लिपस्टिक

Submitted by मोहना on 30 January, 2020 - 08:16

"कसलं आकर्षण वाटतं गं तुला त्या कपड्यांचं?" आईकडे मी दुर्लक्ष केलं. बग्गीकडे कुतूहलाने बघणार्‍या डोळ्यांकडे एक नजर टाकली पण मला त्या नजरांची आता सवय झाली होती. कुतूहल, आश्चर्य आणि कधीकधी आकर्षणही त्या नजरांमध्ये मी पाहिलं होतं. फारसा बदल यात कधी झाला नव्हता पण आम्हाला बघायला येणार्‍या लोकांचा पोषाख बघायला मला फार आवडतं. रंगीबेरंगी बाह्यांचे, बिनबाह्यांचे शर्ट, फ्रॉक, जिन्स, स्कर्ट, किती प्रकार. काळ्याभोर डांबरी रस्त्यावर बग्गीत बसलेली मी आणि केवळ आम्हाला बघायला आलेले पर्यटक म्हणजे रस्त्यावर फुललेली रंगाची बाग वाटत राहते ती, कपड्यांमुळे. दुकानाच्या दिशेने आमची बग्गी जायला लागली की हे दृश्य रोजच दिसतं आणि जोडीला आईचं नेहमीचं वाक्य येतंच. मी माझी नजर घोड्यांच्या टपटप आवाजावर खिळवली पण मनातून मात्र रस्त्यावरच्या तरुणींचे पाहिलेले सगळे कपडे अंगावर चढवून पाहिले. मला त्यांच्या पोषाखाचं आकर्षण आणि त्यांना माझ्या.

आता मी १३ वर्षांची आहे पण लहानपणचा एक प्रसंग अगदी चांगला लक्षात आहे माझ्या. आईबरोबरचा तो संवाद अजूनही मनात घर करून बसलाय. तिसरीत होते मी तेव्हा. दुकानात एका कोपर्‍यात काहीतरी करत बसले होते. लाकडी पायर्‍यांचा करकर आवाज झाला आणि मी दाराकडे पाहिलं. दुकानात वस्तू न्याहाळता न्याहाळता लोक आम्हालाही निरखीत असतात ते मला नुकतंच कळायला लागलं होतं. आई मला आणि माझ्या भावाला मुद्दाम दुकानात घेऊन येते हेही. क्वचित बाबाही येऊन बसायचे. आई माझा पायघोळ झगा सारखा नीट करायला लावायची आणि डोक्यावरची टोपी बुचड्यावर नीट बसवायला लावायची. एकदा मी भोकाड पसरलं. त्या दिवशी बाबांनी मला दुकानाच्या मागे आमचंच शेत होतं तिथे पाठवून दिलं.
"थोडावेळ खेळा दोघं. गर्दी कमी झाली दुकानातली की या." मला आणि भावाला दटावून ते परत दुकानात जाऊन बसले. जेवायची वेळ झाली तेव्हा आईने हाक मारली. आम्हाला दोघांना जवळ बसवून सांगितलं.
"आपल्याला बघायला येतात लोक."
"आपल्यात काय आहे बघण्यासारखं?" माझा भाऊ दोन वर्षांनी मोठा आहे. आईने उत्तर द्यायच्या आधी तोच म्हणाला,
"आपण छान दिसतो म्हणून येत असतील बघायला."
"आपल्याला बघायला दुकानात येतात? दुकानात वस्तू विकतो ना आपण? त्यांना आपल्यालाही विकत घ्यायचंय?" आई हसायलाच लागली. मला तिचा राग आला होता पण ती हसते तेव्हा तिच्या गालावरची खळी इतकी खुलून दिसते की कुणीच तिच्यावर रागावू शकत नाही. मी तरीही हुप्प करून बसले. आई म्हणाली,
"आपण ऑमिश आहोत म्हणून ते येतात. दुकानात आलेच आहेत म्हणून मग वस्तूही घेतात."
"मग आपल्याला बघण्याचेच पैसे का देत नाहीत?" माझा प्रश्न बाबांना आवडला. ते म्हणाले,
"काहीच हरकत नाही खरंतर. आपण पुतळे होऊन उभं राहू." आईच्या वटारलेल्या डोळ्यांकडे पाहून ते गप्प बसले. आईने लोक आम्हालाही मुद्दाम बघायला येतात हे सांगितल्यापासून मला नीटनेटकं राहायचं वेडच लागलं. तेव्हापासून हळूहळू आम्हाला पाहायला येणार्‍या लोकांचं निरीक्षण करायला लागले. त्यांच्यासारखे सुंदर सुंदर पोषाख आपण का घालत नाही ते मला कळायचंच नाही पण इतकं कळायचं की त्यामुळेच आपल्याला पैसे मिळतात आणि त्यामुळे आई - बाबा दोघं खूष असतात. माझ्याकडे निळा, हिरवा आणि गुलाबी या तीन रंगाचे पायघोळ झगे आहेत. तेच आलटून पालटून घालते मी. केसाचा बुचडा आणि बुचड्यावर पांढरी टोपी. आमच्या गावातल्या सगळ्याच ऑमिश मुलींचा हा पोषाख आहे.

"रेचल लक्ष कुठे आहे?" आईने माझी तंद्री मोडली. दुकानाशी बग्गी पोचली होती. बग्गी हेच आमचं प्रवासाचं साधन. मला गाड्या ठाऊक आहेत त्या पर्यटकांमुळे. मला बग्गीच आवडते. छान वाटतं त्यातून प्रवास करताना. आम्ही सगळे दुकानात पोचलो. नेहमीप्रमाणे हळूहळू गर्दी वाढायला लागली. माझ्या मनात प्रचंड गोंधळ आहे आमच्या चालीरीतींबद्दल. कधी सगळं पटतं कधी मुद्दाम नियम तोडावेसे वाटतात. आता तसंही बदलत चाललं आहे असं आई म्हणत होती. कितीतरी नियम शिथिल करून टाकले आहेत. आई म्हणते, ’ज्याची त्याची मर्जी, माझ्या मुलांनी आपल्या संस्कृतीबाहेर केलेलं मला नाही आवडणार.’ आईचं हे असं बोलणं मला अजिबात आवडत नाही. नव्या गोष्टी करायला जायचं तर आईचं बोलणंच आठवतं, बहुतेक तसं व्हावं यासाठीच ती ते म्हणत असावी. मध्यंतरी आमच्या गावात एका मुलाने आपल्या बायकोला आरसा आणून दिला. आता ही काय बातमी झाली का?, पण आमच्या समाजात खळबळ उडाली. लग्न झालेली ऑमिश स्त्री आरशात पाहू शकत नाही. त्या जोडप्याला गावकीसमोर प्रश्नोत्तराला सामोरं जावं लागलं. अखेर ते जोडपं जिंकलं. त्या मुलावर गावातल्या सगळ्याच स्त्रिया खूष आहेत आता. हे पाहिल्यावर कधीकधी मला वाटतं आपणही एखादा नियम मोडावा ज्यामुळे सर्वांना त्याचा फायदा होईल. आईने पुन्हा टोकलं तसं मी कामात लक्ष घातलं. तुम्ही म्हणाल, माझ्या वयाची मुलगी दुकानात काम का करते? शाळा नाही मला? आहे ना. आमच्या सगळ्याच शाळा अगदी घराजवळच असतात आणि दुपारी भरतात. एकच खोली आणि आठवीपर्यंत शिक्षण की संपलं. माझं हे शेवटचं वर्ष आहे. नंतर मी शाळेतच शिक्षिका म्हणून काम करू शकते. पण मी काही ठरवलेलं नाही अजून.
"रेचल, त्या मुलीला तुझ्याशी बोलायचंय." आई जोरात म्हणाली तशी मी तंद्रीतून बाहेर आले.
"काय बोलायचंय?" उत्सुकतेने माझ्याकडे बघणार्‍या त्या मुलीला मी विचारलं.
"तुझी मुलाखत हवी होती." ती कॅमेर्‍याशी चाळा करत म्हणाली. आई लगेच मध्ये पडली.
"फोटो नाही घेता येणार."
"ठाऊक आहे, ’ऑमिश’ लोक फोटो काढत नाहीत. हरकत नाही. पण मुलाखत घेतली तर चालेल ना?" आईने मान डोलवली. ती तिथेच बसत होती मला प्रश्न विचारायला पण मी आई काही म्हणायच्या आधी तिला बाहेर काढलं. गिर्‍हाईकांच्या गर्दीत कदाचित आईच्या ते लक्षातही आलं नसेल. बाहेर पडल्यापडल्या मी तिला विचारलं,
"तू माझा फोटो काढशील?"
"तुझी आई ओरडेल." ती हसून म्हणाली.
"तिला कसं कळेल? तू माझ्या मुलाखतीबरोबर छापलास तरी चालेल." त्या मुलीने मला खूप प्रश्न विचारले. एकेक प्रश्नाचं उत्तर देताना तिच्याइतकेच मलाही प्रश्न पडायला लागले. मी तिला ते सांगून टाकलं. काही चालीरीती मला खूप आवडतात काही नाही. ती म्हणाली,
"तुला काय आवडतं ते सांग ना."
"खूप आवडणारी गोष्ट आहे ती म्हणजे आम्ही गावात सगळे सामूहिक कामं करतो." त्या मुलीच्या चेहर्‍यावरचं प्रश्नचिन्ह पाहून मी स्पष्ट केलं.
"समजा, कुणी घर बांधायला घेतलं. गावातले सगळे मिळून ते घर बांधतो. खूप मजा येते. कुणाच्यातरी घरी ते काम चालू असताना एकत्रच स्वयंपाक होतो आणि हसतखेळत जेवणही. कोण नविन घर बांधतंय याची वाटच बघत असतात सगळे." तिला हे सांगतानाच मला खूप आनंद होत होता.
"ऐकलं होतं हे पण आता तुमच्या समाजात पण दोन गट आहेत ना? जुन्या चालीरीती पाळणारे आणि आधुनिक. तुला काय करायला आवडेल?" मला खरंच ठाऊक नाही मला काय करायला आवडेल. पण मला जे वाटतं ते मी तिला सांगितलं.
"मला माझ्या आई - बाबांना दुखवून काहीच करायला आवडणार नाही आणि तसंही मला खूप गोष्टी आवडतात आमच्या." त्या मुलीने विचारलं,
"मग फोटो काढायला का सांगितलंस?" मला हसायलाच आलं.
"या खूप साध्या गोष्टी आहेत. असं काही केलं तर जास्तीत जास्त काय होईल आई ओरडेल, बाबा बोलणार नाहीत काही दिवस. पण या गोष्टी करून पाहिल्याचं समाधान मला मिळेल."
"तू तर अगदी मोठ्या मुलीसारखी बोलतेस." ती मुलगी मला छोटी समजत होती ते मला अजिबात आवडलं नाही.
"तू किती वर्षांची आहेस?"
"चोवीस." ती मुलगी माझ्याशी बोलता बोलता तिचे मुद्दे उतरवत होती कागदावर.
"हं, मग खूप लहान आहे मी तुझ्यापेक्षा. पण आमची शिक्षिका तुझ्याएवढीच आहे आणि ती सांगते ना आम्हाला."
"काय सांगते?"
"हेच की नव्या आणि जुन्याचा ताळमेळ राखायला आपण शिकायचं आणि आपल्या पालकांनापण राजी करायचं. सगळं आपल्याच हातात असतं." मला हे बोलताना खूप मोठं झाल्यासारखं वाटत होतं.
"मग आज तुझा काय विचार आहे?" तिच्या नजरेतला खट्याळपणा मला लगेच कळला.
"तूच सांग. काय करू?" तिने लिपस्टिक काढली.
"लावून बघायची आहे? लावून घरी जाशील?"
"हो." मी उत्साहाने म्हटलं पण लिपस्टिक न घेता तिला सांगितलं,
"मला अजून शिकायचं आहे आणि हे धाडस मी करू शकले तर तो मोठा बदल असेल. माझ्याकरता आणि कदाचित आमच्या समाजाकरता. तुला ठाऊक आहे ना आम्हाला जी पाहिजे ती जीवनशैली निवडण्याचं स्वातंत्र्य आहे?"
"हो पण तरी प्रत्यक्षात तसं होत नाही हेही." त्या मुलीच्या चेहर्‍यावर गोंधळ होता. मी घाईघाईने सांगितलं.
"होत नाही कारण एकदा तुमची जीवनशैली स्वीकारली की आमचं असं काही राहत नाही. मला तेच नकोय. आमच्यात जे चांगलं आहे ते ठेवून बाकी बदल केले की झालं."
"किती प्रगल्भ विचार आहेत तुझे. पुन्हा कधीतरी मी येईन ते कदाचित फक्त तुझ्याशीच बोलायला येईन. तेव्हा इथे सगळे पुढच्या शिक्षणाकडे वळलेले असतील. छान बदल असेल हा तुमच्या समाजाकरता आणि तुला जे अपेक्षित आहे तेही झालेलं असेल. बाकी कितीतरी गोष्टी तुला आवडतात ते मी मुलाखतीत अधोरेखित करेन..." ती मुलगी खूप वेळ बोलत होती. तितक्यात लांबून आईची हाक ऐकू आली आणि मग माझा भाऊ धावत बोलवायलाच आला. निघता निघता मी त्या मुलीच्या हातातली लिपस्टिक ओढली. तोंडावरून फिरवली. काय होतंय ते कळायच्या आधीच पुन्हा तिच्या हातात कोंबली आणि धूम ठोकली. मला आई ओरडणार हे आधीच माहीत होतं पण त्याआधी मला माझा चेहरा आरशात पाहायचा होता. आरशासमोर मी उभी राहिले स्वत:लाच निरखीत. पाठीत धपाटा पडेल असं वाटत होतं. तयारीतच होते तेवढ्यात आरशात आईचा चेहरा दिसला. ती दुकानाच्या फळीवर मान टेकवून माझ्याकडे टक लावून पाहत होती. मी तिच्याकडे आरशातूनच पाहत राहिले. ती हसली, त्याक्षणी वाटलं त्या मुलीकडून ती लिपस्टिक आणावी आणि आईच्या ओठावरून फिरवावी. आई खुदकन हसेल तेव्हा ओठावरची लिपस्टिक तिच्या गालावरच्या खळीला किती खुलून दिसेल. ती माझ्याकडे बघत होती तेव्हा अगदी क्षणभर असंही वाटलं, गर्रकन वळावं आणि आईला म्हणावं,
’आई, मला आठवीनंतर शिक्षण थांबवायचं नाही. पुढे शिकायचं आहे.’ मी वळलेही पण तेवढ्यात आईदेखील आलेल्या गिर्‍हाईकाला काहीतरी देण्यासाठी वळली. मी पुन्हा आरशात माझ्या प्रतिबिंबात रमून गेले. आईचं बोलणं कानावर पडत होतं तेवढ्यात ती मुलगी दुकानाच्या पायरीवर उभी राहिलेली दिसली. मी आनंदाने वळले. तिला म्हटलं,
"माझी मुलाखत छापून आली की परत येशील? माझ्या आईला वाचून दाखवशील?" तिने मान डोलवली. माझ्या ओठांकडे पाहून तिचा चेहरा खुलला. पर्समधली लिपस्टिक काढून तिने माझ्या हातात ठेवली आणि जशी आली होती तशी पटकन दुकानाच्या पायर्‍या उतरलीही. लिपस्टिक तिथेच ठेवून मी देखील तिला माझ्या मनातलं सांगायला धावले.

परत आले तेव्हा आईच्या हातात लिपस्टिक होती.

(ऑमिश लोक पहिल्या महायुद्धाच्याआधी, जवळजवळ ३०० वर्षांपूर्वी अमेरिकेतील काही राज्यात स्थलांतरित झाले. दक्षिण जर्मनी आणि स्वित्झर्लंडहून तत्कालीन राजकीय, सामाजिक परिस्थितीमुळे त्यांनी स्थलांतर केले. डच, जर्मन आणि इंग्रजी भाषा बोलू शकणार्‍या या समाजाच्या चालीरीती आधुनिक जीवनशैलीची सावलीही न पडण्याची दक्षता घेणार्‍या आहेत. यौवनात पदार्पण करणार्‍या या समाजातील मुलींच्या मनातील विचारांची आंदोलनं म्हणजे ’लिपस्टिक कथा’)

प्रसाद दिवाळी अंक २०१९ मध्ये प्रसिद्ध

शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

मस्तय गोष्ट!
> ऑमिश लोक पहिल्या महायुद्धाच्याआधी १७२० च्या सुमारास अमेरिकेतील काही राज्यात स्थलांतरित झाले. > इथे माझा थोडा गोंधळ उडालेला. मला वाटलं १९२० ऐवजी १७२० लिहलंय चुकून. 'पहिल्या महायुद्धच्याही खूप आधी' असतं तर नसता उडाला गोंधळ....

छान कथा. आवडली.
अ‍ॅमीश / ऑमिश लोकांबद्दल जास्त काही माहित नव्हते. आता अधिक माहिती मिळवणे आले Happy

धन्यवाद सर्वांना.

@वावे, वेगवेगळे उच्चार करतात लोक.
@ॲमी, केला बदल.
@हर्पेन - खूप वर्षांपूर्वी मी लोकसत्तेत लेख लिहिला होता या लोकांबद्दल. असेल बहुतेक माझ्याकडे. असला तर पाठवते तुम्हाला.

@हर्पेन - खूप वर्षांपूर्वी मी लोकसत्तेत लेख लिहिला होता या लोकांबद्दल. असेल बहुतेक माझ्याकडे. असला तर पाठवते तुम्हाला. >>

आवडेल वाचायला, जरूर पाठवा. धन्यवाद.