सायकलीसंगे जुले किन्नौर- स्पीति २: शिमला ते नार्कण्डा

Submitted by मार्गी on 19 August, 2019 - 09:22

२: शिमला ते नार्कण्डा

सायकलीसंगे जुले किन्नौर- स्पीति १: प्रस्तावना

२५ जुलैला ट्रेनने स्पीति- लदाख़ सायकल प्रवासासाठी निघालो. मला निरोप देण्यासाठी अनेक सायकल मित्र व घरचे आले. ट्रेनमध्ये गेल्यावर सायकलची पिशवी सहजपणे बर्थच्या खाली ठेवली. खूप आरामात फोल्ड केलेली सायकल व इतर सामानाची पिशवी बर्थच्या खाली मावली तेव्हा बरं वाटलं. आता सायकल ट्रेनमध्येही आरामात नेता येते आहे! सायकल अशा प्रकारे फोल्ड करण्यासाठी त्याचं कॅरीअर, दोन्ही चाकं, स्टॅण्ड, सीट आणि दोन पेडल काढावे लागतात. काल सायकल पिशवीत भरून ठेवतानाही मित्रांनी खूप मदत केली होती. आता दोन दिवस शिमलापर्यंत पोहचायला लागतील व २८ जुलैपासून सायकल चालवेन. प्रयत्नपूर्वक मनाला वर्तमान काळात ठेवलं आणि ट्रेनच्या प्रवासाचा आनंद घ्यायला सुरुवात केली.

सुपरफास्ट ट्रेन असूनही सचखंड एक्स्प्रेस अगदी हळु जातेय. एके ठिकाणी दिसलं की रुळावर काही काम सुरू आहे व त्यात बहुतेक माती टाकताना गाढवांचीही मदत घेतली जातेय! सोबतचे प्रवासी बाबांना ओळखणारे आहेत! थोडा वेळ सोबतच्या प्रवाशांसोबत माझ्या अभियानाबद्दल बोलणं झालं. मग लवकरच ते जॉब- प्रॉपर्टी- पोलिटिक्स अशा गोष्टींवर बोलायला लागले. मस्त आराम सुरू केला आणि गाण्याचा आनंद घेत राहिलो. थोड्या वेळाने औरंगाबादमध्ये हे लोक उतरले आणि एक छोटं कुटुंब माझ्या कंपार्टमेंटमध्ये आलं. ते आर्मीचे जवान वाटत होते आणि नंतर त्यांनी तेच सांगितलं. औरंगाबादनंतर मनमाडच्या आधी अंकाई- टंकाईचा किल्ला अगदी जवळून बघता आला. योगायोगाने पुढच्या प्रवासात माझं कंपार्टमेंट अर्ध रिकामच राहिलं. सायकलच्या पिशवीमुळे इतर प्रवाशांचं सामान ठेवताना अडचण येणार नाही ना, ही काळजी मला होती. पण शेवटपर्यंत तिथे अर्धे बर्थस रिकामेच राहिले. हळु हळु मिलिटरीतल्या जवानांसोबत बोलणं झालं. त्यांना माझ्या उपक्रमाबद्दल सांगितलं, बोललो की, मी आर्मीच्या जवानांनाही भेटणार आहे. तेव्हा त्यांनी स्वत:बद्दल सांगितलं. ते आर्मी हॉस्पिटल मध्ये काम करतात आणि पीस स्टेशन म्हणजे पंजाबात त्यांचं पोस्टिंग आहे. आत्तापर्यंत डिस्टर्ब्ड एरियाजमध्ये त्यांचं पोस्टिंग झालेलं नाही आहे. पण ह्याचा अर्थ असा नाही की त्यांना अडचणी येत नाहीत. त्यांनी सांगीतलं की, त्यांचे बॉस त्यांना स्वत:ची अनेक कामं सांगतात, मनमानीही करत असतात. हे जवान बीड जिल्ह्याच्या गावचे आहेत आणि त्यांच्या गावाकडचे अनेक युवक आर्मी हॉस्पिटलमध्ये भरती झाले आहेत. ते आणि त्यांची बायको ग्रामीण भागातले आहेत. ते पहिल्यांदाच असे छोट्या मुलीला ट्रेनने नेत आहेत व त्यामुळे त्यांना थोडी अडचण आली. मुलगी खूप वेळ रडत राहिली. आजूबाजूचे प्रवासीही नंतर काळजीत पडले व शेवटी काही बायका आल्या व त्यांनी मुलीला दुध दिलं, तिच्या आईला समजावलं. रात्री उशीरापर्यंत ती छोटी मुलगी रडत होती, त्यामुळे सगळेच प्रवासी थोडे काळजीत होते. असो.

बाकीचा ट्रेन प्रवास आराम करत करतच झाला आणि २६ जुलैला दुपारी अंबाला कँटला पोहचलो. वेळेच्या अर्धा तास आधी ट्रेन पोहचल्यामुळे सायकलची पिशवी काढताना गडबड झाली. ट्रेनवर विशेष गर्दी नाही आहे. पण ही पिशवी अगदी जवळच असलेल्या बस स्टँडवर नेताना मात्र बराच त्रास झाला. एक तर एका दिवसापासून एसीच्या थंडीमध्ये होतो, आता एकदम अतिशय उष्ण वातावरण व आर्द्रता आहे. सायकलचं किट व अन्य एक सॅक त्या पिशवीत आहे व त्यामुळे पिशवीचं वजन वीस किलो असावं. शिवाय एक सॅक माझ्या पाठीवरही आहे- ती तीन- चार किलोची असेल. परभणीत स्टेशनवर येताना अडचण आली नाही. कारण अंतर कमी होतं, पाठीवर सॅकही नव्हती. पण आता उष्णता व आर्द्र हवेमध्ये फक्त पाऊण किलोमीटरचं अंतर चालत जाऊन बस स्टँडवर पोहचताना फार जास्त त्रास झाला! दहा मिनिटांमध्येच घामाने चिंब भिजलो. अगदी शर्ट आणि नंतर पँटही घामाघूम झाली. इतकं छोटं अंतर असूनही परत परत थांबावं लागलं. आणि जास्त त्रास ह्याचा झाला की, दोन तास अंबाला कँट स्टँडवर थांबूनही शिमलाची बस मिळाली नाही. संध्याकाळी दोन बस आहेत, अशी माहिती मिळाली होती. पण इतक्या वेळ थांबूनही बस मिळाली नाही तेव्हा मात्र अवस्था वाईट झाली. एक तर पहाड़ी प्रवासामुळे उलटी होऊ नये म्हणून मी जास्त खाल्ल नव्हतं. त्यामुळे एकदम थकल्यासारखं वाटलं. आणि नंतर वाटलं की, आता बस मिळाली तरी शिमलाला पोहचेपर्यंत रात्रीचे दोन वाजतील. त्यामुळे मग अंबालामध्येच थांबण्याचा निर्णय घेतला. घरातील काही जणांच्या ओळखीतून अंबाला- शिमला इथल्या काही जणांसोबत बोलून ठेवलं होतं. त्यांच्याशी बोललो आणि मग त्यांनी माझ्या मुक्कामाची सोय केली.

अंबालामध्ये असं थांबताना त्रास वाटला. एक तर सायकलची पिशवी उचलून नेताना जो त्रास झाला, त्यामुळे थोडी भिती वाटली. पुढे जे होणार आहे, त्याचं हे ट्रेलर तर नाही? मला नंतर तसे अनेक "ला" म्हणजे पर्वतातले घाट लागतील, पण हा पहिलाच ला- अंबा-ला अवघड गेला. कसंबसं मन शांत ठेवलं आणि आराम केला. दुस-या दिवशी सकाळी अकरा वाजता अंबालाच्या संजयजींनी मला शिमलाच्या व्हॉल्व्हो बसमध्ये बसवून दिलं. हा प्रवास मस्त झाला. बसमधूनच पहिल्यांदा चंडीगढ़ बघितलं! तिथूनच हिमालयाचे डोंगर दिसायला सुरुवात झाली! लदाख़ तर खूप दूर आहे, पण हिमालय पहिल्याच दिवशी भेटला! परवाणू आल्यापासून लगेचच चढ सुरू झाला! सोलनच्या आधी कुमारहट्टीला खूप मोठा जाम लागला. चार तासांमध्ये बस कशीबशी चार किलोमीटर पुढे सरकली असेल. पण आता अतिशय रमणीय दृश्ये सुरू झाली आहेत. सगळीकडे पर्वत रांगा! दूर कुठे तरी खाली लटकलेले ढग! डोंगरातून जाणारी एक रेष दिसली- टॉय ट्रेनचे रूळ! आता देवदार वृक्षांचं राज्यही सुरू झालं आहे. म्हणजे आता रस्ता साधारण १६०० मीटर तरी उंचीवर चढला आहे. ट्रॅफिक जाममध्ये ह्या दृश्यांचा आनंद घेत राहिलो. जाममध्ये अडकलेली एक गाडी दिसली- पाण्याच्या बाटल्या शिमलाकडे जात आहेत. शिमलाच्या दुष्काळाबद्दल ऐकलं होतंच. जाममध्ये असतानाच एक सायकलिस्ट विरुद्ध दिशेने चंडीगढ़कडे जाताना दिसला. उशीरापर्यंत जेव्हा जाम चालू राहिला तेव्हा काळजी वाटली की, शिमलाला पोहचायला उशीर झाला तर? जर शिमलामध्ये रात्री नीट आराम झाला नाही तर मला उद्या थांबावं लागेल व एक दिवस उशीरा नार्कंडासाठी निघावं लागेल. कारण शिमलाच्या २२०० मीटर उंचीवर एक्लमटायजेशन गरजेचं आहे; आराम गरजेचा आहे.


डोंगरातून जाणारे रुळ


अद्भुत नजारे सुरू!

पण नंतर जाम संपला. एका जागी फ्लाय ओव्हरचं काम सुरू आहे, त्यामुळे रस्ता खूपच अरुंद झाला आहे. वाहनांची मोठी रांग व मध्ये मध्ये ड्रायव्हर्सचे वाद होत होते. पण एकदा ती जागा ओलांडल्यानंतर पुढे जाम नव्हता. सोलन आलं, इथे मस्त घाट आहे. पण मध्ये मध्ये रस्ता इतका अरुंद आहे की, ड्रायव्हरला व्हॉल्व्हो बस डावीकडच्या कोप-यात नेऊन तिरपी वळवावी लागते; तेव्हा ती कशीबशी रस्त्यात मावते आहे! हिमाचलच्या बस ड्रायव्हर्सची कीर्ती ऐकली होतीच, त्याचंही उदाहरण मिळालं! सोलननंतर आणखी उंच डोंगर सुरू झाले! अशा भागामध्ये रस्ता असणं हाच एक चमत्कार आहे! आणि अशा रस्त्यावर हे ड्रायव्हर महाशय व्हॉल्व्होला सुसाट पळवत आहेत! पुढचा प्रवास लवकर झाला आणि आठ वाजता शिमला आयएसबीटीला पोहचलो. शिमलामध्ये सगळीकडे ढग आणि धुकं आहे! इथे शिमलामधल्या नेटवर्कमधून ओळखीचे झालेले दोन जण मला रिसीव्ह करायला आले. त्यांनी गेस्ट हाऊसमध्ये माझी राहण्याची व्यवस्था केली. जेवणानंतर उशीर झाल्यामुळे सायकल असेंबल केली नाही. उद्या सकाळीच करेन. आता रात्री चांगला आराम होईल व त्यामुळे उद्या सकाळीच नार्कंडासाठी निघेन.

सकाळी उजाडल्यावर खोलीच्या मागे असलेले देवदार वृक्ष दिसले! सगळीकडे ढग पसरलेले आहेत. सायकल असेंबल करायला सुरुवात केली. सगळं सामान सायकलवर नीट लावलं. त्याला अपेक्षेपेक्षा जास्त वेळ लागला. सगळं सामान घेऊन ट्रायल राईडस तर केल्या होत्या, पण शेवटी प्रत्यक्ष राईड ती वेगळीच! सामान बांधताना अडचणही आली. पण तरी निघायला तयार झालो. बाहेर रिमझिम पाऊस पडतो आहे! ह्या प्रवासात सुरुवातीचे काही दिवस पावसाची भिती वाटत आहे. शिवाय आज पहिलाच दिवस असल्यामुळे मनामध्ये शंकाकुशंका तर भरपूर आहेत! पण जसं निघालो व पेडलिंग सुरू केलं, हळु हळु शिमलामधून नार्कण्डाचा रस्ता विचारत शहरातून पुढे निघालो, तेव्हा मन हलकं होत गेलं. जास्त विचार करण्याऐवजी ह्या क्षणांचा आनंद घ्यायला लागलो. इथे ढग इतके खाली आले आहेत, की जीपीएस कामच करत नाहीय. आणि त्यामुळे माझं सायकल app- strava सुद्धा काम करत नाही आहे. पण माझे पाय चालू लागले. एक रात्र घालवल्यानंतर श्वसन करताना काहीच त्रास नाहीय. सकाळी स्ट्रेचिंग व प्राणायाम केलं त्याचाही उपयोग होतो आहे.

सुरुवातीला तीव्र चढ असल्यामुळे खालच्या गेअर्सवर सायकल चालवतोय. इथलं वातावरण अगदी सह्याद्रीमधल्या घाटांसारखं आहे! ढग, पाऊस आणि भूट्टा! थोडा वेळ चेह-यावर स्कार्फसारखं मास्क लावलं, पण नंतर जेव्हा खूप घाम आला, तेव्हा काढलं. उजेड फार कमी आहे, त्यामुळे सायकलीचा टॉर्च लावला आणि ब्लिंकरही लावला आहे. जेव्हा १५- १८ किलोमीटर पूर्ण झाले, तेव्हा कुफ्रीनंतर उतार मिळाला. इथपर्यंत तसा चांगलाच चढ होता आणि तो पूर्ण केल्यामुळे विश्वासही वाढला. वाटेत एका हॉटेलजवळ दोन सायकली दिसल्या होत्या. नक्कीच इतर सायकलिस्टही ह्या रूटवर आहेत. वाहनांवर प्रेअर फ्लॅग्जही दिसत आहेत! सुमारे ३१ किलोमीटरनंतर ठियोगमध्ये चहा- बिस्कीट घेतले. रस्त्याजवळच सायकल थांबवून चहाचा आनंद घेताना दोन सायकलिस्ट- एक कपल क्रॉस झाले! त्यांनी मला बघून हात हलवला, मीसुद्धा हॅलो केलं. इथली स्थानिक भाषा अगदीच वेगळी वाटतेय! पुढे निघाल्यावर ते दोन सायकलिस्ट मला दिसले. ते स्पेनचे आहेत आणि शिमला- स्पीति- मनाली असे जातील. काही वेळ त्यांच्या सोबत सायकल चालवली. ते खूप अनुभवी आहेत, भारतात, नेपाळमध्ये व तिबेटमध्येही त्यांनी सायकल चालवली आहे. थोड्या वेळाने मला ते माझ्या स्पीडने पुढे जा, असं म्हणाले.

... वेळ लागतोय, पण सायकल चालवताना काहीच अडचण नाही आहे! थोड्या वेळाने तर ढग गेले, ऊनही पडलं. दूरवर ढगांमध्ये पहुडलेले गावं दिसले. तेव्हा टॉर्च बंद केला. तेव्हा कळालं की, माझा ब्लिंकर कुठे तरी पडला आहे! थोडा वेळ वाईट वाटलं. पण लवकरच ते वातावरण, नजारे आणि राईडचा आनंद ह्यामुळे बरंही वाटलं. साधारण साडेचारला नार्कण्डाला पोहचलो. साडेसात तास लागले! आणि नार्कंडाला पोहचल्या पोहचल्या तुफान पाऊस सुरू झाला आणि तो दोन तास सुरू होता. सुरुवातीला एका हॉटेलमध्ये चहा घेतला, रूमची चौकशी केली. मग शिमलाच्या लोकांसोबत बोलून रेस्ट हाऊसमध्ये खोली मिळवण्याचा जुगाड केला. पाऊस इतका तीव्र आहे की, थोडंही पुढे जाणं कठीण झालं. रेस्ट हाऊसमध्ये मस्त आराम केला, जेवणही केलं. ह्या सायकल मोहीमेतला पहिला दिवस मस्त गेला. आज तसा बराच मोठा चढ होता, २२०० मीटर वरून मी २७०० मीटर उंचीवर आलो. पण त्रास काहीच झाला नाही. नार्कंडामध्ये पावसामुळे व थकल्यामुळे नंतर जास्त कोणाशी बोलता आलं नाही. संध्याकाळी थोडं फिरून आलो. माझं हेलमेट सायकल पिशवीत दबलं होतं, त्याला टेप लावली. उद्याच्या नाश्त्यासाठी केळीही आणली. काय दिवस होता पण! पहिल्याच दिवशी सुमारे ६३ किलोमीटर सायकल चालवली!


नार्कण्डा!


आजचा रूट मैप


चढ

पुढील भाग- सायकलीसंगे जुले किन्नौर- स्पीति ३: नार्कण्डा ते रामपूर बुशहर

अशा इतर सर्व लेखांसाठी- माझा ब्लॉग

Group content visibility: 
Use group defaults

मस्तच......तुमच्यासोबत आम्हा वाचकांचीही ट्रीप होतेय चकटफू.....पुढच्या प्रवासाबद्द्ल खूप उत्सुकता आहे

.

..

मार्गी, खुप छान लिहिलंय.
मस्त ट्रिप. तुम्हा ट्रिप/ट्रेकिंग/सायकलिंग/मॅरेथॉन करणारांच कौतुक वाटतं खरंच.

मस्त वर्णन आणि साजेसे फोटो, नार्कंडाच्या पाटीचा धुक्यात बुडलेला फोटो बघून खतरनाक वाटतय
आपल्याकडे असलं धुकं म्हणजे रोमँटिक वाटतं पण हिमालयात पाऊस आणि धुकं म्हणलं की पाठोपाठ लँडस्लाईडच्या भितीने पोटात बाकबुक होते.

पहिल्याच दिवशी ६३ म्हणजे मस्त झालं
पुढचे भाग येऊ दे लवकर