अनुक्रमाणिका > https://www.maayboli.com/node/72984
अनुक्रमाणिका २ > https://www.maayboli.com/node/73598
17th फेब्रुवारी 2019
ए आई,
आई, अग प्रवासाचं बाळकडू मला तूच दिलं आहेस. तू गोष्ट सांगायचीस की मी तान्ह बाळ असताना एका प्रवासात तू मला उसाचा रस पाजला होतास. दिवाळी नि उन्हाळी अशा दोन दोन सुट्याना धरून आपण केवढे फिरायचो! जवळ जवळ अख्खा भारत तुम्ही आम्हाला दाखवला आहे. हे North East मात्र फार रिमोट आहे म्हणून का काय पण राहून गेल. पपा अनेकदा तसं बोलूनही दाखवायचे. आता हा विषय निघाला तर तुमची आठवण येउ लागली.
ज्यांना मराठीत लिहिलेलं पत्र वाचताच येणार नाही, जे कोणी फेसबुक वर नाही, अशांना पत्र लिहिलं पण तुला पत्र लिहिताना कशी ती रुखरुख लागली आहे. याआधी तुला पत्र लिहायची वेळ कधी आलीच नाही. आपल्या ट्रीप मध्ये मी मुंबईतल्या माझ्या मैत्रिणीना पत्र लिहायची ती माझी पत्र वाचायला तुला आवडायची. माझे एकेक पत्र पोस्ट करण्याआधी तू सर्वांना वाचून दाखवायचीस. माझ्या पत्राचे माझ्या आईला कौतुक वाटते ह्यात मला सुख वाटायचे. आज पहिल्यांदा तुला पत्र लिहित आहे. मी जरी मोठ्ठ पत्र लिहीन, तुला ते कळल की तू कौतुकाने हसूनही दाखवशील. पण तुझ्याच मुलीने तुला पत्र लिहिलं आहे हे तुला कळलं असतं तर खूप बरं झालं असतं.
आज सकाळी मयूर बरोबर रोड ट्रिप साठी निघायचे होतं. सकाळी लवकरच निघता यावं म्हणून NH 27 हायवे वरच्या त्याच्या राहत्या हॉटेल मध्ये त्याने माझीही रात्रीपुरती रहायची सोय केली. असलं पॉश हॉटेल माझ्या बजेट बॅग पॅकिंग ट्रिप साठी जडच गेलं असतं. पण सारा खर्च मयूरने केला. "तू काळजी करू नकोस, तू मला बहिणीसारखी आहेस" हे वाक्य खूप धीर देणारं आहे. बऱ्याच शंका कुशंका पाठी टाकून कोणावर विश्वास टाकायची प्रेरणा देणारं आहे. एरव्ही कुणी पुरुष बरोबर प्रवास करणार ही माझ्या सुरक्षिततेची व्यवस्था असू शकते, नाहीतर तेच धोक्याचे कारणही ठरू शकते.
माझ्यासाठी विश्वास हा फक्त binary असतो, तो असतो किंवा तो नसतो. माझे नशिबच असे आहे की विश्वासाचे बांधलेले धागे घाताने आजवर तुटले गेले नाहीत. म्हणूनच आजही एकेका धाडसाची सुरवात मला संपूर्ण विश्वास ठेऊन करता येते.
या प्रवासाची एक गंमत सांगते. अंघोळ झाल्यावर अंग पुसायला मी माझ्या सामानात टॉवेल भरलाच नव्हता. उचलायला समान जड नसावे, म्हणून किडे सुचले तसे केले! एक चौरस आकाराचा हातरुमाल भरला होता. अगदी बर्फाचा पाउस पडत होता त्या सिक्कीम मध्ये सुद्धा, न्हायल्यावर माझ्या रुमालाला एका दमात झेपतील तेवढे थेंब थेंब तो टिपून घ्यायचा मग गारठलेल्या हाताने पुन्हा पुन्हा पिळत पिळत मी त्याला टोवेल चे पार पाडायला वापरायचे. पण आज ह्या पॉश हॉटेलचा थाट बघून मी थोडी चेकाळले. इतकी मोठी अंघोळ केली की काळवंडलेला माझा चेहेरा आज चमकायला लागला. शाळेतल्या एका मित्राने माझा फोटो पाहून विचारले सुद्धा की, ये सुंदरता का राज क्या है?
दुसऱ्या दिवशी भटपेट फुकट ब्रेकफास्ट करून मी रोड ट्रिप साठी निघाले. NH 27 चा हा stretch खूप सुंदर आहे. गाडी चालवणाऱ्याला सिमेंटच्या रोड वर ड्राइव्ह करायला आवडेलच, पण बाजूच्या सीट वरच्या प्रवाशासाला आसामची घरं, शेती, जनजीवन याची झकास झलक अनुभवता येते. वाकड्या तिकड्या रेषांनी रेखलेली अक्षरे तेवढी वाचता येत नाहीत. अनेकदा त्यांचे भाषांतरही नसते. दुपारी आम्ही आसामी लोकल जेवण जेवलो. त्या थाळीत भात, अनेक प्रकारच्या चटण्या, पापड आणि 13 वाट्या होत्या. साऱ्या भाज्या तिथेच पिकवलेल्या आणि कुठचेही मसाले न घालता बनवलेल्या होत्या. एक थाळी दोघांना पुरून उरली. 100 रुपयांत दोघांचे पोटभर जेवण झाले.
गोहाटी पासून 345 किलोमीटर पण ब्राम्हपुत्रेच्याच काठी जोरहट जवळ निमची घाटावरून फेरी सुटते. ही माजोली या जगातील सर्वात मोठ्या रिव्हर आयलंड वर घेऊन जाते. भारतभूमी वरची एकच नदी masculine आहे...ती ब्रम्हपुत्रा नदी! विश्वास तरी बसेल? ... की या नदीच्या पोटात जवळपास 900 स्क्वेअर किलोमीटर भूप्रदेश असेल? पण ज्या नदीने जोपासायचे त्याच नदीने बुडवले तर वाचवणार कोण? ब्रम्हपुत्रेच्या पूराने माजोलीचे जनजीवनाला तडाखे बसलेच पण या आयलँडचे मोठ्या प्रमाणात इरोजनही होत आहे. अजून काहीच वर्षात एवढे मोठे आयलंड गडप होण्याची दाट शक्यता आहे.
नदीच्या पोटात माजोली ला घेऊन जाणारी फेरी प्रवाशांबरोबर गाड्या ही घेऊन जाते. या गाड्या वर गाड्या कशा चढवतात तो जुगाड बघण्यासारखा आहेच पण एवढे दिव्य पार पाडल्यावर त्या तराफ्यावर गाड्या कशा उभ्या करतात ते तर निव्वळ कल्पनेपलिकडचे! मयुरची 4 wheel Audi चाकांपुढे दगड-विटा अडकवून एका लाकडी तराफ्यावर उभी केली होती ज्याला कुठच्याच बाजूने कठडाच नव्हता. तराफ्याची साईझ आणि गाडीची साईझ यात फार फरक नसावा. गाडीच्या पुढे 2 इंच नि पाठी 2 इंच एवढेच काय ते मार्जीन! मयूरच्या चेहेरयावर गाडीची काळजी साफ दिसत होती नि त्यात एक जण म्हणाला 'आप आराम से गाडी के अंदर बैठ जाइये।' ... हे भगवान!
फेरी वरून जाताना सुंदर सूर्यास्त पहाता आला. सहा वाजता माजोली ला उतरलो तोवर अंधार पडला. मयूर ला कॅश काढायची म्हणून तो ATM पहाताच उतरला तर तिथे लिहिले 'closes at 5 pm'
अंधाराने संध्याकाळच्या वेळीच माजोलीचा कब्जा घेतला होता. लहान लहान रस्त्यावरून रात्रीसाठी निवारा शोधत गाडी वात काढत चालली होती. धुवाधार पाउस चालू होता. गारठवून टाकणारी थंडी पडली होती. इथे एकीकडे जिथे सर्वसाधारण रहायची सोय झाली तिथेच आम्ही रहायचे ठरवले. रात्री बॉन फायर जवळ इतर प्रवासी जमले तशा छान गप्पा रंगल्या.
पोटभर गरमागरम जेवण जसे पोटात गेले झोप अनावर होऊ लागली तशी गुडनाईट करून मी उठले. बांबूच्या झोपडीत दोन दोन जाड ब्लॅंकेट्स मध्ये घुसले, तशीच शांत गाढ झोप लागून गेली. आजच्या दिवसाच्या ट्रिप च्या आठवणी लिहून पाठवत आहे खरी. तुझ्याच मुलीने पत्र लिहिले हे लक्षात आले नाही तरी सुप्रियाने तुला पत्र लिहिले आहे असे कळल्यावर तुला हसू येईल तुला, कसे ते माझ्या डोळ्यासमोर येते आहे.
तुझीच
सुप्रिया.
चांगला झालाय हाही भाग
चांगला झालाय हाही भाग
छान झाला आहे हा पण भाग....
छान झाला आहे हा पण भाग....
अवांतर- 100 रुपयात एवढं सगळं.... वाह्ह...
वाचते आहे.. सगळे भाग आवडलेत,
वाचते आहे.. सगळे भाग आवडलेत, व्हिडिओ सुद्धा.
Chhaan!
Chhaan!
मुशाफिरी या शब्दाचा अर्थ अगदी
मुशाफिरी या शब्दाचा अर्थ अगदी पूर्णपणे अनुभास येतो आहे .
हा नुसता भूप्रदेशाचा प्रवास नाहिये..नात्यांच्या गोतावळ्याला मनात बरोबर घेऊन सार जग त्या सगळ्यांच्या डोळ्यांसाठी शब्दात पकडता आहात.