गमती पक्षीनिरीक्षणाच्या!

Submitted by Dr Raju Kasambe on 3 February, 2020 - 12:08

गमती पक्षीनिरीक्षणाच्या!

पक्षी निरीक्षण हा खरे तर गंभीर विषय! निसर्गाच्या सान्निध्यात जायला मिळावे हा सुरुवातीचा उद्देश! नंतर हळूहळू पक्षीनिरीक्षणामधून निसर्गप्रेमी आणि निसर्ग संवर्धक म्हणजे कंझर्वेशनिस्ट कसे जन्माला येतात ते कळत सुद्धा नाही! ते एक नैसर्गिक स्थित्यंतर असते.
मला पक्षीनिरीक्षणाचा छंद जडल्यापासून अनेक विनोदी किस्से घडले. त्यातीलच सुरुवातीच्या दिवसातील काही नमुने येथे सादर करतोय.
मी एकदा माझ्या कंपनीच्या मीटिंगमध्ये छंद म्हणून ‘बर्डवॉचिंग’ असा उल्लेख करताच बरेच जण हसायला लागले. नंतर कळले की उत्तर भारतात ‘चिडीमारीला’ विनोदाने बर्डवॉचिंग म्हणतात!
***
पक्षांसाठी ‘हे विश्वची माझे घर’ असते. पृथ्वीच्या उत्तर गोलार्धातून पक्षी लाखोंच्या संख्येत दक्षिण गोलार्धात हिवाळा व्यतीत करण्यासाठी स्थलांतर करून येतात. मी एकदा शाळकरी मुलांना एक स्थलांतरित पक्षी पाकिस्तानातून आपल्याकडे स्थलांतर करून येतो असे सांगितले. चटकन एक मुलगा म्हणाला,

‘टपकवू का साल्याला?’

बालपणापासूनच आपल्या मनात इतर जाती, धर्म, देशाबद्दल द्वेषाची भावना कशी बिंबविली जाते त्याचे हे निरागस उदाहरण!
***
एकदा माझ्याकडे आलेल्या मित्रांना माझी शक्तिशाली दुर्बीण दाखवायची होती. मी त्यांना दुर्बीण घेऊन टेरेसवर जायला सांगितले. वरून दोन ते तीन किलोमीटर लांबवरच्या शिवटेकडीवरचा (मालटेकडी) भगवा झेंडा आणि शिवरायांचा अश्वारूढ पुतळा कसा दिसतो ते बघून यायला सांगितले. थोड्यावेळाने ते निराश चेहेर्‍याने परत आले आणि एकाने म्हटले

‘राजूभाऊ दुर्बिण तर छान आहे, पण आम्हाला त्यातून सगळा अंधारच दिसतो आहे!’

काय गडबड झाली ते माझ्या लक्षात येताच मी म्हणालो

‘पण तुम्ही तर दुर्बिणीची झाकणेच उघडले नाहीत!’

आम्ही नंतर खूप वेळ पर्यंत हसलो. जाता जाता हा किस्सा कुणालाही सांगू नका म्हणून सांगायला ते विसरले नाहीत!
***
त्याकाळी अमरावतीला युथ होस्टेल्स असोसिएशनचे कार्यालय अगदी भाजपाच्या कार्यालयाजवळ होते. सायंकाळी सारे युथ होस्टेल्सचे सदस्य मित्र तेथे जमत असू. एके दिवशी मी कार्यालयाबाहेर एका मित्रासोबत पक्ष्यांबद्दल चर्चा करीत होतो. तिकडे भाजपाच्या कार्यालयात कशाची तरी गर्दी जमली होती. एक कार्यकर्ता आमच्याजवळ बऱ्याच वेळेपासून उभा होता. तो हसत आमच्याजवळ आला आणि म्हणाला

‘तुम्ही कुठल्या पक्षाचे?’

त्याला आम्ही राजकीय पक्ष्यांबद्दल नव्हे तर उडणार्या पक्ष्यांबद्दल बोलतोय हे समजावून सांगताना आमची तारांबळ उडाली. त्याच्या चेहऱ्यावर सुद्धा विचित्र भाव उमटलेले दिसले!
***
माझे निळ्या शेपटीच्या राघुंवर संशोधन चालू होते. तेव्हा मी वर्धा नदीच्या किनार्‍यावर वसलेल्या प्रत्येक खेड्यात जाऊन तिथून नदीत उतरायचे, पक्ष्यांच्या नोंदी घ्यायच्या असा कार्यक्रम ठरला होता. असे सर्वेक्षण मोर्शी (जि. अमरावती) गावापासुन तर तळेगावापर्यन्त (जि. वर्धा) मी करणार होतो. नागपूरवरून एका खेड्यावर पोचलो. अमरावती वरून माझा मित्र जयंत वडतकर येणार होता. पण तो ठरविल्याप्रमाणे आला नाही. म्हणून त्यांच्या घरी फोन करायचा विचार आला. जवळच्याच एका खेड्यात ग्रामपंचायतच्या निवडणुकीची धामधूम चालू होती.

खेडे अगदीच छोटे असल्याने एसटीडी सुविधा नव्हतीच पण टेलिफोनच्या तारांवरून फोन असलेल्या एका व्यक्तीच्या घरी पोहोचलो. घरात फक्त बायका होत्या. पुरुष मंडळी निवडणुकीच्या कामासाठी बाहेर गेलेली होती. अनोळखी व्यक्ती बघून त्याही गोंधळल्या. फोन करू द्यायची मी विनंती केली त्याचा फायदा झाला नाही. रस्त्यावर कुतूहलाने बरेच ग्रामस्थ जमले होते. येथे हे नमूद करायला हवे की आमचा अवतार जीन्स, टी-शर्ट, पाठीवर रकसक, गळ्यात दुर्बीण, कॅमेरा, पायात हिरवे शूज असा होता. ग्रामस्थांपैकी एका युवकाने मला विचारले
'तुम्ही काय करता?'
‘पक्षांचा अभ्यास!’ मी.
‘म्हणजे कोणता पक्ष जिंकल्यावर वगैरे ते तुम्ही टीव्हीवर सांगणार! तुम्ही कोणत्या पक्षाचे? म्हंजी बघा, तुम्ही शिवसेनेचे असाल तरच फोन लावता येईल!’
मी त्यांना काही समजावयाचा केलेला प्रयत्न व्यर्थ गेला. आपला वेळ वाया जातोय असे वाटल्याबरोबर मी गाडीला किक मारली.
***
मी लहान मुलांना नेहमी पक्षीनिरीक्षणासाठी घेऊन जात असे. अनेकदा त्यांच्या पालकांच्या भेटी घ्याव्या लागतात. एकदा एका मुलाने माझ्या आई-बाबांना तुम्हाला भेटायचे आहे म्हणून मला त्याच्या घरी बोलावले. कारण त्याला माझ्या सोबत मेळघाट व्याघ्र प्रकल्पात व्याघ्र गणनेसाठी यायचे होते. त्याच्या आईचे जंगलाबद्दलचे ज्ञान अगदीच दिव्य होते! त्या बाईंना काय सांगावे ते मला कळत नव्हते. तेव्हा मला त्यांनी एक प्रश्न विचारला,

‘जंगलात वाघ वगैरे श्वापदाने हल्ला केला तर तुम्ही काय कराल?

मी मिश्कीलपणे हसत म्हणालो,

‘आम्ही काय करणार? काय करायचे ते तो वाघच करेल!’

झाले, संपले. त्या बाईंनी स्वतःच्या मुलाला त्या दिवसानंतर माझ्यासोबत कधीही जंगलात पाठविले नाही!!
***
२००४ मधील किंवा त्यापूर्वीचा प्रसंग. त्यावेळेस माझ्याकडे लँडलाईन फोन होता. अमरावती जिल्ह्यात किंवा आमच्या सूचित नसलेला कुठलाही नविन पक्षी मिळाला की जवळपास १५ ते २० मित्रांना मी फोन करून सांगत असे. एका तलावावर मला एकदा गल (Gull) पक्ष्यांचा थवा आढळून आला. मी नेहेमीप्रमाणे डायरी घेऊन सर्वांना फोन करायला बसलो.
‘जयंता, आजच मी गल्स बघून आलो. उद्या तू येशिल का?’
‘राजू तू कशाला पोरीबीरींकडे बघतोस?’
‘काय? अरे गल्स म्हणजे जी यू डबल एल (Gull), जी आय आर एल (Girl) नाही. समुद्री गल पक्षी!’
‘अरे, मला वाटलं तू आपलं चिडिमारीच करून राह्यला की काय?’.
....
२०१४ किंवा २०१५ मधला प्रसंग असावा. मी मुंबईला बीएनएचएस मध्ये काम करण्यासाठी राहायला आल्यानंतरचा प्रसंग.

काय झालंय की भारतातील कितीतरी पक्ष्यांची नावं आता बदलली गेली आहेत. ज्यांनी डॉ. सालीम अलिंची पुस्तके वाचून पक्षीनिरीक्षणाला सुरुवात केली ती मंडळी आता नवीन नावांनी गोंधळून जातात. तसेच भारतातील एका सर्वत्र आढळणार्‍य ‘ग्रेट टिट’ (Great Tit) ह्या इवल्याशा कवड्या रंगाच्या पक्ष्याचे आता नाव ‘सिनेरीअस टिट’ (Cinereous Tit) असे करण्यात आले आहे. युरोपात आढळणार्‍य प्रजातीला ‘ग्रेट टिट’ असे नाव देण्यात आले आहे.
इंग्लंडवरुन हेलेन बायरन नावाची तरुण अॅडवोकसी ऑफिसर आणि इयान बार्बर हे ऑफिसर मुंबईला आले होते. ठाण्याच्या खाडीत बोटीत बसून त्यांना फ्लेमिंगो दाखवायचे होते. गप्पांच्या ओघात ह्या पक्ष्यांचा उल्लेख आला. कधीकधी आपल्याला खूप बोलायचे असते, आपले ज्ञान पाजळायचे असते. त्या नादात मी म्हणालो

‘यू हॅव ग्रेट टिट्स...’ आणि मला श्वास लागला...

माझा सहकारी माझ्याकडे बघत होता. कारण वाक्य पूर्ण करणे जरूरी होते.

‘इन यू.के.!’

पण मी एवढे म्हणे पर्यन्त हेलेन माझ्याकडे ‘कौतुकाने’ की ‘आ’ वासून बघत राहिली!! नंतर मला सहकार्‍याने सांगितले की
‘सर तुम्ही चुकीच्या ठिकाणी ‘पॉज’ घेतला’.
सोप्या शब्दात सांगायचे तर भारतीय मुलीसोबत ही चूक झाली असती तर तिने माझा श्वास कायमचा बंद पाडला असता! नाही तर मला बोटीतून ढकलून दिले असते.
***
पूर्वप्रसिद्धी (शेवटचे दोन प्रसंग नंतरचे आहेत): दैनिक जनमाध्यम. दिनांक ३१ जुलै २००४.
डॉ. राजू कसंबे, मुंबई

Group content visibility: 
Use group defaults

छान आहेत किस्से. आपण गावांत किंवा दूरच्या ठिकाणी पक्षी बघायला जातो पण स्थानिकांना याचे फारसं कौतुक नसतं. ते रोजच बघतात. गांधीजींबद्दल फार आदर असतो व त्यास प्राधान्य असते.
______________
मला माझ्या मित्राने ( bnhs) एकदा शिवडीची जागा सांगितली.
(( आता ही जागा - शिवडी बंदर / Sewry jetty लोकांसाठी बंद केली आहे. hindustan times May, २०१८ news ))

" पावसाळा संपला की फ्लेमिंगो पक्षी नवीन पिलांना घेऊन कच्छमधून देशात कुठेकुठे पाण्याच्या जागांकडे येतात आणि पावसाळ्या अगोदर परत कच्छला जातात. शिवडी जेट्टी ( शिवाय ऐरोली खाडी, भांडुप पंपिंग स्टेशनही) ही एक नवीनच जागा मुंबईतील त्यांनी (फ्लेमिंगोजनी ) शोधलीय. नोव्हेंबर ते फेब्रुवारीच्या दुसऱ्या आठवड्यापर्यंत इतर स्थलांतरित पक्षीही तिथे पाहता येतात."
या अगोदर माळशेज घाटावर पिंपळगाव बसवंत तलावावर येत असत. पण ती जागा दूरच होती. शिवाय लोक घोळका करून पुढे धावायचे 'फ्लेमिंगोज फ्लेमिंगोज' ओरडत. जणू काही त्यांना त्यांचे इंग्रजी नाव माहीत नसेल म्हणून. ते उडून जात.

तर ते मुंबईकरांना जवळच आलेत आणि दुषित पाणी वन्य जीवांना हानीकारक आहेत हे जणू काही खोटे पाडण्यासाठीच मोठ्या संख्येने येतात. (( जेव्हा साबण, डिटरजण्टस पाण्यात वाहून तलावात जमा होतात तेव्हा तिथे शेवाळवगैरे भरमसाठ वाढतं. तेच फ्लेमिंगोजचं अन्न आणि त्यास इतर पक्षी प्रतिस्पर्धी नाहीत हे कामाचं))

"केव्हा ,कसं, कुठे जायचं शिवडीला?"
" हे पाणपक्षी खाड्यांना धरुन असतात. खोल समुद्र यांच्या कामाचे नाहीत. भरती ओहोटीप्रमाणे खाणं मिळतं. ओहोटी लागली की पाण्याबरोबर आलेले समुद्री जीव परत जाण्याची धावपळ करताना उघडे पडतात ते हे पटापट पकडतात. कुठेकुठे दोन फुटी खळग्यांत आलेले अडकून पडलेले शेवाळ फ्लेमिंगो खातात. शंख,खेकडे वगैरे इतरांसाठी. भरतीची वेळ पाहून तिथे (जेट्टीवर) थांबायचं. अर्ध्या तासाने ओहोटी सुरू झाली की पाणी भराभर ओसरेल आणि भरतीच्या वेळी वरती घिरट्या घालणारे पक्षी भराभर चिखलात उतरून खाणे खातात. पाणी जसजसे मागे हटते तसे ते जेट्टीपासून दूर आत जातात. "

आता सकाळी गर्दीच्या वेळी मुंबईकडे ट्रेनने जाणे कठीण म्हणून दुपारची भरतीची वेळ ठरवली. शिवडी स्टेशनला उतरून पूर्वेला एक रस्ता जातो फाटक ओलांडून तिकडे निघालो. विचारत पुढे गेल्यावर पेट्रोल पंप वजन काट्याजवळ उजवीकडे वळलो आणि पुन्हा एकाला "जेट्टी कुठे?" विचारलं.
"तुम्ही मांत्रिक आहात का?" या प्रश्नाने गोंधळलो.
" नाही. "
"इकडे मांत्रिक येतात पाण्यात उभे राहून मंत्र म्हणायला 'आज'."
"आज म्हणजे?"
" आज अमावस्या आहे ना!"
अच्छा, दुपारची भरतीची वेळ ,मी अमावस्येचा शनिवार निवडला होता! रविवारी मेगाब्लॉक असतो आणि इतर दिवशी नको म्हणून.

भरतीच्या वेळी पाणी जेट्टीच्या कठड्याला पाणी लागलेले आणि आकाशात पक्ष्यांचे थवे होते. पाणी ओहोटीला भराभर ओसरले आणि खूप पक्षी जवळून दिसले.

पाणपक्ष्यांचे एक बरे असते. घाबरून उडून जात नाहीत.शांतपणे पाहता येतात. 'यांचे मास चविष्ट लागते' हा गैरसमज पसरलेला नसल्याचा परिणाम असावा.

पुढे शिवडीला चारपाचदा गेलो, बिएनएचएसच्या जाहीर कार्यक्रमालाही गेलो.

लेख मस्त आहे, सगळे किस्से मस्त आहेत.

दुर्बीण नसेल तर निरीक्षण करता येत नाही हा माझा अनुभव. जमिनीवरून बघितल्यास तारेवरचे, झाडावरचे सगळे पक्षी सारखेच दिसतात, मला सगळ्या चिमण्या वाटतात Happy Happy

होय. जेएनपिटीची उरणची कॉलनी आहे त्याच्या मागच्या गेटपाशी पोलीस स्टेशन आहे तिकडे, उरणच्या रस्त्याने जातानाही. पावसाळा संपल्यावर लगेच.
दुर्बीण नसेल तर निरीक्षण करता येत नाही हा माझा अनुभव.

हो. प्लवर ( कंठी चिखल्या)थव्याने बसतात. फारच लहान पक्षी असतो. चमचा चोच मात्र जरामोठा असतो.

उरण -पनवेल -कर्नाळा या भागात पाणपक्षी आणि रानपक्षी दोन्ही आहेत.

पक्षीनिरीक्षणासाठी चांगली दुर्बीण कोणती?
निकॉन उत्तम आहे यात वाद नाही. पण महाग पडते. ऑलिम्पस १०x५० चांगली दुर्बीण आहे. निकॉनच्या तुलनेत अर्ध्यापेक्षा कमी किंमत असेल.