हिंदुस्तानी

Submitted by Asu on 22 November, 2019 - 04:33

हिंदुस्तानी

हिंदू आम्ही हिंदुस्तानी, जात पात ना अन्य धर्म
देशावरती प्रेम करावे, ठावे आम्हां एकच कर्म

हिंदू-मुस्लीम ख्रिस्त ईसाई, भिन्न जरी जगण्याच्या रीती
धर्म आमुचा एक सांगतो, करा जगावर अनन्य प्रीती

देव हृदयी एकच असतो, लाख मोलाचा हा सल्ला
ईश्वर म्हणती येशू म्हणती, वा कुणी म्हणती अल्ला

माणसाची माणसाशी असे, माणुसकीची अभंग नाती
दफन करा अग्नीत जाळा, एकच गती एकच माती

रंग-बिरंगी कपडे घालून, दिसशी जरी तू वेगवेगळा
कपडे उतरून शोधून पाही, मानव सर्व समान सगळा

प्रेमातूनच प्रेम उगवते, नको द्वेषाची तृणपाती
तण द्वेषाचे उपटून फेकू, वाढवू फक्त प्रेमाची नाती

सर्वधर्म समभाव असावा, मतामतांचा दुस्वास नसावा
भारत आपला एक दिसावा, जगी वाटावा आपला हेवा

देश प्राण अन् धर्म आम्हां, एकची आमची भारतमाता
श्वास शेवटचा घ्यावा देवा, गुणगान तिचे गाता गाता

प्रा.अरूण सु.पाटील (असु)
© सर्व हक्क स्वाधीन
https://www.facebook.com/AsuChyaKavita

शब्दखुणा: 
Group content visibility: 
Use group defaults

अरूण सर सुंदर कविता !

गर्व मजला या जन्माचा असा एक मी हिंदुस्थानी
मानवता माझा धर्म एकला हीच माझी विचारसरणी