अनुक्रमाणिका > https://www.maayboli.com/node/72984
अनुक्रमाणिका २ > https://www.maayboli.com/node/73598
मायबोली वाचकांसाठी,
तुम्ही प्रोत्साहन दिले आहेच पण वेळ आणि इच्छा कमी पडते म्हणून लेखनात खंड पडला. पुन्हा एकदा लेखन सुरु करायचे म्हणजे मोठा पुश लागतो तो मला मेसेज पाठवून रात्रीचे चांदणे ने दिला म्हणून हा लेख संदीप या मेम्बर ला समर्पित करत आहे.
15 फेब्रुवारी 2017
प्रिय Poo,
(तुला मराठी कळत नाही म्हणून काय अर्थ बदलत नाही. माझ्या सुप्रिया अशा नावाचे जसे तू सु केलेस तसेच मी ही Pooja या तुझ्या नावाचे Poo केले)
निघायच्या आदल्या रात्री पोस्टकार्ड वर लिहून केवढं गोड पत्र दिलंस आणि त्यात ही गळ घातलीस की, पत्राचं उत्तर लिही. एकदा घरी परतल्यावर पत्र लिहिण्यासाठी कारण आणि वेळ नाही सापडणार म्हणून या श्रुंखलेतले पुढचे पत्र तुलाच लिहायचे ठरवले.
तू फेसबुक वर नाहीस म्हणजे तुला टॅग करता येणार नाही आणि म्हणजे तुला पत्र मिळणार सुद्धा नाही. पण तुला सांगावेसे वाटेल ते लिहून झालं की वाचून रेकॉर्ड करेन नि wa वर पाठवेन. तरीही तुला कळायचे वांदेच आहेत. तो आपला रिक्षावाला हिंदीतून तीस रुपये सांगत होता तर तुला ते इंग्लीशमधले forty वाटले, ही तुझी अवस्था आहे.
आपण सिलिगुडी पासून NJP रेल्वे स्टेशन साठी धुळकट्ट गर्दीतून दबूड घुबुड आवाज काढत चालणाऱ्या त्या रिक्षाने निघालो. माझी दुपारी दिडची राजधानी चुकली त्यात काहीच नवल नाही.
एरव्ही उशिरा पोहोचल्यामुळे ट्रेन वगैरे चुकली तर माझे मानसिक संतुलनच बिघडून जाते, पण या ट्रिप मध्ये सारे चालते. कारण ट्रीपमधला एकेक अनुभव हा आनंद किंवा दु:ख यापैकी काहीच देत नाही, निव्वळ अनुभव मात्र देतोय, त्यामुळे त्याच्याबद्दल आसक्ती किंवा द्वेष दोन्ही वाटत नाही. अशी ट्रीप करताना शरीराबरोबर मन सुद्धा प्रवास करते आहे, chaos मधून clarity कडे, अपेक्षेमधून निरपेक्षते कडे, एकटेपणा कडून पूर्णतेकडे! पण NJP हून गोहातीला जायचे म्हणजे नुसतीच फिलोसोफी झाडून होणार नाही.आपण तिकीट विंडो वर जाऊन जनरल बोगी चे तिकीट काढले आणि दोन वाजता कुठलीशी पसेंजर ट्रेन आली. तुला गुडबाय ची मिठी मारली आणि ट्रेन मध्ये चढले. ज्या ट्रेन चे धड नाव सुद्ध माहीत नाही त्या ट्रेन मध्ये बसून गोहाटी कडे माझा प्रवास सुरु झाला.
जनरल बोगी कुठे असते ते माहीत नव्हते पण ती कशी असेल याची मी कल्पना करू शकत होते. मग मी स्लीपर कोच मध्येच एका रिकाम्या सीट वर बसले. सीट कसली अख्खा स्लीपर रिकामा होता. नंतर टीसी आला, तशी त्याने या सीट वर अनऑफीशिअली बसायची ऑफिशियल परवानगी दिली. जरी सहप्रवासी यथातथाच होते तरी ऐसपैस बसायला मिळाले म्हणून मी सुखावले.
निसर्गाचा नजरा साफ साफ बदलला होता. सिक्कीमला एकेका वळणावर आपण भारावून बघत रहायचो ते डोंगर नद्यांचे नजारे आठवणीत होते नि वास्तवात गाडी शेतमैदानामधल्या ट्रॅकवरून सरळसोट पळत होती.
ट्रेनचा गोहाटी ला पोहोचायचा निर्धारित टाईम माहीत नाही, पण दहा तास प्रवास केल्यावर जेव्हा गोहाटी ला उतरून पुढे काय करायचे याचा अंदाज घेत मी पलातफोर्म वर फिरत होते तेव्हा रात्रीचे साडेबारा वाजून गेले होते. मला ट्रेन मध्ये सीटची व्यवस्था करून दिली होती तोच टीसी भेटला. आता टीसी चे चेहरे कोण कशाला लक्षात ठेवेल? शिवाय हा तर कोट उतरवल्यावर स्वतः च आम प्रवासी दिसत होता. मी त्याला ओळखलेच नाही यात नवल नाही, पण नवल म्हणजे स्टेशन वरच्या एवढ्या गर्दीतून त्याने मात्र मला बरोबर हुडकले. इथे गोहाटी स्टेशन वर सुद्धा त्याची खूप मदत झाली. त्यानेच मला वेटिंगरूम दाखवली. अनोळखी शहरात, अपरात्री काही मदत लागल्यास स्वतः चा नंबर दिला.
'गुडबाय सिक्कीम' चा फक्त तीनएक मिनिटांचा व्हिडिओ बनवायला मला किती वेळ लागला असेल?...एक अख्खी रात्र! पण अमेरिकेचा 14 फेब्रुवारी संपायच्या आत मालविकाला लिहिलेल्या पत्राला जोडून पाठवायचा म्हणून मी झोपलेच नाही. सकाळी बेवड्यागत परिस्थिती झाली. डोळे बंद होत होतयत. डावा खांदा अवघडल्यामुळे जोरात दुखतोय, अनोळखी शहरात कुठे रहायचे त्याचा पत्ता नाही ... नाही म्हणायला दिवस उजाडत होता हे नशीब समजायचे.
तुला माझी काळजी वाटत असेल हे मला कळते. म्हणूनच तू सकाळी सकाळी मेसेज करून मी कुठे नि कशी आहे हे विचारत होतीस तेव्हा मी उत्तर द्यायचे टाळले. तोवर माझी काहीही धड सोय झाली नव्हती आणि मला तुझी काळजी वाढवायची नव्हती. व्हॅलेंटाईन्स डे च्या कारणाने असेल कदाचित, पण जिथे जिथे चौकशी केली तिथे कुठेच जागा रिकामी नव्हती. दुखऱ्या खांद्याची वेदना सहन करतच समान पाठीवर लटकवले नि पलटन बाजार ला फेरफटका मारून आले. तिथेही कुठे सुरक्षित रहायची सोय होऊ शकेल असे नाही वाटले.
कुणाला वाटेल, दूरस्थ LOC वर एकटी फिरलेली मी गोहाटी सारख्या शहरात मात्र सुरक्षिततेच्या गोष्टी का करते? खर सांगू, मोठी मोठी शहरंच आहेत जिथली माणसे मुखवटे लावून फिरत असतात. दूरस्थ गावात त्या मानाने निर्मळ मनाची माणसे भेटतात. निदान माझा तरी असा अनुभव आहे.
कितीतरी तास प्रयत्न करून झाले. दरम्यान कौच सर्फिंग च्या फ्रेंड्स ना ही विचारून संपले. जवळपास आठ च्या आसपास कायलीपाडा एरिया मध्ये एक होम स्टे सापडला. सामान उचलून निघाले तर नॉर्थ इंडियन रेल्वे स्टेशन वर साऊथ इंडियन ब्रेकफास्ट चा स्टौल दिसला. मला मज्जाच वाटली. तिथेच इडलीवडाचा ब्रेकफास्ट करून घेतला.
"स्टेफिज् नेस्ट" ला पोहोचेपर्यंत खूप गळून गेले होते. अंघोळ अटपायला म्हणून गेले तेव्हा कळले माझे पिरिएड्स सुरू झाले होते. सारे कपडे धुवावे लागले. आता आणखी कुठवर ताणून धरायचे? मग मी ताणून दिले. रात्रीचा दिवस केला होता, दिवसाची रात्र करूया. पुढचे पुढे पाहून घेऊ. पण काहीच मिनिटे डोळा लागला असेल की मून (माझी होस्ट) ने मला चहा प्यायला बोलावले. मी खरतर चहा पीत नाही, त्या अवस्थेत काय तिने दिले ते मी तोंडाला लावले. आयुष्यात पहिल्यांदा साय आलेला चहा घटाघटा घशात ठोसला आणि एक्स्क्यूज मी म्हणून पुन्हा बेडरूम मध्ये पळाले. पण तेवढ्यानेही झोप रुसली. मग मी ही म्हटलं "तेल लावत जा" सरळ उठून बसले. मोबाईलवर टपाटप पत्र लिहून पूर्ण केलेच शिवाय पुढच्या प्रवासाचा ढोबळ प्लॅन करावा म्हणून wifi मध्ये जी घुसले ती दुपार होईस्तोवर तिथेच हरवले. पोतडी भरून संत्री जवळ आहेत तर दुपारी जेवायची काही चिंताच नाही.
आता संध्याकाळ होऊ घातली आहे. गोहाटी जर फिरून यावे. फिरायचे म्हणजे प्रेक्षणीय स्थळांना भेट नाही द्यायची पण जिथे इथच्या लोकांची वर्दळ असेल तिथे जायचे. प्रवाशाला कुठच्याही अनोळखी जागेबरोबर ओळख वाढवायची तर सुरवात तिथूनच करावी लागते. गोहाटी?...पलटण बाजार ...और क्या?
तुझी गँगटोक ची हॉस्टेल मेट
सु
दूरस्थ गावात त्या मानाने
दूरस्थ गावात त्या मानाने निर्मळ मनाची माणसे भेटतात. +१