एकटीच @ North-East India दिवस - १४

Submitted by सुप्रिया राज जोशी on 28 February, 2020 - 01:18

अनुक्रमाणिका > https://www.maayboli.com/node/72984
अनुक्रमाणिका २ > https://www.maayboli.com/node/73598

19 फेब्रुवारी 2019
मयूर,

जरी गेले दोन दिवस पावसाने भिजवून टाकलेला निसर्ग बघून मी आनंदाने खिदळत होते तरी काझीरंगाला फिरायचे तेव्हा सूर्याने तोंड दाखवले तरच गेंड्याचे तोंड पहायला मिळेल असा एक समज झाल्यामुळे उद्याही पाउस पडेल का काय या विचाराने झोपी गेले आणि बाहेर पाऊस पडतोय की काय या प्रश्नाने अगदी पहाटे पहाटेच जाग आली. जाग आल्या आल्या खिडकीतून बाहेर पाहिले तो काय, सोनेरी ऊन बघून मेरी तो नींद भी खुल गयी और होशभी उड गये | पावसाने खरच आपल्यावर कृपाच केली.

सकाळी अनोळखी रस्ते धुंडाळताना कुतूहल म्हणून आपण इस्टर्न गेट जवळच्या हेरिटेज पार्क मध्ये शिरलो. आत शिरल्या शिरल्या रंगबिरंगी नजारा पाहून दिल खुश झाले. पारंपरिक पोशाखातल्या आसामी तरुणीही सारी माहिती हसऱ्या चेहऱ्याने द्यायला तत्पर असतात त्यामुळे बाग असो किंवा म्युझींअंम, नुसताच फेरफटका मारला जात नाही तर त्याचे रसग्रहण करता येते.
53145788_10156888632422778_4899233928570732544_n.jpg

म्युझींअम मध्ये सिल्कच्या धाग्यांना कोणत्या रंगाने रंगवायला काय काय वापरतात ते मला सर्वात आवडले.
53006192_10156888632882778_2907729907779895296_n.jpg53028710_10156888633012778_4098594901531295744_n.jpg

तू म्युझिअम मध्ये जास्त रमल्यासारखा वाटलास पण मी बागेच्या मोहात पडले. इथली झाडा पानांची विविधता आणि फुलांचे ताटवे पहात, त्यामाधून काढलेल्या छोट्या छोट्या ट्रेल्स मधून पक्षांची किलबिल ऐकत चालत रहायचे...
52582522_10156888633217778_4895822878429151232_n.jpg

तिथेच रेंगाळले होते तोवर आसामी फोक डान्स सुरू झाला. अरे? मी आजच सकाळी अशी लोकनृत्य मला पहायला आवडतात तेवढे मात्र राहिले असे म्हटले काय नि अचानक हे असं जुळून आलं, ते कस काय? आसाम सोडायच्या आधी आसामी कल्चर ची झलक पहायला मिळाली, आसाम पोटभर फिरून झाले, असे वाटले.

53071355_10156888633497778_1238006340043931648_n.jpg

काझीरंगाच्या चार गेट्स पैकी कुठून सफारी घ्यावी त्याबद्दल अनेकांची अनेक मत होती पण दोघांचे एकमत झाले तेवढे बरे! वेस्टन गेट वरून सफारी घ्यायची असे आपण ठरवले.
52602745_10156888633957778_7673140815845130240_n.jpg

इथे गेंडे तर पोटभर दिसले पण आपल्या पिल्लाच्या सुरक्षेसाठी तो गेंडा आपल्यावर हल्ला करायला धावून आला तो अनुभव एक नंबर! गेंड्याची नजर कमजोर असते पण माझ्या कपड्याचा लाल रंग त्याला दिसला, असं ड्रायव्हर म्हणतो. तो सांगत होता की अशा वेळेलाच खास व्हिडीओ घेता येतो, ते सारे खरे आहे आणि मी कॅमेरा सुरू केलाही होता पण त्या चवताळलेल्या गेंड्याचे रूप दिसले ते एवढे भयावह होते की स्वतः ला वाचवायला सावरून बसताना मोबाईल हातातून सटकला. तेवढ्यात ड्रायव्हरने आपल्या सुरक्षेसाठी जीप ही पुढे हलवली होती. कसला व्हिडीओ नि कसलं काय जीव मुठीत घेउन पळालो ते बरे! तेव्हाचा भीतीदायक अनुभव आता आठवला की मात्र हसू येत्ते. अभयारण्यात खूप सुंदर पक्षी बघता आले, कित्येक प्रकारची हरणं दिसली. काझीरंगा अभयारण्याला भेट द्यायचे माझे जूने स्वप्न, आज पुरे झाले.
आज तू गोहाटीला जायचं ठरवलस आणि मला शिलॉंग ला जायचं, म्हणजे जोरबाट कडून आपले रस्ते बदलणार. माझी गाडीची लक्झरी संपणार. पब्लिक ट्रान्स्पोर्टने डूगुडूगु वाटचाल होते. इथे तर साडे पाच नंतर अंधार पडायला सुरुवात होते तर एवढा लहानसा दिवस मी पुरवायचा कसा? बर तिथे संध्याकाळीच जोरबाट ला बस्तान मारायचे तर ते हि मन मानेना.

शिलॉंगसाठी पब्लिक ट्रान्सपोर्ट मिळेल की नाही अशी चलबिचल चालू असताना इकडून Audi तून उतरता तिकडून बस आली. काहीच न सुचून अंधार पडता पडता शिलॉंग ला जायला निघाले खरी पण अशी घाई गडबड झाली की तुझा नीट निरोपही घेतला नाही. म्हणून तुला पत्र लिहायला घेतले. तुझ्याबरोबर तीन दिवस प्रवास केला. आयुष्यातल्या कटू अनुभवांनी मन कधी इतके हिरमुसल्यासारखे होते की चांगुलपणावर भरवसा ठेवायला मागत नाही.

पण तुझ्यातले माणूसपण जसे पाहिले तसे स्वत:चे माणूसपण जोपासण्याची उम्मीद वाटू लागली. माझ्या हृदयातील प्रेम, करुणा, सहायता याचे रोपटे सुकून मारता मारता त्याला खत पाणी मिळाले असे म्हटले तरी ते समर्पक आहे. पुन्हा एकदा ते रोपटे फुलवायची प्रेरणा मिळाली. तुझ्या गाडीतून फिरायची ऐश झाली हे आहेच पण त्यापेक्षा या विचारांचा कायापालट झाला त्याबद्दल Thanks. दिल से!

शिलॉंग चा रस्ता निसर्गरम्य आहे म्हणतात, पण निघाले तेव्हाच अंधार पडला होता. मग बसमध्ये आजच्या दिवसाचे फोटो, व्हिडीओ पहाण्यात रमून गेले. शिलॉंगला पोहोचायला आठ वाजणार होते, पुढच्या एका दूरस्थ गावाला ज्याचे नाव उच्चारता सुध्दा येत नाही (Mawlynnong) तिथे जायचे असे ठरवले होते. त्या साठी लागलीच निघायची माझी तयारी होती पण मेघालय काळे का गोरे इतपतही माहिती नव्हती तसात एवढ्या रात्री संपूर्ण अनोळखी रस्त्यांनी प्रवास तरी कसा करायचा? पण एक गंमत झाली ...तुला आठवतय? आपण काझीरंगावरून निघालो तेव्हा मला कामाचा एक फोन आला होता? शेल्टर डॉन बोस्को चे फादर ग्रेगरी ज्यांच्याबरोबर मी काम केले आहे, तो त्यांचा फोन होता. बोलता बोलता मी शिलॉंग ला चालले आहे हे कळल्यावर त्यांनी स्वतः होऊन मला तिथच्या फादर चा नंबर दिला. त्यांच्याकडूनच पुढच्या प्रवासाची माहिती घ्यावी म्हणून त्यांना फोन काय जोडला तर मी न विचारता आणि मला न विचारताच, त्या रात्री मी शिलॉंगलाच रहायचे हा निर्णय त्यांनी घेउनही टाकला आणि तशी सारी सोयही केली.

बसमधून चर्चजवळ उतरले तेव्हाच मिट्ट अंधार पडला होता. दहा मिनिटे चालत St Anthony College कडे पोहोचले. त्या फादर ने मग मला सिस्टर्सच्या ताब्यात सोपवले. हॉस्टेलमध्ये स्नेहा च्या रूम मध्ये माझी व्यवस्था केली होती. रात्रीचे जेवण, आंघोळीसाठी गरम गरम पाणी, wifi ची चंगळ, मेघालयातील खासी कम्युनिटी बद्दल माहिती ... पुढची सारी मदत तिनेच केली.

52836994_10156888634177778_8057671050332209152_n.jpg52898327_10156888634272778_2628073862603997184_n.jpg52608981_10156888634327778_5096096408872681472_n.jpg

लवकर निघायचे म्हणून सकाळी सातला उठून गडबडीने निघाले तर रोजच्या सवयीप्रमाणे स्नेहा बाहेरून कडी लावून प्रार्थनेला गेली होती. मी आत अडकून पडले. दरवाजा खूप ठोकला मग काही उपाय नाही कळले तसे गपचूप पत्रलेखानाला सुरवात केली.
आज 20 फेब्रुवारी माझ्या लाडक्या भावाचा वाढदिवस आहे! आजच्या तारखेचे पत्र त्याला लिहीणार.

52993347_10156888634457778_5026439954956288000_n.jpg

तुला मात्र भाऊ म्हणू की मित्र म्हणू हा एक प्रश्नच आहे. पहिल्या दिवशीच मला तू बहीण मानलंस, खर तर प्रश्न तेव्हाच सुटायला हवा होता. पण कधीकधी गैरसमज टाळण्यासाठी मैत्री सुद्धा बहिणभावाच्या नात्याच्या धाग्याने गुंफली जाते. तसेही दोन्ही नात्यांमध्ये अंतर फारसे नाहीच. नावे वेगळी दिली आहेत, भावना त्याच असतात.

नाते जोडणे आणि नाते निभावणे या मध्ये खूप फरक आहे. मला स्वतःच्या बहिणीचा दर्जा दिलास पण तो राखलास हे महत्वाचे! तुझ्यासारखा भाऊ, मित्र सर्वांना मिळू दे.
तुझी बहीण, तुझी मैत्रीण
सुप्रिया

Group content visibility: 
Public - accessible to all site users

प्रत्येक भागातील काही वाक्य ही मनाला भावतात... जसं... कधीकधी गैरसमज टाळण्यासाठी मैत्री सुद्धा बहिणभावाच्या नात्याच्या धाग्याने गुंफली जाते....

पहील्या काही भागात काळजीपोटी (आणि येस! फक्त काळजिपोटी) टीका केलेली होती. पण आता जसजसे भाग वाचते आहे तसतसे तुम्ही स्वतःला व्यवस्थित , सांभाळत आहात, नीट हँडल करत आहात, हे कळून येते आहे व भाग अधिक एन्जॉय करता येत आहेत.
मनस्वी लेखन. आवडत आहे.

सामो, आई वडील आपल्याला ओरडतात ती टीका नाही काळजी असते हे आपल्याला एका वयानंतर कळलेले असते.
फक्त हे एवढे 'कल्चरल शोकस' बघून वाचक मला ओणवे उभे राहून आंगठे धरायला लावणार की काय (मागच्या एका प्रतीक्रीय्त कोणी तरी लिहिल्यासारखे) अशी धाकधूक होती. पण आता सर्वात मोठ्या पातळीवर समाजमान्यता नसलेले पत्र लिहून झाले आता ती ही धाकधूक संपली.
या अशा फोरम वर अनेक वाचकांना कल्चरल शॉक बसतोय तरीही खरे खरे लिहायचे ही ताकद मी कमावली हे खूप मोठे मिळाले - खरच!

मीच लिहीलं होतं.
माझ्या बाबांच्या शिस्तीत अनरिझर्वड् प्रवास बसत नाही. तुम्ही केलात तसल्या प्रवासाची कल्पना जरी मांडली तरी ते मला अंगठे धरुन उभं करतील.
तुमच्या कल्पनेचं आणि आत्मविश्वासाचं कौतुक.

वाचतेय.
तुमच्या एकंदर प्रवासाचा आणि साहसाचा अचंबा वाटतोय आणि धैर्याचे कौतुक!
फोटोतला चपलांचा जोड बघून प्रश्न पडला की अशा फारश्या सुखासीन नसलेल्या प्रवासासाठी थंडी - पावसात , डोंगराळ रस्त्यांवर या चपला पुरेश्या comfortable होत्या का ?

त्या चपला नाजूक नाहीत चंद्रा, खूप मजबूत आहेत. आणि खूप पूर्वीपासून मी ट्रिप्स मध्ये मी शहरातले रस्ते सोडले की अनवाणी फिरते. त्यामुळे थंडी - पावसा साठी , डोंगराळ रस्त्यासाठी पाय तयार झाले आहेत. आपल्याला वाटत फक्त त्रास होत असेल पण एकदा सवय झाली की अक्युप्रेशर ट्रीटमेंट होते. Lol