गुड न्यूज - चित्रपट परीक्षण

Submitted by सनव on 28 December, 2019 - 16:35

गुड न्यूज चा ट्रेलर बघून एकूण चित्रपट धमाल विनोदी असणार हा अंदाज होताच. थिएटरमध्ये जसं टेस्टी यम्मी जंक फूड मिळतं तसा हा मुव्ही टाईमपास आहे.

दीप्ती (करीना कपूर खान) आणि वरुण (अक्षय कुमार) बत्रा हे श्रीमंत, करियर माइंडेड जोडपं. मूल हवं म्हणून एका आयव्हीएफ क्लिनिकमध्ये जातात. तिथे दुसरं एक जोडपं असतं - दिलजीत (हनी) आणि कियारा (मोनिका) बत्रा. एकाच आडनावाच्या दोन जोडप्यांच्या आयुष्यात स्पर्मची अदलाबदल झाल्यामुळे जो काही गोंधळ होतो त्याला विनोदी ढंगाने दाखवलं आहे.

अक्षय कुमार आणि करीनाने चित्रपटात धुमाकूळ घातला आहे. त्या तुलनेत हनी आणि मोनिका तसे दुय्यमच ठरतात. यशस्वी , लग्नाला 7 वर्ष झालेल्या जोडप्याला मूल नसण्यावरून विचारले जाणारे प्रश्न, त्यांच्यावरचा दबाव आणि त्यातून नात्यावर येणारा ताण हे सर्व चित्रपटात नेमकं दाखवलं आहे आणि ते दाखवताना थोडा तिरकस ,sarcastic सूर पकडल्यामुळे विनोदाची भट्टी जमली आहे. चित्रपटाचा सुरुवातीचा भागच मला सर्वात जास्त आवडला. पंचेस भारी जमले आहेत.

पुढे शेवटाकडे सरकताना कथानक काहीसं awkward होतं. एकीकडे अक्षय कुमारची over acting दुसरीकडे दिलजीतची over acting. आणि शेवटच्या टप्प्यात इमोशनल मोडमध्ये जाऊन चित्रपट त्याच्या लॉजिकल एन्डकडे पोचतो.

ओव्हरऑल एक वेगळ्या विषयावरचा, बऱ्यापैकी प्रोग्रेसिव्ह, आजच्या काळातील समस्या मांडणारा आणि मुख्य म्हणजे हसवणूक करणारा धमाल चित्रपट आहे.

करीना शाईन्स थ्रू द मुव्ही. कॉमेडी असो वा शेवटचे भावनिक क्षण असोत, तिने कमाल काम केलंय. तिचं स्टायलिंग, wardrobe एकूणच लुक आवडला. अक्षय कुमार परफेक्ट विनोदी टायमिंगच्या जोरावर भाव खाऊन जातो. अजूनही कसला फिट आणि देखणा दिसतो. कियारा आडवाणी आणि दिलजीत डोसांझ यांनीही त्यांच्या वाटयाला आलेल्या भूमिका चोख केल्या आहेत. मुख्य चारी कलाकार प्लस आयव्हीएफ डॉक्टर्स या सर्वांची कामं दमदार झाल्यामुळे चित्रपटाची भट्टी जमली आहे.
यात करीना एक मॉडर्न करियर वुमन आहे. तिला उगाच घरात स्वयंपाक करताना, सासरच्यांनी मर्जी सांभाळताना दाखवलेलं नाही. हे मला फार आवडलं. तिला नवरा हवा आहे पण एका मर्यादेपलीकडे ती त्याचं ना काही ऐकून घेते ना ती त्याच्यावर अवलंबून असते. अशी कॅरेक्टर आणखी लिहिली जायला हवीत.

अशा छान जमलेल्या मुव्हीला मध्येच रिग्रेसिव्हपणाचे मूड स्विंग येणं म्हणूनच खूप इरिटेट झालं. आई होण्यात बाईच्या लाईफचे सार्थक, गर्भपात म्हणजे पाप वगैरे ट्रॅकवर मध्येच मुव्ही जाऊ लागतो. मग परत खूप डिरेल व्हायच्या आत सीन बदलतो. पण तरी का? व्हाय- हा प्रश्न पडतोच.
याव्यतिरिक्त एकूणात एका हायली सेन्सिटिव्ह विषयाच्या जास्त खोलात न शिरता वरवरचाच विचार केल्यामुळे चित्रपट उथळही वाटू शकतो.

दिगदर्शक नवीन आहे राज मेहता म्हणून. पहिलाच प्रयत्न उल्लेखनीय आहे. गाणी काही खास लक्षात राहिली नाहीत.

का बघावा- डोकं बाजूला काढुन ठेवून चार घटका धमाल करमणूक, वेगळा विषय, प्रोग्रेसिव्ह मांडणी, करीना-अक्षय.

का टाळावा- वेब सिरीज किंवा मालिका टाईप घराच्या दिवाणखान्यात किंवा क्लिनिकमध्ये चित्रपट घडतो. भव्यदिव्य बाहुबली टाईप काही नाही. लहान मुलांना संवाद ऐकून बरेच प्रश्न पडू शकतात.

3.5 out of 5.

विषय: 
Groups audience: 
Group content visibility: 
Use group defaults

एकंदर अक्षयला मुल जन्माला घालण्यामधे सुरवातीपासूनच फारसा इंटरेस्ट नसतो >> किमान हिरो तरी दाखवत आहेत असे.. तेही लॉजिकल पॉईंट्स असलेले, कि खरंच मूल हवय कि फक्त्त पिअर प्रेशर मध्ये हवय. लोक बोलायला लागले म्हणून. मुलगी अशी दाखवली तर तर शक्यतो व्हीलन च.. पण असतात अश्या मुली आजकाल.. समाजातील रिऍलिटी कधी दाखवणार कोणास ठावूक..

बढाई हो चित्रपटात म्हातारपणीही बिनधस्त त्या काकूंनी मुलाला जन्म द्यायचा निर्णय घेतला.

> बढाई हो चित्रपटात म्हातारपणीही बिनधस्त त्या काकूंनी मुलाला जन्म द्यायचा निर्णय घेतला. > हाच तर प्रॉब्लेम आहे ना!
कॉलेजमधली, वन डे स्टँडमधून गरोदर झालेली मुलगी असो - क्या कहना
लिव्हइनमधे राहणारी, अपघाती गरोदर झालेली तरुणी असो - सलाम नमस्ते
एक वर्षच काँट्रॅक्ट लग्न करणारी, अपघाती गरोदर झालेली तरुणी असो - हम आपके दिल में रहते है
लग्नाच्या वयाचा मुलगा असलेली,मेनोपॉजजवळ आलेली, अपघाती गरोदर राहिलेली मध्यमवयीन विवाहित बाई असो - बढाई हो
किंवा मुलासाठी आसुसलेली, ivfमधे घोळ होऊन गरोदर राहिलेली करिअरवूमन तरुणी असो - गुड न्यूज
सगळ्या गर्भपात न करण्याचा निर्णयच घेतात... जर या सगळ्यांना, स्वतःला खरंच मुल हवं असतं तर त्या गर्भपात करून घेणाऱ्या १.६ कोटी बायका (एका वर्षात!) कुठून येतात?

भारतात वर्षाला ४.८ कोटी प्रेगन्सीज होतात. त्यापैकी ५०% अनप्लॅन्ड असतात. त्या २.४ कोटीपैकी ६६% म्हणजेच १.६ कोटी स्त्रिया गर्भपात करतात.

जर या सगळ्यांना, स्वतःला खरंच मुल हवं असतं तर त्या गर्भपात करून घेणाऱ्या १.६ कोटी बायका (एका वर्षात!) कुठून येतात?
>>

कित्येक चित्रपटात गर्भपात केलेलाही दाखवतात. कथेची काय डिमांड आहे त्यावर हे अवलंबून. किती चित्रपटात गर्भपात केलेला दाखवला आहे आणि कितीत नाही याची तुलना प्रत्यक्ष आकडेवारीशी करण्यात काय हशील!

तर त्या गर्भपात करून घेणाऱ्या १.६ कोटी बायका (एका वर्षात!) कुठून येतात?

लिंगपरीक्षण चाचणी चा परिणाम असेल. अर्थात हा वेगळ्या धाग्याचा विषय आहे.

कित्येक चित्रपटात गर्भपात केलेलाही दाखवतात. कथेची काय डिमांड आहे त्यावर हे अवलंबून>>>

बरोबर आहे.

गर्भपात करून घेणारी वाईट हे दाखवणे जसे कथेची गरज तसेच केला हे दाखवणे देखील.

कित्येक वर्षांपूर्वी सुप्रिया पाठकची एक मालिका होती, त्यात ती गर्भपात करवून घेते अशी कथा होती ती आठवली.

प्रत्येकाचा आपला निर्णय.
पण गर्भपात शरिरावर बराच टॅक्स लावतो.म्हणजे लोकल मध्ये टपावर जाहिराती असतात '1 तासात घरी' तितकं ते रिकव्हरी ला लहान डिल नाहीये.हेही कारण असू शकेल की गर्भपात स्वेच्छेने करून घेणाऱ्या नायिका/बायका फारश्या दाखवत नाहीत.

भारतात वर्षाला ४.८ कोटी प्रेगन्सीज होतात. त्यापैकी ५०% अनप्लॅन्ड असतात. त्या २.४ कोटीपैकी ६६% म्हणजेच १.६ कोटी स्त्रिया गर्भपात करतात>>>>

अनप्लॅनड मधल्या 66 टक्के स्त्रिया गर्भपात करवून घेत असतील तर तेवढ्या स्त्रिया तरी स्वतःपुरते ठरवू शकतात असे म्हणता येईल. यांची तुलना दोन चार चित्रपटांतील स्त्रियांशी का व कशी करता येईल?

आणि भारतात पुराणकाळापासूनच्या चित्रपटात मुलाचे आगमन हे प्रियकराच्या प्रेमाचे प्रतीक मानले गेलेय. तो दैवी प्रियकर नायिकेच्या पदरात प्रतीक घालून झाले की पळून जातो हीच मुख्य कथा असल्यामुळे नायिकेला प्रेग्नन्सी कितीही unplanned असली तरी ती पूर्ण वाहून बाळाला जन्म देऊन पुढच्या अपेक्षित हालअपेष्टा सहन करणे भाग पडते. प्रत्यक्ष आयुष्यात ती नायिका असे करणार आहे का/करते का?

> लिंगपरीक्षण चाचणी चा परिणाम असेल. अर्थात हा वेगळ्या धाग्याचा विषय आहे. > नाही. ७५% गर्भपात ९- आठवड्यातच होतात. तोपर्यंत बाळाचं लिंग कळत नाही.
It estimated that close to three in four abortions are achieved using drugs from chemists and informal vendors. WHO says abortion medicines are safe and effective when used correctly and within a nineweek gestational limit.

India’s abortion rate is 47 per 1,000 women of reproductive age, which is similar to rates in Pakistan (50), Nepal (42) and Bangladesh (39). Dr Shekhar said the unintended pregnancies pointed to the need for better contraception and family planning programmes.
Around 53% Indians use modern contraception, but the expert said studies have shown that half the couples surveyed didn’t know how to use the condom correctly.
===

> लगेच गर्भपात वगैरे, म्हणजे बाईलाच परत त्रास. >
> पर्याय नसेलच तिथे गर्भपात करुन घेणे योग्य पण मूल हवंय कां नकोय हे माहीत नाही म्हणून निष्काळजीपणा केल्यामुळे गर्भपात करायचा का? >
> गर्भपात हा टोकाचा निर्णय. >
असली वाक्यं दिसली काही प्रतिसादात म्हणून रिअल लाईफ डेटा आणला चर्चेत.
===

> आणि भारतात पुराणकाळापासूनच्या चित्रपटात मुलाचे आगमन हे प्रियकराच्या प्रेमाचे प्रतीक मानले गेलेय. तो दैवी प्रियकर नायिकेच्या पदरात प्रतीक घालून झाले की पळून जातो हीच मुख्य कथा असल्यामुळे नायिकेला प्रेग्नन्सी कितीही unplanned असली तरी ती पूर्ण वाहून बाळाला जन्म देऊन पुढच्या अपेक्षित हालअपेष्टा सहन करणे भाग पडते. प्रत्यक्ष आयुष्यात ती नायिका असे करणार आहे का/करते का? > बरोबर!
त्या तसल्या चित्रपटाना आणि त्यांच्या शेवटाला कोणीही लॉजिकल किंवा योग्य म्हणणार नाही. पण क्या कहना, बढाई हो, गुड न्यूजचं मात्र कौतुक होतं. नवीन प्रश्न मांडून त्याची घिसीपीटी उत्तरं दिलेली असली तरीही!!
===

जसे या सिनेमात अक्षयला पालकत्वाबद्दलचे प्रश्न पडलेत तसेच हा किंवा इतर सिनेमा बघून मातृत्वाबद्दलचे प्रश्न स्त्रियांना पडायला हरकत नसावी.
Are we always being bombarded by exaggerated views about motherhood and morality in pregnancies?

पूर्वी लादलेल्या पुरुषसत्ताक पद्धतीची fashion होती आणि आता feminism लादण्याची fashion आहे. आजच्या काळात बाईने गर्भपात केला नाही, बिन-लग्नाची-बिन-मुलांची राहिली नाही, नवऱ्याला घटस्फोट दिला नाही, विवाहबाह्य संबंध ठेवले नाही, अप्पलपोटेपणा केला नाही तर त्या बाईला anti-feminist ठरवून मोकळ्या Happy सगळ्या pseudo-feminist!
दुसयाला (पक्षी: नवरा/बॉयफ्रेंड/one night stand) I care a damn दाखवून देताना गर्भपात म्हणजे आपल्याच शरीराचे हाल हे का कळत नाही? का डोकं जाग्यावर नसतं ? का actually जेव्हा फेमिनिसम दाखवून no म्हणायची वेळ असते तेव्हा pseudo-feminist चा feminism पायात शेपूट घालून बसलेला असतो!

Feminism म्हणजे स्वैराचार नाही स्वातंत्र्य असले तरी जबाबदारी च्या जाणिवेमुळे जबाबदारीने वागणं.

ह्या ज्या before/after/72hrs/8weeks/planning गोळ्या आहेत त्या हार्मोनल imbalance करतात. हार्मोनल imbalace म्हणजे भीक नको पण कुत्रा आवर प्रकार.

एवढे सीरीयस का होतात लोक ?

अशा चुकिमुळे घडणार्या गोष्टीना " नाट्यमयता" म्हणतात आनि पिक्चर मनोरन्जाक होतो..

अरे मूल पोटात आल्यावर आईचा अन त्याचा काही एक बंध निर्माण होतो हे जरी हार्मोनल असले तरी एक सकारात्मक घटना पण असू शकते.
आई पणा चा प्रवास सुखदायक पण असू शकतो. व असे ट्रीटमेंट घेउन का होईना बाळ पदरात पडले की " तुझ्यामुळे मी झाले आई" फीलिन्ग पण येते. ही एक शक्यता पण बघा बाई तपासून.

गर्भपातासाठी वेगळा धागा काढा.

गर्भपात करणे न करणे, बिनलग्नाची राहणे न राहणे , आणि राजसी म्हणते तश्या इतर गोष्टी करणे हे प्रत्येक स्त्रीच्या चॉईसवर, तिला आलेल्या अनुभवान्वर आणि काही वेळेला परिस्थितीवर अवलम्बून असत. त्या बाईला आयुष्यात काय हवे, तिला कस राहायला आवडेल यावरुन तिला पुरुषप्रधान विचारान्ची किव्वा फेमिनिस्ट ठरवण योग्य नव्हे. आवड आपली आपली.

तिला स्वैराचार करायचा असेल, लग्न करायच असेल, किव्वा गर्भपात करायचा असेल तर तो निर्णय सम्पूर्णपणे तिचा असावा. तिच्यावर कोणी लादलेला नसावा. हा, त्या निर्णयाची जबाबदारी मात्र तिने घ्यायला हवी. तिच्यावर जसे पुरुषप्रधान विचार लादणे चूक तसेच फेमिनिस्ट विचार लादणेही चूकच.

अरे मूल पोटात आल्यावर आईचा अन त्याचा काही एक बंध निर्माण होतो हे जरी हार्मोनल असले तरी एक सकारात्मक घटना पण असू शकते.
आई पणा चा प्रवास सुखदायक पण असू शकतो. व असे ट्रीटमेंट घेउन का होईना बाळ पदरात पडले की " तुझ्यामुळे मी झाले आई" फीलिन्ग पण येते. ही एक शक्यता पण बघा बाई तपासून. >>>>>>>>> +++++++++११११११११११

' बढाई हो' नाही ते , ' बधाई हो' आहे.

आवड आपली आपली. >> +१०००. एखादीचा आईपणाचा एखादा अनुभव कसा? सुखदायक का दु:खदायक का 'चांगले दिवस होते नि वाईटही दिवस होते'. हे ठरवण्यासाठी जी 'ऑब्जेक्टीव्हिटी' वस्तुनिष्ठता लागते ती व्यक्त्तीकडे असेलच असे नाही. बहुतेकवेळा मिथ्यास्त्रीवादी ते परंपरावादी एखादी टोकाची भूमिका आसपास असते. मग त्यांना खुश ठेवा किंवा कुठे नादी लागा म्हणून सोशल कंडिशनिंगनुसार उत्तरे येतात. खरं उत्तर काय ते चारचौघात सांगायचं बळ असेल नसेल तरी स्वतःचं स्वतःला सांगता आलं म्हणजे बस.

गर्भपात म्हणजे आपल्याच शरीराचे हाल हे ही एकदा तपासून बघा. कुठे, कधी, कसा केला ह्यावर बरेच अवलंबून आहे. एक शास्त्रसंमत मेडीकल प्रोसिजर आहे. तिचे आउट्कम आपल्याला पटेल न पटेल पण उगाच अशा मेडीकल प्रोसिजरने शरीराचे हाल असे समज आकडेवारीशिवाय पसरवू नये. ह्या सिनेमात करिनाने गर्भपात करावा असे माझे अज्जिबात म्हणणे नाही. दिलजित सारखे दिसणारे बाळ ही गोडच वाटेल - सूरत ओस दी परियांवरगी.. !

बाकी फेमिनिस्टांनी 'आराधना'त राजेश खन्नाला ते 'बँड बाजा' मध्ये रणवीरला 'नो' म्हणायचे म्हणताय का???? Wink Happy

> एखादीचा आईपणाचा एखादा अनुभव कसा? सुखदायक का दु:खदायक का 'चांगले दिवस होते नि वाईटही दिवस होते'. हे ठरवण्यासाठी जी 'ऑब्जेक्टीव्हिटी' वस्तुनिष्ठता लागते ती व्यक्त्तीकडे असेलच असे नाही. > +१. आईची स्वतःची शारीरिक-मानसिक-आर्थिक स्थिती + जोडीदार कसा आहे, कितवं मुल आहे, घरातले इतर लोक-नातेवाईक् कसे आहेत यासगळ्या आणि इतर बऱ्याच गोष्टींवर प्रेगन्सी आणि त्यानंतरचा काळ कसा असेल हे अवलंबून आहे.
मुल पोटात आलं की बॉण्डिंग तयार होईलच आणि ते आयुष्यभर टिकून राहीलच असे काही जरुरी नाही.
नाहीतर सरोगेट बनण्यासाठी बायका तयार झाल्या नसत्या.
===

> बहुतेकवेळा मिथ्यास्त्रीवादी ते परंपरावादी एखादी टोकाची भूमिका आसपास असते. > +१.
===

> खरं उत्तर काय ते चारचौघात सांगायचं बळ असेल नसेल तरी स्वतःचं स्वतःला सांगता आलं म्हणजे बस. > क्या कहना, सलामनमस्ते, बढाई हो सारख्या प्रेगन्सी स्वतःसोबत किंवा स्वतःच्या जवळच्या नातेवाईक मुलीसोबत घडल्या तर इथे जो स्टान्स आहे तोच मेन्टेन करणारे कितीजण असतील?
===

> गर्भपात म्हणजे आपल्याच शरीराचे हाल हे ही एकदा तपासून बघा. कुठे, कधी, कसा केला ह्यावर बरेच अवलंबून आहे. एक शास्त्रसंमत मेडीकल प्रोसिजर आहे. तिचे आउट्कम आपल्याला पटेल न पटेल पण उगाच अशा मेडीकल प्रोसिजरने शरीराचे हाल असे समज आकडेवारीशिवाय पसरवू नये. >
Abortion safer than giving birth: study
Researchers found that women were about 14 times more likely to die during or after giving birth to a live baby than to die from complications of an abortion.
पूर्ण लेख वाचा धार्मिक पगडा, त्यातून बनलेले कायदे यामुळे डॉक्टर स्वतःच म्हणताहेत
What makes it complicated, Harwood added, is when the law interferes and requires doctors to state information that isn’t always balanced or medically sound — usually exaggerating the risk of abortion.
===

> ह्या सिनेमात करिनाने गर्भपात करावा असे माझे अज्जिबात म्हणणे नाही. दिलजित सारखे दिसणारे बाळ ही गोडच वाटेल - सूरत ओस दी परियांवरगी.. !> हा हा दिलजीतसारखे दिसणारे बाळ हा विचारच टेररायजिंग आहे म्हणायचे नव्हते Lol
तुमच्या घरात राहणार बाळ, सेम शेजारच्या पुरुषासारखं दिसायला लागलं.... कशी-कितीदा हाताळणार ही सिच्युएशन?

ऍमी, शेवटचं वाक्य एकदम पटतंय.
पिक्चर च्या केसमध्ये बाळं झाल्या झाल्या एक्स्चेंज करणे हा सोपा उपाय वाटतोय.
अबोर्शन च्या रिस्क चा बाऊ वगैरे: ही केस लाईफ थ्रेटनिंग नाही.पण जाहिरातीत दाखवतात तसं '1 तासात घरी परत, आयुष्य चालू' वाली नाही, शरीराला रिकव्हरी ला वेळ लागतो इतकंच म्हणायचं होतं.गर्भ राहणे ते डिलिव्हरी ते नंतरचा थोडा काळ(इन्फेक्शन वगैरे) हा सगळाच रिस्की आहे. ती रिस्क का अबोर्शन ची रिस्क हा प्रत्येकाचा आपला निर्णय आहे.अबोर्शन कायद्याने करू न दिल्याने आयर्लंडमध्ये डॉ सविता चा जीव गेला, तसंच अबोर्शन केल्याने एखादीचाही गेला असेल.आकडे दोन्ही बाजूने असतील.
(खूप इंग्लिश शब्द झालेत पण आता जाऊदे.)

तुमच्या घरात राहणार बाळ, सेम शेजारच्या पुरुषासारखं दिसायला लागलं.... कशी-कितीदा हाताळणार ही सिच्युएशन? >> Happy जिंदगी तेरे गमने हमें रिश्ते नए समझाए....
त्या बाळाचे आणि जैविक बाबाचे जसं जे नातं हवं असेल तसं तसं ते सांगायचं उदा: दिलजितलाही जर बाबा-मूल असे नाते हवे असेल तर तो 'को-पॅरेंट' किंवा सहपालक आहे सांगायचं. करण जोहर एका मुलाखतीत हिरू (त्याची आई) ही त्याच्या जुळ्यांची को-पॅरेंट आहे सांगताना ऐकले आहे, त्यामुळे को-पॅरेंट हे नाते आता भारतीय समाजात लवकर मान्य होईल असे वाटते Wink . तसे नाते दिलजितला नको असेल तर हे काका डोनर होते म्हणून आता शेजारी आहेत असे ही सांगता येते. लोक पूर्ण न ऐकता पाठीमागे काय कुजबूजतात हा विचार करत बसलं तर ही काय कुठलीच सिच्युएशन आयुष्यात हाताळता येणार नाही...

तुमच्या घरात राहणार बाळ, सेम शेजारच्या पुरुषासारखं दिसायला लागलं.... कशी-कितीदा हाताळणार ही सिच्युएशन?>>>हे हे हे जाम भारी Lol

पिक्चर च्या केसमध्ये बाळं झाल्या झाल्या एक्स्चेंज करणे हा सोपा उपाय वाटतोय.>>>सहमत,
कारण कुणी एकाने आपले नसलेले मूल सांभाळणे हाच उपाय झाला हा ,त्यामुळे दोघनपैकी जो हे जास्त सक्षमपणे करू शकतो त्यानेच हा पर्याय स्वीकारावा,मी हा पिक नाही बघितला पण प्रतिसाद वाचून असे वाटतंय की करिना हा पर्याय स्वीकारू शकत होती अक्षय पेक्षा

गर्भपात करू नये असं माझं म्हणणं नाही. गर्भपात हा फॅमिली प्लांनिंग option असू नये अथवा काळजी न घेतल्याने करावा लागू नये. काळजी घेऊन सुद्धा नको असलेली गर्भधारणा झाली अथवा डॉक्टरनी तसा सल्ला दिला तर .

ह्या सिनेमात अक्षय-करीना मुलासाठी नाही तर त्यांना एकमेकांबरोबर राहायचे आहे म्हणून एकत्र रहातात असं स्टोरीलाईन वरुन वाटते.
बधाई हो मध्ये तर सगळ्यांची तिनी गर्भपात करुन घ्यावा अशी इच्छा असते. मग समाजविरुद्ध जाणारी म्हणून नीना ग्रेट कशी नाही? तिला empty नेस्ट syndrome आला किंवा तत्सम कारणं (आता कोणालाच तिची गरज नाही, कोणी तिच्यावर अवलंबून नाही अश्या भावनेने, कोणाला तरी तिची गरज असणं ही तिची गरज असणे) असू शकतात. पाप आहे म्हणून गर्भपात नको असं मला तरी आत्ता सिनेमात दाखवलं असं आठवत नाही.

काही दिवसांपूर्वी एक youtube video बघितला एका छोट्या मुलीचा. तिची केस unbreakable मधल्या व्हिलन सारखी आहे. तिच्या आईवडिलांना डॉक्टर ने MTP करा असा सांगितलं होतं पण त्यांनी केलं नाही. का बरं असा विचार आलाच माझ्या मनात, पण शेवटी त्यांचं आयुष्य आणि त्यांचा निर्णय.

मला वाटलं होत बाळ जन्माला आल्यानंतर दोन्ही कपल एकमेकांच्या बाळांची अदलाबदल करतील म्हणजे जे ते बाळ आपल्या आई- वडिलांकडे आलं असत. पण तस काही दाखवलं नाही . मग करीना ने जे काँट्रॅकट मध्ये लिहून समोरच्या कपल समोर ठेवलं होत. "एकदा का बाळ जन्माला आलं कि तुम्ही आमच्या आयुष्यात दखल द्यायची नाही आणि आम्ही तुमच्या आयुष्यात दखल देणार नाही " तो पण पर्याय योग्यच होता .

तुमच्या घरात राहणार बाळ, सेम शेजारच्या पुरुषासारखं दिसायला लागलं.... कशी-कितीदा हाताळणार ही सिच्युएशन? >> मुव्ही मध्ये दिलजीत हा अक्षय आणि करीनाच्या सोसायटीत अगदी त्यांच्या बिल्डिंग मध्ये वरच्याच फ्लॅट मध्ये ( हे कस काय ? ) रेंट वर राहिला आलेला आहे असं दाखवलं आहे . फक्त बाळ जन्माला येईपर्यत तो तिथे राहणार असतो . त्यामुळे सेम शेजारच्या पुरषारखं दिसणं ( यदाकदाचित तस झालच तर) इतर आजूबाजूच्या लोंकाना कधीच समजलं नसत. चित्रपट टाईमपास म्हणून बघायला छान आहे . पण ट्रेलर बघून खूप अपेक्षा वाढतात तेवढा नाहीये पण कमावले आहेत भरपूर

आधी करीना अक्षयच्या मनाप्रमाणे आणि तिच्या स्वतःच्या इच्छेप्रमाणे अबोर्ट करायला तयार असते. त्या करता ती हॉस्पिटल मध्ये सुद्धा जाते. पण डॉक्टरीण तिला स्क्रीन वर बाळाच हृदय धडधडताना दाखवते आणि सांगते कि "या जीवाला तू मारणार आहेस का ? मान्य आहे जे घडलाय ते न निस्तरता येण्यासारखं आहे पण त्यात बाळाचा काहीच दोष नाही. विचार कर . शेवटी अबोर्ट करायच का नाही हा निर्णय तुझा " ते हृदय धडधडताना पाहून ती मूल जन्माला घालण्याचा डिसिजन घेते आणि घरी येऊन अक्षयला सांगते. तेव्हा आणि अगदी त्याच मूल ( मोनिकाच्या उदरातल ) जन्माला येईपर्यत अक्षय तिने अबोर्ट च करावं किव्वा करायला पाहिजे होत या विचारांवर ठाम असतो . पण मोनिकाच्या द्वारे जेव्हा त्याच बाळ सातव्या महिन्यात जन्माला येत तेव्हा त्याची घालमेल होते त्याला त्याची चूक समजते आणि तो करीनाला सॉरी म्हणतो . आपण तिला अबोर्ट करायला सांगत होतो याचा त्याला पश्चताप होतो

पाप आहे म्हणून गर्भपात नको असं मला तरी आत्ता सिनेमात दाखवलं असं आठवत नाही.>> अश्या आशयाचे संवाद नीना गुप्ता म्हणताना दाखवली आहे.
ह्या सिनेमातली अजून एक खटकलेली गोष्ट म्हणजे, रिनीच्या आईला जेव्हा कळते की नीना गुप्ताला बाळ होणार आहे तेव्हा ती रिनीला म्हणते की, "देखना! ये बच्चा आगे चलके तुम्हारीही जिम्मेदारी बनेगा. ". त्यावर रिनीसुद्धा त्या मुलाची जबाबदारी घ्यायला मला काही हरकत नाही अश्या आशयाचे संवाद म्हणते.
आजकालच्या काळात मुली लग्नानंतर सासू-सासर्‍यांची जबाबदारी घ्यायलाही तयार नसतात. तर आपल्या नवजात दिराची जबाबदारी रिनी का घेईल? आणि घेतली तरी ती जबाबदारी ती कितपत आनंदाने निभावेल? असा मला प्रश्न पडला.

पिक्चर च्या केसमध्ये बाळं झाल्या झाल्या एक्स्चेंज करणे हा सोपा उपाय वाटतोय.>>> का? बाळांचे जैविक वडील बदलले आहेत पण आया तर same आहेत ना? म्हणजे करीना- दिलजीत आणि कियारा - अक्षय. मग फक्त नवऱ्यासाठी त्यांनी आपली बाळं का एक्सचेंज करायची?

आधी करीना अक्षयच्या मनाप्रमाणे आणि तिच्या स्वतःच्या इच्छेप्रमाणे अबोर्ट करायला तयार असते. त्या करता ती हॉस्पिटल मध्ये सुद्धा जाते. पण डॉक्टरीण तिला स्क्रीन वर बाळाच हृदय धडधडताना दाखवते आणि सांगते कि "या जीवाला तू मारणार आहेस का ? मान्य आहे जे घडलाय ते न निस्तरता येण्यासारखं आहे पण त्यात बाळाचा काहीच दोष नाही. विचार कर . शेवटी अबोर्ट करायच का नाही हा निर्णय तुझा " >>>>>>>>>> इथे डॉक्टरची लुडबुड पटली नाही. तिला करायचय ना अबोर्ट तर करु दया ना.

अश्या आशयाचे संवाद नीना गुप्ता म्हणताना दाखवली आहे. --- माझं मिस आऊट झालेलं दिसतंय जाता-येता बघत होते.

पिक्चर च्या केसमध्ये बाळं झाल्या झाल्या एक्स्चेंज करणे हा सोपा उपाय वाटतोय
>>>>>>

नवरा बायकोच्या जोड्या एक्स्चेण्ज करणे हा देखील एक पर्याय आहे .. पण सोपा नाही.

Pages