कोंबडीचे पाय

Submitted by ऋन्मेऽऽष on 2 February, 2020 - 02:00

साधारण चारपाच वर्षांपूर्वीचा किस्सा. मित्रासोबत एका बॅंकेत गेलो होतो. मित्राचेच काम होते. मला त्यातले कळते, असे त्याला उगाचच वाटत असल्याने मला सोबत म्हणून नेले होते. पण माझे आपले अवांतर निरीक्षण चालू होते. सहज नजर एका मुलीवर पडली. अडकली. ओळखीची वाटली. नजरानजर होताच तिच्याही चेहरयावर ओळखीचे भाव आले. पण नेमके कुठली ओळख ते आठवेनासे झाले. अश्यात अनोळखी मुलीकडे बघून हसायचे तरी कसे. कसेबसे चेहरयावर आलेले ओळखीचे भाव आवरले आणि वोह कौन थी? हे आठवू लागलो. अगदी बालवाडीपासून शाळा, कॉलेजेस, ऑफिसेस, मित्र, नातेवाईक, शेजारपाजार, ऑर्कुट, फेसबूक ते व्हॉटसपग्रूप ईतक्या ठिकाणी आपण ओळखी बनवत वावरलो असतो की यातून एखादा ओळखीचा चेहरा नेमका कुठला हे आठवणे अवघडच. पण चेहरा गोड होता, त्यामुळे डोक्याला ताण द्यायचा नाद सुटतही नव्हता. ती मुलगीही बहुधा याच प्रयत्नात होती. पुन्हा पुन्हा माझ्याकडे बघून अंदाज घ्यायचा प्रयत्न करत होती. पण माझे बॅडलक ईतके खराब की तिलाही मी कोण हे आठवत नव्हते.

ईतक्यात मित्राचे नाव पुकारले गेले. त्याने माझ्या हातात एक कागद आणि पेन कोंबले. रुनम्या हे एवढे अ‍ॅप्लिकेशन लिही जरा, मी आलोच तेवढ्यात, असे म्हणून स्वत: पळाला. झाली बोंब. ती सुद्धा दुहेरी. एकीकडे ईंग्लिश दुसरीकडे हस्ताक्षर. तिसरीकडे ती मुलगी, जिचा विचार आता बॅकफूटला गेला होता. डीअर सर मॅडम रिस्पेक्टेड पर्सन टू हूमसोएवर ईट मे कन्सर्रन.. मनातल्या मनात शब्दांची जुळवाजुळव चालू होती. जे वाक्य चांगले तयार होत होते ते विसरायच्या आधी पटापट लिहीत होतो. ईतक्यात कोणीतरी पाठीमागून डोकावतेय असे वाटले. मागे वळून पाहणार तोच पाठीवर थाप पडली..,

"अरे ऋन्मेऽऽष गधड्या ओळखलेस का?.."

तीच मुलगी. आता बहुधा तिला माझी ओळख पटली होती. पण कशी?
तसे तिने मी लिहीत असलेल्या कागदाच्या चिटोरयाकडे बोट दाखवले. मी गोंधळून गेलो, त्यावर मी माझे नावही लिहीले नव्हते, मुळात ते लेटरच मी मित्राच्या वतीने लिहीत होतो. त्यावरून कसे ओळखले??

तर अक्षर...!

"अक्षर गधड्या, आजही तसेच आहे. मेल्या माझा सोमवार बुडला तुझे हे कोंबडीचे पाय बघून.. (फिदीफिदी)"

"आठवतेय तुला, बाई तुझी वही वर्गात फिरवायच्या, ‘अक्षर कसे नसावे’ हे आम्हाला दाखवायला. त्यामुळेच ते पक्के लक्षात राहिले. आणि मग आमच्याकडे वही आली की आम्हीही तुझी फिरकी घ्यायला मुद्दाम ते वेडेवाकडे वाचायचो. कसली धम्माल होती ती.."

आता मलाही ती आठवली. ती माझी ईयत्ता चौथीतली मैत्रीण होती. फेसबूकवर अ‍ॅड होती, पण ती फेसबूक फारसे वापरायची नाही. त्यामुळे प्रत्यक्षात पाहिल्यावर चेहरयाने ओळखणे दोघांनाही अवघड गेले. आज मात्र ईतक्या वर्षांनीही माझे अक्षर पाहून तिला माझी खात्रीपूर्वक ओळख पटली होती. Happy

नुकतेच काही दिवसांपूर्वी जागतिक हस्ताक्षरदिन होता. सुंदर हस्ताक्षर जमणारे फेसबूक व्हॉटसपवर आपले स्वलिखित काहीबाही मिरवत होते. त्यात आपले चिकन तंदूरीचे फोटो कुठे टाकायचे म्हणून मी शांतच होतो. पण आज एके ठिकाणी वाचनात आले की ज्या लोकांच्या मेंदूचा विचार करायचा वेग अफाट असतो, त्यांच्या लिहित्या हातांना तो वेग झेपत नसल्याने त्यांचे अक्षर खराब येते. उदाहरण म्हणून स्वत:कडेच पाहिले आणि हे लॉजिक एकदम पटले. त्यानिमित्ताने हा किस्सा आठवला. तो न लाजता शेअर करायची हिंमतही आली. आणि आता विषय निघालाच आहे तर चार मुक्ताफळे आणखीही उधळावी म्हणतो.

तर आम्ही कोंबडीचे पाय म्हणून हिणवले जाणारे नॉस्टॅल्जिक नाईटीज पिढीतल्या त्या गटाचे प्रतिनिधीत्व करतो ज्यांनी द्रष्टेपणा दाखवत हे आधीच ओळखले होते की काही वर्षातच हाताने लिहीण्याचा काळ संपणार आहे. कॉम्पुटर आणि मोबाईलचे युग येणार आहे. सारे काही टकटक बोटांचा खेळ असणार आहे. ज्याचा टायपिंग स्पीड जास्त, त्याचा लिहायचा वेग जास्त. आणि ज्याच्याकडे छान छान फॉंट असणार, त्यानेच टाईपलेले अक्षर छान दिसणार. आज लोकांच्या घरात मोबाईलचे चार्जर चटकन हाताला लागतील अश्या जागी सापडतील. पण काही लिहायची वेळ आल्यास पटकन पेनपेन्सिल सापडणे अवघडच. आजच्या तारखेला शब्दकोडी आणि सुडोकूही ऑनलाईनच सोडवणारी लोकं काही लिहीत असतील तर ते म्हणजे फक्त स्वाक्षरी. आणि ती देखील हळूहळू डिजिटल होतेय. तसेही ज्याचे अक्षर घाण, त्याचीच स्वाक्षरी महान. कारण ज्याची स्वाक्षरी गिचमिड, त्याचीच कॉपी करणे अवघड. सुंदर अक्षर असणार्‍यांचा एक जागतिक हस्ताक्षर दिवस असतो. पण ऊरलेले तीनशे चौसष्ट दिवस आमचेच असतात.

अक्षरावरून स्वभाव समजतो असे म्हणतात. स्वभावाला औषध नसते असेही म्हणतात. मग अक्षराला तरी कसे असावे? पण तरीही आयुष्यातील उमेदीची खेळायची मौजमजा करायची वर्षे या अक्षर सुधारायच्या नादात फुकट गेली. रोज उठा, दात घासा, आंघोळ करा, आणि अक्षर सुधारायला पाच पाने लिहून काढा. हा दर उन्हाळी सुट्टीचा ठरलेला उपक्रम. त्याशिवाय क्रिकेट खेळायला सोडायचेच नाहीत. एवढी मेहनत जर ईंग्लिश सुधारायला घेतली असती तर ऑक्सफॉर्डची आख्खी डिक्शनरी पाठ झाली असती. आज लाईफ बनली असती. पण सरावानेही अक्षर सुधारायचे नव्हतेच. कारण वहीपुरते चांगले लिहीले जायचे. पण परीक्षेची वेळ आली की पुन्हा ये रे माझ्या मागल्या. दर उत्तरपत्रिकेवर अक्षर सुधारावे हा ठरलेला शेरा.

लिहायचा स्पीड मात्र माझा अफाट होता. बाई जे बोलायच्या ते रेकॉर्ड केल्यासारखे कागदावर ऊतरवून काढायचो. गणिताच्या बाईंनी फळ्यावर गणिते लिहून शिकवली आणि नंतर ती मुलांना वहीत कॉपी करायला सांगितली की ती सर्वात पहिले संपवून मी मुद्दाम शीळ वाजवत बसणार हे नेहमीचेच. मग फळा पुसायचे मानाचे कामही माझ्यावरच सोपवले जायचे. माझ्या अक्षराची किर्ती सर्वदूर पसरली होती. स्टाफरूममध्येही चर्चा व्हायची. एकदा मधल्या सुट्टीत मला स्टाफरूममधून बोलावणे आलो. भितभीतच गेलो. त्याकाळी स्टाफरूममध्ये तशीच जायची पद्धत होती. ईतिहासाच्या बाई पेपर तपासत होत्या. पण मी लिहिलेला ईतिहास त्यांना वाचता येत नव्हता. कुठलाही चष्मा चढवून त्या ईतिहासाचा अर्थ लागत नव्हता. तेव्हा आमच्या गणिताच्या क्लासटीचर बाईंनी त्यांना सल्ला दिला की त्यालाच बोलाव आणि त्याच्याकडूनच वाचून घे. तेवढे माझे एक चांगले होते. माझे अक्षर मला वाचता यायचे. चटचट वाचून दाखवले. भले स्वत:चेच का असेना, एवढे घाणेरडे अक्षर हा पोरगा पटपट कसे वाचतोय या कौतुकाने सारे शिक्षक माझ्याकडे बघत होते. जणू मी संस्कृतचे श्लोकच धडाधडा म्हणत होतो.

शालेय जीवनात अक्षराने प्रसिद्धी, मनस्ताप, सुखद दुखद आठवणी सारे काही दिले. तोच वारसा घेऊन कॉलेजला गेलो. आपले ईंग्लिशचे अक्षर आणखी गचाळ आहे हा शोध तिथे लागला. परकीयच भाषा ती. मातृभाषा लिहू न शकणारा मुलगा ती कशी आत्मसात करणार. वाईट गोष्ट म्हणजे ईंग्लिशमध्ये लिहीलेले माझे मलाच काही दिवसांनी वाचता यायचे नाही. पण कॉलेजमध्ये कधी स्टाफरूममधून बोलावणे आले नाही. त्यांचे ते वाचायचे अर्थ लावायचे आणि मार्क्स द्यायचे. जोपर्यंत अपेक्षित मार्क्स मिळत होते. प्रसंगी टॉपरही येत होतो, तोपर्यंत मलाही अक्षराचे मग काही पडले नव्हते.

वालचंदला असताना मात्र एका परीक्षेच्या वेळी एका सुपरवायझरने माझी ईज्जतच काढली होती. लिहीता लिहीता माझ्या हातातून पेपर खेचून घेतला आणि म्हणाला की हे काय लिहिले आहे, कोण वाचणारे हे, काय चेक करणार, तुला तरी वाचता येतेय का? नसेल काही येत तर नको लिहू, उगाच का टाईमपास करतोय??... मला पेपर चालू असताना वाद घालायचा नव्हता. मी पेपर परत घेतला आणि शांतपण एवढेच म्हणालो की सर मी असेच अक्षर काढून गेल्यावेळी टॉपर आलेलो. विचारा ईथे कोणालाही... आणि त्याच्या चेहरयावरचे भाव न टिपता पुन्हा झरझर पेपर लिहू लागलो. सोबतचे मित्र मात्र नंतर खुश झाले होते. तो सुपरवायझर हॉस्टेलमधील एक हलकट मुलगा होता आणि मी छान अ‍ॅटीट्यूड दाखवत त्याला ऊलटे उत्तर दिले असे मित्रांना वाटत होते.

मला नक्की आठवत नाही की मी त्याला नक्की कोणत्या टोनमध्ये प्रत्युत्तर दिलेले. पण येस्स, कसेही असले तरी ते आपले अक्षर असते, एक आपुलकी जिव्हाळा त्याबद्दल असतोच. तोच जिव्हाळा जो आपल्या कुरुप पोराबद्दलही आईबापांना असतो. त्यामुळे मस्करी होत राहते आम्हा कोंबडीचे पायवाल्यांची, आम्हीही ती एंजॉयच करतो.पण त्या पलीकडे जात जर कोणी त्यावरून अवहेलना करायचा प्रयत्न करत असेल, तर त्याला सडेतोड प्रत्त्युत्तर दिले जाऊ शकतेच Happy

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

बाकी आपण हुशार आहोत म्हणून आपले हस्ताक्षर चांगले नाही हि एक लंगडी सबब / पळवाट आहे.
>>>>

शक्य आहे की हुशारी आणि हस्ताक्षर याचा आपापसात संबंध नसावा. तसे ते मी वाचलेले एक वाक्य होते. खोलात जाऊन संशोधन केले नव्हते. मी स्वत: हुशार आणि अक्षर वाईट या कॅटेगरीत असल्याने हे लॉजिक पटले ईतकेच. लेखातही तसेच लिहिले आहे. बाकी जास्त लोकांवर संशोधन करून काय ते खरे खोटे कोणी केले तर आवडेलच.

पूर्वी उत्तम कॅरम खेळणारा माणूस सवय गेली कि हात थरथरतात आणि सोंगटी नीट घेता येत नाही तसेच आहे.>>> हे खरं नाही. मुन्नाभाई mbbs मधला म्हातारा आठवतोय. मरणाच्या बेडवरून उठून राणी घ्यायला येतो आणि घेतोपण.

हुशारी आणि हस्ताक्षर याचा आपापसात संबंध नसावा.

बऱ्याच वेळेस हुशार मुलांना हस्ताक्षर सुधारा असा सल्ला शिक्षकाकडून दिला जातो कारण त्यांची अभ्यासातील प्रगती हि लोकांना "दिसत" असते आणि त्यात फारशी सुधारणा शक्य असली तरी दिसून येत नाही. पहिल्या दुसऱ्या क्रमांकावरील विद्यार्थी अजून किती वर जाणार?

याउलट ढ विद्यार्थ्याला अक्षरावरून बोलण्यापेक्षा अभ्यास करण्यावरून बोलणे हे शिक्षकाला जास्त सोपे जाते.

दोन्ही गोष्टीत त्या विद्यार्थ्यात सुधारणा व्हावी अशीच शिक्षकांची इच्छा असते.

विषयांतर होईल, पण लिहूनच टाकतो. मुळात विद्यार्थी हुशार असणे हे मान्य पण ढ असणे अमान्य आहे. कोणती ना कोणती प्रतिभा, गन हे प्रत्येक व्यक्तीमध्ये असतातच, फक्त बऱ्याचदा त्या प्रतिभेला समाजात मान्यता नसते किंवा ती प्रतिभाच त्या व्यक्तीला उशिरा लक्षात येते किंवा येतही नाही. प्रतिभा लक्षात न येण्याची उदाहरणे अनेक आहेत. माझ्या एका १२ वी नापास भावाने रानात गुरे राखता फिरत असताना शेतातल्या काळ्या, न गाळलेल्या मातीपासून खुप सुंदर अर्धाकृती मानवी पुतळा बनवला होता. लहान होतो मी, पण आज ते आठवल्यावर वाटतं कि हीच कला एखाद्या शहरात उच्चभ्रू कुटुंबात दिसली असती, तर प्रॉपर एक्सपोजर, शिक्षण घेऊन तो किमान एक चांगला कलाकार म्हणून जगला असता.

त्यातल्या त्यात वर्गात पहिल्या ५- १० त असणारी मुले आणि साधारण बऱ्या मार्कांनी पास होणारी मुले आज साधारण एकाच ठिकाणी आहेत. मी स्वतः पदवी करताना ८-८ विषयात नापास होतो, आणि ते सगळेच विषय एकाच परीक्षेत काठावर काढले देखील आहेत. त्याच वेळी चारही वर्षं फर्स्ट क्लास डिस्टिंक्शन घेणारी मुलं आज माझ्याच बरोबरीने काम करत आहेत. काही काही तर चार वर्षं इतर काहीही न करता फक्त अभ्यासच करत राहिली, ना मित्र ना काही जगणं. परिणामी ढासळलेला आत्मविश्वास आणि त्यामुळे इंटरव्यू मध्ये नापास होऊन आज बेरोजगार आहेत. थोडक्यात ह्या तथाकथित हुशार असण्याने किंवा नापास होण्याने काही फारसा फरक पडलेला नाही. ह्या उलट महावियालयीन चार वर्षं झकास मजा करत घालवली त्याबद्दल मला आनंद आहे!

हावियालयीन चार वर्षं झकास मजा करत घालवली त्याबद्दल मला आनंद आहे!
>> माझ्या कॉलेजातही अशीच काही टुकार मंडळी होती. यथातथा नोकरी करत आहेत, काही वडिलोपार्जित संपत्ती होती म्हणून बऱ्या अवस्थेत आहेत तर काही बायकोच्या पगारावर अवलंबून आहेत. हुशार मुले कुठच्या कुठे पोहोचली. अनेक जण माझ्या सारखे सरकारी नोकरीत उच्च पदावर काम करत आहेत.

अतिशय विचार करणारी सर्वच बाबतीत पण अगदी सुबक , वळणदार अक्षर असलेली व्यक्ती आहे आमच्या घरात. माझ्या आईला, हस्ताक्षर, चित्रकला, गाणं , विणकाम ते हस्तकला ह्यात अगदी बक्षिसे / प्रशंसा आता ह्या वयात सुद्धा मिळालीत. प्रत्येक काम नीटसपणे वेळेत आणि बहुकार्य करणारी स्त्री आहे. शेजारी-पाजारी ते घरच्या सर्वांचे महत्वाच्या ( वाढदिवस , लग्नदिवस साजरे) दिवशी कधी काय करायचे ह्याचा प्लॅन असतो तिच्याकडे.

त्यामुळे, मेंदू वेग ज्यास्त आणि अक्षर खराब असले काही विश्वास नाही ठेवू शकत.

Submitted by अरुणकुमार शिंदे on 3 February, 2020 - 13:36>> तुमच्या आधीच्या जन्मात झालेला करार याही जन्मात तुम्ही पाळावा अशी माझी अपेक्षा आहे. खोडसाळ प्रतिसाद द्यायचे असल्यास आम्ही तुमच्या वाटी येत नाहीत, तुम्ही आमच्या वाटे येऊ नये. याउपर काही मुद्देसूद असेल तर नक्की लिहा. उत्तर देऊच.

ढ असणे हे फक्त अभ्यासबाबतीत आहे.

त्यात कोणाचाही उपमर्द करण्याचा हेतू नाही / नव्हता.
तसा अर्थ ध्वनित होत असेल तर क्षमस्व.

मागे एक प्रतिसादात मी लिहिले होते की चित्रकला हस्तकला इ सर्व कलांच्या बाबतीत मी ढ आहे.

लौकिकार्थाने शिक्षणाचा आयुष्यात यशस्वी होण्यात फारतर 10 % सहभाग असतो.
Academic success has at the most 10% contribution in success in life.

आपल्याकडे इतर क्षेत्रात संधी कमी असल्यामुळे शैक्षणिक यशाला अनावश्यक जास्त महत्त्व दिले गेले आहे.

याचे एक कारण म्हणजे जास्त पैसा मिळवणे म्हणजेच आयुष्यात यशस्वी होणे असे समीकरण सध्याच्या चंगळवादी मनोवृत्ती तुन रूढ झालेले आहे.

. ह्या उलट महावियालयीन चार वर्षं झकास मजा करत घालवली त्याबद्दल मला आनंद आहे!>>>>>>> अगदी खरे आहे.
आमच्या रियुनियनमधे तत्कालीन बॅकबेंचर्सनी केलेली मजा ऐकली, त्यावेळी आपण किती आयुष्य फुकट घालवले हे कळले.

>>>>>>भले स्वत:चेच का असेना, एवढे घाणेरडे अक्षर हा पोरगा पटपट कसे वाचतोय या कौतुकाने सारे शिक्षक माझ्याकडे बघत होते.>> हाहाहा
>>>>>>कॉलेजला गेलो. आपले ईंग्लिशचे अक्षर आणखी गचाळ आहे हा शोध तिथे लागला.>>>>> Happy सॉलिड!

तसेही ज्याचे अक्षर घाण, त्याचीच स्वाक्षरी महान. कारण ज्याची स्वाक्षरी गिचमिड, त्याचीच कॉपी करणे अवघड. सुंदर अक्षर असणार्‍यांचा एक जागतिक हस्ताक्षर दिवस असतो. पण ऊरलेले तीनशे चौसष्ट दिवस आमचेच असतात.>>>>>>>>>>>>>>> Lol

मस्त लिहिलंय

आठवतेय तुला, बाई तुझी वही वर्गात फिरवायच्या, ‘अक्षर कसे नसावे’ हे आम्हाला दाखवायला.
बालमनावर किती विपरीत परिणाम होऊ शकतो .

गणेशोत्सव हस्ताक्षर स्पर्धा संपली आहे. शेक्क़्डो लोकांनी आपली सुंदर अक्षरे त्यात डकवली आहेत.
कोंबडीचे पाय गॅंग.. ते पाहून कोणाला न्यूनगंड तर नाही ना आला ईथे..
काळजीपोटी धागा वर काढतोय

पूर्ण लेख वाचून काढला.मस्त खुसखुशीत.
पण ज्याचे ईतके वर्णन केलय ते कोंबडीचे पाय बघायला नाही मिळाले ह्याची खंत.

हस्ताक्षर वाईट पण माणूस हुशार.
हे मला पण पटतंय, कौतुक नाहीए पण नवर्याचे अक्षर अति वाईट आहे आणि तो अति हुशार आहे.

मी जेव्हा भरभर लिहितो तेव्हा माझे अक्षर सुद्धा कोंबडीचे पाय असतात. पोस्ट करतो नमुना थोड्या वेळात.
--------- --
हे बघा:
20200906_140349.jpg

पण ज्याचे ईतके वर्णन केलय ते कोंबडीचे पाय बघायला नाही मिळाले ह्याची खंत.
>>>>
शोधतो आता काहीतरी लिहिलेले सापडतेय का?.
उगाच मुद्दाम नव्याने लिहून फोटो काढण्यात मजा नाही.. Happy

मी जेव्हा भरभर लिहितो तेव्हा माझे अक्षर सुद्धा कोंबडीचे पाय असतात
>>>>

कारण तुम्ही मुळात चांगले अक्षराचे आहात
मी जेव्हा स्लो लिहितो तेव्हा आणखी गचाळ लिहिले जाते. फास्ट लिहीताना हाताचा तोल साधला जातो.

नव्याने लिहिले तरी अक्षर तेच असेल.....
>>>
हो पण ते आता धागा काढलाय तर मुद्दाम आपले अक्षर कसे खराब आहे हे दाखवायला काढल्यासारखे होईल..:)

Pages