पुनर्जन्म ,सत्य की आभास ? … (भाग 3)

Submitted by Sujata Siddha on 30 January, 2020 - 07:59

पुनर्जन्म ,सत्य की आभास ? … (भाग 3)

सकाळी उठल्यावर ऑफिसला जायचा मूड नव्हता खरं तिला , पण आज काही महत्वाच्या मिटींग्ज होत्या त्या आटपून, हाफ डे टाकावा , चिकूला घेऊन बागेत जावं , म्हणजे तो खूष होईल तिने विचार केला . अभिषेकचा मेसेज आला होता , त्याची USA टूर लांबली होती, कदाचित अजून सहा महिने किंवा जास्त , तो चिकूला मिस करत होता , तिला रेझिग्नेशन द्यायला सांगून तिकडे बोलावत होता . एवढं सोप्प वाटतं का ह्याला हे ? एक सुस्कारा टाकून तिने आवरायला घेतलं . आरशासमोर जाताच तिचं मन नकळत कालच्या तिच्या पाहिलेल्या रूपाची तुलना स्वतः:शी करायला लागलं , छे काहीही साम्य नव्हतं . कुठे कालची ती निरागस , नकट्या नाकाची कोवळी , गावाकडची साधी सुधी पोर आणि शलाका ? तिशी क्रॉस करूनही आपला फॉर्म टिकवून ठेवलेली , केसांचा बॉब , हाय हिल्स , स्मार्ट फीचर्स , सतत ब्लेझर आणि जीन्स मध्ये वावरणारी .एका प्रथितयश कंपनीत मार्केटिंग मॅनेजर . काडीचही साम्य नव्हतं .खरंच आपला हा जन्म त्या मुलीचा पुनर्जन्म असेल का ? की ही आपल्या मनाने काहीतरी बनवलेली स्टोरी असेल ? hypnosis मध्ये काहीही घडू शकतं . पण मग आपण एवढे वाहवत का गेलो तिच्या स्टोरी मध्ये ? ती जणू काही आपली स्टोरी असावी असं आणि इतकं का मनाला लागलं ते ? का इतक्या वेदना झाल्या आपल्याला ? , का इतके तडफडलो आपण ? विचारांच्या नादात ऑफिस कधी आलं ते कळलं देखील नाही . गाडी पार्क करत असतानाच , तिला विहानचा फोन आला , “शलाका खालीच थांब ,आपल्याला मिटिंगला जायचंय , !.. “आणि तिच्याशी बोलत असतानाच तो समोरून उड्या मारत आला .
“अरे SSS इथेच होतास ना तू ? मग फोन कशाला केलास, कमाल आहे .आणि उडया काय मारतोयस सिनिअर आहेस तू मला , कमॉन behave yourself !.. ”
“ मग काय झालं ? तु दिसल्याच्या excitement मध्ये फोन केला मी !..” विहान तिला उल्हासाने म्हणाला आणि तिला हसू आलं,
“तू म्हणजे ना विहान मेषपात्र च आहेस एक “
“ते काय असतं?” , केसांची स्टाईल तिच्या गाडीच्या आरशात बघून नीट करत त्याने विचारलं .
“ मेषपात्र म्हणजे सॅम्पल, नमुना” ती म्हणाली, त्यासरशी तो हसला आणि शलाकाच्या डोक्यात काहीतरी क्लीक झालं. हे हसू कुठेतरी पाहिलं आहे मी. कुठे ? ? स्मृतीला जरा जोर देताना तिला धाडदिशी आठवलं कालचा ‘तो !’
...तिच्या हृदयाचे ठोके प्रचंड जलदगतीने वाढले. हा काय प्रकार आहे ? ती भेदरलेल्या चेहेऱ्याने विहानचं जसं जसं निरीक्षण करायला लागली , तसा तसा तिच्या अंगावरचा काटा सरसर वर जाऊन मस्तकापर्यत धडकला , हो तोच चेहेरा , तेच घारे डोळे , विहानलाही नियमित जीम ला जायची आवड आहे . लक्षात कसं आलं नाही आपल्या ?
ती चक्रावली .पण हा मग लहान कसा आपल्यापेक्षा ? आपसूकच त्याच्या हाताकडे तिचं लक्ष गेलं, जाडजूड चांदीचं कडं !..आपली शुद्ध हरपतीये की काय असं तिला वाटायला लागलं .
“काय गं ? अगं असं भूत पाहिल्यासारखं काय पाहतियेस माझ्याकडे? “
“ विहान, तू .. तुझ्या हातात,... हे कसं ?....कधीपासून?? “ कोरड्या पडलेल्या ओठांवरून जीभ फिरवत तीने कसबसं विचारलं.
“ कसं आणि कधीपासून म्हणजे? बावळट आहेस का? चोरून नाही आणलेलं काही मी, कमॉन , i can afford it …” तिच्या डोक्यावर टपली मारत विहान म्हणाला .
“तसं नव्हतं मला म्हणायचं ,खरं म्हणजे , तू , तुला मी काल , i mean .. … कसं सांगू तुला … ओह गॉड ! … please help me !.. “ ती असहाय्य पणे उद्गारली .
“शलाका ..काय होतंय बाळा तुला ? कॅन्सल करूयात का आजची मिटिंग ? “ विहानने तिला एकदम काळजीने विचारलं . अशा काळजी युक्त प्रेमळ उद्गारांची तिला सवय नव्हती . एकदम त्याच्या गळ्यात पडून खूप रडावं असं तिला वाटलं . त्याला गदागदा हलवावं , त्याच्या शर्टची कॉलर पकडून त्याला जाब विचारावा की का ? का? मीच का तळमळायचं ? तू कायमच कसा अनभिज्ञ राहू शकतोस ? प्रत्येक जन्मात ?.
पण खूप प्रयत्नपूर्वक तिने स्वतः:ला सावरलं . “नाही , मी ओके आहे आता ..चल निघुयात .ही मिटिंग कव्हर करून मला घरी जायचंय आज , आणि हो , मी या month मध्ये resign करीन कदाचित , अभिषेक चा मेसेज आला होता , मला USA ला बोलावतोय . चिकूला खूप miss करतोय तो . “ तिने मुद्दाम त्याच्याकडे रोखून बघितलं , त्याची प्रतिक्रिया बघायला .
“जा ना यार शलाका , एवढा मस्त चान्स आहे सोडू नकोस !.. “ तिच्या गाडीच्या आरशात आपली छबी न्याहाळत तो म्हणाला . “move on babe .. इकडे काय आहे या छपरी कंपनीत. सारखं पुढे पुढे जात रहावं , मम्मी नेहेमी म्हणते , एका जागी गुंतू नये कधी . “
“खरंच आहे तुझी मम्मी म्हणते ते ...एका जागी गुंतु नये कधी .फार महागात पडतं ते , कधी कधी अख्खा एक जन्म … “ मनाशी एक निश्चय करून तिने अभिषेक ला मेसेज टाईप करायला सुरूवात केली . “मी येतेय .. “

समाप्त !  

शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

छान. खरच अमेरीकेला जा म्हणावं. Sad कुठे गुंतते आहे. नको तो गुंता आणि डोक्याला शॉट. म्हणजे शलाका व अभिषेक दोघांच्या डोक्याला शॉट.

लगेच संपवलीत. छान वाटली. उत्कंठा वाढत गेली प्रत्येक भागात. अजून पुढे असेल असं वाटत होतं.

अरे शेवटपण झाला?.. लवकर लवकर संपवली असं वाटलं.. मला वाटल परत ती गतकाळात जाऊन सगळ्या गोष्टी माहित करुन घेईल. Happy