टेक्सास चे भूत (काल्पनिक गूढकथा)

Submitted by तुषार पेडणेकर on 23 January, 2020 - 03:15

ती फारच गप्पिष्ट, त्यात चार महिन्यांचा विरह! विमानतळावरून मी नवीनच घेतलेल्या घरी येताना तासाभराचा रस्ता संपला कधी ते ही आम्हाला कळले नाही. उरलेला दिवस सामानाची आवरावावर करण्यात गेला. रात्री वरण भात जेवून गादीवर पडलो. जुन्या स्पर्शांची मला नव्याने ओळख होत होती, पण मनात चलबिचल वाढतच होती. तरी त्या आनंद तरंगात शरीरापासून विलग अवस्थेत मी हेलकावे घेत होतो. हेलकव्यांची तीव्रता इतकी वाढली की मी भानावर आल्यावर मला कळले की ती मला जागं करत होती!

"मला झोप येत नाही!"

"तुझा जेट लॅग आहे म्हणून असेल"

"नाही, मला त्या घड्याळाच्या आवाजाने झोप येत नाही"

उत्साहात अँटिक म्हणून आणलेल्या घड्याळाचा लोलक थांबवून मी परत सुप्त अवस्थेची आळवणी करू लागलो.

दुसऱ्या दिवशी ऑफिसमधून आल्यावर दारातच हिने आवेगाने घातलेल्या घट्ट मिठीचा अर्थ समजायला मला काही क्षण गेले, तिच्या गालावर अश्रू होते - श्रीमंतीत आणि गोंधळात वावरलेली पोर ती. आई वडिलांशिवाय आता एकटीच उरली होती - प्रेमाने मी थोपटताच बांध फुटला. ओक्साबोक्शी रडू लागली. खाली बसवत तिला पाण्याचा पेला हातात दिला आणि तिच्या शब्दांची वाट पाहू लागलो.

थोड्यावळाने जेमतेम शब्द बाहेर पडले, "मला...इथे... नाही राहायचे!" दुसऱ्याच दिवशी अशा समर प्रसंगाला मी तयार नव्हतो. मी तिला आणखी थोड्या महिन्यासाठी परत जाणार का ते विचारले. पण तिची तयारी नव्हती. मी बराच वेळ शांतच होतो. "आपल्या बाल्कनीतून इतके सुंदर दृश्य दिसते. निरभ्र आकाश, हिरवळ पण चित्र काढणारा त्यात आत्मा ओतायचा विसरला! सकाळ, दुपार, संध्याकाळ त्यात बदल काही होतच नाही. ना प्राणी पक्षी दिसत ना माणूस! नाही म्हणायला त्या समोरच्या झाडावर एक गिधाड येऊन बसले होते. हो, गिधाडच होते ते! निसर्ग पाहून आपण शांत होतो पण ह्या दृष्यातील भयाण शांततेने मला खूप विचलित केले आहे. मी नाही राहू शकत इथे अशी!" धरण फुटून पाण्याचा लोंढा माझ्या अंगावर आला. काहीतरी समजुत काढून मी वेळ मारून नेण्याचा प्रयत्न केला. दुसऱ्या दिवशी सुट्टी घेऊन जवळपास फिरून आलो, काही मित्रांना भेटलो आणि येताना टिव्ही आणला. पण ह्या शांततेच्या भुतावर टिव्हीचा उतारा फार काळ टिकला नाही. मग सकाळीच मी तिला वाचनालयात तर कधी मॉल मध्ये सोडू लागलो. वाचनालयात जाऊन नोकरीच्या शोधात तिचा जीव रमला!

महिन्याभरातच टेक्सास मधून इंटरव्ह्यू चा एक कॉल तिला आला. इंटरव्ह्यूचे सोपस्कार संपवायला तिला तिथे मुक्काम करावा लागणार होता. "इथे आपण दोघे असूनही मी कधी कधी अजून तो पहिला दिवस आठवून विचलित होते. तिथे कसे होईल दोन दिवस? त्यात तिथे माझी वेळ दोन तास पुढे!" ह्या शंकेला मी वरकरणी आव आणून उत्तर देत होतो.

ठरल्यप्रमाणे रविवारी संध्याकाळी ती टेक्सास ला हॉटेलमध्ये पोचली. सारं काही शांत शांत आणि त्यात हॉटेलची खोली, चार भिंतीत आपण गुदमरत आहोत असे तिला वाटू लागले. रुममधील फोन वरून बोलताना तिची चलबिचल जाणवली आणि असहाय्य वाटू लागले. आपणच तिला ह्यात लोटले असे झाले. तरी गप्पा मारून ती अकराला झोपली. तासाभरात मी ही माझे काम उरकून झोपलो. तिने ज्या जीवघेण्या शांततेत दिवस काढला होता तिथे मला रात्र काढायची होती. आज मला तिचे म्हणणे कळले. कान बधीर करणाऱ्या शांततेत मी गुंगु लागलो. झोपेत तिच्या पैंजणांचा आवाज ऐकू येत होता. पण थोड्याच वेळात त्याची कर्कशता वाढली आणि दचकून जागा झालो तर फोन ठणठणाट करत होता. अत्यंत घोगऱ्या आवाजात माझे नाव घेत कोणीतरी बोलत होते. मला भानावर यायला दोन मिनिटे लागली. तिचाच आवाज होता पण इतका घोगरा? मी ही दबक्या आवाजात विचारले "काय झाले?". परत घोगरा आवाज आला, "इथे अचानक टिव्ही चालू झाला आहे. मुंग्या मुंग्या दिसत आहेत." खोलीत कोणी शिरले असेल की भुताटकी? झोपेत क्षणभर मला ही काही सुचेना. "अरे बोल ना, असे कसे झाले असेल? मी झोपताना तर टिव्ही बंद होता." मला टायमरची शक्यता वाटली. असेल असेल करत फोन चालू ठेवून ती टिव्ही बंद करून आली. थोडा वेळ बोलून झोपायला मला मध्यरात्र झाली. मला जरा झोप लागते तोच परत ठणठणाट! मी परत घोगरा आवाज कानावर पडणार असे वाटून पडल्या पडल्या फोन घेतला. अत्यंत लडिवाळ आवाजातले सुप्रभात ऐकू आले आणि माझी नजर घड्याळावर गेली. ते पहाटेचे पाच दाखवत होते. म्हणजे मला झोप लागली की नाही ह्या संभ्रमात मी तिची झोप झाली का विचारले. ती चांगलीच फ्रेश आणि तासाभरात इंटरव्ह्यूला निघण्याच्या उत्साहात होती! दिवस चांगला जावो म्हणत आम्ही फोन ठेवला. थोडावेळ लोळून मी ही उठलो.

"अरे सगळे छान झाले. कदाचित मला तिथूनही काम करता येईल" संध्याकाळी ही तिचा आवाज उत्साही होता. गप्पात तिने बाहेरून आणलेले जेवण उरकले. "सकाळी एक सांगायचे राहिले की सहाला मी उठले तर टिव्ही सुरूच होता. मध्येच परत सुरू झाला असणार!" "एक काम कर तू आज प्लग काढून झोप. कालसारखे मला दचकवून उठवू नकोस!" झोपताना परत एकदा फोन झाला. मला झोपायला अकरा वाजले. कालपेक्षा आज शांतता सुसह्य वाटत होती. मध्यरात्री असह्य आवाजात फोन वाजला. परत तसाच घोगरा आवाज! प्लग काढायचा विसरली होती. साधारण तीच वेळ असल्याने टायमर असणार असे म्हणून प्लग काढायचे ठरवले. पण तिला शंका तरीही टिव्ही सुरू झाला तर? थोडक्यात तिला फोन ठेवायचा नव्हता.

मी तिला फोन सुरू ठेवून कानापशी ठेवायला सांगितले. गप्पा मारता मारता ती झोपली होती. फोन सुरूच होता. टिव्हीचा प्लग काढून ती जरी झोपली असली तरी मी जागाच होतो. मधूनच फोन कानाला लावून काही आवाज येतो ते ऐकत होतो. माझे ही डोळे मिटू लागले.

ठरल्या वेळी माझा अलार्म वाजला म्हणून मी कानाला फोन लावला आणि माझ्या कानावर घुसमटण्याचा हात पाय झाडण्याचा आवाज आला. ठरल्याप्रमाणे कार्य उरकले होते तर.

मनात एका विलक्षण सुखाचा उसासा घेऊन मी माझ्या मैत्रिणीच्या कुशीत शिरलो.

मूळ लेखक - तुषार पेडणेकर, अनुवादक आणि सह लेखक - राजो

Group content visibility: 
Public - accessible to all site users

मस्त!!

बॅकस्टोरी अशी आहे की ती त्याची बायको आहे आणि ती खूप श्रीमंत आहे. तिच्या पाठी कुणी नाही आहे. श्रीमंती चा वारसदार मग कोण?

ते गूढ आहे. मला ही समजले नाही !!! Happy
>>मग नाही लॉजिकल वाटली ही गोष्ट. त्याने काहीतरी केल्याशिवाय तो मैत्रिणीच्या कुशीत कसा निवांत झोपणार ?

मग नाही लॉजिकल वाटली ही गोष्ट. त्याने काहीतरी केल्याशिवाय तो मैत्रिणीच्या कुशीत कसा निवांत झोपणार ?>>> कर्रेक्ट!