ज्वारीची झटपट आंबील

Submitted by योकु on 23 October, 2019 - 15:44
प्रत्यक्षात लागणारा वेळ: 
४५ मिनिटे
लागणारे जिन्नस: 

दोन वाट्या ज्वारी
दोन कढीलिंबाचे टहाळे
६ - ७ लसूण पाकळ्या
थोडे सुक्या खोबर्‍याचे काप (साधारण पाव वाटी) आणि आवडत असतील तर तेव्हढेच शेंगदाणे
दोन - तीन हिरव्या मिरच्या
पाव चमच्याहूनही कमी हळद, अर्धा चमचा लाल तिखट
मीठ चवीनुसार, मोठी चिमटीभर साखर
मोहोरी, जिरं मिळून अर्धा चमचा
पाव चमचा हिंग
अर्धी - पाऊण वाटी दही. फार आंबट असेल तर अर्धी वाटीही पुरेल.
जरा सढळ हातानं तेल

क्रमवार पाककृती: 

ज्वारी एकदा नीट पाहून, स्वच्छ करून घ्यावी. एकदा धूवून, पाण्यात १० मिनिटं भिजू द्यावी.
ज्वारी चांगली चोळून पुन्हा धूवून निथळू द्यावी आणि त्यातलं पाणी पूर्णपणे निथळलं की मिक्सर मध्ये भरडा करावा.
हा भरडा डब्यात घालून फ्रिजात बरेच दिवस राहातो.

खोबर्‍याचे काप आणि शेंगदाणे (वापरत असाल तर) निराळे भिजत घालावे. एका बाजूला चार - पाच वाट्या पाणी गरम करत ठेवावं.
आता एखादं जाड बुडाचं भांड, कढई बर्‍यापैकी तेल घालून चांगली तापू द्यावी आणि त्यात क्रमानी - मोहोरी तडतडल्यावरच जिरं, हिंग, लसूण, हिरव्या मिरच्या आणि कढीपत्ता घालावा. यात आता खोबर्‍याचे काप आणि दाणे निथळून घालावे, हे प्रकरण आच मंद करून एखाद मिनिट परतावं.
यात आता ज्वारीचा भरडा घालून ५ मिनिटं तरी मंद आचेवर परतावं. खमंग सुवास सुटला की यात मीठ, साखर, हळद, लाल तिखट घालून एकदा नीट मिसळून दही घालावं आणि उकळीचं पाणी घालून ढवळावं. गुठळी राहाता कामा नये.

झाकण घालून आंबील शिजू द्यावी. दर मिनिटाला आंबील पाहायला लागते आणि तळापासून ढवळायलाही लागते नाहीतर लगेचच भांड्याला चिकटते भरपूर पाणी असूनही. सो त्यानुसार लक्ष ठेवायचंय आणि समजा लागलंच तर थोड अजूनही पाणी लागेल; शिजेस्तोवर. जरा सैलसर कन्सिस्टंसी हवी फायनल यिल्ड ची.
चांगली शिजली की अगदी गरमागरमच खायला घ्यावी. सोबत एखादं गोड तिखट लोणचं आणि साधं ताक फार मस्त लागतं.

वाढणी/प्रमाण: 
ही विषेश फुलत नाही सो दोन वाट्यांची आंबील दोन लोकांना पोटभरीची होते.
अधिक टिपा: 

- शिजतांना आंबीलीला ऑलमोस्ट सतत पाहायला लागतं.
- एकदम पोटभरीचा प्रकार आहे हा. ज्वारी असल्यानी तसा पचायला हलकाही आहे. रात्रीच्या जेवणाला मस्त पर्याय आहे.
- पारंपारीक प्रकारांत ज्वारीचे धसकटं काढून मग करतात पण या पद्धतीनीही चांगली होते. महालक्ष्मीच्या (गौरी) जेवणातला एक मस्ट प्रकार आहे. आमच्या इथे गोडाची करतात आणि सासरी या पद्धतीनं तिखटाची; अर्थात लसूण वगळून. पण लसणाची आंबील जास्त खमंग लागते.
- भरडा तयार असेल तर २०-२५ मिनिटात तयार होते.
- फोडणीत थोडं किसलेलं आलंही चांगलं लागतं.
- कुकरमध्ये करू नये; हमखास करपते तळाला.
- फार हळद घालून पिवळी जर्द आंबील चांगली नाही दिसत; फिकट पिवळा रंग येइल इतपतच हळद वापरायचीय.

माहितीचा स्रोत: 
बायडी
पाककृती प्रकार: 
प्रादेशिक: 
शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

फोडणी लाड न करता आमच्याकडे ह्या ज्वारीच्या कण्या! थंड ताक घालून प्यायचे .. उन्हाळ्यात आंबील सोबत हेही करतात Happy

मला ज्वारीच्या पीठाची आंबील माहीत होती. भरड्याची आंबील करुन पहायल हवी.
ज्वारीचे पीठ भिजवुन ते आंबवुन त्याची आंबील करुन पाहिली आहे.. ती पण मस्त लागते.

योकु, महालक्ष्म्यांची आंबील पण फोडणीची नाही करत!
आणि पाणी उकळत ठेऊन त्यात आंबट दही व कण्यांचं मिश्रण ओततो. मीठ- मिरची- आलं- खोबरं- मिरपूड चवीनुसार!
हे उकडपेंडी व आंबील चं फ्युजन दिसतंय. Happy

नागपूरला सासरी महालक्ष्म्यांसाठी अशीच करतात, मस्त लागते. केली नाही खूप दिवसांत, आता करून बघायला हवी.

आंबील= ज्वारी कण्या+ ताक +खोबरे काप+मिरी+गूळ+चवीनूसार मीठ . कण्या= ज्वारीच्या कण्या +ताक किंवा पाणी+चवीनूसार मीठ. आमच्याकडे आंबील महालक्ष्मी , आठवी पुजनाचे दिवशी करतात.