मूर्तिमंत भीती उभी , ...!..

Submitted by Sujata Siddha on 24 January, 2020 - 04:25

.

वाचकांस नम्र निवेदन : सदर  कथा हि निव्वळ मनोरंजनाच्या उद्देशाने लिहिली गेली आहे , त्यात कुठलेही खुसपट काढून वाद घालत बसू नये . !.. 

मूर्तिमंत भीती उभी . ...!.

“फडके आजी SSS , “मुक्ता ने बाहेरून हाक मारली , तशा फडके आजी लगबगीने किचन मधून बाहेर आल्या , कमरेला खोचलेल्या नॅपकिन ला हात पुसून दरवाजा उघडेपर्यंत मुक्ताचा हाकांचा सपाटा चालूच होता ,
“अंग हो हो आले ना !.. “
दार उघडून मुक्ताच्या पाठीत धपाटा घालत त्यांनी तिला दटावलं , “गधडे कित्ती वेळा सांगितलं कि बाहेरून अशा हाका मारत जाऊ नकोस , आणि बेल पण एकदाच बेल वाजवत जा म्हणून , मला म्हतारीला दारापर्यँत यायला वेळ लागतो . ”
“हीहीहीही , मुक्ता खिदळत आत आली , चप्पल काढून तिने प्रेमाने फडके आजींच्या गळ्यात हात टाकले ,आणि म्हणाली , “ कशी मज्जा केली “
“चल आगाऊ कुठली , बाजूला हो “ फडके आजी लटक्या रागाने तिचे हात बाजूला करत म्हणाल्या .
“खीखी खी … परत हसत , “आजी खमंग वास येतोय ,काय बनवलंय आज ? “ असं म्हणत मुक्ता बाथरूम मध्ये जाऊन हात पाय धुऊन आली .
“ भाजणीचं थालीपीठ !.. नानू कुठे आहे , आज आला नाही तुझ्या सोबत तो ? “ आत किचन मधून थालीपीठ उलटता उलटता आजींनी विचारलं .
“येईल हो तो कुठे जाणार , खाली बसला असेल क्रिकेट खेळत मुलांबरोबर “
“हे काही बरोबर नाही हो मुक्ते , बोलावं आधी त्याला वर , आई बाबा व्हायची वेळ झाली तरी तुम्ही दोघेही लहान मुलांसारखे वागता अजून .” बोलता बोलता फडके आजीं किचनच्या खिडकीतून बाहेर डोकावल्या , अनिरुद्ध खालीच खेळत होता. पाठीमागे वळून त्याच्याबद्दल काही बोलणार तेवढ्यात त्यांचं लक्ष एकदम मुक्ताच्या चेहऱ्याकडे कडे गेलं , ती गंभीर झाली होती .
‘बाळाचं’ नाव काढलं कि एरवी वाक्या- वाक्याला खिदळणाऱ्या हिचं काय बिनसतं ,ते एका भगवंतालाच ठाऊक .. फडके आजी मनातल्या मनात पुटपुटल्या . टेबलाशी बसलेल्या मुक्ता समोर गरम गरम थालीपीठ आणि वर लोण्याचा गोळा असेलली डिश ठेवत , त्या तिच्या पुढ्यात बसल्या ,आणि प्रेमाने म्हणाल्या “ घे गं माऊ खा ..गरम गरम छान लागतं , हापिसातून दमून आली असशील “
“ हीहीही . हे काय आजी बाकी सगळं शुद्ध बोलायचं आणि ऑफिस ला मात्र हापिस म्हणायचं . “
“अगं चालायचंच , तू कशाला मेले चुका काढतेस , आजे सासू म्हणून काहीतरी मान ठेव की “ हे असं म्हटलं कि मुक्ता जीभ चावत असे , थोडावेळ ती शांत बसे , पण परत पहिले पाढे पंचावन्न . हीहीही- हूहूहू ,
दोन वर्षापुर्वी लग्न ठरलं तेव्हापासून मुक्ताची आई एकच पालुपद लावून होती , “ “मुक्ते सासरची माणसं खूप चांगली मिळाली तुला पण तू शिस्तीत रहा बाई , मला त्यां लोकांची काळजी वाटते . “
अनिरुद्ध जेव्हा मुक्ताला पहायला आला तेव्हा त्याच्याबरोबर त्याचे आई-बाबा , काका काकू , त्यांची मुलं ,आईच्या आई , बाबांच्या आई , असा सगळा फौजफाटा आलेला , मुक्ता बघताच राहिली , आईच्या आईला ‘ फडके आजी’ , आणि बाबांच्या आईला ‘लेले आजी’ असं त्याचं नामकरण झालेलं . दोघीही चांगल्या टुणटुणीत वाटलेल्या मुक्ताला . मुक्ताच्या आईला आधी काळजी वाटली होतीच कारण २८ व वर्ष लागलं तरी मुक्ता तशी अल्लड होती , येता जाता प्रत्येक वाक्यावर खिदळायची तिला सवय होती , त्यात एवढ्या संख्येने घरात वृद्ध मंडळी असल्यावर त्यांना हे आवडणार का ? पण त्यांच्या कल्पनेपेक्षा कितीतरी अधिक पटीने मुक्ता त्या घरात सामावून गेली ह्याला कारण मुक्ता पेक्षा लेले मंडळी खूपच adjustable होती , मुक्ताला त्यांनी आपल्यात घेतलं ,घरात अनिरुद्ध जसा लाडका तशीच मुक्ताही लाडकी झाली , फडके आजी दोन घरं सोडून पलीकडे राहत असत आणि लेले आजी शेजारी वेगळ्या फ्लॅट मध्ये राहत होत्या. त्या दोघींची अहमिका चालायची मुक्ताचे कोण जास्त लाड करतंय यासाठी , एक -दोन वर्ष अशा कोड कौतुकात निघून गेली आणि घरात पाळणा हलला पाहिजे यावर सगळ्यांची चर्चा सूरू झाली . तसं मुक्ताचं धाबं दणाणलं , तिला अपेक्षित होतं , तेच समोर यायला लागलं . बाळंतपणाचा तिला भयंकर फोबिया होता . डिलिव्हरीच्या वेळी आपण मरून जाणार अशी एक भयंकर भीती लहानपणापासून तिच्या मनात ठाण मांडून बसली होती ,लहानपणी कधीतरी कुणाच्या बाबतीत घडलेल्या घटनेचा तिच्या मनावर खूप विचित्र परिणाम झाला होता , इतके दिवस त्याचा तिला त्रास झाला नव्हता पण आता संकट समोर येऊन उभं राहिल्यावर , मनात कुठेतरी खोलवर दडलेली भीती उफाळून बाहेर यायला लागली होती , मुक्ताच्या एरवीच्या वागण्याकडे बघता तिला असा काही त्रास असेल हे एकतर कोणाला कळलं नव्हतं आणि कळालच तर त्यात सिरिअस असं काही कोणाला वाटण्याचं कारण नव्हतं . ती जशी एरवी अल्लड्पणे वागत असे त्याकडे बघता हि गोष्टही सगळ्यांकडून हसण्यावारीच नेली गेली . .
“फडके आजी SSSSS येताय ना देवळात ? “ रस्त्याच्या पलीकडे थोड्या अंतरावर रामाचं मंदिर होतं , आजुबाजुच्या घरातल्या माने काकू , बडवे काकू , इंगळे ताई , सगळ्या मिळून संध्याकाळी मंदिरात जायच्या , फुलवाती वळत प्रवचनं , कीर्तनं ऐकायच्या , कधी कधी स्वतः:हि ताल वाजवून भजनं म्हणायच्या .
“हो हो आले आले “ मग मुक्ताकडे बघून म्हणाल्या ,” आटप गं लवकर खा , मला देवळात जायचंय .”
“ आजी मी पण येऊ ? “ मुक्ताने विचारलं तसं फडके आजींना आश्चर्य वाटलं.
“चल की , “ त्या आनंदाने म्हणाल्या
त्यांच्या हातातली फुलवाती , निरंजनाची पिशवी डाव्या हातात घेऊन ,उजवा हात त्यांच्या हातात गुंफून मुक्ता निघाली . खाली सगळ्याजणी वाट पाहत उभ्या होत्या , मुक्ताला फडके आजींसोबत बघून सगळयांना कौतुक वाटलं ,सगळ्याजणी मिळून मंदिरात गेल्या , मुक्ताने अर्थातच त्यांना मंदिरात जास्त वेळ बसून दिलं नाही , सगळयांना घेऊन ती समोरच्या बागेत गेली , मग हिरवळीवर बसून ओली भेळ खात त्यांच्या भरगोस गप्पा झाल्या , मुक्ताने वेगवेगळ्या नकला करून त्यांना हसवलं , अंधार वाढला तसा सगळ्याजणी अनिच्छेनेच उठल्या , ‘परत कधी येशील मुक्ता ? “ कोल्हे काकूनी खूप अधीरतेने विचारलं , आज बऱ्याच दिवसांनी त्या इतकं पोट भर हसल्या होत्या “ हीहीही ,येईन की नेहेमी , त्यात काय ? “ हिरवळीजवळच्या छोट्या खड्ड्यात साठलेलं पाणी पायाने उडवत ,नेहेमीसारखी खिदळत मुक्ता म्हणाली,
“हो पण आता एकटीने नाही यायचं हं “ माने काकू हातांनी बाळ जोजवल्याची action करत म्हणाल्या , “हयाचा विचार करा आता , झाले कि दोन वर्ष लग्न होऊन “ फडके आजीनी धास्तावून मुक्ताकडे बघितलं , त्यांच्या अपेक्षेप्रमाणे ती गंभीर झाली होती , क्षणात त्यांच्या हातात पिशवी देऊन ती पुढे निघून आली. दिवसेंदिवस हा प्रश्न जटील होत चाललाय असं मुक्ता ला वाटायला लागलं , तिच्या मनातली भीती कोणाकडेही ती व्यक्त करू शकत नव्हती ,कारण त्याचं गांभीर्यच त्याना कळत नव्हतं . सगळ्यात जास्त तिची खिल्ली कोण उडवत असेल तर तो अनिरुद्ध . त्यामुळे मुक्ताला गप्प बसण्याशिवाय पर्याय नसायचा . कितीही काकुळतीला येऊन सांगितलं तरी यांना ते कळणार नाही आणि पर्यायाने आपलं मरण अटळ आहे अशी धास्ती तिला वाटायला लागली अशातच एके दिवशी मुक्ताला कोरड्या वांत्या सुरू झाल्या, इतकी काळजी घेऊनही दिवस राहिलेच याचं मुक्ताला खूप वाईट वाटलं पण दुसरीकडे मात्र या बातमीसाठी आसुसलेल्या सगळ्यांच्या मनात आनंदाचं जणू उधाण आलं . लेले आजी , फडके आजी तर घरी राहायलाच आल्या , दोन आजे सासवा , एक सख्खी सासू आणि एक चुलत सासू यांच्या कोडकौतुकात मुक्ता न्हाऊन गेली, बाळ गोरं व्हायला हवं म्हणून सकाळी तिला चांदिच्या वाटीत अस्सल केशराची काडी उगाळून दूध प्यायला द्यायचं काम फडके आजीनी घेतलं तर बाळाची स्किन चांगली तजेलदार रसरशीत व्हायला हवी म्हणून रोज फळं कापून द्यायचं काम लेले आजी करायच्या, बाळ संस्कारी हवं म्हणून आजोबा संस्कृत श्लोक,ऋचा, यांचे पाठ, बुद्धिमान व्हावं म्हणून अथर्वशीर्षाची आवर्तनं येता जाता करायला लागले , मुक्ता आसपास वावरत असेल तर तिच्या आणि पर्यायाने पोटातल्या बाळाच्या कानावर पडेल अशा हेतून ते आवाज कमी जास्त करायचे , अनिरुद्धने तर कृष्णाची कितीतरी पेंटिग्ज घरात आणून लावली ,भरपूर खेळणी आणि पाळणे यांनी तो प्रशस्त बंगला भरून गेला . , सर्वांची अशी उत्साहाने जय्यत तयारी चालू असताना मुक्ता मात्र सतत धास्तावलेली असायची , जसे महिने जातील तशी ती आपले किती दिवस शिल्लक राहिलेत याचं एकीकडे मनात काउंट डाऊन करायला लागली ,आपलं बाळ ,आपली प्रेमळ माणसं, अनिरुद्ध यांना सोडून जावं लागणार याची भीती तिच्या मनावर इतकी कब्जा करून बसली कीं ,ती दिवसेंदिवस सुकत चालली , तिच्या चेहेऱ्यावर टवटवी येईना , सगळयांना वाटलं डोहाळे कडक लागलेत ,फडके आजी गालावरून हात फिरवीत म्हणायच्या ,’धीर धर हो मुकते अजून थोडाच काळ सहन करावं लागणार , मग एक तुझ्याच सारखं लोभस गोंडुल खेळणं तुला मिळालं कि सगळ्या वेदना विसरून जाशील’. ‘खेळायला मी जिवंत तर असले पाहिजे ‘, मुक्ता मनात म्हणे आणि शहारून जाई . जसे जसे दिवस भरत चालले तशी एरवी सतत खिदळत राहणाऱ्या मुक्ताचं हसणं पूर्ण बंद झालं ,
एकदा असंच रेग्युलर चेक अप ला जेव्हा ती दाते बाईंकडे गेली तेव्हा त्यांनी पाहिलं की हिचं B.P. खूप लो झालंय , खाणं कमी झालंय ,होमोग्लोबीन तर अगदी आठ वर आलंय , चेक अप करून झाल्यावर अनिरुद्ध ला बाहेरच बसवून त्या तिला आत त्यांच्या रेस्ट रूम मध्ये घेऊन गेल्या ,” मुक्ता , लेल्यांच्या सगळ्या सुनांची बाlळांतपणं मी केलीयेत ,अगदी तुझ्या सासूचं पण , तेव्हा माझ्यापाशी सगळं मोकळेपणानं बोलायचं , खरं खरं सांगायचं , काय होतंय तुला बाळा ?”
मुक्ताच्या डोळ्यातून अश्रू वाहायला लागले , दाते बाईनी तिचे दोन्ही हात हातात घेतले , आणि त्यावर थोपटलं,
“ हे बघ rest assure , मी कोणालाही काही बोलणार नाही, तुझं B.P खूप लो होतंय सारखं, कशामुळे ? तु Hb count एवढा कमी झालाय , असं व्हायचं काय कारण?तुझ्या सासूबाई म्हणत होत्या कि ती जेवत नाही , खात नाही सारखी गंभीर होऊन वावरत असते ,सांग बरं तुला नक्की काय प्रॉब्लेम आहे बाळ ? अगदी मोकळेपणानं सांग ”
मुक्ताने काही नाही अशा अर्थाने मान हलवली , पण अश्रुधारा चालूच होत्या .
“हे बघ मुक्ता तुला रक्ताची बॉटल चढवावी लागेल आणि तुझं B.P जर असंच राहिलं तर बाळंतपणाच्या वेळेस तुला धोका उत्पन्न होऊ शकतो , कळतंय का तुला ? “ दाते बाईंनी असं म्हणताच मुक्ताच्या चेहेऱ्यावर धक्का बसल्याचे भाव आले आणि ती डोळे विस्फारून त्यांच्याकडे बघायला लागली , “ हो ना ?म्हणजे तुम्हालाही कळलं ना ? “
“काय कळलं ? “ दाते बाईंनी काही न समजून तिला विचारलं (आधीच तिच्या नाजुक अवस्थेत आपण नको ते बोललो याचा त्यांना पश्चाताप होत होता )
“हेच की डिलिव्हरीच्या वेळेस मी मरणार आहे म्हणून ? “ मुक्ता भेदरून म्हणाली .
“अगं तू मरणार असं कुठे म्हटलं मी वेडे ‘?”
“ तुम्ही म्हटला नाहीत पण मला माहितीये , मी ऑपरेशन थिएटर मध्ये जाणार आणि येताना मला पांढऱ्या कपड्याने झाकून आणणार “
, “बाळा ही नवीन information , तुला कोणी दिली? “
“नवीन नाही काही ,जुनीच आहे . मी ८-९ वर्षांची होते तेव्हा हॉस्पिटल मध्ये गेले होते , माझ्या आजोबांना बघायला ,त्यांच्या रूमच्या समोरच डिलिव्हरीचं सेक्शन होतं , आजोबांपाशी मला बसवून बाबा त्यांचं औषध आणायला गेले होते , कंटाळा आला म्हणून मी रूमच्या दारात उभी होते , तेव्हा पाहिलं मी , दोन जणी डिलिव्हरीसाठी आत गेल्या , आणि येताना त्यांच्या अंगावर पांढरं कापड टाकून आणलं ,तेव्हा तिकडच्या बायका एकमेकींना म्हणत होत्या डिलिव्हरीत या दोघी मेल्या म्हणून . “ सांगत असताना मुक्ताच्या चेहेऱ्यावर प्रचंड भीती दाटून आली .
एक क्षणभर कपाळावर हात मारून घ्यावा असं दाते बाईनां वाटलं , पण त्यांनी स्वतःला कंट्रोल केलं ,
चेहेऱ्यावर कसंबसं हसू आणत त्या तिला म्हणाल्या,” “मुक्ता तुझी काहीतरी गल्लत होतेय ..एकदम दोघी आत कशा जातील ? आणि लगेच मरून बाहेर कशा येतील ?”
“अहो नाही डॉक , मी थांबले होते आजोबांजवळ बराच वेळ , त्या दोघी एकापाठोपाठ एक गेल्या “
“बरं पण त्या गेल्या म्हणजे तु जाणार , हे गणित तू कसं काढलंस ,? “
“ कारण त्यां जेव्हा ओरडत आत गेल्या त्या दोन्ही वेळेस मी रूमच्या दारात उभी राहून त्यांना बघत होते, आणि
त्या दोघी माझ्याकडे बघून ओरडत होत्या.”
“ अगं त्या तुझ्याकडे बघत नसतील राजा, वेदना असह्य होतात अशा वेळेला कळत पण नसतं आपण कुठे बघतो काय करतो”
“ असं कसं ,चांगली मान वर करून बघत होत्या आणि ओरडत होत्या माझ्याकडे बघून “
“ बरं बघत असतील तुझ्याकडे , पण मग त्याने काय होणार ? “ दाते बाईंनी थकून विचारलं
“ सुज्ञा ताई म्हणाली की त्या तुझ्याकडे बघत होत्या , म्हणजे तिसरा नंबर तुझा , ‘ईजा , बीजा आणि तिजा ‘
असं असतं नेहेमी “ मुक्ता हताश पणे म्हणाली .
“ आता हि सुज्ञाताई कोण ? “
“माझी चुलत बहीण “
“ हो ? किती डिलिव्हऱ्यांचा अनुभव आहे तिला ? “
“ हीहीही , अहो ती लहान होती तेव्हा डॉक , माझ्यापेक्षा थोडी मोठी होती , पण तशी लहानच होती “ मुक्ता खूप दिवसांनी पूर्वीसारखी हसली , तसं दाते बाईंना बरं वाटलं .
“मुक्ता ,तुझ्या सुज्ञाताईचं सोड , तू आता आई होणार आहेस , तुला वाटतं ना बाळ तुझ्यासारखं हुशार ,लाघवी आणि हसरं व्हावं ? “
“ हो “
“मग मला एक सांग , तू मास्टर्स डिग्री घेतलेली मुलगी , हसणं खिदळणं जाऊदे पण तशी wise गर्ल आहेस , मग हे असं irrational थिंकिंग का करतेस ?”
“माहिती नाही “ ...एक दीर्घ सुस्कारा टाकून मुक्ता पुढे म्हणाली . , “लहानपणीचा तो प्रसंग आणि त्यानंतरचं ते सुज्ञाताईचं बोलणं माझ्या मनावर इतकं बिंबलंय कि पुसता पुसलं जात नाही . “
“कधी प्रयत्न केलायस हि भीती घालवायचा ? “
“नाही , कशी घालवणार, ही नुसती भीती नाहीये काही ? ,हे असं घडणारच आहे डॉक . तुमचं काय म्हणणं आहे असं घडणार नाही ?आत्ताच तर तुम्ही म्हणालात कि B.P असच लो राहीलं तर डिलिव्हरीच्या वेळेस धोका उत्पन्न होऊ शकतो “ मुक्ता ज्या पद्धतीने ठाम पणे बोलत होती दातेबाईना किंवा आली तिची .
“होऊ शकतो , पण जर तू मनात असे चुकीचे विचार आणले नाहीस आणि खाण्यापिण्याकडे नीट लक्ष दिलंस तर , नीट ट्रीटमेंट घेतलीस तर तुझं B.P normal होईल आणि तुला काहीही होणार नाही.”
“खरंच ? “
“१००% खरं , अ डॉक्टर्स प्रॉमिस !! “
“नाही हो मला तुमच्यावर विश्वास ठेवायची भीती वाटते “ मुक्ता खाली मान घालून म्हणाली
“मुक्ता तू ना मनाच्या आहारी गेलीयेस ..”
“म्हणजे ? “
“म्हणजे माणूस दारूच्या आहारी जातो , सिगारेटच्या आहारी जातो , ड्रग्जच्या आहारी जातो , तशी तू मनाच्या आहारी गेली आहेस . “ दाते बाई तिच्याकडे रोखून बघत म्हणाल्या .
“मला नाही कळलं “ मुक्ता ने काही न समजून विचारलं .
“मी कमीतकमी १००० किंवा त्याहूनही जास्त डिलिव्हऱ्या केलेली , पांढरे केस झालेली एक डॉक्टर तुला सांगतेय त्यावर तू विश्वास ठेवायला तयार नाहीस आणि ती कोण कुठली १०-१२ वर्षांची सुज्ञा तिच्यावर तुझा विश्वास आहे , याचाच अर्थ तू बुद्धी वापरत नाहीस , म्हणजेच तू मनाच्या आहारी गेलीयेस . “ अतिशय क्लान्त होऊन दाते बाईंनी शेजारी झाकून ठेवलेल्या काचेचा पाण्याचा ग्लास तोंडाला लावला . एक घोट घेऊन त्या पुढे म्हणाल्या ,
“हे बघ बेटा ,Mind can be your best friend or your worst enemy , परमेश्वराने आपल्याला दोन डोळे , दोन कांन , नाक एक असलं तरी दोन नाकपुड्या असे जवजवळ सर्वच अवयव दोन दोन दिले , आपण वापर करताना दोन्हीचा करतो , का तू एका डोळ्याने बघतेस ? , एका कानाने ऐकतेस ? आणि एकाच पायाने चालतेस ?”
“डॉक मला कळलं , तुम्हाला काय म्हणायचंय , मी या बाबतीत बुद्धी आणि मन दोन्हीचा वापर केला पाहिजे .”
“हं ..एक्झॅक्टली , बुद्धी जर तुला सांगत असेल कि असं काही नसतं तर तू मनाचं न ऐकता बुद्धीचं ऐकलं पाहिजे “
“बरोबर आहे , पण मनाचंच बरोबर असेल तर ?”मुक्ताने शंका काढली ती दाते बाईंना अपेक्षितच होती
“ नाही , मन उच्शृंखल असतं , माकडासारखं त्याचं तू सगळं ऐकत बसलीस तर ते तुला सगळीकडे नाचवत बसेल , म्हणून तर भगवंताने हृदय खाली आणि मेंदू वर दिलाय बाळा !.. मनाला आपल्या ताब्यात ठेवता आलं पाहिजे , त्याचं सगळं ऐकायचं पण ते आधी बुद्धीच्या निकषावर घासून बघायचं , नाही तर आपण त्याच्या आहारी जातो आणि मग addiction मुळे काय काय होतं ते तुला माहितीच आहे , बघ तुझी हि अवस्था त्यामुळेच तर झालीये , गरोदर पण एन्जॉय नाही करू शकलीस तू त्यामुळे , आपल्या बाळाशी हितगुज करता आलं नाही तुला,लाड नाही करता आले त्याचे , ते तुझ्या जवळ येऊन आता सात महिने होत आले “
“हो ना “ मुक्ताने खंत वाटून अतीव प्रेमभराने स्वतः:च्या पोटावरून हात फिरवला .
“पण खरच मी मरणार नाही ना ? “
“मुळीच नाही , मी प्रॅक्टिस सोडून देईन , मी बोलतेय ते खोटं ठरलं तर , तेव्हा आता एन्जॉय करायचं , मनात कुठल्याही फालतू शंकांना स्थान द्यायचं नाही , कळलं ? “ दाते बाईंनी खुर्चीतून उठता उठता तिला बजावलं .
“हो डॉक तुम्ही म्हणता ते बरोबर असेल , मी खरच बुद्धी वापरत नाहीये ,हि भीतीच असेल आणि ती घालवण्याचा मी मनापसून प्रयत्न करीन. मी अशा पद्धतीने कधी विचारच नव्हता केला Thank you so much !.. “मुक्ता पोट सांभाळत उठली .
“सावकाश उठ , आणि अनिरुद्ध आहे का बघ बाहेर ,मला वाटतं तो गेला कंटाळून निघून .”
“हीहीही नाही जायचा , झोपला असेल खुर्चीत बसल्या बसल्या , त्याला झोपायला फार आवडतं , कुठेही झोपतो,”
बोलत बोलत त्या दोघी बाहेर आल्या , अनिरुद्ध खरोखरच झोपला होता. मग दोघी मनमुराद हसल्या .
यथावकाश मुक्ताची प्रसूती होऊन तिने एका गोंडस बाळाला जन्म दिला , त्याच्या बारशाला दाते बाई आवर्जून उपस्थित राहिल्या कारण त्यांना ‘सुज्ञा ‘ ला बघायचं होतं , नाही म्हटलं तरी तिचा , मुक्ताच्या मनावरचा इम्पॅक्ट घालवायला त्यांना फार प्रयास पडले होते , हॉल मध्ये गेल्या गेल्या त्यांनी एका लहान मुलीला विचारलं तीने समोर पाळण्यापाशी उभ्या असलेल्या साधारण तिशीच्या आसपास असलेल्या एका गोऱ्यापान स्त्रीकडे बोट दाखवलं , ती मुक्ताला काहीतरी सांगत होती , “ हे बघ मुक्ते बाळ गुटगुटीत होण्यासाठी ,आणि निरोगी राहण्यासाठी तुला सात्विक अन्नच खाल्लं पाहिजे , उगाच काहीतरी अबरचबर खाऊ नकोस नाहीतर .. “
“ नाहीतर बाळ त्याच्या ‘सुज्ञा मावशीसारखं’ चटोर होईल ..हो की नाही …” तिचं वाक्य वरच्यावर झेलत दातेबाईनीं एंट्री केली आणि मुक्तासकट सर्व लेले -फडके मंडळी हास्याच्या फवाऱ्यात रमून गेली. !!!...

शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

भारी आहे. मला हे खालचं वाक्य फार आवडले. छान आहे कथा. Happy

<<<<<< नाही , मन उच्शृंखल असतं , माकडासारखं त्याचं तू सगळं ऐकत बसलीस तर ते तुला सगळीकडे नाचवत बसेल , म्हणून तर भगवंताने हृदय खाली आणि मेंदू वर दिलाय बाळा !.. मनाला आपल्या ताब्यात ठेवता आलं पाहिजे , त्याचं सगळं ऐकायचं पण ते आधी बुद्धीच्या निकषावर घासून बघायचं , नाही तर आपण त्याच्या आहारी जातो >>>..

रश्मी,  Minal Hariharan , urmilas  ,  स्वाती मन:पूर्वक धन्यवाद ! 
@नौटंकी : तुमच्यावर पण 'सुज्ञा ताई ' चा प्रभाव आहे की  काय Lol Lol :