माझं गाव

Submitted by निरंजन कुलकर्णी on 24 November, 2019 - 01:16

माझं गाव ‘नागदेववाडी’. कोल्हापूर शहरातून एक रस्ता गगनबावड्याकडे जातो. त्याच रस्त्याला उजव्या बाजूला नागदेववाडी हे गाव आहे. कोल्हापूरच्या रंकाळा तलावापासून केवळ दोन मैल दूर. साधारण पाच वर्षांपूर्वीच आम्ही इथे राहायला आलो. सध्या मी व माझा भाऊ पुण्यात असतो पण माझे आई वडील गावातच राहतात. गावाचं नाव ‘नागदेववाडी’ कसं पडलं हे मलाही नाही सांगता येणार पण गावात पूर्वी खूप नाग असावेत असा अंदाज लावता येईल. गावात एक छोटं नागाचं मंदिर सुद्धा आहे.

तसं आमचं घर गावापासून थोडं दूर आहे. गावातील बहुतांश लोक शेतकरीच आहेत. प्रत्येकाची थोडी का होईना पण स्वतःची शेतजमीन आहे. आमच्याकडे मात्र कसली जमीन वगैरे नाही. गगनबावड्याकडे जाणाऱ्या रस्त्यावर फुलेवाडीचा टोलनाका ओलांडला की थोडं पुढे गेल्यावर उजवीकडे एक रस्ता वळतो. हा रस्ता पुढे शिंगणापूर गावात जातो. या रस्त्याने थोडं पुढे आल्यावर डाव्या बाजूला एक पाण्याची टाकी दिसते. पाण्याच्या टाकीकडून डाव्याबाजूला उतारावरून काही अंतर गेल्यावर आमचं घर आहे. तिथून अजून पुढे गेल्यावर मुख्य गाव सुरू होतं. माझ्या घरापर्यंत पक्का रस्ता आहे. तिथून पुढे मात्र गावातला मातीचा रस्ता सुरू होतो.

आमच्या गावाला निसर्गाने भरभरून दिलं आहे. रस्त्याच्या दुतर्फा उंचच उंच वाढलेले उसाचे तांडे, वाटेत एखाद्या जीर्ण झालेल्या पुरातन वृक्षाची सावली, त्या वृक्षाच्या फांद्यांवर अतिशय कष्टाने बांधलेली सुंदर, सुबक पक्ष्यांची घरटी व त्या घरट्यांमध्ये बसून सूर्य मावळताच आपल्या किलबिलाटाने जणू दिवस संपल्याची सूचना देणारे पक्षी, संध्याकाळी दिवसभर काम करून थकून घरी परतणारे गुराखी व त्यांच्या मागून अतिशय शांतपणे एका रेषेत चालणाऱ्या म्हशी, रस्त्याने अजून थोडं पुढे गेल्यावर शांतपणे वाहणारी पंचगंगा नदी व नदीपात्रात सूर्यास्ताच्या वेळी पडणारं मावळत्या सूर्याचं प्रतिबिंब, सर्वकाही अतिशय सुंदर आहे. साधारण दोन महिन्यातून एकदा माझी गावाकडे चक्कर असतेच. घरी पोहोचताच एका वेगळ्याच वातावरणात माझं मन रमतं. आता चार दिवस कसली घाई नाही की कामाचं टेन्शन नाही. इथे सगळं निवांत असतं.

आमच्या घरासमोर एक खणी आहे. त्या खणीला लागून एक उंच झाड आहे. या झाडावर सुग्रणीची अनेक घरटी आहेत. काही वर्षांपूर्वी जेव्हा मी शिकत होतो तेव्हा मी घरीच असायचो. दिवसभर माझा आभ्यास चालायला. दुपारी फार कंटाळा यायचा मग मी थोडा वेळ बाहेर आंगणात जायचो. त्यावेळी या सुग्रणींचं घरबांधणीच काम सुरू असायचं. एकेक सुगरण जवळच्याच शेतात जाऊन तेथील उसाच्या पानाचा एक धागा आपल्या चोचीने तोडायची व पुन्हा झाडापाशी जाऊन आपल्या अर्धवट विणलेल्या घरट्यात विणायची. पुन्हा जाऊन धागा आपल्या चोचीत घेऊन यायची व घरट्यात विणायची. कितीतरी वेळ तिचं हे काम सुरू असायचं. तिची ही मेहनत पाहून मीही थक्क व्हायचो. हे पाहून माझ्या मनातील मरगळ कुठल्याकुठे पळून जायची व मी पुन्हा माझ्या खोलीत जाऊन अभ्यासाला लागायचो. संध्याकाळ होताच मेंढ्यांची मेमे…सुरू व्हायची. आमच्या घरासमोरच एक छोटं मैदान आहे. खरंतर मैदान नाही म्हणता येणार. मोकळी जागा आहे असं मी म्हणेन. तिथे वर्षातले काही दिवस मेंढ्यांचा मुक्काम असतो. दुपारी किंवा संध्याकाळी मेंढपाळ शेकडो मेंढ्या घेऊन येतो व जवळपासच्या माळरानावरच्या गवतावर ताव मारून या मेंढ्या आमच्या घरासमोरच्या जागेत मुक्काम ठोकतात. रात्र होताच या मेंढ्यांचं (ओ) रडणं सुरू होतं. सकाळ होताच मेंढ्यांचा लोंढा तिथून हलतो व त्यांचा प्रवास पुन्हा सुरू होतो. सर्वात जास्त कौतुक मात्र मला या मेंढपाळांच्या कुत्र्याचं वाटतं. हा कुत्रा कायम अतिशय कर्तव्यदक्ष असतो. त्याचं सर्व मेंढ्यांकडे अगदी बारीक लक्ष असतं. एखादी मेंढी त्याला कळपाच्या बाहेर जाताना दिसली की तो तिला बरोबर पुन्हा कळपात आणतो.

प्रत्येक गावात भुताटकीच्या गोष्टी असतातच. तशा आमच्या गावात देखील आहेत. त्यातल्या किती खऱ्या किती खोट्या हा विषय वेगळा. मला स्वतःला देखील तसे अनुभव आले आहेत. तेव्हा आम्ही गावात नुकतेच रहायला आलो होतो. रविवारचा दिवस होता व वेळ सकाळची होती. केस कापायला मी घरातून बाहेर पडलो व थोड्याच वेळात कटिंगच्या दुकानापाशी पोहोचलो. दुकान बंद होतं. मी परत निघालो. पाण्याच्या टाकीच्या अलीकडे एक वृद्धाश्रम आहे. त्या वृद्धाश्रमासमोर बरीच झाडी आहे व त्या झाडीमागे खूप जुनं पाणी शुद्धीकरण केंद्र आहे. आता ते केंद्र बंद असतं. तिथे आता नुसती मोकळी जागा आहे व त्या जागेभोवती चार बाजूनी उंच दगडी भिंती आहेत. समोरच्या बाजूला एक लोखंडी गेट आहे व मागच्या बाजूला सुद्धा तसच गेट आहे. आजूबाजूला उंचच उंच झाडं आहेत. तिथे वेगवेगळ्या प्रकारचे पक्षी दिसतात असं मी ऐकलं होतं. त्यामुळे मी घरी न जाता एखादा पक्षी दिसतो का ते पाहण्यासाठी तिथे निघालो. थोडं पुढे गेल्यावर मला एक खंड्या म्हणजेच किंग फिशर पक्षी दिसला. एका छोट्या झाडाच्या फांदीवर तो बसला होता. मी खिशातून फोन काढला. मी त्या पक्ष्याचा फोटो काढणार होतो तितक्यात तो त्या झाडावरून उडाला व झाडीत गायब झाला. मीही त्याच्यामागे गेलो पण पुन्हा मला तो पक्षी दिसला नाही. थोडं चालल्यावर मी पाणी शुद्धीकरण केंद्रापाशी पोहोचलो. पायऱ्या चढून वर गेल्यावर लोखंडी गेटसमोर गेलो. गेट बंद होतं. पूर्ण गेटला गंज चढला होता. समोर मोकळ्या जागेत वाळलेलं पिवळं गवत पसरलं होतं व त्या गवताचा जीर्ण वास हवेत पसरला होता. समोरच्या गेटमागे कोणीतरी बसलं होतं. ती एक मुलगी होती. गुढगे दुमडून त्या गेटला टेकून ती बसली होती. तिची मान खाली झुकली होती त्यामुळे तिचे लांब पण विस्कटलेले केस खाली मातीत मिसळले होते. त्या मुलीला पाहताच माझं मन एका क्षणात भीतीने व्यापलं. हृदयाची धडधड वाढली. आता ती मुलगी डोकं वर करून आपल्याकडे पाहतेय व काही क्षणातच ती हावेतूनच आपल्यावर झेप घेईल असा मला भास झाला व मी तिथून पळालो. पळत पळतच मी घरी आलो. बराच वेळ मी धापा टाकत होतो. “काय झालं रे?” आईने मला विचारलं. पण मी काहीच न बोलता माझ्या खोलीत गेलो व बेडवर पडलो. थोड्यावेळाने मन जरा शांत झालं, हृदयाची धडधडही कमी झाली. मी खाली जाऊन आईला सगळं सांगितलं. “म्हणून म्हणते मी भूतांचे पिक्चर पाहत जाऊ नकोस.” आई उलटं मलाच ओरडली. नंतर मला वाटलं, आपण उगाचच घाबरलो. पण तरीही पुन्हा मी त्या जागी जायचं धाडस केलं नाही. त्या प्रसंगानंतर काही दिवसांनी माझ्या आईची गावातली एक मैत्रीण आईला भेटली होती. तिने आईला सांगितलं. तिचा मुलगा साधारण माझ्याच वयाचा असेल. तो शेतात काम करायला जायचा. पण अचानक तो डोक्यावर परिणाम झाल्यासारखा वागायला लागला. काम धंदा सोडून त्या पाणीशुद्धीकरण केंद्रा पाशी जाऊन दिवसभर नुसता घुम्या सारखा बसायचा. बरेच दिवस हे सुरू होतं. घरचे सगळेच फार काळजीत होते. एक दिवस गावात एक नाथ सांप्रदायातले योगी आले होते. त्यांना दाखवल्यावर त्या योगींनी काही मंत्र तंत्र केले. तेव्हा कुठे हा हळू हळू सुधारला. हे सर्व ऐकून माझ्या अंगावर शहारा आला.

एके दिवशी माझा मावस भाऊ पुण्याहून आला होता. संध्याकाळी मी, माझा भाऊ व मावसभाऊ आम्ही तिघे नदीकडे जायला निघालो. “आज आमावस्या आहे, जास्त वेळ नदीजवळ थांबू नका.” निघताना नेहमीप्रमाणे आज्जी म्हणाली. थोड्याच वेळात आम्ही नदीजवळ पोहोचलो. सूर्य मावळायला अजून थोडा वेळ बाकी होता. आमच्या गप्पा चांगल्याच रंगल्या होत्या. गप्पांच्या नादात रात्र कधी झाली आम्हाला समजलच नाही. आम्ही परत घरी जायला तिथून निघालो. सगळीकडे अंधार पडला होता. मी फोनचा टॉर्च चालू केला. आम्ही पायवाटेने चालत होतो. सगळीकडे चिडीचूप शांतता होती. आमच्या गप्पा पुन्हा सुरू झाल्या. माझा मावस भाऊ त्याच्या घराजवळच्या एका भुताटकी वाड्याबद्दल सांगत होता. अचानक आम्हाला ‘हम…..’ असा आवाज ऐकू आला. आम्ही जागेवरच थांबलो. कोणच कुणाशी काही बोलेना. “काही नाहीये, चला” असे मी म्हणालो व आम्ही तिथून निघणार तेवढ्यात तो आवाज पुन्हा आला. आता मात्र आमची चांगलीच फाटली. आम्ही तिघेही जाम घाबरलो होतो पण मनात कुतुहलही तितकंच होतं. मी घाबरतच कसाबसा टॉर्च आजूबाजूला फिरवला. टॉर्च एका झाडावर स्थिर झाला व समोर पाहताच आम्ही तिघेही जोरजोरात हसू लागलो. त्या झाडाच्या डोलीत एक घुबड बसलं होतं व तेच आवाज करत होतं.

आमच्या घरात सगळेच प्राणीप्रेमी आहेत. खासकरून माझी आई आणि भाऊ. आम्ही गावात राहायला आल्यापासून आमच्याकडे एक तरी मांजर होतच. मागच्यावर्षी अवनी वाघिणीच्या मृत्यूची बातमी ऐकून आम्ही सारेच खूप हळहळलो. त्यावेळी आमच्याकडे एक मांजर होती, तीचं नाव आम्ही आवनी ठेवलं होतं. त्याआधी आमच्याकडे एक काळा बोका होता, अजूनही आहे. वरच्या खोलीला लागून एक छोटं टेरेस आहे. या बोक्याचा मुक्काम आधी तिथेच असायचा. पण अवनी गरोदर झाली आणि तिने त्या बोक्याची जागा हडपली. तो बिचारा तेव्हापासून खाली दारासमोर बसू लागला. काही महिन्यातच अवनीने दोन पुत्रांना जन्म दिला. ते दोघेही दिसायला अगदी एकसारखे होते. त्या टेरेसवर माझ्या वडिलांनी एक जुना कॉट ठेवला होता. तो कोट आता अवनीची बाळंतिणीची खोली झाली होती. बाळंतीण असल्यामुळे अवनीचे खूप लाड होत होते. आमच्या घराजवळच एक घर आहे. तिथे एक तांबड्या रंगाचा बोका होता. त्याचं नाव लाल्या होतं. अवनीच्या पिल्लांचा रंगही तांबडा असल्यामुळे लाल्याच अवनीच्या पिल्लांचा बाप असावा असा आमचा अंदाज आहे. विशेष म्हणजे हा लाल्या आमचा डोळा चुकवून हळूच टेरेसवर जायचा व पिल्लांशी खेळायचा. आम्ही पाहतोय हे कळताच तो तिथून धूम ठोकायचा. पण दुर्दैवाने ‘अवनी’ आणि ‘लाल्या’ दोघेही आता या जगात नाहीत. पिल्लं मात्र आता मोठी झाली आहेत व दोन्ही भावांचा एकमेकांवर फार जीव आहे.
तर असं हे आमचं गाव. शेवटी एकच सांगावसं वाटतं. मी पुण्यासारख्या शहरात राहतो. इथे सर्वकाही आहे पण शांतता आणि मानसिक सुख नाही. गावाकडचे लोक भले चार पैसे कमी कमावुदेत पण ते सुखी आहेत. कारण ते निसर्गाच्या जास्त जवळ आहेत.

Group content visibility: 
Public - accessible to all site users