गीता जयंती

Submitted by मी मधुरा on 8 December, 2019 - 06:33

गीता जयंती निमित्त आगामी युगांतर पुस्तकातला एक भाग तुम्हा सर्वांकरता......

युगांतर-आरंभ अंताचा!

कुणाच्यातरी आगमनाची चाहूल लागली आणि भीष्मांनी डोळे उघडत आवाजाच्या दिशेने पाहिले. निळा शेला आणि मोरमुगुटातले मोरपीस कृष्णाला अगदीच शोभून दिसत होते. तो भीष्मांजवळ आला तेव्हा त्याच्या रुपाचं संमोहन तिथल्या वाऱ्यावरही घडलं असावं. कुठल्याशा धुंदीत तो चक्राकार वाहू लागला.

"प्रणाम पितामह." कृष्णाने विनम्रतेने हात जोडले. भीष्मांनी डोळ्यांची उघडझाप करत नजरेनेच अभिवादन केले आणि उठून बसण्याचा प्रयत्न करू लागले तसं त्यांच्या लक्षात आलं की ना ते त्यांच्या छावणीत आहेत, ना त्यांची शय्या मऊ कापुसाची! रात्र प्रत्येक कोपरा व्यापू लागली तसं तापमान कमी होऊ लागलं. शीतल वाऱ्याची मंद झुळूक आली आणि भीष्मांना अगदी शांत वाटलं.
कृष्णाचे डोळे बाणांच्या शय्येवर पडलेल्या वृद्ध देहाकडे भावविभोरतेने पाहण्यात मग्न होते. त्या वेदनादायी स्थितीतही भीष्माचार्यांनी कृष्णाकडे पाहून हलके स्मित केले.
"केशव...... " भीष्म शांतता भंग करत म्हणाले.
"बोला पितामह...." कृष्ण हात जोडून भीष्मांपुढे उभा राहिला.
"आत्ता या वेळी तुम्ही इथे?"
"हो.... तुम्हाला भेटायला."
कृष्णाचे उत्तर ऐकून भीष्मांच्या चेहऱ्यावरच आनंदाची एक रेषा उमटली.
..... आणि दोघे शांत एकमेकांकडे बघत! खूप काही बोलायचे असले, की नेमके शब्द सापडत नाहीत. असेच काही झाले असावे का? की या दोन महाभागांच्या संवादाला शब्दांची गरजच पडत नसावी? काही प्रश्न अनुत्तरितच बरे! कारण प्रश्न मानव निर्मित असतात आणि उत्तरे सापेक्ष! प्रत्येकाला समाधान मिळेल याचा दावा कोणते खरे उत्तर करू शकते? कदाचित कोणतेच नाही! कारण प्रश्न एकटा असतोच कुठे? सोबत शंका, मानसिक द्वंद्व, अमान्यता, मनाचा कल..... सारेच आले.
मनाचा हिय्या करून भीष्मांनी विचारले, "अर्जुन कसा आहे, वासुदेव?"
"कसा असणार, पितामहं? कसा असणार तुम्हाला स्वतःच्या हातांनी इतके जखमी केल्यावर?" कृष्णाने भावनाविवश होत प्रतिप्रश्न केला. भीष्म हळहळले.
"का असं करायला लावलेत मग वासुदेव त्याला? या मानसिक यातना त्याला देणे गरजेचे होते का? तो तर तुम्हालाही प्रिय आहे, वासुदेव. त्याला का चालवायला लावलेत शस्त्र माझ्यावर? उचललेच होतेत तुम्ही चक्र, तर का त्यागलात माझ्या वधाचा विचार? स्वहस्ते मुक्ती का नाही दिलीत?" अगतिक होतं भीष्माचार्य म्हणाले.
"मी? मी तुमच्यावर शस्त्र चालवेन, पितामह?" कृष्ण भावूक होत भिष्मांना म्हणाला.
"का माधव? माझी पात्रता नाही तितकी सुद्धा?"
"पितामहं!" कृष्णाच्या चेहऱ्यावर अस्वस्थतेची भावना झळकली.
"हे कसले युद्ध आहे हेच कळत नाहीये, वासुदेव..... इथे बाण कोणी चालवले आणि घायाळ कोण झाले, याचा काही ताळमेळच लागत नाही !
सुर्यास्त झाल्यावर शरशय्येवर मी होतो.... पण रडून-रडून लाल अर्जुन झाला होता!
त्याची तळमळ..... त्याचे अश्रू.... क्षणभर वाटले त्याला मिठीत घ्यावं. डोक्यावर हात फिरवून आधीसारखी त्याची समजूत काढावी. पण.... माझ्या मांडीवर वीतभर जागाही मोकळी नाही आता अर्जुनकरता. हातही जेरबंद झालेले. मग शब्दांचाच आधार घेऊन महतप्रयासाने त्याचे अश्रू थांबवावे लागले. बाकी काहीही म्हणा केशव, पण अर्जुनचा खूप जीव आहे माझ्यावर."
कृष्णाने स्मित केले. "माहिती आहे, पितामह. माहिती आहे मला. म्हणूनच तर त्याच्याच हातून तुम्हाला या बाणांच्या बेड्यांमध्ये बांधावे लागले."
भीष्मांच्या चेहऱ्यावर प्रश्नचिंन्ह होतं, "म्हणजे काय केशव?"
"पितामह, अर्जुन तुमच्यावर खूप प्रेम करतो, हे माहिती आहे ना तुम्हाला?"
"नि:संशय!"
"तुम्हाला एखाद्या व्यक्तीने क्षती पोचवली असती, तर अर्जुनने त्या व्यक्तीला जिवंत सोडले असते?"
"कदापि नाही." भीष्म उद्गारले.
"ती व्यक्ती पांडवांपैकी एक असती तर?"
"तरीही नाही."
"तेच तर, पितामहं. तेच तर! अर्जुनचे तुमच्यावर जितके प्रेम आहे, तितके तर स्वतःच्या सख्ख्या बंधुंवरही नाही. माझ्या पायांना त्याने घातलेला विळखा आठवा, पितामहं. 'वचन मोडू नका' सांगत त्याने मला चक्र खाली ठेवायला लावलं. तुम्हाला काय वाटतं, पितामहं? केवळ माझं वचन कारण होतं त्याच्या त्या कृतीच? विचार करा, पितामह. त्याला सहन झालं असतं, मी तुम्हाला काही केलं असतं तर? तो ही मला देवच मानतो. पण तरीही मी तुम्हाला क्षती पोचवणं, त्याला अमान्य होतं. मग जिथे त्याने साक्षात देवाला जुमानले नाही, तिथे त्याच्या बंधुंचे काय खपवून घेणार होता तो? अर्जुनाने स्वपक्षातच रक्ताचा पाऊस पाडू नये, म्हणून त्याच्याच..... त्याच्याच हस्ते तुम्हाला बंदिस्त करावे लागले! पण खरंतर....." कृष्ण मध्येच थांबला.
"बोला केशव.... मी ऐकतो आहे." उत्तर ऐकून भीष्मांचे प्रश्न तृप्त होत होते. उत्तरांनी मनाच्या जखमांवर नाजूक खपली चढत होती.....कृष्णाने हाताला गुंडाळलेल्या वस्त्राचे टोक सोडवले आणि भीष्मांच्या चेहऱ्यावर उडलेले रक्ताचे थेंब पुसले.
"खरंतर, तुमच्या प्रिय अर्जुननेच तुम्हाला जखमी करण्याचा निश्चय करून तुमच्यावर शस्त्र उगारले, म्हणल्यावर तुम्ही तिथेच...... त्याक्षणीच इच्छामृत्यूचा वापर करालं, अशी अपेक्षा तेवत होती कुठेतरी. पण तुम्ही? तुम्ही मात्र हट्टाला पेटलात, पितामहं."
पितामहंनी तृप्ततेने दीर्घ श्वास घेतला, तशी त्यांची छाती फुगून जराशी हलचाल झाली आणि शरीरात रुतलेल्या बाणांना लाल गडद रंगात रंगवत उष्ण रक्ताची धार ओघळून पितामहंच्या शरशय्येखाली साचलेल्या रक्ताच्या थारोळ्यात मिसळली.
कृष्ण काही काळ असहाय्यपणे बघत ते राहिला. शेवटी त्याने पितामहंना अगतिक होत विचारले, "किती काळ, पितामह? अजून किती काळ इच्छामृत्यू ऐवजी हे वेदनादायी जीवन निवडणार आहात तुम्ही?"
"वेदना? त्या तर माझ्या भाग्यातच कोरल्या आहेत, केशव. आजवर वेदना झाल्याच नव्हत्या, असंही नाही आणि या युध्दामुळेच मी त्या अनुभवल्या आहेत, असही नाही. हं.... त्यांना वाचा मात्र फुटली आहे या बाणांमुळे!
जे रक्त आटवत हस्तिनापुराला बांधून ठेवले, ते रक्त आता हस्तिनापुराची ढळलेली प्रतिष्ठा, त्यातले कलह आणि हा...... हा महाविनाश पाहून स्वस्थ राहीलच कसं, केशव?
आता पुकारलेला विद्रोह केवळ शरीराची साथ सोडूनच ते दाखवू शकते, त्याला काय करणार ते तरी?"
कृष्णाने अस्वस्थपणे भीष्मांच्या रक्ताळलेल्या देहावर सर्वत्र नजर फिरवली.
"प्रत्येकाची दंड देण्याची पद्धत वेगवेगळी असते, वासुदेव. न जाणो, माझ्या प्रतिज्ञेमुळे मी किती पापं केली..... कितीतरी जणांचा अपराधी बनलो असेन मी! मग सगळ्यांचे शाप चिकटलेला देह सुअवस्थेत राहिलच कसा?
एकदा विदुर म्हणाला होता मला....आपल्या भाग्यातले भोग आपल्यालाच भोगावे लागतात." त्यांच्या शरीरात घुसलेले बाण रक्तात नाहून पुर्णपणे निसरडे झाले होते. अंग निष्क्रिय होत होत जड होऊ लागले आणि बाणावरून त्यांचे शरीर घासत घास खाली ओढले जात होते. रक्ताच्या थारोळ्यात सतत भर पडत होती.
"तुम्ही उत्तरायणाची वाट पाहत आहात, पितामह?" कृष्णाने नजर भीष्मांच्या नजरेला भिडवत विचारले.
"केशव.... पुन्हा या मृत्यूलोकी परतायचे नाही मला. आणि दक्षिणायन.....साक्षात नरकाचे द्वार! या अश्या स्थितीत देह सोडायचा धोका पत्करणार नाही मी."
"ज्याला देव मानता त्याने मंगलतेची शाश्वती दिली तरी सुद्धा?" कृष्णाने भावूक होतं विचारले.
भीष्मांच्या चेहऱ्यावर हलक स्मित आलं.
"तुम्ही शाश्वती देत असालं, तर सगळे मंगलच होईल, केशव. पण कारण केवळ उत्तरायणच नाही ना! माझ्या सर्वच कृतींची कारणे खूप गुंतागुंतीची आहेत."
कृष्णाने डोळे घट्ट मिटले. "ते काय मला माहित नाही का, पितामह? ते काय मला माहित नाही का?"
भीष्मांनीही क्षणभर डोळे मिटले.
"मी आत्ता देहत्याग करू शकत नाही, वासुदेव..... त्या आधी एकदा मला माझ्या डोळ्यांनी हस्तिनापुरास न्याय आणि धर्माच्या छत्रछायेखाली बघायचे आहे."
"हस्तिनापुर!" कृष्णाच्या मुखातून अस्पष्ट उच्चार बाहेर पडले. "पण आता तर धर्माचा विजयही निश्चित झालेला आहे, पितामह..... आणि युद्धाचा निकालही."
"पण अजून युद्ध संपले कुठे आहे, वासुदेव? अजून युधिष्ठिराचा राज्याभिषेक कुठे झाला आहे?"
कृष्णाने दु:खावेगातच स्मित केले.... "तुम्हाला माहित आहे, पितामह? तुम्ही अत्यंत हट्टी आहात."
भीष्मांच्या निस्तेज चेहऱ्यावर हलकेसे स्मित पसरले. कोरड पडलेल्या घश्यावर जोर देत त्यांनी पुढे बोलायला सुरुवात केली.
"जिने इतके उत्तम योद्धे हस्तिनापुरास दिले, त्याच धरणीमातेला असा असुरी रक्ताभिषेक घातला या योद्ध्यांनी!"
काही क्षण निशब्द शांततेत गेले.
"गिरिधर, हस्तिनापुरात आता मी नसेन, गुरु द्रोण नसतील. पण तो महाल..... त्याचा कण अन् कण आमच्या आठवणींनी भरलेला असेल. बाकीचे सारे कदाचित सावरतीलही स्वतःला यातून. विसरून जातील सारं. पण अर्जुन..... तो हा असा सवयीने माझ्या कक्षात जाईल मला शोधत-शोधत.... 'पितामह-पितामह' हाका मारत..... आणि त्याला त्या निर्जीव कक्षातून प्रतिसाद मिळाला नाही, की आठवणींनी सैरभैर होईल तो.
तुम्ही जपालं न त्याला, वासुदेव?"
कृष्णाने डोळे बंद केले, तसे कडांवर साठलेले पाणी गालांवर ओघळले निपचितपणे. गार वाऱ्याच्या वाहत्या स्पर्शाने त्याच्या मुगुटातले मोरपिस थरथरल्यासारखे झाले.
"केशव, त्या महालाचा प्रत्येक कोना-कोपरा बदलून टाका..... साऱ्या जुन्या आठवणी पुसून टाका. आमच्यासारख्या दुर्दैवी लोकांची कणभरही स्मृती राहू देऊ नका तिथे." त्यांनी अबोल झालेल्या कृष्णाकडे पाहिले. आत्ममग्न झालेला कृष्ण एखाद्या कसलेल्या शिल्पकाराने कोरलेल्या नयनरम्य मूर्तीसारखा दिसत होता.
"गिरिधर, तुम्ही उत्तर दिले नाहीत..... तुम्ही पुढेही अर्जुनची काळजी घ्यालं ना?"
कृष्णाने भीष्मांच्या नजरेला नजर भिडवली. त्यांच्या नजरेत चिंतीत प्रश्न होते.... काळजी होती.... अर्जुनाबद्द्लचे निस्सीम प्रेम होते. डोळ्यांतून वाहणारा मायेचा, स्नेहाचा एक अतूट झरा होता. कुठून आणता हे सगळं पितामहं?
"मी निशब्द झालो आहे तुमच्यापुढे. तुमची ही अवस्था..... ही शरशय्या..... हा जर्जर झालेला वृद्ध देह.... केवळ दर्शनानेही अंगावर शहारा आणणाऱ्या यातना भोगत आहात तुम्ही! आणि तुम्ही चिंता करताय ती मात्र......! कसं जमतं, पितामह? कसं जमत हे तुम्हाला?"
काही क्षण केवळ घोंगावणाऱ्या वाऱ्याचा आवाज येत राहिला.
"एकमेकांच्या रक्ताची भूक लागली आहे इथे सर्वांना......" भीष्मांची नजर रणांगणावर होती. कृष्णानेही रणांगणावर नजर फिरवली. लाल रंगाचे भयावह पडसाद उमटलेले होते. शवांचे अस्ताव्यस्त प्रस्थ माजले होते. वारा वेगाने शवांवर आदळत होता. निश्चल शवांवर पसरलेले रक्त काळपट भासत होते.

"खरचं काही पर्यायी मार्ग नव्हता या रक्तपाताला, मुरलीधर?"
"असता तर मी हे घडू दिले असते पितामह?" कृष्णाने प्रतिप्रश्न केला.
"पण विनाशच का वासुदेव?"
"विषारी वृक्ष कधी मधुर वा ग्रहण करण्यायोग्य फळे नाही देत, पितामह. उलट माती सुद्धा विषारी बनवतो. त्याला छाटणे हा एकच पर्याय उरतो. त्यावेळी बघणाऱ्याला देठावर घातलेला कुऱ्हाडीचा घाव क्रूरता वाटेलही! पण तेच त्याच प्रारब्ध असतं, महामहीम! 'समूळ विनाश का?' हा विचार करण्याची वेळ नसते ती. जर त्याच्या विनाशाकरता कोणी निष्ठुरत्व धारण केलं नाही, तर ते मला करावं लागेल आणि सर्वांचा रोष पत्करावा लागला तर तोही!
अनेकदा जमिन सुपिक होण्याकरता ती जाळावी लागते महामहीम. मग तो विनाश म्हणावा की नव्याचा आरंभ..... हा ज्याचा त्याचा दृष्टीकोन आहे. त्यामुळे हे युध्द नक्की काय आहे, योग्य आहे की अयोग्य, आवश्यक की अनावश्यक....हे तुम्हीच ठरवा."
भीष्मांनी समाधानाने कृष्णाकडे पाहिले.
"केशव..... इथे या शय्येवर मोकळ्या आकाशाखाली पडल्या- पडल्या मनात जिवनाचा हिशोब सुरु होतो.... काय योग्य केलं, कुठे चुकलो, किती नियम तोडले... सारखे एक ना अनेक विचार ......पण विचाराअंती हाती काहीच सापडत नाही... काहीच उरत नाही.
पण तुमच्या उत्तरांनी मन शांत झालं...... विसरायला भाग पाडलं की ही शय्या बाणांची आहे. धन्यवाद केशव.... या भेटीबद्दल!"
कृष्णाने मान हलवली. निरोपाकरता त्याच्या चेहऱ्यावरचे नेहमीचे लाघवी स्मित पुन्हा चेहऱ्यावर झळकले.
"उद्या पुन्हा भेट देईन, पितामह."
"नको केशव!"
कृष्णाने अचंबित होऊन पाहिले.
"का, पितामह?"
"कारण सवय होते तुमच्या अस्तित्वाची, केशव. यातना शमतात तुम्ही जवळपास असताना...... मनाच्याही आणि देहाच्याही! .....आणि मग तुम्ही सतत आसपास असावंत, ही इच्छा बळावत राहते!"
"मग मी इथेच थांबेन, पितामहं. जोवर तुम्ही देहत्यागाचा निर्णय घेत नाही अगदी तोवर...... इथेच थांबेन." भावविवश होऊन कृष्ण भीष्मांचा सुरकुतलेला हात धरत म्हणाला. भीष्मांच्या चेहऱ्यावर एक जिवंतपणा पसरला त्या शब्दांनी.
"धन्य झालो मी, वासुदेव. पण आता तुमची गरज रणांगणावर आहे..... अर्जुनाला आहे, माझ्या पंडुपुत्रांना आहे. इथे मला राहू दे एकांतात माझ्या वेदनांसोबत. माझ्या वेदनांचा भार स्वयं परमेश्वराने घ्यावा, इतकी पुण्याई नाहीये माझ्या गाठीला."

"पितामह...." कृष्णाला भरून आलं होतं.

"केशव, तुमच्या खांद्यावर आधीच खूप भार आहे. माझ्या पापांचे ऋण फेडून मला कर्जदार बनवू नका. निदान माझ्या वेदनांचा तरी मला घेऊ दे...."

भीष्मांच्या चेहऱ्यावर प्रसन्न भाव होते. पण कृष्णाच्या चेहऱ्यावर मात्र एक वेगळीच संमिश्र भावना पसरली होती.
'आयुष्यभर ज्याने कोणाचे उपकार घेतले नाहीत, तो त्याच्या मौनाचे ऋण फेडल्याशिवाय देह कसा त्यागणार? हो ना, पितामहं? निर्धार, स्वयंपुर्णता, निष्ठा, प्रेम एकीकडे आणि एक अयोग्य निर्णय..... प्रतिज्ञा पालन दुसरीकडे! तुमचं मुल्यमापन चुकले फक्त, पितामहं.
पण नियती कोणालाच सोडत नाही. खुद्द कृष्णाला जुमानलं नाही, तिथे भीष्मांना कसं सोडणार होती ती? प्रत्येक कृतीची फळे द्यायला बांधील आहे ती. मृत्यू नाही देऊ शकली तर या अश्या वेदना दिल्या तिने.
अनेक महाभाग या कालमहासागरात विलिन झालेत, पितामहं. पुढेही अनेक होणार आहेत.... सारे नियतीच्या मर्जीनुसार! पण त्या नियतीचा निर्णय नामंजूर करणारे..... धूडकावून लावणारे तुम्हीच! यमदेवांना अडवून ठेवत या भयंकर अवस्थेत जगण्याचं धाडस तुम्हीच करू जाणे, पितामह.....तुम्हीच करू जाणे!'
कृष्णाने हाताला गुंडाळलेल्या वस्त्राचे टोक सोडवले आणि भीष्मांच्या चेहऱ्यावर उडलेले रक्ताचे थेंब पुसले.
हात जोडून त्याने पितामहंची रजा घेतली. भीष्म त्याच्या पाठमोऱ्या आकृतीकडे पाहत होते. अगदी ती बारीक ठिपका होऊन दिसेनाशी होई पर्यंत.
आणि पुन्हा एकदा भयाण, एकाकी, भेसूर शांतता वातावरणात पसरली. हात जरासा हलवल्याने आरपार घुसलेल्या बाणाने अजून रक्त बाहेर काढले होते. आता ती तीव्र वेदना शरीरात पुन्हा एकदा पसरू लागली होती. प्रत्येक बाण त्याचे शरीरातले स्वतंत्र अस्तित्व स्पष्टपणे जाणवून देत होता. आता पुन्हा एकदा वृद्ध शरीराने तक्रारीचा सूर लावला होता.

देहाच्या जाणिवा पुर्ववत झाल्या आणि भीष्मांच्या तोंडून अस्फुटशी हाक बाहेर पडली. "वासुदेव!"
भीष्मांनी हस्तिनापुरच्या दिशेकडे नजर टाकली.
"हस्तिनापुरा, माझं वचन पूर्ण होणार आहे. तुला योग्य अधिपती मिळणार आहे लवकरच. आता बस, अजून काही दिवसांची प्रतिक्षा फक्त!"

©मधुरा

Group content visibility: 
Public - accessible to all site users

खुप छान लिहिला आहे हा भाग .
मनापासुन आवडला .

अणि युगांतर-आरंभ अंताचा या पुस्तक लेखना साठी मनापासुन खुप खुप शुभेच्छा.

एक सूचना आहे !
भिष्मांचं कृष्णाप्रती संबोधन एकेरी करशील का..ते अधिक सहज, ओघवतं आणि आपलेपणाचं वाटेल. Happy
उदा.
"कारण सवय होते तुमच्या अस्तित्वाची, केशव. यातना शमतात तुम्ही जवळपास असताना.....>>>

कारण सवय होते तुझ्या अस्तित्वाची, केशवा ! यातना शमतात तू जवळ असताना.....

>>>"धन्य झालो मी, वासुदेव. पण आता तुमची गरज रणांगणावर आहे....>>>
धन्य झालो मी, वासुदेव..पण आता तुझी गरज रणांगणावर आहे.....

बाकी या आगाऊपणाबद्दल आगाऊ सॉरी ! Lol
पुस्तकासाठी खूप साऱ्या शुभेच्छा ! Happy

आनंद,

सुचनेचा विचार केला मी.

काही बाबी अश्या, की कृष्ण द्वारका नगरीच्या राजा होता आणि पितामह त्याला देव मानत होते.
असं असताना ते त्याचे एकेरी संबोधन करणार नाहीत, असे माझे मत आहे.

तुम्ही बारकाईने वाचलेत, हे तुमच्या सुचनेवरून लक्षात आले. धन्यवाद Happy

मधुरा खूप खूप छान लिहलं आहे तुम्ही. अणि युगांतर-आरंभ अंताचा या पुस्तक लेखना साठी मनापासुन खुप खुप शुभेच्छा.

"कारण प्रश्न मानव निर्मित असतात आणि उत्तरे सापेक्ष"...

वाह ! क्या बात है मधुरा! Hats-off for this line.

कसं काय सुचतं राव इतकं भारी?

काही बाबी अश्या, की कृष्ण द्वारका नगरीच्या राजा होता आणि पितामह त्याला देव मानत होते.
असं असताना ते त्याचे एकेरी संबोधन करणार नाहीत, असे माझे मत आहे.>>>
ओके मधुरा.

माझ्या मते वरील प्रसंगात कृष्ण द्वारकाधीश वा देव म्हणून भीष्मांकडे आलेला नसून एक नातलग, जवळची व्यक्ती म्हणून आलेला असल्याने भीष्मांनी त्याच्यासाठी एकेरी संबोधन वापरायला हवं होतं.
अर्थात् आपल्या मताचा आदर आहे. Happy
पुलेशु !