सायकलीसंगे जुले किन्नौर- स्पीति ११ (अंतिम): ह्या प्रवासाविषयी विहंगावलोकन

Submitted by मार्गी on 14 October, 2019 - 07:47

११ (अंतिम): ह्या प्रवासाविषयी विहंगावलोकन

सायकलीसंगे जुले किन्नौर- स्पीति १: प्रस्तावना

सायकलीसंगे जुले किन्नौर- स्पीति २: शिमला ते नार्कण्डा

सायकलीसंगे जुले किन्नौर- स्पीति ३: नार्कण्डा ते रामपूर बुशहर

सायकलीसंगे जुले किन्नौर- स्पीति ४: रामपूर बुशहर ते टापरी

सायकलीसंगे जुले किन्नौर- स्पीति ५: टापरी ते स्पिलो

सायकलीसंगे जुले किन्नौर- स्पीति ६: स्पिलो ते नाको

सायकलीसंगे जुले किन्नौर- स्पीति ७: नाको ते ताबो

सायकलीसंगे जुले किन्नौर- स्पीति ८: ताबो ते काज़ा

सायकलीसंगे जुले किन्नौर- स्पीति ९: काज़ा ते लोसर. . .

सायकलीसंगे जुले किन्नौर- स्पीति १०: एक भयाण बस प्रवास

७ ऑगस्टला सकाळी लोसरवरून निघून संध्याकाळी मनालीला पोहचलो. खरंच पूर्ण प्रवासातला हा टप्पा सर्वांत जास्त भयानक आणि तितकाच रौद्र- सुंदरही वाटला. खूप बर्फ अगदी जवळून बघता आला. आता ह्या प्रवासाच्या रिलेव्हन्सविषयी बोलेन. सुरुवातीला सायकलशी निगडीत गोष्टींविषयी बोलतो. सामाजिक विषय घेऊन ह्याआधीही मी काही सायकल प्रवास केले आहेत. पण ह्यावेळी विशेष गोष्ट ही होती की, पहिल्यांदा माझ्या सायकल प्रवासासाठी अनेक संस्था आणि व्यक्ती मदतीला आले. एक प्रकारची स्पॉन्सरशिप मला मिळाली. आधी सांगितलं होतं तसं स्पॉन्सरशिप एक भाग असतो फक्त, बाकीची तयारी, प्रॅक्टीस राईडस आदिशी निगडीत खूप खर्च स्वत:ला करावा लागतो. तरीही, एक सायकलिस्ट म्हणून अशा प्रकारची स्पॉन्सरशिप मिळणे, माझ्यासाठी मोठी गोष्ट आहे. ज्यांनी ह्या प्रवासासाठी मदत केली आणि एक प्रकारे सहभाग घेतला, त्या मंथन फाउंडेशन, रिलीफ फाउंडेशन आणि अन्य सर्व संस्था व व्यक्तींना पुन: एकदा धन्यवाद देतो. हिमाचल प्रदेश आणि अंबालामध्येही मला अनेकांची मदत घ्यावी लागली, त्यांनाही त्यासाठी खूप धन्यवाद. जर मला अशी मदत मिळाली नसती, तर माझ्यासाठी असं सायकलिंग करणं अतिशय कठीण होतं. दुसरी गोष्ट म्हणजे सायकलसाठी मी जी तयारी केली होती, जी व्यवस्था केली होती, ती सर्व अगदी उपयोगी पडली. म्हणजे सायकलच्या प्रचलित महाग टायर्सच्या ऐवजी भारतातले पण अगदी मजबूत टायर्स वापरले. अगदी खडकाळ आणि धोकादायक रस्त्यांवरही एकही पंक्चर झालं नाही! त्याशिवाय माझे सायकल मित्र व सायकल रेसर शेख खुदूस ह्यांनी बनवलेली सायकल पिशवीसुद्धा खूप उपयोगी पडली. आता अशा प्रकारे ट्रेनमधून सहजपणे सायकल कुठूनही कुठे नेता येऊ शकते. एक समस्या नेहमीसाठी सुटली. सायकल चालवण्यासंदर्भात बाकी केलेली तयारीसुद्धा उपयोगी पडली. सायकलीलाही धन्यवाद देतो, तिने काय साथ दिली!


.

सायकल चालवण्यासंदर्भात पुढे नंतर त्रास तर झाला. पण हा त्रास सायकल चालवण्यामध्ये किंवा पेडलिंगमध्ये नव्हता. अशा मोहीमेमध्ये पेडलिंग अगदी छोटा घटक असतो. बाकीची सर्व व्यवस्था- बाकी मॅनेजमेंट ही मोठी गोष्ट असते. म्हणजे चांगला आराम करता येणं, चांगली विश्रांती घेणं (मनाने शांत राहणं, जास्त विचार न करणं), योग्य आहार घेणं इत्यादी. त्यासंदर्भातही ब-याच प्रमाणात मी प्रयत्न केले. पहिल्या आठवड्यामध्ये जास्त त्रास नाही झाला. पण त्यानंतर हळु हळु तब्येतीला त्रास झाला. नंतर खाण्याचे जास्त पर्याय शोधू शकलो नाही आणि मग शरीरानेही साथ दिली नाही. त्यातून मला हे शिकता आलं की, शरीर कितीही फिट असलं किंवा स्टॅमिना कितीही चांगला असला, तरी पुढे जाऊन सर्व काही एडाप्टेबिलिटीवर म्हणजे विपरित स्थितीत टिकाव धरण्यावर अवलंबून असतं. असेही अनेक सायकलिस्ट आहेत ज्यांनी हिमालयात मोठा सायकल प्रवास केला आहे, पण ते कदाचित जास्त फिट नव्हते. कदाचित त्यांना मोठे घाट पायी पायी चढावे लागले, पण त्यांच्यात क्षमता होती की ते विपरित परिस्थितीमध्ये टिकाव धरू शकले. तिथे तग धरू शकले. ही बाब प्रत्येक व्यक्तीसाठी वेगळी असते. मला ह्याची कल्पना होती, म्हणून कधी कधी ठरलेलं रूटीन तोडून कधी रात्री उशीरा जागायचो तर कधी खूप उशीरा खायचो. त्यामुळे शरीर अशा गोष्टींसाठीही तयार राहू शकेल. पण मला ते तिथे शक्य झालं नाही. त्याबरोबर दुसरी एक गोष्ट म्हणजे लहानपणापासून जवळजवळ २६- २७ वयापर्यंत मी‌ अगदी प्रोटेक्टेड आयुष्य जगलो आहे. तोपर्यंत कुठेही कोणत्याच प्रकारची आव्हानात्मक स्थिती किंवा विपरित गोष्टींचा फार कमी अनुभव आला. असुरक्षित आणि अज्ञात जगामध्ये माझी पावलं त्यानंतरच वळली. कदाचित त्यामुळे माझ्यात ही जुळवून घेण्याची क्षमता कमी असेल. असा एखादा असेल ज्याने सर्व प्रकारच्या अडचणी झेलल्या आहेत, अगदी कष्टप्राय जगला आहे, तो माझ्यापुढे गेला असता. आणि त्याचा एक मानसिक पैलूसुद्धा आहे. जर मी हिमाचलमध्ये कुठल्याही दुर्गम जागी एखादा ट्रेक केला असता, तरी मला मनाने ते सोपं गेलं असतं, मी कणखर राहू शकलो असतो. तरीही ज्याने २६- २७ वर्षांपर्यंत अगदी आरामदायी आयुष्य काढलं आहे, त्या व्यक्तीच्या दृष्टीने तर ही एक उपलब्धीच ठरावी. असो. मनालीला पोहचलो तेव्हा महाराष्ट्रातून पुराच्या बातम्या सुरू झाल्या. आणि नंतर माझ्या मूळ योजनेनुसार मी जेव्हा लेहवरून मनालीला जाणार होतो, तेव्हा हिमाचलमध्येही मोठा पाऊस झाला आणि मनाली- लेह हायवे व अन्य रस्तेही अनेक दिवस प्रभावित होते. अनेक पर्यटक अडकले होते. मनाली- लेह हायवेसुद्धा ५० तास बंद होता! ट्रक ड्रायव्हर्सनी पर्यटकांना जेवण बनवून दिलं. मी थोडक्यात त्यातून वाचलो...


.

मी जिथपर्यंत आणि ज्या प्रदेशात सायकल चालवू शकलो, त्यामध्ये अंदाजे ९०% हिमाचल प्रदेश, पूर्ण उत्तराखण्ड आणि जम्मू- कश्मीर व जवळपास ५०% लदाख़सुद्धा येतं. अर्थात् हिमालयात मध्यम व उच्च मध्यम पातळीपर्यंत मी सायकल चालवू शकलो. आणि स्पीतितले रस्ते लदाख़ आणि सिक्कीमच्या तुलनेत इतके चांगलेही नाही आहेत. एक सायकलिस्ट म्हणून ही एक अचिव्हमेंट म्हणायला हवी. त्याबरोबर हिमालयामध्ये सायकल चालवण्याचा चांगला अनुभवही मला मिळाला. आजवरचं जे स्वप्न होतं की, "तिथे" सायकल चालवायची आहे, ते ब-याच प्रमाणात पूर्ण झालं. बाकी जे नाही झालं, तसं तर नेहमीच राहून जाणार. पण ह्यावेळी जे करता आलं नाही, त्याची खंत अजिबात नाही आहे. उलट असं वाटतंय की, मी हिमालयाच्या अगदी अंतरंगातून सायकल चालवली. ८०० मीटर उंचीपासून ४००० मीटर उंचीपर्यंत सायकल चालवत गेलो. त्यामुळे माझ्या मनात जी इच्छा होती, ती ब-याच प्रमाणात शांत झाली. सायकलिंगसोबतच मी आधीच ठरवलं होतं की, ह्यावेळी हिमालयाचे अनुभव सोबत परत आणेन आणि तेही मला बहुतेक जमलं. हिमालयामधून परत आल्यावरही हिमालयासोबतचं अंतर असं जाणवत नाही आहे. इतका उत्कट, इतका विराट आणि जीवंत अनुभव हा आहे की तो आयुष्यभर सोबत राहील. आणि अपूर्व- अविश्वसनीयसुद्धा! हिमालयाची आठवण आणि सोबत सतत राहील. हे काही दिवस माझ्या तारुण्याच्या सेकंड इनिंग्जसारखे गेले! त्यामुळे परत तिथे सायकल चालवण्याची इच्छा अजिबात उरली नाही. जितकी सायकल चालवता आली, त्यातूनच कृतज्ञ झालो, कृतकृत्य झालो!


.

त्यामुळे आता परत हिमालयात किंवा अशी साहसी सायकल मोहीम करण्याची इच्छा उरली नाही. कदाचित हाच अनुभव इतका प्रबळ ठरला की जी कमतरता राहिली, तीसुद्धा दूर करण्याची इच्छा राहिली नाही. २०१५ मध्ये लदाख़मध्ये सायकल चालवली होती, आता स्पीतिमध्ये चालवली. हिमालय तर विराट आणि अनंत आहे! किती वेळेस आणि कुठे कुठे चालवू? कितीही चालवली तरी खूप काही बाकी राहूनच जाईल. त्याउलट जो अनुभव मिळाला, तो खोलवर जाऊन अनुभवायचा आहे. त्यामुळे परत कधी मी हिमालयात अशा प्रकारे सायकल चालवेन, असं वाटत नाही. अगदी त्याप्रमाणे ज्याप्रमाणे हाफ मॅरेथॉन व फुल मॅरेथॉनमध्ये मला नंतर इंटरेस्ट नाही वाटला. मला वाटतं की, जेव्हा आपण एखादा अनुभव संपूर्ण प्रकारे घेतो, त्यामध्ये पूर्ण डुबकी घेतो, तेव्हा त्यामधून आपण कृतज्ञतेसह मुक्तही होऊन जातो. २०१५ मध्ये कदाचित खूप कमतरता राहिल्या, त्यामुळे हिमालयामध्ये सायकल चालवण्याची परत परत इच्छा होत राहिली. ह्यावेळी ती कमतरता दूर झाली आणि आता फक्त शांत वाटतंय.


.

ह्याचा अर्थ सायकल चालवण्याचीच इच्छा राहिली नाही, असा नाही. सायकल चालवणं तर आयुष्याचा भाग बनलेलं आहे. सायकल चालवत राहीनच. पण जेव्हा पुढच्या सायकल मोहीमेचा विचार करतो, तेव्हा वाटतं की, ती क्रिएटीव्ह असायला हवी. फक्त निव्वळ साहस किंवा प्रतिकूलतेतील प्रवास नसावा. त्या सायकल मोहीमेला एक अर्थ असावा, समाजाला त्यातून काही उपयोग व्हावा. मी आरोग्य- एचआयव्ही एडस बद्दल आणि योग प्रसारासाठी जे सायकल प्रवास केले होते, त्याचा तिथे उपयोग झाला. लोकांसोबत संवाद झाला, अगदी छोटं, पण उपयोगी असं कामही झालं. ह्यावेळीही तसा प्रयत्न तर केला होता. काही संस्थांसोबत बोलणं झालं, अनेकांसोबत भेट झाली. हिमाचलमध्ये रामपूर बुशहरामध्ये ASHI आणि HIRD संस्थेच्या सदस्यांसोबत भेट झाली. पण नंतर संपर्क होण्यातील अडचणी, लोक व्यस्त असणं अशा कारणांमुळे तितक्या भेटी नाही होऊ शकल्या. अर्थात् सायकलमध्ये अंतर्भूत जी गोष्ट असते ती होत होतीच. ज्यांनी ज्यांनी मला सायकल चालवताना बघितलं असेल, त्यांच्या मनात सायकलला बघून एक प्रश्न व एक विचार तर आलाच असेल. आणि तिथे मी आरोग्य व पर्यावरणासंदर्भात अनेक गोष्टी बघू शकलो. तिथल्या मजूरांची आरोग्य स्थिती व स्थानिक लोकांच्या आरोग्य समस्या ह्याबद्दल माझी निरीक्षणे समाजापुढे ठेवतच आहे, आपण सर्वांसोबतही‌ शेअर करतो आहे. ह्या सर्व बाबींवर विचार मंथन करण्याचाही एक प्रयत्न करत आहे. तरीही जितकी अपेक्षा होती, तितका सामाजिक उपयोग ह्या प्रवासाचा नाही होऊ शकला. पण हेसुद्धा शिकालया तर मिळालं! सायकल प्रवासामध्ये एक माध्यम म्हणून सायकलचा उपयोग करताना खूप इनोव्हेशन असलं पाहिजे. फक्त खडतर स्थिती किंवा प्रतिकूलता इतक्यापुरतं मर्यादित न राहता समाजासाठी आउटपुट काय आहे, हेसुद्धा बघायला पाहिजे. भविष्यातील सायकल प्रवासामध्ये ह्यावर नक्की विचार करेन. पुनश्च ह्या सायकल मोहीमेमध्ये सहाय्य करणा-या सर्व संस्था आणि व्यक्तींना मन:पूर्वक धन्यवाद देतो. हे वाचल्याबद्दल आपल्यालाही धन्यवाद! पुढच्या लेखामध्ये भेटेपर्यंत आपला निरोप घेतो! धन्यवाद!


.
अशा इतर सर्व लेखांसाठी- माझा ब्लॉग

Group content visibility: 
Use group defaults

छान आढावा, मार्गी.

हिमालयात जायची इच्छा कधीच मरत नसते. थोडा ब्रेक घेऊन झाला की ती इच्छा मनात उसळी मारून वर येईल.

तुम्ही लोसरला पोचलात तो भाग वाचल्यावर एक विचार मनात आला होता. तो फक्त इथे मांडते. तुम्ही त्याच्याशी सहमत असायला हवं असं काही नाही. समजा तुमच्याबरोबर कोणी असतं, इन शॉर्ट तुम्हांला कंपनी असती तर कदाचित फरक पडला असता का असं वाटून गेलं. कारण अश्या वेळेस कोणाची सोबत असली की एक प्रकारचं मोटिव्हेशन मिळतं, जे अश्या परिस्थितीत खूप उपयोगी ठरतं.

छान आढावा, मार्गी.
एकूणच मोहिमेबद्दल तुम्ही तुमचे मत अगदी प्रांजळपणे मांडले आहेत. याआधीही तुम्ही एकट्याने सायकलींग केली असल्यामुळे तुम्हाला सोबतीची आवश्यकता वाटली नसेल. पण आता आऊटडोअर्सने जे लिहीले आहे सोबतीबद्द्ल त्यामुळे त्यावर तुमचे मत वाचायला आवडेल.

काहीही हा मार्गी

त्यामुळे परत तिथे सायकल चालवण्याची इच्छा अजिबात उरली नाही. जितकी सायकल चालवता आली, त्यातूनच कृतज्ञ झालो, कृतकृत्य झालो! >>> हे असं थोडीच असतं. बघ तुला हिमालय परत बोलवणार की नाही.

>>कारण अश्या वेळेस कोणाची सोबत असली की एक प्रकारचं मोटिव्हेशन मिळतं, जे अश्या परिस्थितीत खूप उपयोगी ठरतं.

ह्याचे फायदेही आहेत आणि तोटेही. पण तुमचे विचार वाचायला आवडेल मार्गी. Introspection करणारा हा मालिकेतला शेवटचा लेखही आवडला. तुमच्या पुढच्या मोहिमेचे लेख लवकर येवोत ही सदिच्छा!

सर्वांना मन:पूर्वक धन्यवाद व नमस्कार!! Happy माझी हिमालयात सायकलिंगची जितकी इच्छा होती, तितकी पूर्ण झाली. आणि हिमालय बोलावतोच हे खरंय. तो जेव्हा बोलावेल तेव्हा जावं लागेलच!

@ आउटडोअर्स जी, काही प्रमाणात बरोबर आहे. बराच फरक पडला असता. पण मला नेहमी वाटलेलं आहे, योग्य सायकल सोबती मिळत नाही. कारण वेळ, आवड, इच्छा, तयारी, स्टॅमिना हे सर्व मॅच व्हायला हवेत. तसा मला आजवर कोणी मिळाला नाही. आणि उलट अनेकदा ग्रूप सायकलिंग माझ्या आवडीचं कसं नाहीय, हेच जाणवत आलंय. पण ह्यावेळी सोलो सायकलिंगचाही एक प्रकारचा तोटा जाणवला! कोणी सोबत असतं तर मानसिक ताण तरी बराच कमी झाला असता. अर्थात् हे जर- तर आहे! असो. खूप खूप धन्यवाद.