ब्लॉक (Block) [ललित लेख]

Submitted by शुभांगी दिक्षीत on 3 November, 2019 - 08:02

Block किती छोटा शब्द आहे. अडीच अक्षरी आणि इंग्रजीत चार अक्षरी पण, या छोट्याशा शब्दाने संवादच संपून जातो. काही काळापुरता नाहीतर कायमचा. किती सोपं झालंय आजकाल आपल्याला नकोसं असणारं कोणी ब्लॉक मध्ये टाकलं जातं नाहीतर आपण कोणाला नकोसे झालो तर आपल्याला ब्लॉक केलं जातं.

खुप प्रसिद्ध झाला आहे शब्द हा. नाही आवडलं कर ब्लॉक नाही पटलं, राग आला, नकोसं झाली कोणी कर ब्लॉक. ते पण एक टच वर. फक्त एक टच आणि झालं समोरचं माणूस ब्लॉक. संवाद तिथंच संपला. त्या व्यक्तीला काय वाटेल मन दुखावलं जाईल याचा विचार पण येत नाही. आपल्याला काय वाटेल आपण ब्लॉक झालोतर हा ही विचार येत नाही.

हे ही ठिक आहे कोणी विनाकारण जास्त त्रास देत असेल उदा. कस्टमर केअर, लोन, इ. तर त्यांना ब्लॉक केलं तर चालून जातं पण, कधी कधी आपल्या प्रेमाच्या माणसांनाही आपण गैरसमजातून ब्लॉक करतोच की. कधी कधी तर typing..असं दिसत असतानाही ब्लॉक केलं जातं. आपण तरी काय करणार..राग, दुःख, चिडचिड, गैरसमजूत सगळे एकत्र जमतात ना ब्लॉक कर त्याला किंवा तिला म्हणून सांगायला.
प्रत्येकवेळी असंच नसतं बरं का. कोणाला कायमचं विसरण्यासाठी पण ब्लॉक केलं जातं. यात होतं काय माहीत आहे? ब्लॉक केलं तर मनातल्या आठवणी पण ब्लॉक केल्याच पाहिजेत त्या मनात सेव्ह करून कसं चालेल? मग ब्लॉक करूनही डिपी; बरोबर संवाद साधणं आलंच. जुन्या साठवलेल्या आठवणी मनात आणून रडणं. खरंतर त्याच जास्त त्रास देतात.

शक्य होईल आठवणी पुसणं? नाहीच होणार शक्य. याला उपाय एकच असावा कदाचित. जितका जास्त संवाद तितकं जास्त नातं घट्ट होतं जातं म्हणजेच मुरतं कैरीच्या लोणच्यासारखं. वा! किती छान वाटतं नात्यांना अशी उपमा दिली की. दवबिंदू आणि गवत. समुद्र आणि लाटा. अत्तराची कुपी आणि अत्तर..

सांगायचंय इतकंच की ब्लॉक करताना एकदा विचार करा..चार पाच वेळा तरी कराच कारण ब्लॉक झालं तर काय वाटतं? हे आपल्याला आपल्या अनुभवावरूनच माहीत असतं. मैत्री, असो नाहीतर प्रेम, नात्यांची गम्मत संवादातच असते. ब्लॉक अनब्लॉक करणं निमित्त फक्त..
@शब्दस्नेह (शुभांगी दिक्षीत)

शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users