सर - भाग २

Submitted by अज्ञातवासी on 5 November, 2019 - 23:30

भाग १

https://www.maayboli.com/node/72229

"या बेण्याला कुणी बोलवलं बे." सेनापती चिडले.
"गप बे, मी तर याच्यापासून शंभर कोसांवर कुणाला आमंत्रण धाडलं नाही." प्रधान म्हणाले.
"शट अप गाईज!" धर्मगुरूंनी दटावले.
"सर... आदरणीय, पूजनिय, सर्वज्ञानी, महामहिम, गायनवादननृत्यलेखनपोएमादी शिरोमणी सरांचे या तुच्छ सेवकाकडे स्वागत असो." राजा म्हणाला.
"परीक्षणशिरोमणी...?" कडाडणाऱ्या आवाजात सरांची शब्दवीज राजावर पडली.
"माफी असावी, महामहिम, गायनवादननृत्यलेखनपोएमपरीक्षणआदी शिरोमणी सर," राजा थोबाड झोडत गडबडा लोळत म्हणाला.
"अमान्य...." भयकंपीत होणारा आवाज झाला. सर्वजण भयभीत झाले. पक्षी, उंदीर, हत्ती, घोडे इत्यादींनी मघाचाच कार्यक्रम केला, ते बघून सरांचाही आत्मा सुखावला.
सर आत गेले. त्यांनी आपल्या थैलीतून घडीची छोटीशी खुर्ची काढली, व ते राजाशेजारी बसले.
"राजा आजचा मुहूर्त काय?"
"वैशाख शुद्ध प्रतिपदा सर!" भयभीत राजा.
"आणि अशा मुहूर्तावर तुम्ही गुणप्रदर्शनाची स्पर्धा भरवतात?" सर म्हणाले.
"व्हाट्स रोंग विद धिस मुहूर्त," धर्मगुरू कपाळावर आठ्या आणत म्हणाले.
सरांनी तुच्छतेने त्यांच्याकडे बघितले. दोन्ही गाल, ओठ आणि हनुवटी डाव्या बाजूला वळवून त्यांनी नापसंती व्यक्त केली.
"अज्ञानी, सुरुवातच वाईट! गुणांच्या विरुद्ध काय?"
"अवगुण." प्रधान उतरले.
"वैगुण्य!!!" सरांचा ताठा वाढला.
"अहो सर मी दुसरीत शिकलोय, गुण × अवगुण."
"मग तिसरीत या, गुण × वैगुण्य!" इति सर.
"वैगुण्याचा आणि मुहूर्ताचा काय संबंध बे?" सेनापती वैतागले.
"अक्कल गुडघ्यात, माज शरीरात." सरांनी पुन्हा दोन्ही गाल, ओठ आणि हनुवटी डाव्या बाजूला वळवले.
"वैशाख, सुरुवात वै ने. वैगुण्य, सुरुवात वै ने... कळलं?' सर भडकले.
प्रजाजनांमध्ये कुजबुज सुरू झाली. इतकी मोठी चूक? घोर अपराध!!!
"सर, मग पुढे काय?"
"स्पर्धा बंद!" सर कडाडले. पक्षी, हत्ती, उंदीर....
"सर, खूप बजेट खर्च झालंय स्पर्धेवर, अजून पाच वर्ष कर्जमाफी देता येणार नाही इतकं..." राजा काकुळतीला आला.
"मला आमंत्रण न देताना, परिक्षक म्हणून न बोलवताना याचा विचार केला होता का?"सर फुत्कारले.
राजा डोकं धरून खाली बसला.
"मग कवा स्पर्धा भरवायची बे?"
सर टूनकन उडी मारून सेनापतीकडे आले.
"अरे बे दुणे साडेपाच म्हणणार तू, तुला काय कळणार मुहूर्त, शुभाशुभ." सर उद्गारले.
"बरं, हा सगळा मंडप तसाच ठेवू. मी केटरिंग, डीजे आणि लायटिंगवाल्याला समजवतो. पुढच्या महिन्यात घेता येईल." प्रधानाने तोडगा काढला.
"बिग नो, नो, नो... सर म्हणाले." पुढचा महिना कोणता?
"ज्येष्ठ!'
"दुर्योधन कौरवांमध्ये सगळ्यात ज्येष्ठ, त्याचा कसा अंत झाला बघितला ना?"
जिथे कुठे महाभारत चालू असेल, तिथे जाऊन शिला की जवानी डीजेवर वाजवणाऱ्या सरांच महाभारताच ज्ञान बघून प्रजाजन स्तंभित झाले.
थोडावेळ सवाल जबाबाचा खेळ रंगला.
आषाढ - आषाढी एकादशी. लोक वारीला जातात.
श्रावण - दशरथाला श्रावणामुळे शाप मिळाला होता.
भाद्रपद - सरांनी भ ची बाराखडी गायली.
अश्विन - अपशब्द, अपशकुन इ. अ वरून सुरू होतात.
कार्तिक - कुविचार, कुसंगत इ. क वरून सुरू होतात.
मार्गशीर्ष - सरांना थोडावेळ काही सुचलं नाही, मात्र 'मरण' हे 'म' वरून सुरू होतं म्हणून त्यांनी पॉईंट मिळवलाच.
पौष - संक्रांत आणा आता तुम्ही सगळ्यांवर!
माघ - पुन्हा म
फाल्गुन - आधीच उल्हास, त्यात फाल्गुन मास!!!
चैत्र - मार्च एंडीगच प्रेशर.
"इसका मतलब कभी स्पर्धाही नही होगा!" वैतागाने धर्मगुरूंत बाबुराव संचारला.
सरांनी पुन्हा दोन्ही गाल, ओठ आणि हनुवटी डाव्या बाजूला वळवले, आणि 'माझ्याविना स्पर्धा भरवतात लेकाचे.' असा कटाक्ष टाकला.
"सर, मार्ग सुचवा." राजा सरांपुढे साष्टांग नमस्कार घालता झाला.
"याला मार्ग एकच. मी स्वतः या स्पर्धेत परिक्षण करेन. म्हणजे अशुभ गोष्टी स्पर्धेपासून दूर राहतील."
"ह्याच्यासारखं अशुभ सापडणार कुठं, अशुभच ह्याला घाबरून पळलं." सेनापती स्वतःच्याच विनोदावर खुदुखुदु हसले. त्यावर धर्मगुरूंनी 'ओ गॉड' म्हणत वर हात केले.
"रेका रे!" सरांनी आज्ञा दिली.
उस्ताद दिन दिन दिवाली यांनी गाणं सुरू केलं...
सगळा आसमंत उस्तादांच्या सुरांनी भरून गेला. लोकांच्या कानाला तृप्तीचा भास झाला. निर्गुणात चैतन्याचा संचार झाला, आजि पूर्णत्वाचा आविष्कार झाला.
...आणि या सुरांना अग्निदेवाचा आशीर्वाद म्हणून की काय, सगळे दीप प्रज्वलित झाले.
टाळ्यांचा कडकडाट थांबतच नव्हता. अक्षरशः आसमंत दुमदुमून गेला.
सर्व परीक्षकानी उभे राहून उस्तादाना अभिवादन केले.
सर सोडून!!!!!
शांतता झाल्यावर सर बोलू लागले.
"बरं झालं गाणं, पण आठवा स्वर काही लागला नाही."
'आठवा स्वर?' उस्ताद आश्चर्यात पडले.
हो. 'आ' स्वर.
"असा कुठलाही स्वर नाही." उस्ताद चिडले.
"आहे." सरही चिडले.
"आरं इकडे गाण्याने दिव लागलीत, आणि तू काय बोलून राह्यला बे?" इति सेनापती.
"ते काम कुणीही करू शकतो. मीसुद्धा."
"काय?" सगळ्यांचा आ वासला.
"हो. बघा..."
सर उठले. त्यांनी खिशातून सिगरेट पेटवायचं लायटर काढल...
....आणि आधीच पेटलेली एक मेणबत्ती फुंकर मारून विझवून पुन्हा पेटवली.
"मेणबत्या पेटवण्यासाठी गाणं म्हणण्याची गरज नाही." सर कुत्सित हसले.
उस्ताद आधी स्तब्ध झाले, आणि मग चिडून निघून गेले.
राजाही जरा अस्वस्थ झाला.
"बघितलं, आणि उभे राहतात लेकाचे." सर पुन्हा जागेवर जाऊन बसलेत.
"बोलवा रे पुढचा रेकायला." सरांनी आवाज दिला.
आता पाळी होती पंडित रामचरणसेवकप्रसादशास्त्री अयोध्यावाले यांची...
पंडितजींनी सूर लावला, तशी सर्व प्रजा भावविभोर झाली. आनंदाने गाऊ लागली, नाचू लागली, आणि त्यांना आशीर्वाद देण्यासाठी वरुणराजाने हजेरी लावली.
पुन्हा पंडितजीना वंदन केलं गेलं...
पण सर....
"सगळं बरं आहे, पण आठवा आणि नववा सूर काही लागला नाही."
पंडितजी रागाने सरांकडे बघू लागले.
'आ' आणि 'उ' हे स्वर!!!
"हो ना, आणि ते पाऊस पाडण्याच काम तुम्हीसुद्धा करू शकाल, ना सर?"
"इथे शेतकरी ओल्या दुष्काळाने मरतोय, आणि तुम्हाला ही थेरं सुचतायेत? मी पाऊस पाडेन, पण दुष्काळात. आता नाही!"
प्रधान गप्पच बसले.
"सर, मग सांगा विजेते," राजा म्हणाला.
"कुणीही नाही. सरांनी अभिप्राय दिला... कारण दोघांनाही आठव्या आणि नवव्या सुराची जाण नाही. आता मी त्या सुरांचं प्रात्यक्षिक दाखवतो."
सर टुणकन उडी मारून खुर्चीवरून उठले. आणि खाली गेले.
"नीट वाजवा रे, भुसनळ्याहो..." त्यांनी वादकाना सक्त ताकीद दिली.
आणि सरांनी गायला/रेकायला सुरुवात केली.

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

१ ला व दुसराही भाग अज्याबात कळ्ळा नाही. पार डोक्यावरुन गेला. कोणी संत्रे, मोसंबे, लिंबु सोलाल तरे बरे .

कोणाला उद्देशुन आहे ही कथा?

एक नंबर...आधी कळली नव्हती...नंतर लक्षात आलं...आणि हसतच सुटलो...भारीय..ग्रेट..

"इसका मतलब कभी स्पर्धाही नही होगा!"

हे वाक्य मला राजपाल यादवच्या आवाजात वाचल्यासारखं वाटलं..

"इसका मतलब कभी स्पर्धाही नही होगा!"

हे वाक्य मला राजपाल यादवच्या आवाजात वाचल्यासारखं वाटलं..
>>>>>>>>>>

आणि मी

"नीट वाजवा रे, भुसनळ्याहो..."

हे वाक्य मकरंद अनासपुरेच्या स्टाईलमध्ये त्याच्याच आवाजात वाचले.

ह. कळतंय सगळं नीट. नेहमीप्रमाणे अहो रुपम, अहो ध्वनी... चालु द्या!