सर - भाग १

Submitted by अज्ञातवासी on 5 November, 2019 - 14:06

फार पूर्वीची गोष्ट आहे, एक राज्य होतं. त्याच नाव सुखनगर. तिथली जनता सुखेनैव जगत होती. म्हणजे, फारच मोत्यांच्या राशी लागल्या होत्या, अशी परिस्थिती नाही, पण दोन टाईम खाऊन, थोडे पैसे FD मध्ये टाकून सुखसमाधानाने जगत होती. काही शेयर मध्ये गुंतवायचे, काही सोनं घेऊन ठेवायचे.
या नगरीचा एक राजा होता. त्याची तर चैनच होती. नगरात चोरी व्हायची नाही, लोक कर नीट भरायचे, शेजारी राज्ये त्रास देत नसत. भरीस भर म्हणजे राण्यादेखील एकमेकींशी गुण्या गोविंदाने राहत. अशा निर्भेळ सुखात तो राजा नांदत होता.
राज्याची बौध्दिक संपदा तर अहाहा, अनेक गायक, त्यांची घराणी यांनी राज्य व्यापून टाकलं होतं. पार 'किराणा' घरण्यापासून ते 'पुराना' घरापर्यंत त्यांची व्याप्ती होती. त्यांना साथ द्यायला निपुण वादक होते. ज्यांचे पदलालित्य साक्षात मोराला लाजवेल, आणि हस्तचापल्य एखाद्या चोराला लाजवेल, अशा नृत्यांगनाही नगरात होत्या.
लेखकू तर अफाट होते. तेही अचाट लिहायचे. नवरसानीयुक्त त्यांचे लिखाण वाचून बौद्धिक रसना तृप्त झाली नाही, तरच नवल. कवी तर इतके प्रतिभावान, की त्यांची कविता ऐकून कपिला देखील ज्ञानप्राप्ती होईल.
मात्र हे सुख, राजाला डासाप्रमाणे टोचत होतं, इंगळीप्रमाणे डाचत होतं, गाठीप्रमाणे काचत होतं. मात्र काय टोचतय, डाचतय, काचतय, हेच त्याला समजत नव्हतं.
या असंमजसपणामुळे राजाचं राज्यकारभारातून लक्ष उडालं. तो राणीमहालात जाईनासा झाला, स्नानगृहात गाईनासा झाला. सगळ्यांच दुःख गगनात मावेनासं झाला. आमच्या राजाचा सुंदर मुखडा, चंद्राचा तुकडा ग्रहण लागल्याप्रमाणे निस्तेज का झाला, याचीच सदैव चिंता दरबारी लोकांना छळू लागली. काळजात अग्नी जळू लागली.
एके दिवशी न राहवून, प्रधान, धर्मगुरू व सेनापती यांनी महत्वाच्या व्यक्तींची बैठक बोलावली. त्यात सर्वानुमते धर्मगुरू राजाला भेटतील, व राजाचे मनोवृतांत काढतील, असे ठरले. ठरल्याप्रमाणे धर्मगुरूंनी राजांची एकांतात भेट घेतली. एकांत भेटीचा राजाच्या मनावर फार परिणाम झाला. त्याने मनातला आकांत बाहेर मांडला. त्या आकांताने धर्मगुरूंना संक्रात आल्यासारखे झाले.
तर राजाचा मनोवृत्तांत आपण पाहुयात:
'धर्मगुरू, आपल्या आशीर्वादाने राज्य निर्विवादाने चाललं आहे. आपल्या राज्यातील बुद्धीजीवी प्रजातींचा तर त्रिखंडात बोलबाला आहे. आपला खजिना साऱ्या जनतेसाठी खुला आहे. इथे कलागुणांची जाण, कलावंताना मान आहे.
पण...
आजपर्यंत या कलावंतांपैकी सर्वोत्कृष्ट रचेता कोण, याचा विचारही माझ्या मनाला शिवला नाही. किंबहुना मी सर्वोत्कृष्टाचा ध्यासच घेतला नाही, सर्वोत्तमाचा ग्रासच ग्रहण केला नाही, ही माझ्या मनाला लागलेली विचारवाळवी आहे.'
धर्मगुरूंनी यावर गहन विचार केला, आणि शेवटी त्यांच्या मुखातून अजोड शब्दांचे वहन झाले.
"यु वॉन्ट टू जज देम????????"
'आकाशवाणी... देववाणी....' म्हणून राजा उठला. त्याचे मुखमंडल उजळले. हे बघून प्रजाजनांना कोण आनंद झाला. धर्मगुरूंनी राजाच्या अस्वस्थतेचे कारण सांगितले. ते ऐकून सगळ्यांची स्वस्थता कुठल्या कुठे पळाली, व सगळ्या कलावंतांचे मूल्यमापन करण्यासाठी एक स्पर्धा आयोजित करण्यात आली.
स्पर्धेच्या विजेत्यांची निवड करण्यासाठी एक समिती नेमण्यात आली, आणि त्यात धर्मगुरू, प्रधान आणि सेनापती यांचा समावेश करण्यात आला. समितीचे मुख्य म्हणून राजाची निवड करण्यात आली.
वैशाख शुद्ध प्रतिपदेला स्पर्धेला सुरुवात झाली...
सर्व परीक्षक मंचावर स्थानापन्न झाले. राजानेही उच्चासन ग्रहण केले, व स्पर्धा सुरू करण्याचा आदेश दिला. सर्वात आधी गायनाची स्पर्धा होती. ही स्पर्धा 'किराणा' व 'पुराना' घराण्यांमध्ये होणार होती.
सर्वात आधी किराणा घराण्याचे गायक उस्ताद दिन दिन दिवाली यांनी बैठक घेतली, व गाण्याला सुरुवात करणार... इतक्यात...
"थांबा....." सभेत आवाज घुमला. या आवाजाने पक्षी घाबरून उडाले. उंदीर बिळात जाऊन लपले. हत्ती बिथरले, घोडे उधळले.
...मात्र आवाजाच्या रोखाने सगळ्यांच्या नजरा रोखल्या, आणि त्यांची पाचावर धारण बसली. अनेकांना काचावर उभे केल्यासारख्या वेदना झाल्या. राजाचा सुंदर मुखडा चंद्राचा तुकडा चिचुंद्रीसारखा काळाठिक्कर पडला. धर्मगुरू घाबरले, सेनापती हळहळले, प्रधान बावरले.
सर!!!!.... साक्षात सर!!!!! समोर उभे होते.

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

इथून तिथून मिथुन बनायचा केविलवाणा प्रत्यत्न !!
थोडक्यात हे अजिबात काही जमलेले नाहीये.

अज्ञातवासी तुमच्या कडून असल्या लिखाणाची अपेक्षा नाही,खूप छान,सुसंगत लिखाण केलेय तुम्ही या आधी ,हे कै च्या कै आहे,
असो,पटले तर घ्या