फासेपारधी – विद्युत तारेने शिकार

Submitted by Dr Raju Kasambe on 5 February, 2020 - 02:52

फासेपारधी – विद्युत तारेने शिकार

माझं नाव विमान्या पवार. वाघरी म्हणा, पारधी म्हणा नाही तर फासेपारधी. बारावी पास. नोकरी नाही. आमच्या बेड्या वरचा सर्वात जास्त शिकलेला पोट्टा आहे मी. माझ्या मायची डिलीवरी होऊन राह्यली होती तेव्हा आकाशातुन विमान चाललं होत. म्हणूनशान माह्या बुढ्यानं माह्य नाव ठेवलं विमान्या !

आमचा बेडा अमरावती आणि यवतमाळ जिल्ह्यांच्या मधोमध आहे. एकिकडे नांदगाव खंडेश्वर आणि दुसरीकडे नेर परसोपंत. वस्ती तशी लहानशीच आहे. माळरानावर. तिथे सहजा सहजी कुणी फिरकत नाही. पण माझं नाव कुणाला सांगू नका.

तुम्ही जे पेपरात वाचलं ना पोलीसांचा गोळीबार - दोन पारधी ठार. ती खूप लांब स्टोरी आहे. पण तुम्ही माझं नाव कुणाला सांगू नका.
एक दीड वर्षाआधी नेरच्या तिकडे इलेकट्रीसिटीचे काम चालू होते. तेव्हा मी आणि आणखी चार जणांनी मिळून दीड दोन मैलांची विद्युत तार उडवली. रातोरात तारांचे बंडल नांदगावला आणून जंगलात लपवून टाकले. एमएसईबीवाले आणि पोलिसांना पत्ता लागला नाही. तार असा लपवून ठेवला होता की बास. ढुंढते रहे जायेंगे. सापडणार नाही.

सहा एक महिने गेल्यानंतर ठरलं. ह्या तारांचा उपयोग करायचा. तारांनी शिकार करायची. मी सर्वांना बोललो 'धोका आहे’.
पण माझ्या इशार्‍याकडे कुणी लक्ष दिले नाही. त्या रात्री आम्ही सहाजण होतो. आम्ही प्रथम फक्त एक सावर (सरळ खांब) घेऊन जंगलाकडे गेलो. लपवून ठेवलेल्या तारा काढल्या. आमच्या इकडचं जंगल म्हणजे झुडूपी माळरान. पहिले तार पसरवून घेतली. खूपच लांब तार होती. कुठल्या कुठे लांबली. अशी तार अंथरून झाली की त्याच्या एका टोकाचा आकडा (हुक) केला. तो सावरीला लावला. असे सर्व जण मिळून हातभार लावत होते.
तो आकडा जंगलातून जाणाऱ्या पॉवरलाईन वर टाकत होतो. माझ्या मनात एकच दिसत होतो ते म्हणजे खांबावरचा बोर्ड ‘सावधान 13000 व्होल्ट्स! खतरा! डेंजर!’ मला वाटत होतं याच्यात धोका आहे. ह्यापेक्षा फास्याने केलेली शिकार परवडली. जनावर जिवंत तरी हाती लागते. मी असा विचारच करत होतो तेवढ्यात एकदम स्फोट झाल्यासारखा आवाज झाला आणि माझ्यासमोरच आगीचा गोळा उठून उजेड पडला. माझ्या सोबतचे दोन गडी करंट लागून उभे पेटले. एका मिनिटात खेळ खल्लास झाला. त्यांचे शरीर भट्टीवर जिवंत डुक्कर भाजल्या प्रमाणे काळे ठिक्कर पडले होते. माझा काका नरेंद्र पवार आणि माझा दोस्त रामदास चव्हाण जागेवरच मेले. मी धावत जाऊन बेड्यावर सांगितलं. तसा सगळा बेडा धाऊन आला. गाजावाजा व्हायला नको नाहीतर सगळे अंदर होऊ. चुपचाप आम्ही त्यांचे अंत्यसंस्कार निपटले. बेड्याच्या बाहेर कोणालाही खबर जाऊ दिली नाही. बायकांनी खूप आकांत-तांडव केले. शिकार करायला गेलेले पारधी यापूर्वी कधीच स्वतः शिकार झाले नव्हते. माझ्या आजोबांनी तर रातोरात वाघ-बिबट मारून आणले होते. पण अंगाला कधी लागलं नव्हतं.

त्या रात्री काय चूक झाली ते कुणालाच कळत नव्हतं. तार गुंडाळून तशीच लपवून ठेवून दिलेली होती. आता ताराने शिकार करायची म्हटलं का म्हातारे-कोतारे पुढे खूप डाफरत होते. खराब खराब शिव्या देत होते.

‘तुमच्यात शिकारीचा दम नाही. असा जंबियाने रान डुक्कर मारावा लागतो. तीन-चार मर्द भेटले, भिडले तर कुठलं जनावर भारी पडत नाही; आणि तुम्ही चालले इलेक्ट्रिकनी शिकार करायला; आणि स्वतःच खल्लास! व्वा रे शिकारी. म्हणे आम्ही फासेपारधी आहोत. थुत तुमच्या जिंदगीवर!’

बुढया माणसांचे असे टोचून बोलणे दररोजचेच झाले होते. तशी आम्ही शिकार करतच होतो. पण चुटपुट. एखादे हरणाचे पिल्लू, ससा, तीतर, बटेर असे काहीतरी. नाही तर शहरातली दोन तीन डुकरं जिवंत पकडून आणायची. त्यांना भट्टीवर जिवंतच उलट टांगायचं. चांगलं मरेपर्यंत शिजू द्यायचं आणि मगच खायचं. खूपच निबर (चिवट) असते त्याचे मांस.

एखादे वर्ष उलटल्यावर जुनी गोष्ट सगळे जण विसरून गेले. त्या तारांचा उपयोग कसा करायचा याचा विचार डोक्यात येत होता. पण भीती सुद्धा वाटत होती. मग चार-पाच डोकी जमली. आता जुनी चूक करायची नाही. ‘विमान्या तू शिकलेला आहेस. तूच सांग कसं करायचं.’ ते सगळेजण म्हणू लागले.

नांदगावला माझ्या शाळेतल्या दोस्तानं इलेक्ट्रिकचे दुकान लावले होते. मी त्याच्याकडे तीन-चार चकरा मारल्या. हा इलेक्ट्रिकचा शॉक कसा लागतो ते मी त्याला विचारलं. खरे तर शॉक लागू नये म्हणून काय करावे लागते त्याचाच मला प्रश्न पडला होता. लवकरच ते इलेक्ट्रिसिटीचे गणित मला समजले. पण मनात धाकधूक असतेच माणसाच्या.

मागच्या वेळेस केलेली चूक आता आम्ही केली नाही. शेती वाडीत इलेक्ट्रिसिटी पुरवठा असतो ना, त्या तारांवर आम्ही यावेळेस आकडा टाकला. आकडा टाकणार्‍याच्या पायात बूट होते आणि तो लाकडाच्या फळीवर उभा होता. माझ्या दिमाखाप्रमाणे मी सगळ्यांना काम कसं करायचं ते सांगितलं होतं. त्यांनी पण ते ऐकलं. तपासून झाल्यावर केवळ एकाने आकडा टाकला, तेव्हा सगळेजण दूर होतो. रात्री घरी आलो. रामप्रहरी आम्ही वापस जाऊन बघितलं. माझ्या बुद्धीने काम झालं होतं. तारेवर दोन हरणं मरून पडली होती. तार गुंडाळून ठेवून शिकार घरी घेऊन आलो. म्हातारे-कोतारे जास्तच भीत होते. पण हरणाचे लुसलुशीत मटन खाऊन ढेकर दिल्यावर त्यांनी सुद्धा माझी पाठ थोपटली.

माझे आजोबा मला म्हणत.

‘ईमान्या लेका, शहरात तुला नोकरी लागली तर तू चमकशील’.

त्यांना वाटायचे की मी बारावी पास आहे म्हणजे खुपच चार पाच डिग्र्या घेतल्या. पण शहरात बारावी पासवाले झाडू मारतात हे त्यांना कोण सांगणार?

तर ह्या इलेक्ट्रीकच्या तारांची खूप प्रसिद्धी झाली. पण तोंडो तोंडी. कुणी जोरात बोलायचं नाही. ह्या परिसरातील पीक घेणाऱ्या शेतकऱ्यांना हरणांचा, रोहयांचा (निल गाईंचा) आणि रानडुकरांचा खूप त्रास आहे. त्यांनी मग हे सर्रास चालू केले. सुरुवातीला कास्तकारांनी वर्तमानपत्रात बोंबा मारून बघितल्या. आता हरिण आणि रोही काय वनविभागाचे नोकर आहेत काय? की वन विभागवाले म्हणतात म्हणून शेतात घुसायचं नाही? शेतकऱ्यांच्या तक्रारी ऐकून ऐकून त्यांचे पण कान किटले. ते आता स्वतःच बारीक मध्ये बोलायला लागले,

‘तुम्ही तुमचं तिकडे काहीही करा, पण प्रकरण माझ्यापर्यंत आलं नाही पाहिजे. नाहीतर मला कायदेशीर कारवाई करावी लागेल.'

लोकं सुद्धा आता फॉरेस्टवाल्यांच्या बंगल्यावर कोंबडी, दारूचा फव्वा (पावटी) पोचवून देतात. सोबत हरणाचं, रानडुकराचं मटन पडल्यावर त्याचासुद्धा हिस्सा त्यांना देतात. ह्याला विज्ञानात ‘सहजीवन’ म्हणतात.

पण आम्ही पडलो शिकारी जरा कुठे खाटखुट झालं की हे पोलीसवाले पहिले आम्हाला अंदर टाकतात. कित्येकदा तर आम्हाला हेच माहिती नसते की आज आपण काय गुन्हा केलाय. मग आत टाकल्यावर आमच्या माय बहिणी कुणी जेलात भेटायला आल्या की बस. ह्या पोलिसांच्या नजरा आणि बोलणं एखाद्या बलात्कार करणाऱ्या पेक्षा सुद्धा खराब. पण कायदे कानून ह्यांच्या हाती आहे. काही बोलायची सोय नाही.

असेच दिवस जात होते. आम्हाला जंगलातलं प्रत्येक जनावर खायला मिळालं. हरीण, रोही, लांडगा, कोल्हा, बिलाडो (रानमंजर), ससा सगळं. एक दिवस तरस मरून पडला होता. पण आम्ही त्याला खात नसतो. त्याला जंगलातच गाडून टाकला.

आणखी एक दिवस खूप अघटीत घडलं. मी जंगलात फिरायला जात होतो. तेव्हा चकवी चांडव्याचं (गव्हाणी घुबड - Barn Owl) तोंड दिसलं होतं. पण माझ्या कमरेला खवल्या मांजराचं खवलं बांधून ठेवलं आहे. म्हणून मला काही भीती नव्हती. तार अंथरूण आकडा टाकला. घरी येऊन झोपलो. सकाळीच शिकार आणायला जाणार होतो. रात्री मन शांत नव्हतं. सकाळी जंगलात गेलो तर तिकडे रस्त्यांने खूप गर्दी दिसली. मला वाटले कोणी माणूस तारांवर मेला की काय. त्याचं असं झालं की जंगल रस्त्याने एक बैलबंडी समोर जुंपलेले दोन बैल आणि मागे दोन बैल असे तिकडच्या खेड्यावर जात होते. पण अंधारात एका मिनिटात समोरचे दोन बैल शॉक लागून गेले. बरं झालं बैलबंडी जागेवरच थांबली. नाहीतर बैलबंडीतले तिन्ही गडी जागेवरच गारद झाले असते. त्या तीन गड्यांनी बैलबंडी वळवून पोलीस ठाण्यात जाऊन बोंब मारली. सकाळी सगळे लोक आणि आम्ही एकाच वेळेस जंगलाकडे निघालो होतो. लोकांनी तारांचा आमचा आकडा काढून घेतला होता. आम्ही मात्र जंगलात धूम ठोकली. मी तर माझ्या कमरेचा खवलं धरून झुडपात लपून बसलो.

नेहमीप्रमाणे पोलीस आमच्या बेड्यावर आले. माझे मित्र घरी पोहोचले होतेच. म्हणून सगळी पुरुष मंडळी झोपड्यांमध्ये लपून बसले. बायका समोर गेल्या. पोलिसांनी दम भरायला सुरुवात केली. कुठल्यातरी पोलिसाने माझ्या आईला मारायला दांडा उगारला. तशी ती शिव्या शाप द्यायला लागली. मग बाकीच्या बायकांनी सुस्ती केली नाही. जे हातात येईल ते पोलिसांना फेकून मारायला सुरुवात केली. दोन-चार खोपड्या फुटल्या तेव्हा कुठे ते ढुंगणाला पाय लावून पळाले.

दुपार झाली तशा तीन-चार लॉरी पोलिसांनी खचाखच भरून आमच्या बेड्या समोर थांबल्या. समोर मोठ्या लोखंडाच्या जाळ्या, डोक्यावर लोखंडी हेल्मेट आणि हातात बंदुका. जणूकाही लढाईच आहे अशा तयारीने पोलिस आले होते.
कोणीतरी मोठा साहेब भोंग्यातून बोंबलला.

‘रात्री इलेक्ट्रिकच्या करंटची तार जंगलात अंथरून ठेवणाऱ्यानी पोलिसांसमोर शरण यावे’.

तो हे खूपदा बोंबलला. बेड्यावरच्या बायका तेवढ्या पोलिसांना दिसल्या. म्हातारे-कोतारे कुणी पुरुष समोर आले नाही. पोलीस समोर यायला लागले. तसा बायकांनी शिव्या आणि दगड धोंड्याचा मारा चालू केला. त्या ढेरपोट्या साहेबांनी बंदुकीची गोळी हवेत चालवली. तसे लपलेली पुरुष मंडळी धावून समोर आली. ढेरपोट्या साहेबांनी गोळ्या झाडून माझा काका आणि माझा बालपणीचा मित्र मारून टाकला. त्याच्या आईची.....

गावातील जी बायका माणसं हाती लागतील त्यांना उचलून त्यांनी गाडीत भरून घेऊन गेले. पोलीस स्टेशनमध्ये मग त्यांनी आमच्या लोकांना ढोरावानी मारलं.
'गुन्हा कबुल करा. मग मारत नाही. या कबुली जबाबावर अंगठा टेकवा.'

दोन-तीन दिवस मी फरार होतो. कंबरेच्या खवल्यानेच मला वाचवले होते. अंदर गेलेल्या पैकी कोणीही दुसऱ्याचे नाव सांगितले नाही. स्वतःच ढोरा सारखे मार खात राहिले.

नांदगावला मी वर्तमानपत्रात वाचलं की पारध्यानी केलेल्या प्रचंड दगडफेकीत दहा पोलीस आणि एक इन्स्पेक्टर जखमी झाले होते. प्रत्युत्तरादाखल का काय म्हणतात त्यासाठी केलेल्या गोळीबारात दोन आरोपी ठार अशा बातम्या छापून आल्या होत्या.

‘देवा खंडोबा हे कुठले जगणे तू आम्हाला दिलंस? जो आमचा रोजीरोटीचा मार्ग तोच बेकायदेशीर करून टाकला? आमच्यासारख्या वाघरीनी (पारध्यानी) खांद्यावर फासे नाही तर काय घेऊन जंगलात जावे? तू सुद्धा आता आमचा रखवाला नाही राहिलास काय?’

पूर्वप्रसिद्धी: दैनिक लोकमत. मंथन पुरवणी. रविवार दिनांक २५ ऑगस्ट २००२.

डॉ. राजू कसंबे, मुंबई

Group content visibility: 
Use group defaults

मी हा लेख दुपारी प्रवासात वाचला होता आणि आधीचे तुमचे लेख वाचले आहेत.
कृत्रिमपणाचा गंध तुमच्या लिखाणात नाही, जे आहे ते आहे आणि असेच असते हे पटवण्याचा अट्टाहास सुध्दा नाही.
तुम्ही जे लेख आणि तुमचे अनुभव इथे मांडत आहात त्यामुळे भारतातील/महाराष्ट्रातील लोकजीवनाचा वेगळा पैलू आम्हा वाचकांना लाभतो.
आम्हा वाचकांना तुमचे हे अनुभव आणि त्याचबरोबर समाजमन समजून आले तरी खुप .

कृत्रिमपणाचा गंध तुमच्या लिखाणात नाही, जे आहे ते आहे आणि असेच असते हे पटवण्याचा अट्टाहास सुध्दा नाही.>>>
+1000
तुमचे लिखाण वाचले की वनमहर्षि श्री मारुती चितमपल्ली यांच्या लिखाणाची आठवण झाली

चितमपल्ली शी तुलना करून तुम्ही त्यांचा उपमर्द करत आहात.
सन्मान नाही.
नवीन Submitted by Rajesh188 on 5 February, 2020 - 10:58
>> हसावं की रडावे? राजेश ची बुध्दी खुंटलेली आहे.

स्वतः लेखक सुधा मान्य करतील.
कथित अरुण कुमार(तू स्त्री झालास पुरुष झालास नक्की तुलाच माहीत नाही तू स्त्री आहेस की पुरुष)

अरे त्यांनी आठवण आली असं लिहिलं, त्यात तूलना कुठे आहे? तोंड धुवून घे बरं. नीट वाचता येईल.

अरुण कुमार
मी जाणून बुजून तशा पोस्ट केल्या.
अरुण कुमार ह्या नावा मागे जी व्यक्ती आहे.
त्याचे किती तरी खोटे आयडी ह्या ग्रुप वर आहेत.
फक्त नाव वेगळी आहेत.
हेच मला कन्फर्म करायचे होते.

समोर असतास तर
उभा चिरला असता.
Admin ni असल्या बकवास लोकांचा आयपी adress block karava.
असल्या चर्सी लोकांकडे एकच मोबाईल असणार .
असली बकवास लोक इथे येवू नयेत ह्याची काळजी घेणे myboli admin chi जबाबदारी आहे.
ह्या व्यक्तीचा मूळ आयडी वेगळाच आहे.

अरुण कुमार
मी जाणून बुजून तशा पोस्ट केल्या.
अरुण कुमार ह्या नावा मागे जी व्यक्ती आहे.
त्याचे किती तरी खोटे आयडी ह्या ग्रुप वर आहेत.
फक्त नाव वेगळी आहेत.
हेच मला कन्फर्म करायचे होते.
Submitted by Rajesh188 on 5 February, 2020 - 11:38
>> हेच खरं आहे असं आईची शपथ घेऊन म्हण बरं. मगच विश्वास ठेवीन.

बापरे.हे विश्वच कल्पने बाहेरचं आहे.कठीण आहे.
असे लेख लिहीत राहा.पुढे याचे एक पुस्तक बनवता येईल.

फार जिवंत वर्णन केले आहे. तुलना करत नाही पण व्यंकटेश माडगुळकरांच्या कथांची आठवण झाली.

>> एकदम स्फोट झाल्यासारखा आवाज झाला आणि माझ्यासमोरच आगीचा गोळा उठून उजेड पडला. माझ्या सोबतचे दोन गडी करंट लागून उभे पेटले. एका मिनिटात खेळ खल्लास झाला.

हे वाचल्यानंतर बराच वेळ डोळ्यासमोर जाळ दिसत होता. उत्कृष्ट लेखन सिनेमापेक्षासुद्धा प्रभावी ठरते ते असे. लहानपणी फासेपारधी लोकांविषयी बरेच ऐकायला मिळायचे. गावाबाहेर बसस्टॉप होता. तो मुख्य सडकेपासून बराच आत होता. त्यामुळे प्रवासी तिथे कधीच थांबत नसत. मग तो बसस्टॉप भटकंती करत येणाऱ्या लोकांचाच निवारा बनून गेला. तिथे कधीमधी फासेपारधी येऊन राहायचे. ते आले कि गावात बातमी पसरायची. लोक एकमेकांना सावध करायचे. त्यांच्याविषयी मुलांच्यात भीतीयुक्त कुतूहल असायचे. "मांजर मारून खातात" पासून "मुलांना पळवून नेतात" पर्यंत अनेक अफवा उठायच्या. अफवांमुळेच अधिक बदनामी झालेला समाज. पण तरीही त्यांच्याविषयी इतके खोलात माहित नव्हते जे या लेखामुळे कळाले.

या पार्श्वभूमीवर खालील मुलाखत खरेच वाचण्यासारखी आहे:

"... आम्हाला शाळा म्हणजे जेल वाटायचं. एकदा शाळेतून बाहेर बघितलं, तर लावा दिसला. लावा पकडायला शाळेतून पळून गेलो. घोडी शोधली. तिचे केस उपटून फांदा तयार केला. लाव्याची शिकार केली. लावा भाजून खाल्ला..."

https://www.weeklysadhana.in/archive/view_article/karyakarta-samajik-pra...

देवकी
चकवी चांडव्याचं तोंड दिसलं होतं. >>>>> म्हणजे कोणता प्राणी?
पारधी बोलीत Barn Owl (गव्हाणी घुबड) ला चकवी चांडवा (चकवा चांदणं) म्हणतात. मारुति चितमपल्ली सरांच्या आत्मचरित्राचे हेच नाव आहे. अर्थात हा लेख आधी प्रकाशित झालेला आहे. धन्यवाद.