नशा - (द्विशतशब्दकथा)

Submitted by किल्ली on 30 October, 2019 - 08:31

लालसर जड डोळे, अर्धवट मिटलेल्या पापण्या, विस्कटलेले केस आणि झुलणारी चाल असा अदितीचा एकंदरीत अवतार पाहून ऑफिसमधल्या लोकांमध्ये कुजबुज सुरु झाली.
.
.
.
“आज किती उशिरा आली ही? एरवी वक्तशीरपणावरून ज्याला त्याला ऐकवत असते.”
“आणि टापटीप राहण्यावरूनही ऐकवलं मला. आजचा अवतार पाहिलास का तिचा?”
“काहीतरी झालं असेल गं. तुला काय वाटतं? तिची अशी अवस्था कशामुळे झालीये?”
“ड्रग्स?”
“अदिती तशी मुलगी नाही.“
“दारू?”
“काहीतरीच काय. अदिती दारूला स्पर्शही करत नाही.”
“मग घरी प्रॉब्लेम झाला असेल का?”
“असू शकेल. नुकतंच लग्न झालेलं असूनही तिच्या व्यक्तिगत आयुष्याबद्दल ती आपल्याला काहीच सांगत नाही.” “घरगुती हिसाचार तर नसेल? बघ, आज ती पूर्ण बाह्यांचा ड्रेस घालून आलीये. केस कसेबसे वरवर विंचरून बांधलेत. दुःखी असेल बिचारी.”
“तिलाच विचारूया का?”
“अगं असं कसं थेट विचारणार तुला मारलं का सासरी म्हणून? थोडा वेळ वाट पाहू, मग आपल्यापैकी एकीने जाऊन हळूच विषय काढायचा.”
“पण ही बया कॉफी मशीनच्या इथे गेली.”
“अरेच्चा, तिला कॉल आलाय.”
.
.
.

"हॅलो साहिल. अरे डोकं जाम चढलंय. तुलापण असंच होतंय का?

.
.
.
.
.
हम्म. चुकलंच आपलं. पुढच्या वेळेस असं नाही करायचं. काहीही झालं तरी सकाळी सकाळी साग्रसंगीत पुरणपोळीचं जेवण जेवायचं नाही. मग कोणाचंही कितीही आग्रहाचं आमंत्रण असू देत. किती जायफळ घालतात मावशी पुरणात काय माहिती? "

--------------------------------------------------------------------------------
**किल्ली**
-------------------------------------------------------------------------------

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

हाहा किल्ले
जबरदस्त. सणावाराचे कठीण असते हापिसात जायला. पुरणपोळी न काम द्विधा मनस्थिती.

परवा एकदा , कोजागिरी नंतर, उरलेले, ग्लासभर मसाला दूध पिउन ऑफिसात आले होते. माय गॉड!!! इतकी झोप येत राहीली ना.

मावशींनी भांग घातली होती का . इतका नशा ? .>> मलाही असच वाटल.
पूरणपोळीच जेवण करून कधी ऑफिसला गेले नाही आज पर्यन्त , त्यामुळे अनुभव नाही .

पण एक गोष्ट वाटते , एवढ जड जेवण झाल्यावर झोप येइल , डोळे जड होतील .
आदीती चा एकंदर अवतार होईल अस वाटत नाही .

मजेदार आहे कथा.
अवतार होण्याचं कदाचित कारण असेल की एक चुटका काढूनच हफिसात आली आहे ती

एवढी तुपासंगं पूरणपोळी जेवण झेपेना व्हय तुमासनी Uhoh इकडे १ आक्खी कोंबडी आन तंबड्या रस्स्यासंगं आठेंक भाकऱ्या खावून बी आमच्या गावचं हाफिसात टायमात जातात की...
ते बी अजाबात आसं न डुलता बराबर चालत बर्र का.

छान!!!...अनपेक्षित शेवट...

मला वाटतं साग्रसंगीत जेऊन ऑफिसमध्ये येताना कॅब, बस, किंवा ट्रेनमध्ये झोप काढली असेल..म्हणून असा अवतार..

कोणतीही टापटीप राहणारी बाई अशी विस्कटलेल्या अवस्थेत डेस्क वर जाणार नाही. हापिसात आल्यावर आधी ती लेडीज रूम मध्ये जाईल आणि केस, चेहरा सगळे व्यवस्थित करेल, मगच डेस्क कडे जाईल.

पाथफाईंडर, सामो, मन्या,पद्म, बोकलत,कटप्पा, विनिता, शाली, स्वस्ति, प्राचीन ,भिकाजी,अजय चव्हाण, जाईजुई, च्रप्स व सर्वांचे आभार Happy

कोणतीही टापटीप राहणारी बाई अशी विस्कटलेल्या अवस्थेत डेस्क वर जाणार नाही. हापिसात आल्यावर आधी ती लेडीज रूम मध्ये जाईल आणि केस, चेहरा सगळे व्यवस्थित करेल, मगच डेस्क कडे जाईल.>> पण लेडीज रूम ऑफिसच्या दुसऱ्या टोकाला असेल तर काय करणार ना???

कैच्याकै
पण भारी. हसले खुप.
एक अनुभव आहे असा आमच्याकडे सुद्धा. असं साग्रसंगीत जेवण करून कॉलेजला पहिल्या बाकावर बसून केलेलं लेक्चर... अनुभव पुर्ण न सांगणे उत्तम असं मला वाटतंय.