता तर बुवांची हृदयाची ‘बायपास’ शस्त्रक्रिया झाली होती. >>>>>> सस्मित, अगं इथे गोंधळ नाही वाटत का? Uhoh

सूर्यास्तानंतर परत आलो. लॉज मालकाला छातीवर आणि मालकीणबाईंना डोक्यावर मोठमोठी बॅंडेज होती. बाईंचा अपघात झाला होता तर बुवांची हृदयाची ‘बायपास’ शस्त्रक्रिया झाली होती. वरच्या माळ्यावर पडून मालकीण बाईंचे डोके फुटले होते. एवढे असूनही दोघे आम्हाला आग्रहाने घरचे बनविलेले ‘आलूके पराठे’ खाऊ घालीत होते. >>>>>>>>>>>>>> हे कसे शक्य आहे ?? बायपास सर्जरी केली कि ड्रेसिंग केले?? म्हणजे नुसते कापून बघितले आत हृदय आहे कि नाही ??

इतक्या कमी वेळेत बायपास होऊन घरी कसे आले ते ? >> मला सुद्धा हा प्रश्न पडला होता. >>

मंडळी तो मालक म्हणजे साक्षात बोकलत होता .... Lol Lol Lol

डॉक्टर आणि कुटुंबियांनी चेक इन केलं तेव्हा लॉजमालक आणि मालकिणबाई ठीक होते आणि हे लोक पक्षीनिरीक्षण करुन येईपर्यंत लगेच ते बायपास करुन आले आणि अपघात होऊन पट्टी करुन आले असं लिहिलेलं नाहीये.

>>>> करेक्टेय... कायपण प्रश्न पड्तात लोकहो तुम्हाला Wink Lol

हा हा हा. वर बोकलत मालकानं गांजा टाकलेले आलू पराठे खाऊ घातले अन् त्यामुळे पलंग हवेत तरंगू लागले.

Pages