थुंकणार्‍याची मानसिकता

Submitted by प्रकाश घाटपांडे on 13 December, 2019 - 02:10

अनेक व्यापारी संकुल, सरकारी कार्यालये या सारख्या इमारतींमधे आपण जिन्याच्या कोपर्‍यात,लॉबीच्या कोपर्‍यात, लिफ्ट मधे कोपर्‍यात अशा ठिकाणी लोक थुंकलेले दिसतात.अगदी सुसंस्कृत गृहसंकुलात देखील ही दृष्य कधी कधी दिसतात. पानटपरीच्या आसपास तर विहंगम दृश्य असते. ’रांगोळ्यांनी सडे सजविले रस्त्या रस्त्यातून’ हे कवीला अशी दृष्ये पाहूनच सुचले असावे. पान गुटका तंबाखू वगैरे खाउन किंवा न खाताही थुंकणार्‍या लोकांचे प्रमाण भारतात खूप मोठे आहे. परदेशातून आलेल्या पाहुणे हे जेव्हा पहातात त्यावेळी त्यांच्या मनात आपल्या देशाची प्रतिमा अत्यंत मागासलेला देश अशी होते. अतुल्य भारत च्या प्रबोधन जाहिरातींमधे ते दाखवून अशा थुंकीसम्राटांचे प्रबोधन करण्याचा क्षीण प्रयत्न सरकारी पातळीवर केलाही जातो.त्या जाहीराती अशा लोकांपर्यंत पोहोचतात किती व त्याचा किती परिणाम होतो हा संशोधनाचा विषय आहे. काही व्यापारी संकुलात जिन्याच्या कोपर्‍यात देवादिकांची चित्रे असलेल्या टाईल्स लावून या थुंकीवीरांवर नैतिक दबाव आणण्याचा प्रयत्न होताना दिसतो.त्याचा काही अंशी परिणाम होतो देखील पण तो तेवढ्या पुरताच.थुंकीवीर आपले पिचकारीचे ठिकाण थोडे शिफ्ट करतात. एका टिकाणी मी पिचकारीचे शिंतोडे मारुतीच्या टाईल्सवर उडालेले पाहिले.कदाचित लक्षात आल्यावर थुंकणार्‍याने नंतर आपली जीभ चावली असेल. पुर्वी काही सरकारी कार्यालयाच्या आवारात विटकरी रंगाच्या भितींवर पांढर्‍या रंगाच्या पाटीवर लाल अक्षरात कार्यालयाच्या आवारात तंबाखू सिगारेट थुंकणे वगैरे गोष्टी भारतीय दंडविधान अमुक अमुक अन्वये गुन्हा आहे व तो अमुक शिक्षेस पात्र आहे अशा आशयाचे लिहिलेले दिसायचे.त्यानुसार कारवाई झाल्याचे पहाण्यात नाही.म्हणजे शिक्षेचे भय नाही व प्रबोधनाची तमा नाही. सुसंस्कृत व सुशिक्षित लोक हे सर्व असहाय्यपणे पहात असतात.
थुंकणार्‍याच्या मानसिकतेतुन पाहिले तर" आता मानुस हाये म्हन्ल्यावर थुकनारच ना! जनावर थुकत्यात का? हॅ हॅ! आमी कुट लोकांच्या अंगाव थुकतो. कोपरा पघुन थुकतो, आन द्यवाची तसबीर आसन तर थुकत बी नाई" असे विचार त्यांच्या मनात असतात. त्यांची भावनिक, बौद्धिक वाढ ज्या संस्कारात, ज्या वातावरणात झाली असते त्या दृष्टीने यात काही गैर नसते. जसे आपण श्वास घेतो, शिंकतो, खाजवतो, ढेकर देतो, जांभई देतो तितकी ती निसर्गसुलभ व सहज प्रक्रिया आहे. पुलंच्या रावसाहेबांच्या फुल्या फुल्या जितक्या सहजसुलभ असतात तितक्या. ती एक प्रकारची प्रतिक्षिप्त क्रिया असते. जागॄत मेंदु त्याची दखलसुद्धा घेत नाही.
आमच्या जीवन शिक्षण मंदिरात पाचवी ते सातवी देव गुरुजी आम्हाला शिकवायचे. ते रोज पाच ओळी अक्षरसुधारणेसाठी शुद्धलेखन लिहून आणायला सांगायचे. टाक वापरणे आम्हाला सक्तीचे होते. चुकून जरी पेन नुसता दिसला तरी गुरुजी तरवारीच्या आवेशाने तो पेन दगडी भिंतीवर आपटून त्याचा विनाश करीत असत. खेड्यात लोक आपली पोर गुर्जींच्या पायावर घालायची. गुर्जींविषयी घरात तक्रार केली तर घरात डबल मार बसायचा पोरांना. गुर्जींची शिस्त कडक होती त्यांनी अनेक विद्यार्थी घडवले. गुर्जी अक्षरश: जीव ओतून शिकवायचे. सगळ्या विषयांना एकच गुरुजी असायचे. गावाचा गुर्जींवर पुर्ण विश्वास होता. आदरयुक्त दरारा असायचा गुर्जींचा. तर अशा या गुरुजींना तंबाखू खायच व्यसन होते. शेणाने सारवलेल्या वर्गात गुर्जींना फक्त खुर्ची टेबल असायचे. बाकी आम्ही खालीच बसत असू. आम्हीच सगळे मिळून वर्ग शेणाने सारवत असू. गुरुजी तंबाखू खात शिकवायचे व कधी कधी खिडकीतून बाहेर तर कधी खुर्चीच्या खालीच थुंकायचे. पण यामधे कुणालाच त्याकाळी गैर वाटत नसे. कारण या चित्राचा कॅनवास हा खेड्यातील समाजजीवन हा होता. ज्यामधे थुंकणे हा समाजजीवनाचा अपरिहार्य व अविभाज्य भाग होता. गुरुजींनी तंबाखू सोडण्याचे भरपूर प्रयत्न केले पण ते फसले. आता हे जर मी कॉन्वेंट स्कूल मधे शिकणार्‍या विद्यार्थी व पालकांना सांगितले तर शिक्षक वर्गात थुंकतात हे भयंकर अनाकलनीय वाटेल. एखाद्या चित्राचे आकलन हे ते चित्र कुठल्या कॅनवासवर प्रक्षेपित केले आहे त्यावर अवलंबून असते. चित्राचा कॅनवास बदलला कि आकलन ही बदलते. आपली समाज चित्रे ही अशीच असतात. माध्यम त्याचा वापर चतुराईने करुन घेतात. कधी त्याचा उपयोग समाज घडण्यासाठी होतो तर कधी बिघडण्यासाठी होतो. थुंकणार्‍या लोकांमधेही प्रबोधनामुळे काही बदल घडत असतात. भान सुटलेले कुठेही व कसेही थुंकणारे लोक आता आजुबाजूला कोणी नाही ना? असे पाहून रस्त्याच्या कडेला थुंकतात. स्वच्छ सुंदर चकचकीत अशा कार्यालयांमधे जर हे थुंकीवीर गेले तर त्या वातावरणाचा मनोवैज्ञानिक दबाव त्यांच्यावर पडतो व त्यांची थुंकीची उर्मी नाहीशी होते . पण जर एखाद्या ठिकाणी पिचकारीचे अवशेष दिसले की त्यांची उर्मी उफाळुन येते व प्रतिक्षिप्त क्रिया म्हणून तिथे अजून एक पिचकारी पडते. आपला देश एकाच वेळी किमान तीन शतकात तरी वावरतो. त्यामुळे देशातून या चित्राचे समूळ उच्चाटन शक्य होईल असे वाटत नाही पण किमान वेगाने घटले तरी दिलासा म्हणावा लागेल.
थुंक थुंकून कधी तू दमशील
थक थक रे थुंकीलाला
थक थक रे थुंकीलाला।

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

<<सुसंस्कृत व सुशिक्षित लोक हे सर्व असहाय्यपणे पहात असतात>> कुणाला सुसंस्कृत म्हणाय्चे हा प्रश्न आहे

सुसंस्कृत आणि सुशिक्षित हे दोन्ही भिन्न प्रकार आहे
सुशिक्षित व्यक्ती सुसंस्कृत असेलच असे काही नाही किंवा.
अशिक्षित व्यक्ती सुसंस्कृत नसेल असे पण काही नाही .
जे व्यसन करतात पान,तंबाखू ,गुटखा हे लोक च थुक्ततात.
तोंडात पान,तंबाखू,गुटखा असेल तर थुकने ही शारीरिक क्रिया .पण योग्य जागी न थुकणे हे असंस्कृत आहे.
पाण्याची रिकानी बॉटल्स,थरमॅकॉल चे कप,ग्लास,रॅपर रस्ता वर टाकणे हे सुद्धा असंस्कृत पना आहे आणि त्याची बरोबरी थुकण्याशी करण्यात काही गैर नाही..
महाविद्यालयीन मुल आणि मुली सर्रास असा कचरा रस्त्यावर टाकतात.
तसेच सार्वजनिक वाहनात समोरच्या सीट वर पाय ठेवून बसणे आणि थुखने ह्याची बरोबरी करायला सुद्धा काही हरकत नसावी .
मग आपण रोजच्या जीवनात बघितलं तर सर्व स्तरावरची मंडळी असंकृत च वागत असतात .
काही अपवाद सोडून..
एका घटनेने मी खूप प्रभावित झालो होतो.
गिरगाव चौपाटीवर दोन मुली कुत्रे फिरवायला घेवून यायच्या मी रोज बघाय चो.
श्रीमंत वर्गातील च असाव्यात .
त्यांच्या हातात प्लास्टिक ची पिशवी असायची आणि handgloves सुद्धा बरोबर असायचे कदाचित कुत्र्यांनी रस्त्यावर संडास केली की ती स्वतः हाताने भरून प्लास्टिक chya पिशवीत ठेवायच्या आणि कचऱ्याच्या डब्यात टाकायच्या..
आणि हे दृश्य नी खूप वेळा बागितल ..
अशी पण लोक जगात असतात .

ते जास्त सुसंस्कृत आहेत म्हणून नव्हे तर मरीन ड्राइव्ह वर "घाण"केली तर 1000 रुपये दंड आहे. आणि तो नियम फार कसोशीने पाळला जातो.

जसे आपण श्वास घेतो, शिंकतो, खाजवतो, ढेकर देतो, जांभई देतो तितकी ती निसर्गसुलभ व सहज प्रक्रिया आहे.

याच्याशी सहमत नाही.

थुंकणे हि अत्यंत किळसवाणी गोष्ट आहे आणि यामुळे अनेक रोग पसरतात ज्यात क्षयरोग हा एक फार मोठा घटक आहे.

जांभई, ढेकर किंवा शिंक या नैसर्गिक क्रिया आहेत पण त्याचे सामाजिक प्रदर्शन हे अनैसर्गिक आहे.

जांभई, ढेकर किंवा शिंक आली तरी मोठ्याने आवाज करणे हे अतिशय ओंगळवाणे असते आणि याची आजू बाजूच्या लोकांना घाण वाटू शकते किंवा किळस येऊ शकते. असे करणारे अनेक अतिशहाणे वरिष्ठ नागरिक (विशेषतः मोठ्या आवाजात ढेकर देणे) माझ्या दवाखान्यत येतात आणि त्यांना नाक मुरडणारे इतर रुग्ण बाजूला बसलेले असतात. त्याची त्यांना खंत व खेदही नसतो.

जसे घाम येणे हे नैसर्गिक आहे पण घामाचा वास अंगाला मारणे हे अजिबात नैसर्गिक नाही तर आजू बाजूच्या लोकांना किळसवाणेच असते

त्याउलट थुंकणे हि अजिबात नैसर्गिक क्रिया नाही.

आपल्यामुळे दुसऱ्याला त्रास होतो हे खिजगणतीत नसणे हा भारतीयांचा स्थायीभाव आहे.

यात मोठ्याने डीजे लावून आवाज प्रदूषण करणे, रस्त्यात नको तिथे गाडी लावून वाहतुकीचा खोळंबा करणे, बेशिस्तपणे पार्किंग करणे, जोरजोरात हॉर्न वाजवणे, मोटारसायकलचा सायलेन्सर काढून ठणाणा आवाज करत रात्रीच्या शांत वेळेस लोकांची झोप उडवणे आणि सर्वात बाईट म्हणजे अशा गोष्टीबद्दल शेखी मिरवणे अशा अनेक गोष्टी येतील.

बाकी सर्व गोष्टींचे समर्थन करता येत नाही तसेच सर्वजनिक ठिकाणी थुंकण्याचे अजिबात समर्थन करता येत नाही.

असे करणारे अनेक अतिशहाणे वरिष्ठ नागरिक (विशेषतः मोठ्या आवाजात ढेकर देणे) माझ्या दवाखान्यत येतात>>>
अतिशहाणे? कसं काय निष्कर्ष काढला हा?
gastritis dyspepsia वगैरे मुळे अशा ढेकरा अनिवार्य होतात, सुरवातीला बहुतेक सगळ्यांनाच याची खंत वाटते. पण नाईलाज असतो. अशी येणारी मोठी ढेकर टाळता किंवा हळूहळू देता येत नाही. अशा रोगांचे पेशंट्स आहेत ते, त्यावर समाधानकारक इलाज अद्यापतरी नाही. असता तर त्यांनी तो करवून समस्या सोडवून घेतली नसती का? (ढेकर येणे या व्यतिरिक्त इतरही त्रास असतो ना त्यांना अशा रोगांचा.)

हळू आवाजात कसं शिंकायचे ते volume बटन आपल्या हातात नसते .
तोंडावर रुमाल किंवा हात ठेवून शिंकता येईल हीच फक्त काळजी घेता येईल.
Padne हे सुद्धा आपल्या हातात नसते .

जसे आपण श्वास घेतो, शिंकतो, खाजवतो, ढेकर देतो, जांभई देतो तितकी ती निसर्गसुलभ व सहज प्रक्रिया आहे.

याच्याशी सहमत नाही.>>>>> हे थुंकणार्‍याच्या दृष्टीकोनातून. पुढे मी ती एक प्रकारची प्रतिक्षिप्त क्रिया आहे असे म्हटले आहे.

घाटपांडे साहेब,
जिथे तिथे वैचारीक थुंकणारे आणी वैचारीक ओकार्‍या काढणारे याबद्दल पण प्रबोधन करावे असे सुचवतो. निदान मायबोलीवर त्याची नितांत गरज आहे.

अतिशहाणे? कसं काय निष्कर्ष काढला हा?

पाटलाच्या धाकट्या सुनबाईला मोठ्या आवाजात ढेकर का येत नाही?

तेच एखाद्या निवृत्त सरकारी अधिकाऱ्याला मोठ्या आवाजात ढेकर का येते?

ढेकर देताना ओ ~~~ ब्बा असा आवाज कुठून येतो?

ढेकर ही जठरातील हवा अन्ननलिकेतून बाहेर पडण्याने येते श्वास नलिकेतून नाही.

त्यामुळे पोटातील वायू बाहेर पडेल त्याचा येईल "तितकाच" आवाज असायला पाहिजे.

स्वरयंत्रातून येणारा ओ ~~~ ब्बा असा स्वर येतो याचे कारण या व्यक्ती इतरांना मला त्रास होतो आहे हे जाणवून देण्यासाठी आवाज स्वरयंत्रातून काढतात. (attention seeking)

हा आवाज न काढताही ढेकर देता येते. शीतपेय पिणाऱ्या प्रत्येक माणसाला ढेकर येते. परंतु सर्वांचा एवढा मोठा आवाज येतो का?

मोठी ढेकर देण्याचे सर्वात मोठे कारण हवा गिळणे हे आहे. मानसिक तणाव हे याचे एक महत्त्वाचे कारण आहे.

https://en.wikipedia.org/wiki/Aerophagia

पाटलाच्या धाकट्या सुनबाईला मोठ्या आवाजात ढेकर का येत नाही?

तेच एखाद्या निवृत्त सरकारी अधिकाऱ्याला मोठ्या आवाजात ढेकर का येते? >>>

चूकीचे निरीक्षण. स्त्री / पुरुष कुणालाही होऊ शकते हे, मध्यम वयापासूनही.

ढेकर देताना ओ ~~~ ब्बा असा आवाज कुठून येतो?

जांभई, ढेकर किंवा शिंक आली तरी मोठ्याने आवाज करणे हे अतिशय ओंगळवाणे असते आणि याची आजू बाजूच्या लोकांना घाण वाटू शकते किंवा किळस येऊ शकते. असे करणारे अनेक अतिशहाणे वरिष्ठ नागरिक (विशेषतः मोठ्या आवाजात ढेकर देणे) माझ्या दवाखान्यत येतात आणि त्यांना नाक मुरडणारे इतर रुग्ण बाजूला बसलेले असतात.

त्याची त्यांना खंत व खेदही नसतो. यामुळे त्यांना अतिशहाणे म्हटले आहे.

यात स्त्री पुरुष असा भेद नाही.

वरील उदाहरण हे प्रातिनिधिक आहे जेथे "धाकट्या सुनेला" अशी ढेकर दिल्यावर ओरडा पडण्याची शक्यता जास्त आहे.

या ऊलट सामाजिक उतरंडी मध्ये "वरच्या पातळीवर" असलेल्या माणसाला फारसं कुणी बोलणार नाही

माझे कोर्टात काम होते.मी तिथे गेले आणि माझा नंबर लागायची वाट पहात बसले होते.तेंव्हा लक्षात आले की 90%वकील पचापच थुंकत होते,आणि कामाने येणाऱ्या लोकांपैकी बरेच जण कोर्टाच्या मोकळ्या अंगणात थुंकत होते.मला अगदी तिथे बसणे नकोसे झाले होते.किती घाणेरडी ही सवय.सुशिक्षित,अशिक्षित बरोबरीने थुंकण्याचे काम करत होते.

समई, नुकतेच कोर्टाच्या आवारात थुंकणार्‍या दोन पोलिस कर्मचार्‍यांवर कारवाई करण्याचे आदेश न्यायालयाने दिले आहे.ही बातमी पहा
http://www.dailykesari.com/2020/02/01/pune-police-crime/
आता कारवाईचे प्रमाण घडणार्‍या घटनांच्या तुलनेने अगदी नगण्य आहे ही गोष्ट खरी आहे. पण सुरवात तर होते आहे.