काळे ढग- पांढरे ढग

Submitted by salgaonkar.anup on 30 January, 2020 - 06:24

इंद्र देवाच्या दरबारात दोन गंधर्व गायक होते. दोघेही आपापल्या सुरांचे पक्के आणि गाण्यात तरबेज.
दोघांकडे सुरांची अशी काही जादू जी समोरच्याला मंत्रमुग्ध करेल, इंद्र दरबारी दोघे अप्रतिम गाणं सादर करायचे.
दरबारातीलच नाही तर स्वर्गलोकीचे सर्व देवही भान हरपून त्यांचं गाणं ऐकायचे
दोघांचाही देवलोकी भरपूर कौतुक व्हायचं.
त्या दोघांत फक्त एक फरक होता, तो असा कि एक गंधर्वगायक रंगाने कळा आणि एक गोरा.
त्यातल्या गोऱ्या गायकाला स्वतः च्या दिसण्याचा, मिळणाऱ्या सन्मानाचा फारच अभिमान झाला.
हाच अभिमान हळू हळू गर्वात बदलला. स्वतःपुढे तो सर्वाना कमी लेखू लागला, पदोपदी सर्वांचा अपमान करू लागला.
याउलट काळ्या रंगाचा गायक फारच शांत आणि सुस्वभावी होता.
एक दिवस इंद्रदेवाने त्या दोघांची एकदा परीक्षा घ्यायची ठरवलं.
राजगायकाच्या पदासाठी घेण्यात येणाऱ्या स्पर्धेसाठी दोघांनाही दरबारात बोलावून घेण्यात आलं.
जो गायक आपल्या गाण्याने धरती मातेला प्रसन्न करेल त्याला राजगायकाचे पद, सन्मान आणि इच्छित वर देण्यात येईल अशी घोषणा झाली.
सुरांची मैफिल सजली आणि या दोघात स्पर्धा रंगली. तबल्यावर थाप पडली, सतारीवर साज चढला तसे दोघांचेही सूर लागले. दोघांपैकी कुणीच माघार घेईना.
गोऱ्या रंगाच्या गंधर्व गायकाच्या गळ्यातून अहंकाराने बाहेर पडलेले उग्र सूर धरतीवर वणव्या सारखे पसरले, अनेक झाडे जळून खाक झाली, वृक्ष उन्मळून पडले आणि धरतीला तडे जाऊ लागले.
या उलट काळ्या रंगाच्या गंधर्व गायकाचे शांत सूर आभाळाला भिडले, आभाळ दाटून आले आणि पावसाच्या सरींनी धरती सुखावली.
निर्विवाद काळ्या गायकाला राजगायकाचा सन्मान मिळाला आणि गोऱ्या गायकाचा अहंकार धुळीला मिळाला
इंद्रदेवाने धरतीची विडंबना केलेल्या गोऱ्या गायकाचे पांढरे ढग तयार केले. जे आजही उन्हात उभं राहून आपल्या अहंकाराचं प्रायश्चित करत आहेत.
याउलट काळ्या गायकाचे देवाने काळे ढग तयार केले जे आजही आभाळी दाटून येतात, गडगडून सूर छेडतात, मनसोक्त बरसतात आणि सृष्टीला शीतलता प्रदान करतात.
म्हणूनच मित्रहोआपल्या दिसण्याचा किंवा असण्याचा कधीही गर्व करू नये. आपल्या जवळ असलेली कोणतीही विद्या आणि कला ही विनयेन शोभते.

शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

सुंदर आहे कथा!
अशा कथा दंतकथा म्हणून फुलवल्या ना, अजून मजा येते.
एक अनाहूत सल्ला देतो. ही कथा काढा, अजून फुलवा (संवाद वगेरे टाकून) आणि ग एक मस्त दीर्घकथा पोस्ट करा.
अप्रतिम कथा तयार होईल.