हिंदू धर्म आणि विश्वाची कालगणना

Submitted by स्वामी विश्वरूपानंद on 3 December, 2019 - 22:24

आपल्या पुरातन कालगणनेचे गणित, विश्वाच्या आधुनिक कालमापनाशी किती जुळते ? सर्वसाधारणत: पंचागात या कालमापनेचे गणित दिलेले असते. अनेकांना हे गणित माहीत आहे, पण या लेखात आवश्यक वाटले म्हणून इथे त्याची पुनरावृत्ती करत आहे.
(इथे एकम, दशम, शत, सहस्र, दशसहस्र, लक्ष, दशलक्ष, कोटी, दशकोटी, अब्ज, खर्व, निखर्व, महापद्म, शंकु, मध्य, अंत्य, जलधि, परार्ध ही अंकगणना विचारात घेतली आहे.)

ब्रह्मदेवाचे आयुष्य १०० वर्षे.
ब्रह्मदेवाच्या प्रत्येक दिवसात (दिन) १४ मन्वंतरे होतात. प्रत्येक मन्वंतराचा मनु, म्हणजे आद्यपुरुष वेगळा. प्रत्येक दिवसाइतकीच ब्रह्मदेवाची रात्र असते.
प्रत्येक मन्वंतरानंतर प्रलय होतो आणि काही अपवाद वगळता जीवसृष्टी नष्ट होते. जीवसृष्टीचा नव्याने आरंभ होतो. हा प्रलयकाळ कृतयुगाएवढा असतो. थोडक्यात चौदा मन्वंतरासोबत, कृतयुगाएवढे चौदा संधिकाल असतात.
या व्यतिरिक्त चौदाव्या मन्वंतरानंतर आणखी एक कृतयुगाइतकाच संधिकाल असतो.

प्रत्येक मन्वंतरात ७१ महायुगे होतात.
प्रत्येक महायुगात चार युगे असतात. कृतयुग, त्रेतायुग, द्वापारयुग व कलियुग. ही युगे याच क्रमाने प्रत्येक महायुगात येतात (या संदर्भात मतभिन्नता आहे)
यातील प्रत्येक युगाच्या आरंभी त्या युगाच्या वर्षांच्या एक दशांश इतका संधिकाल असतो. युगाच्या आधी येणार्‍या संधिकालास उपसंधि व नंतर येणार्‍या संधिकालास प्रतिसंधि म्हणतात.

कृतयुग, त्रेतायुग, द्वापारयुग व कलियुग यांची वर्षे अनुक्रमे ४०००, ३०००, २००० व १०००. पण ही दिव्यवर्षे आहेत (याबाबत मतभिन्नता आहे) . एक दिव्यवर्ष (देवांचे वर्ष) म्हणजे मानवी ३६० वर्षे.

त्यामुळे एका महायुगाचे गणित पुढीलप्रमाणे :

कृतउपसंधि : ४,०००/१० = ४०० दिव्यवर्षे = १,४४,००० मानवी वर्षे
कृतयुग : ४००० दिव्यवर्षे = १४,४०,००० मानवी वर्षे
कृतप्रतिसंधि : ४,०००/१० = ४०० दिव्यवर्षे = १,४४,००० मानवी वर्षे
त्रेताउपसंधि : ३०००/१० = ३०० दिव्यवर्षे = १,०८,००० मानवी वर्षे
त्रेतायुग : ३००० दिव्यवर्षे = १०,८०,००० मानवी वर्षे
त्रेताप्रतिसंधि : ३,०००/१० = ३०० दिव्यवर्षे = १,०८,००० मानवी वर्षे
द्वापारउपसंधि : २०००/१० = २०० दिव्यवर्षे = ७२,००० मानवी वर्षे
द्वापारयुग : २००० दिव्यवर्षे = ७,२०,००० मानवी वर्षे
द्वापारप्रतिसंधि : २,०००/१० = २०० दिव्यवर्षे = ७२,००० मानवी वर्षे
कलिउपसंधि : १०००/१० = १०० दिव्यवर्षे = ३६,००० मानवी वर्षे
कलियुग : १००० दिव्यवर्षे = ३,६०,००० मानवी वर्षे
कलिप्रतिसंधि : १,०००/१० = १०० दिव्यवर्षे = ३६,००० मानवी वर्षे

वरील गणित लक्षात घेतल्यावर :
कृतयुगाची एकूण वर्षे = ४,८०० दिव्यवर्षे = १७,२८,००० मानवी वर्षे
त्रेतायुगाची एकूण वर्षे = ३,६०० दिव्यवर्षे = १२,९६,००० मानवी वर्षे
द्वापारयुगाची एकूण वर्षे = २,४०० दिव्यवर्षे = ८,६४,००० मानवी वर्षे
कलियुगाची एकूण वर्षे = १,२०० दिव्यवर्षे = ४,३२,००० मानवी वर्षे

या सर्वांची बेरीज केल्यावर एका महायुगाची वर्षे = १२,००० दिव्यवर्षे = ४३,२०,००० मानवी वर्षे
एका मन्वंतरात ७१ महायुगे म्हणजे एका मन्वंतरात ७१ x ४३,२०,००० मानवी वर्षे = ३०,६७,२०,००० मानवी वर्षे. अर्थात तीस कोटी, सदुसष्ट लक्ष, वीस हजार मानवी वर्षे.
प्रत्येक मन्वंतरानंतर कृतयुगाइतका प्रलयकाल अर्थात १७,२८,००० मानवी वर्षांचा प्रलयकाल.

म्हणजेच प्रत्येक मन्वंतर + मन्वंतरसंधिकाल मिळून ३०,८४,४८,००० मानवी वर्षे होतात. अर्थात तीस कोटी, चौर्‍याऐंशी लक्ष, अठ्ठेचाळीस हजार मानवी वर्षे.
अशी १४ मन्वंतरे म्हणजे ३०,८४,४८,००० x १४ = ४,३१,८२,७२,००० मानवी वर्षे. अर्थात चार अब्ज, एकतीस कोटी, ब्याऐंशी लक्ष, बहात्तर हजार मानवी वर्षे.
या व्यतिरिक्त जो पंधरावा कृतयुगाइतका संधिकाल असतो त्याचे मान १७,२८,००० मानवी वर्षे

या दोघांची बेरीज करता ब्रह्मदेवाच्या एका दिवसात (दिन) ४,३२,००,००,००० मानवी वर्षे होतात. (१००० महायुगांइतका काळ). अर्थात चार अब्ज बत्तीस कोटी मानवी वर्षे. याला ब्रह्मकल्प किंवा कल्प अशी संज्ञा आहे.
या इतकीच ब्रह्मदेवाची रात्र असते. या रात्रीत महाप्रलय होतो आणि सर्व विश्व शून्यवत होते. ब्रह्मदेव दुसर्‍या दिवशी उठून पुन्हा सृष्टीनिर्माणाला सुरुवात करतो.
त्यामुळे ब्रह्मदेवाच्या एका दिवसरात्रीत ८,६४,००,००,००० मानवी वर्षे होतात. आठ अब्ज चौसष्ट कोटी मानवी वर्षे. (Carl Sagan ने उल्लेख केलेले हेच ते मापन. )

ब्रह्मदेवाच्या एका वर्षात ३६० दिवस असतात. त्यामुळे ब्रह्मदेवाच्या एका वर्षात
३६० x ८,६४,००,००,००० = ३,१,१,०,४०,००,००,००० मानवी वर्षे होतात. अर्थात ३ महापद्म, १ निखर्व, १ खर्व, ४० कोटी मानवी वर्षे. अर्थात 3.1104 ट्रिलियन मानवी वर्षे.
त्यामुळे ब्रह्मदेवाच्या १०० वर्षांच्या आयुष्यात ३,१,१,०,४,०,००,००,००,००० मानवी वर्षे होतात. अर्थात ३ अंत्य, १ शंकू, १ महापद्म, ० निखर्व, ४ खर्व मानवी वर्षे. अर्थात 311.04 ट्रिलियन मानवी वर्षे किंवा ३१,१०४ खर्व मानवी वर्षे.

--
ब्रह्मदेवाचे आयुष्य संपल्यानंतर, दुसरा ब्रह्मदेव निर्माण होण्यापूर्वी आणखी १०० ब्रह्मवर्षे (अर्थात ३,१,१,०,४,०,००,००,००,००,००० मानवी वर्षे अर्थात 31104 ट्रिलियन मानवी वर्षे किंवा ३१,१०४ महापद्म मानवी वर्षे. ) इतका काळ ब्रह्मदेवाविना जातो. !
--

वैज्ञानिक गणितानुसार सध्याच्या अंतिम अनुमानानुसार विश्वाचे वय १३.७९९±०.०२१ अब्ज वर्षे इतके आहे.

आपले विश्व Big Bang (महास्फोटा) नंतर तयार झाले या आधुनिक सिद्धांताला लक्षात घेऊन, Big Bang म्हणजे ब्रह्मदेवाचा जन्म मानायचा की ब्रह्मदेवाने सृष्टीनिर्मितीस केलेला आरंभ मानायचा ?

ब्रह्मदेवाच्या जन्माच्या ज्या दोन कथा आहेत त्यातील एकात, ब्रह्मन व माया यांच्या संयोगातून जन्मलेले ब्रह्मांड व त्यातून जन्मलेल्या ब्रह्मदेवाचे वर्णन आहे. तर दुसर्‍या एका कथेत, विष्णुनाभीतून उत्पन्न झालेल्या कमळावर ब्रह्मदेव अवतीर्ण झाले असे वर्णन आहे.

पहिली कथा प्रथमदर्शनी काही अंशी, Big Bang शी मिळतीजुळती वाटते.

दुसर्‍या कथेतील विष्णुनाभीचा संदर्भ, आकाशगंगेच्या मध्यात असलेल्या, विशालकाय कृष्णविवराशी जोडून, काहीजणांनी आणखी एक मांडणी देखील केली आहे. दुसर्‍या कथेप्रमाणे विष्णुनाभीचा संबंध कृष्णविवराशी जोडल्यास, ब्रह्मदेवाचे आसनस्थान कृष्णविवराच्या जवळपास येते आणि याचाच दुसरा अर्थ, एका परीने असा होतो की प्रत्येक आकाशगंगेला स्वतंत्र 'विष्णु' आणि स्वतंत्र 'ब्रह्मदेव' आहे. ही मांडणी अर्थातच सहज पचनी पडणारी नाही. कारण इथे विश्व हा शब्द आकाशगंगेपुरता मर्यादित होतो.

ब्रह्मदेवाच्या वयाची ५० वर्षे उलटून गेली आहेत, ५१ व्या वर्षाच्या पहिल्या दिवसाच्या, (पंचांगानुसार), अर्थात ब्रह्मदेवाचे सध्याचे वय किमान, १५,५५२ खर्व मानवी वर्षे अर्थात (किंवा 155.52 ट्रिलियन मानवी वर्षे) असले पाहिजे. हे विश्वाच्या अनुमानित १४ अब्ज वर्षांपेक्षा (अर्थात १.४ खर्व वर्षांपेक्षा) प्रचंड अधिक आहे. स्वाभाविकच Big Bang या नावाने संबोधली जाणारी घटना ब्रह्मदेवाच्या जन्माशी निगडीत नाही, असे म्हणता येईल.
मग Big Bang ही ब्रह्मदेवाच्या दिवसाची सुरुवात आहे का ? ब्रह्मदेवाच्या सध्याच्या दिवसात, ६ मन्वंतरे होऊन गेली आहेत. सातव्या वैवस्वत मन्वंतरातील २७ महायुगे उलटून, २८ व्या महायुगातील कलियुगाची ५११८ वर्षे संपली. हे गणित केल्यास :

उलटून गेलेली मन्वंतरे + संधि => ३०,८४,४८,००० x ६ = १,८५,०६,८८,००० मानवी वर्षे
उलटून गेलेली महायुगे => ४३,२०,००० x २७ = ११,६६,४०,००० मानवी वर्षे
२८ व्या महायुगात => १७,२८,००० + १२,९६,००० + ८,६४,००० + ५,११८ मानवी वर्षे = ३८,९३,११८ मानवी वर्षे

या तिन्हींची बेरीज केल्यानंतर उत्तर येते १,९७,१२,२१,११८ मानवी वर्षे . अर्थात ब्रह्मदेवाचा दिवस आरंभ होऊन, १ अब्ज ९७ कोटी १२ लक्ष २१ हजार ११८ मानवी वर्षे झाली आहेत. हा कालावधी विश्वाच्या आधुनिक गणितानुसार असलेल्या अनुमानित वयाशी जुळत नाही.

मग असे म्हणायचे का की मन्वंतरात होणारा बदल, केवळ प्रलयाशी, नव्या मनुशी (व कदाचित केवळ पृथ्वीशी) निगडीत आहे ? परंतु साधारण २अब्ज वर्षांपूर्वी पृथ्वीवर मानव अस्तित्वात असल्याचा, कोणताही पुरावा वैज्ञानिकांना अजूनपर्यंत सापडलेला नाही. सध्याच्या मान्यतेनुसार केवळ ६.६ कोटी वर्षांपूर्वी Impact Event मुळे डायनोसॉर नष्ट झाले आणि त्यानंतर साधारण ३० लक्ष वर्षांनी मर्कटसदृश प्राणी अस्तित्वात आला. पण हा कालावधी देखील सध्याच्या मन्वंतराच्या गणनेशी जुळत नाही. सध्याचे मन्वंतर सुरू होऊन १२,०५,३३,११८ अर्थात १२ कोटी ५ लक्ष ३३ हजार ११८ वर्षे उलटून गेली आहेत . म्हणजे जर या मन्वंतरापूर्वी प्रलय (संधिकाळात) झाला होता असे मानायचे असेल तर, या गणितानुसार हा प्रलय किमान १२ कोटी वर्षांपूर्वी झाला असला पाहिजे. आधुनिक (भूस्तर) विज्ञानाच्या गणितानुसार या काळात 'प्रलय' झालेला नाही.

--

ब्रह्मदेवाचा दिवस (केवळ दिवस, रात्र नव्हे) अर्थात कल्प याचे मान आहे ४.३२ अब्ज मानवी वर्षे. या संख्येशी साधारण जुळणारी मात्र एक गोष्ट आहे, ती आहे पृथ्वीचे अनुमानित वय. सध्याच्या मान्यतेनुसार पृथ्वीचे वय ४.५४±०.५ अब्ज वर्षे इतके आहे. सूर्यमालेचे अधिकतम अनुमानित वय देखील ४.५६७ अब्ज वर्षे इतके आहे. पण यातून काही विशेष साध्य होते आहे का ? ४.३२ अब्ज मानवी वर्षे जर ब्रह्मदेवाच्या दिवसाशी सुसंगत धरली तर, ब्रह्मदेवाची रात्र आता सुरू होणार (किंवा झाली) असे मानावे लागेल. याचाच दुसरा अर्थ सूर्यमालेचा/पृथ्वीचा विनाश खूप जवळ आला आहे असा होतो. ज्याची ठोस चिन्हे नाहीतच पण युगाच्या कालगणनेशी देखील ते जुळत नाही.

आपल्या कालगणनेतील, एका आकड्याच्या अंशत: जवळपास जाणारी दुसरी एक गोष्टही आहे. आपला सूर्य (त्याच्या ग्रहमालेसह) आकाशगंगेच्या केंद्राभोवती (Galactic Center) प्रदक्षिणा घालतो. आकाशगंगेचे हे केंद्र ,मूळ नक्षत्राजवळ आहे असे म्हटले जाते. (तसे असल्यास मूळ नक्षत्राचे नाव खूप अर्थवाही आहे असे म्हणावे लागेल.) सूर्याचे या केंद्रापासूनचे अंतर अंदाजे २५,००० ते २८,००० प्रकाशवर्षे इतके आहे. या केंद्राभोवती प्रदक्षिणा करण्यास २२.५ ते २५ कोटी वर्षे लागतात असे सध्याचे अनुमान आहे. हा आकडा एका मन्वंतराच्या मानाशी काहीसा जवळ आहे (१ मन्वंतर = तीस कोटी, सदुसष्ट लक्ष, वीस हजार मानवी वर्षे. ) , आकाशगंगेच्या केंद्राभोवती फिरताना सूर्य एकाच प्रतलात भ्रमण करत नाही. तो त्याच्या कक्षेत वरखाली करत, लंबवर्तुळाकार प्रदक्षिणा करतो. (जणू एखादा चेंडू जमिनीवर आपटून, पुन्हा वर उसळी मारत पुढे जात आहे आणि छताला आपटून पुन्हा जमिनीच्या दिशेने प्रवास करत आहे किंवा दुसर्‍या प्रकारे विचार करायचा तर Sine Wave आठवा) . केंद्राभोवतीच्या भ्रमण करताना, १० भ्रमणांमध्ये, सुमारे २७ वेळा तो वरखाली होतो,म्हणजेच एका प्रदक्षिणेत अंदाजे २.७ वेळा. या परिभ्रमणादरम्यान अथवा उभ्या आंदोलनादरम्यान काही वेळा तो अशा अवकाशीय वस्तूंजवळून जात असावा ज्यांच्यामुळे सूर्यमालेत हल्लकल्लोळ माजतो, पृथ्वीवर प्रलय येतो असा प्राथमिक अंदाज आहे. हे गणित जर मन्वंतराच्या कालावधीशी ताडून बघितले तर, साधारण १०.५ ते १३ कोटी वर्षांनंतर आणखी एक प्रलय होईल असे म्हणता येईल. सध्याच्या जैवशास्त्रीय अनुमानानुसार, इतका काळ पृथ्वीवर, सध्याच्या प्रजातींपैकी कोणतीही प्रजाती टिकणार नाही. सध्याच्या मानवजातेचे पृथ्वीवरचे अस्तित्व या आधीच संपलेले असेल. काही वैज्ञानिकांच्या मान्यतेनुसार ही सहावी Extinction Event असेल (त्यांच्या अभ्यासानुसार आधीच्या पाच Extinction Event ४४ कोटी वर्षात होऊन गेल्या आहेत, अर्थात त्या ही आपल्या गणनेशी जुळत नाहीत.)

पृथ्वीवर अस्तित्वात असणार्‍या बहुतांश जुन्या संस्कृतींमध्ये, प्रलय ही संकल्पना कमीअधिक प्रमाणात आढळते. पण ही संकल्पना मूळातून नाकारणार्‍या काही वैज्ञानिकांकडून, एक प्रतिवाद असा केला जातो की पूर्ण पृथ्वीवर प्रलय आणण्याइतके पाणी पृथ्वीवर आहे का ? सध्याच्या गणनेनुसार पृथ्वीवरच्या एकूण पाण्यापैकी तब्बल ९८% पाणी समुद्रांमध्ये आहे, साधारण १.६% हिम स्वरूपात, ध्रुवांवर व काही पर्वतांवर, साधारण ०.३६% जमिनीच्या खाली आणि केवळ ०.०३६% नद्या व इतर जलाशयात आणि इतर बाष्पाच्या स्वरूपात. या माहितीच्या आधारे, काही वैज्ञानिकांचे असे म्हणणे आहे की पृथ्वीवरची २९% जमीन, प्रचंड मोठ्या प्रलयाने व्यापण्यासाठी उपलब्ध पाणीसाठाच मूळात पुरेसा नाही. पण इथे हे लक्षात घेतले पाहिजे की प्रलयपूर्व काळात ओढवलेल्या एखाद्या नैसर्गिक आपत्तीमुळे, अशी एखादी जागतिक स्वरूपाची अशी रासायनिक प्रक्रिया घडू शकते, ज्यायोगे पृथ्वीवरच्या एकंदर पाणीसाठ्यात विलक्षण वाढ होईल. त्यानंतर संततवृष्टी वा अन्य काही कारणामुळे, विध्वंसक ठरेल अशा पद्धतीने, पृथ्वीवरची सर्व जमीन दीर्घ काळासाठी पाण्याखाली जाऊ शकते. दुसरी गोष्ट अशी की पुराणातील प्रलय हा जलप्रलय असल्यामुळे, आपण असे गृहीत धरून चाललो आहोत की पुढचा प्रलय हा देखील जलप्रलय असेल. पण पंचमहाभूतांपैकी एक वा अनेक 'भुते' कोपू शकतात ही शक्यता आहेच की. 'अग्निप्रलय' वा 'वायुप्रलय' हा देखील जलप्रलयाइतकाच विध्वंसकारक ठरू शकतो. Extinction Event घडू शकण्याची विविध कारणे आहेत.

--
ब्रह्मदेवाच्या दिवस रात्रीच्या संकल्पनेची पृथ्वीच्या दिवसरात्रीच्या संकल्पनेशी सांगड घालता येते का ? या प्रश्नाचे उत्तर उपलब्ध असल्यास माझ्या वाचण्यात आलेले नाही. पण त्याच्या दिवस आणि रात्र या प्रत्येक विभागास कल्प असे म्हणतात आणि त्याचे मान ४ अब्ज ३२ कोटी मानवी वर्षे इतके आहे हे विष्णुपुराणात दिले आहे. याचे संपूर्ण गणित लेखांक २ मध्ये दिले आहे.

पृथ्वीच्या दिवसरात्रीचे कारण तिचे परिवलन आहे,तोच निकष लावायचा म्हटला तर 'ब्रह्मलोक' स्वत:भोवती फिरतो का ? आणि दिवस रात्र होण्यासाठी त्याला कुणाकडून 'प्रकाश' मिळतो असे प्रश्न उभे राहतात. या प्रश्नांची ठोस उत्तरे माहीत नाहीत, परंतु चंद्र पृथ्वीभोवती फिरतो (चंद्रमंडल), पृथ्वी सूर्याभोवती फिरते (सूर्यमंडल), सूर्य आकाशगंगेच्या केंद्राभोवती प्रदक्षिणा करतो (परमेष्ठी मंडल), आणि आपली आकाशगंगा स्वायंभू मंडलात परिभ्रमण करते असा संदर्भ उपलब्ध आहे (मूळ श्लोक सापडले नाहीत) .

वर म्हटल्याप्रमाणे प्रलय संकल्पनेची उपलब्ध वैज्ञानिक ज्ञानाशी पुरेशी सांगड जमत नाही. मात्र प्रलयाचे तीन महत्त्वाचे प्रकार मानले जातात;

१) प्रलय हा प्रत्येक मन्वंतरानंतर होतो पण त्यात समस्त जीवसृष्टी नष्ट होत नाही, इथे नव्या मनुच्या हातून मर्यादित जीवसृष्टी वाचते (sampling) आणि त्या मनुच्या नावाने नवीन मन्वंतरास सुरुवात होते.
२) महाप्रलय हा प्रत्येक कल्पांतानंतर होतो (ब्रह्मदेवाच्या दिवसाच्या शेवटी) ज्यात सर्व जीवसृष्टी (पृथ्वी व इतर सर्व ग्रह) नष्ट होते, महाप्रलयानंतर ब्रह्मदेव नव्याने सृष्टीनिर्माणास सुरुवात करतो.
३) प्राकृत किंवा आत्यंतिक प्रलय हा ब्रह्मदेवाचे आयुष्य संपल्यानंतर होतो आणि त्याचा कालावधी हा ब्रह्मदेवाच्या आयुष्याइतकाच मानला गेला आहे. ज्यानंतर 'नवीन' ब्रह्मदेव सृष्टीनिर्माणाची सूत्रे हातात घेतो. यात सर्व सृष्टीचा लोप कल्पिला आहे (Big Crunch ?)

प्रलय या संकल्पनेची व्याप्ती स्पष्ट होण्यासाठी ब्रह्मदेवाचे स्थान फार महत्त्वाचे ठरावे. जर आपण आकाशगंगेचे कृष्णविवर (म्हणजे त्याच्या निकट) ब्रह्मदेवाचे स्थान (परमेष्ठी मंडल) मानले तर, महाप्रलय म्हणजे आपल्या आकाशगंगेतील समस्त जीवसृष्टीचा नाश आणि प्राकृत प्रलय म्हणजे आकाशगंगेचा विनाश असा अर्थ होतो. पण जर ब्रह्मदेवाचे स्थान स्वायंभू मंडल मानले, तर प्रलयाची व्याप्ती आपली आकाशगंगा ज्या कुठल्या केंद्राभोवती परिभ्रमण करत आहे, त्या केंद्रांशी संबंधित सर्व अवकाशीय वस्तूंशी निगडीत होते.

ब्रह्मदेवाच्या कालगणनेप्रमाणेच विष्णूची, शिवाची (रुद्राची ?) आणि आदिमायेची कालगणना चढत्या स्वरूपात उपलब्ध आहे !
--

--

मूळ विषयापासून थोडेसे अवांतर :

मन्वंतर बदलते तेंव्हा जसा मनु बदलतो तसाच इंद्र आणि सप्तर्षी देखील बदलतात असा उल्लेख आहे. सध्या आपण ज्या तार्‍यांना सप्तर्षी (Big Dipper) म्हणून ओळखतो हे 'Ursa Major' या तारकासमूहातील ठळक तारे आहेत. एका समूहात आहेत असे वाटणारे हे तारे प्रत्यक्षात विविध अंतरावर आहेत आणि त्यांच्या भ्रमणाच्या गतीही वेगवेगळ्या दिशांना आहेत. विविध संस्कृत ग्रंथात सप्तर्षींच्या नावाची वेगवेगळी यादी आहेत. पहिल्या मन्वंतरात प्रचलित असलेली नावे अशी होती क्रतु, पुलह, पुलस्त्य, अत्री, अंगिरस, वसिष्ठ आणि मरिचि आणि सध्याच्या मन्वंतरातील सप्तर्षि आहेत अत्रि, कश्यप, गौतम, जमदग्नि, भारद्वाज, वसिष्ठ, विश्वामित्र.

एक चौकोन आणि त्याचे शेपूट असा सात तार्‍यांचा आकार आपण सप्तर्षी म्हणून ओळखतो. हे सात तारे आहेत :

Dubhe; Alpha of Ursae Majoris :: १२४ प्रकाशवर्षे, प्रत : १.८१),
Merak; Beta Ursae Mejoris :: ७९ प्रकाशवर्षे, प्रत : २.३४)
Phad, Gamma Ursae Majoris :: ८४ प्रकाशवर्षे, प्रत : २.४१),
Megrez, Delta Ursae Majoris :: ८१ प्रकाशवर्षे, प्रत : ३.३२),
Alioth, Epsilon of Ursa Major :: ८१ प्रकाशवर्षे, प्रत : १.७६),
Mizar; Zeta Ursae Majoris :: ७८ प्रकाशवर्षे, प्रत : २.२३) आणि
Alkaid; Eta Ursae Majori :: १०१ प्रकाशवर्षे, प्रत : १.८५)

अनेक ठिकाणी वर उल्लेख केलेल्या सात तार्‍यांना अनुक्रमे क्रतु, पुलह, पुलस्त्य, अत्री, अंगिरस, वसिष्ठ आणि मरिचि अशी नावे दिली आहेत आणि त्यासाठी वापरलेला संदर्भ विष्णुपुराणाचा आहे. पण विष्णुपुराण जर या मन्वंतरात लिहिले गेले आहे Happy असे स्वीकाराले, तर हे तारे पहिल्या मन्वंतरातील सप्तर्षींचे निदर्शक मानावेत की सध्याच्या मन्वंतरातील सप्तर्षींचे ? मूळात सप्तर्षीचे तारे कोणते हे ठरविण्याचा काही निकष आहे का ? इथे ठळक तारे हा निकष बहुदा नसावा. कारण पहिल्या व सातव्या अशा दोन्ही मन्वंतरात, अत्रींचा सप्तर्षींमध्ये समावेश आहे. पण त्यापेक्षा अधिक ठळक दिसणारे तारे या तारकासमूहात आहेत. उदा.

Psi of Ursae Majoris :: १४७ प्रकाशवर्षे , प्रत : ३
Mu of Ursae Majoris :: २४९ प्रकाशवर्षे , प्रत : ३.०६
Iota of Ursae Majoris :: ४८ प्रकाशवर्षे , प्रत : ३.१२
Theta of Ursae Majoris :: ४४ प्रकाशवर्षे , प्रत : ३.१७

----

दिव्यवर्षे या कल्पनेला मूळातून नाकारणारी आणि महायुगांच्या परंपरागत मांडणी छेद देणारी एक वेगळी मांडणी श्री युक्तेश्वर यांनी केली आहे. त्यांच्या 'The Holy Science' या पुस्तकात ती मांडणी आहे. (हे पुस्तक इंटरनेटवर उपलब्ध आहे.) त्यानुसार सूर्य, आकाशगंगेच्या केंद्राभोवती भ्रमण करत नसून, त्याच्या एका जोडीदाराभोवती भ्रमण करतो आणि या भ्रमणादरम्यान तो जेंव्हा आकाशगंगेच्या केंद्राजवळ जातो, तेंव्हा कृतयुग येते व आकाशगंगेच्या केंद्रापासून दूर जातो तेंव्हा कलियुग. इथे सत्ययुग, त्रेतायुग, द्वापारयुग, कलियुग अशी १२००० वर्षांची उतरती आणि पुन्हा १२००० वर्षांची चढती युगरचना करून, तिचा संबंध जोडीदाराभोवतीच्या परिभ्रमण काळाशी व अंतिमत: पृथ्वीच्या Axial Precession (विषुचलनाशी) जोडला आहे. व्यक्तिश: मला ही मांडणी कधीच पटली नाही. तिच्यात अनेक त्रुटी आहेत.
----

मग विश्वाच्या वयासंबंधी आपली परंपरागत धारणा, ही केवळ कविकल्पना मानायची का ? किंवा आधुनिक विज्ञानाने मोजलेले विश्वाचे वय तरी कितपत योग्य, अचूक आहे ?

आपली परंपरागत धारणा केवळ कविकल्पना नसावी असे मानण्यासारख्या काही गोष्टी त्या गणितात आहेत. त्यातील सर्वप्रथम आहे ती कालगणनेतील फरक. पृथ्वीवरील, देवलोकातील आणि ब्रह्मलोकातील काळाची गती वेगवेगळी दाखविली आहे. 'देवांचे' एक वर्ष म्हणजे मानवाची ३६० वर्षे हे सूत्र आपल्याला असे सांगते की (देवलोक म्हणजे देवांचा ग्रह असे मानल्यास) हा बहुदा एक प्रकारचा गुरुत्वीय कालविस्तार (Gravitational Time Dilation) आहे. हा 'लोक' अशा ठिकाणी आहे जिथल्या गुरुत्वीय बलाने, तिथल्या काळास आपल्यापेक्षा ३६० पटीने संथ ठेवले आहे. काळ इतक्या मोठ्या प्रमाणात संथ असणे, केवळ प्रचंड गुरुत्वाकर्षण असलेल्या एखाद्या अवकाशीय वस्तूच्या परिसरातच शक्य आहे. दुसरी गोष्ट अशी की, कालगणना सांगणार्‍या या श्लोकांमध्ये ब्रह्मदेवाचे आयुष्य प्रचंड दीर्घ दाखवले असले तरी ते अमर्यादित नाही वा ब्रह्मदेव 'अमर' दाखविलेला नाही. त्याची कालगणना प्रचंड संथ आहे इतकेच. प्रत्यक्ष अनुभव आल्याशिवाय वा हे ज्ञान अन्य कुणाकडून मिळाल्याशिवाय Time Dilation ची ही कल्पना कागदावर उतरणे जरा अवघड वाटते. कालमापनातील हा फरक ही कविकल्पना नाही असे मानून विचार केल्यास पुढीलप्रमाणे गणित करता येऊ शकते. (परिभ्रमणाच्या वेगामुळे पडणारा फरक तात्पुरता दुर्लक्षित करून)

पृथ्वीवर ठराविक काळ लोटलेला असताना, प्रचंड गुरुत्वाकर्षण असलेल्या एखाद्या परिसरात, एखाद्या (स्थिर) अवकाशीय वस्तूवर जे Gravitational Time Dilation अनुभवास येईल ते पुढील सूत्राने काढता येते.

T-earth = T-object / (SQRT(1 - (2*G*M / (R * C^2) ) ) )
इथे G हा Gravitational Constant आहे.
T-earth पृथ्वीवर लोटलेला काळ (Fast-Ticking)
पृथ्वीवर T-earth इतका काळ लोटलेला असताना, प्रचंड गुरुत्वाकर्षण असलेल्या परिसरात एखाद्या अवकाशीय वस्तूवर लोटलेला काळ T-object (Slow-Ticking)
M हे त्या प्रचंड गुरुत्वाकर्षणास कारणीभूत ठरणार्‍या अवकाशीय वस्तूचे वस्तूमान
R गुरुत्वाकर्षण अनुभवणार्‍या व्यक्तीचे गुरुत्वाकर्षण निर्माण करणार्‍या अवकाशीय वस्तूच्या केंद्रापासूनचे अंतर
C म्हणजे प्रकाशवेग

--
देवलोक म्हणजे अशा प्रचंड गुरुत्वाकर्षण असलेल्या अवकाशीय वस्तूच्या परिसरातील एखादा ग्रह वा तारा आहे असे मानल्यास :
--

T(earth) = T(devlok) / (SQRT(1 - (2*G*M / (R * C^2)) ) )

∴ (SQRT(1 - (2*G*M / (R * C^2)) ) ) = T(devlok) / T(earth)

दोन्ही बाजूचा वर्ग करून
∴ 1 - (2*G*M / (R * C^2)) = (T(devlok) / T(earth)) ^ 2
∴ (2*G*M / (R * C^2)) = 1 - ((T(devlok) / T(earth)) ^ 2 )

प्रकाशाचा वेग = 29,97,92,458 मीटर प्रति सेकंद घेऊन

∴ (2 * 6.67 * 10^(-11) * M / (R * (29,97,92,458)^2)) = 1 - (1 / 360)^2
∴ (2 * 6.67 * 10^(-11) * M / (R * (29,97,92,458)^2)) = 1 - (1 / 129600)
∴ (2 * 6.67 * 10^(-11) * M / (R * (29,97,92,458)^2)) = 1 - 0.00000771605 = 0.99999228395
∴ 13.34 * 10^(-11) * M / (R * 89,87,55,17,87,36,81,764) = 0.99999228395
∴ M / R = (0.99999228395 * 89,87,55,17,87,36,81,764) / (13.34 * 10^(-11))
∴ M / R = (0.99999228395 * 89,87,55,17,87,36,81,764 * 10^11) / 13.34
∴ M / R = 6,7,3,7,2,4,3,2,0,7,6,2,3,0,9,4,0,6,13,06,21,348 (अर्थात अंदाजे ६,७३,७२,४३,२०७.६ परार्ध = ६.७३ अब्ज परार्ध )
∴ M / R = 6.73729 * 10^26

वस्तुमान व त्रिज्या यांचे इतके प्रचंड गुणोत्तर असे सांगते, की प्रचंड गुरुत्वाकर्षण असलेल्या परिसरात देवलोक आहे हे सुरूवातीचे अनुमान योग्य आहे.
एखाद्या सर्वसाधारण ग्रहाच्या बाबतीत असे घडण्याची सुतराम शक्यता नाही. कदाचित ही गोष्ट एखाद्या न्यूट्रॉन तार्‍याच्या बाबतीतही घडू शकते. पण तार्‍यावरती जीवसृष्टी असू शकते ही शक्यता अत्यंत विरळ आहे. (केवळ Black Dwarf वर मर्यादित काळ असे घडू शकेल अशी शक्यता काही जणांनी वर्तविली आहे) . कोणत्याही तार्‍यावर जीवसृष्टी शक्य नाही असे मानल्यास, उरणारी संभाव्य शक्यता हीच आहे की एखाद्या कृष्णविवराजवळ पण Event Horizon च्या बाहेर असणार्‍या, एखाद्या तार्‍याभोवती फिरणार्‍या ग्रहावर 'देवलोक' आहे !

==

दुसर्‍या बाजूने विचार केल्यास :

गेल्या लेखांकात हे स्पष्ट झाले आहे की आपल्या कालगणनेचे आकडे, आधुनिक विज्ञानाच्या कालगणनेशी जुळत नाहीत. त्यामुळे कोणत्याही विज्ञानवादी व्यक्तीस असे वाटले, की स्मृती-पुराणातील ही कालगणना म्हणजे कल्पनेचा खेळ आहे, तर तसे वाटणे हे पूर्णत: चूक नव्हे. कारण ही कालगणना कशी ठरविली याचा उल्लेख बहुदा उपलब्ध नाही आणि त्यामुळे हे ज्ञान 'देवांकडून' मिळाले असावे असाच अर्थ निघतो. पण जर या न्यायाने आपली, कालगणना कल्पनेचा खेळ असेल असे समजायचे असेल तर, आधुनिक पद्धतीने केलेली विश्वाची कालगणना ही सुद्धा काही गृहीतकांच्या पायावरचा डोलारा आहे हे देखील लक्षात घ्यायला हवे. आज विज्ञानाने 'सिद्ध' केलेली जी कालगणना आपण मान्य करतो त्यामागची आधुनिक विज्ञानाने मानलेली काही गृहीतके, काही मापनेच चुकीची असतील तर ? किंवा ही गृहीतके, मापने विश्वाच्या केवळ एका भागातच सत्य ठरत असली तर ?

पहिल्या लेखांकात विश्वाचे वय काढण्याची पद्धत दिली आहे ती पद्धत मूळातच काही गृहीतकांवर अवलंबून आहे. त्यातील काही पुढीलप्रमाणे :

१)
आधुनिक विज्ञानात अढळ सत्यासारखे मानले जाणारे एक गृहीतक असे आहे की प्रकाशाचा वेग हा सर्वत्र आणि सर्व काळात समान आहे आणि प्रकाशवेगापेक्षा अधिक वेगाने काहीही जाऊ शकत नाही. पण खरेच असे आहे का ?

इथे 'सर्वत्र' हा शब्द खरंतर निर्वात पोकळीला लागू आहे आणि विश्वात सगळीकडे, दोन अवकाशीय वस्तूंच्या दरम्यान अशी निर्वात पोकळी आहे असे मानले आहे. या निर्वात पोकळीचे गृहीतक चुकीचे असेल तर हे गणित बदलू शकते. आजचे विज्ञान असे मानते की विश्वात सर्वत्र Dark Matter आणि Dark Energy भरून राहिली आहे. (इथे Dark Matter हे देखील एका प्रकारचे गृहीतकच आहे) या संदर्भात सध्या असे मानले जाते की प्रकाशावर Dark Matter मुळे कोणताही विद्युतचुंबकीय परिणाम होत नाही. जर काही परिणाम होत असेल, तर तो केवळ गृरुत्वीय बलामुळे होतो. गृरुत्वीय बलामुळे होणारा परिणाम आपण अनुभवला आहे. Gravitational Lensing मुळे एखाद्या अवकाशीय वस्तूच्या थेट मागे असणारी दुसरी अवकाशीय वस्तू दिसते हे आपण स्वीकारले आहे. याचाच दुसरा अर्थ असा की एखाद्या वस्तूपासून निघालेला प्रकाश हा सरळ रेषेत प्रवास करूनच आपल्यापर्यंत पोहोचला असेल असे ठामपणे सांगता येणार नाही. कोणत्याही कारणामुळे आलेल्या अवकाशाच्या वक्रतेमुळे, त्याने प्रत्यक्षात पार केलेले अंतर कितीतरी अधिक असू शकते. थोडक्यात प्रकाश एका सरळ रेषेत प्रवास करतो या पूर्वीच्या गृहीतकाला धक्का लागलेला आहे. भविष्यात Dark Matter, Dark Energy या गृहीतकांबाबत अधिक माहिती उपलब्ध झाल्यावर, असाच धक्का प्रकाशवेगाच्या संदर्भातील आपल्या आजच्या कल्पनांना बसणार नाही, असे ठामपणे आपण म्हणू शकणार नाही.

आईनस्टाईनच्या व्यापक सापेक्षता सिद्धांतासंबंधी (General Theory of Relativity) एका पेपरमध्ये शेवटच्या पानावर (मूळ पेपर जर्मन मध्ये आहे) ,

त्याने लिहिलेले हे वाक्य बोलके आहे.

"The space-time problem seems to me to lie as follows. If we restrict ourselves to a work of constant gravitational potential, the laws of nature are of an extraordinarily simple and invariant form. when they are referred to a space-time system of the manifold connected by the Lorentz transformations with constant c. If we do not restrict ourselves to areas of constant c, the multiplicity of the transformations permitting natural laws will become a coarser, but the laws will become more complex."

इथे तो एकाप्रकारे अशी शक्यता व्यक्त करतो आहे की, प्रकाशाचा वेग स्थिर नसणारे काही विभाग अवकाशात असू शकतील आणि अशा ठिकाणचे भौतिकी, गणिती नियम, आपल्यासाठी विलक्षण गुंतागुंतीचे असू शकतात.

प्रकाशवेग स्थिर असेलच असे नाही या विचाराला पुष्टी देणारी ही एक बातमी. अर्थात इथे त्याचे कारण गुरुत्वाकर्षण नसून वेगळे काही आहे.

कालमापनाचे परिमाण (सेकंद) आणि अंतराचे परिमाण (मीटर) ही दोन्ही प्रकाशवेग स्थिर आहे या गृहीतकावर आधारलेली आहेत. अवकाशात प्रकाशवेग समान असतोच असे नाही असे जर भविष्यात सिद्ध झाले तर अवकाशातील अंतरांमध्ये, विविध कालावधींमध्ये त्यानुसार फरक पडेल आणि विश्वाच्या वयाचे गणित देखील बदलेल.

----
त्यात या व्याख्या बघा. Happy
Second : The SI definition of second is "the duration of 9,19,26,31,770 periods of the radiation corresponding to the transition between the two hyperfine levels of the ground state of the caesium 133 atom."
Speed of Light : The speed of light in vacuum, commonly denoted c, is a universal physical constant & its exact value is 29,97,92,458 metres per second; it is exact, because the unit of length, the metre, is defined from this constant and the international standard for time.
Metre (Or Meter) : The metre is defined as the length of the path travelled by light in a vacuum in 1/29,97,92,458 seconds.

एक गोल फेरी मारल्यासारखे वाटते का ? Happy
Caesium 133 अणूची मोजमापे पृथ्वीनिष्ठ आहेत.
----

२)
पहिल्या लेखांकात नमूद केल्यानुसार, विश्वाच्या वयाचे गणित हबल स्थिरांकाच्या मूल्यावर आधारित आहे. हबल स्थिरांक हा विश्वाच्या प्रसरणाचा वेग आहे आणि खरंतर तो स्थिरांक नव्हे. हा स्थिरांक मोजण्यासाठी जे घटक वापरले जातात त्यातही प्रचंड गृहीतके आहेत. विश्वाचा प्रसरणवेग मोजण्यासाठी दूरदर्शकाच्या माध्यमातून, अधिकाधिक आकाशगंगांचे सातत्याने निरीक्षण करून, त्यांचे आपल्यापासूनचे अंतर मोजले जाते. यासाठी त्या आकाशगंगांकडुन प्राप्त होणार्‍या प्रारणांची redshift (तरंगलांबीमध्ये झालेले मूल्यवर्धन) मोजली जाते. (इथेही प्रकाशवेग हा स्थिर आहे हे गृहीतक आहेच !) वेगवेगळ्या कालावधीत त्यांच्या अंतराचा मागोवा घेतल्यावर, या आकाशगंगांचा आपल्यापासून दूर जाण्याचा वेग समजतो. पहिल्या लेखांकात उल्लेख केल्याप्रमाणे ,एकाच वेधशाळेने वेगवेगळ्या कालावधीत मोजलेल्या हबल स्थिरांकाचे मूल्य वेगवेगळे येते, त्याचे प्रमुख कारण आहे निरीक्षणाखाली आलेल्या आकाशगंगांची वाढती संख्या. विविध आकाशगंगांच्या दूर जाण्याच्या वेगाचे एकत्रीकरण करून विश्वाच्या प्रसरणाचा वेग निश्चित केला जातो. याचाच दुसरा अर्थ असा की जसजशी निरीक्षणाखाली येणार्‍या आकाशगंगांची संख्या वाढेल (उदा. २०१८ नंतर James Webb Space Telescope पूर्ण क्षमतेने काम करू लागल्यावर) , तसतसे हबल स्थिरांकाचे मूल्याही बदलत जाईल, आणि पर्यायाने विश्वाचे अनुमानित वय देखील बदलेल. थोडक्यात सांगायचे तर कोणत्याही दूरदर्शकाच्या वा अन्य संभाव्य माध्यमातून निरीक्षणाखाली आलेल्या विश्वाच्या पसार्‍यावर, आधुनिक विज्ञानाने मोजलेले विश्वाचे वय अवलंबून आहे ! जसजसे विश्वाच्या निश्चित स्वरूपाबाबत, विस्ताराबाबत आपले ज्ञान वृद्धिंगत होत जाईल, परिपक्व होत जाईल, तसतसे विज्ञानाला उमगणारे विश्वाचे अनुमानित वय देखील बदलत जाणार आहे.

शिवाय असाही विचार करायला हवा की विश्वाचे वय ठरविण्यासाठी प्रकाशाचा वा प्रारणांचा उपयोग करणे हे अचूक साधन आहे का ? मूळात ही शक्यता का विचारात घेऊ नये की आपण वैज्ञानिक निरीक्षणे घेण्यास सुरुवात केली, त्याच्या कितीतरी आधी विश्वाचे प्रसरण इतक्या मोठ्या प्रमाणात झाले होते की तिथला प्रकाश / प्रारणे आपल्यापर्यंत कधीही पोहोचू शकलेली नाहीत वा शकणार नाहीत ? किंवा आपण निरीक्षणे सुरुवात करण्यापूर्वी तिथला प्रकाश / प्रारणे आपल्यापर्यंत पोहोचत होती पण आता प्रचंड मोठ्या अंतरामुळे ती प्रारणे आपल्यापर्यंत पोहोचू शकत नाहीत ?

३)
Big Bang ही सर्वाधिक स्वीकारली गेलेली तरीही, केवळ विश्वाच्या उत्पत्तीसंबंधीची एक धारणा आहे, आणि खर्‍या अर्थाने 'विश्वाचे वय' ठरविण्यासाठी ती परिपूर्ण नाही. आधुनिक पद्धतीने विज्ञानाने ठरविलेले विश्वाचे वय (जर अचूक आहे असे मानले तर) , तर हे वय केवळ, Big Bang पासून लोटलेला कालावधी सांगते.

बरेचसे वैज्ञानिक म्हणतात की हे विश्व सतत प्रसरण पावत आहे आणि एवढेच नव्हे तर त्या प्रसरण वेगाला त्वरण आहे. आपल्यापासून एक मेगापार्सेक अंतरावर असलेल्या आकाशगंगा ज्या वेगाने आपल्यापासून दूर जात आहेत, त्याच्या दुप्पट वेगाने आपल्यापासून दोन मेगापार्सेक अंतरावर असलेल्या आकाशगंगा दूर जात आहेत. विश्वाला एखाद्या फुगणार्‍या फुग्याची उपमा देणे कदाचित योग्य ठरणार नाही, पण केवळ तुलनेसाठी तसा विचार केला तर कोणताही फुगा, बुडबुडा सतत फुगत राहिला तर एक वेळ अशी येते जेंव्हा तो फुटतो. मग विश्व हे अमर्याद प्रसरण पावत राहणार आहे असे आपण मानू शकू का ?

अमर्याद प्रसरणशील विश्व ही संकल्पना शक्य नाही हे जर स्वीकारले तर त्यानंतर स्वाभाविकपणे तीनच शक्यता उरतात.
एक) एक वेळ अशी येईल जेंव्हा प्रसरण थांबून विश्व ज्या स्थितीला पोहोचले आहे त्या स्थितीला स्थिर राहील कारण एक वेळ अशी येईल की विश्वातील सर्व ऊर्जा लोप पावेल. (Big Freeze)
दोन) फुगणारा फुगा सतत हवा भरत राहिल्यास फुटतो व छिन्नविछिन्न होतो, त्याचप्रमाणे विश्वाची अवस्था होईल (Big Rip)
तीन) प्रसरण पावणारे विश्व एका ठराविक मर्यादेपर्यंत प्रसरण पावत राहील आणि त्यानंतर त्याच्या आकुंचनाचा (Big Crunch) आरंभ होऊन ते पुनश्च मूळ स्थितीला (Big Bang पूर्वीची) येईल

विश्वाच्या उत्पत्तीसंबंधीची आपली पारंपारिक धारणा ही चक्रनेमिक्रमाची (Cycle) आहे. तिच्याशी साधर्म्य असणारी आणि काही वैज्ञानिकांना भावणारी, वरची तिसरी शक्यता Big Bounce या नावाने ओळखली जाते, ज्यानुसार Big Bang आणि Big Crunch आळीपाळीने होत राहतात. पण आपण अजूनही Big Bang या अवस्थेतच आहोत ही धारणाच चुकीची असेल तर ? किंवा Big Crunch ला आरंभ झाला आहे, पण त्याची निरीक्षणे करण्याएवढे आपले विज्ञान सक्षम होऊ शकलेले नाही असे असेल तर ?

या क्षणाला विश्व प्रसरण पावत आहे हे ठामपणे म्हणता येणार नाही असे मानणारे देखील काही वैज्ञानिक आहेत आणि त्यांच्या मान्यतेचा आधार काही निरीक्षणेच आहेत. त्या वैज्ञानिकांच्या म्हणण्यानुसार अतिदूर अंतरावर युक्लिडियन भूमितीचे सर्वसाधारण नियम लागू पडत नाहीत. (मूळात गणित हा मानवाचा त्याने स्वत:च्या आकलनासाठी लावलेला शोध आणि त्याच्या आकलनाचे केवळ एका साधन आहे की मानवाव्यतिरिक्त गणिताचे स्वतंत्र अस्तित्व आहे हा मूलभूत प्रश्न आहे. Happy ) Big Bang मुळे विश्वाचा आरंभ झाला असे म्हटल्यावर डोळ्यासमोर एका अवाढव्य फुग्याच्या आत जशी अवस्था असेल तसा काहीसा (गोल वा लंबगोल) आकार डोळ्यासमोर येतो, पण तसे असेलच असे नाही. विश्वाचा आकार अनियमितही असू शकतो. विश्वाचा आकार एखाद्या तारामाशासारखा (Star Fish) आणि आपण त्या तारामाशाच्या एका भुजेत असू, तर आपल्याला अदृश्य असणारे विश्व हे प्रचंड विशाल असेल. सोयीसाठी विश्वाचा आकार अंडाकृती जरी मानला तरीही आपल्याला विश्व 'जसे दिसते' तसे ते प्रत्यक्षात असेलच असे नाही. अॅटलासमधील भू-नकाशा पाहून जर आपण अशी समजूत करून घेतली की ऑस्ट्रेलिया पासून अमेरिकेकडे जायला 'सरळ रेषेत' एकमेव मार्ग आहे तर ते चुकीचे ठरेल. कारण अॅटलासमधील पृथ्वीचा नकाशा हा प्रत्यक्षातील त्रिमित जगाचे द्विमित रूप आहे. त्याचप्रमाणे आपल्याला पृथ्वीवरून किंवा सूर्यमालेतून दिसणारे विश्वाचे रूप फसवे असू शकते. Big Bang चा विचार करताना सायकलच्या चाकाच्या मधल्या भागाकडून, चाकाचे आरे जसे सर्व दिशांना जातात तशी कल्पना करून (अर्थात हे उदाहरण द्विमित झाले, त्याजागी त्रिमित विचार केला तरीही), महास्फोटानंतर विश्वाची वाढ सर्व दिशांना सारख्या प्रमाणात झाली असावी ही संकल्पनाच चुकीची असू शकते. एखाद्या त्रिमित अमीबाप्रमाणे विश्वाचा आकार अनियमित देखील असू शकतो.

आजही आपल्याला विश्वाच्या स्वरूपाचे पूर्ण ज्ञान झालेले नाही. चंद्र पृथ्वीभोवती फिरतो, पृथ्वी सूर्याभोवती फिरते, सूर्य आकाशगंगेच्या (Milky Way) भोवती प्रदक्षिणा घालतो, इथपर्यंत आपण पोहोचलो आहोत. पण मग आपली आकाशगंगा कुणाभोवती फिरते ? याचे उत्तर आपल्याला नीटसे माहीत नाही आपली आकाशगंगा ज्या लोकल ग्रुप मध्ये आहे, त्यात असंख्य आकाशगंगा आहेत, या लोकल ग्रुप मध्ये Center of Mass असावे आणि त्याभोवती आपली व अन्य आकाशगंगा फिरत असाव्यात हा केवळ तर्क आहे. आपला लोकल ग्रुप आणि असे असंख्य दुसरे ग्रुप हे 'Virgo Super Cluster' चा भाग आहेत आणि हा Virgo Super Cluster त्याहूनही प्रचंड मोठ्या अशा Shapley Supercluster च्या दिशेने प्रवास करत आहे. इथे भ्रमणाच्या कक्षा वा इतर घटक निश्चित करण्याइतकी आज आपली प्रगती झालेली नाही. पण आपल्या आसपासच्या सर्व आकाशगंगा Shapley Supercluster या एकाच दिशेने का प्रवास करत आहेत हा कुतुहलाचा आणि संशोधनाचा विषय तर आहेच, पण कुठेतरी अलगदपणे तो Big Crunch च्या दिशेने बोट तर दाखवत नाही ना ही शंका मनात उत्पन्न करणारा आहे.
--

विज्ञानातील गृहीतके या 'विज्ञाननिष्ठ कविकल्पना' आहेत असे म्हटले तर ते थोडे अतिरेकी होईल; कारण काही गृहीतकांवर आधारित प्रमेयांची सिद्धता आपण कागदावर मांडू शकतो. पण त्यासोबत हे देखील लक्षात ठेवले पाहिजे, ही गृहीतके सार्वत्रिक आणि सार्वकालीन सत्ये आहेत असे मानून चालणे, तितकेच अतिरेकी ठरेल. ठामपणे मांडले गेलेले सिद्धांत, त्यामागील गृहीतकांना धक्का लागताच कोसळतात, नवनवीन ज्ञान, विज्ञान उदयास येते आणि जुने कालबाह्य होते वा ठराविक परिस्थितीपुरते सीमित होते असे अनुभव आजवर वारंवार आले आहेत. पण तरीही आधुनिक विज्ञानाने काही गोष्टी सिद्ध झाल्या, म्हणजे ज्यांची पूर्वपीठिका माहीत नाही, ज्यामागचा कार्यकारण भाव ज्ञात नाही, अशी प्राचीन इतिहासातील माहिती वा अशा नोंदी लगेच निकालात काढण्याकडे, त्याज्य ठरविण्याकडे काही जणांचा कल असतो, तो मात्र तितकासा योग्य नाही. विज्ञान ज्या गोष्टींचा प्रत्यक्ष अनुभव घेऊ / देऊ शकत नाही, ज्या गोष्टी आधुनिक विज्ञानासाठी अजूनही कागदावर, सैद्धांतिक स्तरावर, केवळ गणिती स्तरावर आहेत, त्या प्रमाण मानायच्या, परंतु त्याच वेळी परंपरेने उपलब्ध झालेले असे ज्ञान, जे ज्ञात विज्ञानाच्या चौकटीबाहेर आहे आणि ज्याचा उगम माहीत नाही, पण तरीही जे चूक आहे म्हणून सिद्ध होऊ शकलेले नाही, ते अतार्किक म्हणून नाकारायचे हा निव्वळ दुटप्पीपणा आहे. कोण जाणे, कदाचित भविष्याच्या उदरात, प्राचीन ज्ञानाला सत्य ठरविणारे काही दडलेले असू शकते.

====

संपादित
साभार : विकास दत्तात्रेय बापट

Groups audience: 
Group content visibility: 
Use group defaults

माझ्या माहितीप्रमाणे युक्तेश्वरांच्या पुस्तकात २४००० वर्षात सूर्य त्याच्या जोडीदाराभोवती प्रदक्षिणा करतो असे म्हटले आहे, विष्णुनाभीभोवती प्रदक्षिणेचा कालावधी दिलाच नाही आहे.>>> मान्य. विष्णुनाभीभोवती प्रदक्षिणेऐवजी प्रदक्षिणा करताना विष्णुनाभीच्या जवळ आणि दूर असे हवे होते.

Pages