दिगंतराचे प्रवासी...

Submitted by .......... on 14 November, 2019 - 01:39

पक्ष्यांच्या वर्गिकरणाविषयी थोडी माहिती

वाढ आणि रचना ह्यांमधील मूलभूत फरकावर आधारित अशा २७ गणांमधे (Order) पक्षीवर्गाचे वर्गीकरण केले जाते. उदा. कुलिंग गणातील पक्षी (Order Passeriformes) म्हणजे झाडावर राहणारे पक्षी, आणि हेच पक्षी आपल्या जास्त परिचयाचे असण्याचा संभव असतो. पाण्याजवळ आपले जीवन व्यतीत करणारे बगळ्यासारखे पक्षी बक गणात (Order Ciconiiformes) अंतर्भूत होतात तर बदके, हंस ह्यांसारख्या पाण्यात राहणाऱ्या पक्ष्यांचा वर्ग म्हणजे हंस गण (Order Anseriformes)

गणांचे आणखी कुलांमध्ये (Families) पृथक्करण करण्यात येते. एका कुलामधील पक्ष्यांचे महत्वाचे गुण सारखेच असतात. कुलिंग गणातील पक्षी म्हणजेच फांदीवर बसणारे पक्षी. ह्या गणात एकूण ४० कुले आहेत. त्यात नाचरे (Muscicapidae), कावळे (Corvidae), फुलचुब (Nectariniidae) ह्यांसारखे पक्षी आहेत. ही कुले म्हणजे खरोखरीचीच कुटुंबे आहेत कारण प्रत्येक कुलात अनेक प्रजाती असतात. प्रजातींमध्ये विकास पावलेले पुष्कळच गुण सारखे असतात आणि त्यामुळे दिसण्यात आणि आचरणात सारखेच दिसतात. ह्या सवयींचे प्रत्यंतर चोच आणि पंजा ह्यांचे आकार, काही वेळा पंख आणि साधारण आकार व हालचाल ह्यांत दिसते. अन्नसाधनांच्या पद्धतीवर चोच आणि पाय ह्यांची रचना अवलंबून असते. पुष्कळ वेळा एखाद्या अनोळखी पक्ष्याची जात जरी सांगता आली नाही तरी त्याचे कुल लगेच सांता येते.

बऱ्याचशा सारख्या गुणांच्या प्रजातीच्या समूहाला गोत्र (Genus) म्हणतात. गोत्र कुलापेक्षा खालच्या वर्गाचे असते किंवा दुसऱ्या शब्दात कुलाचे गोत्रात वर्गीकरण केले जाते. केवळ सोईसाठी सारख्या गुणांच्या प्रजाती एकत्र करुन गोत्राची निर्मिती केली आहे. शास्त्रीय नावांमधील पहिले नाव गोत्राचे असते. एवढ्यापुरताच गोत्राचा संबंध आहे. गोत्रामधील सर्व पक्ष्यांचे पहिले नाव एकच असते. उदा. कावळ्यांच्या अनेक जाती आहेत परंतु त्यांच्यामध्येही काही समान गुण असल्यामुळे त्यांना कॉरव्हस (Corvus) या एकाच गोत्रात गोवले आहे.

गोत्राची विभागणी निरनिराळ्या जातींमध्ये (Species) करणे ही शेवटची पायरी आहे. जात एक नैसर्गिक घटक आहे. आंतर निपज करुन जातींची कसोटी ठरविण्यात येते. एका जातीत सारख्या गुणधर्माचे वेगवेगळे पक्षी असतात. त्यांच्यात पुनरुत्पादन होऊ शकते. सभोवतालच्या प्रदेशाची रचना व हवामान ह्यामुळे काही वेळा एकाच जातीच्या पक्ष्यांमध्ये आकार आणि पिसांचे रंग ह्यात फरक आढळून येतात. उत्तर भागात राहणारे पक्षी दक्षिणेकडे राहणाऱ्या पक्ष्यांपेक्षा साधारण आकाराने मोठे असतात. किंवा दमट हवेत राहणाऱ्या पक्ष्यांचे रंग कोरड्या हवेत राहणाऱ्या पक्ष्यांपेक्षा जरा जास्त गडद असतात. जाती अंतर्गत असे अनेक सूक्ष्म भेद असू शकतात. हे फरक जर अधिक स्पष्ट व कायमचे असतील तर त्या जातीच्या उपजाती आणि वंश ह्यात आणखी भेद करतात. परंतू निरनिराळ्या वंशांमधील पक्ष्यांची आंतरनिपज होऊन सुद्धा जात ती राहिल्यामुळे जात ही वर्गीकरणाचा घटक म्हणून राहतेच.

प्रत्येक पक्ष्याचे गोत्र ठरवून त्याचे कुल आणि जात निश्चित करता येते. सध्या पृथ्वीवर पक्ष्यांच्या ८६५० जाती आहेत. हे पक्षी ज्या २७ गणात विभागलेले आहेत त्या गणांचा अनुक्रम सर्वात कमी प्रगत अशा वंजुल (Grebe) आणि मंजूक (Divers) पक्ष्यांपासून सुरु होऊन अतिशय प्रगत अशा फांदीधारी (Perching) पक्ष्यांपर्यंत शेवट होतो. भारतामधील १२०० पक्ष्यांच्या जाती ७५ कुलांचे प्रतिनिधित्व करतात.

(वरील माहिती सलिम अली यांच्या भारतीय पक्षी या पुस्तकातून जशीच्या तशी घेतली आहे)
1दिगंतराचे प्रवासी.jpg

-----------हरिहर (शाली)

Groups audience: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

आमच्या देवराईत एक दादा येतात त्यांच्या म्हशी चारायला. देवराई त्यांचीच आहे. बरेचदा आम्ही गप्पा मारत बसतो. त्यांच्याकडे अनेक किस्से आहेत ऐकण्यासारखे. नाहीतर त्यांच्या रेडीओवरची गाणी ऐकत बसणे हा उद्योगही आवडतो मला. आज त्यांना देवराईच्या अलिकडील भागात आल्यावर फोन करायला सांगितला होता. चार वाजता त्यांचा फोन आला आणि मी गेलो. त्यांना म्हणालो की देवराईच्या या टोकापासुन त्या टोकापर्यंत म्हशी घेवून जावू. मी सोबत येतो. त्यांना माझी ही विचित्र इच्छा काही समजेना. मग त्यांना सांगितले की मला आज काहीही झाले तरी म्हशींच्या पाठीवर बसलेल्या जंगली सांळूखी पहायच्यात. जवळून. तुमची सवय असेल त्यांना. उडणार नाहीत. मग आम्ही या टोकापासुन त्या टोकापर्यंत पाऊन तासात गेलो. पण काय दुर्दैव असेल माझे! कोतवाल आणि मैना दिसूनही त्या म्हशींच्या पाठीवर काही बसल्या नाही. गुराखी दादांनी कचकचीत शिवी घालून सांगितले की तुम्ही या सकाळी लवकर. हव्या तेवढ्या मैना आणि गोविंद दिसतील जवळून. हे सर्व इथे लिहायचे कारण म्हणजे या पक्षी निरिक्षणाच्या छंदाने आज मला गुरे वळायला लावली. आणि हे कमी म्हणून की काय, उद्या गुरे वळायचे आमंत्रणही मिळाले. Lol
घरी आल्यावर बायकोची कॉमेंट होती “आता या पक्ष्यासांठी म्हशी घ्यायच्या का? रोज सकाळी उठून म्हशींमागे जात जा लंच बॉक्स आणि कॅमेरा घेवून” Lol
हा छंद आता ‘नादात’ बदलला आहे. त्याचे व्यसन नाही झाले म्हणजे मिळवली.

काळा गोविंद अगदी निश्चलपणे एका जागेवर आवांजांचा कानोसा घेत बसला होता. प्रिनिंग नाही, ओरडणे नाही, शिकारीसाठी सुर नाही, काही नाही. सगळ्या जगावर वैतागल्यासारखा वाटला. किंवा प्रेमभंग झाल्यासारखा.

काळा गोविंद, कोतवाल
Black Drongo
Pune (Devrai)
14 Dec (4:30 pm)

या जंगल मैना पाचच्या संख्येत होत्या. एका बाभळीच्या झाडावर बसल्या होत्या. देवराईच्या या टोकापासुन त्या टोकापर्यंत त्या पाचही मैना आमच्या सोबतच होत्या. या वेळात त्यांनी तिन वेळा झाडे बदलली. प्रत्येकवेळी त्या बाभळीच्याच टोकावर बसल्या. अर्थात देवराईत बहुसंख्या झाडे बाभळीचीच आहेत. या ४५ मिनिटात मी एका मैनाला बाभळीचा कोवळा पाला ओरबाडून खाताना पाहीले. तो पाला तिला तुटत नव्हता तरी तिने पंखांचा जोर लावून तो तोडलाच. (तो तिने खाल्ला असा माझा समज आहे. तिने नक्की कशासाठी तोडला ते समजले नाही. तिने वेळा पाला तोडताना मी पाहीले. कदाचीत ही त्यांची कसल्या त्रासावरची रेमेडीही असू शकेल.)

सकाळी जर पुन्हा मनात आले तर या गुराखी दादांबरोबर पुन्हा म्हशी वळायला जाईन. कोण कसले प्लॅन करतं रविवारचे आणि मी कसला प्लॅन केलाय. Lol Lol

ही आहे बाभळीचा पाला तोडणारी जंगल मैना. तिच्या पायांची पोझीशन व अर्धवट उघडलेले पंख पाहून तिने किती विचारपुर्वक ताकद लावली आहे हे लक्षात येते. हे दृष्य पाहील्यावर मला फोर्ज्ड इन फायर हा शो आठवला. त्यात एखादी गोष्ट तोडताना पायांची पोझीशन, हत्यार धरायची पद्धत, शरीराला दिलेला झटका या सर्व गोष्टी किती महत्वाच्या आहेत हे अनेकदा सांगतात. शो मधे अनेकांना हे स्किल जमत नाही. या साळूंकीला फिजिक्सचे इतके ज्ञान कुठून मिळाले असेल?

मस्त फोटो.
भारद्वाज मला नेहमीच एक बोजड पक्षी वाटत आला आहे. अगदी फार श्रम पडत असल्यासारख्या हालचाली वाटतात त्याच्या.

सुंदर फोटोमुळे इतरांना मजा घेता येते आहे. हरिहर म्हणजे शाली हे आता कळलं.
हा पक्षीप्रकल्प उत्तम झाला आहे. पक्षी बाल्कनीत यावेत पण कबुतरं नकोत यासाठी फार खटपट करावी लागते आहे.
भटकंतीच्या वेळी पक्षी पाहिले होते ते आता फारच कमी झाले आहेत. पुणे परिसरातील शेतं आणि कोकणातील माड पोफळी, आंबे,फणस यामुळे तिकडील पक्षी टिकून आहेत.
आजुबाजूच्या सोसायट्यांत अशोकाची झाडे आहेत त्याच्या गर्द उतरत्या झावळ्यांमुळे मुनिया त्यांत घरं करतात. कावळे त्यात घुसू शकत नाहीत. ओगस्टपर्यंतच्या पावसाने गवत वाढले की त्याची पाने आणून गवताचा गोळा दिसेल असे घर बांधतात. बाल्कनीतल्या गवती चहाची पाने तिकडे जातात सकाळपासून.
पण
हाय.
सोसायटीवाल्यांनी माणसे बोलावून झाडांच्या झावळ्या तोडून पार भुंडे खांब केले. ती मुनिया जोडी अमच्याच दुसऱ्या खोलीच्या अर्धवट बंद खिडकीत पाहणीसाठी आली. पाच दिवसांत छोटंसं घर बांधलंही. आता घरट्यात पिलं आहेत.
हुश्श.
फोटो मिळत नाहीत. पळतात. पडदा सरकवून ठेवलाय.

सुंदर फोटोमुळे इतरांना मजा घेता येते आहे. हरिहर म्हणजे शाली हे आता कळलं.... ... धन्यवाद Srd.

अर्धवट बंद खिडकीत पाहणीसाठी आली. पाच दिवसांत छोटंसं घर बांधलंही. आता घरट्यात पिलं आहेत.
हुश्श........ आजकाल मला "मी कसे पक्ष्यांचे फोटो काढले" हे सांगणाऱ्या माणसांपेक्षा "आमच्या बाल्कनीत त्यांनी घरटे बांधले व आता त्यात पिल्ले आहेत. त्यामुळे आम्ही बाल्कनी वापरत नाही जास्त. फोटोही मिळाले तर काढू" असं सांगणारी माणसे आवडायला लागली आहेत. पुर्वी मलाही या फोटो काढणाऱ्यांचे फारसे काही वाटत नसे पण येथील ऋतुराज या आयडीने सांगितले की हे फोटोग्राफर एका फोटोसाठी पक्ष्यांना कसा त्रास देतात. तेंव्हापासून हे बर्ड फोटोग्राफर मला व्हिलनसारखे वाटायला लागले आहेत. Sad
झाडे तोडायची व असल्या फोटोग्राफर्सना प्रोत्साहन द्यायचे, या ऐवजी झाडांचे संवर्धन करुन फोटोग्राफर्सना कडक नियमात गुंतवले पाहिजे.

आज जरा देवराईपलीकडील भाग पायाखालून घातला. या पक्ष्यामुळे मी इकडे आलो व चार चांगल्या लोकांच्या ओळखी झाल्या. येथे अनेक पक्षी दिसले. उशीर झाल्याने फोटो मात्र मिळाले नाहीत. यात देवराईत न दिसलेले पक्षी म्हणजे स्ट्रॉबेरी फिंच, ओळखता न आलेले घुबड, एक हिरवा पक्षी, दोन फ्लायकॅचर आणि फोटो काढता आले अशा भोरड्या म्हणजेच रोझी स्टरलींग. येथे एक मोठी बोरांची बाग आहे. कदाचीत बोरांचे जंगल असावे कारण त्या बोरींची काहीही काळजी घेतलेली दिसत नव्हती. या बोरींवर अनेक वेल चढून प्रत्येक झाडाचा एक मस्त घुमट झालाय आणि त्यात अक्षरशः कानाला त्रास होईल इतका पक्ष्यांचा गोंधळ सुरु होता. येथे तुतवारही दिसले. शेतमालकाने केलेल्या वर्णनावरुन कांडेकरकोचेही येथे उतरतात सकाळी. येथे एक चांगल्या अर्थाने विचित्र व एक अत्यंत वाईट अर्थाने विचित्र असा अनुभव आला. एक पक्ष्यांचा व दुसरा माणसांचा.

येथील बोरांच्या झाडाखाली लाल शेंदरी बोरांचा अक्षरशः खच पडला होता व त्यावर भोरड्यांचा थवा तुटून पडला होता. या भोरड्या जमिनीवरचीच बोरे खात असल्याने व जमिनीवर गवत असल्याने मला त्यांचे फारसे फोटो मिळाले नाही पण निरिक्षण मात्र करता आले. (आज बायको सोबत नव्हती, नाहीतर कॅमेरा बाजूला ठेऊन बोरे गोळा करत बसावे लागले असते.)
अगदी सुंदर पक्षी आहे हा. लहानपणी खुप पाहीले होते. एवढ्यात सासवडला दिसले होते पण देवराईच्या जवळ इतक्या भोरड्या पाहून खुप आनंद झाला. बोरे देशी असल्याने त्या संपुर्ण फळ गिळत होत्या असे वाटले. किंवा कदाचीत निवडलेले बोराचे फळ बाजूला नेवून मग तोडून खात असाव्यात. यात एक प्रकार दिसला. सात-आठ रोझी बोरे खात असताना अनेक रोझी बाजूच्या झाडांवर बसायच्या. या उडाल्या की त्या बोरे खायला उतरायच्या व अगोदरच्या दुसऱ्या झाडावर बसुन रहायच्या. हा प्रकार दोन तिन वेळा झाल्याने हे योगायोगाने होत नाही हे समजले. उद्या पुन्हा जाईन तेंव्हा निट पाहीन.

हावरट सारखी बोरे खाणारी भोरडी. Wink

ही बोरे. हे फोटो घरी दाखवल्यामुळे उद्या कॅमेऱ्या ऐवजी मोठ्ठी पिशवी गळ्यात अडकवून यावे लागणार. Lol

कंठी होला मला कधीच देवराईत दिसला नाही. घरामागे दोन किमीवर एक टेकडी आहे. तेथे मात्र हे दिसतात. आज यांची एक जोडी येथे वावरताना दिसली. अजुनही दोन जोड्या असाव्यात. फोटोवर am चे चुकून pm झाले आहे.

या उडाल्या की त्या बोरे खायला उतरायच्या व अगोदरच्या दुसऱ्या झाडावर बसुन रहायच्या. हा प्रकार दोन तिन वेळा झाल्याने हे योगायोगाने होत नाही हे समजले. >>>>>> वॉव

शालीदा, तुमच्या दिगंतराच्या प्रवाश्यांची साधना निरंतर चालू आहे. खूपच मस्त फोटो व खूप माहितीपूर्ण निरीक्षण
बरीच माहिती मिळतेय
उद्या गुरे वळायचे आमंत्रणही मिळाले. >>>>>भारीच

उगाच फार कौतुक करु नकोस ऋतुराज. तू पक्ष्यांचा तसेच वनस्पतिंचा उत्तम जाणकार आहेस हे माहित आहे मला. एकाच जातीच्या पक्ष्याचे नर, मादी व पिल्लू पाहून तिन वेगवेगळे पक्षी पाहिल्याची नोंद करणारा पक्षीनिरीक्षक (?) आहे मी. Lol

आता पंधरा मिनिटांपुर्वी (4:00 pm) मी बाल्कनी कॉफी पित असताना समोरच्या डबक्यात सामुहिक स्नान सोहळा पाहिला. बाल्कनीतून फोटो शक्य नव्हते व कॉफी संपवून खाली जाण्यात वेळ घालवायचा नव्हता त्यामुळे फोटोचा विचार न करता पक्ष्यांचा कुंभमेळा पाहिला. प्रत्येकजण फार तर फुटभर अंतर ठेवून अंघोळ करत होते. व एकाच वेळी सगळे अंघोळ करत होते. ज्याचे होत होते तो बाजूच्या भिंतीवर प्रिनिंग करत होता.
या मध्ये मी पाहीलेले पक्षी
टिटवी
पांढरा धोबी
पिवळा धोबी (करडा धोबी असेल कदाचीत)
पारवा
साळूंकी
जंगल मैना
तुतवार (अंघोळ करत नसावा)
या सर्वांना एकत्र पण वेगवेगळे स्नान करताना पाहिले. दहा इंचाचे अंतर असावे प्रत्येकात. कुंभमेळ्यात प्रत्येक आखाड्याचा स्वतंत्र घाट असतो त्याची आठवण झाली.
जंगल मैनाचे स्नान मात्र खास वाटले. तिने प्रथम दोन-तिन वेळा फक्त डोके पाण्यात घालून खुप हलवले व झटकून साफ केले. मग छातीचा भाग अगदी व्यवस्थित बुचकळून काढला. शेवटी ती पुर्णच पाण्यात बसुन सारे अंग पाण्यात घुसळले. हे तर नमाज पढण्याअगोद वुजू करण्यासारखे साग्रसंगीत स्नान झाले. भारी.
मी मागे एकदा निरु यांनी बुलबुलचा अंघोळ करतानाचा व्हिडिओ काढला होता त्यावेळी गमतीने म्हणालो होतो की असे कुणाला अंघोळ करताना पाहू नये. Wink पण मीच आज या सगळ्यांना अंघोळ करताना मनसोक्त पाहून घेतले. भारी वाटले एकदम. मी या सगळ्याचा जमेल तसा व्हिडिओ शुट केला आहे.

येथे सुगरणींची मोठी कॉलनी होती. फोटो काढायला जवळ जावे लागत असले तरी निरिक्षण मात्र घराच्या बाल्कनीतूनही करता यायचे. त्यामुळे त्यांच्या घरटे बांधण्यापासून ते पिल्ले होऊन ती उडून जाईपर्यंत मी त्या कॉलनीवर लक्ष ठेवले होते. नंतर लाबलेल्या पावसाने या खोप्यांची अगदी रया गेली व मी माझे निरिक्षण बंद केले. आज तेथून जात असताना मला त्या कळकटलेल्या घरट्यांमध्ये हालचाल दिसली. पिल्ले तर केंव्हाच उडाली होती त्यामुळे मी थांबून व्यवस्थित पाहीले. एका घरट्यात इंडीयन सिल्व्हरबिल अगदी स्वतःचे घरटे असल्यासारखा वावरत होता. मला सुरवातीला वाटले की तो काड्या घेवून जायला आला असेल. कारण आठ दिवसांपुर्वीच मी यांचे प्रणयाराधन खुपदा पाहिले होते. घरटी बांधणार असतील हे सिल्व्हरबिल असे वाटले. पण दोन मिनिटातच माझ्या लक्षात आले की तो काही घेवून जात नव्हता. आता माझा हा समज कितपत बरोबर आहे माहित नाही पण मला वाटते तो घरटे दुरुस्त करत होता. हे कसं शक्य आहे? समजा तो दुरुस्ती करत नसेलही, पण ज्या पद्धतिने तो वावरत होता त्यावरुन ते घरटे त्याला नविन नव्हते. बाहेर डोकवायची त्याची स्टाईलही सुगरणीसारखीच होती. जरा वेळाने तो बाहेर आला व घराच्या अंगणात बसावा तसे खोप्याच्या शेजारील फांदिवर आरामात बसला. सुगरणही काम करुन दमला की असाच शेजारच्या फांदीवर बसताना मी अनेकदा पाहिले आहे. काय प्रकार असावा हा? आज गुगल करुन पाहिन. एक मात्र आहे की शक्यतो पक्ष्यांनी त्यांचे घरटे सोडले तरी ते हलवू नये. इतर पक्षी त्या घरट्याचा किंवा त्यातल्या साहित्याचा वापर करतात.

(येथेही am चे चुकून pm झाले आहे.)

मी आताच कुणा अश्विनी वैद्य यांची खुप जुनी नोट पाहिली. त्यांनीही २००७ मध्ये हैदराबाद येथे असाच प्रकार पाहील्याचे नोंदवले आहे. त्यांनी सिल्व्हरबिलच्या जोडीला पीसे आणून या खोप्यात ठेवताना पाहीले. याचा अर्थ या मुनिया सुगरणीचा हा खोपा कस्टमाईझ किंवा/व दुरुस्त करतात. आंजावर अजून काही उल्लेख मिळाला नाही याबाबत. नंतर सर्च करेन. मी उद्या नक्कीच त्या घरट्यावर लक्ष ठेवेन.

इतर पक्षी त्या घरट्याचा किंवा त्यातल्या साहित्याचा वापर करतात.

आता जिथे मुनियाचं घर आहे तिथे चिमण्यांनी घर करण्यासाठी काड्या जमा करू लागल्या की आम्ही त्यांना हाकलले आहे. कारण वीस वर्षांपूर्वी उत्साहाच्या भरात खिडक्यांना बुटांची खोकी बांधली होती आणि पाच घरटी होती.
सकाळी सहाला प्रचंड चिवचिवाट, नंतर ती सुरक्षित जागा पकडायला आलेल्या नवीन जोड्यांशी भांडणं नऊ वाजेपर्यंत चालायची. मग एकेक घरट्यांतील पिले उडाल्यावर खोके काढले. ठरवून टाकले चिमण्यांचे लाड करायचे नाहीत. मुनिया आवाज करत नाहीत, केलाच तर अगदी बारीक चू.

आता एक चिमणी येऊन मुनियाच्या घरट्यातून काड्या ओढायला लागली आणि बाजुच्या तारेवर मुनिया मूग ( किंवा गवताचे बी) गिळून गप्प बघत होती. काठीने त्या चिमणीला हाकलले.

Srd, पक्ष्यांच्या बाबतीत भुतदया महत्वाचीच आहे पण 'डोळस भुतदया' हवी. पक्ष्यांगणिक ती कमी, जास्त अथवा अजिबात नाही अशी बदलली पाहिजे. म्हणजे चिमण्यांना वळचणीला घरटी करु देऊ नयेत पण दाणे टाकायला हरकत नाही. कबुतरांना वळचण आणि दाणे दोन्ही वर्ज्य. भवतालच्या पक्ष्यांसाठी उन्हाळ्यात फक्त पाणी. तर काही दुर्मिळ पक्ष्यांना अन्न व निवारा (यात विशिष्ट झाडे जोपासने हे येईल.) हे कुवतीप्रमाणे करावे. व नामशेष होत चाललेल्या पक्ष्यांसाठी तर विणीसाठी मदत करणे हेही करावे लागेल. अर्थात हे तज्ञांचे काम. नको ती फुलझाडे, शोभेची झाडे आयात करणे, किटकनाशकांचा वापर, नद्यांमधले प्रदुषण याचा फार परिणाम होतोय पक्ष्यांवर.

बिल्डिंग मटिरिअल दुर्मिळ होत आहे!!>>>>>> मला नाही तसे वाटत. कोणत्याही शहराच्या बाहेर पडले की लगेच खेडे सुरु होते असं मला वाटते. परिस्थिती आपण समजतो तितकी वाईट नसावी. मुबलक खाद्य, निवारा हे सहज उपलब्ध आहेत पक्ष्यांसाठी. पण नद्यांचे प्रदुषण, किटकनाशके ही सगळ्यात मोठी समस्या असावी. बदलणारे ऋतुचक्र हेही महत्वाचे आहे. मला एका मित्राने तर सांगितले यामुळे पक्ष्यांमध्ये वंध्यत्वाची समस्या वाढायला लागलीय. म्हणजे अंडी तर देतात पक्षी पण त्यातून पिल्ले निघत नाही/हॅच होत नाहीत/ मृत पिल्ले होतात असं काहीसे. Sad

धन्यवाद निलाक्षी, वर्षा! Happy

त्या पावशाच्या फोटोबद्दल ( page 4) धन्यवाद. तो आणि रातवा अजून मला पाहिला मिळालाच नाही.

कबुतरं ( doves and pigeons) वर्ग आणि कोकीळ ( cuckoos) वर्गातले पक्षी यात खूप
प्रजाती आहेत. गोंधळ होतो.

Birds Of Mumbai - Sanjay Monga. हे पुस्तक वापरतो. मुंबई लिहिले आहे तरी पालघर ते अलिबाग मुरूड लोणावळा माळशेज इगतपुरी जव्हार एवढ्या भागातले पक्षी आहेत.
सलीम अलीचेही आहे संदर्भासाठी.

बरेच जण वाचून आनंद घेत आहेत,आवडलं.

सुप्रसिद्ध पक्षीतज्ञ व निसर्ग लेखक श्री किरण पुरंदरे सरांच्या मार्गदर्शनाखाली अभिनव पक्षीनिरीक्षण कार्यशाळा आयोजित केली आहे. या कार्यशाळेत केवळ पक्षीच नव्हे तर जंगलातील इतर जैवविविधतेविषयी जाणून घेण्याची, अभ्यासण्याची संधी मिळेल. केवळ पक्षिनिरीक्षण हे उद्दिष्ट न ठेवता एक अभ्यासपूर्ण कार्यशाळा असे या कार्यक्रमाचे स्वरूप आहे.
पक्षिनिरीक्षण यातलं निरीक्षण म्हणजे नेमके काय? आपण शहरात राहून पक्षांविषयी काय करू शकतो? शहरात राहून आपल्याला निसर्गविषयक कोणते उपक्रम करता येतील? पक्षिनिरीक्षण करताना आपला दृष्टिकोन कसा असावा? या आणि अश्या अनेक गोष्टींबद्दल आपण सरांकडून जाणून घेणार आहोत. त्यांच्या चाळीस वर्षांच्या अनुभवाचा खजिना आपल्या समोर ते उघडणार आहेत. अशा प्रकारचा उपक्रम प्रथमच आयोजित करण्यात येत आहे. निसर्गप्रेमींनी याचा जरूर लाभ घ्यावा.
कुठे : पिटेझरी गावात. नागझिरा जवळ, भंडारा
कधी : ६ ते ९ फेब्रुवारी २०२०
अधिक माहितीसाठी कृपया ऋतुराज यांच्या विपु मध्ये लिहा.

हिचे नाव भांगपाडी मैना कुणी ठेवले असेल व का? मला तर नेहमी वाटते की हिचे नाव भांग पाड गं मैना असे हवे. संतापून शेंडी सोडलेला चाणक्य कसा दिसला असेल तशी दिसते ही मैना नेहमी. पण व्यवस्थित प्रिनिंग वगैरे केले की मग मात्र अगदी संजाब असल्यासारखी विंचरलेली शेंडी असते हिची. आज दोघेही व्यवस्थित आवरुन बसले होते. शेजारी साळंक्यांच्या एक दोन जोड्या होत्या. या मैनांच्या पहाण्यात क्रमबद्धता नव्हती पण दोघी दोन विरुद्ध बाजूला पहायच्या, मग दोघीही डावीकडे व नंतर उजवीकडे पहायच्या. मग मधेच दोघीही खाली वाकून पहायच्या. मधेच एक उडून उलटी बसायची. मग पुन्हा हे पहाणे सुरू. एखाद्या टेहळणी बुरूजावर बसुन परिसरावर लक्ष ठेवल्यासारखे वागणे होते या मैनांचे. कोणत्याही मोठ्या आवाजाने या दचकल्या नाहीत हे महत्वाचे. मला या मैनेची रंग संगती व डोक्यावरचे विस्कटलेले केस फार आवडतात. या शेंडीचे जुने फोटो सापडले तर येथे डकवेन.

ब्राम्हणी मैना, भांगपाडी मैना.

बंड गार्डन पुलावरुन जाताना गाडी थांबवून फोटो काढला. व्यवस्थित पहायला वेळ नव्हता. तरीही नजरेत आलेले चक्रवाक मोजले. आठ पक्षी होते. अजुनही चक्रवाक असतील तेथे. दोन ग्रेट हेरॉन, पाण्यात उतरलेल्या सहा घारी, अनेक ढोकरी, गायबगळे दिसले पाच मिनिटात.

वरील पोस्टमध्ये उल्लेख केलेली हिच ती भांग न पाडलेली मैना.

सुगरणीची मादी एकदा अंडी उबवायला लागली की नर दुसरी मादी शोधतो व दुसरा घरोबा थाटतो. विणीच्या हंगामात असे अनेक संसार थाटतो. माद्यांनी नाकारलेले व सोडलेले खोपे पुढे मुनिया वापरतात
नांदूरला तीन चार मजली खोपे पाहिले आहेत.
बिल्डिंग मटेरियल नाही पण अधिवसाच्या जागा कमी होत चालल्या आहेत
आता जुन्या घराच्या वळचणी, कौले, खांब नाहीत त्यामुळे घरटी करायला शहरात जागा नाहीत

चक्रवाक पक्षी वियोगे बहाती। झाले मजप्रती तैसें आतां।।
वत्स न देखता गाई हंबरती। झाले मजप्रती तैसें आतां।।
जीवनावेगळे मत्स्य तळमळती।झाले मजप्रती तैसें आतां।।
चुकलिया माय बाळके रडती l झाले मजप्रती तैसें आतां।।

संत नामदेव

Pages